Saturday, August 22, 2020

खाण्याच्याबाबतीत आळस,लाड धोकादायक

बदललेल्या जीवनशैलीमुळे आज अनेकांना आहाराच्या अनिष्ट सवयी लागलेल्या आहेत. 'फास्टफूड' आणि 'रेडी टू इट' पदार्थांकडे आकर्षित झाले आहेत. घर आणि नोकरी या कचाट्यात सापडलेल्या महिला लवकरात लवकर होणाऱ्या पदार्थांकडे किंवा तयार अन्न पदार्थांकडे आकृष्ट झाल्या आहेत. मात्र यामुळे स्वतःसह मुलांचे आयुष्यही धोक्यात घालत आहेत. खरे तर अन्न पदार्थांबाबतीत कसलाच आळस केला जाऊ नये किंवा आपल्या लाडक्यांना त्याला आवडते ते खाऊ घालू नये. यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. 

बाजारात मिळणाऱ्या 'रेडी टू इट' खाद्यपदार्थांमध्ये मेदाचे प्रमाणही अधिक असते. जसे लोणचे टिकवण्यासाठी त्यात भरपूर तेल टाकावे लागते,तशीच काहीशी स्थिती या 'फास्ट फूड' आणि 'रेडी टू इट' फूडची असते. या पदार्थांमध्ये कॅलरी अधिक असते. अशा उत्पादनांमध्ये कार्बोहायड्रेटस आणि प्रोटिन्स असतात. पण आपल्या चौफेर जेवणातून मिळणारे फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे या गोष्टी या पदार्थांमध्ये नसतात. मैद्याचे नूडल्स आपण चवीने पटापट गिळतो, तर चपाती आपण दूध,दही, डाळी, अंडे, भाजी यांच्याबरोबर खातो.त्यामुळे आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर मिळून त्यात भरपूर पोषणमूल्ये मिळतात. 

घरी एखादा पदार्थ बनवताना व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्या पदार्थांमध्ये आपण बदल करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्याला कोलोस्ट्रोलचा त्रास असेल तर त्याच्या चपातीला तूप न लावणे हे करता येऊ शकते. विकतच्या 'रेडी टू इट' किंवा 'फास्टफूड' खाण्यात असा व्यक्तिगत विचार अजिबात नसतो. तो सरसकट सर्वांसाठी एकाच पद्धतीने बनवलेला असतो. 

अलीकडच्या संशोधनातून असेही स्पष्ट झाले आहे की, भारतीय व्यक्ती या चणीने लहानखुऱ्या असल्यातरी त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण अतिरिक्त असते. वजन एकदा वाढले की ते कमी होणे कठीण असते, असाही अनेकांचा अनुभव असतो. ते आटोक्यात राहावे यासाठी आपण दक्ष राहायला हवे. 

प्रामुख्याने मुलांच्या वाढीसाठी योग्य ती पोषणमूल्ये योग्य त्या प्रमाणात मिळणे अत्यावश्यक असते. त्यातूनच त्यांच्या शरीराची घडण होत असते. जर मुलांना फास्टफूडची सवय लागली तर त्यातील प्रिझव्हेंटिव्हजमुळे मुलांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फास्टफूडमध्ये असलेले मेदाचे प्रमाण आणि त्यातली सोडियमची वाढीव मात्रा यामुळे लहान वयातच रक्तदाब व अतिताण यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यात वापरल्या गेलेल्या मैदामुळे वजन वाढते, इन्शुलिन तयार होण्याचे प्रमाण मंदावते. या सगळ्याचे प्रमाण ऐन तिशी-चाळिशीतच दिसायला लागतात. चेहऱ्यावर मुरूम, डाग येणे, शरीरावर, चेहऱ्यावर अनावश्यक लव येणे, गळ्याखाली काळी वर्तुळे येणे-ही सारी लक्षणे तुमच्या जीवन तसेच आहारशैलीत ताबडतोब बदल करणे अत्यावश्यक आहे. 

आजची नवी पिढी मैदानी खेळ खेळत नाही. ही मुले रमतात ती बैठ्या खेळांमध्ये, नाहीतर कॉम्प्युटर, मोबाईल गेममध्ये.त्यामुळे वाढीव कॅलरीज जाळल्या जात नाहीत. 'युरोप-अमेरिकेत कुठल्या आल्या चपात्या?तिथल्या पिढ्या ब्रेडवर तर पोसल्या गेल्या आहेत', असे म्हणणारे लोक युरोप आणि अमेरिकेतील लोकांची सक्रिय जीवनशैली ,व्यायामाची सवय आणि तिथले हवामान या गोष्टींकडे कानाडोळा करतात. आपल्याकडे मात्र लाड केवळ अमुक एका व्यक्तीला आवडते ते खाऊ घातल्यानेच केले जाऊ शकतात, असे मानले जाते. लहान मुलांना भरमसाठ चॉकलेट, मिठाई, शीतपेये देण्यामागची प्रेरणा हीच असते. मात्र प्रिय व्यक्तीला आवडते ते खाऊ घातल्याने त्या व्यक्तीच्या आरोग्य धोक्यात येते, हे मात्र आपण साफ विसरून जातो. विशेषतः मुलांना लहानपणीच खाण्याच्या अयोग्य सवयी लागल्या तर त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे.

मागे एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑनकोलॉजीचे एक शल्यविशारद यांनी खाण्याच्या अनिष्ट सवयी आणि कर्करोग यांचा जवळचा संबंध असल्याचे सांगितले होते. जास्त कॅलरीज असलेले खाद्यपदार्थ आणि शर्करामिश्रित पेये, प्रक्रियायुक्त मांस पदार्थ ,मिठाचा अतिरिक्त वापर केलेले पदार्थ हे कर्करोग निर्माण करणाऱ्या घातक रसायनांची निर्मिती करतात. रक्तातील वाढीव साखरेमुळे स्त्रियांना स्वादुपिंड, त्वचा, मूत्राशयाचा मार्ग, गर्भाशय, स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता दुणावते. असे संशोधन'डायबेटीस केअर' या स्वीडिश जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहे. प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ कॅनिंग, फ्रीजिंग, रेफ्रिजरेशन, डिहायड्रेशन, असेप्टिक प्रोसेसिंग अशा टप्प्याअंमधून जात असतात. या सगळ्या प्रक्रियांमुळे त्या पदार्थांचे पोषणमूल्य कमी होते. रक्तातील साखरेचे आणि मेदाचे प्रमाण वाढल्यास वजन वाढते आणि अतीलठ्ठपणामुळे स्वादुपिंड, मूत्राशय आदी सहा प्रकारचे कर्करोग होतात असे 'अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्च' आणि 'वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फ़ंड'ने प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे.

कॅन फूडमध्ये अतिरिक्त प्रमाणात सोडियम असते. व्हाइट ब्रेड आणि पास्तामध्ये मैदा असल्यामुळे तेही आरोग्यदायी नाहीत. चिप्स आणि चिजयुक्त स्नॅक्समध्ये जास्त कॅलरीज असतात. खारवलेले फ्रोझन मासे, केक्स, कुकीज, साखर असलेने ब्रेकफास्ट, सिरियल्स, प्रक्रियायुक्त मांस पदार्थ हेही प्रकृतीला अपायकारक असतात. 'रेडी टू इट' पदार्थांमध्ये असलेले प्रिझव्हेंटिव्हज, कृत्रिम रंग आणि जास्तीच्या कॅलरीज आरोग्याला घातक असतात. भारतीय पारंपरिक जेवणात भरपूर भाज्या, सलाड, डाळी, फळे, धान्य यांचा समावेश असतो. हे खाद्यपदार्थ आरोग्याला पूरक असतात. अशा संतुलित आहारात फायबर, खनिजे, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. तुमचा आहार पोषक नसेल तर त्याचा चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यातून हार्मोन्सचे असंतुलन, अस्थमा, अति ताणतणाव असे विकार जडतात. 'फास्टफूड' खाद्यपदार्थांनी पोट भरत नसल्याने ते अधिक खावेसे वाटतात. परिणामी लठ्ठपणा येतो. खरे तर साधे जेवण वा चपाती-भाजी हे पोटभरीचे जेवण असते. आरोग्य उत्तम तर सर्व गोष्टी उत्तम राहतात. त्यामुळे आपल्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना पोषण आहार कसा मिळेल, याची काळजी घरच्या महिलांनी आणि कुटुंब प्रमुखाने घ्यायला हवे. याबाबतीत आळस करू नये, हीच अपेक्षा!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Friday, August 21, 2020

विभक्त कुटुंब संस्कृतीच्या निमित्ताने...

महायुद्धोत्तर काळात एकत्र कुटुंबपद्धतीला धक्के बसू लागले. तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात विभक्त कुटुंबपद्धती हळूहळू मूळ धरू लागली. 1970 पर्यंत बरीचशी मध्यमवर्गीय कुटुंबे विभक्त होऊन स्थिरावली. 1980 नंतर विभक्त कुटुंबातही स्फोट होऊ लागले. 1990 नंतर तर विभक्त कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वतःला त्यातून बाहेर काढू लागली. आणि उरलेसुरले बंधही तुटले. नवी नाती स्थिरावेनाशी झाली. पूर्वी माणसांचं आयुष्य संस्कारित होताना माणूस समाजाशी बांधला गेला होता.माणसाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंती लाभली नसली तरी नात्याची श्रीमंती होती. कुटुंबात विविध प्रकारची माणसं होती. कुटुंबात गोष्टी सांगणारे काका होते...परवचा घेणारे आजोबा होते. नाटक आणि संगीताच्या तालमी घेणारे गणेशोत्सव होते. या गोतावळ्यात माणसाला शारीरिक, मानसिक, भावनिक आधार वेगवेगळ्या व्यक्तीकडून सहज मिळायचा. ही नाती घट्ट आणि स्थिर होती. या नात्यांनी समृद्ध झालेल्या माणसांना कुटुंबात वा समाजात माणसांची निवड करण्याची संधी होती. त्यानंतर बदलत गेलेल्या समाजरचनेनुसार एकत्र, सामायिक कुटुंबं कमी आणि विभक्त कुटुंबं जास्त होत गेली. एकत्र कुटुंबातल्या माणसांच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे वळताना कुटुंबव्यवस्था पती-पत्नी पुरती संकोचली गेली.

बदलत गेलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर विचार करता पती-पत्नी या नात्यातही आज बराच बदल झाला आहे. खरोखरच कुटुंब व्यवस्था पती-पत्नी पुरतीच संकोचली गेली आहे. अलीकडे लग्नविषयक जाहिरातींमध्ये 'मुलगी गोरी,सुंदर, ग्रॅज्युएट, नोकरी करणारी, करिअरिस्ट पाहिजे.' आदी अटी असतात. मुलांच्या जाहिरातीच्याबाबतीतही हेच दिसते. करिअरिस्ट मुलगी ही सुरुवातीला अभिमानाची बाब असते, पण पुढे संसार सुखाचा करताना हीच गोष्ट अडथळा निर्माण करते. हे आव्हान पेलवणे अनेक घरांना अवघड जाते. त्यातच वेगाने येणाऱ्या पाश्चात्यिकारणाचा सामाजिक आणि त्या अनुषंगाने कौटुंबिक जीवनावरचा होणारा परिणाम थांबवता येत नाही. कितीही शिकलेले तरुण-तरुणी असतील तरीही जेव्हा त्यांच्यात पती-पत्नी हे नाते निर्माण होते, तेव्हा पत्नीने पतीशी सल्लामसलत न करता काहीही ठरवणे , एखादा निर्णय घेणे-हा पुरुषांकरिता इगो प्रॉब्लेम होतो. पुढारलेल्या पत्नीनेही आपला सल्ला घेतलाच पाहिजे, कुळाचार केले पाहिजेत आणि आर्थिक सहभागही दिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. बदलत्या काळानुसार 'वतासावित्री'ची जागा 'कडवा चौथ'ने घेतली आहे, एवढेच. मुंबई, पुण्यासारख्या शहरात तर आयुष्याची गती इतकी वाढली आहे की, पती-पत्नीलाही एकमेकांसाठी मुद्दाम वेळ काढावा लागतो. गतिमानतेमुळे नाती व्यवहारी होत चालली आहेत. व्यवहारावर आधारलेल्या या कुटुंबांमध्ये सहनशीलता कमी झाली आहे. एखादे नाते घडविण्यासाठी ,ते दृढ होण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो, तो दिलाच जात नाही. कोणतीही गोष्ट करताना जबाबदाऱ्या वाटून घेणे ,दोघांनी मिळून करणे-हा विचार पती-पत्नीत अभावानेच आढळतो.

