Monday, June 14, 2021

(लघुकथा) आपलं दैवत


महानगरपालिकेची ट्रॉली ट्रॅक्टरच्या मागोमाग खेचली जात होती. ती शहरातल्या केरकचऱ्यांनी काठोकाठ भरली होती. तो केर शहराबाहेरच्या भल्यामोठ्या खड्यात टाकला जाणार होता. नंतर त्याचे खत बनले की पालिका ते शेतकऱ्यांना विकणार होती.

"काय! कसं काय चाललंय?' हा आवाज ऐकून देवाच्या चरणावरुन पायउतार झालेली फुलांची माळ इकडे-तिकडे पाहू लागली. वेश्येच्या केसांतून कचराकुंडीत आलेला आणि आता ट्रॉलीत आलेला गजरा तिला काहीतरी बोलू पाहात होता.

'तू इथे कसा  आलास रे?' फुलमाळ त्याच्यावर संतापून म्हणाली. 

'वेश्येच्या कोठ्यावर राहणारा तू माझ्यासोबत कसा?'

'हेच तर मी तुला विचारणार होतो. या घाणेरड्या कचऱ्याच्या ढिगावर तू काय करतेस? तू तर कृष्णामाईच्या पवित्र पाण्यावर तरंगायला हवी होतीस?'

तेवढ्यात आणखी एक आवाज आला. दोघांनी त्या आवाजाकडं पाहिलं. तो गुलाब होता. 

'मित्रांनो, मी गुलाब. काल संध्याकाळी एका तरुणानं आपल्या प्रियेशीच्या मोहक केसांत मला माळलं होतं. उशीरा ती गुलूगुलू बोलत राहिली. घरात शिरण्यापूर्वी मुलीनं मला डोक्यातून काढलं आणि आपल्या पर्समध्ये लपवलं. रात्रभर मला कवेत घेऊन मला कुरवाळत राहिली, चुंबन घेत राहिली. सकाळी तिने मला रस्त्यावर फेकून दिलं.'

'आजचा माणूस किती मतलबी झालाय नाही?', फुलमाळ तिरस्काराने म्हणाली.

'भाविकांच्या गर्दीत ज्या सन्मानानं मला देवाच्या गळ्यात स्थान मिळालं. पहाट होताच रस्त्यावर यावं लागलं.'

गजरा म्हणाला, 'ताई, तू म्हणतेस ते. खरंच आहे. संध्याकाळी त्या सुंदर वेश्येनं | मला किती नखऱ्यात आपल्या केसात माळलं होतं. किती धुंद झाली होती ती, त्या अनोळख्या माणसाबरोबर. धसमुसळेपणा तर विचारूच नका. पण सकाळी तिनं पहिल्यांदा मला बाहेरचा रस्ता दाखवला.'

काही काळ सगळे शांत राहिले. केवळ त्या ट्रॅक्टरचा भयंकर आवाज येत होता. मग गुलाब म्हणाला, 'या माणसांविषयी तक्रार तर कुणाकडे करायची? खरं पाहिलं तर आमच्याशिवाय हे जग निव्वळ उजाड, भावनाशून्य आणि भयंकर बनले असते.'

यावर फुलमाळ म्हणाली, 'मित्रांनो, आपल्या तक्रारीला काही किंमत नाही. आता तुम्हीच पहाल, आपण सारे त्या खड्यात पडू. आपण कुजून आणि सडून जाऊ. खत बनू. पुन्हा सुपिक जमिनीसाठी आपला वापर ही माणसं करतील. पिकं येतील. फुलं फुलतील. आपण आणखी पुन्हीं तोडले जाऊ. देवाचा कंठ शोभेल. वेश्येचा आंबाडा सजेल. प्रियेशीचे केस दरवळतील. पण हे कुठंवर चालेलं? आपण गप्प राहू तो पर्यंत हे असंच चालायचं..! आपलं दैवच आणखी काय?'-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

(लघुकथा) इलाज


मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. मुलाला मुलगी पसंत पडली. चहा-पाणी करून दोन्ही घरची माणसं तिथेच लग्न ठरावाला बसली. बऱ्याच प्रयत्नानंतर पन्नास हजार हुंडा आणि तीन तोळे सोने असे मुलीच्या घरच्यांनी मुलाला देण्याचे ठरले. लग्न ठरल्याने दोन्हीकडील लोकांमध्ये उत्साह होता. चेहऱ्यांवरून आनंद ओसंडत होता. पण मुलीच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही नव्हता. उलट मुलगी त्या मुलाला काहीतरी सांगण्यासाठी अडून बसली होती. तिची आई मात्र तिला थोपवत होती. शेवटी तिने मनाचा हिय्या करून आईला बजावले, 'माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यांना स्पष्ट सांगायला हवं. नाहीतर पुढच्या होणाऱ्या परिणामांना तुम्ही जबाबदार असाल...'

