Wednesday, September 30, 2020

स्त्री-स्वातंत्र्य आणि गांधीजी


महात्मा गांधी यांनी भारतातल्या दबलेल्या व दाबलेल्या जनसमुदयाच्या विकासासाठी कार्य केले आहे. भारतीय स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना न्यूनगंड व भयगंडमुक्त केले. त्यांची योग्यता आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे असलेले महत्त्व यांची जाणीव करून दिली. आपणही देशासाठी काहीतरी करू शकतो, याचा विश्वास स्त्रियांमध्ये निर्माण केला. खरे तर गांधीजींना स्त्री-शक्तीची जाणीव पहिल्यांदा आफ्रिकेत झाली. आफ्रिकेतील सत्याग्रहाचे नेतृत्व करताना गांधींनी स्त्रियांना पाहिले,तेव्हा त्यांना जाणवले की सहनशक्ती आणि विश्वास यातून निर्माण झालेले कणखर मन यांची नेतृत्वासाठी गरज आहे. आणि या दोन्ही गोष्टी स्त्रियांमध्ये असल्याचे दिसून आले. भारतात आल्यावर स्त्रियांना स्वातंत्र्य लढ्यात आणण्याचे काम त्यांनी केले. स्वयंपाक घरातून सामान्य स्त्रीला त्यांनी सत्याग्रहासाठी घराबाहेर काढण्याची किमया केली. 

गांधीजी स्त्रियांना उद्देशून म्हणत असत,'भगिनींनो, तुम्ही राष्ट्राची अर्धी शक्ती आहात.राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी तुमचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्य व अहिंसेवर आधारित माझ्या संकल्पित लढ्यात भाग घेण्यास तुम्ही समर्थ आहात.तुमची शक्ती जागृत झाली की, तुमच्यात सामर्थ्य येईल. त्या सामर्थ्यावर या देशात जी परकीय सत्ता आपल्या इच्छेविरुद्ध आपल्यावर राज्य करत आहे ती नाहीशी झाल्यावाचून राहणार नाही. या देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे. पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांपेक्षा अधिक निष्ठेने कार्य करण्याची शक्ती तुमच्यात आहे. 

आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनाही ते म्हणत, 'स्वातंत्र्य हा प्रत्येक राष्ट्राचा व प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे व ते तो मिळवणारच ,असा विश्वास असेल तर तुम्ही आपल्या घरातील स्त्रियांना प्रथम अनिष्ट प्रथा व चालीरीती यांपासून मुक्त केले पाहिजे. त्यांची सर्वांगीण वाढ व प्रगती केली पाहिजे.' गांधीजींच्या या विचारामुळेच स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्याऱ्या दाम्पत्याची संख्या अधिक होती. स्त्रियांचा सहभागही उल्लेखनीय होता. गांधीजींनी फक्त भारतीय राजकारणात क्रांतिकारक बदल घडवून आणला नाही तर स्त्रियांच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनातही बदल घडवून आणला. स्त्रियांचा अहिंसेच्या मार्गाने देशाच्या राजकारणात प्रवेश झाल्यामुळे आश्चर्यकारक परिणाम स्वातंत्र्य लढ्यावर दिसून येऊ लागला. एका बाजूला स्त्रियांना आपल्या कुवतीची व ताकदीची जाणीव झाली तर दुसऱ्या बाजूला अहिंसेच्या मार्गाने मानवी व नैतिक मूल्ये राजकारणात आली. 

गांधीजींचा आपल्या अहिंसेच्या मार्गावर पूर्ण विश्वास होता. ग्रामीण व नागरी स्त्रिया ,शिक्षित व अशिक्षित , भारतीय व विदेशी महिला गांधीजींच्या विचारसरणीकडे आकृष्ट झाल्या. यात सरोजिनी नायडू, अनसूयाबेन साराभाई, विजयालक्ष्मी पंडित, मीराबेन, लक्ष्मी मेनन, सुशीला नय्यर, राजकुमारी, अमृत कौर यांचा समावेश आहे. गांधीजींनी स्त्रियांच्या मनात फक्त स्वातंत्र्य मिळवण्याचा अंगार फुलवला नाही तर त्यांनी स्त्रियांना आत्मोद्धाराचीही प्रेरणा दिली. मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह आदी सर्व सत्याग्रहांमध्ये शेकडो स्त्रिया सामील झाल्या. स्त्रियांनी समाजजागृतीसाठी कीर्तने,भजने, बैठका, स्वातंत्र्य लढ्यावरील पुस्तकांची विक्री, खादी विक्री, दारूच्या दुकानांवर निदर्शने, परदेशी मालाच्या व कपड्यांच्या होळया करणे आदी कार्यक्रम राबवले. शेकडो महिला तुरुंगात गेल्या.

