Friday, January 15, 2021

एलियन: उत्सुकता आणि चिंता


एलियनबाबत आपल्या सगळ्यांनाच एक प्रकारची उत्सुकता आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की, एलियन असतात तर काही लोकांना अशा प्रकारच्या फक्त कोऱ्या करकरित कल्पना आहेत असं वाटतं. मनुष्य अनेक वर्षांपासून एलियनचा शोध घेत आहे. कधी त्याच्या शोधासाठी दुर्बीणची मदत घेतली जात आहे तर कधी अवकाशात यान पाठवून त्याचा शोध घेतला जात आहे. खूप दिवसांपासून आपल्या पृथ्वीवरून रेडिओ तरंग (संदेश) देखील पाठवले जात आहेत. कारण अवकाशात कुठेतरी माणसांसारख्यांची वस्ती असल्यास ते त्यांना ऐकायला जाईल आणि त्यांच्याकडून काहीतरी प्रतिसाद मिळेल.पण अजूनपर्यंत तरी एलियनने मानवाच्या कोणत्याही संदेशाचे उत्तर दिलेले नाही.

जवळपास शंभर वर्षे उलटून गेली आहेत ,तेव्हापासून आपण ब्रह्मांडात आपले अस्तित्व असल्याचे संदेश प्रसारित करत आहोत. या दरम्यान निर्माण झालेल्या रेडिओ तरंगांनी आतापर्यंत अब्जावधी मैलांचा प्रवास केला असेल. पण एलियनचा प्रतिसाद अजूनपर्यंत मिळालेला नाही. असं का घडलं असेल? याची अनेक प्रकारची कारणे असू शकतात. एक तर आपण जसे काही विचार करतो आहे, तसे काही एलियन ब्रह्मांडात नसतीलच. किंवा ते इतके दूर असतील की, त्यांच्यापर्यंत आपल्या पृथ्वीवरून निघालेले रेडिओ संदेश पोहचू शकलेच नाहीत. अथवा ब्रह्मांडात एकाद्या कोपऱ्यात जे जीवन असेल, ते अजून किटाणू स्वरूपात असतील,त्यांचा अद्याप विकास झाला नसेल.

अवकाशात एलियनच्या शोधासाठी एकवटलेली संस्था-सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रीयल इंटेलिजेन्स (सेटी)  शी संबंधित शास्त्रज्ञ सेथ शोस्टाक यांच्या म्हणण्यानुसार आपण एलियनची खूप प्रकारची रूपं चित्रपटांमध्ये पाहिली आहेत. त्यामुळे त्यांची एक खास अशी चित्रे आपल्या मनात कोरली गेली आहेत. सेटी गेल्या पन्नास वर्षांपासून अवकाशात एलियनचा शोध घेत आहे.शोस्टाक सल्ला देतात की, आपल्याला ब्रह्मांडात कुठेतरी एलियनचा शोध घेण्यापेक्षा आपल्या भविष्याबाबत विचार करायला हवा. त्यांच्या म्हणण्यानुसार मनुष्य आज कृत्रिम बुद्धिमत्ता असणारी यंत्रणा उभी करण्यात गुंतला आहे. अशात जर ब्रह्मांडात कुठे एलियन असतील तर ते प्रगतीच्या बाबतीत माणसाच्याही अधिक  पुढे निघून गेले असतील. कदाचित जिथल्या कुठल्या ग्रहावर असलेल्या जीवांनी कृत्रिम बुद्धीचा विकास साधला असेल किंवा अशा पद्धतीने बनवलेल्या मशिनीने (रोबोट) त्यांना बनवणाऱ्या जीवांचा खातमा केला असेल. आपल्याकडे आज रोबोट्सच्या माध्यमातून एकापेक्षा एक अनेक क्लिष्ट कामे करवून घेतली जात आहेत. ते बुद्धिमत्तेच्या बाबतीत काही क्षेत्रात माणसाच्याही पुढे गेले आहेत.

