एक फार गरीब शेतकरी होता. तो आपल्या पत्नीसोबत एका छोट्याशा गावात राहात होता. त्याला चार मुलं होती- दोन मुली आणि दोन मुलगे. शेतकर्याजवळ एक छोटासा जमिनीचा तुकडा होता. पण जमिनीचा तो तुकडा इतका छोटा होता की, त्यात कुटुंबाला पुरेल इतकं पीक येत नव्हतं. त्यामुळे गरीब शेतकर्याला दुसर्याच्या शेतावर मजुरीही करावी लागे. अशाप्रकारे मजुरीतून मिळणारे पैसे आणि शेतातून मिळणारे धान्य यातून कसे तरी तो आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होता.
शेतकर्याची मोठी मुलगी जशी वयात येऊ लागली, तशी त्याला चिंता सतावू लागली. मुलीला योग्य वर मिळायचा, पण ते खूप ज्यादा हुंडा मागायचे. त्यामुळे तो मन मारून राहायचा.
एक दिवस शेतकर्याची पत्नी म्हणाली, “ काय हो, तुम्हाला दिसत नाही का, मुलगी उपवर झाली ती. तिच्यासाठी मुलगा कधी शोधणार?”
“ मी तर त्याच खटपटीला लागलो आहे, पण आपल्याकडे मुलीचा लग्न करून देण्याइतपत पैसेच नाहीत. मग काय करणार?” त्याने उत्तर दिले.
“ मला माहित आहे, आपल्याकडे पैसा-अडका नाही तो. पण मग तिला अशीच लग्नावाचून ठेवायची का? तिचं लग्न तर केलं पाहिजेच. तिच्या लग्नाचं बघा. त्यासाठी आपल्याला जमीन किंवा घर विकावं लागलं तरी चालेल.” शेतकर्याची पत्नी म्हणाली.
शेतकरी हे ऐकून फार उदास झाला. त्याने जमीन विकली तर तो खाणार काय? आणि जर घर विकलं तर तो राहणार कुठे? त्या रात्री त्याला जेवण गेलं नाही. काही न खाता तसाच अंथरुणावर जाऊन पडला. पण त्याला झोप आली नाही. त्याला मुलीच्या लग्नाचा प्रश्न सतावत राहिला. तो तसाच रात्रभर तळमळत राहिला.
दुसर्यादिवशी शेतकरी घराबाहेर पडणार तोच पत्नी म्हणाली,” काय हो? मी रात्री काय म्हटले ते लक्षात आहे ना? मुलीच्या लग्नाचं मनावर घ्या. त्यासाठी जमीन आणि घर विकावं लागलं तरी चालेल.”
शेतकरी काही न बोलताच घराबाहेर पडला. पत्नीने विचार केला की, पती तिच्या बोलण्याकडे लक्षच देत नाहीए. त्यासाठी ती उठून उंबर्याजवळ आली आणो ओरडून म्हणाली, “ ठीक आहे, तुमची मर्जी. पण एक लक्षात ठेवा, जो पर्यंत मुलीचा विवाह पक्का होत नाही, तोपर्यंत मी अन्न-पाणी ग्रहण करणार नाही.”
शेतकरी यावरही काही बोलला नाही. तो पुढे निघाला. अशा परिस्थितीत त्याला गावातला एकच माणूस मदत करू शकत होता, तो म्हणजे गावातला सावकार. परंतु, त्याला सावकाराकडे जायची इच्छा नव्हती. सावकार ज्याला कुणाला कर्ज द्यायचा, त्याने कर्ज चुकते केले नाही तर तो त्याच्या जमिनीवर किंवा घरावर कब्जा करायचा.
उधार घेण्यासाठी सोन्या-चांदीची दागिने किंवा जनावरे सावकाराजवळ गहाण ठेवावी लागत असत. गावातला प्रत्येक माणूस जाणत होता की एकदा का एखादी वस्तू सावकाराकडे गहाण ठेवली तर ती पुन्हा कधी परत मिळत नाही. सावकार इतका ज्यादा व्याज लावायचा की त्यामुळे कुठलाही गाववासी मूळधन आणि व्याज परत करण्याची उम्मीद ठेवत नसे.
