Sunday, April 30, 2017

महात्मा बसवेश्‍वर (भाग सहा)


वीरशैव संप्रदाय
मध्ययुगात दक्षिण भारतातील कर्नाटकात वीरशैव हा भक्तिसंप्रदाय संत ज्ञानेश्वरांच्या पूर्व काळात उदयास आला. महाराष्ट्रातील महानुभाव, वारकरी,दत्त, समर्थ आणि नाथ या संप्रदायांप्रमाणेच हा संप्रदायदेखील गुरु संस्थेला महत्त्व देणारा आहे. बाराव्या शतकात कर्नाटकात जैन आणि अन्य धर्म संप्रदायांचा प्रभाव होता. वीरशैव संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसाराने अन्य धर्म पंथांचा प्रभाव कमी झाला. काही संशोधकांनी या संप्रदायाचा उदय हा बाराव्या शतकात झाल्याचे म्हटले असले तरी काही संशोधकांच्या मते, शिवाची सद्योजात ,वामदेव, अघोर,तत्पुरुष आणि ईशान ही पाच मुखे आहेत. त्यांनीच कलियुगात रेवणसिद्ध,मरुकासिद्ध,एंकिराम,पंडिताराध्य आणि विधाराध्य असे पाच अवतार घेतले. त्यांना पंचाचार्य म्हटले जाते. रंभापुरी-कोल्लिपाक किंवा बाळेहोन्नूर(कर्नाटक),उज्जैन(मध्यप्रदेश), केदार(हिमाचल प्रदेश), श्रीशैल( आंध्र प्रदेश) आणि वाराणसी( उत्तरप्रदेश) ही वीरशैवांची पाच पिठे होत. पंचपीठांच्या भारतात अनेक शाखोपशाखा पसरल्या आहेत. बसवेश्वर हे संप्रदायाचे आद्यस्थानी किंवा संप्रादाय प्रवर्तक आहेत किंवा नाही यावर एकमत नसले तरी त्यांनी संप्रदायाचे पुनरुज्जीवन केले हे सर्वच अभ्यासक मान्य करतात. त्यांनी अनुभव मम्डप या संप्रदाय पीठाची बसवकल्याण येथे स्थापना केली. कांचीचे शंकराध्याय यांनी संस्कृतात बसवपुराण नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच प्रभुलिंगलिला आणि बसवपुराणाष्टकम या तीन ग्रंथांतून बसवेश्वरांचे चरित्र वर्णन केले आहे. प्रभुलिंगलिलेचा मराठी अनुवाद कवी ब्रम्हवासांनी लीलाविश्वंभर या नावाने केला आहे. याशिवाय अनेक ग्रंथातून त्यांच्या जीवन कार्याची माहिती मिळते. संप्रदायाचा अभ्यास डॉ. रा.चिं.ढेरे यांच्या मते बसवेश्वर हे मंगळवेढे (जि.सोलापूर) येथे इ.. 1133 ते 1153 या सुमारे वीस वर्षांच्या काळात राहिले. मंगळवेढ्याला रेवणसिद्धाचे मंदिर आहे. येथेच त्यांनी वीरशैव संप्रदायाचे संघटन केले. त्यानंतर पुढे संगमेश्वर आणि कल्याणी येथे गेले. लिंगायत हे वीरशैवाहून प्राचीन आहेत, असेही डॉ. ढेरे नमूद करतात. तरीही वीरशैव हे मन्मयस्वामी शाखा आणि लिंगायत परंपरेला आपल्या संप्रदायात समाविष्ट करून घेतात. वीरशैवात वैदिक आणि अविअदिक परंपरांशी नाते सांगणार्या अनुक्रमे पंचाचार्य आणि वीरक्त या दोन विचारधारा आहेत. महाराष्ट्रातील वीअरशैव हे पंचाकार्य तर कर्नाटकातील वीरशैव हे विरक्त परंपरेशी समन्वित झाले आहेत.

वीरशैव धर्माची शिकवण
वीरशैव धर्म याचा अर्थ साधारणपणे वीर म्हणजे शूर नायक,शिव या एकाच देवाचे अधिष्ठान मानून त्याची एकाग्र भावनेने भक्ती करावी, अशी वीरशैव धर्माची शिकवण होती. याचा अर्थ त्यांनी इतर देवांचा अनादर करावा, असे नव्हे, तर शिव सर्वश्रेष्ठ आहेतद्वतच लिंगायत किंवा लिंगवत असे नामही या पंथाचे वर्णन करण्यासाठी वापरतात. आपल्या शरीरावर जे (शिव) लिंग धारण करतात ते लिंगायत.त्यांना मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करण्याची गरज नाही. पूजेचे आणि भक्तीचे स्वरुप महात्मा बसव यांनी समजावून दिले होते. तळाशी सपाट असलेले काशीबोराच्या आकाराचे छोटे लिंग सर्व वीरशैवधर्मीय आपल्या शरीरावर धारण करतात.यालाच इष्टलिंग असेही म्हणतात.एखाद्या कपड्यात बांधून किंवा छोट्याशा डबीत ठेवून लिंग नेहमीच गळ्यात धारण करण्याची प्रथा आहे. जेणेकरून हे लिंग छातीवर (हृदयाजवळ) रुळत राहते. दिवसातून दोनवेळा तळहातावर घेऊन लिंगाची पूजा करावी.या पूजाविधीचा एक अर्थ असा की, प्रत्येक आत्मा हा पशू असून त्याचा देव पशुपती असतो. आत्मरुपी पशूला आपल्या देवरुपी मालकाचे सदोदित संरक्षण लाभते. दुसरा अर्थ असा की, मानवी आत्मा हाच मुळी देव आहे. सततच्या संथ प्रयत्नामुळे आत्म्याची उन्नती होऊन त्याला देवत्व लाभू शकते आणि आत्माच देव होतो. वीरशैव धर्मात गुरु,लिंग आणि जंगम यांचा आदर साधक व भाविकांनी करावा, असा आग्रह आहे. वीरशैव धर्माच्या तत्त्वांचा अनुग्रह करून लिंग देणारा तो गुरू. दीक्षा घेतलेल्या माणसाने आपल्या शरीरावर लिंग सतत धारण करावे, असा संकेत आहे. साधुत्व लाभलेल्या माणसाला या धर्मात जंगम म्हणतात. जंगम म्हणजे देवाचे दृश्य स्वरुप,स्थलास्थलावरून तो भ्रमण करतो. भक्ती,ज्ञान आणि वैराग्य याला वीरशैव धर्मात महत्त्वाचे स्थान होते.
साधनास्थळ : कुडलसंगम
महात्मा बसव सोळा वर्षांचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. वृद्ध आजीशिवाय त्यांना कोणाचाच आधार नव्हता. याच काळात त्यांचे पारंपारिक शिक्षण पूर्ण झाले होते. आई-वडिलांचे छत्र गेल्यावर सर्व समाज त्यांच्याशी कठोर वागू लागला. त्यांना अनेक प्रकारच्या धमक्या आल्या. तरीही समाजातील अनिष्ट चालीरितींना बसवेश्वरांनी ठाम विरोध केला. आजीच्या निधनानंतर मात्र त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. लहान भावाला नातेवाईकांकडे सोपवून ते गुरु आणि आत्मज्ञानाच्या शोधार्थ आपली बहीण अक्कगम्माबरोबर अरण्यातून निघाले. वाटेत कुडलसंगम हे मलप्रभा आणि कृष्णा नदीच्या संगमावर वसलेले छोटेसे रमणीय गाव दिसले. या गावालाच कप्पडीसंगम असेही म्हणत. याठिकाणी संगमेश्वराचे (शंकर) मंदिर होते. मंदिराचा कारभार ईशान्यगुरु बघत असे. गुरुंनी बसवची परीक्षा घेतली. मात्र त्यांची ईश्वरभक्ती आणि निष्ठा बघून मंदिराच्या कामात मदत करण्याची परवानगी दिली.बसवची बहीण मात्र गावातील ओळखीच्या कुटुंबाकडे राहू लागली. बसव या ठिकाणी पहाटे उठून पाणी भरणे,ताजी फुले-फळे आणणे, मंदिराची साफसफाई करणे अशी कामे करीत असे. ईशान्यगुरू वृद्ध झाल्यानंतर मंदिराचा कारभार बसवकडेच आला. ईश्वरभक्तीत बसव तल्लिन होऊन जात असे. भक्तीपदे गाणे,नृत्य करणे आनि ईश्वराशी लहान बालकाप्रमाणे संभाषण करण्यात बसव गुंगून जाई. मंदिराचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ त्यांच्या भक्तीने प्रभावित होत. कपिलाषष्टीला कुडलसंगमावर मोठा उत्सव भरत असे. याठिकाणी बसवचे नर्तन,गायन आणि प्रवचन ऐकण्यास हजारो भक्त येत असत. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे याठिकाणी लोक आकर्षित होऊ लागले. कुडलसंगम हे आता बसवेश्वरांचे साधनास्थळ बनले होते. कुडलसंगमाच्या संगमेश्वर चरणी सर्व आयुष्य घालवायचे, असा बसवेश्वरांचा निश्चय होता आणि ईश्वरभक्ती हेच प्रमुख उद्दिष्ट होते. यातूनच पुढे वीरशैव पंथाचा पाया रचला गेला, असे म्हटले जाते. 

