Friday, July 31, 2020

हिरोशिमाच्या इतिहासातील काळा दिवस

तो काळा दिवस होता-6 ऑगस्ट 1945. भयंकर अणुबॉम्बच्या स्फोटाने चार लाख लोकांचा घास घेतला. किरणोत्सर्जनाचे परिणाम पुढे अनेक वर्षे अनंत लोकांनी सोसले. या कटू घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 1945 साली सर्वत्र महायुद्धाचे ढग दाटून आले होते. सगळे जग युद्धाच्या छायेने ग्रासले होते. परंतु लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या अणुबॉम्बच्या विध्वंसक शक्तीची कुणालाच कल्पना नव्हती. मात्र आज त्या घटनेच्या नुसत्या  आठवणीने आपल्या हृदयात कालवाकालव होते. 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमातले सामान्य जनजीवन सकाळी नित्याप्रमाणे सुरू झाले. सकाळचे सव्वा आठ वाजलेले. शाळा-महाविद्यालये, नोकरी-चाकरीसाठी जाणाऱयांची लगबग. रस्त्यावरून एका छोट्या मुलीला घेऊन तिची आई चालली होती. "आई आई, लवकर बघ, वर आकाशात किती तेजस्वी काहीतरी..." आणि तिचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच सूर्याइतकीच प्रखर उष्णता बाहेर फेकत, सारे आसमंत हादरावणारा महाभयंकर आवाज करत आगीचा लोळ जमिनीवर आदळला होता. त्या मुलीचा आणि तिच्या आईचाच नव्हे तर हिरोशिमातील चार लाख लोकांचा घास त्या भयंकर अणुबॉम्बने घेतला. माणसांचे कोळसे झाले. चालत्या-बोलत्या माणसांचे देह हवेत उंच उडून त्यांचे अवयव जमिनीवर इतस्ततः उधळले. प्रेतांचा खच, रक्ताचे पाट आणि हाडामांसाच्या चिखलाने हिरोशिमाची भूमी संपूर्णपणे व्यापली. रेल्वे, बसेस, ट्रॅम्स आणि इमारती कोसळल्या. आगीचा डोंब उसळला. धुराचे लोट इतके की नजरेसमोर काहीच न दिसावे. पण नजरेसमोर पाहण्यासाठी जिवंत तर कुणी हवे? डोळ्यांची पापणीही लवायला अधिक वेळ लागेल इतक्या क्षणात गगनभेदी किंकाळ्यांनी आसमंत भरून गेला. जणू ही पृथ्वीच नष्ट होतेय असं वाटावं. 43 लोकवस्तीचे आणि सात नद्यांचा परिसर असलेले हिरोशिमा क्षणात बेचिराख झाले. भाजलेली,पोळलेली, मरणप्राय वेदना सहन करीत पाण्याच्या शोधात जणू प्रेतेच सैरावैरा धावत होती. नव्हे धावयाचा प्रयत्न करता करताच एकेकजण कोसळून प्राण सोडत होता. मृत्यूला कवटाळत होता. एका शांततापूर्ण शहराचे जळणाऱ्या नरकात रुपांतर झाले होते.
हे महायुद्ध संपल्यावरही 25-30वर्षे किरणोत्सर्जनाचे परिणाम भोगत अनंत लोकांनी प्राण सोडले. हिरोशिमाच्या आसपासच्या आठ ते दहा मैलांच्या परिसरात अणुबॉम्बच्या भयावह परिणामांचे बळी जात राहिले. आजही स्फोटातून अत्यंत गंभीर रीतीने जखमी झालेले व मृतवत जीवन जगणारे काही हजार जीव तिथे आहेत. त्यांची वस्ती सामान्यांपासून , शहरापासून दूर आहे. त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून सरकार सर्वोतोपरी काळजी घेते. त्यांच्या औषधापाण्याची सोया सरकारच करते.
हिरोशिमातील महाभयंकर घटनेला एक वर्ष पूर्ण होताना हजारोंच्या संख्येने स्वयंस्फूर्तीने लोकांनी बळी गेलेल्या किंवा त्यांचे भयंकर परिणाम भोगत असलेल्या लोकांसाठी मदतकार्य सुरू केले. पुढे त्यांना बहुसंख्य लोक येऊन मिळाले. या सर्वांच्या प्रयत्नांने 'पीस पार्क' उभे राहिले. ऑगस्ट 1949 मध्ये जपान सरकारने हिरोशिमाला 'पीस मेमोरिअल सिटी' म्हणून घोषित केले.
या परिसरात एक स्मारक उभारले आहे. त्याच्यासमोरचा परिसर स्वच्छ,सुंदर,रमणीय आणि खूप मोठा आहे. इथे दरवर्षी6 ऑगस्टला लाखभर लोक येऊन मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना शोकाकुल होऊन श्रद्धांजली वाहतात.'No more Hiroshimas. Don't allow the disaster of Hiroshima to be repeated...' अशी प्रार्थना करतात. 
इथेच एका दुमजली भव्य इमारतीमध्ये 'हिरोशिमा हिस्टरी म्युझियम' उभारले आहे. तिथे अणुबॉम्ब पूर्वीच्या आणि नंतरच्या हिरोशिमाची छायाचित्रे, वस्तू, पुतळे इ.मांडून त्याबद्दलची सविस्तर माहिती जपानी आणि इंग्रजी भाषेत दिली आहे. शिवाय या विषयावरचा अर्ध्या तासाचा लघुपट दाखवला जातो. म्युझियम आणि लघुपट पाहताना मानवी क्रौर्याची, अमानुषतेची दृश्ये पाहून मान शरमेने आणि दुःखाने खाली जाते.
1945 मध्ये त्या बॉम्बस्फोटातून दोन वर्षे वयाची सडाको ससाकी ही मुलगी वाचली होती. पुढे ती शाळेत जाऊ लागली. धावपटू म्हणून तिने नाव कमवायला सुरुवात केली. पण वयाच्या अकराव्या वर्षी तिला किरणोत्साराच्या परिणामाने झालेल्या कर्करोगाने गाठले. ती अत्यंत निराश आणि दुःखी झाली. तिचे वर्गमित्र तिला भेटायला येत.क्रेन पक्षी एक हजार वर्षे जगतो. 'तू जर एक हजार कागदी क्रेन बनवलेस तर तुझी इच्छा पूर्ण होऊन तू पुन्हा पूर्ववत निरोगी होशील', असे मैत्रिणीने सांगितल्यावर सडाको हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेतही रंगीत कागदाचे क्रेन बनवू लागली. मृत्यूपूर्वी तिने 644 क्रेन बनवले. पण अखेरीस मृत्यूने 1955 मध्ये तिला गाठलेच. पुढे तिच्या वर्गमित्रांनी उरलेले 356 क्रेन बनवले आणि सडाकोच्या पार्थिव देहाबरोबर ते सर्व एक हजार क्रेन दफन केले गेले. एका अर्थी तिची इच्छा पूर्ण झाली होती. अनेक वर्षे तिने तेथील लोकांच्या हृदयात स्थान मिळवले.
या दुर्घटनेत ज्या लहान मुलांचे सडाकोप्रमाणे बळी गेले त्यांचे स्मारक उभारण्याचे जपानमधील तरुणांनी ठरवले. त्यासाठी देशभरातून आर्थिक मदत गोळा करण्यात आली. आणि 1958 मध्ये 'हिरोशिमा पीस पार्क'जवळच त्या स्मारकाचे अनावरण झाले. 'माऊंटन ऑफ पराडाईज' नावाच्या ग्रॅनाईटच्या उंच वास्तूच्या शिखरावर आपल्या पसरलेल्या हातात क्रेन पक्षी घेतलेली सडाको त्या ठिकाणी आपल्याला दिसते. दरवर्षी6 ऑगस्टला म्हणजेच शांततादिनी हजारो कागदी क्रेन्स अर्पण केले जातात. या स्मारकावर शब्द कोरले आहेत. 
There is our cry
This is our prayer
Peace in the world.
चार टन वजनाचा जगातला पहिला अणुबॉम्ब अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा या शहरावर टाकला. या बॉम्बचे नामकरण 'लिटल बॉय'असे करण्यात आले होते. कारण प्रत्यक्ष डिझाईनपेक्षा थोडा लहान होता. अमेरिकेने बी 29 जातीचे 'इनोला गे' नावाचे विमान बॉम्ब टाकण्यासाठी वापरले होते. पश्चिम पॅसिफिकमधील तिनियान या अमेरिकी तळावरून या विमानाने इतर दोन विमानांसह उड्डाण केले होते. जपानमधील इच्छित स्थळी पोहचण्यासाठी त्याला तब्बल सहा तास लागले. 'इनोला गे' ठरवलेल्या उंचीवर (10 हजार मीटर) आणि ठरवलेल्या लक्ष्यावर येताच त्यातून 'लिटल बॉय' खाली सोडण्यात आला. स्फोटाच्या पूर्वनियोजित उंचीवर (600 मीटर) पोहोचायला त्याला 57 सेकंद लागले. स्फोट होताच हिरोशिमाच्या इतिहासातील तो काळा दिवस उगवला. 
अणुबॉम्बमधील युरेनियम व प्लुटोनियम यांच्या विघटन क्रियेतून बाहेर पडणारी ऊर्जा अत्यंत भयंकर व प्रचंड असते. आरडीएक्स किंवा टीएनटी पेक्षा हजारो पटींनी ही ऊर्जा जास्त असते. ऊर्जेबरोबर बाहेर पडणारे किरणोत्सारी किरणे हे जास्त संहारक व खूप वेळ टिकणारे असतात. 'लिटल बॉय' मध्ये 50 किलो युरेनियम-235 हे मूलद्रव्य भरलेले होते. साधारण एक किलो वजनाच्या युरेनियम-235 च्या विघटनाने निर्माण होणारी ऊर्जा ही 16 हजार टन टीएनटी (ट्रायनायट्रो टोल्युईन) विस्फोटाकाच्या ऊर्जेएवढी असते. या ऊर्जेतील50 टक्के ऊर्जा स्फोट स्वरूपात (pressure wave ), 35 टक्के उच्च तापमानाच्या स्वरूपात आणि 15 टक्के ऊर्जा किरणोत्साराच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. स्फोटाच्या केंद्रातील तापमान 10 लाख डिग्री सेल्सिअस इतके असते. स्फोटामुळे प्रचंड वेगाने पसरणारा एक आगीचा लोळ तयार होतो. केवळ एका सेकंदात पसरणारा हा लोळ 200 मीटर एवढी त्रिज्या व्यापतो. या क्षणी या लोळाच्या पृष्ठ भागावरील तापमान 5 हजार डिग्री सेल्सिअस इतकं पोहोचतं. अर्थात स्फोटातील 50 टक्के ऊर्जा 'प्रेशर वेव्ह' या स्वरूपात असल्याने 'प्रचंड विध्वंसक दाब' स्फोट केंद्रातून निर्माण होतो. व या विध्वंसक'दाबलहरी' आपल्या वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट उद्वस्त करतात.
तापमान,विध्वंसक दाब व किरणोत्सर्ग यांच्या मिश्र परिणामाने हिरोशिमाचा अक्षरशः कोळसा झाला. स्फोट केंद्रापासून दोन किलोमीटर त्रिज्येतील सर्व मालमत्ता व मानवी जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. दोन ते तीन किलोमीटर त्रिज्येतील जवळजवळ90 टक्के मालमत्ता नष्ट झाली किंवा त्यांचे प्रचंड नुकसान झाले. किरणोत्सर्गाचे प्रमाण सुरुवातीला प्रचंड होते. ऑगस्ट ते डिसेंबर1945 या कालावधीत अनेक लोक किरणोत्सर्गाने होणाऱ्या रोगाने दगावले. किरणोत्सर्गाची लागण पूर्णपणे नाहीशी व्हायला त्यापुढील चार दशके जावी लागली.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

Saturday, July 25, 2020

(रहस्यकथा) तिथे काही तरी आहे

 ढगांची गर्दी दाटली होती.अधूनमधून विजा चमकत होत्या आणि त्यातून मन चरकायला लावणारा गडगडाट ऐकायला येत होता. रस्त्यावरून दोघेच निघाले होते. बाकी रस्ता निर्मनुष्य होता. चालताना ते सारखं आकाशाकडे पाहत असत आणि मग त्यांचा चालण्याचा वेग वाढत असे. हे दोघे मित्र होते-मोहन आणि रावसाहेब. मोहन जासूस कथा लिहायचा, त्यामुळे त्याला सगळे  गंमतीने 'डिटेक्टिव्ह मोहन' म्हणून बोलवायचे. खरे तर ते जवळच्या शहराकडे निघाले होते. वाटेत त्यांची गाडी खराब झाल्याने त्यांना चालतच जाणं भाग पडलं होतं.

रावसाहेब म्हणाला,"लवकर चल, नाहीतर पाऊस आला की आपलं काही खरं नाही. भिजून जायचो आपण. पुढं आसऱ्याला कुठं झाडही नाही की घरही!"
तो असे म्हणतोय तोच पावसाचे थेंब पडायला लागले. मोहन आता थांबून बाजूच्या मैदानात काहीतरी पाहत होता. काही अंतरावर धूर दिसत होता.
तो म्हणाला,"रावश्या, जरा तो धूर बघ.अशा या मोकळ्या मैदानावर कुणी आग लावली असेल बरं? आजूबाजूला दूरदूरपर्यंत एखादी वस्तीदेखील दिसत नाही."
रावश्याने धुराकडे पाहिलं. बारीकसा धूर आकाशाच्या दिशेने मंदपणे चालला होता. तो म्हणाला,"या आगीची आणि धुराची चिंता सोड आणि आपली काळजी कर. आणि असल्या रिकाम्या जागेत जळणाऱ्या आगीत तुला कसलं रहस्य दिसलं?" रावश्याने त्याचा हात धरून त्याला पुढं ओढण्याचा प्रयत्न केला,पण मोहनची नजर अजूनही त्याच धुरावर खिळली होती.
मोहन म्हणाला,"माझं मन म्हणतंय, या आगीत काहीतरी रहस्य नक्की दडलं आहे. बघ ना ,आजूबाजूला चिटपाखरूही नसताना ही आग लावली कुणी? आणि का लावली? "असे म्हणून तो त्यादिशेने चालू लागला. आता नाइलाजाने रावश्यालाही त्याच्याबरोबर जाणं भाग पडलं. तो बडबडत होता,"अरे,पाऊस पडेल आणि आग आपोआप विझेल.तुला का त्याची पंचेती. "
"अरे,असं नको व्हायला. आग विझण्याअगोदरच आपल्याला तपास केला पाहिजे." काही वेळातच दोघेही त्या आगीजवळ पोहचले. पाऊस वाढत होता. समोर कसलीशी पिशवी जळत होती. पावसामुळे आग विझत चालली होती आणि त्यातून धूर निघत होता.
मोहनने पायाने आग विझवली आणि ती पिशवी घेऊन पाहू लागला. कापडी असलेली पिशवी बऱ्यापैकी जळाली होती. त्याने ती उलटी करणार तोच करणार तोच त्यातून अर्धवट जळालेले कागद खाली पडले. त्याबरोबर आणखीही काही तरी पडल्याचा आवाज झाला. त्यातली अंगठी खाली पडली होती. रावश्याने अंगठी उचलली आणि ती निरखून पाहू लागला. त्यावर 'एन' लिहिले होते.  इकडे मोहन जळालेली कागदं उलटून पालटून पाहात होता. ती कसल्याशा डायरीची पानं होती. पावसामुळे अर्धवट जळलेल्या कागदावरील अक्षरं पुसट झाली होती. अक्षरं व्यवस्थित वाचता येत नव्हती. पिशवीवर 'बीएमसी' असं प्रिंट केलेलं होतं.
मोहन म्हणाला,"पावसामुळे आग विझली असती तर इकडे कुणाचंच लक्ष गेलं नसतं. आता ही 'एन' अक्षराची अंगठी कुणाची आहे? आणि ही कागदं का जाळली गेली? ही अंगठी आणि कागदं जाळण्यामागं काय रहस्य आहे? याचा आपल्याला शोध घ्यावाच लागेल. आपलं लक्ष गेलं नसतं तर याची उत्तरं शोधली गेली नसती."
मोहनने जळालेली कागदं पिशवीत घालून रस्त्याच्या दिशेने निघाला. अंगठी अजूनही रावश्याच्या हातात होती. आता पाऊस थांबला होता. तिकडे बरंच लांब काही वस्त्या दिसत होत्या. छोटं गाव असावं. ते दोघे तिकडे गेले. तिथे त्यांना एक दुकान दिसलं. त्यावर असलेल्या बोर्डावर 'बीएमसी' लिहिलं होतं.
दोघेही त्या दुकानात घुसले. गल्ल्यावर बसलेल्या माणसाने डोळ्यानंच विचारलं,"काय हवं?"
बाजूलाच पिशव्या विक्रीसाठी अडकवलेल्या होत्या.
मोहनने जळालेली बॅग त्याच्यासमोर धरली आणि विचारलं,"ही बॅग तुमच्या दुकानातूनच विकली गेलीय काय? असेल तर कधी विकली गेली आणि कोणाला?"
गल्ल्यावर बसलेला माणूस उठला आणि त्यानं पिशवी पाहिली. "ही तर जळालेली आहे. एका तासापूर्वी एका तरुणाने पिशवी खरीदली होती. बहुतेक ती हीच असावी."
बॅग जळाली असली तरी त्याचे नवेपण अजूनही जागोजागी दिसत होते.
मोहनने उतावीळपणे विचारलं,"त्या तरुणाचं नाव सांगू शकाल? दिसायला कसा होता तो? आणि तो एकटाच होता की आणखी कोण त्याच्यासोबत होते?"
दुकानदार म्हणाला,"त्याचे केस कुरळे होते आणि त्याने दाढी वाढवली होती. त्याने लाल रंगाचा शर्ट घातला होता आणि त्याचे डोळे सुजलेले होते. त्याचा चेहरा रडवेलासा दिसत होता. पण काय झालंय काय,मला तरी सांगा. तो चोर होता का? आणि तुम्ही पोलीस आहात का?"