सगळे गाववासी सावकाराचा तिरस्कार करत , पण ज्यावेळेला रुपये-पैशांची गरज पडे, त्यावेळेला त्यांना सावकाराकडेच जावे लागे. दुसरा कोणीही त्यांची गरज भागवू शकत नव्हता.
गरीब शेतकर्याने शेवटी निर्णय घेतला की, सावकाराकडेच जायला हवं. सावकाराच्या घरी गेला. दरवाजा ठोठावून आत गेला.
सावकार गरीब शेतकर्याला पाहून हसला. मग मोठ्या आवाजात म्हणाला, “ ये ये. बस. मोठ्या काळजीत दिसतो आहेस. मी तुझ्या कुठल्या कामाला येऊ शकतो का ते सांग?”
“ होय, शेठजी. आता तुम्हीच आमचे आश्रयदाता.” शेतकरी हात जोडून म्हणाला.
“ बोल, काय काम आहे? तुला तर माहीतच आहे,माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी आयुष्यभर गाववाल्यांची सेवा केली. मीदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करतो आहे.” सावकर म्हणाला.
“ माझी मोठी मुलगी लग्नायोग्य झाली आहे, पण माझ्याकडे तिचे लग्न करण्यासाठी पैसा-अडका नाही. आज पत्नीने निक्षून सांगितलं की, जोपर्यंत मुलीचा विवाह पक्का होत नाही, तोपर्यंत अन्न-पाणी ग्रहण करणार नाही. शेठजी, अशा अडचणीच्या वेळेला तुम्हीच माझ्या उपयोगाला पडाल.” शेतकरी म्हणाला.
सावकार हे ऐकून हसायला लागला. तो म्हणाला, “ अरे एवढंच! अरे बाबा, ही तर क्षुल्लक गोष्ट आहे. तू काही घाबरू नकोस. मी करीन तुला मदत.”
“ शेठजी, आपले फार उपकार होतील.” शेतकरी समाधानाने म्हणाला.
“ अरे, सांगितलं ना! मदत करीन म्हणून. मी तर गावातल्या कित्येक तरुण मुला-मुलींच्या लग्नाला मदत केली आहे. पण तुला एक काम करावं लागेल. तुला काही तरी वस्तू गहाण ठेवावी लागेल. तुला जितके पैसे लागतील, तितके घे. आणि मुलीचे मोठ्या थाटामाटात लग्न कर.” सावकार म्हणाला.
“पण शेठजी, आपल्याला तर ठाऊक आहे, माझ्याजवळ फक्त दोन एकर जमीन. झोपडीवजा घर आणि एक बैलजोडी आहे. जर जमीन गहाण ठेवली तर आम्ही जगायचं कसं? आणि घर गहाण ठेवलं तर राहायचं कुठं? आणि जर बैल दिले तर शेतीवाडी कशी करणार? ’’ शेतकर्याने आपली अडचण सांगितली.
“ तुला तर नियम ठाऊक आहे. रुपये घेण्याअगोदर तुला काही ना काही गहाण ठेवावं लागेल.” सावकार म्हणाला.
सावकाराची पत्नी आत दाराआड बसली होती. ती सगळं काही ऐकत होती. शेतकरी उत्तरादाखल काही बोलणार तोच, तिने आपल्या नवर्याला आत बोलावून घेतले. आणि म्हणाली, “अहो, तुम्हाला काही डोक्याचा वापर करता येतो की नाही?”
“ का? काय झालं?” सावकारने विचारलं.
“ का काय? इकडे कान द्या. आपल्याकडे जमीन-जुमला आहे.घरदार आहे. त्याची निगा राखणं अवघड जातं आहे. आता आपल्याला काही जमीन नको की घर! आपल्याला तर असा चाकर हवा, जो पैशाशिवाय काम करू शकेल.” सावकाराची पत्नी त्याला समजावत म्हणाली.