महात्मा बसवेश्‍वर (भाग पाचवा)

स्वच्छता आणि शीलतेचे महत्त्व
तत्कालिन समाजावर अनेक अनिष्ट प्रथा, परंपरा, रुढी आणि अंधश्रद्धा यांचा मोठा पगडा होता. त्याला छेद देऊन नवीन समाज घडविण्याचे कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले. अनेक देव-देवतांची उपासना करण्यात समाज गुरफटला होता. पासतापास,नवससायास, पशुबळी, शरीराला इजा पोहोचेल अशा वाईट उपासना यांचे स्तोम माजले होते. महात्मा बसव यांनी जुनी दैवते टाकून फक्त शिव उपासना करावयास सांगितले. मांसाहार,भांग आणि मदिरापान सोडावयास लावले. तत्कालिन साधू, शिष्य आणि साधक हे अत्यंत अस्वच्छ राहत असल्याने त्यांना रोगराई होत असे. याउलट महात्मा  बसव यांनी स्वच्छ आणि सत्शील राहणीला पोषक आचारसंहिता तयार केली. बसव यांचा पुतण्या चन्नबसव याने पन्नास आचारांची नियमावली तयार केली. त्यात नियमित स्नान करणे ,दात घासणे,हिंसा टाळणे, सत्यवचन ,पती-पत्नीने एकनिष्ठ राहणे आदींचा समावेश होता. वीरशैव धर्माचा प्रचार करणार्या गुरुंना या गोष्टी आपल्या शिष्यांना शिकवण्याची आज्ञा होती. वीरशैव धर्माचे निष्ठावंत प्रचारक गावोगाव फिरून धर्मप्रचार करीत. त्यातील काही प्रचारक धर्माची तत्त्वे समजावून सांगताना गोरगरिबांच्या घरी अन्न सेवन करीत नाहीत. त्याइवजी ते शिधा गोळा करून दुसरीकडे स्वयंपाक करून जेवण करतात. असे बसव यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या गोष्टींची निर्भत्सना केली. मनुस्य कुठल्याही जातीचा असो तो श्रेष्ठ-कनिष्ठ नाही असे ते म्हणत. त्या काळात दळणवळणाच्या सोयी नसल्याने काशी किंवा रामेश्वर यात्रेला जाताना शेवटचा निरोप घेऊनच लोक निघत. सुखरुप परतीची शक्यता कमीच होती. बसव यांना मात्र यात्रा म्हणजे श्रम,पैसा आणि वेळ यांचा अपव्यय वाटे. त्यामुळे वीरशैवश साधकाने यात्रा करण्याची गरज नाही. कारण तो साधक स्वत:च देवाचे वसतिस्थान आहे, असेही ते सांगत.

अखेरचा कालखंड
वीरशैव पंथ किंवा धर्माचे महत्त्व समाजात वाढू लागल्याने शत्रूंची संख्या वाढू लागली होती. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि राजकीय प्रस्थापितांना धक्का बसल्याने त्यांनी वीरशैव समाज आणि महात्मा बसवेश्वरांविरुद्ध कट-कारस्थान करण्यास सुरुवात केली. चालुक्य घराण्याचा सम्राट बिज्जळ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी राजा होता. त्याच्या दरबारात बसव एक खजिनदार म्हणून अधिकारी पदावर असला तरीही राजा आणि अधिकारी यांच्यात फारसे चांगले संबंध नव्हते. कारण बिज्जळला मदत करणारे जमीनदार आणि मंत्री हे प्रस्थापित व्यवस्था आणि परंपरेचे पुरस्कार करणारे होते. तर महात्मा बसव हे बंडखोर विचारांचे होते. साहजिकच राजा आणि बसव यांच्यात खटके उडू लागले. त्यातच एक वेगळीच घटना घडली. बसवकल्याण शहरात मधुवय्या या ब्राम्हणशिष्याची मुलगी आणि अल्लय्या (हरळप्पा) या अस्पृश्य शिष्याचा मुलगा यांच्या विवाहास बसव यांनी मान्यता दिली. सनातनी लोकांनी राजा बिज्जळकडे यासंबंधी तक्रार केली. बिज्जळ याने संतापाच्या भरात नववधू-वरांचे डोळे काढण्याची आज्ञा दिली. या घटनेने वीरशैव समाजात वादळ उठले. याच्या निषेधार्थ जगदेव या बसवच्या अनुयायाने राजा बिज्जळची इ.. 1167 मध्ये हत्त्या केली. असा आरोप करण्यात येऊन वीरशिव समाजातील लोकांना राजाच्या लोकांनी मोठा त्रास देण्यास सुरुवात केली. सनातन्यांच्या या अत्याचाराला कंटाळून श्रावणशुद्ध प्रतिपदेला शके 1090 मध्ये (1168) महात्मा बसवेश्वर यांनी कुडल संगमावर जलसमाधी घेतली.
बसव जयंती सोहळा

बसवेश्वर यांच्या जीवनकार्याच्या कालखंडाला सुमारे आठशे वर्षे झाली तरीही अनुयायी आणि भाविकांमध्ये या महात्म्याविषयी नितांत आदर आणि श्रद्धा दिसून येते. कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील लातूर ,नांदेड आनि उस्मानाबाद या जिल्ह्यांत वीरशैव समाज मोथ्या प्रमाणावर आहे. नोकरी,व्यवसाय आणि उद्योगधंद्यांमुळे महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील वीरशैव,लिंगायत,जंगम,गोसावी गुरव आदी समाज मोठ्या प्रमाणावर असून ते महात्मा बसवेश्वराला मानतात. लिंगायत समाजाचे अनुयायी एकमेकांना प्रेमाने बसवण्णा असे म्हणतात. अण्णा म्हणजे थोरला भाऊ होय. वीरशैवांनी तयार केलेल्या बहुतेक भुर्जपत्र हस्तलिखितांची सुरुवात ही बसवलिंगय्या नम: अशी होते. म्हणजे श्री बसवलिंगाला नमस्कार असो संकटप्रसंगी किंवा दु:खात असताना भाविकांच्या मुखातून बसव-बसव असा उच्चार होतो,त्यामुळे आपल्यावरचा दुर्धर प्रसंग टळेल, असा त्यांना विश्वास वाटतो. दरवर्षी कर्नाटकात आणि दक्षिण महाराष्ट्रात बसव जयंती सोहळा उत्साहात साजरा होतो. खेड्यापाड्यातील लोक आपली घरे स्वच्छ करतात. पहाटे स्नान करून नवीन कपडे घालतात आणि मोठ्या प्रमाणावर शिवमंदिरात जाऊन पूजा करतात. देवाला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवून नातेवाईकांना जेवण देतात.

Friday, April 28, 2017

महात्मा बसवेश्‍वर (भाग चौथा)

वचनांमधून समाजप्रबोधन
महात्मा बसवेश्वरांची वीरशैव धर्मशिकवण आणि शिकवण्याची पद्धत अत्यंत सोपी, साधी आणि आकर्षक होती. ते नेहमी सांगत की, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या धर्माचा स्वीकार कोणालाही करता येईल. आपल्या अनेक वचनांमधून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. एका वचनात ते परमेश्वर प्राप्तीबद्दल म्हणतात, तू चोरी करू नकोस, हत्याही करू नकोस आणि खोटेही बोलू नकोस. कोणावरही रागावू नकोस.कोणाचा तिरस्कार करू नको. स्वत: विषयी अभिमानही बाळगू नको. कोणालाही दूषणे देऊ नकोस. हेच तुझे आंतरिक आणि बाह्यशुचित्व होय, याच मार्गाने आपला कुडल संगमेश्वर प्राप्त होईल.
त्याचप्रमाणे धर्माबद्दल सांगतात की, प्रेम आणि करुणेविनाधर्म तो कसला,सगळ्या जीवांविषयी करुणा हवी. सगळ्या धार्मिक श्रद्धेचे मूळ करुणा होय. या गुणांच्या अभावाषियी कुडल संगमेश्वराला आस्था नाही. तुम्ही जीवन म्हणता तो वार्याने विझणारा दिवा होय. ज्याला तुम्ही संपत्ती म्हणता ती तर बाजार गर्दी. अशा क्षणभंगुर गोष्टीवर विसंबून आपल्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका. स्वत; जवळ्चे सर्व काही बसव यांनी उदारपणे धर्मकार्यासाठी देऊन टाकले होते. ते ईश्वराला प्रार्थना करीत की, माझ्या घरी नको ठेऊ फुटके भांडेसुद्धा, ईश्वरा माझ्या घरी राहू दे गवताची काडी, मी जर मागेन भिक्षा देवाच्या नावाने तर लोकांनी देवाच्याच नावाने मला हाकलून द्यावे- हे कुडल संगमेश्वरा! आपल्या शिष्यांना वचनातून बसव शिकवण देतात की,यावे यावे ठिक आहात ना? असे म्हटल्याने तुम्ही कुरुप होत नाही. कृपया बसा, असे म्हटल्याने तुमच्या घरात खड्डे पडत नाहीत. चांगले बोलल्यामुळे तुमचे डोके किंवा पोट फुटत नाही. तुम्ही काही देऊ शकत नसाल तर एखादा गोडशब्दही तुमचे आणि अतिथींचे कल्याण करतो. त्यामुळे म्हणा ईश्वर, म्हणा संत, म्हणा तुमचे भले होवो,यातच कैलास प्राप्ती असते. बसवांचे समकालिन मारुल शंकर म्हणतात, बसवांचे विचार म्हणजे स्वर्गाप्रत पोहोचण्याची शिडी आहे. महात्मा बसवचे सहकारी त्यांना आपला गुरु व तत्त्वज्ञानी म्हणून आदर करीत.

