Saturday, March 17, 2018

पाणी संरक्षणासाठी जगभरात होताहेत प्रयत्न


     पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय मनुष्य,प्राणी आणि वनस्पती यांचे जीवन अशक्य आहे,याची कल्पना आपल्याला आहे. पण पाण्याची नासाडी करताना आपण हे विसरून जातो. कारण अजून आपल्याकडे मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. दोन-चार दिवसांतून नळाला पाणी आले तरी आपण घरातील सर्वच्या सर्व भांडी भरून ठेवतो आणि त्याचा वापर बिनधास्तपणे करत राहतो. कारण आपण पुढचे पाणी येईपर्यंत पाण्याची व्यवस्था केलेली असते. पण मोटर जळाली किंवा अन्य काही अडचण निर्माण झाली तर मात्र आपल्याला पाण्याची किंमत कळते. पण वळत नाही. आपण पुन्हा ये रे माझ्या मागल्या... प्रमाणे वागत राहतो. पण आपल्याला इथे नमूद करावे लागेल की, आपण पाण्याची नासाडी अशीच करत राहिलो तर आपल्याला फार मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. आपल्याकडे पाणी मिळते, परंतु काही देशांमध्ये पाणी महत्प्रयासाने मिळवावे लागते.यासाठी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागते. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन काही देशांनी जलसंरक्षणासाठी टेक्नॉलॉजीचा आधार घेतला आहे. थेंब थेंब पाणी वाचवण्यासाठी काही देश धडपडत आहेत.
     पाण्याची टंचाई आपल्या देशाबरोबरच संपूर्ण जगाची समस्या बनली आहे.त्यामुळे आपल्याला घरातील वडिलधारी माणसे किंवा शाळेत पाठ्यपुस्तके, शिक्षक पाणी वाचवण्याचे फंडे सांगत असतात.टपकणारा नळ बंद कर, टाकीतील पाणी सांडू नकोस, यासारखे उपाय आपल्याला सांगितले जाते. आपल्याला लागेल तेवढेच पाणी ग्लासात घ्यायला किंवा पाणी घेण्यासाठी वगर्याळचा वापर करायला सांगितले जाते. जलसंरक्षणाचे हे प्रयत्न आवश्यकच आहेत. पण फक्त यामुळे जलसंकट हटणार नाही. आपल्या घरापर्यंत पाणी नदी,तलाव,कुपनलिका याद्वारे येत असते. जर यांचा जलस्तर कमी झाला तर मात्र तुम्ही घरात कितीही पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा, शेवटी ते संपणारच! जर नदी,तलाव,जमिनीतीलच पाणी संपले तर काय? या गोष्टी गांभिर्याने लक्षात घेऊन काही देशांनी यावर जालीम उपाय शोधून काढले आहेत. यासाठी त्यांचा नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाखाणण्यासारखा आहे.
     आपल्याला माहित आहे, पृथ्वीचा 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पण त्यातील फक्त तीन टक्के पाणी स्वच्छ आणि आपल्या वापरण्याजोगे आहे. स्वच्छ पाण्याच्या स्त्रोतांचा विचार केला तर पावसाचे पाणी हेच सर्वात स्वच्छ पाणी आहे.काही ठिकाणी हिमालयातील बर्फ वितळून पाणी उपलब्ध होते. जगभरात पेयजलचे संकट लक्षात घेता सऊदी अरब, इस्त्राईल, इराणसारखे देश जलसंरक्षणाचे हटके मॉडेल्सवर काम करीत आहेत.
सऊदी अरबमध्ये समुद्री पाण्याचे डिसॅलीनेशन
सऊदी अरब अनेक वर्षांपासून समुद्री पाण्याचे डिसॅलिनेशन ( अलवणीकरण) द्वारे पाणी पिण्यालायक बनवत आहे. हा देश जगातला डिसेलायनेटेड वॉटरचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. महत्त्वाचे म्हणजे समुद्राचे खारे पाणी पिण्यालायक गोडे बनवताना ऊर्जा आणि आर्थिक  यांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर लक्षात घेऊन सऊदी अरबने अलिकडेच सौर ऊर्जेवर चालणारे प्लांट बसवले आहेत. वाळवंटी प्रदेशाचा विस्तार लक्षात घेता सौर ऊर्जा इथे मुबलक प्रमाणात अनायसे उपलब्ध होते. जगातला सर्वात मोठा सौर ऊर्जेवर चालणारा डिसेलायनेटेड प्रकल्प अरब देशात आहे. हा प्रकल्प अल खाफजी शहरात असून 2019 पर्यंत संपूर्ण देशातले प्लांट सौर ऊर्जेने जोडण्याचा निश्चय केला आहे.
इराण जियोथर्मल रिन्यूएबल एनर्जीद्वारा स्वच्छ पाणी

