Friday, March 16, 2018

पुरातत्त्व विषयात खोल शिरायचंय?


     आर्किऑलॉजी हे खरंच एक आव्हानात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात येताना विद्यार्थ्यांनी मुळात आर्किऑलॉजी म्हणजे काय, हे जाणून घेण्याची गरज आहे. साधारणपणे 'स्टडी ऑफ ह्युमन पास्ट इन प्रेझेंट'अशी आर्किऑलॉजीची व्याख्या लिहिली जात असली तरी हे क्षेत्र फक्त आधी घडलेल्या एखाद्या घटनेचा अभ्यास करत नाही. तर, मानवाच्या इतिहासाचे जे काही अवशेष, पुरावे आज, अस्तित्वात आहेत, त्यांचा केलेला अभ्यास म्हणजे आर्किऑलॉजी. अभ्यास म्हणून पहायचं झालं तर आर्किऑलॉजी हा असा विषय आहे, ज्यामध्ये वेगवेगळी शास्त्र (सायन्सेस) वापरून माणसाच्या भूतकाळाचा अभ्यास केला जातो.

     माणसाशी निगडीत सर्व शास्त्र यामध्ये अभ्यासली जातात. उदा. एखाद्या ठिकाणी अवशेष सापडले, तर, ते किती वर्ष जुने आहेत, हे ओळखण्यासाठी डेटिंगची पद्धत वापरली जाते. अशा वेळी फिजिक्स विषयात अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. एखाद्या ठिकाणची माती, दगड, धातूच्यावस्तू सापडल्या तर, त्याचं परीक्षण करण्यासाठी जिऑलॉजी म्हणजेच भूशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं. एखादं नवं शहर सापडलं तर, लोक कुठे राहत असतील, मग ते नदीच्या किनारी राहायचे का, हे भूगोल विषयातील तज्ज्ञ सांगू शकतात. एखाद्या उत्खननात हाड सापडली तर, आंथ्रोपॉलॉजिस्टला त्याचा अभ्यास करायला सांगितला जातो. हाडं जनावरांची असल्यास जिऑलॉजिस्ट ती तपासतात. सापडलेल्या धान्यावर एखादा बॉटोनिस्ट अभ्यास करतो. या लोकांनी काढलेली वेगवेगळी अनुमानं या क्षेत्रात तपासून पाहतो. त्यामुळे वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करणार्‍या किंवा शिकलेल्या विद्यार्थ्यांना हे क्षेत्र खुलं आहे. म्हणजेच या आणि अशा सगळ्याच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आर्किऑलॉजी हा पर्याय खुला आहे.
     कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे क्षेत्र खुलं असलं तरी, त्यासाठी पदवी नंतर एमए करणं गरजेचं असेल. असा एमए इन आर्किऑलॉजीचा अभ्यासक्रम महाराष्ट्रात पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. भारतातलं आर्किऑलॉजीचं सर्वात उत्तम शिक्षण देणारं ठिकाण म्हणून हे कॉलेज ओळखलं जातं. तसंच घरापासून दूर जाऊन अभ्यास करायची तयारी असेल तर, बडोद्याचं सयाजीराव विद्यापीठ हा एक उत्तम पर्याय असू शकतो. इथे बीए इन आर्किऑलॉजी हा पदवी अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. शिवाय काशीचं बनारस हिंदू विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ, शांती निकेतन, अलिगड मुस्लिम विद्यापीठ या सर्व ठिकाणी जाऊन तुम्हाला एमए इन आर्किऑलॉजी हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकता येईल.
     या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. उत्खनन, संवर्धन या गोष्टी प्रामुख्याने त्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातूनच शिकवल्या जातात. तसंच एन्व्हायरमेंटल सायन्सेस, बायोलॉजिकल सायन्सेस, थिअरी अँड मेथड, भारताची आर्किऑलॉजी, आर्ट हिस्ट्री, नाणेशास्त्र, लिपीशास्त्र, म्युझिऑलॉजी आदी विषय या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकवले जातात. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातील एक विषय निवडून त्यावर स्वत:चं संशोधन करत एक प्रबंधही लिहावा लागतो.
एमए इन आर्किऑलॉजीनंतरही विद्यार्थ्यांना या क्षेत्रात शिक्षणाची दारं बंद होत नाहीत. हा अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक विद्यार्थी संशोधन करतात. तर अनेक जण एखादा विषय घेऊन त्यात पीएचडी करतात. पण, या क्षेत्रात येत असाल तर, फक्त एमए करून चालणार नाही. पुढेही शिक्षण घेणं गरजेचं आहे. आपल्या या शाखेतील आवडत्या विषयात विद्यार्थ्यांना काही स्पेशलाइज्ड डिप्लोमा अभ्यासक्रम करणं फायद्याचं ठरेल. शिवाय एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप केल्यास त्याचा निश्‍चितपणे फायदा होऊ शकतो. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना अनुभव तर मिळेलच पण, विविध नोकर्‍यांनाही आकर्षित करता येईल. पुढे, अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या म्युझिअममध्ये नोकरीच्या संधी आहेत. 
     संवर्धन क्षेत्रातही या विद्यार्थ्यांना मोठी भूमिका बजावता येईल. हेरिटेज टुरिझम क्षेत्रात या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. झपाट्याने वाढणार्‍या या क्षेत्रात ताजमहाल, फत्तेपूर सिक्री ,रेड फोर्ट, आदी ठिकाणे बघायला लोक परदेशातून मोठय़ा संख्येने येतात. त्यावेळी या क्षेत्रात या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. हेरिटेज टुरिझ हे क्षेत्र या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी असू शकते. आवड म्हणून या क्षेत्रात येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही खूप आहे. अशा विद्यार्थ्यांना आपल्या नेहमीच्या पदवीसह हा अभ्यासक्रम शिकता यावा म्हणून मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाने देखील एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यार्थी त्याचा निश्‍चितपणे विचार करू शकतात. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी तर इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतीलच. पण, विविध ठिकाणांना भेटी देऊन उत्खनन म्हणजे काय, हे शिकताही येईल. त्याची माहिती विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

No comments:

Post a Comment