बसवेश्वरांनंतर पंथाची स्थिती
महात्मा बसवेश्वर यांच्या काळात वीरशैव पंथाचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला. कालौघात सामाजिका आणि धार्मिक चळवळ ही एका संघटित धर्म-पंथामध्ये रुपांतरित झाली. संत,मुत्सद्दी,तत्त्वज्ञ,कवी आणि विद्वान यांनी या पंथाला लोकप्रियता मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले. कर्नाटक राज्यात सुमारे 25 टक्के लोक वीरशैव पंथाचे म्हणजे लिंगायत समाजाचे आहेत. तसेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांतही या पंथाचे मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत. कन्नड साहित्यावर बसवेश्वरांच्या चळवलीचा मोठा प्रभाव जाणवतो. सोळाव्या शतकातील सर्वज्ञ नावाचा कवी हा बसवांच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा पुरस्कर्ता होता. विजयनगर साम्राज्याच्या राजाश्रयामुले धर्मसुधारक , अभ्यासक आणि साहित्यिकांनी बसवेश्वर आणि त्यांच्या अनुयायांनी रचलेली वचने जमा करण्यासाठी प्रयत्न केले. वचनांची जमवाजमव करून टीकाटिपणी तयार केली. आधुनिक कवी- लेखकदेखील बसववचनांचा अभ्यास करताना दिसतात.
स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता
अकराव्या आणि बाराव्या शतकात पारंपारिक विचारसरणीनुसार स्त्री ही पापाचे मूळ समजले जाई. शिक्षण, मतस्वातंत्र्य, सभा-संमेलन सहभाग आदी गोष्टींची स्त्रियांना बंदी होती. इतकेच नव्हे तर धार्मिक आणि आध्यात्मिक उपासनेत सहभागालाही स्त्रियांना परवानगी नव्हती. या सर्व अनिष्ट रुढीला महात्मा बसव यांनी कडाडून विरोध केला. अकराव्या शतकात देवर दासीमय्या या शैवसंताने स्त्रियांविषयी आदरभाव राखला पाहिजे. या मताचा हिरीरीने पुरस्कार केला. दासीमय्यांकडून स्त्रीमुक्तीचा विचार घेऊन बसव आणि त्यांचे सहकारी स्त्रीमुक्तीच्या कार्यात मग्न झाले. सिद्धरामय्या हा बसवचा सहकारी म्हणतो की, स्त्री ही माया नसून प्रत्यक्ष ईश्वर आहे. अल्लम याने स्त्री-पुरुष यांना दोन डोळ्यांची उपमा दिली आहे. स्त्रियांना विविध व्यवसाय करण्यास आणि कुटुंबासाठी कमाई करण्यास बसव यांनी प्रोत्साहन दिले. तसेच गीत आणि काव्य रचनेलाही मुभा दिली. बसव यांच्या दोन्ही पत्नी गंगादेवी आणि निलोचना यांनी धर्मवचने लिहिली आहेत. बसव यांची थोरली बहीण अक्कनगम्मा यांनीही वचनांची रचना केली आहे. त्याचप्रमाणे कापड विणणारी अम्मावेना ,वडे विकणारी पित्ताय्वेना,दळणकांडण करणारी सोम्माव्वेना यांनी उत्तम कवने रचली आहेत.त्याचप्रमाणे अक्कमहादेवी,राणीमहादेवी,मुक्तायाक्का आणि लख्खम्मा या वीरशैव योगिनींनी अनेक दर्जेदार कवने रचली आहेत. त्यांनी आपल्या उपासनेतून अध्यात्मिक उन्नती साधलेली दिसते. बसवाच्या अनुयायांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते. सर्वजण भजन, शिवस्तुती आणि धार्मिक चर्चेत सहभागी होत. महिला शिष्य आनि साधक भल्या पहाटे घरोघरी जाऊन लोकांना ध्यानासाठी गोळा करीत. तसेच सभा आणि भजनांमधून वचनांचे गायन करीत असत. स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असलेल्या महात्मा बसवेश्वरांचा आजच्या काळातील अभ्यासकही आदराने उल्लेख करतात. केवळ कर्नाटकच्या इतिहासात नव्हे,तर भारताच्या इतिहासात धार्मिक आणि सामाजिक चळवळीत महात्मा बसवेश्वर आणि वीरशैव पंथाचे योगदान मोलाचे मानले जाते.

महात्मा बसवेश्‍वर (भाग 3)

तीर्थस्थळ आणि साम्राज्यनगरी बसवकल्याण
चालुक्यांची राजधानी असलेले कल्याण हे बिदर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. बसवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याला बसवकल्याण असे नाव दिले आहे. बाराव्या शतकातील वीरशैव चळवळीचे स्मरण होईल, अशा किती तरी गोष्टी तिथे सापडतात. कन्नड साहित्याच्या अभ्यासकांना तर त्याचे महत्त्व अनन्यसाधारणच वाटते.येथे कितीतरी गुहा आणि मंदिरे आहेत. बसवेश्वर,अक्कनगम्मा, अल्लमप्रभू आदींसह अनेक सत्पुरुषांनी येथे तपश्चर्या केली. महात्मा बसव येथे गोरगरिबांना दान देत असत. आणि आपल्या सहकार्यांसमवेत वेगवेगळ्या धार्मिक विषयांवर चर्चा करीत असत. त्यामुळे वीरशैव समाजासाठी बसवकल्याण हे तीर्थस्थळ म्हणून महत्त्वाचे वाटते. अनेक देवी-देवतांची मंदिरे येथे होती. शैव, वैष्णव आणि जैन लोक येथे राहत असत. काही प्रमाणात बौद्धधर्मीयदेखील येथे राहत होते. धर्माचे आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून या नगराचा उल्लेख होई. या ठिकाणी अनेक असलेल्या शीलालेखांवरून इतिहास संशोधकांनी नगर विस्ताराची आणि उद्योगधंद्याच्या भरभराटीची माहिती दिली आहे. बिज्जळ याने इ.. 1162 मध्ये बसवकल्याण येथे चालुक्य घराण्याची सत्ता हस्तगत करून स्वत:ला सम्राट म्हणून घोषित केले. बिज्जळ हा एक शूर योा, चतुर आणि समर्थ राज्यकारभारी होता. तो दूरदर्शी राज्यकर्ता असल्याने त्याने सर्व धर्माला समान वागणूक दिली. या राजाने बसव यांना राज्याचा खजिनदार म्हणून नेमले. राज्याच्या उत्पन्नाची आणि खर्चाची काळजी वाहणे आणि हिशोबाची कागदपत्रे जतन करणे ही खजिनदाराची दोन कर्तव्य बसव यांनी निष्ठेने पार पाडली. बसव यांची खजिनदारपदी नेमणूक संबंधी एक कथा सांगितली जाते. ती अशी: चालुक्य साम्राज्याचा खजिना मोजण्याचे काम सुरू असताना तेथील अधिकार्यांची चूक झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे खजिनदाराला लक्षावधी रुपये राज्याच्या तिजोरीत भरावे लागणार होते. याचवेळी अर्थमंत्री सिद्धदंडनाथ यांच्याकडे बसव आले असता त्यांनी खजिना पुन्हा मोजून देण्याची जबाबदारी घेतली. बसवने खजिना मोजला असता हिशोबातील चूक सापडली आणि खजिनदारावरचे संकट टळल्याने सिद्धदंडनाथ यांनी बसवला खजिनदारपदी नेमले.

बसव यांचे सहकारी
बाराव्या शतकातील धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख केला जातो,कारण तत्कालिन समजात ते सर्वमान्य महात्मा होते. बहुजन समाजाने त्यांच्या विचारांना आणि कार्याला पाठिंबा दिला .इतकेच नव्हे तर त्या काळातील (समकालीन) संत व विचारवंत त्यांचे सहकारी, शिष्य आणि अनुयायी होते. तरुणपणी मंग़ळवेढे आणि बसवकल्याण येथील त्यांचे सहकारी आणि अनुयायी यांची नितांत श्रद्धा होती.ओरिसातील कलिंग प्रांतातील महादेवी शेट्टी नावाचा व्यापारी त्यांचा परमभक्त होता. अलमप्रभू (प्रभूदेव) हा थोर संतदेखील बसवांचा प्रमुख सहकारी होता. परंतु काही ठिकाणी अलमप्रभू तथा अल्लमा यांना बसव यांचे आध्यात्मिक गुरू असा उल्लेख आला आहे. अलमप्रभू यांनीच लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ता सिद्धराम आणि गोग्गय्या यांना वीरशैव समाजाचे अनुयायी बनवले. सिद्धराम यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्य केले. अक्कमहादेवी ही कर्नाटकातील संत बसवांची अनुयायी होती. सारंगी आणि वीणावादक सकलेश मदारस यांनी अनेक वचने लिहिली. मादिवळ माच्चया हा धोबी, अंबिगार चौदय्या हा नावाडीदेखील वीरशैवीच होते. मोळीगेय मारय्या हा एकेकाळचा काश्मिर राजा संन्यासी होऊन कर्नाटकातील जंगलात आला होता. त्याची पत्नी राणी महादेवी आणि राजा मारय्या हे दोघेही शिवभक्त होते. ऐदक्की आणि त्याची पत्नी लक्कम्मा तसेच बासरीवादक किन्नरय्या हे बसव यांचे भक्त होते. चन्नबसव हा बसव यांचा पुतण्या अतिशय बुद्धिमान आणि व्यासंगी होता. त्याच्या रचनांमधून षटस्थळ तत्वज्ञानाची संपूर्ण आणि पद्धतशीर माहिती व विवेचन मिळते.
षटस्थळ अवस्था