इराणमधल्या मिलोंस बेटावर ज्वालामुखी आर्कच्या कारणामुळे भू-तापीय अक्षय ऊर्जा मोठ्या प्रमाणात मिळते. इथे मॅग्मा आसपासच्या मोठ्या दगडांना गरम करते. दगडांमध्ये निर्माण झालेले गरम पाणी जलवाहिन्यांद्वारा भूमिगत असलेल्या विहिरींमध्ये टाकले जाते.इथे त्याचे बाष्पात रुपांतर होते. त्यामुळे टर्बौइन सुरू होऊन ऊर्जा निर्माण होते. भू-तापीय ऊर्जाचा वापर समुद्राचे खारे पाणी गोड पाण्यात परावर्तित केले जाते. याचा उपयोग सिंचनासाठी आणि पिण्यासाठी केला जातो. यामुळे इराणमधील ही नवी जियोथर्मल डिसेलायनेटेड योजना एक आदर्श योजना म्हणून जगभरात नावाजलेली आहे.
   युनायटेड किंगडमची वॉटर मिटरिंग टेक्नॉलॉजी
युनायटेड किंगडम स्मार्ट वॉटर मिटरिंग टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. यामुळे इथल्या रहिवाशांना पाण्याच्या वापराविषयीची माहिती ऑनलाइन मिळते. या माहितीच्या आधारावर इथल्या लोकांना पाण्याच्या वापराबाबत खबरदारी घेता येते. लक्ष ठेवता येते. या स्मार्ट मीटरमुळे पाण्याबाबतची अगदी सुक्ष्म माहिती उपलब्ध होते. पाण्याचा वापर कसा आणि किती केला जात आहे. पाण्याचा वापर वाढला आहे का? त्याचबरोबर जलसंरक्षणाबाबत उपायदेखील सांगितले जातात. या सगळ्या गोष्टी वापरकर्त्यांना जाग्यावर ऑनलाइन समजून येतात. शिवाय पाणी संरक्षणासाठी त्यांना प्रोत्साहितही केले जाते. 2030 पर्यंत देशातल्या प्रत्येक घरात हे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे.

कॅलिफोर्नियातील अनोखे डिसेलायनेटेड संयंत्र
अमेरिकेतील कॅलिफोर्निया पुन्हा एकदा ऐतिहासिक दुष्काळाच्या तावडीत सापडला होता. त्यामुळे या प्रदेशाला वेस्टर्न हेमिस्फेयरच्या सर्वात मोठ्या डिसेलायनेटेड संयंत्र बसवण्यास भाग पडले. हे संयंत्र 10 मैलापर्यंत पाण्याची डिलिवरी जलवाहिनीच्यामाध्यमातून करते. हे संयंत्र रोज 50 दशलक्ष गॅलन समुद्री जलाचे स्वच्छ आणि गोड पाण्यात रुपांतर करते. कॅलिफोर्नियातील ही योजना जगातील सर्वात प्रगत योजनांपैकी एक आहे.
जलसंरक्षण तंत्रज्ञानात सर्वात पुढे इस्त्राइल
इस्त्राइल नेहमीच जलसंरक्षणाच्याबाबतीत सर्वात पुढे राहिला आहे. याला कारण म्हणजे येथील वाळवंटी प्रदेश! पण आज स्वच्छ पाण्याची गरज लक्षात घेता जवळपास 85 टक्के अशुद्ध पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य बनवले जात आहे. हे तंत्रज्ञान इस्त्राइल अन्य देशांना विकून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ उठवत आहे. इस्त्राइलचा अंदाज असा आहे की, 2020 पर्यंत त्यांच्या कृषी क्षेत्राला लागणारी 50 टक्के आर्थिक मदत फक्त पाण्याच्या रिसायक्लिंगच्या माध्यमातून मिळून जाईल. इस्त्राइलने असे तंत्रज्ञान शोधले आहे की, सगळ्यात घाण पाणी किंवा कसले तरी खारे पाणी  असू दे,त्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर करण्याची क्षमता आहे.विशेष म्हणजे हा देश दुसर्या देशांनादेखील पाण्याची निर्यात करतो.
आगामी काळात पाण्याचे वाढते संकट लक्षात घेऊन आपल्याही देशाला अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचे संयंत्र बसवण्याचे काम आपल्या देशातही मोठ्या वेगाने सुरू आहे. समुद्र किनारी असलेल्या शहरांमध्ये यावर सध्या काम सुरू आहे. मात्र आपल्याकडे मिळणार्या पावसाचे पाणी जिरवण्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे.यासाठी अधिक आणि वेगाने काम करावे लागणार आहे.जलयुक्त शिवारसारखे प्रयोग महाराष्ट्रात राबवले जात आहेत. त्याला यहशी मिळत आहे,पण यातही अजून फार मोठे काम करावे लागणार आहे. शासनाचा सहभाग आणि लोकांचा सहभाग यातून फार मोठे काम होऊ शकेल,यासाठी शासन पातळीवर मोठे काम हाती घेण्याची आवश्यकता आहे. (world water day 22 march)

No comments:

Post a Comment