असंही होऊ शकेल की, कदाचित उद्या जाऊन रोबोट माणसाच्या काबूतही राहणार नाहीत.माजी अंतराळप्रवासी आणि लेखक स्टुअर्ट क्लार्क म्हणतात की, जर या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मशिनी बौद्धिक दृष्ट्या  वेगाने पुढे गेल्या तर ते माणसांचे आदेशही मानणार नाहीत. आणि हे एकदम बरोबरही आहे. पुढे जाऊन हे मानवावरच राज्य करू शकतील. अशा अनेक कल्पना माणसाच्या मनात घर करून आहेत. स्टुअर्ट क्लार्क म्हणतात की, असा विचार करून आपण एलियनला आपल्या शोधाच्या एका मर्यादेत बांधत आहोत. त्यांचे आकार-बिकार, बुद्धिमत्ता,ऊर्जा-ताकद मानवापेक्षाही भिन्न असू शकते. 

एलियनचा शोध घेणारी संस्था-सेटी काही रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने अवकाशातील एलियनचे संदेश ऐकण्याचा प्रयत्न करत आहे. खास करून अशा ठिकाणी जिथे अंतरिक्ष यानांनी नव्या ग्रहांची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांना अशा ग्रहांवर पाणी आणि हवा असण्याची आशा आहे. शोस्टाकचे म्हणणे आहे की,  मशिनी एलियन ब्रह्मांडमध्ये कुठेही असू शकतील.

अशा एलियनला मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यता असणार आहे. त्यामुळे आपल्याला अवकाशात अशा ठिकाणी शोध घ्यावा लागेल, जिथे ऊर्जेचे मोठ्या प्रमाणात स्रोत उपलब्ध असण्याची शक्यता असेल. यासाठी सेटीला आपली दुर्बीण पृथ्वीवर लावण्यापेक्षा अंतरिक्ष यानांसोबत अवकाशात पाठवावे लागतील. एलियनचा शोध घेण्यासाठी दुसरा पर्याय असा असू शकतो, तो म्हणजे पृथ्वीवरून कोणत्या तरी खास ग्रह अथवा ब्रह्मांडाच्या कुठल्या तरी खास दिशेने रेडिओ संदेश पाठवावे लागतील. वास्तविक याला स्टीफन हॉकिंग यांनी विरोध केला होता. कारण त्यांना भीती होती की यामुळे पृथ्वीला धोका पोहचू शकतो. आपल्यापेक्षा अधिक ताकदवान जीव ब्रह्मांडात कुठे तरी असू शकतील आणि आमच्याबाबतीत त्यांना अजून माहिती मिळाली नसेल.पण या रेडिओ संदेशद्वारे ते आपला शोध घेत इकडे येऊ शकतील. यामुळे मानव आणि मानवतेचे भविष्य धोक्यात येऊ शकेल.

एलियनबाबत तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी बोलल्या जातात. असं म्हटलं जातं की, काही देशांच्या सरकारांकडे एलियनबाबत खूप काही माहिती आहे, पण ही गोष्ट लोकांपासून लपवली जात आहे. काही शास्त्रज्ञांनी आणि लेखकांनी दावा केला आहे की, एलियन पृथ्वीवर मानवांसोबत राहत आहेत. काम करत आहेत. स्टॅटन फ्रीडमन एक न्यूक्लियर वैज्ञानिक होते, ज्यांचा मृत्यू मे 2019 मध्ये झाला. त्यांनी अमेरिकेतील चर्चित रोजवेल यूएफओ दुर्घटनेचा तपास केला होता. ते त्यांच्या म्हणण्यावर कायम होते की एलियन आपल्यामध्ये आहेत. त्यांनी म्हटलं होतं की, या गोष्टीला अनेकदा पुष्ठी मिळाली आहे की, एलियनने आपल्या पृथ्वीवर अनेकदा भ्रमण केले आहे आणि ते लोकांसमवेत राहत आहेत. एरिया-51 बाबतीत (अमेरिकेतील नेवादाजवळील वाळवंटात दूरदूरपर्यंत एक परिसर आहे. तो म्हणजे एरिया-51. इथे एलियनवर रिसर्च केला जात असल्याचे म्हटले जाते.)  सांगितले जाते की अमेरिकी सरकारने इथे एलियनला लपवले आहे. याची हकीकत काय आहे, या बाबतीत अधिक माहिती उपलब्ध नाही. परंतु पहिल्यांदा अमेरिकी सरकारने एरिया-51 चे अस्तित्व नाकारले होते,पण नंतर याचा स्वीकार केला होता. काहींच्या म्हणण्यानुसार ,तिथे उडत्या तबकडीचे परीक्षण करण्यात आले होते.

