भारताच्या राजकीय इतिहासात महात्मा गांधी
यांच्यासारखी अन्य कोणती महान व्यक्ती नाही, हे
नि:संशय आहे. महात्मा गांधी असे एकच भारतीय
राजनेता होते, ज्यांना देशातल्या कानाकोपर्यातूनच नव्हे तर जगभरातून सन्मान मिळाला. भारताचे पहिले
पंतप्रधान पंडित नेहरू यांचाही राजकीय प्रभाव संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातल्या
राजकीय वर्तुळात होता. भारताच्या श्रेष्ठत्वतेचे नेतृत्व पंडित
नेहरू यांनी केलं. अशाच प्रकारे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर
शास्त्री यांचेही नाव अत्यंत आदराने घेतले जाते. खरे तर राजकारणात
प्रत्येक राजकीय नेत्याला वैचारिक विरोध हा होत असतोच. पण लालबहाद्दूर
शास्त्री ही एकच अशी राजकीय व्यक्ती आहे, ज्यांना भारताच्या राजकारणात
विरोधी पक्षांमध्येदेखील विरोधक सापडणार नाही. विरोधक त्यांचे
आदराने नाव घ्यायचे. कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याने त्यांच्यावर
टीका केली आहे, असे अजून तरी ऐकण्यात आलेले नाही.
शास्त्रीजी अशी एकमेव भारतातील राजकीय
व्यक्ती आहे, ज्यांचा आदर आणि सन्मान सामान्य
लोकांकडून तर मिळालाच, तितकाच विरोधक आणि विरोधी पक्षांकडून मिळाला.
शेवटी याचे काय कारण असावे बरं? याचे सर्वात महत्त्वाचे
कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात जोपासलेली कठोर नैतिक मूल्यं.
अशी किती तरी राजकीय माणसे भाषणात नैतिकतेच्या मोठमोठ्या बाता मारत असतात,
पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मात्र नैतिकतेचा मोठा अंध:कारच असतो. लालबहाद्दूर शास्त्री यांनी आयुष्यभर जी नैतिकता
जपली, ती कुणाही राजकीय नेत्यांमध्ये दिसली नाही आणि कदाचित कधी
दिसणारही नाही. वास्तविक दुसरा कोणता नेता अशा राहणीमानाची कल्पनाही
करू शकणार नाही. आजचे राजकारणातले विदारक चित्र पाहिले तर लालबहाद्दूर
शास्त्री यांची नैतिक पातळी किती पराकोटीची होती, याचा प्रत्यय येतो.
त्यांची व्यक्तिगत नैतिकता इतकी जबरदस्त
होती की, ज्यावेळेला ते देशाचे पंतप्रधान झाले, त्यावेळेला त्यांनी देशातल्या लोकांना आठवड्यातून एकदा उपवास करण्याचे आवाहन केले होते.
लोक अक्षरश: त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून उपवास
करत होते. लोकांच्या घरी चूल पेटत नव्हती.त्यांच्या साध्या राहणीचा हा चमत्कार होता. देशातल्या
तमाम लोकांना आवाहन करण्यापूर्वी त्यांनी आपल्या घरात आणि कुटुंबात हा प्रयोग करून
पाहिला होता. त्यांचे चिरंजीव अनिल शास्त्री यांनी काही वर्षांपूर्वी
यासंबंधीचा एक किस्सा माध्यमांसोबत शेअर केला होता. त्यांनी सांगितले
होते की, एके दिवशी वडिलांनी (शास्त्रीजी)
घरी घोषणा केली की, आज घरात जेवण बनवले जाणार नाही.
सर्वांनी उपवास धरायचा. यावर माझ्या आईने
(ललिता शास्त्री) विचारलं, असं का? तेव्हा वडिलांनी उत्तर दिलं की, मला बघायचं आहे की,माझी मुलं एक दिवस तरी उपवाशी राहू
शकतात की नाही. त्यादिवशी घरात अजिबात स्वयंपाक बनवला गेला नाही
आणि घरातल्या कोणीच व्यक्तीने कसलीच तक्रार केली नाही, तेव्हा
दुसर्यादिवशी वडिलांनी संपूर्ण देशवासियांना आठवड्यातून एक दिवस
उपवास करण्याचे आवाहन केले. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या खाद्यान्नांच्या
संकटाशी तोंड देता यावे, हा त्यामागचा उद्देश होता.
जगाच्या इतिहासात कधी कुठल्या देशाच्या
राजनेत्याने अशी घोषणा केली नव्हती आणि कोणत्या देशाने त्याची अंमलबजावणीही केली नव्हती. लोक आपली गोष्ट ऐकतील आणि मानतील अशी उच्च पातळी फक्त लालबहाद्दूर शास्त्री यांच्याकडेच
होती आणि आत्मविश्वासही. त्यांना जो विश्वास होता, तो अगदी योग्य होता,कारण
आजही लोक सांगतात की, खरोखरच त्याकाळी लोकांच्या घरी चूल पेटलेली
नव्हती. त्या दिवसांत अशा प्रकारचे व्रत करणे त्यांच्याविषयीचा
एकप्रकारचा सन्मान होता. खूप मोठा प्रभाव होता.
पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री अनेक
कारणांमुळे सतत चर्चेत होते. पण ज्या प्रकारे
त्यांनी जय जवान,जय किसान चा नारा दिला आणि लोकांचे समर्थन मिळवले,
त्याला तोडच नाही. यामुळे खरोखरच त्यांचा भारतीय
जनमानसावर किती प्रभाव होता, याची प्रचिती येते. अन्य दुसर्या राजकीय नेत्यांच्या तुलनेत हा प्रभाव खूप
मोठा होता. जय जवान... हा नारा त्यांनी
देशवासिय आणि प्राणाची बाजी लावून सीमेवर लढणारे जवान यांच्यात एकजुटता निर्माण व्हावी,
आमच्या सैनिकांना देशातल्या सामान्य लोकांचे नैतिक बळ आणि समर्थन मिळावे,
हा त्यामागचा उद्देश होता. जय किसानच्या घोषणेमागे
शेतकर्यांना आधिकाधिक धान्य उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे,
हा हेतू होता. त्यावेळेला दुष्काळामुळे मोठे खाद्यान्न
संकट उद्भवले होते. अशा अडचणीच्या काळाता अमेरिका आपल्यावर अप्रत्यक्षरित्या
गुलामगिरी थोपवण्याच्या प्रयत्नात होती. यापासून मुक्तता मिळवणे
गरजेचे होते.
लालबहाद्दूर शास्त्री यांनी भारताचे
दुसरे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा, देशात
मोठे खाद्यान्न संकट निर्माण झाले होते. आपल्याला अमेरिकेच्या
पीएल-480 योजनेनुसार मिळवलेला लाल गहू खावावा लागणार होता.
1965 मध्ये एका बाजूला पाकिस्तानसोबत युद्ध आणि दुसर्या बाजूला भयानक दुष्काळ या मोठ्या धर्मसंकटात भारत सापडला होता आणि अमेरिका
यात हात धुवून घेऊ इच्छित होता. अशा बिकट काळात लालबहाद्दूर शास्त्री
यांनी देशातल्या लोकांना दोन महत्त्वाचे आवाहन केले होते. एक
म्हणजे कुठल्याही रिकाम्या, ओसाड जमिनीत धान्य-भाजीपाला पिकवला जावा आणि दुसर्या बाजूला प्रत्येकाने
आठवड्यातून एकदा उपवास करावा. हे आवाहन कोणत्या जाती वर्गासाठी
किंवा अमूक एका वयासाठी मर्यादित नव्हता. त्यांच्या आवाहनाला
सर्वांनीच म्हणजे अबाल-वृद्धांनी प्रतिसाद दिला,कारण हे त्यांच्या लोकनायकाचे आवाहन होते.