गांधीजींनी स्वदेशी चळवळीसाठी स्त्रियांना प्रोत्साहित केले. यामुळे  परदेशी वस्तू घरी आणायच्या नाहीत, असे महिलांनी पुरुषांना बजावले. परिणामी विदेशी वस्तू आणल्या तर जाळून टाकू, असे स्त्रिया घरोघरी सांगू लागल्या. आणि तसे त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलेही. विशेषतः श्रीमंत पारशी व गुजराथी स्त्रियांनी आपल्या नवऱ्यांचे कपडे आगीत भस्म केले. गांधीजी स्त्रियांशी बोलताना अनेक वेळा त्यांच्यासमोर परंपरागत आदर्श नव्या स्वरूपात मांडत. सीता, द्रौपदी, मीराबाई या थोर स्त्रिया होत्या. ही गोष्ट भारतीय स्त्री-पुरुषांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. त्यात नवीन काही नाही. गांधीजींनी नव्या विचारांना चालना दिली. ते सांगत,'सीता दुबळी नव्हती.अतिशय कठीण व गंभीर परिस्थितीत तिने नैतिक धैर्य दाखविले होते. मीराबाई ही असामान्य धैर्यवती होती. तिने जो विचारपूर्वक मार्ग निवडला, त्या मार्गावरून सामाजिक व कौटुंबिक विरोधाला न जुमानता ती चालत राहिली. म्हणून या गोष्टी स्त्रियांना आजही आदर्शच आहेत.'

स्त्रीला दुबळी मानणं हा पुरुषांनीत्यांच्यावर केलेला अन्याय आहे, असे ते मानत. 'शक्तीचा अर्थ जर नैतिक शक्ती हा असेल तर स्त्रिया या पुरुषांपेक्षा किती तरी पटीने सशक्त आहेत. स्त्रियांची सहनशक्ती, स्वार्थत्याग, अतुल धैर्य या गोष्टी त्यांच्या सशक्ततेची उदाहरणे आहेत. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे.' अशी मांडणी ते करीत. गांधीजी म्हणत की, स्त्रीला गुलामाचा दर्जा हा शेकडो वर्षे चालत आलेल्या अनिष्ट प्रथेतून दिला गेला. कायदे सगळे पुरुषांनीच केले. स्वतःच्या फायद्याचे केले. ही

परिस्थिती सुधारण्याचा स्त्रियांसमोर असलेला एकमेव मार्ग म्हणजे त्यांची आग्रही इच्छाशक्ती. आपल्याला नेमके काय हवे ते ठरवून ते प्राप्त करून घेण्याबाबत त्या सजग व समर्थपणे उभ्या राहिल्या पाहिजेत. स्त्रियांनी बेजबाबदार व सुखलोलुप बनू नये, असे त्यांचे म्हणणे असे. गांधीजींनी बालविवाह, विधवांचे दमन, जरठ कुमारी विवाह, हुंडा व पडदा पद्धतीला विरोध केला. हरिजनांच्या प्रश्नाशी त्यांनी स्त्रियांना अगदी तर्कशुद्धतेने जोडले. हरिजन व भंगी हे जर घाण काम करणारे लोक आहेत म्हणून अस्पर्श असतील तर आई मुलासाठी हेच काम करते ना? ती अस्पर्श असते का? आई जे काम आपल्या मुलासाठी करते, ते काम हरिजन समाजाकरिता करतात. ते समाजाची आईप्रमाणेच सेवा करतात ना? मग ते अस्पर्श कसे? म्हणून गांधीजींनी स्त्रियांना सांगितले की, जातीयवादातून पुरुषांची मुक्तता करणे, हे स्त्रियांनाच शक्य आहे. 'पुरुषांनी हरिजनांना घरात घेतले पाहिजे व माणूस म्हणून वागवले पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही घरात स्वयंपाक करणार नाही. कारण हेच काम आम्हीही आमच्या मुलांसाठी करतो...' असे म्हणत नगरच्या जानकीबाई आपटे, मालवणच्या महालसा भांडारकर यांनी हरिजन मुलींना घरात ठेवून घेऊन घेतले आणि समाजाला धडा घालून दिला. गांधींच्या विचारसरणीत भारतीय स्त्रीला स्वतःची नवी प्रतिमा प्राप्त झाली. आपल्या अंगभूत गुणांची जाणीव झाली आणि स्त्री- पुरुष समानतेचे महत्त्वही कळले. 


Saturday, September 26, 2020

(विदेशी कथा) योग्य-अयोग्य


इरीदु नगरात राहत होता अदमा. एक सर्वसामान्य मनुष्य. दिसायला दुसऱ्या मनुष्यांसारखाच! ना श्रीमंत, ना गरीब. पण खूप कष्टाळू होता,त्यामुळं त्याचं आयुष्य छान चाललं होतं. पण तरीही त्याच्यात असं काही तरी होतं, जे दुसऱ्या मनुष्यांमध्ये नव्हतं. त्याला देवानं निवडलं होतं, कारण तो नित्यनेमाने देवळात जायचा. मनोभावे पूजा करायचा.निष्ठेनं देवळातील सर्व कामं करायचा.

एके दिवशी अदमा देवळात गेला. त्याला आवाज ऐकू आला,"मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्यावर माझी सदोदित कृपा राहील. अशा प्रकारे भक्तिभावाने आपले कार्य करीत राहा.मी प्रत्येक संकटात तुझ्या मदतीला धावून येईन. मी तुझा संरक्षक देवता आहे,हे लक्षात ठेव."
अदमाने निष्ठापूर्वक, मनोभावे देवाच्या मूर्तीला नमस्कार केला आणि मग नित्य कामे उरकून तो बाहेर पडला. तो आनंदी होता. नगरातील लोक अदमाचा आदर-सन्मान करायचे. कुठली अडचण आली तर ती सोडवण्याचा मार्ग जाणून घेण्यासाठी ते अदमाकडे येत.तो त्यांना योग्य सल्ला, मार्गदर्शन करत असे. उपाय सांगत असे.
एके दिवशीची गोष्ट. अदमा नदीवर मासे पकडत होता. तेवढ्यात आकाशात काळे ढग जमले. वादळ घोंगावू लागले. आणि यात अदमाची नाव उलटली. तो पाण्यात पडला. अदमाने विचार केला,'ही तर मोसम येण्याची वेळ नाही. मग असं का घडलं? ' त्यानं आकाशाकडं पाहिलं. आकाशात वादळपक्षी जोरजोराने आपले पंख फडफडवत होता. तो अगदी शांतपणे त्याला म्हणाला,"ये वादळपक्षी, जरा थांब. ही बघ,तुझ्यामुळं माझी होडी उलटली. आता मला देवळात जायला उशीर होईल."
पण वादळपक्ष्यानं त्याचं काहीएक ऐकलं नाही. तो आपले पंख जोरजोराने फडकवित राहिला. आता अदमाला भयंकर राग आला. तो त्याच्याकडे पाहत म्हणाला,"देव करो आणि तुझे पंख गळून पडो. त्यामुळे तू पुन्हा अवेळी वादळ निर्माण करणार नाहीस."
अदमा एवढे म्हणतोय तोच एकदम वारा शांत झाला.कारण खरोखरच वादळपक्ष्याचे पंख गळून पडले होते.
बरेच दिवस वारा शांत शांत असल्याचं पाहून देवराज मर्दुकनं दरबारात विचारणा केली,"वाऱ्याला काय झालंय?"
"असं कळतं की, हे सगळं अदमामुळं घडलं आहे. त्याने वादळपक्ष्याचे पंख कापले आहेत." दरबारी म्हणाले.
मर्दुकला क्रोध आला.एक सामान्य मनुष्य देवतांच्या पक्ष्याचे पंख छाटण्याचं धाडस करू कसं शकतो? तो म्हणाला,"त्या गुन्हेगार मनुष्याला माझ्यासमोर हजर करा."
त्याच संध्याकाळी अदमा देवळात गेला, तेव्हा त्याला आवाज ऐकू आला,"अदमा, सावध रहा. देवराज मर्दुक तुझ्यावर क्रोधीत झाले आहेत. तुला त्यांच्यासमोर हजर व्हावं लागेल."
अदमा घाबरला. त्यानं विचारलं,"आता मला काय करावं लागेल?जे काही झालं,त्यात माझा काहीच दोष नाही. वादळपक्ष्यानं अवेळी वादळ निर्माण करून माझी होडी उलटवली. त्यामुळे मला देवळातील नित्यकर्म करण्यास विलंब झाला."
आवाज आला,"काही काळजी करू नकोस." मग संरक्षक देवतेने त्याला पुढे काय करायचं ते समजावून सांगितलं. अदमानं सगळं लक्षपूर्वक ऐकून घेतलं. रात्र झाली. देवदूत त्याच्यासमोर प्रकट झाला. त्याला देवराज मर्दुकचा आदेश ऐकवला. सोबत यायला सांगितलं. अदमाने फाटके, जीर्ण कपडे परिधान केले आणि जायला सज्ज झाला. देवदूतने त्याला सोबत घेऊन आकाशात भरारी घेतली.
देवराज मर्दुकच्या महालाच्या द्वारासमोर दोन देव उभे होते. ते होते अडोनिस आणि गिजिदा. ते दोघे आर्द्रतेचे रक्षक होते. वर्षातले सहा महिने पृथ्वीवर असायचे आणि उर्वरित सहा महिने मर्दुकच्या आकाशातील महालाचे द्वारपाल म्हणून काम पाहायचे.
अदमाला अशा फाटक्या अवस्थेत आणि उदास पाहून अडोनिस आणि गिजिदाने विचारले,"अरे , हे काय! तू देवराजच्या महालात अशा फाटक्या वेशात का चालला आहेस?"
यावर अदमा म्हणाला,"मी एक विनंती घेऊन आलो आहे. अडोनिस आणि गिजिदा अर्धे वर्षं पृथ्वीवर नसतात.त्यामुळे तिथे दुष्काळ पडतो. जमीन उजाड होऊन जाते. नदी,ओढे-नाले सुकून जातात. मी देवराजांना विनंती करेन की, या दोघा देवतांना नेहमी पृथ्वीवरच राहण्याची अनुमती द्यावी."
अदमाचे बोलणे ऐकून दोन्ही देव त्याच्यावर प्रसन्न झाले. कारण त्यांना पृथ्वीवरची आर्द्रता आवडत होती.त्यांना  वर्षातले सहा महिने देवराज मर्दुकच्या महालाची पहारेदारी पसंद नव्हती. देवता अडोनिस गिजिदाला म्हणाला,"अदमा भला माणूस आहे. तो आपल्यासाठी विनंती करायला आला आहे. आपल्याला याची मदत केली पाहिजे."
अदमाने दोन्ही देवतांचे बोलणे ऐकले. त्याला आनंद झाला. देवलोकमध्ये त्याने दोन मित्र बनवले.
अडोनिस आणि गिजिदा या दोघांनीही अदमाला आपली ओळख सांगितली नाही, परंतु संरक्षक देवतेने त्यांची ओळख अगोदरच अगदी चांगल्या प्रकारे करून दिली होती. अदमाने त्यांना ओळखले होते, पण तोही तसा काही बोलला नाही.
अडोनिस आणि गिजिदा यांनी त्याला आत जायला रस्ता मोकळा केला. देवदूताने अदमाला देवराज मर्दुकसमोर उभे केले. तिथली भव्यता पाहून अदमाचे डोळे दिपून गेले. कक्षात देवराज मर्दुक उच्च अशा सिंहासनावर आरूढ होता. तिथे आणखी काही देवता उपस्थित होत्या.
अदमाने मर्दुकला लवून प्रणाम केला आणि मग मान खाली घालून उभा राहिला. त्याला पाहिल्यावर मर्दुकचा क्रोध जागा झाला. तो म्हणाला," अच्छा, तर तो तू आहेस,जो देवतांच्या कार्यात विघ्न आणण्याचे धाडस करतोस. तू वादळपक्ष्याचे पंख कापण्याचा शाप का दिलास? पटकन उत्तर दे."
अदमा विनम्र आवाजात म्हणाला,"देवांचे देव श्री मर्दुक महाराजांचा विजय असो. महाराज, वादळामुळे माझी होडी उलटली. मी पाण्यात पडलो. यामुळे माझा वेळेत देवळात जाण्याचा नियमभंग झाला. माझ्याकडून एक मोठा गुन्हा घडला." तो पुढे म्हणाला, "खरं तर वादळ येण्याचा कुठलाच मोसम नव्हता. तरीही वादळ आले. त्यामुळे मी घाबरलो. मला काळजी वाटू लागली की, वेळेत देवळात गेलो नाही तर मला संरक्षक देवता शाप देतील. त्यामुळेच माझ्या तोंडून ती शापवाणी निघाली. मला त्याचा खेद आहे. मी क्षमाप्रार्थी आहे."
अदमाचे बोलणे ऐकून मर्दुक विचार करू लागला. त्याला वाटलं की, जे काही घडलं ,त्यात अदमाचा काही दोष नाही.  तो तर वेळेत मंदिरात जाता येत नसल्याकारणानं काळजीत होता. पण मर्दुकने हे विचार बोलून दाखवले नाहीत. शेवटी त्याने अदमाला गुन्हेगार ठरवून शिक्षा सुनावण्यासाठी देवलोक बोलावणे धाडले होते. अशा परिस्थितीत त्याला एकदम क्षमादान करणं योग्य नव्हतं. आता पुढे काय करायचं, याचाच तो विचार करत होता,तेवढ्यात अडोनिस आणि गिजिदा उठून उभे राहिले. त्यांनी देवराज मर्दुकला प्रणाम घातला आणि बोलण्याची अनुमती मागितली. आज्ञा मिळाल्यावर दोघेही म्हणाले,"महाराज,अदमा हा धर्मप्राण आणि नियमाला धरून वागणारा मनुष्य आहे.हा देवतांना पूजतो. त्यांच्या शापाला घाबरतो. खरं तर तो आमच्यासाठीदेखील तुमच्यासमोर एक विनंती घेऊन आला आहे. नक्कीच त्याने अपराध केला आहे,पण हा त्याचा पहिलाच अपराध आहे. निश्चितच याला क्षमादान मिळायला हवं."
हे ऐकून मर्दुकला मार्ग सापडला. त्याने अगोदरच मनोमन अदमाला क्षमादान करण्याचा निश्चय करून टाकला होता. तो म्हणाला," तुम्ही दोघे देवगण अदमाची शिफारस करत आहात म्हटल्यावर मला क्षमादान करावंच लागेल."
मर्दुकच्या बोलण्याला समर्थन म्हणून दरबारी मंडळींनीही मान हालवून संमती दिली. मर्दुक म्हणाला,"अदमावर त्याच्या संरक्षक देवतेची कृपा आहे. पण हा तर मनुष्यप्राणी आहे. का नाही याला देवपण प्रदान केलं जावं?" यानंतर त्यांनी देवभोज आणि अमृतजल पात्र आणण्याचा आदेश दिला.
देवभोज आणि अमृतजल पात्र अदमासमोर ठेवण्यात आले. मर्दुक म्हणाला,"अदमा, तू दोषमुक्त झाला आहेस. देवभोजन सेवन करून अमृतजल प्राशन करावं."
अदमाला त्याच्या संरक्षक देवतेचा इशारा ध्यानात होता. त्याने चुकूनसुद्धा देवभोज आणि अमृतजल पात्रास स्पर्श करू नये, असं संरक्षक देवतेनं बजावलं होतं.
अदमा गपचूप उभा राहिला. आपल्या संरक्षक देवतेच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास तो अजिबात तयार नव्हता. परंतु मर्दुकसमोर नकारसुद्धा देऊ शकत नव्हता. त्यामुळे तो गपचूप उभा होता. त्याने देवभोज आणि अमृतजल पात्रांकडे पाहिलेदेखील नाही. देवभोज करण्याची आणि अमृतजल पिण्याची त्याची इच्छा नव्हती,हे उघड होतं.
मर्दुक अगदी लक्षपूर्वक अदमाचे हावभाव निरखीत होता. तो हसला आणि त्याने अमृतजल व देवभोज माघारी नेण्याचा आदेश दिला. तो मनातल्या मनात म्हणाला,'अदमा शेवटी मनुष्यप्राणी आहे आणि तो तिथेच राहू इच्छितो. असो, जसे असेल तसे. तो अजून देवपंक्तीमध्ये सामील होण्यास स्वतःला योग्य समजत नसावा.'
तो म्हणाला,"अदमा, मी तुझ्यावर नाराज नाही. हीच मनुष्यनियती आहे. पण तू एक भला मनुष्य आहेस, जो देवपूजा करतो. तुझ्यावर देवतांचा आशीर्वाद कायम असेल."
आणि मग देवदूतांनी परत अदमाला पृथ्वीवर आणून सोडले. संध्याकाळी अदमा नेहमीप्रमाणे वेळेत पूजा करण्यासाठी देवळात गेला. त्याच्या मनात एक प्रश्न होता-'काय मी देवता न बनण्याचा निर्णय योग्य होता?'
त्याच्या या प्रश्नाचं उत्तर कुठल्याच मनुष्याजवळ नाही.

मूळ बेबीलोन कथा-पीरी ग्रिमल
अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे







Friday, September 11, 2020

रिकामटेकड्यांचे उद्योग 'गुलामगिरी'च्या दिशेने...


आपला भारत आदेश आज अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या टाळेबंदीने देशाचं अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.अनेक छोट्या-छोट्या असंघटित कामगारांचे रोजगार बुडाले आहेत. देशाचा जीडीपी दर -23 टक्क्यांवर घसरला आहे. हे सगळे होत असताना देशाची परिस्थिती सावरण्यासाठी केंद्र सरकार काहीच करताना दिसत नाही. उलट देशावर जे संकट ओढवले आहे,ती 'देवाची करणी' असल्याचा साक्षात्कार देशाच्या अर्थमंत्र्यांना झाला आहे. मागे ओढवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते, त्याचे काय झाले समजत नाही. अशा परिस्थितीत देशातल्या न्यूज चॅनेल आणि सोशल मिडियावर मात्र सुशांतसिंग, रिया चक्रवर्ती आणि आता कंगना राणावत यांचीच चर्चा करत त्यावर किस पाडला जात आहे. आणि या सगळ्या गोष्टींना केंद्र आणि राज्य सरकारांना जबाबदार धरून आरोप-प्रत्यारोप यांच्या फ़ैरी झाडल्या जात आहेत. सोशल मीडियावर तर राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेतल्याचेच चित्र दिसत आहे. इथे कुणीच माघार घ्यायला तयार नसतो, माझंच कसं खरं हे 'खोटं बोल पण रेटून बोल' अशा पद्धतीने सांगितलं जातं आहे. त्यामुळे देशातल्या ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीचं कुणालाच गांभीर्य दिसत नाही. प्रासारमाध्यम आणि सोशल मीडियावर जो काही गोंधळ चालू आहे, याचा फायदा सत्ताधारी आणी विरोधक दोघांनाही होत आहे. मात्र यामुळे प्रमुख प्रश्नांना सोयीस्करपणे बगल दिली जात आहे. आणि हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे. यावरून एक गोष्ट साफ दिसून येत आहे की, आपल्या देशात रिकामटेकड्या लोकांची संख्या प्रचंड आहे. खायचं-प्यायचं आणि दिवसभर सोशल मीडियावर दिवस घालवायचा. 'हा त्याला असं म्हणाला,तुम्हाला काय वाटतं?','राज्य सरकारनं असं केलं, त्यांचं वागणं योग्य आहे का?', 'केंद्र सरकारने असा निर्णय घेतला,तुमचं मत काय?' अशा पद्धतीची विचारणा कुणीतरी करतं आणि त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडतो. यात एकमेकांना अर्वाच्य शिव्यासुद्धा दिल्या जातात. यात जणू काही 'आताच सगळे प्रश्न मिटतील' अशा प्रकारे बोललं जातं. पण असं काही होत नसतं. आता कोणतेही सरकार लोकांचं ऐकून घेत नाही. त्याला जसं हवं, तशीच मनमानी किंवा निर्णय घेतला जातो. त्यामुळे इथे फक्त आमच्या पक्षाचे कसे बरोबर ,सत्ताधारी लोकांचे कसे योग्य हेच ऐकायला मिळतं आणि हा निर्णय कसा चुकीचा, मनमानीचा हेच ऐकवलं जातं. कुणीही खोलवर चिंतन करत नाही, थोडासुद्धा कुणी विचार करत नाही. लगेच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. यामुळे शांतपणे ऐकून घ्यायचे आणि मग वैचारिक प्रतिक्रिया द्यायची असले दिवस संपले आहेत. शिवाय आणखी एक महत्त्वाचे म्हणजे लोकांची सहनशीलता संपली आहे. लोकं लगेच शिव्या-शाप,हमरीतुमरीवर आणि हाणामारीवर येतात. त्यामुळे शहाण्यांनी गप्प बसणेच योग्य आहे, अशी भयानक परिस्थिती देशावर आली आहे. ही परिस्थिती देशाला फक्त गुलामगिरीकडे घेऊन जाणार आहे.राजकीय पक्ष, सत्ताधारी लोक उद्योजकांचे गुलाम आणि त्यांचे समर्थक पक्षांचे किंवा त्यांच्या पुढाऱ्यांचे गुलाम. साहजिकच आपल्या देशात पुन्हा साम्राज्यशाहीला दिवस चांगले आहेत, हेच दिसत आहे. निसर्गचक्रसुद्धा हेच सांगते. फक्त एवढेच की, केवळ सत्तर वर्षांचे स्वातंत्र्य उपभोगल्यावर पुन्हा लगेच आपण गुलामगिरीकडे जातो आहोत, हे चित्र मात्र भयानक आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday, September 8, 2020

हिंदी भाषेला दिवस आले चांगले


अलीकडच्या काही वर्षांत हिंदी भाषा मृत्यूपंथाला लागली आहे असं काहीसं बोललं जात होतं. पण आज चित्र फार वेगळं आहे. लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर एकवटलेल्या या विश्वात हिंदी भाषेचा वापर वाढला आहे, ही एक  हिंदी भाषेसाठी सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. गुगलच्या नेक्स्ट बिलियन युजर्स अँड पेमेंट्सचे व्हाइस प्रेसिडेंट सीजर सेनगुप्ता यांनी इंटरनेट युजर्सच्या बाबतीत सांगताना म्हटले आहे की, आजचा युवावर्ग डेडस्टॉक किंवा लॅपटॉपपेक्षा स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटवर अधिक काळ घालवत आहे.आणि व्हॉइस फिचरचा अधिक वापर करत आहे.इंटरनेटचा वापर वाढल्याने साहजिकच ई-कॉमर्सचा बिझनेस वेबसाईटची संख्याही वाढली आहे.आणि पेमेंट ऍप्सचा विचार केला तर असं लक्षात येईल की, पेटीएम, गुगल पेसारख्या ऍप्सनी हिंदी भाषेचाही अंतर्भाव केला आहे. हिंदी बोलणाऱ्या आणि लिहीणाऱ्या आपल्या ग्राहकांची संख्या वाढावी, हा त्यामागचा उद्देश आहे.एवढेच नव्हे तर मनोरंजन जगतात आपले स्थान बळकट करणाऱ्या नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम यांनी हिंदी भाषेसाठी स्वतंत्र कंटेंट बनवली आहे.सोशल मीडियावरदेखील फेसबुक, व्हॉटस अप,ट्विटरवरसुद्धा हिंदी भाषा वाढताना दिसत आहे.फेसबुक तर अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत शिवाय गुगल इंडिक आणि फोनेस्टिकवर आधारित अशा की-बोर्डची निर्मिती केली आहे की, हिंदी भाषा सहजगत्या टाइप करता येते.हिंदी आता बाजारची भाषा बनली आहे.