एडवर्ड स्नोडन अमेरिकेबाबत अनेक खळबळजनक दावे करत असतात. म्हटलं जातं की  स्नोडन जेव्हा सीआइएमध्ये काम करत होते,तेव्हा त्यांनी गोपनीय माहितीची चोरी केली होती. नंतर ही माहिती उजेडात आणणार असल्याचे म्हटले होते. या माहितीद्वारे असे संकेत मिळतात की अमेरिका टॉल वाइट नावाच्या एलियनकडून संदेश मिळत होते. असा दावा केला जात आहे की या एलियननी नाजीयांना पहिल्या विश्व युद्धात सत्ता मिळवून दिली होती. 

असा दावा आहे की पहिल्या विश्वयुद्धानंतर पुन्हा या एलियननी अमेरिकेला काबूत आणायला सुरुवात केली होती. अमेरिकेच्या कृषी विभागाने काही अशी माहिती शेअर केली आहे,ज्यामुळे असं वाटतं की एरिजोनाच्या टोनटो नेशनल फॉरेस्टमध्ये कदाचित एलियन आहेत. यांची गुप्त ठिकाणे आणि हालचाली पाहिल्याचे दावेही केले गेले आहेत.त्याचबरोबर तिथे उडत्या तबकडी पाहिल्या गेल्याच्या गोष्टीही समोर आल्या आहेत.

रशियाचे एक राजकारणी किरसान इल्युझिनोवने एक चकित करणारा खुलासा केला होता.त्यांचे म्हणणे होते की, 18 सप्टेंबर1997 रोजी एलियन त्यांच्या अपार्टमेंटमध्ये त्यांना भेटायला आला होता. यानंतर एलियनने त्यांचे अपहरण केले होते. ही गोष्ट दोन कारणांनी विश्वसनीय मानली जाते.  एक म्हणजे इल्युझिनोव यांचा ड्रायव्हर, मंत्री आणि सहाय्यक यांनी या गोष्टीला पुष्टी दिली होती की ते रहस्यमयरीत्या गायब झाले होते.

दुसरे कारण रशियानेदेखील मान्य केले होते. वास्तवात रशिया सरकारला ही काळजी होती की, त्यांनी जर एलियनसोबत गोपनीय माहिती शेअर केली असेल तर रशियाला धोका निर्माण होऊ शकतो. रशियाचे माजी पंतप्रधान दमित्री मेदवेदेव यांनी अनेकदा एलियन असल्याबाबत सांगितले होते. एकदा त्यांच्या तोंडून निघाले होते की, एलियन माणसांमध्ये राहत आहेत आणि त्यांच्यासोबत कामही करत आहेत. कॅनडाचे माजी संरक्षण मंत्री पाउल हेलर यांनी दावा केला होता की एलियन पृथ्वीवर येतात. त्यांच्या म्हणण्यानुसार अलीकडच्या काळात त्यांचं येणं-जाणं वाढलं आहे. अनेक देशांमधील अणू ऊर्जा प्रकल्पांबाबत मात्र त्यांना चिंता आहे. एलियननी त्यावर ताबा मिळवला काय?  -मच्छिंद्र ऐनापुरे, जत