अलिकडे कुटुंबातील मुलांची संख्या कमी होत आहे. कुटुंबातील सर्व नात्यात ताणतणाव गृहीत धरले जातात, पण पालक-मुलांचं नातं हे प्रेमाचंच असणार , हेही गृहीत धरले जाते. बदलत्या कुटुंबव्यवस्थेतले हे बदल संमिश्र म्हणजे evolutionaryआणि  destructive अशा दोन्ही स्वरूपाचे आहेत. कुटुंबव्यवस्था बदलली म्हणजे मुले बिघडली , असे नाही. मुलांमध्ये बदल ही नव्या पिढीची गरज आहे. पालक आणि मुलांमधली मित्रत्वाची भावना आता मौलिक होते आहे. अलीकडे शिक्षक -विद्यार्थ्यांमधले नातेसुद्धा बदलले आहे. या नात्यात गप्पा आणि sharing ला वाव आहे. शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदरापेक्षा मुलांना त्यांच्याशी मैत्रीचं नातं हवं आहे.  अर्थात आता जे बदल होत आहेत ,ते सगळे वाईटच असतात असं नाही. पूर्वी एकत्र कुटुंबात ज्येष्ठांचा व्यवहार अंतिम शब्द असे. आपण जर लोकशाहीत राहतो, तर कुटुंबात हुकूमशाही का असावी? एकत्र कुटुंबपद्धतीचा पाया जर हुकूमशाहीवर आधारलेला असेल तर ती पद्धती या प्रवाहात टिकणार कशी? अलीकडे मात्र नाती पारदर्शक होत चालली आहेत. निरोगी होत आहेत. 'ए आई' सारखं ' ए बाबा' चं स्थान निर्माण होत आहे. हा नात्यातला बदल समजून घेतला पाहिजे. 

आपण आहोत तसे दाखवायला न घाबरणे , स्वतःच्या क्षमतेच्या जाणिवेबरोबरच दुसऱ्याच्या क्षमतेचीही जाणीव ठेवणे आदी गोष्टी लक्षात घेतल्या तर कुटुंब मोडणार नाही. घटस्फोटाचे दूरगामी परिणाम इतके भयानक आहेत की घटस्फोटितांची मुलं पुढे जेव्हा स्वतःचे कुटुंब घडवू पाहतात,तेव्हा कोणावरही प्रेम करायला , विश्वास ठेवायला घाबरतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आशय प्रेम नसून व्यवहार आहे. ज्याच्या-त्याच्या भूमिका ठरल्यामुळे हुकूमशाही आली.हुकूमशाहीचा अतिरेक झाला तेव्हा कुटुंब मोडू लागली. पण जेव्हा 'स्त्री कुटुंब मोडते' असा तिच्यावर आरोप होतो ,तेव्हाच ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होती, हे मान्य करण्यासारखे होते.

आई बाबाला विचारते, त्याच्यापेक्षा कमी पैशांची नोकरी धरते, म्हणजे ती कमी महत्त्वाची आहे, हे मुलांना कळते. तसेच पालक- मुले यांच्यात कितीही मित्रत्वाचे नाते असले तरी 'मी जास्त अनुभवी', 'मी सांगतो म्हणून..'हा पालकांचा दृष्टिकोन बदललेला नाही.म्हणजेच बुद्धिपेक्षा अनुभवला महत्त्व दिल्यामुळे शंभर टक्के लोकशाही या नात्यात शक्य नाही. खरे तर शेवटचा निर्णय हा पालकांचाच-हे. चूक आहे. अनुभव पचवणे, रिचवणे आणि तपासून पाहणे यासाठी वृत्तीचा मोकळेपणा हवा. त्यामुळेच नाते पुढे जाऊ शकते. अनुभवाची प्रक्रिया न मांडता निष्कर्ष मांडल्यामुळे नाते पुढे जात नाही.  महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात संसदेपासून संसारापर्यंत कुठेही लोकशाही नाही. पूर्वीपासून पुरुषांनी स्त्रीचे उदात्तीकरण केले. तिला 'जननी म्हटले. नंतर स्वतःला अडचण आल्यावर तिला नोकरीला लावले. म्हणजेच स्त्रियांना दुय्यम वागणूक देणारी आणि विषमतेवर आधारलेली अशीच सदोष कुटुंबव्यवस्था आपल्याकडे आहे. तीत सुधारणेची गरज आहे. मात्र त्यातल्या त्यात अलीकडे पुरुषप्रधानता  खिलाडू वृत्तीने स्वीकारली जात असल्याचे नमूद केले पाहिजे.  पुरुष खिलाडू वृत्तीने मुले सांभाळतात. ज्येष्ठांनीही आपल्या अपेक्षा लादणं कमी केलं आहे. स्वातंत्र्याच्या कल्पना विस्तारत चालल्या आहेत. कुटुंबव्यवस्थेचा पाया प्रेमाधिष्ठित व्यवहाराचा असावा. कुटुंबात समानता म्हणजेच समोरच्या व्यक्तीचा स्वीकार आणि आत्मस्वीकारही हवा. कुटुंबव्यवस्थेत दोन पिढ्यांमध्ये लैंगिकतेबद्दल संवाद हवा. अनुभवांचे शेअरिंग हवे. कौटुंबिक बदल हे क्रांतिकारी नकोत, तर उत्क्रांतीवादी हवेत. या बदलांना गतीपेक्षा दिशा हवी. त्यात सुधारणावाद हवा. विविधतेचा आदरच नाही, तर उत्सव करणे महत्त्वाचे आहे. 'मी'ने ठळक असावे, पण छप्पर फाडू नये. नियमांकडून नियमनाकडे जाताना खिलाडूपणे स्वीकारलेले गतिशील संतुलन हवे, एकमेकांचा भावनिक स्वार्थ जपायला हवा, Nurture मध्ये जे घडतं ते हळुहळू Nature चा भाग होईल, अशी आपली जबाबदारीची वागणूक हवी.


Sunday, August 16, 2020

प्रेमविवाहातील धोके...

आजकाल प्रसारमाध्यमांच्या अतिरेकी वापराच्या काळात वरकरणी गोष्टींना ,बाह्यसौंदर्याला, बेगडी मूल्यांना अवास्तव महत्त्व येऊ लागलेलं दिसतं. आपला जोडीदार निवडताना शाश्वत मूल्यांचा विचार न होता वरवरच्या बाबींचा विचार जास्त होऊ लागलेला आहे. कदाचित यामुळेच घटस्फोटाचं प्रमाणही वाढीला लागलं आहे. दिसायला सुंदर आहे, याकडे अधिक लक्ष दिलं जातं. वागायला-बोलायला समोरचा माणूस कसा आहे, हे पाहिलंच जात नाही. खरं तर लग्नाबद्दल विचार करणं तशी गंभीर बाब आहे.मात्र यामुळेच पुढे संकट ओढवतं. सगळ्यांनाच पश्चाताप होतो. 

 लग्नाचा निर्णय संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. जुन्या काळी घरची मोठी माणसं निर्णय घेत. अपरिचित व्यक्ती आयुष्याचा जोडीदार म्हणून वाट्याला येत असे. 'लग्न टिकवणं' या मानसिकतेतून संसाराची सुरुवात होत असे आणि लग्नं टिकतही असत.एकत्र कुटुंबाचा अभिमान वाटत असे.पण अलीकडच्या काळात उलटा प्रवास सुरू झाला. पाश्चिमात्य राहणीमान नव्या पिढीला भुरळ घालू लागली. आता लग्न न करता रिलेशनशिपमध्ये स्त्री-पुरुष राहू लागले आहेत. कंटाळा आला की, दुसऱ्याशी रिलेशन ठेवले जात आहे.

जुन्या पिढीत स्त्री-पुरुष नुसते बोलताना दिसले की बोलबाला व्हायचा.मधल्या पिढीत स्त्री-पुरुषाचं समाजात हसणं, बोलणं सर्वमान्य झालं पण चारचौघात एकमेकांना स्पर्श वर्ज्य होता. आता मुलं-मुली एकत्र भेटतात, मोकळेपणानं गप्पा मारतात. हात मिळवणं, पाठीवर हात ठेवणं वगैरे गैर मानलं जात नाही. स्त्री-पुरुष मैत्री समाज पचवू लागला. मैत्रीचं रुपांतर लग्नबांधनात होणार नाही,हेही ग्राह्य धरलं जाऊ लागलेलं आहे. पुष्कळदा मैत्रिणीशी लग्न नको अशी भूमिका पुरुषांकडून घेतली जाते आणि तशीच मुलगीही मित्राशी लग्न करायला उत्सुक नसते. कधी वाटतं लग्नाबद्दलच्या नव्या पिढीच्या कल्पना अजूनही धूसर असाव्यात. करिअर मागे लागलेली आजची पिढी लग्नाला दुय्यम मानू लागली आहे. 

साहित्यिक व.पु.काळे म्हणतात,लग्न जमवताना पत्रिका बघतात.गुण जुळले तर लग्न जमतं. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांचे अवगुण जुळवून घ्यावे लागतात. त्यांचं म्हणणं होतं,'एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे सांभाळण्याचे!' प्रेम विवाह करणाऱ्यांनी तर हे जास्तच लक्षात ठेवायला हवं. प्रेमविवाह होतो तेव्हा विवाहाआधी एकमेकांना आनंद देण्यासाठी चांगलं वागलं जातं. चांगलं बोललं जातं. चुका माफ केल्या जातात. लग्नापर्यंत प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल खूप अपेक्षा निर्माण होतात. लग्नानंतर मात्र खरं रूप बाहेर आल्यावर अपेक्षाभंग होतो, वादविवाद होतात. भ्रमनिरास होतो. पालकांनी ठरवलेल्या लग्नात निदान अपेक्षा नसतात. त्यामुळे अपेक्षाभंग नसतो. पण आज चित्र पूर्ण उलटं आहे. 

'खऱ्या प्रेमाची' व्याख्या एका मानसशास्त्रज्ञानं खूप छान केली आहे. 'ज्या सहचर्यातून एकमेकांमधील विधायक गुण व सृजनशीलतेला वाव मिळतो ते खरं प्रेम' या सृजनशीलतेत नव्या जिवाचा जन्मही येतोच. खऱ्या प्रेमामध्ये देणं येत असतं, परतीची अपेक्षा नसते. घेवाणीची इच्छा नसते. असं घडलं तरच प्रेम टिकतं. खऱ्या प्रेमात स्वतःचा अहं गौण समजायला लागतो. खूपशा घटस्फोटापर्यंत आलेल्या दाम्पत्यांमध्ये प्रत्येकाचा अतिरेकी अहं कारणीभूत ठरत असतो. प्रत्येक शक्ती भिन्न असते याची जाणीव लग्नाआधी असणं जरुरी आहे. ज्या व्यक्तीबरोबर लग्नगाठ जुळली त्या व्यक्तीच्या लहान लहान सवयींमुळे परस्परांत वाद होऊ शकतात. स्वच्छतेच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. शिंकणं, खोकणं असल्या किरकोळ सवयी दुसऱ्या व्यक्तीला चीड आणू शकतात. वेगळ्या सवयी, आवडीनिवडी याबद्दल एकमेकांशी बोलता आलं, संवाद साधता आला तर मात्र काही तडजोड शक्य असते. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधला व्यवहार नसतो. तो दोन कुटुंबांमधील दुवा असतो. लग्नातील प्रत्येक जोडीदार आपले नातेवाईक, मित्रमंडळी व आधारगट घेऊन आलेला असतो. लग्नाच्या निमित्तानं ही इतकी सारी मंडळी एकमेकांशी जोडली जाऊ शकतात आणि जोडली गेली पाहिजेत. 'लग्नानंतर आपण वेगळं राहू, नातेवाईक नकोत,' अशी भूमिका असली तरी आपण फार मोठ्या आधारगटाला मुकणार आहोत हे दाम्पत्यानं लक्षात घ्यायला हवं.

प्रेमाच्या अनेक व्याख्यांपैकी एक व्याख्या अशीही आहे की 'केवळ प्रेम करणाऱ्या व्यक्तीबद्दलचं प्रेम नव्हे तर ती व्यक्ती ज्या गोष्टींवर, ज्या व्यक्तींवर प्रेम करते त्या सर्वांवर प्रेम करणं म्हणजे खरं प्रेम!' लग्नाच्या बंधनात शिरण्याआधी या सगळ्या गोष्टींची जाणीव असलेली व्यक्ती जास्त समर्थपणे नव्या जगात स्वतःला सामावून घेऊ शकते व सुखी होऊ शकते. जात, पात, धर्म, शिक्षण, पैसा यांप्रमाणे लग्नसंस्थापण मानवनिर्मित आहे. मानवानं ज्या बुद्धिमत्तेच्या भरवशावर जग मुठीत घेतलं त्याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याला लग्न टिकवणं, त्यातून आनंद घेणं खरं तर जड जाऊ नये. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Monday, August 10, 2020

15 ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिन

15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवसाचे माहात्म्य काही औरच आहे. जगातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा भारत हा क्षेत्रफळाने जगातील 7 वा सर्वात मोठा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आहे. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचं निमित्त साधून भारतात वसाहती स्थापन केल्या. त्यातून आपलं साम्राज्यवादी धोरण पुढे रेटले जात होते. यातूनच इंग्रज,डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे भारतात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होते. इंग्रजांनी आपल्या विकसित शस्त्रास्त्रे, युद्धकौशल्य आणि मुत्सद्देगिरी, फुटीचे राजकारण याचा वापर करून हळूहळू देशातील सर्व राज्यं आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत , म्हैसूरचा टिपू सुलतान, 1818 मध्ये मराठा साम्राज्य, 1850 च्या सुमारास पंजाबमधील शीख व जाट असे एक एक प्रदेश हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली घेतलं. 1857 मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला आणि पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला,तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांमध्ये जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार ब्रिटिश सरकारकडे गेला.

लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. 1920 मध्ये टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींनी चळवळीची सूत्रं हाती घेत अहिंसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या. सरतेशेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश यांना वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय क्लेशदायक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. आणि भारत गणतंत्र राष्ट्र बनले. आज आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून बिरुदावली मिरवत आहे.

मात्र, आजही भारतीय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याबाबतीत इथल्या नागरिकांचा प्रचंड गोंधळ उडताना दिसतो. स्वातंत्र्यदिनी भारत ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला, पण फक्त अधिकृत सत्तांतर झालं. तरीही ब्रिटिश सार्वभौमत्व तसंच शिल्लक राहिलं. 1935 चा गव्हरमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हाच घटनेसमान सर्व कारभरासाठी आधारभूत राहिला. मात्र प्रजासत्ताक दिनी नवीन घटना अंमलात येऊन इंग्लंडच्या राजाचं सार्वभौमत्व पूर्णपणे आणि कायमचं हटलं. नव्या घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि एकंदरीत व्यवस्थेतील स्थान निश्चित झालं. त्यामुळे भारत आणि पर्यायाने भारतीय नागरिक खऱ्या अर्थाने पूर्णपणे स्वतंत्र आणि सार्वभौम झाला. या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व अधिक आहे. मात्र हा झाला एक दृष्टिकोन. परंतु प्रजासत्ताक घडण्याकरिता आणि घटना निर्माण होण्याअगोदर स्वातंत्र्य हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. स्वातंत्र्य- अधिकृत सत्तांतर ही एक मोठी सुरुवात होती. एक महत्त्वाचा मैलाचा दगड होता. म्हणून स्वातंत्र्य दिन अधिक महत्त्वाचा! 

देशाच्या अस्मितेचं प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा हा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचं प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकवत असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली असून ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय  ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचं खूप कमी नागरिकांना माहीत असतं. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा किंवा प्लास्टिकचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. त्यामुळे कागदी आणि प्लास्टिक झेंडे वापरू नयेत, यासाठी राष्ट्रीय सणांदिवशी जिल्हाधिकारी आवाहन करताना दिसतात. ध्वज संहितेची ओळख सर्व नागरिकांनी करून घेण्याची गरज आहे.

भारताचं राष्ट्रगीत अनेक प्रसंगी गायलं -वाजवलं जातं. राष्ट्रगीताचं योग्य स्वरूप ,ते वाजवलं जातं किंवा गायलं जाण्याचे उचित प्रसंग, तसेच त्या प्रसंगी राष्ट्रगीताप्रसंगी आदर दाखवण्यासाठी पाळण्याचे संकेट व परंपरा यांबाबतीत सरकारच्यावतीने वेळोवेळी सूचना प्रसिद्ध केल्या जातात. जन गण मन... हे भारताचं राष्ट्रगीत नोबेल पारितोषिक पुरस्कार प्राप्त रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याच्या हिंदीतील केलेल्या भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1911 मधील अधिवेशनात म्हटली गेली होती.रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचं जयगीत म्हणून लिहिलं होतं. 

15 ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहण होतं आणि ध्वजाला तोफांची सलामी दिली जाते. भारतीय नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या अधिकाराच्या माध्यमातून देशाचा विकास चिंतला पाहिजे. आपली कर्तव्ये काय आहेत, हे जाणून घेऊन ती पूर्ण करण्याकडे आपला कल असला पाहिजे. समाजाचे-त्यातील राज्यसंस्थेचे-कायदे पाळणे, इतरांच्या अधिकारांचे भान ठेवून वागणे, सर्व मनुष्यमात्रांना प्रतिष्ठेची वागणूक देणे, भविष्यातील समाजाला चांगले जीवन जगता येईल अशा रीतीने-जबाबदारीने आजच्या साधनसंपत्तीचा विनियोग करणे आणि समाजातील नीतिनियम पाळणे, अशी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. फक्त अधिकार आणि हक्क यांचीच भाषा बोलणे योग्य नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

Saturday, August 8, 2020

अनिश्चिततेच्या काळात अभ्यासक्रम उरकण्याची घाई का?

भारतात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 20 लाखांहून अधिक झाली आहे. यामुळे कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 लाखांपेक्षा जास्त असून ब्राझिलमध्ये 28 लाखांपेक्षा जास्त तर भारतात 20 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आणखी चार-आठ दिवसांत आपण ब्राझीललाही मागे टाकून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावू,कारण कोरोनाबाधितांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत शाळा-कॉलेज सुरू करणे अशक्य आहे. कारण आता ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे पर्याप्त आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या उपचारांची हेळसांड होत आहे. त्यामुळे मृत्यू दर वाढत चालला आहे, ही मोठी चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्याचा अट्टाहास महागात पडू शकतो. त्याच बरोबर अनेक शाळा-कॉलेजांनी ऑनलाईन शिक्षणाचा अतिरेक चालवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्याच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. आता या सततच्या ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांची चिंता पालकांना सतावू लागली आहे. शिक्षक आणि शिक्षण संस्था अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई करत आहेत,त्यामुळे विद्यार्थ्यांना सतत मोबाईल आणि लॅपटॉपसमोर बसावे लागते आहे. आणि हेच आता धोकादायक ठरू लागले आहे. आणि मुळात ज्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॉप नाही,त्या मुलांचे शिक्षण मात्र खंडित झाले आहे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांची आकडेवारीही मोठी आहे,त्यामुळे सध्या जे शिक्षण दिले जात आहे,ते फक्त श्रीमंत आणि उच्चभ्रू मुलांसाठीच दिले जात आहे. यामुळे पुन्हा मागास, वंचित घटकांतील मुले शिक्षणात मागे राहण्याची भीती आहे.

ऑनलाईन शिक्षणात मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर करताना इंटरनेटचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आजच्या या आर्थिक तंगीच्या काळात हा एक आर्थिक भुर्दंडच पालकांना सोसावा लागत आहे. कॉलेजच्या मुला-मुलींना दररोज पस्तीस ते चाळीस रुपये रोज इंटरनेटसाठी खर्च करावे लागत आहेत. महिन्याला हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च होत आहेत.  एवढे पैसे आणायचे कोठून असा, सवाल आता पालक विचारू लागले आहेत. काही मुलांच्या पालकांनी इंटरनेट सेवाच बंद करून टाकली आहे. त्यामुळे मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पालक चिंतेत असतानाच त्यांना घरी बसल्या आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. त्यामुळे हे ऑनलाईनदेखील फार काळ टिकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुळात या कालावधीत मुलांचा व्यायाम होत नसल्याने शारीरिक त्रासाने डोके वर काढले आहेच, शिवाय डोळ्यांच्या समस्याही जाणवू लागल्या आहेत. काही कॉलेजच्या प्राध्यापकांनी ऑनलाईन शिक्षण देताना झूम, गुगलच्या माध्यमातून विद्यार्थी तासाला उपस्थित आहेत की नाहीत,याची खातरजमा करताना विद्यार्थ्यांना तास अटेंड करण्यासाठी दमबाजी केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थितीही आता बिघडत चालली आहे.
शासनाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे, मात्र काही शाळांनी हा वगळलेला अभ्यासक्रम अगोदरच शिकवला आहे. आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही. शिवाय कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अजून शाळा कधी सुरू होणार याची निश्चितता नाही. मुळात औषध किंवा लस उपलब्ध झाल्याशिवाय कोणतीही 'रिस्क' धोकादायक ठरणार असल्याने हा जो ऑनलाईन अभ्यासक्रम उरकण्याचा प्रयत्न चालला आहे, तो काहीच कामाचा नाही. कदाचित शाळा सुरू व्हायला पुढचे वर्ष उजाडेल. त्यामुळे कदाचित आणखी अभ्यासक्रम कमी करावा लागेल अथवा शैक्षणिक वर्षच रद्द करावे लागेल. अशी अनिश्चितता असताना ऑनलाईन शिक्षणाचा आणि अभ्यासक्रम उरकण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे अभ्यासक्रम आणखी कमी करणे किंवा शैक्षणिक वर्ष रद्द करणे अशी नामुष्की ओढवली तर सध्या अभ्यासक्रम उरकण्याचा जो प्रयत्न चालला आहे,तो सगळा पाण्यात जाणार आहे. मग या कालावधीत विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास झाला किंवा होणार आहे, याला जबाबदार कोण? याची जबाबदारी कोण घेणार आहे. आगामी काळ सगळा अनिश्चित असताना शिक्षण देण्याचा अट्टाहास का? आणि मग जी मुलं या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिली आहेत, त्या मुलांच्या भवितव्याचे काय? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची ओळख करून देण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. मुलांचे कलागुण हेरण्याचे आणि त्या गुणांना आणखी चालना देण्याचे काम यानिमित्ताने करता येईल.हे करताना त्याला हसतखेळत शिक्षण देता येईल. थोडा काळ अभ्यासक्रम मागे ठेवून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांच्याकडे ही सोय उपलब्ध आहे,त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देता येईल. नाट्य, गायन,चित्रकला याशिवाय कार्यानुभव या विषयांना स्पर्श करता येईल. संबंधित क्षेत्रातील'बाप' माणूस यांचा परिचय करून देण्याबरोबरच त्यांच्या मुलाखती उपलब्ध करून देता येतील. मात्र याची कुणावर सक्ती असता कामा नये.
मुळात शिक्षण दहावी आणि बारावीपर्यंत मोफत आहे. मात्र आजच्या घडीला ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांना आर्थिक फटका बसत आहे. मग हे कसले मोफत शिक्षण? गेल्या तीन-चार महिन्यात विद्यार्थ्यांना डोळ्यांचे आजार जडल्याचे आणि चष्म्याचे नंबर वाढल्याचे दिसत आहे. शारीरिक समस्याही निर्माण होत आहेत. मुले तासंतास मोबाईलसमोर राहात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर पालक संघटना आणि तज्ज्ञांनी नियमावली जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.  ऑनलाईन क्लासेसच्या नावावर काही शाळांनी सुरू केलेल्या मनमानीला चाप लागणार आहे, असे आपण म्हणत असलो तरी सध्या विद्यार्थी शाळा-कॉलेज आणि क्लास यांचे तास ऑनलाईन'अटेंड' करत आहेत, यात त्यांचा अधिक वेळ जात आहे. यामुळे शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्यांकडे शासनाने आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणवणाऱ्या मंडळींनी लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर ही पिढी आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत घडवणार आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. यंदाचे शैक्षणिक वर्ष अनिश्चित गर्देत सापडले असताना मुलांच्या आरोग्याशी  का खेळ  चालवला जात आहे? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

Tuesday, August 4, 2020

पर्यायी इंधनाचा वापर वाढायला हवा

आपल्या देशात पारंपरिक इंधनाचा (पेट्रोल-डिझेल) वापर खूपच मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे नऊ लाख कोटीचे क्रूड ऑइल आपल्याला आयात करावे लागते. आपला हा पैसा वाचवायचा असेल तर जैविक इंधनाचा वापर वाढवला पाहिजे. जैविक इंधननिर्मितीवर नवीन संशोधन झाले आणि त्याचा अधिक अभ्यासही केला जात आहे. इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजी हे पारंपरिक इंधनावर पर्याय म्हणून समोर येऊ शकतात. आपल्या देशात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी आता साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर अधिक भर दिला पाहिजे. देशात व महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक झाल्याने मागील वषीर्पासून अतिरिक्त साखरेचे संकट निर्माण झाले असून त्यात या वर्षी भर पडणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेच्या संकटावर इथेनॉलनिर्मिती हाच खात्रीशीर उपाय असून साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून साखर उत्पादनाचे प्रमाण कमी करून इथेनॉलनिर्मितीवर भर द्यायला हवा. 

मागील हंगामात देशात देशात २७२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबरोबरच देशांतर्गत बाजारपेठेतही साखरेच्या विक्रीवर करोनामुळे परिणाम झाला आहे. त्यामुळे २0२0-२१ चा हंगाम सुरू होत असताना भारतात साखरेचा १२२ लाख मेट्रिक टनांचा साठा शिल्लक असेल. सध्या साखर ठेवायला गोदामांमध्ये ठेवण्यासाठी व्यवस्था नाही. याशिवाय साखर निर्यातीवर 60 हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली जाते. शिवाय ऑक्टोबर २0२0 मध्ये सुरू होणाऱ्या पुढील साखर हंगामात देशभरात ३११ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. देशातील साखरेचा सरासरी खप वार्षिक २६0 लाख टन आहे. ५0 लाख टन साखर निर्यात होऊ शकेल आणि १२३ लाख टन साखर शिल्लक राहील,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साखरेचे पोते तयार झाल्यापासून ते विकले जाऊन पैसे मिळेपर्यंत साखर कारखान्यांना सहा ते सात महिने वाट पाहावी लागते. या उलट खनिज तेलात इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे राष्ट्रीय तेलकंपन्या इथेनॉल खरेदीस उत्सुक आहेत. शिवाय इथेनॉल तयार होऊन त्याची विक्री झाल्यानंतर पैसे मिळण्याचा अवधी अवघे २१ दिवस आहे. शिवाय केंद्र सरकारने इथेनॉलसाठी ५0 ते ६0 रुपयांचा दर निश्‍चित केलेला असल्याने दराबाबत निश्‍चिंत राहता येते. त्यामुळे इथेनॉल हे बाजारपेठे, दर व त्यातून मिळणारा नफा या सर्व गोष्टींमध्ये खात्रीशीर उत्पन्न देणारे उत्पादन आहे. त्यामुळे उसाच्या रसापासून साखर तयार करून अतिरिक्त साखरेच्या साठय़ात भर घालण्यापेक्षा साखर उत्पादन कमी करून इथेनॉलनिर्मितीवर भर दिला तरच साखर उद्योगाला अतिरिक्त साखरेच्या संकटातून मार्ग काढता येईल.यामुळे इथेनॉलची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल व क्रूड ऑईलची आयात कमी होईल. साहजिकच इंधन आयातीवर होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल. 
आयातीत इंधन खर्च कमी करण्यासाठी व प्रदूषण नियंत्रणासाठी जैविक इंधनावरील वाहने व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण नियंत्रित राहून पर्यावरणाचे समतोल राखले जाईल. तसेच महामार्गावरील वाहतूक करणाऱ्या लाखो ट्रकमध्ये डिझेल ऐवजी बायो सीएनजीचा वापर झाला तर वाहतूक खर्चात मोठी बचत होईल. डिझेलचा ट्रक सीएनजीवर परावर्तित करण्यास येणारा खर्च दोन वर्षात वसूल होईल. पण हा बदल करणे आता आवश्यक झाला आहे. उत्पादन खर्चात बचत, वाहतूक खर्चात बचत, उच्च तंत्रज्ञानाचा वापर, कौशल्याधारीत मनुष्यबळ, यशस्वी तंत्रज्ञान यामुळे देशाचे चित्र तर बदलेलंच, पण आयात वस्तूंवर होणारा खर्च कमी करून तो देशांतर्गत वाढवण्यास मदत होईल. यासाठी लोकांची साथही महत्त्वाची आहे.
दुचाकी, तीनचाकी, सार्वजनिक वाहतूक यासाठी सीएनजी किंवा इलेक्ट्रिकचा वापर करणे आता क्रमप्राप्त आहे. कारण डिझेलवर बसवाहतुक करताना 115 रुपये किलोमीटरचा खर्च येतो, तोच सीएनजीचा वापर केला तर 50 टक्के कमी होतो. आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर कमी केला तर आणखी खर्च कमी येतो. ट्रकसारखी मोठी वाहने सीएनजीवर चालवली तर वाहतूक खर्च कमी होईलच,पण महत्त्वाचे म्हणजे आपल्याला लागणाऱ्या वस्तू, अन्नधान्य ,पदार्थ स्वस्त होतील, याचा विचार करून सरकारापासून सामान्य माणसांपर्यंत पर्यायी इंधन आणि वाहनांचा वापर करायला हवा आणि त्याला प्रोत्साहन मिळायला हवे.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012


Monday, August 3, 2020

उद्योगांनो, खेड्याकडे चला

गावातले लोक गावात काही कामधंदा नाही म्हणून शहरात गेले. अपार कष्ट उपसले. हे करताना उपाशी राहिले, उघड्यावर झोपले. तरीही त्यांना शहर आपलेच वाटले. त्यामुळे त्यांनी गावाकडे पाठ फिरवली. काहींनी गावाकडचा जमीन-जुमला विकला. पण कोरोना संसर्गाचे संकट आले तेव्हा, याच शहराने त्यांना वाऱ्यावर सोडले. मग मात्र त्यांना गावाकडची आठवण झाली. ज्यांनी गावाशी नाळ जोडून ठेवली होती, त्यांनी गाव जवळ केले. बाकीच्यांचे हाल झाले. काही बेघर झालेलेदेखील गावाकडे आली. मंदिरात ,झाडाखाली राहिली. त्यांना गावाने जवळ केला. पण या लोकांना शहराने काय दिले? अपमान, अविश्वास, भूक, दारिद्र्य आणि कोरोना दिला. गावे सुरक्षित होती. पण शहरांनी व्यापारी, बाजारी, नफेखोरी, लालची, स्वार्थी शहरी लोकांनी हे संकट लादले. त्यामुळे गाव हा आपला धर्म, धन, कर्तव्य मानून ते लोक गावात परत आले.मात्र काही गावात त्यांना नाकारण्याचा कटू अनुभवही आला. काहींना आपली चूक लक्षात आली. कोरोनाने माणुसकीच घालवण्याचा विढा उचलला होता, पण शेवटी गावाने त्यांना स्वीकारले. 

आता गावातून उठाव व्हायला हवा. कोरोनाच्या काळात सगळे धंदे आयुष्यातून उठले. पण शेती आणि शेतीसंबंधी छोटे-मोठे उद्योग टिकून राहिले. आपल्यातील शेती समृद्ध आहे, म्हणून या महामारीच्या काळात माणसं तगली. त्यामुळे आता गावाकडं आलेल्या माणसांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी पेटून उठायला हवं. आमच्या लोकांना बेसहारा, बेवारस म्हणून शहरातून हाकलले ना, आता आमचं आम्ही बघू, त्यांचं काय करायचं ते आमचं आम्ही बघू, असा निर्धार आता गावकऱ्यांनी केला पाहिजे. गावातला माणूस गावातच जगला पाहिजे,गावे समृद्ध झाली पाहिजेत अशी व्यवस्था करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. आता सरकारलाही कळून चुकले आहे की, उद्योगधंदेसुद्धा ग्रामीण भागात उभारले पाहिजेत. त्यासाठी सरकारने तयारी केली पाहिजे. गावातच रोजगार मिळण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजेत.
ग्रामीण अर्थव्यवस्था, नैसर्गिक अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भक्कम कशी होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. आर्थिकदृष्ट्या गावे भक्कम झाली तर शहरालाही अधिक ताण बसणार नाही आणि ते बिनधास्त राहील. काही  गावांना आपल्या क्षमतेची, गौरवाची, स्वाभिमानाची जाणीव करून द्यावी लागणार आहे. या पद्धतीनेच शैक्षणिक धोरण राबवले पाहिजे. रोजगार, आरोग्य यांचा दर्जा वाढवला पाहिजे. गावात कमान, मंदिरे उभारण्यापेक्षा शाळा-महाविद्यालये,दवाखाने भक्कम केली पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गावे रोजगारात स्वयंपूर्ण व्हायला हवीत, याकडे सरकारपासून गावपातळीपर्यंतच्या सर्वच स्तरातील लोकांनी लक्ष दिले पाहिजे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही, त्यामुळे आता डोळे उघडलेच आहेत. आता स्वस्थ बसू चालणार नाही.
सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण दूर व्हायला हवा. नवीन उद्योग गावात उभारले पाहिजेत. उद्योग विकास झाला पाहिजे. ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था मजबूत करण्याशिवाय पर्याय नाही.  त्याशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही. गरिबी, भूकबळीसारखे प्रश्न आ वासले आहेत. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागात जागेचा प्रश्न नाही. उद्योगांना भरपूर जागा उपलब्ध होईल. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या गेल्या तर नक्कीच या भागाचा शाश्वत विकास होईल. आणि शहराकडे जाणारा लोंढा कमी होईल. आज शहरांची अवस्था बिकट आहे. रोजगारासाठी धावणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे शहरात सुविधांच्या समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. लोकांच्या गर्दीपुढे तिथली सुविधा पुरवणारी यंत्रणा हतबल झाली आहे.
देशात नव्याने सुरू होणारे उद्योग ग्रामीण भागात सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.मुळात उद्योगांना लागणारा कच्चा माल आदिवासी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावर आधारित उद्योग या भागात सुरू करता येण्यासारखे आहे. याशिवाय नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान या भागात पोहचून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी इथल्या तरुणांना उपलब्ध होईल. यासाठी उद्योगांचे विकेंद्रीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्याची आवश्यकता असून त्याशिवाय नेमक्या दिशेने वाटचाल सुरू होणार नाही.
कोरोना संसर्ग आवरण्याला अजून उपाय सापडला नाही. म्हणजे प्रतिबंधात्मक लस आल्याशिवाय जनजीवन सर्वसामान्य होणार नाही. त्यामुळे त्याच्यासोबत जगण्याची कला विकसित केली पाहिजे. मात्र ही महामारी एकदा हटली म्हणजे, पुन्हा या गोष्टीकडे लक्ष द्यायचे नाही, असा अर्थ आता कुणीच घेऊ नये. कारण इथून पुढच्या काळात अशा कित्येक महामाऱ्या माणसाच्या जीवावर उठायला उद्भवणाऱ्या आहेत. माणसाचे राहणीमानच याला कारणीभूत आहे. शहरातील गर्दी, सर्व प्रकारचे प्रदूषण, अपघात, बदललेली जीवनशैली यामुळे माणसाचे आयुष्य आज औषध गोळ्यांवर अवलंबून राहिले. त्यामुळे कोरोनासारख्या  महामारीपुढे जीवन टिकणार नाही. याचा गांभीर्याने विचार सर्व स्तरावर झाला पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012