आईचा शेवटी नाईलाज झाला. तिने नवऱ्या मुलाला आत बोलावले. मुलगी आणि मुलगा गच्चीवर गेले. मुलगी म्हणाली, 'मी तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट सांगणे माझं कर्तव्य समजते. लहानपणी भाजल्याने माझ्या पाठीवर जखमेचा तसाच मोठा डाग आहे. खूप उपाय केले, पण तो डाग गेला नाही. जर तुम्हाला मंजूर असेल...'असे म्हणून ती थांबली.

मुलाने ही गोष्ट आपल्या बापाला सांगितली. त्यांनी लगेच लग्न मोडल्याचे जाहीर केले. लग्न ठरवायला आलेली मंडळी परत जायला निघाली. तेव्हा मुलीच्या बापाने थोडा वेळ बसून घेण्याची विनंती केली.

नाराजीने सर्व मंडळी पुन्हा बसली. मुलीच्या बापाने मुलाच्या बापाला आत बोलावून घेतले आणि हळू आवाजात म्हणाला, 'आणखी पन्नास हजार देतो, पण हे लग्न मोडू नका...'

मुलाचा बाप बाहेर आला, आलेल्या माणसांशी काही वेळ कुजबूज झाली आणि लग्नाचा व्यवहार पक्का ठरला. पुन्हा दोन्ही घरच्यांमध्ये आनंद ओसंडून वाहू लागला. मी विचार करत होतो, ज्या डागावर मोठ-मोठे डॉक्टर उपाय करू शकले नाहीत, त्या डागावर इलाज हुंड्याने किती सहजतेने केला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत.


(लघुकथा) ही मेहरबानी का?


बसमध्ये खूप गर्दी होती. पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. या बसमध्ये पाच कॉलेजकुमारांचं एक टोळकं होतं. त्यातले तिघे युवक सीटवर बसले होते. उरलेले दोघे जवळच उभे होते. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. गप्पात त्यांना आजूबाजूचा विसर पडला होता. थोड्या वेळाने गर्दीतून वाट काढत-काढत एक, हडकुळी खेडवळ बाई त्यांच्या सीटजवळ आली. तिच्या कमरेला एक तान्हुल मुल होतं. त्याला सावरत-सावरत स्वतःला सांभाळत ती तिथे कशी तरी उभी राहिली. ती बाई गरीब घरची दिसत होती.

मी त्या कॉलेजकुमारांच्या शेजारच्या सीटवर बसलो होतो, माझ्या अंगात कणकण होती. मी त्या तरुणांना म्हणालो, 'गड्यांनो, त्या बाईंना थोडीशी जागा द्या. त्या किती अवघडल्यात पाहा. त्यातला एक माझ्यावर भडकून म्हणाला, 'ए ऽऽ तुला जर इतका पुळका आला असेल तर तू का नाही उठून उभा राहात? दुसऱ्याला कशाला ताप देतोस?'

बाकीचे हसले. आणि ते पुन्हा आपल्या गप्पात रंगले.

माझ्या अंगात ताप मुरला होता, उभ्या राहण्याच्या परिस्थितीत मी नव्हतो. पण तरीही मी माझ्या शेजाऱ्याला थोडे पुढे सरकायला सांगितले आणि कशी तरी तिला बसायला थोडी जागा करून दिली. तीही कशी तरी अवघडून बसली.

बस पुढे जात होती. लोक चढत होते, उतरत होते. मी त्या तरुणांविषयी विचार करत होतो,' ही कसली आजची युवापिढी? कुठे गेली लोकांमधली माणुसकी? एका विवश, असमर्थ महिलेसाठी थोडासुद्धा त्रास सोसला जाऊ शकत नाही. उद्या यांच्या आई-बहिणींवरही असाच प्रसंग गुदरला तर... पण केवळ माझ्या विचार करण्याने कुठे काय साधणार होतं?

पुढच्या थांब्यावर एक सुंदर तरुणी. बसमध्ये चढली. तिचा जिन पँट आणि टी-शर्ट असा पेहराव होता. ती त्या तरुणांजवळ जाऊन उभी राहिली. त्यातला एक तरुण पटकन उठला  आणि त्या तरुणीला मोठ्या अदबीने म्हणाला, 'मॅडम, इथे बसा.

'थँक्स्' म्हणून ती तरुणी बसली सुद्धा!

मला मोठं आश्चर्य वाटलं. मगाशी माझ्यावर ओरडणारा मुलगा आता चक्क उभा होता. माझ्या मनात विचार आला, 'ही मेहेरबानी का?'-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

(लघुकथा) हाय रे देवा!


संध्याकाळची साडेपाचची वेळ असावी. ऑफिसमधून बाहेर पडलेली माणसं घराच्या ओढीनं धावाधाव करीत होती. शहरातले प्रमुख रस्ते माणसांच्या, वाहनांच्या गर्दीने गजबजून गेले होते. एक गाडी वेगाने प्रमुख रस्त्यावर आली आणि अचानक रस्त्याच्या मधोमध येऊन रस्ता आडवून गच्चकन उभी राहिली. गाडीतून गोविंदा उतरला आणि मागून येणाऱ्या स्कूटरस्वाराला हाताने थांबण्याच्चा इशारा केला. स्कूटर थांबताच गोविंदाने स्कूटरस्वाराची गळापट्टीच पकडली. त्याला खाली पाडून लाथेने मारहाण करायला सुरुवात केली.

गाडीच्या मागील सीटचा दरवाजा उघडून आणखी दोन तरुण बाहेर आले आणि ते दोघेहि त्याच्यावर तुटून पडले. स्कूटरस्वार आपल्या स्कूटरसह रस्त्यावर पडला होता. गोविंदा आणि त्याचे दोघे साथीदार लाथा-बुक्क्यांनी त्याला अक्षरशः बुकलून मारहाण करु लागले.

"काय झालं? काय झालं? "चारी बाजूंनी गर्दी जमू लागली. "अरे, झालं तरी काय? का उगाच बिचायाला मारता?"

"हा साला बिचारा?" गोविंदा एक घाणेरडी शिवी हासडून म्हणाला, "मागे पोरगीला धडक मारुन आलाय. तिचा पाय मोडला असता तर...! आणि वर थांबायचं सोडून पळून आलाय."

"असं काय, मारा साल्याला..."गर्दीच्या मागून आवाज आला. "कुठाय ती पोरगी? साल्याला तिची माफी मागायला लावू" मागून आणखी एक आवाज आला.

"आली... आली...."

तेवढ्यात गर्दीला  बाजूला सारुन एक मुलगी तिथे आली. ती लंगडत होती.

"कुठे लागलं, मॅडम?" एकानं विचारलं.

"हाय रे देवा, माझा पाय मोडला असता रे या काळतोंड्या मुडद्यानं... असं म्हणत त्या तरुणीनं दोन्ही हाता"ची टाळी दिली.

आवाज ऐकताच सारेच चमकले. 

"अरे,ही पोरगी न्हाय. हिजडा हाय हिजडा..!"

लोक हसायला लागले. हा तर हिजडा आहे. आम्ही तर पोरगी समजलो होतो. आता गोविंदा शर्मिंदा झाला. तो त्या स्कूटरवाल्याची हात जोडून माफी मागू लागला. 

"सॉरी यार! मला माहित नव्हतं हा हिजडा आहे."

"हाय रे देवा, मला कुणीतरी दवाखान्यापर्यंत तरी पोचवा रे ऽऽ"

गोविंदाने गाडी स्टार्ट केली. ते दोघेही गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसले... आणि गाडी सुसाट वेगाने धावू लागली.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत


Friday, June 11, 2021

जगाला प्रेमाचा संदेश देणारे सानेगुरुजी


भारताला निर्मळ विचार आणि निरामय वृत्ती यांची गरज आहे,असे सानेगुरुजी म्हणत. प्रांतीयता, फुटीरता, जातीयता, कडवी आणि अंध भाषिकता हे देशाच्या प्रकृतीशी आणि संस्कृतीशी विसंगत आहे. आपण सारे एक आहोत. सारे प्रांत,भाषा माझे आहेत, आपण सारे भाऊ आहोत, असे ते म्हणत. सर्व भारतीय भाषांचा अभ्यास करणारे आंतरभारतीसारखे नवभारताच्या निर्मीतीचे एखादे मंदिर असावे, असे त्यांना वाटे. 