महात्मा बसव हे केवळ मोक्ष लालसा असलेले भक्त नव्हते तर प्रखर बुद्धीवादी होते. धार्मिक आणि सामाजिक या दोन्ही व्यवहारात त्यांना रस होता. ईश्वराबद्दल बसव म्हणतात, ईश्वर दर्शन म्हणजे निखळ आनंद आणि ईश्वराशी मीलन म्हणजे उन्मनी अवस्थेतील परमानंद होय. आपल्या साधनेच्या आरंभीच्या काळात बसव यांनी ईश्वराला आपला मालक आणि स्वत:ला नोकर मानले. त्यानंतर ईश्वराला पती आणि स्वत:ला पत्नी मानून मधुराभक्ती केली. वीरशैव संतांनी घेतलेल्या गुढ अध्यात्मिक अनुभूतीची अवस्था ही षट्स्थळ अवस्था म्हणजे सहा पायर्यांमधून वर्णन केलेली आहे. या सहा अवस्था म्हणजे भक्तस्थळ, महेश्वरस्थळ, प्रसादीस्थळ, प्राणलिंगस्थळ, शरणस्थळ आणि ऐक्यस्थळ होय.1) भक्तस्थळ: या अवस्थेत भक्त हा आपल्या मालकाचा सेवक असतो आणि त्याची अध्यात्मिक उमेदवारी या अवस्थेत सुरू होते. 2) महेश्वरस्थळ: या अवस्थेत पुजनीय ईश्वरापलिकडे दुसरे कोणतेही दैवत भक्त मानायला तयार नसतो. 3) प्रासादीस्थळ: साधकावर दैवी कृपेचा वर्षाव हळूहळू सुरू होऊन या अवस्थेत त्याचे चित्त आशेने भरू लागते.4) प्राणलिंगस्थळ: ध्यान करताना तळहातावर धारण केलेल्या ईष्टलिंगात ईश्वर वास करतो, अशी भक्तीची पक्की धारणा या अवस्थेत होते. या अवस्थेत ईश्वराचे अस्तित्व आपल्या ठायी आहे, असा अनुभव त्याला येतो. 5) शरणस्थळ: स्वत:ची संपूर्ण ईच्छाशक्ती ईश्वरचरणी पूर्णत: लीन होते. 6) ऐक्यस्थळ:साधकाचे वेगळे स्वत:चे अस्तित्व लोप पावून भक्त ईश्वरमय होतो. पहिली अवस्था म्हणजे दासोहम. मी सेवक आहे आणि अंतिम अवस्था सोहम म्हणजे मीच तो आहे. आपल्या साधनेत आलेल्या प्रत्यक्ष अनुभवातून या सहा अध्यात्मिक अवस्था बसव यांनी त्यांच्या संत सहकार्यांना सांगितल्या.

जीवाणू, विषाणू व परजीवी हे सर्व घातकच!

(जागतिक पशुचिकित्सा दिवस)

     जीवाणू, विषाणू व परजीवी हे सर्व सजीवांसाठी घातक आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध  सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहेजागतिक पशुचिकित्सा दिवस साजरा करताना समाजजागृत महत्त्वाची असून  आरोग्य, स्वच्छता, लसीकरण सक्षमतेने हाताळण्याची गरज आहे. जागतिक पशुचिकित्सा दिवस एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा करण्याचा प्रघात 2000 सालापासून नियमीत सुरु आहे. जागतिक पशुचिकित्सा संघटना प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम किंवा विषय स्वीकारून जागतिक स्तरावर हा पशुचिकित्सा दिवस साजरा करण्याचे निश्चित करते. यावर्षी सूक्ष्मजैविकांची प्रतिकारत्मकता: जागरूकता व कारवाई हा विषय घेऊन जागतिक पशुचिकित्सा दिवस साजरा करण्याचे ठरले आहे. सूक्ष्मप्रतिजैवके जैविक रोकथाम करण्यासाठी उपयोगात आणली  जातात हे खरे आहे. मात्र, जर हा उपयोग तंत्रशुद्ध नसेल तर प्रतिकार क्षमतेत क्षीणता येईल.
     प्रतिजैवके कधी कमी प्रमाणात दिली जाऊ शकतील किंवा त्यांचे प्रमाण जास्त होईल. जर कमी झाली तर रोग बरे होणार नाहीत आणि जास्त प्रमाणात दिली गेली तर दुसरे रोग किंवा एलर्जीसारखे नको असलेले दुखणे सुरू होतील. पुढच्या काळात मात्र पूर्वी उपयोगात आणलेली प्रतिजैवके काम करणार नाहीत, ज्याला सोप्या भाषेत म्हणजे प्रतिजैविके शून्य काम करतील असे समजायला हरकत नाहीपशुचिकित्सक हा घटक सुशिक्षित असल्याने त्याचे योगदान जबाबदारपूर्ण असते. गरज असेल तेव्हा औषधे घ्यावी. परंतु, जर गरज नसल्यास ती घेऊ नये ही गरज आहे. मात्र औषधांची गरजच पडू नये, त्यासाठी आरोग्य, स्वच्छता, लसिकरण आदी बाबी सक्षमतेने हाताळने ही काळाची गरज आहे.
     पशुचिकीत्सक, जागतिक पशुचिकित्सा दिवस, जागतिक आरोग्य संघटना आदी अनेक अनेक शब्दांचा शेवट फक्त प्रयत्नात आहे. जो साध्य करण्यासाठी लहान लहान प्रेरणादायी कार्यात सुख, आनंद शोधने पर्याय ठरेल. सूक्ष्मजैविकांची प्रतिकारत्मकता: जागरूकता व कारवाई या विषयाचा विचार झाल्यास काही बाबी समजून घेणे गरज ठरते. अभ्यासपूर्ण माहिती, विेषणात्मक शिक्षण, अनुकूल वातावरण, स्वच्छता, संसर्ग प्रतिबंध, जबाबदारवृत्ती, रोगनिदानाच्या सोई व त्यांच्या उपलब्धता, वैयक्तिक व सामूहिक उत्तरदायित्व असे अनेक मुद्दे हाताळल्याशिवाय समाज व देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही.

Thursday, April 27, 2017

महात्मा बसवेश्वर (भाग दोन)

वाड्.मयाची निर्मिती
कन्नड भाषेतील उत्कृष्ट लेखक आणि कवी म्हणून महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख होतो. त्यामुळे सामाजिक आनि धार्मिक सुधारक म्हणूनच नव्हे तर एक साहित्यिक म्हणूनही लोक बसव यांचे स्मरण करतात. काही वाड्.मय अभ्यासकांच्या मते वचनांची परंपरा बसवांपासून सुरू होते. परंतु त्या आधीही काही संतांनी आणि सुधारकांनी वचने लिहिली होती. परंतु बसव हे सर्वश्रेष्ठ वचनकार होते., असे सर्वच अभ्यासक मानतात. वचन या शब्दाचा शब्दश: अर्थ गद्य असा होतो. वचन पद्यात नसले तरी वेगळ्या लांबीच्या ओळीत वचनांची मांडणी शक्य असते. एक वचन साधारणपणे तीन ओळींपासून तीस किंवा पस्तीस ओळींपर्यंत असे. प्रत्येक वचन हे अंकित म्हणजे लेखकांच्या स्वत:च्या नावाने संपे. जसे संत नामदेवांच्या अभंगात नामा म्हणे आणि संत तुकारामांच्या अभंगात तुका म्हणे असे असा उल्लेख असतो. बसवाच्या अंकित त्याच्या आराध्य ईश्वराचे होते ते म्हणजे कुडल संगमेश्वर होय. जसे संत एकनाथांनी आपल्या भारुडात आपले (गुरु संत जनार्दनाचा) एका जनार्दनी असा उल्लेख केलेला आढळतो. बसवाने रचलेल्या वचनांची संख्या सुमारे 1400 पेक्षा जास्त असून त्यात उपदेश,समाज परीक्षण आणि आत्मपरीक्षण केलेले आढळते.

