Monday, May 21, 2018

गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणारे स्वातंत्र्य सैनिक: सुधांशू बिस्वास


     ही गोष्ट 1918 ची आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे रामकृष्णपूर. या गावात राहणारे बहुतांश लोक रामकृष्ण मिशनशी जोडले गेले होते. याच गावातल्या कुटुंबात सुधांशू यांचा जन्म झाला. इतर गाववाल्यांप्रमाणे त्यांच्याही कुटुंबातील सदस्य रामकृष्ण मिशनचे अनुयायी होते. यामुळे त्यांना लहानपणापासून साधेपणा आणि शिस्त यांची शिकवण मिळाली होती.त्यांचे प्राथमिकपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतरच्या शिक्षणासाठी त्यांना घरच्यांनी कोलकात्याला पाठवले. त्यांच्या घरच्यांची इच्छा होती की, मुलाने चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी.परंतु, त्यांना काय ठाऊक की, शहरात गेल्यावर मुलाच्या जीवनाची दिशाच बदलून जाईल म्हणून. वास्तविक, ज्या दिवसांमध्ये सुधांशू बिस्वास कोलकात्याला पोहचले, त्या दिवसांत संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य चळवळ सुरू होती. कोलकाता शहरातदेखील सर्वत्र वंदे मातरम आणि इंग्रजांनो, भारत सोडून जा असे नारे ऐकायला मिळत होते.
   
 ते तेव्हा सातवी इयत्तेत शिकत होते. महान स्वातंत्र्य सेनानी बेनी मधाब दास, बीना दास आणि कल्याणी दास त्यांचे शिक्षक होते. कोलकाता सामाजिक आणि राजकीय उलथापालथीचे केंद्र बनले होते. शाळेच्या कॅम्पसमध्ये सतत सभा आणि चर्चा होत राहायच्या. अशा परिस्थितीत, ते मग स्वत:ला कसे रोखणार? एक दिवस त्यांची भेट स्वातंत्रसेनानी नृपेन चक्रवर्तींशी झाली. सुधांशूने त्यांच्याशी चळवळीविषयी खूप अशा गोष्टी ऐकल्या. खास करून ब्रिटिश शासनाची क्रूर वृत्ती आणि स्वातंत्र्य मोहिमेबाबत. यानंतर त्यांच्यात वारंवार भेटी होऊ लागल्या.
     यथावकाश तेही स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले. वास्तविक त्यांना शिक्षणासाठी शहरात पाठवण्यात आले होते, पण आपसूक स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले. ते दोनदा महात्मा गांधीजींना भेटले.त्यांना भेटून खूप प्रभावित झाले होते ते! पण अनेक प्रयत्न करूनही त्यांची आणि सुभाषचंद्र बोस यांची भेट झाली नाही. चळवळी दरम्यान एकदा कोलकात्याच्या अलबर्ट हॉलमध्ये सगळे स्वातंत्र्य सेनानी एकत्र आले होते. तिथे ब्रिटिश सरकारविरोधात रणनीती आखली जात होती. मोठमोठे नेते उपस्थित होते. सुंधाशूदेखील गेले होते. तेव्हा ब्रिटिश पोलिसांना या बैठकीचा सुगावा लागला. त्यांनी अचानक तिथे हल्ला चढविला. हॉलमध्ये मोठा गोंधळ उडाला. सगळ्या स्वातंत्र्य सेनानींना अटक करण्यात आली. ज्यांना ज्यांना पकडण्यात आले होते, त्यांना त्यांना पोलिसांचा मार खावा लागला होता आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. परंतु, सुंधाशू तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. जरी पोलिस त्यांना पकडू शकली नसली तरी ते सरकारच्या नजरेत आले होते. त्यांच्या दैनंदिन व्यवहारावर लक्ष ठेवले जाऊ लागले.
     ही 1939 ची गोष्ट आहे. सुधांशू मॅट्रिकची परीक्षा देत होते. परीक्षा हॉलमध्ये अचानक धावपळ उडाली. तिथे पोलिस आले आणि त्यांना अटक करून घेऊन जाऊ गेले. त्यांच्या हातातला पेपर हिसकावून घेण्यात आला. पण नंतर त्यांना पोलिसांच्या देखरेखीखाली परीक्षा देण्याची परवानगी मिळाली. ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. या घटनेनंतर मात्र त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची उत्कटता आणखी गडद झाली. 1942 मध्ये ते अनुशीलन समितीमध्ये सामील झाले. बीरभूममधील ब्रिटिश प्रशासनावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना कोलकाता सोडून जावे लागले.
     शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे स्वप्न पूर्ण झाले. पण लवकरच त्यांना जाणवले की, फक्त इंग्रजांना पळवून लावणे एवढेच एक काम नाही. अजून देशासाठी खूप काही करायचे बाकी आहे. त्या काळात गरिबी,बेरोजगारी, अज्ञान यांसारख्या विक्राळ समस्या देशासमोर होत्या.1950 मध्ये ते स्वामी विवेकानंद यांच्या आरके मिशनच्या संपर्कात आले. त्यांच्या मनात जीवन आणि तत्त्वज्ञान समजून घेण्याची अशी काही उत्कंठा निर्माण झाली की, त्यांनी घरदार सोडून हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केले. जवळजवळ 14 वर्षे त्यांनी साधनेत घालवली. अनेक साधू-संत आणि ज्ञानी लोकांना भेटले. काही काळ त्यांनी बनारसमध्ये घालवले. समाजातील विसंगती आणि गरजा समजून घेतल्यानंतर 1961 मध्ये ते एक नवे लक्ष्य घेऊन  कोलकात्याला परतले. आता त्यांचे लक्ष्य होते, समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्याचे! माणसाच्या जीवनातला अंध:कार दूर करायचा असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणत.
सुधांशू यांनी गरीब आणि अनाथ मुलांना शिक्षण देण्याचे ठरवले. यासाठी पैशांची गरज होती. त्यांनी प्लास्टिकचा उद्योग सुरू केला. काही पैसे गोळा झाल्यावर त्यांनी गरीब मुलांसाठी एक शाळा सुरू केली. याचे नाव ठेवले रामकृष्ण सेवाश्रम. आपल्या गावातच म्हणजे रामकृष्णपूरमध्येच त्यांनी ती शाळा उघडली. आता सध्या सुंदरबनमध्ये 18 रामकृष्ण सेवा आश्रम चालू आहेत. त्यांचे म्हणणे असे की, देशाला आनंदी बनवण्यासाठी शिक्षण सर्वात मोठी गरज आहे. पण गरीब माणूस जो आपल्या मुलांना पोटभर अन्न देऊ शकत नाही, तो त्यांना काय शिकवणार आहे?
     व्यवसाय आणि मुलांचे शिक्षण-देखभाल या दोन्ही गोष्टी सांभाळणं त्यांना अवघड जाऊ लागलं. शेवटी त्यांनी उद्योग बंद केला. आपले संपूर्ण आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी झोकून दिलं. त्यांच्या या शाळांमध्ये मुलांना राहण्या-खाण्याची आणि शिक्षणाची मोफत व्यवस्था आहे. मुले त्यांना दादू म्हणून बोलवतात. 99 व्या वर्षीही ते समाजसेवेत सक्रिय आहेत. मुलांच्या शिक्षणाशिवाय ते गावातल्या गरिबांना मोफत औषधे पुरवण्याचेही काम करतात. आयुर्वेदाचे ते गाढे अभ्यासक आहेत. त्यांच्या या शिक्षण आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. याच वर्षी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment