Monday, May 21, 2018

पावसाचे मित्र


पाऊस! हे नाव ऐकताच तुमचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो.तुमच्यामध्ये एक नवा उत्साह येतो. कुठे त्या बंद बाथरुममध्ये आंघोळ करणं आणि कुठे मोकळ्या आभाळाखाली, नैसर्गिक शॉवरखाली आंघोळ करणं आणि बागडणं. फक्त विचार केला तरी मन पावसाशिवाय चिंब भिजायला लागतं. पाऊस म्हणजे फक्त  आकाशातून पाणी बरसणं नव्हे! पाऊस म्हणजे एक जीवन आहे. तो या पृथ्वीवरील जीव-जंतू,प्राणी-वनस्पती आणि मानवाला जीवन देतो. त्यामुळे सगळेच त्याची आतुरतेने वाट पाहात असतात. चला तर मग, आज आपण पाऊस आणि त्याचे काही मित्र यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊ.


पाऊस आणि पर्वत 
पहाड-पर्वत,डोंगर-दरे फिरायला तुमच्यातल्या काही जणांना फार फार मज्जा येत असणार, नाही का? पण तुम्हाला माहीत आहे का की, पावसालादेखील हे डोंगर, हे पर्वत फार फार आवडतात.खरं तर पाऊस पाडायला पर्वत-पहाडांचा फार मोठा हातभार लागतो.त्याचं होतं  असं की, बाष्पाने भरलेल्या वाऱ्याच्या मार्गावर जेव्हा पर्वत आडवे येतात,तेव्हा त्यांना ओलांडून पुढे जाण्यासाठी वाऱ्याला आणखी उंच वर जावे लागते.त्यामुळे हवा प्रसरण पावते. असे झाल्याने पर्वतांवर जमा झालेला बर्फ आणि त्याचा गारवा यामुळे त्यांच्यातील उष्णता कमी होते.हवा थंड झाल्यावर हवेत असलेला बाष्प थेंबाच्या रूपाने खाली जमिनीवर बरसायला लागतो.


पाऊस आणि शेतकरी 
तुम्हाला माहीत असेल, आजदेखील आपला देश कृषीप्रधान आहे. 60 टक्क्यांपेक्षा अधिक लोक खेड्यात राहतात.शेती आणि शेतीनिगडीत व्यवसाय करतात. शेतीसाठी पाण्याची गरज असते.ही गरज नद्या पूर्ण करतात. पण आपल्या देशात सगळीकडे काही नद्यांचे खोरे नाहीत. आपल्या देशातला बहुतांश प्रदेश हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. नदी अडवून धरणे बांधण्यात आली आहेत. काही ठिकाणी भूगर्भातल्या पाण्याचा वापर केला जात आहे.विहिरी,विंधन विहिरी,तलाव यांच्यामार्फत शेतीसाठी पाण्याची गरज भागवली जाते.पण ही सिंचन यंत्रणादेखील सर्वत्र आहे, असे नाही. आजही फार मोठा प्रदेश कोरडवाहू आहे.आणि इथे पावसाशिवाय शेती करणे अशक्य आहे. पाऊस पडल्याशिवाय विहिरी,तलाव,विंधन विहिरी यांनादेखील पाणी येत नाही. म्हणूनच शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात असतो.

पाऊस आणि बेडूक 
पाऊस पडून झाल्यावर तुम्ही कधी पार्कमध्ये किंवा तलावाकाठी गेला आहात का? गेला असाल तर तिथे तुम्हाला डरांव डरांव असा कोलाहल ऐकायला आला असेल.हा कोलाहल बेडकांचा असतो. यांना पावसाच्या पाण्यामुळे एक प्रकारचे नवे जीवन मिळालेले असते. वास्तविक,बेडूक मुख्यत्वे करून पाण्याचा निवासी आहे. शहरीकरण वाढले तसे त्यांची घरे असलेल्या नद्या,तलाव आपण हिरावून घेतले आहेत. अशी कुठे जागाच आपण ठेवली नाही,जिथे हे राहू शकतील. असे असले तरी ते आपल्याजवळ राहायला उतावीळ असतात. जरा जरी थोडे फार पाणी साचलेले तरी ते त्यांना पुरेसे आहे. ते लगेच तिथे राहायला जातात. आपलं घर बनवतात. पण ज्यावेळेला पाऊस दया करत त्याच्यावर बरसतो,तेव्हा ते अगदी आनंदाने 'डरांव... डरांव' करत पावसाला धन्यवाद देतात.

पाऊस आणि मोर

मोर एक असा पक्षी आहे,ज्याला पावसाची प्रतीक्षा सर्वाँपेक्षा अधिक असते.पावसाचे ढग पाहिल्यावर सर्वात अगोदर आनंद होतो मोराला! ते पाहूनच तो नाचायला लागतो.त्याला नाचताना पाहून लोक ओळखतात की, आता पावसाळा दूर नाही.पावसाच्या वेळी मोर नाचतो त्याला आणखी एक कारण आहे. खरे तर ढगांना पाहून मोर तिच्या लांडोरला आकर्षित करण्यासाठी नाचू लागतो. मोराला मोठे पंख असतात. ज्यावेळेस तो पंख पसरून नाचतो,त्यावेळेस एक अद्भूत असं दृश्य तयार होतं.त्याच्या पंखांवर जे रंग आहेत,त्यावर पावसाचे थेंब पडतात,तेव्हा ते आणखी चमकदार होतात. लांडोर ते पाहून खूप आनंदी होते.

पाऊस आणि वर्षावने
पावसामुळे वर्षावने हिरवीगार डवरतात. त्यांना जगाला  'ऑक्सिजनचे सप्लायर' म्हटले जाते.पण या वनांमधल्या झाडांना फ़ुलं-फळं लगडतात.त्यासाठी पाण्याची गरज असते.ती पावसामुळे मिळते.धुवाँधार पाऊस वनांमधल्या झाडांना  वर्षभर हिरवंगार ठेवण्याचे काम करतो. हीच वने पावसाला रिटर्न गिफ्टच्या रूपाने जगाला ऑक्सिजनचे भांडार पुरवतात.

पाऊस आणि ओरांगउटान

ओरांगउटान हा माकड प्रजातीतील एक विशाल प्राणी आहे.ज्यावेळेस पाऊस पडतो,त्यावेळेस तो नखरा दाखवत कुठे गुहेत किंवा आणखी कुठे सुरक्षित आश्रयाला न जाता तो आहे त्या ठिकाणी थांबतो. त्याला पावसात भिजायला आवडतं,पण पाणी मात्र त्याला डोक्यावर पडलेलं आवडत नाही. त्यामुळे तो पाऊस येणार आहे म्हटल्यावर पानांची टोपी बनवून घेतो. मग तो अगदी कुठेही असला तरी पावसाचा आनंद घेतो.

पाऊस आणि हिप्पो 
मूळचा आफ्रिकेतला निवासी असलेला हिप्पो म्हणजेच पाणघोडा कदाचित तुम्ही प्राणी संग्रहालयात वगैरे पाहिला असेल.त्यांना वाटलं तर ते कधीच पाण्याबाहेर यायचे नाव घेत नाहीत. वास्तविक, त्यांच्या शरीरावर चरबीची थप्पी असते. त्यामुळे त्याला उकाड्याचा फार त्रास होतो.त्याचे पावसावर फार प्रेम असते. बरसणाऱ्या पावसाळ्यात हिप्पो नदी, सरोवरे सोडून बाहेर पडतात.कारण त्यांना पावसाचे स्वच्छ पाणी फार आवडते.

पाऊस आणि खार 

खार सर्वांनाच आवडते. ती एवढीशीच असते,पण तिच्यापेक्षा तिची झुपकेदार शेपटीच आपल्याला अधिक नजरेत भरते.पावसाशी तिचे काही कुठे शत्रुत्व वगैरे नाही.पण तिला पावसाचे पाणी तिच्या सुंदर शरीरावर पडलेलं आणि ते भिजलेलं अजिबात आवडत नाही.शरीर पावसाने भिजू नये म्हणून ती आपल्या भल्या मोठ्या  शेपटीचा छत्रीसारखा उपयोग करून घेते. ती शेपटी आपल्या अंगावर ओढून घेते.यामुळे पावसाच्या पाण्यामुळे तिची शेपटी भिजते,पण तिचे अंग मात्र भिजत नाही.ते कोरडेच राहते.

पाऊस आणि आसामी गेंडा
आसामनिवासी गेंडा ब्रम्हपुत्रा नदीच्या काठावर राहतो. नदीशी त्याचे जुने नाते आहे. आणि ज्याचे नाते नदीशी आहे,म्हटल्यावर तो बरं पावसाला घाबरेल? पाऊस त्याच्यासाठी मित्रासारखा आहे.  कांजीरंगा वनक्षेत्र पावसाच्या दिवसांत पाण्याने भरून जाते.या वनांमध्ये गेंडे पावसाच्या पाण्याशी खेळताना तुम्हाला दिसतील.खरे तर त्यांच्या शरीरावर इतकी जाड कातडी असते की,पावसाचे पाणी त्याच्या शरीराला फार थंड करू शकत नाही.त्यामुळे ते पावसात आजारी पडत नाहीत.


No comments:

Post a Comment