महाराष्ट्रातील वीरशैव
महाराष्ट्रातील वीरशैव हे शिवाची अनन्य भक्ती हेच मोक्षाचे साधन मानतात. शिवपरमात्मा आणि जीवात्मा या सामरस्य अद्वैत हे त्यांचे अंतिम श्रेयस आहे. लिंगाचे तीन भाग मानतात. योगांग,त्यागांग आणि भोगांग. योगांगाने जीवाचा शिवाशी संयोग होतो. भोगांगामुळे जीवाला शिवाशी सायुज्यता प्राप्त होते. तर त्यागांगामुळे जीवाची जगाची अनित्यता पटते. या संप्रदायाच्या आचार धर्मानुसार सदगुरुने दिशापूर्वक दिलेले इष्टलिंग सोने,चांदी किंवा लाकूड आदींच्या लहान पेटीत घालून गळ्यात धारण करतात. तसेच सर्वांगावर भस्म लेपन करून ओम नम: शिवाय हा गुरुमंत्र म्हणणे. तसेच अष्टावरण आणि पंचाचारांचे पालन करणे हे महत्त्वाचे आचार मानले जातात. लिंग,जंगम,विभूती,रुद्राक्ष,मंत्र,पदोदक आणि प्रसाद ही अष्टावरणे होत. यामुळे साधक शुचिर्भुत होतो. तर शिवाचार ,लिंगाचार,सदाचार,मृत्याचार आणि गणाचार या पंचाचार हे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे नियम आहेत. महाराष्ट्रात एक हजार वर्षांपूर्वीची प्राचीन वीरशैव मठ आहेत. वीरभ्रद,रेवणसिद्ध,सिद्धरामेश्वर आदी वीरशैव धर्मप्रचारकांची मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील विसोबा खेचर ,मन्मयस्वामी आणि शांतलिंगस्वामी हे वीरशैव परंपरेतील साधुसंत मानले जातात.
समतेचे पाईक
वीरशैव पंथाच्या प्रथा-परंपरा या अन्य समाजाच्या प्रथा-परंपरांपेक्षा वेगळ्या होत्या. अन्य धर्म-पंथातील चालीरीती प्रथा-परंपरांवर बसवेश्वरांनी कठोर टीका केली. त्यांनी घोषित केले की, वर्ग,समूह,पंथ किंवा धंदा यांचा वीरशैव धर्म स्वीकारण्यासाठी अडसर राहणार नाही. एकदा वीरशैव धर्म स्वीकारल्यानंतर त्याला समानतेची वागणूक दिली जाईल. वीरशैव धर्मात व्यक्तीकडून दोन गोष्टींची अपेक्षा असे: 1) आपल्या पूर्वीच्या धर्माचे सर्व संबंध तोडून नवीन धर्माचा अनुग्रह झाल्यावर शरीरावर शिवलिंग प्रतिमा धारण करणे 2) वीरशैव समाजाचा अनुग्रह घेतल्यावर साधकाची शिवावर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. वीरशैवाकडून अपेक्षित असलेले धार्मिक विधीही अत्यंत साधे होते. वीरशैव साधकाने पाळावयाचे नियम असे: 1) आपल्या कपाळावर आडवे भस्म लावावे. 2) दारु आणि मांस भक्षण बंद करावे. संपूर्ण शाकाहारी व्हावे.3) नेहमी सत्य बोलावे.चौर्यकर्म करू नये. हत्या करू नये. लोभीपणा टाळावा, आळस झाडावा.4) प्रत्येकाने काही तरी धंदा-व्यवसाय करून,कष्ट करून आपली उपजीविका करावी. 5) मंदिरात किंवा दुसर्या कुठल्याही पवित्र स्थळी जाणे टाळावे.6) आपला देह मंदिर असून , शिवभक्त वस्ती करतात तेच पवित्र स्थान असते. 7) वेळेअभावी किंवा साधनांच्या अभावी पूजा करता आली नाही तर त्याची चिंता करू नये. कारण साधकाची ईश्वरावरील नितांत श्रद्धा यालाच खरे महत्त्व आहे. तत्कालीन समाजातील गरीब,पददलित, धार्निकदृष्ट्या मागासलेया आणि सामाजिक व धार्मिकदृष्ट्या उच्च समाजाने नाकारलेल्या बहुजन समाजाला या पंथातील सर्वच गोष्टी पटणे स्वाभाविक होते. त्यांच्या उद्धारासाठी बसवेश्वर जणू अवतार होता, असे त्यांना वाटले. हजारो लोक बसवेश्वरांना शरण गेले आणि त्यांनी या पंथाचा स्वीकार केला. काही सनातनी लोक याला हिंदू धर्मातील एक नवी शाखा किंवा पंथ म्हणू लागले.तर सुधारक विचाराच्या लोकांना वीरशैव हा स्वतंत्र धर्म असल्याचे विचार मांडले. तत्कालिन समाजातील शेतकरी,विणकर,चांभार,कोळी, पारधी,बुरुड,न्हावी,व्यापारी आणि ब्राम्हण या सर्वच समाजघटक ,जाती-जमाती आणि व्यावसायिक यांनी नव्या पंथाचा स्वीकार केला.  

महात्मा बसवेश्‍वर (भाग एक)

     भारतात अनेक धर्म असून ,त्यांचे पंथ तथा संप्रदाय आहेत. हिंदू धर्मातील नाथ,महानुभाव,वारकरी,दत्त आणि समर्थ हे पाच प्रमुख संप्रदाय मानले जातात. याशिवाय आणखी एक प्रमुख संप्रदाय म्हणजे वीरशैव संप्रदाय होय. या संप्रदायाची स्थापना महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात केली असे म्हटले जाते. काही अभ्यासक त्यांना धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते मानतात.थोर समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणार्या या महापुरुषाने रुढी-परंपरेशी बंडखोरी करत स्वतंत्र धर्म स्थापन केला, असेही म्हटले जाते. त्यामुळे वीरशैव हा संप्रदाय ,पंथ की धर्म याबाबत मतभेद असले तरी सुमारे 800 वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वरांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे.
बालपण आणि शिक्षण

     कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात बागेवाडी या गावात शैवपंथीय ब्राम्हण मादिराज आणि माता मादलंबिका यांच्या उदरी वैशाख शुद्ध तृतीयेला (अक्षय्य तृतीया) शके 1053 मध्ये (..1131) बसवेश्वरांचा जन्म झाला.त्यांना भक्ती भंडारी, बसव आणि बसवन्ना अशीही नावे होती. त्यांना देवराज मुनी नावाचा भाऊ आणि अक्कन्नगम्मा ही बहीण होती. बालपणी उपनयनसंस्कार करण्यास नकार देऊन ते घराबाहेर पडले. परंतु मात्यापित्याने त्यांचे मन वळविल्याने त्यांना घरी नेऊन उपनयन न करताच शिक्षण घेण्याचे ठरले. बसव या शब्दाचा संस्कृत अर्थ वृषभ होय. शिवशंकराच्या नंदीचा अवतार आपल्या घरात जन्माला आला, अशी त्यांच्या मातापित्याची धारणा होती. बसवला बालपणापासूनच धर्म आणि ईश्वर यासंबंधी जाणून घेण्याची इच्छा होती. मंदिरात सुरू असलेल्या ईश्वर भक्तीच्या कथा ते मन लावून ऐकत असत. पतंतु धर्मातील भेदाभेद आणि अंधश्रद्धा यांचा त्यांना राग येई. यासंबंधी थोरामोठ्यांशी ते तर्कसंगत चर्चा करून एकांतात विचार करीत बसत. बागेवाडी आणि आसपासच्या गावागावात मोठमोठे शास्त्री पंडित राहात असत. या विद्वानांकडे त्यांनी वेद आणि वेदाची सहा अंगे, तत्वज्ञान,छंदशास्त्र, संगीत,वाड्.मय, शिवागम आदी ग्रंथ व विषयांचा अभ्यास केला. बसव हे बालपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असल्याने पारंपारिक शास्त्राभ्यासात ते पारंगत झाले.त्यांच्या स्मरणशक्तीचा सवंगड्यांनाच नव्हे तर गुरुजनांनाही हेवा वाटत असे.
     वैवाहिक जीवन

चालुक्य साम्राज्याचे अर्थमंत्री सिद्ध दंडनाथ यांनी बसवची खजिनदार म्हणून नियुक्ती केली.सिद्ध दंडनाथ त्यांचे मामा होते. कालांतराने बसव यांनी सिद्धदंडनाथांच्या दोन मुली गंगादेवी आणि मायादेवी (निलोचना) यांच्यासमवेत विवाह केला. वास्तविक आपल्या पौगंडावस्थेत बसव यांनी संन्यासी म्हणून जीवन व्यतीत करण्याचे ठरविले होते. त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय सुखी होते. तसेच त्यांना एक पुत्ररत्नही झाले. बिज्जल साम्राज्यात त्यांना मानाचे स्थान मिळाले. बसव दंडनायक (वरिष्ठ दर्जाचा अधिकारी) म्हणून लोक त्यांना ओळखत असत. त्यांच्याकडे भेटीला येणार्यांची ,पाहुण्यांची नेहमी वर्दळ असे. त्यांच्या दोन्ही पत्नी आणि बहीण अक्कन्नगम्मा संर्वांचे यथोचित स्वागत करीत. महात्मा बसवचे चरित्रकार वर्णन करतात की, सत्ता आणि संपत्ती बसवांकडे आपणहून चालत आल्या. परंतु त्यांना त्या गोष्टी भ्रष्ट करू शकल्या नाहीत. त्यामुळे उलट बसव अधिक नम्र झाले. त्यांना गरिबांबद्दल कणव आणि श्रीमंतांबद्दल तुच्छता वाटत होती. स्वत:च्या घराची दारे त्यांनी गरिबांसाठी सताड उघडी ठेवली होती. स्वत:ला अभिप्रेत असलेल्या धर्मासाठी जवळची धनदौलत आणि पैसाही खर्चून टाकला. एकदा घरात शिरलेल्या चोराला त्यांनी पत्नीच्या कानांतील कुड्या देऊन टाकल्या. शुचित्व,नम्रता आणि भक्ती या गुणांनीयुक्त असलेला माणूस म्हणून बसवेश्वरांची चोहिकडे प्रसिद्धी झाली होती. माहेश्वर (शिवाचे भक्त), जंगम आणि अन्य भक्तगण यांची एकच गर्दी बसवांच्या घरी होत असे. दूरच्या गावांकडून लोक त्यांच्याकडे येत म्हणून त्यांच्या घराला महामने म्हणजे सर्वश्रेष्ठ घर असे नाव पडले. कुठल्याही दिवशी आणि कुठल्याही वेळी लोकांचे स्वागत होई. इष्ठ लिंगाच्या पूजेसाठी तेथे सर्व सोयी होत्या. बसवाच्या भक्तीने आणि प्रामाणिकपणाने सर्व लोकांना आनंद होई.

Monday, April 24, 2017

(बालकथा) ससुल्या ससा आणि जादुगार

     एके दिवशी सकाळी ससुल्या ससा आपल्या लाडक्या फुलांना पाणी घालत होता. पण आज वातावरण फार वेगळेच होते. सगळी फुलं गपगप होती. त्यांच्या डोळ्यांत भिती होती. त्याने मोठ्याने जाईला विचारलं, ‘काय झालं गं? रागावलीस का?’ 
जाई आणखी घाबरली. पण ती गप राहिली. ससुल्याला याचं कारणच कळेना. तो काही बोलणार, तोच त्याची दृष्टी एका झाडामागे लपलेल्या म्हातार्यावर पडली. तो झाडामागून ससुल्याकडे एकटक पाहात उभा होता.त्याचे डोळे मोठ्ठेलाल होते.दाढीचा रंग पिवळा होता.त्याला पाहून ससुल्याच्या नाजूक शरीरात भितीची लहर उठली. ससुल्याला घराकडे धुम ठोकायची होती,पण पाय जागचे हलता हलेनात.
हा...हा...हा...! तू पळूच शकणार नाहीस,’ म्हातारा मोठ्याने हसत म्हणाला.
पुढे येऊन त्याने ससुल्याची मान पकडली.बघितलंस, ‘माझ्या जादूची कमाल!कुणी माझ्या आदेशाशिवाय जागचं हलूसुद्धा शकत नाही.’ त्याला तसेच पकडून म्हातारा चालायला लागला.
ससुल्याने घाबरत घाबरत विचारलं,’मला कुठे घेऊन चालला आहेस?’
जादूनगरीला! तिथे तुझ्यावर प्रयोग करणार. हा...हा...हा...! आता,गप राहा.नाही तर तुझी आणि तुझ्या मित्रांची काही खैर नाही.’ असे म्हणून तो झपाट्याने चालू लागला.
ससुल्याला मागे फिरून आपलं घर आणि आपल्या लाडक्या फुलांना पाहायचं होतं,पण त्याला हालतादेखील आलं नाही.
रात्री जादुगार ससुल्याला घेऊन एका उंच डोंगरावर पोहोचला. त्याला आपल्या अंधार्या कोठडीत नेले. तिथे गेल्यावर त्याने एक छोटासा पिंजरा उघडला. त्याने ससुल्याला काहीही खायला-प्यायला न देता त्यात बंद करून टाकलं.ससुल्याला रात्रभर झोप आली नाही. जादुगार मात्र डाराडूर झोपी गेला.
जादूगार सकाळी उठून कुठे तरी निघून गेला.ससुल्या पिंजर्यात कैदच होता. भुकेने व्याकूळ ससुल्याची अवस्था फारच वाईट झाली होती. अंधारात त्याला ना नीटसं दिसत होतं, ना नीट्स श्वास घेता येत होतं.इतक्यात कुणी तरी हळूच दरवाजा उघडला आणि आत आला.पहिल्यांदा तर ससुल्या काही पाहूच शकला नाही,पण नंतर त्याला कुणीतरी स्त्री असल्याचं जाणवलं. ती काही तरी शोधत होती.ससुल्या बेचैन झाला. त्याला राहावलं नाही. तो म्हणाला, ‘अहो, आपण कोण आहात? आणि मला मदत करता का?’
ती चकित होऊन इकडे-तिकडे पाहू लागली.तिने विचारले, ‘कोण आहेस तू?’
ससुल्या ससा.’
ससा, आणि इथे रे कसा आलास?’
जादुगारानं काल पकडून आणलं. मला मदत करा. इकडे... इकडे... ! हां, आता वर बघा! मेहबानी करून मला बाहेर काढा.मी अकडून गेलोय.’
ती अगदी पिंजर्याजवळ आली. त्याने तिला पहिल्यांदाच पाहिले.ती म्हातारी होती. दिसायला दयाळू होती. तिने पिंजर्याला हात लावला.पण,झटकन हात मागे घेतला. ती म्हणाली,’मला नाही उघडता येणार. जादूनं बंद केलं आहे.’
ससुल्या रडायला लागला. ‘आता... मी इथे असाच मरून जाणार?’
म्हातारी म्हणाली, ‘रडू नकोस. मी आताच आमच्या राणी परीला सांगते. ती तुला बाहेर काढेल.पण, मला पहिल्यांदा माझं काम करू दे!’
कसलं काम?’
जादुगाराच्या भाकर्या हव्यात. राणी परीने मागितल्यात. त्यांमध्ये जादुगाराची शक्ती आहे.’
ससुल्या डोळे फुसू लागला. मग म्हणाला,’भाकर्या? त्या तर त्या कपाटात आहेत.’
म्हातारीने लगेच कपाट उघडले.तिथे भाकर्या पडल्या होत्या. म्हातारीने त्या एका कापडात गोळा केल्या.ससुल्याचे आभार मानले आणि जाता जाता म्हणाली,मी परत येईन. माझी राणी परी तुला नक्की मदत करेल.ती निघून गेली.
ससुल्या दरवाज्याकडे पाहात राहिला.त्याला भिती वाटू लागली. जादूगार येईल आणि आल्या आल्या आपला जीव घेईल. इतक्यात जादूगार आलाच. त्याने दिवा लावला.त्याचा चेहरा ससुल्याने पाहिला,तो फारच रागात होता.जादुगाराचे लक्ष उघड्या कपाटाकडे गेलं.तो किंचाळला,’कोण आलं होतं, कोण आलं होतं?’

तो पटकन ससुल्याजवळ आला. ओरडला,’कोण आलं होतं.तुला माहिताय सांग!’
ससुल्या गप्प राहिला.तो काहीच बोलला नाही.जादुगार पिंजरा गदगदा हलवत म्हणाला, ‘आता बोल!’
ससुल्या रडत म्हणाला, ‘मला माहित नाही.खरंच, मला काही माहिती नाही.’
जादूगार पुन्हा मोठ्याने ओरडला,’खोटं खोटं! कुणी तरी इथं आलं होतं. तुचं सांगितलं असशील, भाकर्या कुठे ठेवल्या होत्या ते!थांब! तू असा सांगणार नाहीस. मी तीनपर्यंत मोजेन. जर तुझ्या नरड्यातून आवाज आला नाही,तर पुन्हा कधीच यातून आवाज निघणार नाही.लक्षात ठेव.’
जादुगाराने गिणती सुरू केली.’एक... दोन...’
ससुल्या जाम घाबरला. तेवढ्यात कुणी तरी हळूच दरवाजा उघडला.’तीन! ... ... आई  ई ई गं!’
जादूगार खाली कोसळला.ससुल्याला कुणी तरी उठवलं.त्याने गोड आवाज ऐकला. ‘तू मोठा बहादूर आहेस. बरं केलंस, तू माझं नाव सांगितलं नाहीस.’
ससुल्याने विचारलं,’तुम्ही! तुम्ही कोण आहात?’
मी राणी परी. खरं तर हा जादुगार मला फारचं त्रास देत होता. मी कित्येक दिवसांपासून याच्या पाळतीवर होते. याच्या भाकर्या शोधत होते. आता आम्ही मजेत राहू शकू.’
आता कुठे ससुल्याच्या जीवात जीव आला.तो म्हणाला, ‘म्हणजे आता जादुगार उठणार नाही?’
तिने पालथा पडलेल्या जादुगाराला पायाने ढकलून सरळ केले. आणि म्हणाली, ‘बघ,तो मेलाय. आता कधीच उठणार नाही. आता तू आरामात तुझ्या घरी जाऊ शकतोस.’
ससुल्या हळूच म्हणाला,’पण माझं घर कोठे आहे? किती लांबाय? आणि मी घरी कसं जाणार?’
राणी परी म्हणाली, ‘काही काळजी करू नकोस. मी सोडीन तुला. अगोदर काही तरी खाऊन घे.’
राणी परीने टाळी वाजवली. तसा एकदम कोठडीत प्रकाश उजळला. ससुल्यासमोर तर्हेतर्हेचे गवत आणि फळं आली. ती ससुल्यानं अगदी मिटक्या मारत खाल्ली.
मग राणी परी म्हणाली, ‘आता डोळे मिट. मी तुला घरी पोहचवते.’
मी तुझा फार फार आभारी आहे, राणी परी.’ असे म्हणून त्याने आपले डोले बंद केले. डोळे उघड्ताच तो जिथून गेला होता, तिथे पोहचला.सगळी फुलं आनंदानं डोलू लागली. ओरडू लागली. ‘ससुल्या ससुल्या!कुठे होतास तू? आणि आता कसा आलास?’
ससुल्या म्हणाला, ‘अरे, थोडे थांबा! मी जरा आराम करतो, मग तुम्हाला सगळी गोष्ट सांगतो.’ आणि तो नेहमीसारखा टुण टुण उड्या मारत घरात पोहचला आणि अंथरुणात जाऊन आडवा झाला.