पांडुरंग साने एम.ए.झाल्यावर अंमळनेर येथील एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आणि ते साने गुरुजी झाले. त्याचवेळी त्यांनी वसतिगृहाची जबाबदारीही स्वीकारली. तिथे त्यांनी मुलांसाठी अनेक उपक्रम सुरू केले. 'विद्यार्थी' मासिक सुरू केले. मुले वाचन,मनन, श्रवण आणि प्रतिपादन यांतून समृद्ध व्हावीत असे त्यांना वाटे. शिक्षणाविषयी सानेगुरुजी यांची एक निश्चित भूमिका होती. ते म्हणत,'शिक्षक हा मुले आणि पुस्तके यांमधला दलाल नसतो, तो पुस्तकातील ज्ञानाचा भार वाहणारा हमाल नसतो, मुलांना जीवनदृष्टी देणारा त्यांचा मार्गदर्शक व मित्र असतो.'

त्यांच्या शाळेत घडलेली एक गोष्ट. एका मामलेदार साहेबांचा मुलगा अभ्यासात बेताचा होता. गुरुजींनी त्याच्या प्रगतीपुस्तकांत नोंद केली,'Weak in study.' साहेबांनी याबाबत गुरुजींकडे विचारणा केली,'मुलगा कच्चा कसा राहतो?शिक्षक काय करतात? गुरुजींनी त्यांना उलट विचारले,'मुलगा शाळेत सहा तास असतो. त्याचे पालक काय करतात?'

खरा शिक्षक काय करतो याविषयी गुरुजी लिहितात, 'खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन, भविष्यकाळाच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो. आजपर्यंत जगाने काय केले याची कल्पना देऊन उद्या मानवजातीला काय करायचे आहे,याची सूचना देतो. अशा विशाल दृष्टीचे शिक्षक मुलांना मिळायला हवेत. 

सानेगुरुजी 'छात्रालय' नावाचे दैनिक चालवत. त्यात ते मुलांना 'नित्य नवा दिस जागृतीचा' दाखवत असत. त्यात इतिहास असे, समाज दिसे, शिक्षण भेटे, धर्म लाभे. गुरुजींचा हेतू विद्यार्थी घडवणे हा होता. या मुलांचे हात कामसू हवेत, बुद्धी कर्तव्यपरायण व्हावी, मन मोठे व्हावे यासाठी ते सतत प्रयत्नरत होते. मुलांनी आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा म्हणून त्यांच्यासाठी सानेगुरुजी यांनी अनेक व्यक्तीचारित्रे लिहिली. राणी लक्ष्मी,अब्राहम लिंकन, रवींद्रनाथ टागोर, गौतम बुद्ध, रामकृष्ण परमहंस, संत मीराबाई, संत जनाबाई, देशबंधू अशी  कितीतरी देश-परदेशातील आदर्श व्यक्तिमत्त्वे त्यांनी लिहिली. त्यांचा व्यासंग दांडगा होता. 

गुरुजी हे एक राष्ट्रीय शिक्षक होते. त्यांच्या आईवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. आई गेल्यावर त्यांनी मातृभूमीला आपली आई मानले. मातृदेवतेच्या जागी त्यांनी राष्ट्रदेवतेची प्राणप्रतिष्ठा केली होती. देशाची बांधिलकी हे त्यांच्यापुरते सर्वोच्च मूल्य होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. देशसेवेला वाहून घेतले. अनेकदा त्यांना तुरुंगवास झाला,पण ते तिथेही गप्प बसले नाहीत. तिथे त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. तामिळनाडूतील त्रिचनापल्ली कारागृहात असताना त्यांनी तिरुवल्लूवर यांच्या 'कुरल' काव्याचे मराठीत भाषांतर केले. धुळ्यातल्या कारावासात विनोबा भावे तुरुंगातल्या कैद्यांना गीताप्रवचने देत.ते शब्दबद्ध करण्याचे काम सानेगुरुजी यांनी केले.  विनोबा भावे यांचे ते शिष्य बनले. संस्कृत, कन्नड,तेलगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आदी भाषा ते संपर्कातून ऐकून शिकले. बोलून त्या भाषांचे जाणकार झाले. त्या भाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अटकेत असताना त्यांनी बालगोपाळांसाठीही अनेक पुस्तके लिहिली.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे उराशी बागळलेले स्वप्न पूर्ण झाले. पण आपला नवभारत कसा असावा, याचेही चित्र त्यांनी रेखाटले होते. यावर त्यांनी लिहिले आहे,' भारतात सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. द्वेष शमले आहेत. लोक परस्परांची संस्कृती अभ्यासत आहेत. अनेक भाषा शिकत आहेत. विकास करून घेत आहेत. ज्ञानाविज्ञान वाढत आहे. कला फुलत आहे. व्यक्तीस्वातंत्र्यासाठी प्रतिष्ठा राखणारा समाजवाद आला आहे. अज्ञान,रूढी, रोग नष्ट होत आहेत. प्रयोग चालले आहेत. हिमालयावर युवक चढाई करत आहेत. ज्ञानासाठी समुद्राच्या तळाशी जात आहेत. ज्ञानासाठी नचिकेताप्रमाणे मृत्यूशी स्नेह करत आहेत.'