ऐकून मोहन आणि रावसाहेब दोघेही हसू लागले. मग त्यांनी ही अर्धवट जळालेली पिशवी कुठे सापडली ते सांगितले.
"म्हणजे त्या तरुणाने ही पिशवी जाळायसाठी घेतली होती?" दुकानदाराने प्रश्न केला.
मोहन विचार करत होता,'त्या तरुणाच्या हातात डायरीची पानं असतील. त्याने ती पिशवीत टाकली आणि त्याला आग लावली. पण का जाळली? असं काय होतं या डायरीच्या पानांमध्ये?'
दुकानदार बाहेर आला. त्याने कागदं आपल्या हातात घेतली आणि ती आलटून पालटून पाहिली. पण त्याला त्यात काही विशेष दिसलं नाही. ती काही खास कागदपत्रेही नव्हती.
"आता काय करायचं?" रावसाहेबनं विचारलं आणि त्याने वर आकाशाकडे पाहिलं. आकाश स्वच्छ होतं आणि हलकं ऊन पडलं होतं.
मोहन म्हणाला,"आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी जावं लागेल."
"का?" रावश्याने विचारलं.
"मी या अंगठीचा विचार करतोय. ही या पिशवीत कशी आली? त्याला अंगठी जाळायची नव्हती. ती जळणार तर कशी?कदाचित तो कागदं पिशवीतून काढत असताना त्याच्या हाताच्या बोटातून ती निघून पडली असावी. मला तर असंच वाटतंय. असे असेल तर तो तरुण पुन्हा तिथे नक्की येईल!"
"तो तिथे अंगठी शोधायला येणार का?"
"त्याला अंगठी हरवली असल्याचं लक्षात येईल,तेव्हा तो नक्की येईल. आणि बोटातली अंगठी हरवली आहे, ही गोष्ट फार काळ लपून राहणार नाही. कारण बोटांकडे सारखी नजर जात असते." मोहन म्हणाला आणि पुन्हा वेगाने त्या मैदानाच्या दिशेने निघाला.
"अरे, तो बघ,समोर!"रावसाहेबने मोहनचा हात पकडून समोर नजरेने निर्देश करत म्हणाला.
समोर मैदानात लाल रंगाचा ठळक टिपका दिसला. लाल शर्ट घातलेला तरुण खाली वाकला होता. मोहनचा अंदाज बरोबर होता. दोघेही वेगाने चालत त्या तरुणाजवळ पोहचले. त्या दोघांना पाहून लाल शर्टाचा तरुण चपापला.
मोहनने विचारले,"काय शोधतो आहेस?"
"काही...काही नाही!"तरुण म्हणाला.
"तुझं नाव 'एन'ने सुरू होतं का?" मोहनने विचारलं.
तरुण म्हणाला,"हो, माझं नाव नामदेव आहे.पण तुम्हाला कसं माहीत?"
"आम्हाला हे नाव अंगठीमुळे समजलं." मोहन म्हणाला आणि त्याला अंगठी दाखवली.
"अरे, ही तर माझी अंगठी आहे.मी याच्याच शोधात इकडे आलो होतो." असे म्हणून त्या तरुणाने अंगठी घेण्यासाठी हात पुढे केला.
"आम्हाला काय माहीत की, ही अंगठी कुणाची आहे? पण एक मात्र आम्हाला ठाऊक आहे की, तू तिथल्या वस्तीवरल्या दुकानातून एक पिशवी खरेदी केलीस होतीस आणि त्यात डायरीची पाने घालून ती इथे जाळलीस." मोहन पुढे म्हणाला की,''आम्ही ही घटना पोलिसांना सांगायला चाललो आहोत. पोलिसच सांगतील की, ही अंगठी नेमकी कुणाची आहे."
"प्लिज, पोलिसांकडे जाऊ नका. तुम्हाला अंगठी द्यायची नसेल तर नका देऊ. पण मला पोलीसांच्या चक्करमध्ये पडायचं नाही. पण मी ते सगळं सांगेन,जे कुणाला सांगायचं नव्हतं."
मोहन म्हणाला,"हे बघ नामदेव, जे काही असेल ते खरं खरं सांग. नाहीतर पोलीस...! सांग, ही सगळी काय भानगड आहे?"
त्या तरुणाचा आवाज घोगरा झाला. सांगू लागला, "काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. मी आमच्या घराची साफसफाई करत असताना त्यांची डायरी सापडली. त्यांनी लिहिलं होतं की, ते चंदन तस्करीचं काम करत होते. मग माझ्या लक्षात आले की, एक छोटीशी नोकरी करत असताना त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात. मला याबाबतीत कुणालाच काही सांगायचं नव्हतं. पण मला खूप वाईट वाटत होतं.मग मी विचार केला की, ही डायरीच आपण नष्ट करावी. मी दुकानदाराकडून पिशवी विकत घेतली आणि इथे लांब येऊन त्या डायरीतील ती पानं फाडली आणि या पिशवीत घालून आग लावली.मी विचार केला होता की, आता ही गोष्ट कुणालाच कळणार नाही,पण..." आणि बोलता बोलता त्याच्या डोळ्यांत पाणी आले आणि तो हमसून हमसून रडू लागला.
मोहन त्याच्याजवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला,"तुझ्या वडिलांनी जे केलं ते चुकीचं आहे. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची बदनामी होऊ नये, तू जे केलंस, ते योग्यच आहे. खरेच, आम्ही कुणाला काही सांगणार नाही." मोहनने त्याची अंगठी त्याला परत केली.
दोघेही तिथून निघाले. काही अंतर गेल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले. मैदानात तिथे हलकासा धूर दिसत होता. बहुतेक नामदेवने डायरीची ती पानं पुन्हा जाळली असावीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