(प्रेरक कथा) जुन्या सवयी सोडणे कठीण

   
 एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. तो त्याच्या मुलाला ज्या ज्या वेळेला एखादी वाईट गोष्ट सोडायला सांगायचा, त्या त्या वेळेला त्याला त्याच्या मुलाकडून एकच वाक्य ऐकायला मिळायचं, ‘मी अजून लहान आहे, हळूहळू सवय सोडून दईन.’ पण तो कधीच वाईट सवय सोडायचा प्रयत्न करायचा नाही. एकदा एक महात्मा त्यांच्या गावी आला. श्रीमंत माणसाने आपल्या मुलाला घेऊन महात्म्याकडे गेला. त्यांच्यापुढे आपली समस्या मांडली.
महात्म्याने त्या मुलाला बागेतील एक रोप दाखवून विचारले, ‘काय, तू ते रोपटे उपटू शकतोस?’ मुलाने अगदी सहजतेने ते रोपटे उपटले. मग ते पुढे गेले. थोड्या वेळाने एका थोड्या मोठ्या झाडाकडे हात करत म्हटले, ‘तू हे झाडदेखील उपटू शकतोस का?’
यावेळेला त्या मुलाला झाड उपटायला थोडे कष्ट पडले. पण त्याने ते झाड उपटले. काही वेळाने पुन्हा महात्म्याने एका मोठ्या झाडाकडे बोट करून म्हटले, ‘ते झाड उपटून दाखव.’ तो मुलगा ते झाड जोरजोराने खेचण्याचा प्रयत्न करू लागला, पण झाड काही जागचे हलायचे नाव घेत नव्हते.मुलगा म्हणाला, ‘हे झाड खूप जुने आहे, उपसणं अशक्य आहे.’
महात्मा म्हणाले, ‘बाळा, अगदी अशा प्रकारेच सवयीचं आहे. सवय नवीन आहे,तोपर्यंत सुटणे सोपे असते.पण जसजशी ती जुनी होत जाते, तसतशी ती सुटणे अवघड होत जाते.’ 

अक्षय फळाच्या प्राप्तीसाठी श्रेष्ठ: अक्षय तृतिया


     
पौराणिक ग्रंथांनुसार अक्षय तृतियेच्यादिवशी केल्या गेलेल्या जप,दान आदींमुळे अक्षय फळ मिळते. हा दिवस कुठल्याही कामासाठी सर्वसिद्ध मुहुर्ताचा दिवस आहे. प्रत्येक दिवशी येणार्या वैशाख पक्षाच्या तृतीय तिथीलाअक्षय तृतियाम्हणतात. यावर्षी अक्षय तृतिया 28 एप्रिलला आहे. भविष्य पुराणानुसार या दिवशी रेणुकाच्या गर्भातून भगवान विष्णुने परशुरामाच्या रुपाने जन्म घेतला होता. भगवान विष्णुने याच दिवशी नर-नारायण आणि हयग्रीवच्या रुपातदेखील अवतार घेतला होता.या तिथीपासूनच सयुगादी युगाचा प्रारंभ झाल्या कारणाने यालायुगादी तिथीअसेही म्हटले जाते. बद्रीनाथ धामचे द्वारदेखील याच तिथीला उघडते. या अध्यात्मिक महत्त्वांच्या कारणांमुळेच अक्षय तृतियेचा दिवस विवाहासाठी सर्वसिद्ध मुहुर्ताचा आहे.पौराणिक ग्रंथांनुसार अक्षय तृतियेच्यादिवशी केलेले दान,जप,हवन,स्वाध्याय आदींचे अक्षय फळ मिळते.ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये अनिष्टकारक ग्रहांच्या दशांर्तदशाच्या कारणांमुळे काही पिढा असेल, खोळंबलेली कामे होत नसतील, व्यापारात सतत घाटा होत सेल, घरात सुख-शांती नसेल, संताने अडचणीत असतील, शत्रू तुमच्यावर हावी होत असेल अशा परस्थितीत यश,पद,लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी आणि सगळ्या मनोकामनांच्या पूर्तिसाठी अक्षय तृतियेपासून प्रारंभ केल्या जाणार्या उपायांनी अक्षय लाभ मिळतो.

युवकांचे खरे मार्गदर्शक: भगवान परशुराम

परशुराम जयंती (28 एप्रिल)
     
भगवान परशुराम आजच्या युवकांसाठी खरे मार्गदर्शक सिद्ध होऊ शकतात.भगवान परशुराम स्वत: विष्णूचे अवतार होते. त्यामुळे ते स्वत: शक्तीसंपन्न होते. परंतु, ज्या उद्देशाने त्यांचा अवतार घडला होता,तलक्ष्याच्या प्राप्तीसाठी त्यांनी कठोर आणि पुरुषार्थ केला. परशुराम यांनी आपल्या तपस्येद्वारा अनेक शक्ती प्राप्त केल्या, ज्यात भगवान शिवच्या तपस्येतून प्राप्त झालेले परशु अस्त्र प्रमुख आहे. हे अस्त्र प्राप्त केल्यामुळेच त्यांचे रामाचे परशुराम असे नामकरण झाले. या शक्तीमधूनच युवकांसाठी सद्कर्म आणि पुरुषार्थ यामुळे मिळणारे सुफळ प्रतिष्ठा मिळवून देईल, असा संदेश असेल.भगवान परशुराम यांचे गुरु स्वत: संहार आणि सृजनाचे देवता भगवान शिव होते. युवा परशुरामाने भगवान शिव यांची घोर तपस्या आणि सेवा यातून अनेक अस्त्र-शस्त्र मिळवले आणि अनेक विद्यांचा वापर करून त्यांनी अनाचारी क्षत्रियांचा अंत केला. त्यांच्या अत्याचारातून पृथ्वीची सुटका केली. भगवान परसुरामद्वारा प्राप्त केलेली ही विविध प्रकारची अस्त्रं आणि विद्या युवकांना संदेश देतात की, तुम्ही लक्ष्यासंबंधीच्या प्रत्येक विद्यांमध्ये निपुणता मिळवा. आपले मन-मस्तिक मोकळे-ठाकळे ठेवून यथासंभव जास्तीतजास्त शिकण्याचा प्रयत्न करावा. स्वत: भोवती कोणत्याही मर्यादा घालून घेऊ नयेत. भगवान परशुराम यांच्याप्रमाणे आदर्श शिष्य बनण्याचा प्रयत्न करावा.

Saturday, April 22, 2017

दारुबंदीनंतरचा सुरक्षित प्रवास

     एक खूपच छान बातमी नुकतीच वाचायला मिळाली. बिहारमध्ये दारुबंदीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कालावधीत रस्त्यावरील अपघातात मृत्यू पावणार्यांची संख्या तब्बल साठ टक्क्यांनी कमी झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. हा संदेश खरोखरच अन्य राज्यांना नक्की प्रेरणा देणारा आहे. आपल्या महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयाचा हुकूम लागलीच पाळून निदान महामार्गावरील तरी दारुबंदी करून कित्येक लोकांचा दुवा घेतला आहे. याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदनच करायला हवे. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अगोदरच दारुबंदी आहे. आता शासनाने राज्यात पूर्णपणे दारुबंदी करून बिहारच्या पावलावर पाऊल ठेवावे. देशातल्या अन्य राज्यांनीदेखील याचे अनुकरण करायला हवे.

     रस्ते अपघातात जगात सगळ्यात जास्त मृत्यू पावणार्यांची संख्या भारतात आहे. आणखी म्हणजे अन्य आजाराने मरण पावणार्या संख्येपेक्षाही हा आकडा अधिक आहे. त्यामुळे साहजिकच जगात भारताची मोठी नाचक्की होत आहे. बिहारचे दारूबंदीनंतरचे रस्ते अपघातातील मृत्यूचे आकडे सगळ्यांच्याच डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. रस्ते अपघात कमी झाले, मरणार्यांची संख्या कमी झाली. हे चांगले फळ आहेच, शिवाय दारुबंदी केली म्हणून मोठा महसूल बुडाला आणि राज्य बुडाले असेही काही बिहारचे झाले नाही. त्यामुळे महसूल बुडण्याचा उगाच करण्यात आलेला बाऊ किती बोगस आहे, हे यावरून स्पष्ट होते.खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काय तो आता  निर्णय घ्यायला हवा आहे. गुजरातमध्ये त्यांनी दारुबंदी यशस्वी करून दाखवली आहे, आता त्यांनी देशातूनच दारू हद्दपार करायला हवी आहे. मोदींकडून खरोखरच लोकांच्या फारच मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळेच त्यांना आणि भाजपला भरभरून मतदान करत आहेत.
     साल 2015 मध्ये बिहारमधल्या रस्त्यांवरील अपघातात मरणार्यांची संख्या 867 होती. ती दारुबंदीनंतर म्हणजेच 2016 मध्ये घटून 326 वर आली आहे. म्हणजे दारुबंदीच्या या एक वर्षात रस्त्यावरच्या अपघातात मृत्यू पावणार्यांची संख्या तब्बल साठ टक्क्यांनी कमी झाली आहे. हे आकडे अशा काळात समोर आले आहेत, ज्या काळात नॅशनल आणि स्टेट हायवेच्या 500 मीटर परिसरात दारू दुकानांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे  केंद्र आणि राज्य सरकारे संभ्रमात पडले आहेतराज्य सरकारांना दारूच्या दुकानांवर बंदी घातल्यावर आपल्या सर्वात मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागणार, यामुळे चिंतेत असलेल्या सरकारांना बिहारचे उदाहरण आदर्शवादी ठरणार आहे. महसुलापेक्षा लोकांचा जीव किती मौल्यवान आहे, हे यातून स्पष्ट होते.जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील आपल्या अहवालात रस्त्यांवरील अपघात दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात, असे सांगितले आहे. अशा प्रकारची उदाहरणे दुर्दैवाने भारतासारख्या देशातच अधिक होत आहेत.
     विकसनशील देशांमध्ये दारू पिऊन गाडी चालवणार्यांची संख्या जवळपास 69 टक्के आहे. हाच आकडा विकसित देशांमध्ये 20 टक्के आहे. विकसित देशांतील 20 टक्के लोक ड्रंक ड्राईविंग करतात. चीनमध्ये रस्ता अपघातात मरणार्यांची संख्या अलिकडच्या काही वर्षात कमी झाली आहे. मात्र भारतात सत्तर टक्के रस्ते अपघात दारु पिऊन गाडी चालवल्याने होतात. याबाबतीत केरळचे उदाहरण समोर आहे. तिथे दारुचा प्रत्येक व्यक्तीमागे  खप राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा तब्बल दुप्पट आहे. एकूण तीस टक्के रस्ते अपघात तिथे होत आहेत. इतकेच नव्हे तर तिथे अलिकडच्या काळात रस्त्याच्या अपघातांची संख्यादेखील वाढलेली आहे. त्यामुळे साहजिकच तिथे रस्ता सुरक्षतेच्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
     विकसित देशांनी रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित होण्यासाठी कडक कायदे बनवले आहेत. शिवाय वाहन चालकांची तपासणी प्रक्रियादेखील नव्या तंत्रज्ञानावर आधारित केली आहे. आपल्याकडेही अशाप्रकारची आधुनिक यंत्रणा असायला हवी आहे. याशिवाय ड्रंक़ ड्राइंविंगविरोधात जनजागृती मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. तरच काही प्रमाणात तरी आपल्या देशातील चित्र बदलेले दिसेल.