देश स्वतंत्र झाला,पण देशभर भ्रष्टाचाराचे, जातीयतेचे, ध्येयशून्यतेचे धुके दाटत चालले. त्यामुळे गुरुजी खचले. आणि शेवटी त्यांनी 11 जून 1950 रोजी आपला देह ठेवला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

जिनिअस तंत्रज्ञांची रंजक व अभ्यासपूर्ण माहिती

 
अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी 'तंत्रज्ञ जिनिअस' हा जग बदलवणाऱ्या तंत्रज्ञांचा संच वाचकांना दिला आहे. 'जिनिअस' मालिकेच्या संचामध्ये त्यांनी पहिला संच विदेशी संशोधकांवर लिहिला आहे आणि दुसरा भारतीय संशोधकांवर. नंतरच्या संचामध्ये त्यांनी तंत्रज्ञ जिनिअस घेतले आहेत. यात त्यांनी बारा तंत्रज्ञांची निवड केली असून त्यात थॉमस  अल्वा एडिसन, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, निकोला टेस्ला, राईट बंधू, गुगलिएल्मो मार्कोनी, जॉन लॉगी बेअर्ड, अॅलन ट्युरिंग, स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, जेफ बेझॉस, सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज आणि मार्क झुकेरबर्ग यांचा समावेश आहे. यात विमानाचा शोध लावणारे राईट बंधू सोडल्यास त्यांनी बरेचसे कम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स क्षेत्रातले लोक निवडले आहेत. ही आजची प्रचंड उभरती क्षेत्रं असल्यानं या तंत्रज्ञ मंडळींची निवड केली आहे. अर्थात हे पुस्तक लिहिताना या लेखक द्व्ययींना प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे,हे उघड आहे.यातल्या काही तंत्रज्ञांची माहिती मराठीत फारसी उपलब्ध नाही, त्यामुळे ही पुस्तके वाचकांना समृद्ध करण्यास नक्कीच यशस्वी होतील. 

तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपल्या सगळ्यांचं जगणं आमूलाग्र बदललं आहे. आता हे तंत्रज्ञान आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहे. 'तंत्रज्ञ जिनिअस' या पहिल्या भागातल्या पुस्तकात अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख चार तंत्रज्ञांचा समावेश केला असून पाहिले प्रकरण थॉमस अल्वा एडिसन आणि दिवा, दुसरे अलेक्झांडर ग्रॅहम बेल आणि टेलिफोन, तिसरे प्रकरण निकोला टेस्ला आणि चौथे राईट बंधू आणि विमान अशा प्रकारे समाविष्ट केले आहे. आपल्या जीवनातला अंधार खऱ्या अर्थानं दूर करणारा एडिसन इथे भेटतो. दिव्याचा शोध लावून त्यानं मानवजातीवर अगणित उपकारच केले आहेत. एडिसनचे अथक प्रयत्न, अनेकदा आलेले अपयश आणि तरीही चिकाटी न सोडता मिळालेलं यश बघून मन स्मिमित होतं. एडिसन या ग्रेट अमेरिकन संशोधक आणि उद्योजकाने फक्त दिव्याचा शोध लावला नाही तर त्याने छायाचित्र, साउंड रेकॉर्डर, कॅमेऱ्यातील गतिमान चित्रं, विजेवर चालणाऱ्या गाडीसाठीची बॅटरी, ग्रामोफोन आणि असे अनेक शोध त्यानं लावले. 1093 शोधांची पेटंट्स त्याच्या नावावर आहेत. खूप मोठं काम या संशोधकाने केलं आहे. 

एडिसन इतकंच किंबहुना त्याहून अधिक कार्य निकोला टेस्ला यांचं असल्याचं  लेखकद्वयिंचं म्हणणं आहे. वीज प्रत्यक्षात आणण्यासाठी, किफायतशीर करण्यासाठी आणि त्यातले धोके टाळून ती उपयुक्त करण्यासाठी ज्याने आयुष्यभर प्रयत्न केले, तो निकोला टेस्ला याचे आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. मात्र हा माणूस जगापासून, प्रसिद्धीपासून दूरच राहिला. सर्बियन अमेरिकन असलेला निकोला टेस्ला हा संशोधक अभियंता होता. अल्टरनेटिंग करंट इंडक्शन मोटरचा शोध त्यानं लावला. त्याच्या शोधामुळेच वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सुलभ झालं. विजेशिवाय त्यानं अनेक शोध लावले. मात्र त्यांची पेटंटस घेतली नाही.आयुष्यभर संघर्ष आणि उपेक्षा वाट्याला येऊनही त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य संशोधनासाठी खर्ची घातलं.