Friday, July 24, 2020

मुलीच हुशार कशा?

नुकताच बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे यात मुलीच आघाडीवर दिसल्या. त्यामुळे दरवर्षी लोकांना एकच प्रश्न पडतो. मुलीच हुशार कशा? त्यांच्यावर पुरुषप्रधान संस्कृतीची इतकी बंधनं असताना मुली खुशाल मुलांना मागे टाकून पुढे जाताहेत. ककरिअर क्षेत्रातही असेच घडत आहे. मात्र थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, पुरुषप्रधान संस्कृती मुलींना फायद्याची आणि मुलांना घातक ठरली आहे. निदान आता तरी मुलांनी सावध व्हायला हवे आणि मुलींची परीक्षांमधली यशाची परंपरा खंडित करायला हवी. खरं तर  जीवशास्त्रीयदृष्ट्या ,शारीरिकदृष्ट्या मुलामुलींमध्ये फरक असला तरी बौद्धिक दृष्टीने मुलगा आणि मुलगी सारखेच असतात. तरीही आज निकालांमध्ये परीक्षांमध्ये आघाडीवर असताना दिसत आहेत. पारंपारिक सामाजिक दबावामुळे मुलींमध्ये चिकाटी आणि परिश्रम करण्याची वृत्ती जास्त असते,तर मुले मोकाट सुटल्यामुळे चंचल असतात.श्रम घेण्याची त्यांची तयारी नसते. मुलींना संधी मिळताच त्या त्याचे सोने करतात. मुलांना वर्षानुवर्षे संधी मिळत आहे, मात्र त्याचे सोने करण्यात मुले मागे पडताना दिसतात. मुलींची पूर्वापार जडणघडण आणि मुलांची पूर्वापार जडणघडण इथे महत्त्वाची आहे. 

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांवर खूप काळ अन्याय झाला.त्यांच्यातील गुणांना शतकानुशतके वाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने विकसित झाले नाही. पुरुषप्रधानतेमुळे पुरुषांना जे अवास्तव स्वातंत्र्य मिळाले,त्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले. नंतर मात्र स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे पुरुषांच्या या कमतरता उघड झाल्या.
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केल्यानेच माणसातले सुप्त गुण उघड होतात.त्यामुळेच बऱ्याचदा दरिद्री, अनाथ, संकटग्रस्त वा अभावग्रस्त मुले ही सर्व तऱ्हेची अनुकूलता लाभलेल्या लक्ष्मीपुत्रांपेक्षा जास्त यश कमावतात. काहीतरी मिळवण्याचे ध्येय त्यांच्यासमोर असते. हीच गोष्ट आजवर दडपल्या गेलेल्या महिलांबाबतीतही घडते आहे. त्यांना आपली गुणवत्ता टिकवून ठेवणे गरजेचे असते,तरच आपले शिक्षण पुढे चालू राहते,याची त्यांना जाणीव असते. याउलट मुलांना मोकळे वातावरण, स्वातंत्र्य, शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच त्यांच्यापुढे कमी आव्हान असतात. यामुळे त्यांच्यात जिद्द,प्रेरणा राहत नाही.
आणखी एक कारण म्हणजे मुलींना 'सातच्या आत घरात' चे बंधन पूर्वीपासूनच होते. तसेच दिवसाही त्यांनी उगीचच गप्पाटप्पा, फिरणे वगैरे गोष्टीत अनावश्यक वेळ काढू नये, अशी अपेक्षा नव्हे तशी सक्तीच होती. अर्थातच त्यामुळे मुलींना घरातला वेळ विधायक कामांसाठी देता येई. याउलट मुलांना उशिरापर्यंत खुशाल बाहेर राहण्याची मुभा असल्याने उनाडपणा व व्यसनात ती सहजी सापडू शकतात. त्यांच्या संगतीबाबत पालकांना तेवढे जागरूक राहावेसे वाटत नाही.
पूर्वी स्त्रिया घरात बंदिस्त होत्या तरी त्यांना दिवसभर भरपूर गृहकामे असत. स्वयंपाक, मुलांचा सांभाळ, दळण-कांडण, घरातील वृद्धांची सेवा, पै-पाहुणे यांचा पाहुणचार हे पूर्वापार संस्कार स्त्रीला स्वस्थ बसू देत नाहीत. यासाठी अपार मेहनत आणि चिकाटी लागते. याउलट मुलांना शिक्षणाची संधी मिळाली तरी दैनंदिन व्यवहाराचे जीवनशिक्षण त्यांना मिळाले नाही. घरातील अति महत्त्वामुळे आपण कसेही वागलो तरी चालेल, आपले तेच बरोबर, अशी वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली. अनिर्बंध वर्तणुकीचे संस्कार या पुरुषप्रधानतेमुळे झाले.
शिवाय व्यवस्थापनात मुलीच मुलांपेक्षा अधिक सरस ठरतात. आज मोठमोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीची जागा मुलींनी पटकावल्या आहेत आणि त्या कंपन्या सुव्यवस्थित चालवताना दिसतात. यावरूनच मुलींचे व्यवस्थापन कौशल्य लक्षात येते.
एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील ज्येष्ठांशी वागताना वापरण्याचे कौशल्य, पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना पाळावयाचा शिष्टाचार, स्वयंपाक करताना वापरावी लागणारी कल्पकता, प्रयोगशीलता, कृतीशीलता, कौशल्य, काटकसर, नियोजन, घरखर्च भागवताना पैशांची बचत आणि आर्थिक नियोजन ,घरातील विविध कामे एकाचवेळी पार करताना करावे लागणारे वेळेचे नियोजन, तत्परता अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये आपसूकच व्यवस्थापन कौशल्य विकसित होत जाते. या संस्कारांमुळे स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व घरी असूनही एकांगी झाले नाही. यामुळे मानसशास्त्रीय तत्त्वानुसार, संधी मिळताच 'ट्रान्स्फर ऑफ ट्रेनिंग' होऊ शकते. उलट, पुरुषवर्ग अशा प्रशिक्षणापासून वंचित राहिला. त्यांचा फावला वेळ अनुत्पादक गोष्टीत जातो. कलाकौशल्याची आवड निर्माण होत नाही. ती जोपासली जात नाही. बेफिकीर वृत्ती वाढीला लागते.
संधी मिळताच स्त्रियांना या जीवनशिक्षणाचा उपयोग ,कलागुणांचे संस्कार शिक्षणातही कामी येतात. त्यामुळे परीक्षा तसेच वेगवेगळ्या प्रांतांत स्त्रिया आघाडीवर राहू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. शिवाय त्यांना संधीही दिल्या जात आहेत. आणि त्याचा पुरेपूर लाभ त्या घेत आहेत.
मात्र आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्या तरी पुरुष संस्कृतीच्या अन्याय, अत्याचाराचा फटका त्यांना बसतच आहे. स्त्रियांची होत असलेली सरशी या पुरुषांना खटकत आहे. ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या घातक आहे. पुरुषांनी स्त्रियांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या सोबतीने वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व घडवायला हवे. दोघांचेही व्यक्तिमत्त्व सर्वांगीण, परिपूर्ण झाले तरच खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