भ्रष्टाचारमुक्त पोलिस! कभ्भी नहीं।


     भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी पोलिस विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना बनवायचा आहे. तसे त्यांनी सांगलीतल्या एका कार्यक्रमात बोलून दाखवले आहे. सांगलीतल्या पोलिसांचा प्रताप ऐकल्यावर अशा प्रामाणिक पोलिस अधिकार्याच्या मनाला काय वाटले असणार,हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते आहे.मात्र  भ्रष्टचार मुक्त पोलिस भविष्यात असतील, असा त्यांना विश्वास आहे. त्यासाठी ते स्वत: प्रयत्नशील राहणार आहेत. अर्थात एकट्या अधिकार्याला एवढ्या मोठ्या आवाक्याच्या पसार्यातल्या पोलिसांना सरळमार्गाला लावणं तसं अवघड आहे,पण अशक्य नाही. नांगरे-पाटील यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची धुरा हातात घेतल्यावर त्यांनी या भागात बरेच चांगले उपक्रम राबवले. शाळा, महाविद्यालयातल्या मुलींना भयमुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष पथकांची स्थापना केली.या पथकाने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात रोडरोमिओ आणि सडकहर्यांवर कारवाई करून त्यांच्यावर वचक बसवला आहे, मात्र त्यांच्या खात्यातल्या पोलिसांवरच खुद्द महानिरीक्षक नांगरे-पाटील यांचा वचक बसण्याची आवश्यकता आहे.


     सांगलीतल्या पोलिसांनी चोरीच्या कोट्यवधी रुपयांवरच डल्ला मारून अख्ख्या पोलिस खात्यालाच बदनाम करून टाकले आहे. अर्थात पोलिस तसे बदनामच आहेत. त्यामुळेच त्यांना लोकच मारत सुटले आहेत. टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे या पोलिसांनादेखील वटणीवर आणण्याची आवश्यकता आहे. नांगरे-पाटील यांच्यासारखे अधिकारी सगळीकडे असतील तर ही गोष्ट काही अवघड नाही. मात्र पोलिस अधिकारीदेखील सगळीकडे सारखे कोठून मिळणार? पोलिस अधिकार्यांच्या बदल्या कशा होतात आणि पाहिजे ती ठाणी मिळण्यासाठी कशी फिल्डिंग लावली जाते, हेसुद्धा आपल्याला माहित आहे.त्यामुळे त्यांचा पुढचा अजेंडा काय असतो, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याला बोलवावे लागणार नाही.
     महाराष्ट्रात कुठल्याही तालुक्यात जावा,जिल्ह्यात जावा,तिथे तुम्हाला अवैध धंदे अक्षरश: बोकाळलेले दिसतील. अवैध वाहतूक घ्या, मटका,सट्टा,जुगारसारखे अवैध धंदे घ्या,इथे आपल्याला बिनबोभाट सुरू असलेले दिसतील. गावठी दारू तर कधी बंद राहिली आहे, असे तुम्हाला कधीच दिसणार नाही. आता तर महामार्गावरील अथवा त्याच्या 500 मीटर परिसरातील हॉटेल, बार, बियर शॉपी न्यायालयाच्या खरडपट्टीमुळे बंद झाल्या आहेत. मात्र ही गावठी दारू कधी बंद झाली नाही. विदेशी दारू,बियर विक्रीला बंदी असली तरी त्याची अवैध विक्री चालूच आहे. वाळूतस्करी आणि त्यातून गुंडगिरी मात्र जीवघेणी फोफावली आहे. यालाही आळा घालणं सगळ्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सरळ्यानं धंदा करायला द्या नाही तर मरणाला तयार राहा, असा दमच ही वाळूमाफियावाली मंडळी अधिकार्यांना देत आहेत. तरीही पोलिस त्यांचे काही करू शकत नाहीत.
     शासनाने तंबाकूजन्य पदार्थ,गुटखा, मावा यांच्यावर बंदी घालून बराच कालावधी लोटला आहे, मात्र हे पदार्थ कुठे मिळत नाहीत, हे  पोलिसांनी छातीठोकपणे सांगावे. आता या दारुचं तसं झालं आहे. हॉटेल,परमिट बार,बियर शॉपी आदींमधून महामार्गाच्या परिसरात सरळ सरळ  मिळणं बंद झालं आहे. पण दुसर्या मार्गाने सुरू झालं आहे. विशेष म्हणजे या दारूंचे दर दुप्पट झाले आहेत.गुटखा,मावाचेदेखील तसेच आहे. दोन रुपयांना मिळणारी गुटख्याची पुडी दहा रुपयांना मिळत आहे. याची विक्री करणारा, साठा करणारा किती कमावत असेल. मग यातला थोडा पैसा झिरपत झिरपत पोलिस ठाण्याकडे जात नसेल कशावरून? राजरोस बेकायदेशीर दारू विकणारा म्हणतो , आम्ही कुणाला घाबरत नाही. पोलिसांना आमचा हफ्ता जातो. याला काय म्हणायचं?
     खरे तर तंबाकू,गुटखा, अवैध दारू, वाळू याच्या बेकायदेशीर विक्रीला एक समांत्तर यंत्रणा सुरू झाली आहे. मटकाही चांगलाच पोसला आहे.यात गुंड-पुंड पोसले जात आहेत. त्यामुळे साहजिक शांततेचा भंग होत आहे. अशांततेमुळे सर्वसामान्य माणूस जीव मुठीत घेऊन जगत आहे. कधी काय होईल, हे कळत नाही. त्यामुळे या सगळ्या  वस्तू मुक्तपणे विकायला शासनाने परवानगी द्यायला हवी, असं कधी कधी वाटतं. कारण यामुळे  मारामार्या,गुंडगिरी,दादागिरी तरी बंद होईल. लोकांना शांतपणे जगता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे पोलिसांवरचा ताण कमी होईल.खरेच शासनाने याचा विचार करायला हवा, असं वाटतं.
     विश्वास नांगरे-पाटील यांना पोलिस भ्रष्टाचार मुक्त हवा आहे. त्यासाठी त्यांचा प्रयत्नही चालला आहे. मात्र पोलिसी खात्यातल्या नसानसांत भिनलेला भ्रष्टाचार तो असा तसा कमी होणार आहे का?अर्थात काही पोलीस खरेच प्रामाणिक आहेत. त्यांच्यमुळे तर ही यंत्रणा चालली आहे. काही पोलिसांनी आपापल्या बीट किंवा चौकी परिसरात आणखी एक कमाईची यंत्रणा उभी केली आहे. आपल्या भागात काही अवैध घडत नसलं तरी घडवायला लावायचं आणि त्यातून आपले खिसे भरायचे, असा धंदा सुरू ठेवला आहे. यासाठी बीटमधल्या काही युवकांना,लोकांना हाताशी धरले आहे. त्यांनी सावज हेरायचा.त्याला अवैध गोष्टी करायला लावायच्या आणि आपल्या पोलिसमामाला धाड टाकायला लावायची आणि परस्पर सगळे मॅनेज करून आपला खिसा भरायचा. दगडाखाली हात सापडलेली माणसे दगडापेक्षा वीट मऊ म्हणून त्यांच्या जाळ्यात अलगद अडकून जातात. यात बरबटलेली पोलीस मंडळी आपल्याबरोबरच आपल्या फॅंटरचा फायदा करून देतात.  त्यामुळे ही माणसे गावागावत सावज शोधतानाच दिसतात. नांगरे-पाटील  अशी भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत, ती कशी उपटून काढतील, असा प्रश्न आहे.पण काही प्रमाणात भ्रष्टाचार कमी झाला तरी काय कमी आहे का? यावर समाधान मानून आपण भविष्यात तरी भ्रष्टाचारमुक्त पोलिस होतील, अशी  स्वप्ने बाळगायला काय हरकत आहे.