Saturday, September 1, 2018

आजूबाजूचा केरकचरादेखील तणावाला कारणीभूत

     सध्या आपल्या देशात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. खरोखरच काही शहरांनी कमालीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा लाभ तिथल्या नागरिकांना न झाला असल्यास नवल नाही. आपल्याची देशाची प्रतिमा अन्य देशात घाणेरडा देश अशीच आहे. मात्र अलिकडच्या काही वर्षात ही प्रतिमा बदलू लागली आहे. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले आहे. स्वच्छतेमुळे रोगराई नांदत नाही आणि लोकांचा बळी जाण्यापासून सुटका होते. माणसाचे आयुष्यमान वाढण्यास मदत होते. शिवाय वातावरण उत्साही राहण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषध-पाण्यावर होणारा खर्च टाळून आपल्या अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसानही थांबवता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून, अंगणापासून करायला हवी. अजून कोणी केली नसेल तर त्यांनी आतापासूनच प्रारंभ करायला हरकत नाही.यामुळे  आपल्या देशाची घाणेरडा देश म्हणून जी प्रतिमा तयार झाली आहे, ती दूर होण्यास मदत होणार आहे.

      आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि हिरवागार असल्यास माणसाचे मानसिक आरोग्यदेखील चांगले राहते, असा निष्कर्ष अलिकडेच एका नव्या संशोधनातून निघाला आहे.यूनिवर्सिटी ऑफ पेसिलवेनियाच्या पेरिलमॅन स्कूल ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार सांगितले गेले आहे की, साफसफाई आणि हिरवागार परिसर प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या मानसिक आरोग्याचे रहस्य आहे. याचा खुलासा नुकताच अमेरिकन मेडिकल असोशियनच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आला आहे. अहवालात फिलाडेल्फियाचा उल्लेख करण्यात आला आहे. तिथे याचे परिणाम पाहायला मिळाले आहेत. घाणेरडे रस्ते आणि झाडेझुडपे अशा भागातून जाण्याने हृदयावर परिणाम तर होतोच शिवाय तणावदेखील वाढतो. शहरांना कचरामुक्त करण्याबरोबरच झाडे,रोपे लावल्याने माणूस आनंदी राहू शकतो.
     स्वछता अभियान राबवण्यापूर्वी 18 महिने आणि 18 महिन्यानंतर स्थानिक लोकांना विचारण्यात आले होते, तेव्हा त्यांना किती नैराश, असहाय्य, बेचैन आणि तणाव जाणवत होता, यांची नोंद घेण्यात आली. साफसफाई आणि हिरवागार परिसर झाल्यानंतर लोकांमधल्या तणावात 41 टक्के घसरण आल्याचे दिसून आले. यासाठी सलग तीन वर्षे अभ्यास चालला होता. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही देशातील लोकांचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर साफसफाई आणि परिसर हिरवागार राहिला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छतेचा स्वीकार केला तर आजार आणि औषधांवर होणार्या खर्चातदेखील घट येईल. कारण आरोग्यसंपन्न मन आणि शरीर असेल तरच मजबूत अर्थव्यवस्थेची निर्मिती होऊ शकते.

No comments:

Post a Comment