Saturday, July 4, 2020

जालिहाळ बुद्रुक व्यसनमुक्तीच्या दिशेने...


दारू माणसाचा संसार उदवस्त करते.  दारूत बुडालेला माणूस माणसात राहण्याच्या लायकीचा राहत नाही. याचाच अर्थ दारू माणसाला माणसांतून उठवते. अशी कित्येक माणसं रस्त्यावर पडून, कुठं गटारीत पडून मेली आहेत. दारूसाठी त्रास देतो म्हणून त्याच्याच घरच्या लोकांनी त्याचा जीव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणजेच दारू ती पिणाऱ्याला तर सोडत नाहीच,पण त्याच्या घरच्या लोकांनाही देशोधडीला लावल्याशिवाय राहत नाही. काही लोकांनी मनाला लगाम लावून किंवा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल स्वतःला करून दारूपासून सुटकाही करून घेतली आहे. खरे तर त्यांचे अभिनंदनच करायला हवे. असं म्हणतात की, माणूस जन्म  एकदाच मिळतो.
त्यामुळे त्या जन्माचे सार्थक करावयाचे झाल्यास निरोगी, निर्व्यसनी जीवन जगत इतरांच्या उपयोगी पडणारं कार्य करावं, असं म्हटलं जातं. माणूस जन्म हा माणसाच्या उपयोगी पडावा, हे आपल्या संत महात्म्यांनी सांगून ठेवलं आहे. माणसाचं नाव मागं राहावं, त्याच्या कार्याचं गुणगान गायलं जावं, असं कार्य झालं पाहिजे. पण म्हणतात ना पाची बोटं सारखी नसतात. तसं सगळीच माणसं देवगुणाची नसतात. यात राक्षस अवगुणाचेही लोक असतात. ही माणसं देवगुणाच्या लोकांना त्रास देत असतात आणि त्यांना लुटत असतात. देव गुणांचे लोक आपापल्या परीने त्यांचा प्रतिकार करत असतात. शेवटी विजय हा देव गुणांच्या माणसांचा होतो, असे म्हणतात. मात्र हा शेवट काहीही होवो, पण माणसाने आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहिल्यास मधे-अधे अशा येणाऱ्या दुर्घटना दुर्लक्ष केल्यास छानपैकी जीवन जगता येते.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. शिवाय पुढे 'खड्डा' आहे, पुढे जाऊ नको, असे सांगूनही जो पुढे जातो, त्याचा सर्वनाश निश्चित आहे. त्याने वेळीच सावध व्हावे. यासाठी भूतकाळात काय घडले. इतिहास काय सांगतो याचा विचार करताना भविष्याचाही वेध घेता आला पाहिजे. कोणती गोष्ट वाईट आणि कोणती चांगली हे कळायला शिक्षण महत्त्वाचं आहे. त्याशिवाय मूल्यांची आपल्याला ओळख होत नाही. ज्याच्या घरात आई-बापाची सकाळ शिव्या-शापाने होत असेल तर त्या घरातल्या लहान मुलांना शिवी चांगली की वाईट कसे कळणार? ते आईबापाचे शिकून शिव्या द्यायला लागतं. हीच तऱ्हा चोरी करणाऱ्या बापाची आणि त्याच्या मुलाची! म्हणजे चांगल्या गोष्टी शिकायला शिक्षण महत्त्वाचं आहे. किंवा चांगल्या गोष्टीसाठी चांगल्यांची संगत असावी लागते. समाजात समाज जागृती करणारे लोक असावे लागतात. त्याशिवाय चांगले-वाईटची संकल्पना आणि त्यांचे फायदे-तोटे कळत नाहीत. हे सगळं समजावून सांगणारा हवा. असे समाजसेवक समाजात असायलाच हवेत.
जत तालुक्यातल्या जालिहाळ बुद्रुक गावात समाजजागृती करण्याचं काम आजच्या पिढीचे तरुणच करत आहेत. ही उन्नत समाजासाठी आशादायी घटना म्हटली पाहिजे. या गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. या मंडळींनी गावातले दारू अड्डे, विषारी शिंदी विक्री अड्डे उदवस्त केले आहेत. गावात जागृती केली आहे. या गावात विषारी ताडी पिऊन 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचे संसार उदवस्त झाले आहेत आणि अनेकजण देशोधडीला लागले आहेत. हे पाहिल्यावरच तरुणांनी गाव व्यसनमुक्त करण्याचा विढा उचलला. तरुण एकत्र आले, त्यांनी गावच्या ग्रामपंचायतीला म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेला विश्वासात घेतले आणि गावात दारूबंदी घडवली. गावात कुणी दारूविक्री केल्यास त्याला 20 हजारांचा दंडही आकारण्याचा निर्णय घेतला आहे. शेखर भोसले, मारुती बिराजदार, महादेव कुंडले, सागर भोसले या तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.त्यांना सरपंच पांडुरंग भोसले, ग्रामपंचायत सदस्य मलकारी पुजारी, सिद्धू बिराजदार, पोलीस पाटील पिंटू पाटील यांची साथ मिळाली आहे. या सगळ्यांचे अभिनंदनच करायला हवे. या गावाचा आदर्श तालुक्यातील अन्य गावांनीही घ्यायला हवा. आपला गाव आदर्श  व्हावा, भावी पिढी चांगली निर्माण व्हावी, याची तळमळ तरुणांमध्ये येणे, ही खरेच चांगली लक्षणे आहेत. तरुण पिढीने राजकारण, व्यसन यात वाहवत जाण्यापेक्षा आपल्या गावासाठी काहीतरी विधायक करण्याचा ध्यास घेतल्यास त्याचे परिणाम चांगलेच दिसतील. जालिहाळ बुद्रुक गावातील तरुणांना यासाठी शुभेच्छा...!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

1 comment:

  1. निर्व्यसनी होवून आध्यात्मिकतेचा अंगवळणी करून योग व्यायाम प्राणायाम पासून समृद्धी कडे वाटचाल करने या काळाचा ग२ज आहे (आपला लेख खूप छान आहे )

    ReplyDelete