“ तर मग सांग. अशा चाकराचा शोध कुठं घेऊ?” सावकाराने विचारले.
“ शोध काय घेत बसताय. तो शेतकरी आलाय ना! त्याला दोन मुलं आहेत. त्याला पैसे हवे आहेत. त्यातल्या एका मुलाला घ्या ना ठेवून! जो पर्यंत शेतकरी व्याजासह पैसे चुकते करत नाही, तोपर्यंत त्याचा मुलगा आपल्याकडे गहाण राहील. आपल्यालाही स्वस्तात एक चाकर मिळून जाईल.” सावकाराची पत्नी म्हणाली.
सावकार परत बैठकीच्या खोलीत येत शेतकर्याला म्हणाला,” आजचा दिवस तुझ्यासाठी चांगला फायदेशीर आहे. आत बसलेल्या शेठानीला तुझी दु:खद कहानी ऐकून रडूच कोसळलं. तिने मला आत बोलावलं. तिचं म्हणणं असं की, आपल्याला गावातल्या प्रत्येक उपवर मुलीला आपली मुलगी मानली पाहिजे. त्यासाठी आपण जमीन-जुमला, झोपडी, बैलं गहाण ठेवून घ्यायची नाहीत. त्यांना तसंच कर्ज देऊ.”
शेतकर्याचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. तो म्हणाला,“ शेठजी, आपण तर मला मोठं जीवनदान दिलंत. मी तुम्हाला वचन देतो, आपले पैसे मी व्याजासह चुकते करीन.”
“ अरे, हो हो. मला ठाऊक आहे. पण तरीही तुला काही ना काही तरी रुपयांच्या बदल्यात गहाण ठेवावं लागेल.”
शेतकर्याला काहीच उमजेना. तो म्हणाला, “ शेठजी, माझ्याजवळ जमिनीच्या तुकड्याशिवाय आणि घर - बैलजोडीशिवाय दुसरं काहीच नाही. दैवानं सोन्या-चांदीचं दर्शनही कधी करू दिलं नाही. तुम्हीच सांगा, मी आणखी काय ठेवू शकतो आपल्याजवळ?”
“ माझ्या पत्नीने यावर एक उपाय सांगितला आहे. तू तुझ्या मोठ्या मुलाला माझ्याकडे ठेव. तो आमच्यासोबत राहील. त्याच्या खाण्या-पिण्याची आणि कपड्यालत्त्याचीही सगळी सोय करू. राहायला जागा देऊ. तुझ्यावरचं ओझंही कमी होईल. ज्यादिवशी तू व्याजासह पैसे परत करशील, त्यादिवशी तू आपल्या मुलाला परत घेऊन जाऊ शकतोस.” सावकाराने समजावलं.
शेतकर्याचं आपल्या सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम होतं. त्यामुळे आपल्या मुलाला सावकाराजवळ गहाण ठेवण्याच्या विचारानं त्याचं मन हडबडून गेलं. पण त्याच्याजवळ दुसरा कुठला पर्याय नव्हता.
गरीब शेतकरी घरी आला. त्याने आपल्या पत्नीला मुलीच्या लग्नाला पैसे मिळण्यासाठीचा पर्याय सांगितला. त्याच्या पत्नीला गलबलून आलं. पण त्याशिवाय आणखी कोणता मार्ग नव्हताच. शेवटी ती या गोष्टीला तयार झाली.
मग शेतकरी आपल्या मोठ्या मुलाला सोबत घेऊन सावकाराच्या घरी आला. तिथे सावकाराने रुपये देण्याअगोदर शेतकर्याच्या अंगठ्याचा ठसा एका कागदावर उठवून घेतला.शेतकर्याने मोठ्या मुलाला सावकाराकडे सोडलं आणि मुलीच्या लग्नासाठी खुपसे रुपये घेऊन घरी आला. या पैशांच्या मदतीने त्याने योग्य अशा मुलाशी त्याच्या मुलीचा विवाह लावून दिला.
सावकाराच्या घरी शेतकर्याच्या मुलाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोठे कष्ट उपसावे लागायचे. चुलीसाठी लाकडं फोडणं, जनावरांना चारा घालणं, त्यांना बाहेर चरायला नेणं, गोठा-घर यांची साफसफाई करणं अशी सगळी कामं त्याला करावी लागायची. जेवायला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी दोन पातळ चपात्या आणि थोडी चटणी मिळायची.
मुलाला कपड्याची आवश्यकता असायची, त्यावेळेला सावकार त्याला आपले फाटके, जीर्ण झालेले कपडे घालायला द्यायचा.
काही दिवसांतच मुलाची तब्येत उतरली. मरतुकड्यासारखा दिसू लागला. त्याची हाडं दिसू लागली. अशक्तपणा आल्यानं त्याला पहिल्यासारखे कामही करता ये ईना. मग सावकार आणि त्याची पत्नी त्याला आळशी म्हणून हिणवत आणि मारझोड करीत.
गरीब शेतकरी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाची ही अवस्था पाहून दु:खी राहू लागले. ते सावकाराला विनंती करायचे, “मुलावर दया करा. त्याला इतके मारू नका.”
“ तो आळशी आहे. कुठलं काम वेळेवर करत नाही. मग त्याला शिक्षा तर मिळणारच.” सावकार म्हणायचा.
“ नाही नाही शेठजी, तो चांगला मुलगा आहे. मेहनती आहे. तो फार अशक्त झाला आहे. त्याला थोडं अधिक जेवण द्या. त्याची तब्येत सुधारेल. मग तो चांगली मेहनत करेल.” शेतकरी म्हणायचा.
सावकार ओरडून म्हणायचा, “ तू मला काय समजतोस? मूर्ख? मी मुलाची किंमत तुला आदीच चुकती केली आहे. आणि तो जितकं खातो, तितकं कामदेखील करत नाही. मग त्याला का देऊ जादा अन्न?’’
“पण शेठजी, आपल्या घरचं शिळंपाकं खाऊनही मुलगा ठणठणीत होता. मग आता...? ” शेतकरी फिरून म्हणायचा.
“ तुला जर त्याची इतकीच फिकीर असेल तर माझे पैसे टाक आणि घेऊन जा तुझ्या पोराला. तोपर्यंत माझ्याशी बोलूदेखीलनकोस. समजलास?” एक लक्षात ठेव, तू मुलगा देताना कागदावर अंगठा उठवला आहेस.” सावकार अर्थपूर्ण ढंगात म्हणायचा.
हे ऐकून गरीब शेतकरी गप्प मान खाली घालून निघून यायचा. या निर्दयी माणसाच्या हातून मुलाची सुटका कशी करायची आणि त्यासाठी इतके पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न त्याला पडायचा.
एक दिवस शेतकर्याच्या मुलाच्या सहनशक्तीचा अंत झाला. तो सावकाराच्या घरातून पळाला ते तो थेट राजाच्या दरबारात पोहचला. राजासमोर उभा राहिला आणि आपली दु:खद कहानी राजाला ऐकवू लागला.
राजा फार दयाळू आणि बुद्धिमान होता. मुलाची सगळी कहानी ऐकल्यावर त्याने सिपायांकरवी सावकाराला दरबारात बोलावून घेतले.
सावकार दरबारात हजर झाला आणि म्हणाला, “ महाराज, या मुलाने आपल्याला अर्धवट कहानी सांगितली आहे.याच्या वडिलाने व्याजाने घेतलेल्या रुपयांच्या बदल्यात याला माझ्याकडे गहाण ठेवले आहे. कायद्यानुसार जोपर्यंत माझे पैसे चुकते होत नाहीत, तोपर्यंत या मुलाला माझ्याकडे ठेवण्याचा मला अधिकार आहे.”
सावकाराने शेतकर्याच्या अङठ्याचा ठसा असलेला तो कागद राजाला दाखवला. राजाने तो कागद वाचला आणि म्हणाला, “ बरोबर शेठजी,तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण कागदावर लिहिलं आहे की, तुम्ही मुला खाण्यासाठी अन्न देणार. तुम्ही त्याला अन्न देत होतात का?”
“ हो, महाराज!” सावकार म्हणाला.
“ तुम्ही रोज मुलाला किती भोजन देत होतात?’’ राजाने विचारलं.
“ दोन-दोन चपत्या आणि चटणी. सकाळी, दुपारी आणि रात्री, तीन वेळ.” सावकाराने उत्तर दिलं.
सावकाराकडे पाहात राजा हसला आणि म्हणाला, “ मस्तच! आजपासून तुम्ही माझे अतिथी आहात.”
सावकाराला वाटलं की राजा त्याच्यावर खूश आहे. त्याला महालातल्या अतिथीगृाहाच्या एका खोलीत राहायला दिलं. तिथे तो राहू लागला. राजाने शेतकर्याच्या मुलालाही आपला अतिथी बनवलं.
शेतकर्याच्या मुलाला रोज स्वादिष्ट आणि पौष्टिक भोजन मिळत होतं. पण सावकाराला रोज सकाळी दुपारी आणि रात्री तिन्ही वेळेला दोन दोन चपाती आणि थोडी चटणी मिळत होती.
काही दिवसांतच शेतकर्याच्या मुलाची तब्येत सुधारली. तो पहिल्यासारखा धष्टपुष्ट बनला. मेहनतीला तयार झाला. पण इकडे सावकाराची तब्येत उतरली. तो हडकुळा दिसू लागला. त्याचे कपडे त्याला ढिले पडू लागले. एक दिवस तो इतका अशक्त बनला की, त्याला चालता- बोलताही येईना.
ज्यावेळेला सावकार हे सगळे सहन करू शकेना, त्यावेळेला त्याने राजाचे जाऊन पाय धरले आणि म्हणाला, “ महाराज! मला क्षमा करा. आता मला कळलंय की मी किती चुकीने आणि निर्दयीपणे वागत होतो ते. जर आपण मला क्षमा केलीत तर मी सगळे अंगठे उठवलेले कागद जाळून टाकीन. ज्यांनी माझ्याकडून रुपये घेतले आहेत, ते सगळे लोक स्वतंत्र होतील.”
बुद्धिमान राजाने सावकाराला माफ केलं. सावकाराने व्याजाने रुपये देताना गरीब लोकांचे अंगठे उठवून घेतले होते, ते सगळे कागद आणले आणि ते सगळे कागद राजा व मंत्र्यांसमक्ष जाळून टाकले.
सगळे कागद जळाल्यावर राजा म्हणाला,“ यामुळे फक्त एका गावाचा प्रश्न सुटला आहे. अशी अजून किती तरी गावं असतील...”
“ होय महाराज!” मंत्री म्हणाले.
“ आणि शेतकर्याच्या मुलाला जो त्रास झाला , त्याला कारण आहे हुंडा. या मुलाच्या बहिणीच्या लग्नात हुंडा द्यावा लागला, म्हणून याला सावकाराकडे चाकरी करावी लागली. बरोबर ना?” राजानं विचारलं.
“ आपण म्हणता ते बरोबर आहे, महाराज. “ तिथे उपस्थित असलेले सगळ्यांनी सहमती दर्शवली.
“तर मग ठीक आहे. आजपासून जोकोणी हुंडा घेईल, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाईल.” राजाने घोषणा केली.
“ ... मंत्रीमहोदय, तशी दवंडी राज्यभर पिटवा.”
शेतकर्याचा मुलगा आपल्या आईवडिलांकडे परतला. सोबत त्याला राजाने पुष्कळ भेटवस्तू दिल्या. गावातले सगळे लोक सावकाराच्या तावडीतून सुटका झाल्याने आनंदी होते.सावकारालादेखील समजून चुकलं की, सगळ्यांशी व्यवहारानं वागलं पाहिजे. आणि आता राज्यातल्या कुठल्याही गावात कोणत्याही बापाला मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागत नाही. (बुंदेली लोकथेवर आधारित)