पूर्वी दूरवरच्या लोकांना निरोप देण्यासाठी दवंडी पिटवत, कबुतरांना पाठवत, खास निरोपेही धाडले जात. काही वेळा तर जगभर यासाठी अनेक गंमतीदार प्रयोग केले गेले. पतंगाचाही वापर करण्यात आला. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला आणि बसल्या जागी लोकांचा एकमेकांशी संवाद घडवून दिला. त्यामुळं माणसाचं जगणं सोपं झालं. आता तर आपण मोबाईलामुळे केव्हाही आणि कोठे असतानाही कुठल्याही लोकांशी संवाद साधू शकतो. असे असले तरी टेलिफोनचा शोध एक चमत्कारच होता. कित्येकांना समोर नसलेल्या लोकांचा आवाज ऐकताना काही तरी भुताटकीचा प्रकार वाटला. लोकांनी हा आविष्कार लवकर स्वीकारला नाही. अलेक्झांडर ग्रॅहम बेल हा स्कॉटिश वैज्ञानिक, संशोधक आणि अभियंता होता. 1885 साली अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनी स्थापन केली. 4 ऑगस्ट 1922 रोजी त्याचा मृत्यू झाला त्यादिवशी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा येथील सर्व फोन एक मिनिटासाठी बंद ठेवण्यात आले होते.

अमेरिकन असलेले आर्व्हिल आणि विल्बर राईट हे दोघे भाऊ इंजिनिअर आणि संशोधक होते. जगातल्या पहिल्या विमानाच्या शोधाचं , निर्माणाचं आणि आकाशात भरारी घेण्याचं श्रेय त्यांच्याकडं जातं. राईट बंधूंना आपण जरी विमानाचं संशोधक मानत असलो तरी विमानाचा शोध आपण स्वतः लावल्याचा दावा त्यांनी कधी केला नाही. भारतात बंगलोर येथे विश्वेश्वरय्या संग्रहालयामध्ये राईट बंधूंच्या विमानाची प्रतिकृती आणि त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती खूप चांगल्या तऱ्हेने संग्रहित केलेली आज बघायला मिळते.

पुढच्या पुस्तक संचांमध्ये रेडिओचा शोध लावणाऱ्या मार्कोनी यांच्याविषयी सविस्तर लिहिण्यात आलं आहे. छोट्याशा डब्यासारख्या वस्तूमधून माणसं बोलायला लागली. गाणी गायला लागली.खरं तर मार्कोनीच्या आधी जगदीशचंद्र बोस या भारतीय शास्त्रज्ञालाच रेडिओच्या शोधाचं श्रेय मिळालं असतं, पण त्यांची स्वतःची पेटंट घेण्यामागची तत्त्व आडवी आली आणि याचं श्रेय पुढे गुगलिएल्मो मार्कोनीला मिळालं. रेडीओनंतर आपल्या आयुष्यात दूरदर्शननं म्हणजेच टेलिव्हिजननं प्रवेश केला. जॉन लॉगी बेअर्ड हाच जणू काही महाभारतातल्या संजयच्या भूमिकेतून टेलिव्हिजनच्या किंवा इडियट बॉक्सच्या रूपानं अवतरला आणि आपल्याला 'आँखो देखा हाल' दाखवू लागला-ऐकवू लागला. यांनंतरच्या काळात आधुनिक कम्प्युटर सायन्सचा पितामह असं ज्याला म्हटलं जातं, त्या अॅलन मॅथिसन ट्युरिंगमुळं सर्व जग एका खोक्यात सामावण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. अजूनही यात आणखी प्रगती अपेक्षित आहे. तो एक गणितज्ञ ,लॉजीशीयन, तंत्त्वज्ञ, मॅथेमॅटीकल बायोलॉजिस्ट तर होताच, पण कुटलेखन विश्लेषण याच्या आधारावर त्यानं एनिग्मा यंत्र आणि लॉरेज एस झेड 40/42 या कोडला ब्रेक केलं आणि संपूर्ण जगाला महायुद्धातल्या महाभयंकर विनाशापासून वाचवलं. त्याच्या च पुढलं पाऊल स्टीव्ह जॉब्जनं उचललं आणि ऍपलची निर्मिती करून त्यानं संगणकाचं आधुनिक ज्ञान आपल्या पुढ्यात आणून ठेवलं.