Thursday, July 23, 2020

(बालकथा) हुशार पाहुणे

एक शिंपी होता.मोठा लोभी. त्याची बायकोही काही कमी लोभी नव्हती. त्यांच्या घरी एकादा पाहुणा आला तर त्यांना वाटायचं, मोठं संकटच आलं. एकदा त्यांच्या घरी दोन पाहुणे आले. शिंप्याला चिंता पडली की, यांना आता कसं पिटाळायचं.

शिंपी आतल्या घरात गेला आणि बायकोला म्हणाला,"ऐक, मी तुला शिव्या दिल्या की, तूही मला शिव्या द्यायच्या. मी तुला काठीने मारायला धावलो की, तू पिठाचे मडके घेऊन बाहेर पळायचं. मी तुझ्या मागोमाग धावत येईन. पाहुणे समजतील की, यांच्यात भाडणं लागली आहेत.आणि मग ते माघारी निघून जातील."

काही वेळानंतर शिंपी दुकानात बसल्या बसल्या बायकोला शिव्या देऊ लागला. त्याला उत्तर म्हणून त्याची बायकोही त्याला शिव्या देऊ लागली. शेवटी शिंप्याने काठी घेतली आणि उठून बायकोच्या अंगावर धावून गेला. बायकोने रागाने पिठाचे मडके उचलेले आणि घराबाहेर पळाली. तिच्या मागोमाग शिंपीही काठी घेऊन धावला.
पाहुणे विचार करू लागले. त्यातला एकजण म्हणाला,"बहुतेक हा शिंपी मोठा  लोभी आहे. त्याची पाहुणचार करण्याची इच्छा नाही,त्यामुळेच त्याने हे नाटक चालवलं आहे. पण आपण याला असा सोडायचा नाही.चल, आपण वरच्या माडीवर जाऊन झोपून जाऊ" पाहुणे वर जाऊन झोपले.
पाहुणे गेले असतील म्हणून शिंपी आणि त्याची बायको दोघेही हळूच घरात आले. पाहुणे घरात नव्हते,त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. म्हणाला,"बरं झालं,ब्याद गेली. "मग दोघेही एकमेकांचे कौतुक करू लागले.
शिंपी म्हणाला,"मी किती हुशार, काठी घेऊन लगेच धावलो." यावर त्याची बायको म्हणाली,"मी पण काही कमी नाही, लगोलग मडकं घेतलं आणि बाहेर पळाले."
पाहुणे वर झोपूनच त्यांचे सगळे बोलणे ऐकले होते. त्यातला एकजण म्हणाला,"आणि आम्हीही किती हुशार!वर येऊन आपलं निवांत झोपलो."
ऐकून दोघेही चरकले. त्यांनी त्यांना खाली बोलावलं. चांगला पाहुणचार केला आणि मग निरोप दिला. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012


Wednesday, July 22, 2020

अनवट वाटा

पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे उद्दिष्ट नीट समजावून सांगायला हवे. शिक्षणाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात,औपचारिक शिक्षण हे ज्ञानप्राप्तीचं एक साधन आहे. त्यामुळे मुलांना ज्या विषयात गोडी आहे,ते विषय शिकण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करायला हवे. मुलांना काय आवडतं, त्याची क्षमता किती,याचा विचार पालकांच्या मनात यायला हवा. काही पालक मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगतात. त्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण तो मुलगा मधेच शिक्षण सोडून घरी येतो किंवा भरकटला जातो,तेव्हा पालकांचे डोळे उघडतात. आपण त्याच्यावर लादलं याची जाणीव होते. काहींना तर तीही होत नाही,कारण त्यांनी मुलाला समाजावूनच घेतलेलं नसतं. सगळे खापर मुलावर टाकून मोकळे होतात. इथे मुलं सुधारत नाहीत, बिघडतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या बाबतीत सगळं डोळसपणे पाहायला हवं.

भविष्याची चिंता


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे साडेतीन महिने सामान्य शेतकरी, मजूर, उद्योजक, नोकरदार या सर्वांचेच अपरिमित नुकसान झाले आहे. अजूनही सर्वच व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही लाईनीवर आलेली नाही. उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. शाळा-महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता दिसून येत नाही. शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती दाटली आहे. सर्वात भीतीदायक म्हणजे बेरोजगारी वाढ झाल्याने सगळ्यांनाच भविष्याची चिंता सतावत आहे. 

Monday, July 20, 2020

उद्योजकतेतून अधिक रोजगार निर्मिती शक्य

अर्थव्यवस्थेची सर्वाधिक जरुरी रोजगार निर्माण करणे ही असून आमच्यात अनेक कला आहेत, त्या कलांना प्रोत्साहन देणे, त्या विकसित करणे आवश्यक आहे. यातुनच रोजगार निर्मिती होऊ शकेल. परिवर्तन हा व्यक्तीचा स्वभाव आहे. नावीन्य हे तंत्रज्ञान अद्ययावत करण्यास प्रवृत्त करते. नवीन तंत्रज्ञान शोधण्यात आम्ही लोक पुढे आहोत. त्यांना प्रोत्साहन देणे, बाजारात खेळते भांडवल निर्माण करणे गरजेचे असून एमएसएमई, बँक, एनबीएफसी या क्षेत्रात परकीय गुंतवणूक आणली गेली पाहिजे. देशातील सर्वच क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान आणून परकीय गुंतवणूक आणल्यास अर्थव्यवस्था मजबूत होईल. यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणे, आयात कमी करून निर्यात वाढविणे, समाजातील शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा मिळणे, जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी या देशात निर्माण होणे हीच आत्मनिर्भरता असून यामुळेच देश सुपर इकॉनॉमिक पॉवर होऊ शकेल.

अभ्यासातील स्वावलंबन


पुष्कळ वेळा मुलामुलींना अभ्यास का करायचा, हा मोठा प्रश्न पडतो. परीक्षेच्या आदल्या रात्री किंवा दिवसभर अभ्यास करून मार्कस मिळतात, मग नियमित अभ्यास कशासाठी? पाठयपुस्तक पुन्हा पुन्हा वाचण्याचा कंटाळा येतो. स्वभाव असेल किंवा शिक्षकांच्या निरस शिकवण्यामुळे असेल एकादा विषय नावडता होतो. त्यामुळे त्याचा अभ्यास होतच नाही. अभ्यास विषय आणि दैनंदिन व्यवहार यांची सांगड घालता न आल्याने  अभ्यास का करायचा हेच कळत नाही. त्यामुळे पालकांनी अभ्यासाची आवड आपल्या पाल्यांमध्ये कशी निर्माण होईल,याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना फक्त पाठ्यपुस्तकात अडकवून ठेवू नये. पालकांनीही पाठ्यपुस्तके वाचली पाहिजेत आणि संबंधित कोणत्या घटकांबाबतीत मुलांना अधिक माहिती देता येईल,हे पाहिले पाहिजे.

Saturday, July 18, 2020

(लघुकथा) बाबांची लाडकी


मानसी घरातली कामं पटापट आवरत होती. तिला आज चष्म्याच्या दुकानात जाऊन बाबांचा चष्मा घ्यायचा होता आणि तो घेऊन बाबांकडे जायचं होतं.तिचं सासर- माहेर काही लांब नव्हतं. एकाच शहरात होतं. आई गेल्यापासून तिला वाटलं की, घरातली कामं पटापट संपवून बाबांकडे जाऊन यायची. त्यांना हवं -नको ते पाहायची. ती बाबांकडे निघाली की हमखास सासूचे टोमणे ऐकायला मिळायचे. "निघाली बघा बाबाची लाडकी!" तिथे गेल्यावर भाऊ म्हणायचा,"आली बघा बाबाची लाडकी." मानसी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. तिच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, आईला दिलेलं वाचन! आईनं तिच्याकडून ती गेल्यावर बाबांची काळजी घेण्याचं वचन घेतलं होतं. तिच्या येण्या-जाण्यानं तिच्या भावजयला कसला त्रास नव्हता.

Friday, July 17, 2020

ऑनलाईन शिक्षण : अगोदर सुविधा तर द्या


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील शाळा,महाविद्यालये बंद आहेत. यंदाचे शैक्षणिक सत्र महिनाभर लांबले आहे. कोरोना रोगाचा वाढता प्रार्दुभाव पाहता अजून किती महिने शाळा-महाविद्यालये सुरू होणार नाहीत, याची काहीच गॅरंटी सांगता येत नाही. देशातील विविध सरकारे ऑनलाईन शिक्षण द्यायला उतावीळ झाली आहेत. शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे,असे समजून विविध माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा घाट घातला जात आहे. रेडिओ-टीव्हीच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी खासगी वाहिन्यांवर काही तास आरक्षित करण्यात आले आहेत. 20 जुलै या तारखेपासून त्याद्वारे शिक्षण प्रक्रिया सुरू होणार आहे. 
याशिवाय झूम, गुगल क्लासरूमच्या माध्यमातूनही शिक्षण प्रक्रिया सुरू केली जात आहे. महत्त्वाचे या माध्यमातून विद्यार्थ्यांची ई-हजेरी घेण्याचा घाट घातला जात आहे.

Wednesday, July 15, 2020

(रहस्य कथा) चोर...चोर


आज वातावरण खूप मस्त होतं. सलग तीन-चार दिवस बरसणारा पाऊस आज थांबला होता. चांगलं ऊन पडलं होतं. सुजय त्याचा मित्र आकाशबरोबर गप्पा मारत बाजारातून चालला होता. आजूबाजूला लोकांची जा-येची वर्दळ चालू होती. तेवढ्यात त्यांच्याजवळून एक महिला घाईगडबडीने पुढे गेली. तिच्या हातात एक छोटेखानी लाल रंगाची पर्स होती. अचानक तिच्या हातातली पर्स गळून खाली पडली. 
सुजयने ते पाहिलं. त्याने धावत जाऊन ती पर्स उचलली आणि त्या महिलेच्या हातात सोपवली. महिला त्याच्याकडे पाहून हसली आणि धन्यवाद म्हणत पुढे निघून गेली. दोघेही मित्र तिच्याकडेच पाहात राहिले. त्यांनी बघितलं की, ती महिला टी स्टॉलच्या बाकड्यावर जाऊन बसली आहे.

Tuesday, July 14, 2020

(लघुकथा) खरी नाती


सरिता तिची मैत्रीण -रिनाला घेऊन घरी आली. तिला भेटल्यावर सरिताची आई म्हणाली,"छान झालं आलीस ते! बसा हं, तुम्हां दोघींसाठी काही तरी खायला करते. दिवसभर शाळेत थकला असाल." 
तेवढ्यात कलावतीचे लक्ष दारात उभी असलेल्या कारकडे गेलं. कार महागडी होती. तेव्हा सरिता म्हणाली,"आई, रिना याच गाडीतून शाळेला येते."
कलावतीचं काळीज चरकलं. पुन्हा श्रीमंत माणसं! तिने श्रीमंत माणसांची गरीब माणसांशी वागणूक  अनुभवली होती. पण तिच्यासाठी दोन्ही मुली समान होत्या. तिने कधी भेदभाव केला नाही. ती त्यांना खायला बनवण्यात व्यग्र झाली.
सारिताच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या जागी तिला ऑफिसात शिपाईची नोकरी मिळाली होती.

(लघुकथा) बदल

'युज अँड थ्रो प्लास्टिक' वस्तूंचा वापर करू नका, या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत होता. जाणकार मंडळी अशा प्लास्टिक वस्तूंवर बहिष्कार टाकत होती. सकाळी फिरायला जाणारे वाघमारे आजोबा आणि त्यांचे जोडीदार मित्रांनीदेखील आज एक निर्णय घेतला होता. पंचायत समितीसमोरच्या ए-वन टी स्टॉलवाल्या रमेशला आपण प्लास्टिक कपातून चहा पिणार नाही, हे त्याला सांगणार होते.
फक्त वाघमारे आजोबांनीच नाही तर सांगली रोडला पहाटे फिरायला येणाऱ्या सर्वांनाच तसे वाटत होते. फिरून आल्यावर वाघमारे आजोबा रमेशला म्हणाले,
"गड्या रमेश, आता आम्ही फक्त कपबशी नाहीतर काचेच्या ग्लासातच चहा पिणार बरं!"  टपरीवर जमलेल्या सगळ्यांनीही त्याला हेच सांगितलं. रमेशनं ऐकून घेतलं. तो काहीच बोलला नाही.

(लघुकथा) सरडा


आमच्या शेजारच्या पांढरेंच्या मुलीच्या लग्नाला आलेल्या त्यांच्या एका पाहुण्याला निरोप देण्यासाठी कॉलनीतले आम्ही आठ-दहाजण गेटवर उभारलो होतो. ते एकेक करत सगळ्यांशी आत्मीयतेने बोलत होते. तिकडून माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र सुभाष स्कुटरवरून निघाला होता. थांबून त्यानं कुतूहलानं विचारलं,"कोण आहेत रे हे? मोठी असामी दिसते."
"हो, आमदार आहेत ते!" मी म्हणालो.
"अरे यार, मग ओळख करून दे ना, चल! एखाद-दुसरं कंत्राट मिळायला कामी येतील. कुठले आमदार आहेत म्हणालास?" सुभाष
"कवठेमहांकाळचे माजी आमदार आहेत." मी
"म्हणजे माजी आहेत तर!" सुभाषचा आवाज नरम पडला.
"स्वभावानं फार चांगले आहेत ते. चल भेटू!"
सुभाषच्या चेहऱ्याचे भाव बदलले.

(लघुकथा) गरिबीच्या नावावर...


शहरातल्या एका प्रसिद्ध स्वयंभू बाबाला गरीब आणि निराश्रित लोकांना भोजन देण्याची इच्छा जागृत झाली.त्याने लगेच आपल्या श्रीमंत अनुयायांना निरोप पाठवला,जेणेकरून या पुण्य कार्यासाठी धन गोळा होऊ शकेल. दान देण्यासाठी झुंबड उडाली. गरिबांच्या नावावर दानपेट्या पैशाने खचाखच भरल्या. ठरलेल्या दिवशी बाबांच्या आग्रहावरून लोकांनी सहकुटुंब, मित्रमंडळी यांच्या साथीने भोजनाचा मनमुराद आनंद लुटला. तिकडे गेटवर उपाशी पोटी भिकारी आणि गरीब लोक भोजनाची आस घेऊन ताटकळत उभे राहिले. सायंकाळ होत आली तरी भोजन मिळण्याची कुठलीच चिन्हे दिसेनात तेव्हा ते रिकाम्यापोटीच माघारी परतले.

(लघुकथा) निर्णय


"आई,मला नाही जायचंय मेडिकल लाईनला,का बरं बाबा सारखं सारखं म्हणतात की, पुण्याला जायची तयार कर म्हणून.मला तिकडे इंटरेस्ट नाही." रोहित तिच्या आईला शोभाला म्हणाला.
"ठीक आहे, बाबा! तू काळजी करू नकोस, मी बोलेन तुझ्या बाबांशी."
"मला माहित आहे ,बाबा ऐकणार नाहीत. परंतु, मला टेक्निकल लाईनला जायचं आहे. मला डॉक्टर व्हायचं नाही." असं म्हणत त्यानं आईच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं.
रात्री जेव्हा प्रतापराव जेवण करून टीव्हीसमोर बसले,तेव्हा शोभा म्हणाली,"मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे."
"बोल, काय बोलायचंय तुला?" प्रतापराव टिव्हीकडे पाहतच म्हणाले.

Sunday, July 12, 2020

(बालकथा) दामाजीपंतांचा नोकर

खूप वर्षांपूर्वी एकदा महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. मंगळवेढा प्रांताची जबाबदारी दामाजीपंतांकडे होती. ते आणि त्यांच्या पत्नी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते दीन-दुबळ्यांची सेवा करीत.
दुष्काळ पडल्याने लोक अन्नाला महाग झाले होते. भुकेने काही लोकांनी दम तोडला होता. परंतु इकडे गोदामे धान्यांनी भरलेली होती. दामाजीपंतांना पाहवलं नाही,त्यांनी आदेश दिला,"गोदामाचे टाळे खोला, गरजूंना धान्य वाटा.कुणीही उपाशी राहता कामा नये."

Saturday, July 11, 2020

सांगलीच्या साहित्य चळवळीचा होतोय गौरव


जत तालुक्यातील निगडी बुद्रुक गावचे सुपुत्र असलेले आणि युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेले 'फेसाटी' आत्मकथनाचे लेखक नवनाथ गोरे यांची आत्मकथा आता मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात असणारे विद्यार्थी अभ्यासणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांची आत्मकथा बी. ए. च्या अभ्यासक्रमासाठी निवडली आहे. अत्यंत उपेक्षित असे जीवन वाट्याला आलेल्या नवनाथ यांनी महाविद्यालयीनपूर्व जीवन आपल्या आत्मकथेत रेखाटले आहे. मात्र दुर्दैव असे की, आजही त्यांचा जगण्याचा संघर्ष संपलेला नाही. वयाच्या तिसाव्या वर्षीदेखील त्यांना पोटासाठी झगडावे लागत आहे. दुसरीकडे त्यांच्या आयुष्याचा अभ्यास कॉलेजचे युवक करणारा आहेत. शेवटी संघर्ष हा कुणालाच चुकला नाही. असे असले तरी त्यांची साहित्य विश्वात मात्र आवर्जून दखल घेतली जात आहे.

Thursday, July 9, 2020

लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आवश्यक


दहा हजार वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर काही थोडकीच माणसं होती. तिथून ते अठराव्या शतकापर्यंत ही संख्या 100 कोटी झाली.पण 1920 पर्यंत हाच आकडा 200 कोटी म्हणजे 2 अब्ज झाला.पृथ्वीवर लोकसंख्या वाढण्याचा हा महत्त्वपूर्ण कालखंड मानला जातो. आज जगाची लोकसंख्या सात अब्ज पार झाली आहे. 2050 पर्यंत हा आकडा 10 अब्जपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.संयुक्त राष्ट्रच्या मतानुसार 1990 ते 2010 या कालावधीत लोकसंख्या तीस टक्क्याने वाढली आहे. यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती, भारत आणि चीनने! या कालावधीत भारतात 35 कोटी आणि चीनमध्ये 20 कोटी लोकसंख्या वाढली.

Tuesday, July 7, 2020

( बालकथा) प्रगाढ विश्वास

महायुद्ध होणार हे निश्चित झाल्यावर दुर्योधन आणि अर्जुन दोघेही श्रीकृष्णाकडे मदत मागायला आले. झोपलेल्या श्रीकृष्णाच्या उशाशी पहिल्यांदा आलेला दुर्योधन बसला. नंतर आलेला अर्जुन पायापाशी बसला. जागे होताच श्रीकृष्णाचे लक्ष पहिल्यांदा पायाशी बसलेल्या अर्जुनाकडे गेले. श्रीकृष्ण म्हणाला," अर्जुना,कधी आलास? आणि काय काम काढलंस?"

कोसळणाऱ्या विजा आणि मनुष्यहानी


उन्हाळ्यातल्या वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसादरम्यान किंवा पावसाळ्यात पडणाऱ्या विजेच्या घटना तशा सामान्य आहेत. कुठे ना कुठे वीज पडून जीवितहानी अथवा वित्तहानी होत असते. मात्र अलीकडच्या काळात या घटना वाढत असल्याने चिंता वाढली आहे.  25 जून रोजी बिहार राज्यात एकाच दिवशी वीज पडून 120 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशामध्ये 24 जणांचा बळी गेला. पुन्हा परवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला बिहारमध्ये एकाच दिवशी आणखी 20 जणांचा वीज पडून मृत्यू झाला. हवामान खात्याने अशा 12 राज्यांची यादी प्रसिध्द केली आहे, ज्या राज्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटना अधिक घडतात. यात पहिल्या क्रमांकाला मध्य प्रदेश आहे. त्यानंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार,पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि ओरिसा राज्यांचा क्रमांक लागतो.

Monday, July 6, 2020

शिक्षण सेवकांची कैफियत,'सांगा, कसं जगायचं?'


रोज रोजंदारीवर जाणारा अल्पशिक्षित आणि अल्पकुशल मजूर दिवसाला 500 रुपये पगार पाडतो. घरं बांधणारा गवंडी कामात कुशलता आल्यानं रोज 1000 रुपये कमावतो. म्हणजे गवंडयाच्या हाताखालचा आणि रस्त्याच्या कामाला पाट्या उचलायला जाणारा मजूर रोज पाचशे रुपये कमावतो आणि डीएड शिकलेला, गुणवत्तेवर नोकरीला लागलेला शिक्षण सेवक मात्र रोज 200 रुपये कमावतो. आता हा मेळ कसा आणि कुठे घालायचा? याचा अर्थ एकच निघतो,तो म्हणजे शिकून सवरून काही उपयोग नाही. शिकून कोणी मोठं होत नाही. अलीकडे नोकऱ्या नसल्याने अनेक तरुणांना हा प्रश्न नक्कीच  पडला आहे. सरकारी नोकर भरती प्रक्रिया ठप्प झाली आहे.

एसटी वाचली पाहिजे


एसटी राज्याची जीवनदायिनी आहे. गोरगरिबांची वाली आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाणारी ही एकमेव एसटी आज आचके तोडत आहे. अलीकडच्या काही वर्षांपासून तिला सारखा आर्थिक मदतीचा डोस द्यावा लागत होता, त्यामुळे एसटी आज ना उद्या मरणार, असे म्हटले जाऊ लागले होते. तिला असे किती दिवस डोस देऊन जगावायचे, असाही युक्तिवाद केला जात होता. अर्थात या एसटीचे लचके तोडणारे आपल्याच सरकारात आहेत. प्रवाशांना जवळपास 26 सवलती देताना तिच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले. सरकारचा सतत अंकुश राहिल्याने एसटीला उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र निर्णय घ्यायला मोकळीक नाही. त्यामुळे मोडकळीस आलेल्या गाड्यांसह एसटी बिच्चारी जमेल तसं धावत राहिली.

Sunday, July 5, 2020

पालकांनी सावध राहिले पाहिजे


पबजीच्या वेडापायी पंजाबमधील एका मुलाने आपल्या बापाचे तब्बल १६ लाख रुपये उडवल्याचे समोर आले. या घटनेने बापाला मोठा झटका आणि फटका बसला आहे. विशेष म्हणजे हे पैसे बापाने त्याच्याच भविष्यासाठी आणि आपल्या वडिलांच्या दवाखान्यासाठी राखून ठेवले होते. पण मुलाने हे पैसे सहज उडवून टाकले. हे पैसे उडवत असताना तो यातले काहीच आपल्या बापाला कळू नये, याची वेळोवेळी खबरदारी घेत होता. त्यामुळे वडील अंधारात राहिले. बँकेने स्टेटमेंट पाठवले तेव्हा कुठे त्यांना आपल्या मुलाचा प्रताप लक्षात आला. गेल्या काही वर्षांपासून 'पबजी' या खेळाचे वेड देशातील अनेक तरुण पिढीला लागले आहे. यामुळे अनेक तरुणांचे मानसिक स्वास्थ्य या खेळापायी बिघडल्याच्या बातम्याही आपल्याला सातत्याने वाचायला मिळत आहेत.

Saturday, July 4, 2020

जालिहाळ बुद्रुक व्यसनमुक्तीच्या दिशेने...


दारू माणसाचा संसार उदवस्त करते.  दारूत बुडालेला माणूस माणसात राहण्याच्या लायकीचा राहत नाही. याचाच अर्थ दारू माणसाला माणसांतून उठवते. अशी कित्येक माणसं रस्त्यावर पडून, कुठं गटारीत पडून मेली आहेत. दारूसाठी त्रास देतो म्हणून त्याच्याच घरच्या लोकांनी त्याचा जीव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणजेच दारू ती पिणाऱ्याला तर सोडत नाहीच,पण त्याच्या घरच्या लोकांनाही देशोधडीला लावल्याशिवाय राहत नाही. काही लोकांनी मनाला लगाम लावून किंवा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल स्वतःला करून दारूपासून सुटकाही करून घेतली आहे. खरे तर त्यांचे अभिनंदनच करायला हवे. असं म्हणतात की, माणूस जन्म  एकदाच मिळतो.

Thursday, July 2, 2020

(लघुकथा) ढेकूण

चाळीस वर्षांपूर्वी आम्ही मुंबईत शेजारी शेजारी भाड्याने राहत होतो. त्याला पैसेवाल्यांचा मोठा तिरस्कार होता. दुसऱयांच्या मुंड्या मुरगाळून हे लोक पैसे जमवतात, दुसऱ्याचे शोषण केल्याशिवाय ते श्रीमंत होत नाहीत,असा त्याचा आरोप होता. कधीकधी रागाच्या भरात म्हणायचा," हे साले सगळे ढेकणाच्या औलादीचे आहेत. रक्ताप्रमाणे दुसऱ्याचे शोषण करून मोठे होतात."

(लघुकथा) आदर

बेल वाजली. मी वरून खाली पाहिलं. दारात काका उभे होते. बघता बघता दोन वर्षं उलटली होती. प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात काका हमखास टपकायचे. आले की, आमच्याकडेच राहायचे. त्यांचं रुटीन चेकअप असायचं. याच शहरात त्यांचा मुलगाही राहतो. पण ते तिथे जात नाहीत. मुलाला त्रास होईल ना! माझा चुलत भाऊ माझ्यापेक्षा चौपट पगार घेतो. दोन -दोन कार आहेत त्याच्याकडे. मोटारसायकलीचं म्हणाल तर बाजारात आलेली नवीन गाडी त्याच्या दारापुढे असते. तरीही काकांना त्याच्या गाडीतून जावंसं वाटत नाही. कारची भीती वाटते त्यांना! मी आणि माझी स्कूटर फालतू असल्यासारखे.

महिलांबाबत चिंताजनक वस्तुस्थिती


संयुक्त राष्ट्र संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या 2020 च्या जागतिक लोकसंख्येच्या परिस्थितीच्या आढाव्यातील महिलांचे जे चित्रण केले आहे ते फारच धक्कादायक आणि चिंताजनक आहे. गेल्या 50 पन्नास वर्षात महिलांचे गायब होण्याचे प्रमाण जवळजवळ दुप्पट झाले आहे. दुसरी मोठी चिंताजनक बाब म्हणजे महिलांच्या गायब होण्याच्या प्रमाणात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. काही प्रकरणात घरगुती हिंसा, प्रेमप्रकरण आणि नैराश्य या गोष्टी असल्या तरी बहुतांश महिलांचा अपहरणाचा शेवट देह शोषणाच्या घाणेरड्या व्यवसायातच होतो. एका मोठ्या अंदाजानुसार सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक महिला आणि तरुण मुली या देहविक्रय क्षेत्रात असल्याचे सांगण्यात येते.

(लघुकथा) देवाचं रूप

त्याची आठ वर्षांची मुलगी धानम्मा सायकल खेळताना पडली. तिच्या हाताला खूप लागलं. बरेच दिवस झाले तरी तिच्या हाताचं दुखणं काही कमी होईना. काहींनी शहरातल्या प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. कैलास यांना दाखवण्याचा सल्ला दिला. त्याने डॉ. कैलास यांची भेट मागून घेतली आणि तो मुलीला-धानम्माला घेऊन दवाखान्यात आला.
धानम्माला तपासल्यावर तिच्या हाताचे ऑपरेशन करावे लागेल, असे डॉक्टर म्हणाले. खूप विचार केल्यानंतर त्याने ऑपरेशनचा दिवस विचारला. डॉक्टरांनी त्याला चार दिवसानंतरची तारीख दिली. ऑपरेशनच्या आदल्यादिवशी मुलीला ऍडमिट करायला सांगितलं.

Wednesday, July 1, 2020

(लघुकथा) रिपोर्ट

आठवड्याभरानंतर तो घरी आला. फारच थकलेला दिसत होता. चेहराही पडला होता. त्याची बायको धावतच बाहेर आली.
"या, कसे आहात?"
बाहेरच उभारून त्यानं बायकोला सांगितलं,"कोरोनाची टेस्ट देऊन आलोय. कदाचित पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. खूप भीती वाटतेय."

स्वदेशीचा स्वीकार, चिनीचा बहिष्कार

चीनवर 'डिझिटल स्ट्राइक' करताना केंद्र सरकारने चीनशी संबंधित असलेल्या 59 एपवर बंदी घातली आहे. खरे तर हे फार पूर्वीच व्हायला हवे होते, पण चला ठीक आहे, 'देर आये दुरुस्त आये'. योग्य दिशेने पडलेल्या पावलांचे आपण सर्वांनी याचे स्वागतच करायला हवे आणि तसे संपूर्ण देशभरातून होत आहे. या निर्णयाने 'इंटरनॅशनल मीडिया' देखील आपल्या देशाचे कौतुक करत आहे.अमेरिका,कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपियन देश भारताप्रमाणेच चिनी कंपन्या आणि एपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. तिथल्या जनतेतून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. वास्तविक चीनच्या या हुकूमशाही भूमिकेमुळे संपूर्ण जगच त्रस्त आहे.