आज प्रत्येक मोठा मीडिया हाऊस हिंदी भाषी वर्तमानपत्र किंवा अन्य नियतकालिके काढत आहेत, त्याचबरोबर त्याचे डिझिटल म्हणजेच इ-संस्करण काढत आहेत. जेणेकरून जगातल्या कानाकोपऱ्यात वसलेला हिंदी भाषिककडून ते वाचलं जावं.आज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठमोठी प्रिंट मीडिया बंद चालली असली तरी त्यांचे डिझिटल संस्करण मात्र जोरात सुरू आहेत. शिवाय नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डिझिटल संस्करण आणखी डेव्हलप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माणसेही आज वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक, मासिके  विकत घेऊन वाचण्यापेक्षा मोबाईलवर वाचण्यावर भर देत आहेत. भारतातल्या बारा भाषाअंमधील लेखक आणि वाचकांना जोडण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या डिझिटल प्लॅटफॉर्म प्रतिलिपी कम्युनिटी मॅनेजर वीणा वत्सल सिंह यांनी सांगितलं आहे की, डिझिटल प्लॅटफॉर्मवर सध्या 30 हजार लेखक लिहीत आहेत. आणि  हिंदी भाषेचे वाचक सात लाखांवरून  दहा लांखांवर पोहचले आहेत.पूर्वी कॉम्प्युटर, फोन किंवा लॅपटॉपवर हिंदीमध्ये टाइप करताना लोकांना अडचणी येत होत्या, मात्र आता गुगलच्या फोनेटिक्स ऍपमुळे टाइप करणं सोपं झालं आहे. त्यामुळे लिहिणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.पूर्वी हिंदी लेखकांना फारसं ओळखलं जात नव्हतं. मात्र आता सोशल मीडियावर त्यांची स्वतःची एक ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे हिंदी भाषिक लेखकांची 'गरीब गाय' ही ओळख पुसली गेली आहे. त्यांचे साहित्य इंटरनेटवर वाचायला मिळत आहे आणि जागीच प्रतिक्रियाही मिळत आहे.आता प्रकाशन क्षेत्रात  क्रांती घडू लागली असून लेखकांची कादंबरी, कथा, प्रवासवर्णन आदी साहित्य पुस्तकरुपात म्हणजेच प्रिंटबरोबरच डिझिटलमध्येही स्वस्तात उपलब्ध होऊ लागली आहेत. अनेकांना एकादे पुस्तक मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत होती.मात्र आता इंटरनेटच्या माध्यमातून पुस्तके कुठे मिळतात, याचा पत्ता मिळत आहे. अनेक प्रकाशनांनी आपल्या वेबसाईट काढल्या असून त्यावर पुस्तके आणि त्यांच्याविषयी माहिती प्रसिध्द करत आहेत. अमेझॉनबरोबरच काही प्रकाशक पुस्तकांचे घरपोच इ-मार्केटिंग करत आहेत.जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून पुस्तकांची मागणी करू शकतो. भारतातील हिंदी भाषिक पुस्तके आता फक्त हिंदी भाषिक राज्यांमध्येच नव्हे तर देशात आणि परदेशात कुठेही आपली पुस्तके पाठवू शकतात. 

हिंदी भाषेत युनिकोड फॉन्ट आल्याने एक क्रांतीच घडली आहे. पूर्वी भाषा टायपिंग करण्यासाठी विशिष्ट लिपीचा की-बोर्ड आत्मसात करावा लागत होता. मात्र आता युनिकोडमध्ये लिहिलेले लेखन  कोणत्याही सॉफ्टवेअर कीबोर्डमध्ये कनव्हर्ट करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे आणि टायपिंग करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे कुणीही आता फोन किंवा लॅपटॉपवर लेखन करू लागले आहे. त्याचबरोबर हिंदी लिपीमध्ये लिहिणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सोशल मीडियावर याची प्रचिती दिसून येत आहे.

हिंदी भाषा वाचक वाढत आहेत, हाच इथे मुद्दा महत्वाचा आहे. यासाठी डिझिटल प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. कित्येक साहित्यिक एकत्र येऊन नवोदित लेखकांना लिहिण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत. प्रसिद्ध लेखिका जयंती रंगराजन यांनी लेखकांना 30 दिवसांत कादंबरी लिहून घेण्याचा उपक्रम राबविला होता आणि त्याला चांगले यश मिळाले होते. अनेक लेखकांना प्रसिध्द प्रकाशन मिळत नव्हते किंवा पुस्तक काढण्यासाठी स्वतःच पैसे खर्च करावे लागत होते. मात्र आता ही समस्या संपली आहे. डिझिटल प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी देवदूत म्हणून अवतरला आहे. कित्येक संस्था  लेखकांना आता ई-बुक उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ई-बुक (पुस्तके) उपलब्ध होत आहेत. त्यामुळे साहजिकच लेखकांना अनायासे वाचक मिळत आहेत. फक्त इथे एक अडचण अशी आहे की, अजूनही लेखक आर्थिकदृष्ट्या गरीबच राहिला आहे. भाषेबरोबरच लेखकाचीही आर्थिक प्रगती होत राहिल्यास खऱ्या अर्थाने भाषा समृद्ध झाली, असे म्हणावे लागेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Friday, September 4, 2020

ज्ञानमहर्षी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर1888 या दिवशी तिरुपतीजवळील असणाऱ्या तिरुत्तानी नावाच्या तीर्थक्षेत्रात झाला. त्यांचे वडील एका जमीनदाराच्या पदरी लेखनिक होते. वडिलांचे नाव वीरस्वामी तर आईचे नाव सिताम्मा होते.त्यांची राहणी साधी आणि घरची परिस्थिती बेताची होती. मूळचेच हुशार असलेल्या राधाकृष्णन यांचे प्राथमिक, माध्यमिक  शिक्षण गावीच तर महाविद्यालयीन शिक्षण वेलोर आणि मद्रास येथे झाले. स्वामी विवेकानंद यांच्या सर्वधर्म परिषदेतील विजयवार्तेने राधाकृष्णनदेखील भारावून गेले. त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास करावयाचे ठरवले. यासाठी त्यांनी 'तत्त्वज्ञान' विषय निवडला. त्यांनी एम. ए.च्या प्रबंधासाठी 'वेदान्तातील नीतिशास्त्र' हा विषय निवडला. त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला तेव्हा त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते. 

पुढे 1909 मध्ये त्यांची नियुक्ती मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे सह-प्राध्यापक म्हणून झाली. मात्र त्यांच्यासारख्या बुद्धिमान विद्यार्थ्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन अधिक अध्ययन करावे, असा काही मित्रांचा आग्रह होता. परंतु घरची आर्थिक परिस्थिती आणि नोकरीची गरज यामुळे त्यांना तिकडे जाता आले नाही,पण पुढे याच विद्यापीठात त्यांचे 'हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन' या विषयावर व्याख्याने झाली. पुढे ती ग्रंथरुपाने प्रसिद्धही झाली. याच सुमारास त्यांची देशात ,परदेशात अनेक ठिकाणी व्याख्याने होत होती. पुढे कलकत्ता विद्यापीठाने तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांना पाचारण केले. म्हैसूर विद्यापीठानेही त्यांचा प्राध्यापक म्हणून गौरव केला. 

1931 मध्ये राधाकृष्णन आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. सुमारे सहा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी विद्यापीठास शिखरावर नेले. 1939 मध्ये बनारस विद्यापीठाचेही कुलगुरू झाले. विशेष म्हणजे दोन विद्यापीठाचे कुलगुरू असतानादेखील त्यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. ऑक्सफर्ड, कोलकत्ता, बनारस आदी विद्यापीठामध्ये अध्यापन चालूच होते. भारत स्वतंत्र झाला. 1947 मध्ये त्यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. एक संत आणि एक तत्त्वज्ञ या उभयतांचा सुखद संवाद झाला. यापूर्वी1915 मध्ये मद्रास येथे दोघांची भेट झाली होती. तेथील एक आठवण दोघांच्याही स्मरणात होती. तेव्हा महात्मा गांधी राधाकृष्णन यांना म्हणाले होते," दूध पिऊ नका.गाईच्या अस्थि-मज्जेपासून ,रक्त-स्नायूपासून ते तयार होते. गाईचे दूध पिणे म्हणजे गोमांस-भक्षण होय." यावर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते," या न्यायाने आईचे दूध पिणारा नरमांसभक्षक ठरेल." महात्माजी तेव्हा मनोभावे म्हणाले,"याला म्हणतात तर्कशास्त्राचा प्राध्यापक."

सर्वपल्ली यांची योग्यता जगातील जाणत्यांनी ओळखली होती. 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरव केला. त्यापूर्वी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठानी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांचे अनुकरण केले. 1952 ते 62 या काळात सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे उपराष्ट्रपती होते. 1962 मध्ये ते राष्ट्रपती झाले. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती झाले. या बाह्य उपाधीपेक्षा त्यांचे अंतरजीवन अधिक सतेज होते. त्यांच्या उतुंग बुद्धिमत्तेचे आणि ग्रंथकर्तृत्वाचे कौतुक सर्व खंडातून होत होते. 

'परमेश्वर साकार होण्यासाठी मानवी कुडीचा आश्रय घेतो, तो सुख-दुःखाची वसने परिधान करतो',असे सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत. त्यांच्या जीवनाकडे पाहिले म्हणजे ते खरे वाटते. अशा या महान व्यक्तीस प्रदीर्घ आयुष्य लाभले. 17 एप्रिल 1975 या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.