तंत्रज्ञानातल्या विश्वातील ही सगळी जादुई क्रांतीच होती. बिल गेट्स याने मायक्रोसॉफ्टची निर्मिती करून त्यानं संगणक वापरायला सोपा केला. 'दुनिया मेरे मुठ्ठी में' प्रमाणे सगळं जग खरोखरच आपल्या संगणकात सामावलं होतं. जेफ बेझॉस यानं अमेझॉन कंपनी सुरू करून जगभरातल्या वस्तू घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध केली. गुगलच्या लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी जगभरातील ज्ञान, माहिती लोकांसाठी खुलं केलं.  संवादासाठी टेलिफोन अपुरा वाटायला लागला ,तेव्हा मार्क झुकेरबर्ग यानं फेसबुकचं माध्यम उपलब्ध करून जगभरातल्या मंडळींना एकत्र आणलं, एकमेकांना मित्र बनवलं. अनेकांचं एकाकीपण यामुळं दूर झालं.

या सगळ्याच संशोधक, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी मानवजातीच्या कल्याणासाठी हे शोध लावले. मात्र या शोधांचा, या माध्यमांचा आपल्या हितासाठी वापर करायचा की आपणच आपलं अहित साधायचं याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हा अनर्थ घडवतो. त्यामुळे प्रत्येकानं या सगळ्या साधनांचा , माध्यमांचा सम्यकपणे विचार करून वापर करावा आणि आपलं जगणं सुखकर  बनवावं. त्यासाठी जग जवळ आणणाऱ्या या बाराही तंत्रज्ञांचे आपण कायमचे उतराई आहोत. 

या बारा तंत्रज्ञ जिनिअसचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढ-उतार, यश-अपयश ,सगळं काही आपल्यासमोर उलघडण्याचा चांगला प्रयत्न लेखकद्वयिंनी केला आहे. नेहमीप्रमाणेच आपल्याला सोप्या, रंजक आणि अभ्यासपूर्ण तऱ्हेनं देण्याचा प्रयत्न केला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

पुस्तकाचे नाव-तंत्रज्ञ जिनिअस (भाग 1)

मनोविकास प्रकाशन,पुणे

मूल्य-120 रुपये

Sunday, June 6, 2021

जास्तीतजास्त किती वर्षे जगू शकतो माणूस?


शास्त्रज्ञ माणसासंबंधीत अनेक गोष्टींसंदर्भात संशोधन करत आहेत. त्यात माणूस जास्तीतजास्त किती वर्षे जगू शकतो, यावरही संशोधन सुरू आहे. अर्थात संशोधक आणि जाणकारांना हा प्रश्न आज नाही तर अनेक वर्षांपासून पडला आहे. आपल्याकडे आपले पूर्वज जास्तीतजास्त वर्षे जगले असल्याचे लोक सांगत असतात. मात्र याचे लिखित प्रमाण किंवा दस्तावेज नाही. त्यामुळे या बोलण्याला अर्थ राहत नाही.कारण कुठल्याही गोष्टीला पुरावा हवा असतो. पुराव्याअभावी कोणतीच गोष्ट प्रमाण होत नाही. पण तरीही आपल्याकडच्या अनेकांकडे पूर्वजांच्या जगण्याबाबत अनेक कथा,गोष्टी आहेत. माझे आजोबा अमूक इतकी वर्षे जगले, तमूक वर्षे जगले,असे माणसे म्हणत असतात. ते आपल्या पिढीला किंवा आपल्या संबंधित लोकांना हे अभिमानाने  सांगत असतात.

आजच्या काळाचा विचार केला तर वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील स्वामी शिवानंद महाराज यांच्याबाबत सांगितलं जातं की, त्यांनी वयाची 125 वर्षे पार केली आहेत. मार्च 2021 मध्ये स्वामी शिवानंद महाराज वारणासीहून गोरखपूरला गेले होते, तेव्हा तिथल्या त्यांच्या शिष्यगणांनी स्वामींच्या वयाबाबत लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले होते आणि मिडियांनी ही बातमी प्रसिध्द केली होती आणि दाखवली होती. स्वामी शिवानंद महाराज या जगातील सर्वाधिक वयाची जीवित व्यक्ती असल्याचा त्यांचा दावा आहे. 

स्वामी शिवानंद यांचा लिखित दस्तावेज आहे. म्हणजे त्यांच्या पासपोर्टवर त्यांची जन्मतारीख 8 ऑगस्ट 1896 अशी आहे. या पासपोर्टवर ही तारीख कशी आली आणि त्याला काय आधार आहे, याचा मात्र अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. आणि तसं झालं तर स्वामी शिवानंद हे आजच्या घडीला जगातील सर्वाधिक वयाची जीवित व्यक्ती म्हणून नोंद व्हायला काहीच हरकत नाही. 

याचा अर्थ असा की त्यांनी फ्रान्सच्या महिला जीन कालमें यांच्या नावे सर्वाधिक आयुष्य जगलेली व्यक्ती म्हणून जो विक्रम प्रस्थापित आहे,तो मोडला जाईल. जीन कालमें या 122 वर्षें जगल्याची नोंद आहे. एखादी व्यक्ती जास्तीतजास्त किती वर्षांपर्यंत जगू शकते, याचा सातत्याने अभ्यास केला जात आहे. मोंट्रीयल (कॅनडा) च्या मॅकगील युनिव्हर्सिटीमध्ये बायोलॉजिस्टसची एक  टीम या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन करत आहे. पण ते अजून एका ठाम अशा निष्कर्षापर्यंत पोहचलेले नाहीत. या अभ्यासाचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ सिगफ्रेड हेकिमी यांचं म्हणणं असं की, ते 1968 पासून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स ,जपान आदी देशांतील जास्तीतजास्त वर्षे जिवंत असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून आहेत. सध्याच्या त्यांच्या हजारो व्यक्तींच्या दस्तावेजानुसार त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, माणूस जास्तीतजास्त 115 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. मोंट्रीयलच्या मॅकगील युनिव्हर्सिटीचे हे संशोधन 2017 मध्ये विश्वप्रसिध्द 'नेचर' जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहे. यानंतर या संशोधनावर जगभर बरीच चर्चा झाली. अनेक देशांतल्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन मान्य केलेले नाही. कारण याबाबत प्रत्येक देशातील परिस्थिती वेगवेगळी आहे. काही देशांच्या नोंदी उपलब्ध नाहीत. तरीही आजच्या घडीला किंवा उपलब्ध नोंदीनुसार जीन कालमें याच सर्वाधिक आयुष्य जगलेल्या व्यक्ती आहेत. त्या त्यांच्या वयाच्या 122 व्या वर्षी निधन पावल्या. 

मॅकगील युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी याबाबत आणखी एक निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार आज ज्यांनी वयाची 110 वर्षे ओलांडली आहेत, ते पुढे आणखीही काही वर्षे जगू शकतात. अल्बर्ट आईस्टीन कॉलेज ऑफ मेडिसिनचे मॉलिक्युलर जेनेटिसिस्ट ब्रॅण्डन मिल्होलॅण्ड यांचेही म्हणणे असे की, माणूस वयाच्या 125 वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची शक्यता 10 हजारांमध्ये एक असे आहे. मिल्होलॅण्ड यांच्या म्हणण्यानुसार माणसाचं सरासरी वय वाढत असलं तरी जास्तीतजास्त आयुसीमा वाढू शकत नाही. त्यालाही एक सीमा आहे. 19 व्या शतकापासून आतापर्यंत माणसाचं सरासरी वय वाढलं आहे,याला वॅक्सिन, अँटिबायोटिक्स, कॅन्सरसारख्या घातक आजारांवर उपलब्ध झालेले उपचार आणि खाण्यापिण्यात झालेली सुधारणा आदी गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र हेच प्रमाण सातत्याने पुढे अबाधित राहील,याची काही शाश्वती नाही. शेवटी प्रत्येकाची एक क्षमता आहे. कारण एका मर्यादेनंतर कोशिका निष्क्रिय व्हायला लागतात. त्यामुळे मग माणसाच्या जिवंत राहण्याला विराम मिळतो. त्याचबरोबर असंही पाहिलं गेलं आहे की, जे लोक उत्तमप्रकारे जगले आहेत, आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेतली आहे, त्यांचे शरीर देखील वयाच्या 110 वर्षांनंतर क्षीण होत जाते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी 115 वर्षे हे माणसाचे सरासरी अधिकतम वय मानले आहे. अर्थात हे काही सर्वमान्य झालेलं नाही. अजूनही काही वर्षे यावर संशोधन होत राहील, मग एक प्रमाण निश्चितच मान्य केले जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली