Monday, June 25, 2012

सायकल : अनेक दुखण्यांवरचे औषधपेट्रोलचे

  दर वाढल्याने प्रवासही महागला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम अन्य जीवनाश्यक घटकांवरही झाला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था चिंतेत असल्याचे सांगितल्यानंतर कॉर्पोरेट जगतासह सामान्यजनांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असे असले तरी ऊर्जा संकट देशाच्या दळणवळण व्यवस्थेसाठी घातकच म्हणायला हवे. देशात लागणारे 80 टक्के इंधन आपण आयात करत असतो आणि त्यासाठी जबर किंमत मोजतो. त्यातच रुपयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेले अवमूल्यन यामुळे आणखी गंगाजळी आपल्या इंधनासाठी मोकळी करावी लागत आहे. याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणारच आहे. सत्ताधारी आणि विरोधक या जागतिक मंदीच्या काळात सामोपचाराने वागत आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचे सोडून त्याचे राजकारण करीत बसले आहेत, ही दुर्दैवाची बाब असली आणि सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या यूपीए सरकारातील उघडकीस आलेल्या भयंकर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे हे सरकारही आपली विश्वासार्हता गमावून बसले आहे. त्यामुळे सामान्यजनांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. सामान्यजनांना यावर तोडगा काढताना स्वत:वरच आवर घालावा लागणार आहे. सतत दोन चाकी, चार चाकी वाहनांवर स्वार असणार्‍या मध्यमवर्गीय मंडळींनी स्वत:च्या मनाला आवर घालून काटकसरीचे पर्याय अवलंबायला हवेत. सायकलचा वापर या सर्वावर एक चांगला उपयोग आहे. सायकलच्या वापराने इंधन बचत तर होतेच, पण अनेक दुखण्यावरचे औषधही आहे. बैलगाडीपाठोपाठ सर्वात प्रथम वाहन स्वरूपात रस्त्यावर धावू लागलेल्या सायकलीचा वापर 1885 मध्ये पूर्ण बदलासह होऊ लागला. आता त्यात बराच बदल झाला असला तरी त्याचा मूळचा ढाचा बदललेला नाही. पुढे तिला मोटार जोडूनच मोटारसायकलची निर्मिती झाली. याच मोटारसायकलने पुढे सायकलला मागे टाकले आणि सायकल मागे पडली ती पडलीच. ही सायकल केवळ इंधन बचत करत नाही, तर आपल्या अनेक व्याधींवरचे 'रामबाण' औषधही आहे. व्यायामाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केल्यास त्याचे लाभ लक्षणीय आहेत. इक्झर सायकलवर बंद जिममध्ये दोन-दोन तास घाम गाळून नंतर एसी गाडीतून घरी जाण्यापेक्षा रोज कार्यालयात सायकलवरून गेल्यास आरोग्य, इंधन बचत, प्रदूषणापासून मुक्तता असे अनेक हेतू एकाच वेळी साध्य होतील.

प्रदूषणाचा प्रश्न अलीकडच्या काही वर्षात चांगलाच उग्र बनला आहे. वाहनातून बाहेर पडणार्‍या धुरांमुळे ग्लोबल वॉर्मिगमध्ये प्रचंड भर पडत आहे. त्यामुळे सायकल अनेक प्रश्नांचे उत्तर असू शकते. शिवाय मोठय़ा महानगरांपासून छोटय़ा नगरांपर्यंत वाहतूक कोंडीसारखी समस्या सतावत आहे. त्यावरही अनायसे नियंत्रण येईल. प्रदूषणामुळे दमा, अस्थमा, हृदयरोग अशा अनेक रोगांनी जे मानवी शरीरांवर आक्रमण केले आहे, त्यावर नियंत्रण येईलच, पण सायकल चालवल्याने हाता-पायांसह संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम होईल. शरीरांतर्गातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहील. त्यामुळे आजार, दुखणी पळ काढतील. व्यायामामुळे मनही ताजेतवाने राहील. क्रयशक्ती वाढेल. देशातल्या रस्त्यांवर सायकलींचा वावर कमी व्हायला अन्य वाहनधारकांचाही वाटा आहे. हे नाकारून चालणार नाही. रस्त्यावर सायकलधारकांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. दुचाकीस्वार, बसचालक अथवा अन्य चार चाकी चालक यांच्याद्वारे नेहमीच सायकलस्वारांना कमी लेखले जाते. युरोप-जपानसारख्या देशांमध्ये सायकलस्वारांसाठी वेगळी 'लेन' (रस्ता) असते. अर्थातच तिथे सायकलीच्या वापरासाठी अनुकूलता असल्याने सायकलचा वापर वाढत आहे. नव्या मॉडेलमुळे कॉलेजवयीन युवकांमध्ये, शाळकरी मुलांमध्ये त्याची क्रेझ वाढत आहे, तर काही पर्यावरणवादी लोक सायकलचा हटकून वापर करू लागले आहे. 10-20 किलोमीटरचे अंतर काहीजण सहज सायकलीवरून करत आहेत, ही आशादायी बाब म्हटली पाहिजे. भारतीयांमध्ये ईर्षा ही वाढत असलेली विकृती क्लेशकारक आहे. शेजार्‍याने मोटारसायकल घेतली म्हणून आपणही घ्यायची. मग भलेही कर्ज का काढायचे होईना; पण दारात गाडी आणणार. ही ईर्षा घात करते. कारण त्यामुळे इंधनासाठी घाटा आलाच. हा घाटा एकवेळ खड्डय़ात नेल्याशिवाय राहत नाही. शिवाय सायकल वापरणे म्हणजे कमीपणाचे समजले जाते. त्यामुळे सायकलकडे काणाडोळा केला जातो; पण एक लक्षात ठेवायला हवे, चांगल्या ध्येयाने प्रेरित झालेली माणसे दुसरा काय म्हणतो, याचा विचार करत नाहीत, म्हणूनच ती मोठी होतात.

punyanagari 25/6/2012

Sunday, June 24, 2012

देशातल्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक

देशातले आत्महत्येचे आकडे भविष्यातले भयावह चित्र अधोरेखित करत आहेत. २०१० मध्ये भारतात एकूण १ लाख ८७ हजार लोकांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल     'लान्सेट' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या सर्व्हेक्षण रिपोर्टनुसार दक्षिण भारतातली चार राज्य आत्महत्येच्या बाबतीत आघाडीवर आहेत. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ ही ती राज्ये असून महाराष्ट्राचा क्रमांक यानंतर लागतो. महाराष्ट्रात २०१० मध्ये १९ हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या तामिळनाडूत झाल्या आहेत, तो आकडा आहे, २८ हजाराचा.
     आत्महत्या करणार्‍यांमध्ये महिलांची संख्या चिंता वाटावी अशीच आहे. प्रसृती दरम्यान जीव गमावणार्‍या महिलांच्या संख्येत घट आली आहे, मात्र आत्महत्येचा आकडा वाढतो आहे. २०१० मध्ये १५ ते २९ वयोगटातल्या महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण  सर्वाधिक आहे. हा आकडा एकूण महिला आत्महत्येच्या ५६ टक्के आहे. आणखी एक विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे शिकल्या-सवरलेल्या महिलांमध्येच ही प्रवृती अधिक असल्याचे दिसते. युवा पुरुष वर्गाचे आत्महत्या करण्याचे प्रमाणही बरेच आहे. एकूण पुरुषांच्या सम्ख्येत युवा वर्गाची संख्या ४० टक्के आहे. आत्महत्या करणार्‍या पुरुषांचे सरासरी वय ३४ तर महिलांचे २५ आहे. देशातले हे आत्महत्येचे प्रमाण एडसला बळी पडणार्‍या संख्येच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे.
     आणखी एक चक्रावून टाकणारी बाब म्हणजे विकसित देशांच्या तुलनेत भारतात युवा वर्गात विशेषतः युवतींमध्ये आत्महत्येचे प्रमाण ४ ते ६ पटीने जास्त आहे. या सगळ्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की देशातल्या आत्महत्या रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कोणतीही रणनीती आखण्यात आलेली नाही. किंवा या आत्महत्या गांभिर्याने घेतल्या गेल्या नाहीत. संख्येच्या पातळीवर विचार केला  तर     १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वर्गामध्ये केल्या जाणार्‍या आत्महत्यांमध्ये आंध्रप्रदेश आघाडीवर आहे. आत्महत्येचे मुख्य कारण सामाजिक आहे, त्यापाठोपाठ आर्थिक परिस्थिती, ताणतणाव, व्यसन ही कारणेही कारणीभूत  आहे. आत्महत्या करणारे जीवन संपवण्यासाठी विषारी कीटकनाशकाचा सर्वाधिक वापर करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कीटकनाशके सहज उपलब्ध होत असल्याने व मरण यातना फारशा होत नसल्याने त्याचा अधिक वापर केला जात असावा. त्यामुळे कीटकनाशके सहज उपलब्ध होण्यावर प्रतिबंध घालण्याचा विचार व्हायला हवा. सहा महिलांमधील एक महिला मृत्यूला कवटाळण्यासाठी पेटवून घेण्याचा पर्याय निवडत असल्याचेही यानिमित्ताने आढलून आले आहे.
     मागे आणखी एक आंतरराष्ट्रीय सर्व्हे प्रकाशित झाला होता, त्यात भारताल्या महिलांवर होणारे अन्याय-अत्याचार सौदी अरेबियासारख्या देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे म्हटले होते. सर्व्हेक्षणात जगातल्या १९ विकसित आणि विकसनशील देशांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि हिंसा यांसारख्या विषयांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला होता. यात भारत, मेक्सिको, इंडोनेशिया, ब्राझिल, सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये महिलांची आवस्था विचित्र असल्याचे म्हटले आहे.  महिलांवर अन्याय-अत्याचार, छळ, यौवन शोषण, सामाजिक भेदभाव यासारख्या त्याज आणि निंदनीय घटनांवर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दिसून येतो. समाजात स्त्रियांची उपेक्षा आणि संवेदनहिनताही दिसून येते. काही प्रकरणाम्मध्ये महिलांना होणार्‍या हिंसेला समाजमान्यता मिळाली आहे. एका सरकारी अभ्यासानुसार ५१ टक्के पुरुष आणि ५४ टक्के महिलांनी पत्नीला मारहाण करण्याच्या कृत्याला योग्यतेचे प्रमाणपत्र दिले आहे.
     आजचा समाज अजूनही महिलेला स्वातंत्र्य द्यायला तयार नाही.त्यामुळे निम्म्या लोकसंख्येची उपेक्षा करून कुठलाही देश, समाज प्रगती करू शकत नाही. महिला सक्षमीकरण आणि आरक्षण याबाबतीत आपण अजूनही बोटचेपे धोरण अवलंबत आहोत. देशातल्या महिलांची परिस्थिती सुधारत नसेल तर याला समाजाबरोबरच आमची व्यवस्थाही तितकीच कारणीभूत आहे. ही व्यवस्था बदल्याची आवश्यकता आहे.  आवश्यक त्या सामाजिक आणि कायदेशीर सुधारणा स्वीकारण्याबाबतीत हयगय करून चालणार नाही. त्याची तातडीने अंमलबजावणी व्हायला हवी.            

Saturday, June 23, 2012

बालकथा समजूतदार

        एक होता यश. मम्मी-पप्पांचा लाडका. क्लासमध्ये नेहमीच फर्स्ट. सगळेच म्हणत, यश मोठा स्मार्ट आहे. पण अलिकडे त्याला एक वाईट खोड लागली होती. मम्मीबरोबर मार्केटला जायचा ना तेव्हा, एखाद्या गोष्टीवर हटकून हट्टाला बसायचा. उडणारे विमान दिसले की, घे म्हणून दंगायोट करायचा. आइस्क्रीम पाहिलं की जाग्यावर नाचायला लागायचा. मम्मीकडून 'नाहीशब्द आला की, याची आदळापट सुरू ...  कधी कधी रस्त्यावरच आडवा पडायचा. पाय खुडायचा. शेवटी वैतागून मम्मी तो मागेल ती वस्तू घेऊन द्यायची नंतर  मम्मी फार समजावून सांगायची, कधी रागवायची. असा हट्ट बरा नव्हे म्हणायची. मग त्याला मम्मीचा राग यायचा. म्हणायचा,' सगळी मुलं हट्ट धरतात. त्यांची मम्मी त्यांना रागावत नाही. राजू, दिनू, बानू, मिनी सगळे ममी-पप्पांकडे हट्ट धरतात आणि ते  त्यांच्या पसंदीच्या वस्तू खरेदी करतात. ते त्यांना रागावत नाहीत. तू मात्र रागावतेस!'
     एक दिवस मम्मी रागाने म्हणाली, " यश, तू दिवसेंदिवस बिघडत चाललायस. बाकींच्या पोरांचं मला माहित नाही. पण तू ही सवय सुधार! तुझे पप्पा आणि मी तुझ्यासाठी किती खेळणी घेतो, खायच्या चिजा घेतो. पण तरीही तू पुन्हा पुन्हा नव्या वस्तूंसाठी हट्ट धरतोस. ही वाईट सवय आहे. यापुढं काहीएक मागायचं नाही. गप्प होमवर्क करीत बस जा." असे म्हणून मम्मी किचनमध्ये निघून गेली.
     काही दिवसांनंतरची गोष्ट! यशच्या मित्राला-राजूला त्याच्या पप्पाने सायकल घेऊन दिली. यश बागेत खेळायला गेला तेव्हा राजूने मोठ्या ऐटीत आपली सायकल त्याला दाखवली आणि म्हणाला," बघ, माझ्या पप्पांनी माझ्यासाठी किती छान सायकल आणलीय. दुकानात गेल्यावर मी हीच सायकल पाहिजे असा हट्ट धरला. मग काय! मम्मी -पप्पांनी घेतली सायकल विकत." यशलाही खूप वाटलं, खरंच! पप्पांनी माझ्यासाठीसुद्धा सायकल विकत घेऊन दिली असती तर मीसुद्धा पार्कमध्ये सायकल आणून खेळलो असतो.
     संध्याकाली पप्पा ऑफिसमधून घरी आल्या आल्या यश त्यांना सामोरे गेला आणि त्यांच्या पायांना हातांनी वेटोळे घातले. पप्पांनी त्याला उचलून घेतलं. मग पुढ्यात बसवून घेऊन टीव्ही पाहू लागले. यश पप्पांना म्हणाला," पप्पा, मला सयाकल घेऊन द्या ना! राजूच्या मम्मी-पप्पांनी त्याला नवीन सायकल घेऊन दिलीय. मलाही नवीन सायकल पाहिजे."
     तेवढ्यात मम्मी रागावत म्हणाली," यश, तुला कितीदा सांगितलं, हट्ट करायचा नाही म्हणून.. दुसर्‍याशी बरोबरी ती काय करायची?  " यश पप्पांच्या पुढ्यातून उठला आणि रडायला लागला. " मला सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे. माझ्यावर तुमचं प्रेमच नाही, नाही तर असं वागला नसता." असे म्हनून तो रड्त रड्त बाहेर निघून गेला.
पप्पा मम्मीला म्हणाले," कशाला रागावलीस त्याला. घेऊन देऊ सायकल."
हा दिवसेंदिवस मुलखाचा हट्टी बनत चाललाय. त्याचा आपण प्रत्येक हट्ट  पूर्ण करू शकत नाही आहोत. पाहताय ना पैशाशिवाय कसे हाल चालले आहेत ते! ..."
"पण हरकत नाही, मला कपडे घ्यायला ठेवलेले पैसे आहेत. त्यातून आणि आणखी काही तरी उलाढाल करून घेऊ सायकल."
मम्मी हळूच म्हणाली," अहो पण, तुमच्या कंपनीची अनिवर्सरी आहे ना या मंथ एंडला. समारंभाला जुनेच कपडे घालून जाणार का?''
"असू दे गं, त्याचा आनंद म्हणजे आपला आनंद. कपडे काय नंतरही घेता येतील. आणि जुने कपडे घालून गेल्यावर काय फरक पडणार आहे?"
     यश दाराआडून मम्मी-पप्पांचे बोलणे लपून ऐकत होता. त्याला खूप वाईट वाटले. पटकन त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याला वाटले होते, रडून , गोंधळ घालून सायकल मिळवता येईल. पण आपल्यासाठी मम्मी-पप्पांना त्यांच्या गरजांवर  मुरड घालावी लागत आहे, हे  कळल्यावर त्याला फार दु:ख झाले.
     आता यशला पश्चाताप झाला. त्याची त्यालाच लाज वाटू लागली. 'मी किती मूर्ख! मम्मी-पप्पा माझ्यावर किती प्रेम करतात. मी मात्र दुसर्‍यांचे पाहून उगाचच हट्ट धरून त्यांना त्रास देतो.' तो धावतच त्यांच्याजवळ गेला," सॉरी मम्मी-पप्पा! आता मी कधीच हट्ट धरणार नाही मला सायकल नको. " असे म्हणून यश पप्पांना मिठी मारून रडू लागला. मम्मी-पप्पांनी त्याला गप्प बसवले  आणि म्हणाले," "आज आमचा यश समजूतदार बनला."           

Monday, June 11, 2012

हसत जगवे ८

भेदभाव का?
आत्माराम 'वर' पोहचले. त्यांना स्वर्गातल्या एका तात्पुरत्या कक्षेत ठेवण्यात आले. त्यांच्यासोबत आणखीही काही लोक होते. त्यांना स्वर्गात ठेवायचं की नरकात याचा फैसला दोन-चार महिन्यांनी होणार होता. इथे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री फक्त बिस्किटं आणि चहा दिला जायचा. पण कितीही खा आणि प्या. दोन दिवसांनी त्या कक्षाचा प्रभारी दूत आला, तेव्हा आत्माराम त्याला म्हणाले," मी खिडकीतून रोज पाहतोय, तिकडे त्या नरकवासियांना तीनवेळा मस्तपैकी भरपेट जेवण दिलं जातंय आणि आम्हाला मात्र चहा-बिस्किट? आमच्याशी असा भेदभाव का?"
दूत उत्तरादाखल म्हणाला," त्यांची संख्या लाखात आहे, आणि तुम्ही फक्त सहा-सात! आम्ही विचार केला की इतक्या कमी लोकांसाठी दाम आणि श्रम का वाया घालवायचे?'                   
     घाणेरडा फिक्चर
ते आपल्या मुलावर रागावत होते," तुला लाज नाही वाटत, घाणेरडा   फिक्चर बघतोस ते."
मुलगा म्हणाला," नाही पप्पा, मी गेलो नव्हतो, फिक्चरला. तुम्ही दुसर्‍याच कुणाला तरी पाहिला असाल."
"गप्प बस गाढवा, मला शहाणपणा शिकवू नकोस. मी तुझ्या मागच्याच सीटवर बसलो होतो. मी या.. या डोळ्यांनी पाहिलं तुला घाणेरडा फिक्चर पाहताना. "                                                
    मीच तो जादूगर
एक व्यक्ती गावातल्या एकमेव अशा दुकानात गेला. "तुमच्या दुकानात जे काही सडलेली फळं, टोमॅटो, अंडी आहेत, ते सगळे पॅक करून द्या. पैशाची काही काळजी करू नका."
दुकानदार त्याला अपादमस्तक न्याहाळत म्हणाला," आलं लक्षात! आज संध्याकाळी जादूगरचा प्रोग्रॅम आहे ना गावात. कार्यक्रम चांगला झाला नाही तर त्याची चांगलीच खबर घेण्याचा डाव दिसतोय तुमचा. पण साहेब, मी यापूर्वी तुम्हाला या गावात कधी पाहिलं नाही."
तो म्हणाला," मीच तो जादूगर."                                                        
                                                                           नरक
त्यानं आपल्या मित्राला विचारलं,"  मैत्रिणीखातर तू सिगरेट, दारू आणि मांस-मच्छी सारं काही सोडलंस ना, मग तिच्याशी लग्न का करत नाहीस?"
मित्र म्हणाला," मी खूप विचार केला, मोठ्या मुश्किलीने जिंदगी सुधारली आहे, आता पुन्हा नरकात पडून काय फायदा?"                                                                                   
लग्न
 "माझे बाबा म्हणत, बेटा, आपल्या जिंदगानीत असं एकादं काम करावं, जे आपल्या खानदानीत कुणी केलं नसेल."
"मग तू काय केलंस?"
" मी लग्न केलं."                                                                          
गोळी घालीन
एका अफगाणी सैनिकाला त्याच्या एका अधिकार्‍यानं प्रश्न केला," समज, एखाद्या तालिबान्यानं तुला पकडलं आणि म्हणाला की तुझी बायको माझ्या ताब्यात दे नाही तर बंदूक दे, तेव्हा तू काय करशील?'
"माझी बायको देईन."
अधिकार्‍याला झटकाच बसला. म्हणाला," पण का?''
तो म्हणाला," माझ्या बायकोला घेऊन चालला की त्याला गोळी घालून ठार करीन."  
उपवास
लग्नानंतरच्या काही दिवसानंतर एके सकाळी ती नवर्‍याला म्हणाली," संध्याकाळी येताना एक किलो सफरचंद, एक किलो द्राक्षे, अर्धाडझन केळी, एक किलो संत्री आणि एक नारळ घेऊन या."
त्यानं विचारलं," का काही खास बेत?"
ती म्हणाली," उद्या माझा उपवास आहे."                                                     
डोकं
तो म्हणाला," तू नेहमी म्हणतेस ना की पुरुषांना डोकंच नसतं. हे बघ, पेपरात काय लिहलंय- पुरुषमंडळींचं डोकं स्त्रियांपेक्षा अधिक चालतं."
बायको म्हणली," तुम्ही अजूनसुद्धा तुमचं डोकं चालवत नाही आहात. पेपरमधलं वाचून बोलता आहात."                ..                                                                                                         

घराणेशाहीचा मुद्दा आता नाही, पण बनायला हवा

     मुलायमसिंह यादव यांची स्नुषा आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव हिने एक इतिहासच रचला आहे. तिने १९५२ ते आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या खासदारांपैकी ४४ वी खासदार असल्याचा मान पटकावला आहे.  आपल्या देशाने बर्‍याच वर्षांनंतर अशाप्रकारची निवडणूक पाहिली, ज्यात विरोधकांनी सहभाग घेतला नाही आणि आपला उमेदवार उभा केला नाही. असं काय कारण होतं म्हणून उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात मोठमोठया पक्षांनी कनौज लोकसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आणि डिंपलच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर केला? इतका सन्मान देण्याइतपत तिचं काय राजकीय कर्तृत्व मोठं आहे ? डिंपल मुलायमसिंह यांची स्नुषा नसती तर ती अन्य गृहणीसारखी कुटुंब आणि मुलाबाळांच्या उसाभरीत गढून गेली असती. समाजवादी पार्टीतच अशा किती तरी महिला कार्यकर्त्या आहेत की त्या डिंपलपेक्षा अधिक प्रतिभाशाली आणि क्षमतावान आहेत. पण ती मुलायमसिंहांची सून आहे म्हणून तिला 'न भूतो न भविष्यते' असं कही तरी मिळालं.
     जरा विचार करा, दोन-अडीच दशकापूर्वी असाच काहीसा प्रकार घडला असता तर काय प्रतिक्रिया उमटली असती? नेत्यांनी आणि पक्षांनी घराणेशाहीचा आरोप करत रान उठवून सोडले असते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. काळ बदलला आहे. कुठल्याच पक्षाकडे घराणेशाहीचा प्रचारमुद्दा राहिलेला नाही. राहणार तरी कसा सांगा? कारण क्वचित काही पक्ष सोडले तर सर्वच पक्षांना घराणेशाहीने पार घेरून टाकले आहे. पक्षातल्या कार्यकर्त्यांनीही त्याचा स्वीकार केला आहे. ज्यावेळेला जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या जीवनकाळातच आपल्या कन्येच्या- इंदिरा गांधींच्या हाती  पक्षाची धुरा दिली, तेव्हा डॉ. राममनोहर लोहिया यांनी याला विरोध करताना म्हटलं होतं की, आता एक काँग्रेस पक्ष घराणेशाहीच्या छत्रछायेखाली देशाचे अकल्याण करायला निघाला आहे. तेव्हापासून घराणेशाहीला विरोध हा विरोधी पक्षाचा मुद्दा राहिला आहे. कॉंग्रेस पक्षात जवाहलाल नेहरू यांच्यापासून सुरू झालेली नेतृत्वाची घराणेशाही पुढे इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता सोनिया गांधी , राहुल गांधींपर्यंत एकाच घराण्याकडे चालत आली आहे. मुलायमसिंह यादव त्याच लोहियावादी समाजवादी प्रवाहातले नेते आहेत. त्यांचा एक चुलतभाऊ खासदार आहे तर मुलगा मुख्यमंत्री! एक भाऊ युपीत अगोदर विरोधी पक्षाचा नेता होता, आता मंत्री आहे. पुतण्यासुद्धा खासदार आहे. आता स्नुषानेही या दालनात प्रवेश केला आहे. स्थानिक पातळीवर तर नातेवाईकांच्या गोतावळ्यांचा भरमार आहे. त्याचा निश्चित आकडा सांगणे अवघड आहे. हा घराणेशाहीचा मुद्दा केवळ काँग्रेस पक्षात किंवा उत्तर प्रदेशात यादव घराण्यातच आहे, असे नाही तर त्यांची लागण संपूर्ण भारत वर्षाला झाली आहे.  क्वचितच काही पक्ष या लागणीपासून लांब आहेत. आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपात ही घराणेशाही रुजली आहे. तामिळनाडूत द्रमुक, आंध्र प्रदेशात तेलगू देसम, ओरिसात बीजद, बिहारमध्ये राजद, जम्मू काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फ्रेंस आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी, राष्ट्रीय लोकदल, हरियाणा लोकदल अशा अनेक राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही फोफावली आहे.
     माझ्या एका मित्राने एक उपाय सांगितला आहे, तो मला फार आवडला. त्याचं म्हणणं असं की आपल्या देशातल्या घराणेशाहीतल्या नेत्यांनी आपल्या पक्षांची नावं काही प्रमाणात अशी ठेवावीतः नेहरू परिवार पार्टी, मुलायमसिंह अँड सन्स पार्टी, शेख अब्दुला अँड सन्स पार्टी, शरद पवार प्रायव्हेट लिमिटेड पार्टी! यांनी आपल्या पक्षाच्या घटनेत अशा प्रकारची घोषणा करावी की, कुटुंबातला सदस्यच पक्षाचा आजीवन प्रमुख राहील आणि जर का मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनण्याची संधी आल्यास कुटुंबाबाहेरील कोणाही सदस्याला ही संधी दिली जाणार नाही. शेवटी अशी घोषणा करण्यास अडचण ती काय आहे? बहुतांश स्वयंघोषित लोकतांत्रिक पक्ष हेच तर सर्व करताहेत. आपली दृष्टी चोहोबाजूला फिरवून पाहा, बहुतांश पक्षांच्या अध्यक्षपदांवर ही नेतेमंडळी अनेक दशकांपासून चिकटून आहेत. सोनिया गांधींपासून ते ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती, मुलायमसिंह यादव, नवीन पटनायक, चंद्राबाबू नायडू, अजितसिंह, ओमप्रकाश चौटाला, शरद यादव, एम. करुणानिधी, बाळासाहेब ठाकरे, जयललिता, फारुख-उमराब्दुला, मुफ्ती महंमद सईद-महबुबा मुफ्ती, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, शिबू सोरेन आणि कल्याणसिंह यांच्यापर्यंत सगळे आपापल्या पक्षाच्या अध्यक्षपदावर अजूनही विराजमान असल्याचे दिसते. निवडणूक आयोगाच्या नियम-कायद्याच्या खानापूर्तिसाठी प्रत्येक पक्षात ठरलेल्या कालावधीत नेता निवडीचे सोपस्कार पार पाडले जातात. आणि पुन्हा त्यांनाच अध्यक्षपदासाठी निवडले जाते. देशातल्या बहुतांश राजकीय पक्षांतर्गत लोकशाही जवळजवळ संपुष्टात आली आहे. सर्व अधिकार पार्टी अध्यक्षांकडेच एकवटले आहेत.  
     अलिकडच्या काही घटना पाहिल्यावर असे लक्षात येते की, पार्टी अध्यक्षच सर्वेसर्वा आहेत. पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, खासदार किंवा आमदार यांच्या मताला काही किंमतच नाही. उत्तर प्रदेशातल्या जनतेने समाजवादी पक्षाला जनाधार दिला. सगळ्यांनाच वाटलं होतं की, मुलायमसिंह यादवच मुख्यमंत्रीपद सांभाळतील. पण त्यांनी घराणेशाहीची परंपरा पुढे नेण्याची आयती संधी साधत आपल्या चिरंजीवास-अखिलेश यास मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले. आजम खां आणि शिवपाल यादवसारख्या एक -दोन पक्ष नेत्यांनी विरोधाचा गळा काढला पण तो आवाज आपोआप दबला गेला. अखिलेशच्या राजीनाम्याने कनौज लोकसभेची सीट रिकामी झाली तेव्हा मुलायमसिंह यादव यांनी आपली स्नुषा डिंपल हिला समाजवादी पक्षाचे तिकिट देऊन उभे केले. घरानेशाची राजनीती पुढे सरकावण्याची नामी संधी यापेक्षा आणखी कुठली असणार?
     उत्तराखंड्मध्ये बहुमत कोणालाच मिळाले नाही, परंतु ३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष पुढे आला. ३२ पैकी २१ आमदार हरीश रावत यांचे समर्थक होते. पण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी  विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्री करण्याचा आदेश काढला. पहिल्यांदा पक्षात मोठा उद्रेक झाला. शपथविधी समारंभाला फक्त ११ आमदारच पोहोचले. पण नंतर गुप्त बैठका झाल्या, चर्चा झाल्या आणि हरीश रावतांनी सोनियांचा आदेश शिरसावंद्य मानला.
     संसदीय सदनात काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. महागाई, भ्रष्टाचार, अर्थव्यवस्था, भविष्यातील आव्हाने आदींपासून रामदेवबाबा आणि अण्णा हजारे यांच्या जनाअंदोलनापर्यंत सगळ्या विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रपती-उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार कोण असावा, याचा निर्णय सोनिया गांधींवर सोपवण्यात आला. किती आश्चर्याची गोष्ट आहे बघा, देशाच्या सर्वोच्च पदावर कुणाला बसवायचे याच्यावर काँग्रेसच्या शंभरहून अधिक आणि आघाडीच्या नेत्यांदरम्यान एक मिनिटाचीही चर्चा झाली नाही. सर्वच महत्त्वाच्या निर्णयासाठी १० जनपथकडे डोळे लावून बसण्याची सवय काँग्रेसजनांना लागली आहे. काँग्रेसजण का इतके विवश झाले आहेत? सगळी ताकद फक्त एकाच व्यक्तीकडे कशी केंद्रीत केली जाते? हा भयंकर रोग फक्त काँग्रेस पक्षातच आहे, अशातला भाग नाही. तो सगळीकडेच पसरला आहे.  
     मग या घराणेशाहीला विरोध करणार कोण? हा मोठा कळीचा प्रश्न आहे. भाजपा नेतृत्वात घराणेशाही नाही. राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राज्यांचे अध्यक्ष निवडीत संघाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मात्र इथे घराणेशाहीची दुसरी पिढी स्थानिक राजकारणात अथवा आमदार-खासदारकीत हावी होत चालली आहे. गोपीनाथ मुंडे व त्यांची कन्या अशी काही त्याची उदाहरणे आहेत. माकपसह बहुतांश कम्युनिष्ट पक्षांमध्ये घराणेशाहीपेक्षा कार्यकर्त्यांच्या आधारावरील संघटनेला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र अपवाद वगळता वाढत्या घराणेशाहीची लागण सर्वच पक्षाला होत चालली आहे. त्याचा वेग आणि प्रसार पाहता आगामी काळात कुठला पक्ष त्यापासून सुटेल म्हणणे धाडसाचे ठरावे. सध्या खासदारकी आणि आमदारकीचे मतदारसंघ काही निवडक कुटुंबियांच्या अंमलाखाली आली आहेत. सध्याच्या लोकसभेत आणि राज्यसभेत २२५ पेक्षा अधिक खासदार असे आहेत की, त्यांचा कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जवळच्या अथवा लांबच्या नात्याने कौटुंबिक संबंध आहेत.
     परिस्थितीत खरोखरीच बिकट बनली आहे. पक्षाच्या नेतृत्वाची इच्छा नसताना एखादे सक्षम, कुशल नेतृत्व पुढे येऊ शकेल काय, असा प्रश्न उपस्थित झाला तर त्याचे उत्तर नकारार्थीच येईल. घराणेशाहीने आपला फास इतका जबरदस्त आवळला आहे की, सक्षम आणि कुशल नेतृत्व उभं राहणं अशक्यच आहे. अशा वातावरणात एखादी स्वाभिमानी, क्षमतावान व्यक्ती ना राजकारणात येईल ना पक्षात मनापासून काम करील्.खरे तर कुठलेही नेतृत्व जनतेतून पुढे यायला हवे. संसदीय प्रणालीत जनतेतून नेतृत्व पुढे येण्यापेक्षा घराणेशाहीतून येत असेल तर ही प्रणालीच रोगग्रस्त होऊन जाणार आहे. आणि दुर्दैवाने हेच आपल्या देशात घडत आहे. विशेष म्हणजे याला पक्ष एकमेकाला सपोर्ट करीत आहेत. नेतृत्व जनतेतून आले असल्याचे दाखवण्यासाठी निरनिराळे पक्ष, नेते एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. कारण प्रत्येकाच्या घराणेशाहीचा प्रश्न आहे. डिंपल यादव यांच्या विरोधात कुणीच आपला उमेदवार उभा करू नये, याला काय म्हणायचे?  मग घराणेशाहीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे?
     यातून बाहेर पडायचे असेल तर सर्वसामान्य मतदारांनी घराणेशाहीचे राजकारण नाकारायला हवे. याबाबतीत जनतेचेच आचरण दोषी आहे. समाजशास्त्र तज्ज्ञ आता सांगू लागले आहेत की, भारतीय समाजावर सरंजामशाहीचा फास पुन्हा आवळला जात आहे. जनतेची सुस्तावस्था किंवा जुनाट सरंजाम मनोवृत्तीच याला कारणीभूत आहे, असे म्हणायला हवे. आचरणात कितीही आधुनिकता आली असली तरी मनोवृत्तीत मात्र बदल झाला नाही. घराणेशाहीला विरोध झाला आहे, होत आहे पण त्यात व्यापक जनजागृती, संघर्ष दिसून आला नाही. राजनीती सिद्धांत, मूल्ये आणि मुद्द्यांवर आधारित व्यापक जनजागृती अभियान चालवायला हवी होती. पण नाही चालली. घराणेशाहीला साथ म्हणजे सरंजामशाही, राजा-प्रजा या जुनाट मनोवृत्तीला साथ, हे ध्यानात घ्यायला हवे. याचा फास पुन्हा आपल्याभोवती आवळून घ्यायचा नसेल तर व्यापक जनजागृतीद्वारा संघटन करतानाच राजनीती सिद्धान्त, मूल्य आणि मुद्द्यांच्या मार्गावर चळवळ  पुर्स्थापित करण्यासाठी अहर्निश प्रयत्नांची गरज आहे.
dainik gavakari 20/6/2012 dainik aikya, satara 16/6/2012

Sunday, June 10, 2012

हसत जगावे 7

बाथरूम
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मत मागत होते. त्यांनी एका घराची बेल वाजवली. एका नऊ-दहा वर्षाच्या मुलीने दरवाजा उघडला. उमेदवाराने विचारले," तुझे पप्पा, काँग्रेसमध्ये आहेत का भाजपात?"
मुलगी म्हणाली," नाही, ते बाथरूममध्ये आहेत."  
 

बालकथा मौल्यवान रत्न

                                                        विजयनगरचा राजा अमरसेन याला आपल्या धनदौलतीचा मोठा गर्व होता. एक दिवस त्याला भेटायला त्याचा बालमित्र रतनसेन आला. मित्र खूप वर्षांनी आल्याचे पाहून अमरसेनला फार आनंद झाला. मित्राचे मोठे जंगी स्वागत केले. गप्पागोष्टी झाल्यावर तो रतनसेनला आपला राजवाडा आणि राजेशाही थाट दाखवण्यास घेऊन गेला. तिथे ठेवलेल्या विविध रत्नांच्या आणि आभूषणांच्या किंमती मोठ्या ऐटीत सांगू लागला. नंतर त्याने मोठ्या गर्वाने सांगितले की, कोषागाराची राखण करण्यासाठी हजारो सैनिक चोवीस तास पहारा देत असतात. रतनसेनला राजाच्या या गोष्टीत रस नव्हता. राजाच्या बोलून झाल्यावर रतनसेन म्हणाला," मित्रा, तू तुझ्या धनसंपत्तीबद्दल इतकं सारं सांगितलंस, पण याचा दुसर्‍याला काय फायदा?"
     राजा म्हणाला," इतकी महागडी रत्नं आणि आभूषणं तर माझ्यासाठीच आहेत, त्याचा दुसर्‍याला काय उपयोग असणार आहे?"
     रतनसेनने राजाला एका झोपडीत नेले. तिथे एक म्हातारी जात्यावर धान्य दळत होती. रतनसेन राजाला म्हणाला," मित्रा, तुझ्या कोषागारात ठेवलेली रत्नेसुद्दा दगडच आहेत आणि इथे जे जाते आहे, तेसुद्धा एक दगडच आहे. त्या रत्नांच्या सुरक्षतेसाठी हजारो सैनिक तैनत केले आहेस. पण याच्या रक्षणासाठी कशाचीच आवश्यकता नाही.   मौल्यवान रत्नांचा तुझ्याशिवाय कुणालाच लाभ नाही. इथे मात्र सगळ्या गावासाठी पीठ पाडलं जातंय. त्यामुळे माझ्यादृष्टीने  हे जातेच तुझ्या रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे."
      अमरसेनला आपल्या मित्राच्या बोलण्यातला अर्थ लक्षात आला. ज्या वस्तूचा फायदा सर्वांना होतो, तीच वस्तू खरी मौल्यवान. आणि सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे जाते आणि ते या म्हातारीकडे आहे.

Saturday, June 9, 2012

सिब्बल महोदयांची चिंता

     मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्बल यांना अलिकडे एक मोठाच प्रश्न सतावतो आहे, तो म्हणजे आपल्या देशातले शिक्षक जितके शिक्षित किंवा प्रतिभाशील असायला हवेत तितके ते नाहीत. या प्रश्नाने  सिब्बल बरेच चिंतेच आहेत. सिब्बल यांची ही धारणा खरी असेलही कदाचित , पण जर का असे असेल तर त्याला जबाबदार कोण , हे कपिल सिब्बल सांगू शकतील काय? शिक्षक की त्यांची भरती करण्यासाठीचे नियम बनवणारे किंवा त्यांची योग्यता तपासणारे सरकार? सरकारी सेवेत जाणारे अथवा जाऊ इच्छिणारे तर ही नियमावली बनवू शकत नाही, हे उघड आहे. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा की आपल्या देशातली शिक्षक बिरादरी योग्यतेची नाही, याला  थेट सरकारच जबाबदार आहे. सिब्बल महोदयांना शिक्षकांच्या योग्यतेचा स्तर अधिक असायला हवा, असे वाटणे साहजिक आहे. कारण  अलिकडच्या काळात सगळ्यांना शिक्षणाविषयी अधिक पुळका येऊ लागला आहे. शिक्षणाची भलतीच काळजी भलतीच माणसे घेताना दिसू लागली  आहेत.  त्यात मानव संसाधन विकासासारखे  महत्त्वाचे खाते ज्यांच्याकडे आहे, त्या सिब्बल यांना तर अधिकच काळजी वाटणे साहजिक आहे.  उलट ही बाब चांगलीच म्हटली पाहिजे. पण मग इथे असा प्रश्न पड्तो की हे करायचं कोणी? खरे तर खाते प्रमुख या नात्याने त्यांची ही जबाबदारी आहे.  त्यांनी यासाठीची सरकारी नियमावली बदल्यांची प्रक्रिया अगोदरच हाती घ्यायला हवी होती. त्यांना अडविणारे कोण आहे? सत्ता, खाते सर्व काही त्यांच्याजवळच आहे. 
     आपल्या पाल्यांना योग्य प्रकारचे शिक्षण मिळायला हवे असेल तर शिक्षण क्षेत्रात प्रतिभाशील लोकांना या क्षेत्रात आणावे लागेल आणि शैक्षणिक महोल आणखी चांगला बनवावा लागेल, असेही त्यांनी प्रतिपादले आहे.  वास्तविक, आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सारेच गंभीर आहेत. पालक तर याबाबत अधिकच सतर्क आहेत. आता प्रश्न आहे तो उत्तम शैक्षणिक वातावरणाचा आणि प्रतिभांचा! तर यासाठी पहिल्यांदा सरकारकडूनच योग्य ती पावले उचलली गेली पाहिजे. पण आश्चर्य आणि वाईट  या गोष्टीचं  वाटतं की पंतप्रधान किंवा अन्य केंद्रीय मंत्री अथवा मुख्यमंत्री 'आम्हाला असं करायला हवं', 'तसं करायला हवं'  असे सांगून मोकळे होतात याचे! इथे फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी शिजवली जातेय. 
     परवाच्या सेट्रल अडवाइजरी बोर्ड अँड एजुकेशन (सीएबीई) च्या 59 व्या बैठकीत  मानव संसाधन विकास मंत्रीच जर 'आम्हाला शैक्षणिक वातावरण अधिक पोषक बनवायला हवं, असं सांगतात तेव्हा प्रश्नाचं गांभिर्य मोठं आहे, याचे भान आपल्याला यायला लागते. पण स्वतः मंत्री सिब्बल इतकी वर्षे काय करीत होते, असा प्रश्न उपस्थित होतो. इतक्या वर्षात त्यांनी शैक्षणिक महोल का सुधारला नाही? आतापर्यंत ते काय करत होते का त्यांचे या महत्त्वाच्या विषयाकडे, त्यांच्या उणिवांकडे लक्षच गेले नव्हते? त्यांना शैक्षणिक महोल चांगला बनवायला किंवा प्रतिभावंत शिक्षक  उपलब्ध करायला अडवलंय कोणी? सिब्बल असतील किंवा राज्य सरकारमध्ये बसलेले मंत्री असतील, तर त्यांनी शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ किंवा योग्य वातावरण मिळते का नाही, हे पाहायला नको का? पण सरकार याबाबतीत पुरेसे गंभीर नाही, याचीच अधिक प्रचिती पदोपदी  येते.
     पोलिओचा डोस द्यायचा असेल तर शिक्षक, जनगणना करायची असेल तर शिक्षक किंवा निवडणुका पार पाडायच्या असतील शिक्षकच, त्यांना पुढे हवा असतो.  म्हणजे शिक्षक आपला निम्मा कालावधी अशा कामांसाठी देत असेल तर त्याला अध्यापनासाठी असा कितीसा वेळ मिळणार आहे? सरकारला विद्यार्थ्यांची चिंता आहे, तर अगोदर आपण नेमलेला शिक्षक त्यांच्यासाठी किती वेळ देऊ शकतो हे पाहायला नको का? शिक्षकाला अपटुडेट राहण्यासाठी किंवा मुलांसमोर पुर्‍या तयारीने जाण्यासाठी त्यांना वेळ मिलतोय की नाही, हे कोण पाहणार? खरे तर शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका व्हावी अशी व्यवस्था सरकारने करण्याची आवश्यकता आहे. निव्वळ शिक्षकाच्या माथी शिक्षणाच्या घसरणीचा वरवंटा मारून मोकळं होणं सोपं आहे, किंवा आपल्याला अमूक करायला हवं, तमूक करायला हवंअसं बोलणंही सोप्पं आहे. पण ते करणार कोण? सत्तेवर बसलेल्या लोकांनीच ना? या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्या तरच सिब्बल किंवा शिक्षणाची आस असलेल्या नेत्यांची ही स्वप्ने साकार होणार आहेत, पण या गोष्टी कोण लक्षात घेणार?
dainik saamana 20/6/2012

Thursday, June 7, 2012

बालकथा मैत्री कोणाशी करावी?

       एका गारुड्याने जंगलात जाऊन एक साप पकडला व टोपलीत बंद करून टाकला. गारुडी शहरात जाऊन सापाचा खेळ करून दाखवणार होता. शहर खूप दूर होते. साप उपाशी राहू नये म्हणून त्याने एक उंदीर पकडून टोपलीत टाकले.
     उंदराला पाहून सापाला आनम्द झाला. तो जिभ बाहेर काधून त्याच्याजवळ सरकू लागला. उंदीर घाबरला, थरथर कापू लागला. हात जोडून विणवणी स्वरात म्हणाला," मित्रा! तू माझा जीव घेऊ नकोस. मी तुला गारुड्याच्या कैदेतून मुक्त करीन."
     साप हसला आणि म्हणाला," एवढा एवढासा उंदीर तू, माझी काय काय सुटका करणार? माझ्या इतकी शक्ती आहे, तरी मी टोपलीचे झाकण उघडू शकलो नाही. मग तू कसा काय मला मदत करणार? औगाच काही बाता मारू नकोस. मला जोराची भूक लागली आहे. तुला खाल्ल्यावर माझे समाधान होईल."
     "सापदादा, जरा विचार कर! तू इतका भुकेला आहेस तर माझ्या एवढ्याशा शरीराने तुझे पोट कसे भरणार? उलट तुझी भूक आणि वाढेल. त्यापेक्षा मला स्वातंत्र्य दे. तू मुक्त झाल्यावर जंगलात जाऊन भरपेट खाऊ शकतोस. गारुड्याच्या कैदेत राहिलास तर  त्याच्या पुंगीच्या इशार्‍यावर नाचून घायाळ होऊन जाशील. त्यापेक्षा..."
     सापाला उंदराचे म्हणणे पटले. त्याने आपल्या दृष्ट स्वभावानुसार विचार केला, ' बघू तरी! हा मला मुक्त कसा करतो ते! आणि एकदा का मुक्त झालो की यालाही खावून टाकीन.' मग तो उंदराला म्हणाला," चल, ठीक आहे. तुला खात नाही. आता सांग, तू मला कसा मुक्त करणार ते?"
     " मी तुझ्या डोक्यावर बसून मंत्र म्हणेन. मंत्र संपला की मी तुला सांगेन, तोपर्यंत तू डोळे बंद ठेवायचे." उंदीर म्हणाला. सापाने फणा काढला. उंदीर त्यावर चढून बसला. अशा प्रकारे तो टोपलीच्या झाकणापर्यंत पोहचला. तो भरभर झाकण कुरतडू लागला.
     थोड्याच वेळात त्याने झाकणाला एक छिद्र पाडले. छिद्रातून बाहेर जायला रस्ता मिळाल्यावर तो पटकन बाहेर आला. जमिनीवर उडी मारून जंगलात पसार झाला. डोके हलके झालेले पाहून सापाने डोळे उघडले. त्याला उंदीर कुठेच दिसला नाही. मात्र त्याला झाकणाला एक छिद्र दिसले. संधी साधून तोही हळूहळू बाहेर आला. त्याला मुक्त झाल्याचा आनंद होताच, पण तेवढेच उंदीर हातून निसटल्याचे दु:ख होते. सापाने चोहीकडे उंदराचा शोध घेतला, पण उंदीर काही सापडला नाही.
     या घटनेला बरेच दिवस उलटले.  साप ही घटना  जवळ जवळ विसरून गेला  होता. पण अचानक एक दिवस उंदीर सापाच्या दृष्टीस पडला. साप लाम्बूनच हाक मारत त्याच्याकडे धावू लागला. " अरे मित्रा, तू त्यादिवशी पळून का गेलास? मला तुझे आभार मानायचे होते. मित्रा, इकडे ये, तुझ्याशी मला गप्पा मारायच्या आहेत."
       खरे तर साप उंदराला खाऊ इच्छित होता. पण उंदीर पटकन  बिळात जाऊन बसला. साप त्याच्या बिळासमोर आला आणि म्हणाला," मित्रा, बाहेर ये! तुला मित्राची कसली भीती?"
     उंदीर हातूनच म्हणाले," मित्र! कसला मित्र? तू माझा मित्र-भित्र कोणी नाहीस, शत्रू आहेस. त्यावेळेला माझा नाईलाज होता. मला माझा जीव वाचवायचा होता. म्हणून तुझ्याशी तात्पुरती दोस्ती केली. त्याचा दोघांनाही फायदा झाला..."
     साप गपचिप ऐकत होता. उंदीर पुढे म्हणाला," मित्रा! मैत्री कधीही बरोबरीच्या लोकांशी करावी, तरच ती निभावली जाते. तू माझ्या बरोबरीचा नाहीस. या जन्मात कधीच आपली मैत्री होणार नाही. आता तू निघ इथून." साप एवढेसे तोंड करून माघारी फिरला. तो समजून चुकला की, उंदराला व्यावहारिक ज्ञान आपल्यापेक्षा अधिक आहे.    

Wednesday, June 6, 2012

बालकथा प्रामाणिकपणाचे रोप

     एक राजा होता. तो म्हातारा झाला होता, तेव्हा त्याने आपल वारसदार निवडण्याचा निर्णय घेतला. त्याला आपल्या आप्तेष्ट किंवा मित्र परिवार यांच्यातून वारस निवडायचा नव्हता. एखाद्या योग्य युवकाने राज्याची जबाबदारी सांभाळावी, अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने एक दिवस राज्यातल्या सर्व महत्त्वाकांक्षी युवकांना दरबारात बोलावले. राजा त्यांना म्हणाला," मी म्हातारा झालोय, आता राज्यकारभार सांभाळणं कठीण होत चाललं आहे. माझी इच्छा आहे की, आपल्यापैकीच कुणी तरी ही जबाबदारी सांभाळावी."
     राजा पुढे म्हणाला," आज मी  तुम्हां सगळ्यांना फळ झाडाचं एकेक बीज देतोय. ते तुम्ही घरी जाऊन एखाद्या कुंडीत रुजवा. त्याला खत-पाणी घाला. आणि बरोबर एक वर्षांनी मला दाखवायल घेऊन या. त्यावेळी मी तुमच्यातून एक माझा वारसदार निवडीन."
     चंद्रमणी नावाचा युवकसुद्धा राजाच्या दरबारात उपस्थित होता. त्यालाही एक बीज मिळाले. त्याने ते मोठ्या उत्साहाने घरी आणले. आईला राजाची इच्छा सांगितली. तिने त्याला एक कुंडी दिली. खतमिश्रित चांगली उपजाऊ माती आणून दिली. त्यात त्याने बीज रुजवले. तो त्याला वेळोवेळी पाणी घालू लागला. सूर्य प्रकाशही देऊ लागला. पण तीन आठवडे झाले तरी कुंडीतून काहीच उगवून बाहेर आले नाही. मात्र त्याच्या सोबतचे युवक आपापल्या कुंडीत उगवणार्‍या रोपांविषयी चर्चा करत होते.
     असेच चार-पाच आठवडे उलटले. पण तरीही चंद्रमणीच्या कुंडीतून काहीच उगवले नाही. तो वेळोवेळी पाणी देत होता. प्रकाश देत होता. बघता- बघता सहा महिने उलटले, पण चंद्रमणीच्या कुंडीत साधा अंकुरसुद्धा उगवला नाही. इतर युवकांच्या कुंडीतल्या रोपांना आता फुलंही येऊ लागली होती. चंद्रमणीची परिस्थिती मोठी विचित्र झाली. त्याला अनेक प्रश्नांनी घेरले. काय करावे, समजेना. पण तरीही तो वेळोवेळी कुंडीला पाणी देत होता. शेवटी एक वर्ष पूर्ण झाले. ठरल्यानुसार एक दिवस सगळे युवक कुंड्या घेऊन दरबारात हजर झाले. राजा ते दृश्य पाहून मोठा आश्चर्यचकीत झाला. समोर उभ्या असलेल्या युवकांच्या कुंड्यांमधली रोपं मोठी दिसत होती. अनेकांच्या रोपांना सुंदर सुंदर फुले लागली होती. राजाचे शेवटच्या ओळीत मागे रिकामी कुंडी घेऊन उभा राहिलेल्या एका युवकाकडे लक्ष गेले. तो दरबारी रक्षकाला म्हणाला," त्या युवकाला समोर आण." त्याची रिकामी कुंडी पाहून सर्व युवक हसू लागले. सर्वांच्या हसण्याकडे दुर्लक्ष करीत चंद्रमणी मोठ्या आत्मविश्वासाने व धैर्याने राजासमोर उभा राहिला. म्हणाला," महाराज! योग्य देखभाल आणि पाणी देऊनही मी या कुंडीत काहीही उगवू शकलो नाही."
     राजा सिंहासनावरून उठला व त्याची पाठ थोपटत म्हणाला," तसं नाही माझ्या तरुण मित्रा, मी या रिकाम्या कुंडीत तुझ्या प्रामाणिकपणाचे रोप पाहतो आहे. तुला ठाऊक नाहीमी एक वर्षांपूर्वी तुम्हा सर्वांना शिजवलेल्या पण वाळवलेल्या बिया दिल्या होत्या.ज्या कधीच उगवू शकणार्‍या नव्हत्या. तू सोडून सर्वांनी आपापल्या कुंड्यांमधले बी बदलले आहेत. तुझा प्रामाणिकपणा आणि धैर्य पाहून माझा असा दृढविश्वास झालाय की तूच माझा वारसदार होण्यास लायक आहेस." राजाने लगेच घोषणा केली," आजपासून या राज्याचा वारसदार हा चंद्रमणी असेल."
    मोठ्या जयजयकारात दरबार्‍यांनी आपल्या नव्या राजाचे स्वागत केले. वृद्ध राजाने आपला मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला.                                                                                

सप्रेम नमस्कार.

              पहिल्यांदा 'गतिमान संतुलन'चा मला वर्गणीदार केल्याबद्दल आभार. मागच्या पत्रात तुम्ही या मासिकाविषयी सांगितला होतात. त्याच दरम्यान आमच्या जतच्या वाचनालयात अंक पाहायला मिळाला. त्यावेळी तिथल्या मित्राला विचारल्यावर त्याने आजच अंक आल्याचे व  अंकाच्या प्रसारासाठी मोफत आल्याचे सांगितले. पण मी त्याला दिलीप कुलकर्णी आणि त्यांचे पुणे सोडणे, कुडावळेसारख्या खेड्यात मातीच्या घरात राहणे आणि स्वतः ला पर्यावरणाच्या संतुलनासाठी झोकून कार्यरत राहणे याविषयीचा आपण सांगितलेला तपशील त्याच्यापुढे  कथन केला. ऐकल्यावर तो जसा मी सुरवातीला भारावून गेलो होतो तसा तो भारावून गेला. त्याने लगेचच त्याची वर्गणी भरून टाकली. आज (दि. ५ मे) दोघांनाही अंक आला. साहजिकच अंक खूप सुंदर आहे. विशेषतः दिलीप कुलकर्णींचे संपादकीय! तुमच्यामुळे एक वैचारिक लेखन आता माझ्या संग्रही राहील.
      तुमचे पत्र चार दिवसांपूर्वीच मिळाले, पण शाळेचा निकाल किंवा अन्य गोष्टींमुळे नंतरच पत्र लिहायला घ्यायचे ठरवले होते.  शिवाय सुटटीत तुम्ही सासरी येणार असा कयास करून पत्र लिहावं की नको या संभ्रमातही काही काळ होतो. मात्र तुमच्यावर शाळेच्या बांधकामाची जबाबदारी आहे, म्हटल्यावर तुमचा माहेरवास लांबणार असा विचार करून पुन्हा पत्र लिहायला घेतले.
      तुमचा स्वभाव बडबडी असल्याचे आपण म्हटले आहे. वाचून थोडी भीतीच वाटली. कारण मला बडबड्या माणसांची खरेच भीती वाटते.  अशी माणसं मनानं निर्मळ असली तरी  भीडभाड न ठेवता बोलणारी असतात, असा माझा अनुभव आहे.  त्यामुळे अशी माणसं कधी काय बोलून समोरच्याची विकेट घेतील, सांगता येत नाही. पण अशी माणसं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. माणसाच्या स्वभावाचं तत्त्वज्ञान मोठं विचित्र आहे.  बघा ना! - ' जो जास्त बडबड करतो, तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. जो गडबड करतो तो लक्ष वेधून घेतो. जो तडफड करतो त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. जो कडकड करतो त्याला काही तरी मिळून जाते. आणि महत्त्वाचे म्हणजे गप्प बसणार्‍याचे मोती खपत नाहीत, मात्र बडबडणार्‍यांची वाळूही खपते म्हणतात.'
     यात कुठला गैरसमज नसावा. फक्त मी  माणसांच्या स्वभावाचं हे सुंदर साहित्यिक तत्त्वज्ञान ऐकवलं आहे. आणि ते पटण्यासारखं आहे. जतला सात आठ वर्षांपूर्वी औरंगाबादकडील एक शिक्षणसेविका  होत्या. आता त्या तिकडेच आहेत. त्याही अशाच बडबडया! त्यांना मला त्रास द्यायचे मनात आले की तेव्हाही सोडत नव्हत्या आणि आताही  नाही. आले मनात की, लगेच फोन. उचलला गेला नाही तर रिंगवर रिंग  सुरूच. मग त्याला काळ वेळ काही नाही. त्यापेक्षा फोन उचलून काहीबाही बोलून ब्याद टाळता येते. फोन उचलला की त्यांनाही समाधान. नाही उचलला तर मात्र घोळ. तसे त्यांच्या या त्रासाला माझी संमतीच आहे म्हणा! कारणही तसेच आहे. त्यांनी लहानपणापासून फार खस्ता खाल्ल्या आहेत. कौटुंबिक प्रॉब्लेम वगैरे.... मात्र त्यात अडकून तो उगाळत बसल्या नाहीत. स्वतः ला सतत  कामात ठेऊन त्यांनी त्याच्यावर मात केली. त्यामुळे अपुसकच त्यांचा स्वभावही बडबड्या बनला. अजूनही त्या गप बसत नाहीत. फावला वेळ संगीत, वादन, कलाकुसरी बर्‍याच गोष्टी...  काय करते, काय नाही, सगळे सांगितल्याशिवाय राहत नाहीत.  त्यांचा हा स्वभाव माहित असल्यामुळे एक शिक्षा म्हणून मी सहन करतोय. हा माझा बडबड्या माणसांविषयीचा तर्क आणि अनुभव.
     व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे सगळीच माणसे सारखीच नसतात, पण त्यात एक समान धागा असतो, असा माझा कयास आहे. म्हणूनच म्हटलं, बकबक करणार्‍या माणसांची भीती वाटते.
     नुकतंच 'आयोध्येतला रावण आणि लंकेतला राम' हे अनुवादीत (गुजराती) पुस्तक वाचून झाले. पुस्तक वाचताना खरा क्रूर राम होता की रावण असा प्रश्न पडत राहिला. या पुस्तकातून हेच सुचीत करण्यात आले आहे. सीतेला दिलेला त्रास, लक्ष्मणाच्या बायकोची उर्मिलाची उपेक्षा वैगेरे... तर इकडे सीतेला पळवून नेण्याशिवाय कोणतीही चूक रावणाची नसल्याचे लाक्षात येते. रावण तपस्वी, प्रचंड ज्ञानी केवळ बहिणीच्या शुर्पणखा हिच्या अहंकाराखातर ( लक्ष्मणाशी विवाह करण्याचा हट्ट) रावण- राम एकमेकासमोर भिडले. विशेष म्हणजे रावणाने नंतर पुन्हा कधीच सीतेला स्पर्श केला नाही. तिच्या नकाराचा आदर केला, बळजबरी केली नाही. राम- रावण तसे दोघेही तितकेच तोलामोलाचे किंबहुना रावण अधिक सरसच.  असो पण यामुळे रावणाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली.
     

बालकथा हुशार हरीण

     श्रीरंगपूरजवळच्या जंगलात एक हरीण राहत असे. त्याला एका झाडावरची फळं फार आवडायची जवळच्या गावात एक शिकारीही राहत होता. त्याला हरणाची आवड माहिती होती. एक दिवस शिकारी लवकर उठून जंगलाच्या दिशेने निघाला. त्याच झाडावर त्याने लाकडी माचण बांधले. आणि त्यावर बसून हरणाची वाट पाहू लागला.
     हरीण नेहमीप्रमाणे फिरत फिरत त्या झाडाजवळ आले. झाडावर लगडलेली रसरशीत फळं पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तेवढ्यात त्याची दृष्टी माणसाच्या पाऊलखुणांवर पडली. त्याने तेथेच थांबून विचार केला, 'नक्कीच इथे कुठे तरी शिकारी लपला असावा, जो माझी शिकार करायला टपला आहे. '
     इकडे हरीण थबकल्याने शिकारी विचारात पडला. मग त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. तो झाडाची फळे तोडून हरणाच्या पुढ्यात टाकू लागला. फळाचा लालसेने हरीण पुढे येईल, आणि मग त्याला पकडता येईल, असे त्याने विचार केला. परंतु, हरणाने शिकार्‍याची चलाखी ओळखली. त्याला झाडावर बांधलेली माचण दिसली. हरणाला एक युक्ती सुचली. त्याने झाडाशीच बोलायला सुरूवात केली." अरे वृक्षदादा, आज तुला झालंय तरी काय? रोज तर तू फळे खाली टाकत होतास आणि आज मात्र माझ्या दिशेने फेकतो आहेस. काय झालंय तरी काय तुला?"
     पण तिकडून काहीही आवाज आला नाही.
     "वृक्षदादा, तू काहीच बोलेनास, आज तू विचित्र वागतो आहेस. नियम सोडून चाललंय तुझं. आता मीसुद्धा तसाच वागतो, नियम तोडतो. आता मी दुसर्‍या झाडाची फळं खायला जातो."
     शिकार्‍याने विचार केला, आता शिकार तावडीतून सुटणार... त्याने लागलीच हरणाच्या दिशेने भाला फेकला. पण हरीण आधीच सावध होते. त्याने झटक्यात उडी घेतली आणि लांब जाऊन उभा राहिला. हरीण ओरडून म्हणाले," शिकार्‍या, मी तुझी चाल कधीच ओळखली होती. पण आता चान्स गेला गेला. पुन्हा कधी तरी नशीब आजमाव." असे म्हनून त्याने धूम ठोकली.  तात्पर्यः नेहमीच्या कामात थोडा जरी बदल आढळला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.  ( पंचतंत्रावर आधारित)                                                                                 

Tuesday, June 5, 2012

स्प्राइट प्या आणि त्यासोबत प्लॅस्टिकसुद्धा खा!

जत (ता. जत जि. सांगली) येथील एका विक्रेत्याकडे स्प्राइटच्या बाटलीत प्लॅस्टिक दिसून येत आहे.
          सांगणार्‍यांनी कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याचं ऐकत नाही. एका कानाने ऐकतो आणि दुसर्‍या कानांनी सोडून देतो. आकर्षक बाटल्यांमधील कार्बनयुक्त शीतपेये पिऊ नका, असं सांगूनसुद्धा आपण काही त्यांचं ऐकत नाही आणि आपण विकतचा आजार घेऊन आपलं आर्थिक नुकसानही करून घेतो. पण ह्या कंपन्या निव्वळ कार्बनयुक्त पाणी प्यायला देतील तर खरे! आता ते यात गुटख्याच्या पुड्या, प्लॅस्टीकचे तुकडे आणखी काहीबाही खायला बाटलीत घालून देतात. वर थंडगार प्या आणि वर स्नॅकला असले काही तरी खा, असेच काही तरी शीतपेय कंपन्या सांगत असतात का कोण जाणे. विशेष म्हणजे या कंपन्यांना कसलीच लाजअब्रू नसते. त्यांनी खालच्या डीलर, विक्रेते मंडळींना सांगून टाकलेलं असतं. आमची शीतपेये बिनधास्त खपवा. आम्ही मोठमोठे वकील ठेवले आहेत. काही काळजी करू नका. बिनधास्त विका. त्यांनी पढवलेली भाषाच ही मंडळी वापरत असतात. त्यांना समाजाचं काही देणं-घेणं नसतं. त्यामुळे असे शीतपेय बाटल्यांमध्ये काही सापडू शकतं. आपण मात्र त्याकडे कानाडोळा करून बिनधास्त थंडगार पेये घशात घालत असतो.  वास्तविक ही थंडपेये तात्पुरते मनाला समाधान देत असतात. मिळतेशिवाय  नकळतपणे शरीरावर त्यांचा प्रतिकूल परिणामही करत असतात. जगभरातील संशोधकांनी यावर संशोधन केलेले आपण वृत्तपत्रांमध्ये आलेले वाचत असतो.  अलिकडेच  शीतपेयांच्या अतिसेवनामुळे आजारी पडणार्‍या लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यात समोर आल्याचंही वाचलं आहे. त्यामुळे जर कोणी सातत्याने कार्बनयुक्त शीतपेयांचे सेवन करत असेल तर त्याला वेळीच रोखायला हवं की नाही. पण आपण तसल्या भानगडीत न पडता, उलट त्याकडे दुर्लक्ष करून आपण तहान त्याच्यानेच भागवत असतो.      अलिकडेच वाचलेली आणखी एक बातमीत फेसाळणारी कार्बनयुक्त कोलासारखी शीतपेये आरोग्यास हानीकारक आहेत असा दावा पाँडिचेरी विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी केला आहे. दिल्लीस्थित विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने केलेल्या चाचणीमध्ये लोकप्रिय कोला कंपन्यांच्या शीतपेयांमध्ये जास्त प्रमाणात हानीकारक घटक आढळून आले आहेत. या घटकांमुळे मनुष्याच्या शरीरावर एखाद्या स्लो पॉयझनसारखा परिणाम होतो असे स्पष्ट झाले आहे. या शीतपेयांचा सर्वाधिक धोका बालकांना होत असून जगभरातील प्रदीर्घ संशोधनानंतर कृत्रिम स्वाद, रसायने, रंग असणार्‍या पेयांपासून लहान मुलांना दूर ठेवावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. संशोधनानुसार या पेयांच्या वारंवार सेवनाने मुलांची एकाग्रता कमी होते, शिवाय शरीरावरदेखील दुष्परिणाम होतो.

ही शीतपेये प्यायल्याने आपण विकतचे आजारांना निमंत्रण देत असतोच. पण ती बनवताना आणि बाटल्यांमध्ये भरताना किती निष्काळजीपणा केला जातो, हेही आपण पाहिले आहे. गुटख्या पुड्या, शेवाळ, प्लॅस्टिकचे तुकडे, काड्यापेटीतील जळक्या काड्या, विड्या असं काहीबाही बाटलीत आढळून येतं, तशा बातम्याही आपण वाचत असतो. आता परवा काही मित्र-मित्र स्प्राईट पित होते, त्यांनी विक्रेत्याकडून बाटल्या मागवल्या. तर त्यात त्यांनी चुरगाळलेला प्लॅस्टिक तुकडा सापडला. म्हणजे ' स्प्राइट प्या आणि वर प्लॅस्टिकही खा' म्हणजे अन्न खायची गरजच नाही. आहे की नाही गंमत! तरीही आम्हाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. होतं असं कधी कधी, असं म्हणून पुढं जातो. ही आपली मनोवृत्ती कधी संपणार?

बालकथा '... आणि भीती पळाली!'

चिकू-मिकू बेटाचला मी आज तुम्हाला उडायला शिकवते. तुम्ही दोघे मोठे झालात, आता तुम्हाला उडायला यायला हवं."  मिनू चिमणीने आपल्या बाळांना आवाज दिला.
"मोठे! आणि आम्ही!"  एकदम दोघेही ओरडले.
" हो... हो.. आता तुम्ही मोठे झालात. चला उडण्याचा प्रयत्न करा. आता तुमचे पंख उडण्याइतके मोठे आणि सक्षम झाले आहेत."
" पण मम्मी, काल तर तू म्हणालीस की आम्ही दोघे अजून  लहान आहोत म्हणून..."
" हो मी म्हणाले होते, पण माझ्या लबाड आणि आळशी पिल्यांनो! तुम्ही घरट्याबाहेर जाऊ का विचारत होतात. तेव्हा म्हणाले, उडायला आल्याबिगर बाहेर जाणार कसे?" उडायला शिकायचं म्हणजे भारी कष्टाचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं.  दोघेही बहाणा करताहेत, हे मिनूनं ताडलं होतं.
"बरं चला, काही बहाणा सांगायचा नाही मला. मी जशी उडते, तसे पाहून उडायला शिकायचे. "
चिकू म्हणाला," मम्मी, आम्ही दाणे कसे टिपायचे शिकलो आहोत ना, मग तसेच शिकू. त्यात काय अवघड आहे."
"हो मम्मी, चिकू म्हणतोय ते खरंय." मिकू चिकूच्या स्वरात स्वर मिसळत म्हणाला.
"खायला काही शिकवावं लागत नाही. जन्मताच  काय आणि कसं खायचं आपोआप सगळे शिकतात. उडायला मात्र शिकावं लागतं."
"आमची स्वीट स्वीट मम्मी, आज नाही उद्यापासून....  उद्या  शिकव ना उडायला!" दोघंही मिनूच्या गळ्याभोवती जाऊन झुलू लागले. शेवटी मम्मीने हार पत्करली.
" ठीक आहे, पण उद्या नक्की!"
" हो, नक्की!" दोघांनी विश्वास दिला.
दुसर्‍यादिवशी मिनूने पुन्हा उडण्यासाठी त्यांना उठवलं, पण पुन्हा दोघांनी बहाणा केला.अशा प्रकारे दिवस जात राहिले.पण ते काही  उडायला शिकले नाहीत.
एक दिवस चिकू आणि मिकू घरट्यात दोघेच होते. मम्मी खाऊ आणायला बाहेर गेली होती. दोघांना एकटे पाहून दबा धरून बसलेला साप त्यांच्या दिशेने हळूहळू सरकत होता. दोघांनीही सापाला पाहिले. दोघे घाबरून गट्ट झाले. त्यांना मम्मीने सांगितलं होतं, साप आपला शत्रू आहे. संधी मिळताच आपली लहाने बाळे आणि अंडी गिळंकृत करतो. चिकू म्हणाला," मिकू, आता हा साप आपल्याला खाणार. आपण काय करायचं रे?"
" चिकू, ही विचार करत बसण्याची वेळ नव्हे. चल उड..." मिकूने चिकूचा हात पकडला आणि दोघांनीही घरट्याबाहेर उडी घेतली. दोघे उडण्याचा प्रयत्न करू लागले. पण उडायला शिकले नसल्याने दोघेही धप्पकन खाली पडले. जोराचा मार बसल्याने त्यांचे डोळे बंद झालेले...!
डोळे उघडले तेव्हा, ते दोघे एका घराच्या अंगणात होते. भलं हो त्या माणसांचे! ज्यांनी त्यांना पाहिलं नि  सुरक्षित ठिकाणी ठेवलं. त्यांनी दवा-पाणीही केलं. दोघे घाबरल्याने थरथर कापत होते. चिकू तर रडायलाच लागला. रडत रडत म्हणाला," मिकू, आपण मम्मीचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आता आपण जिवंत राहणार नाही. सापापासून तर बचावलो, पण इथे एखादे मांजर आपल्याला गट्टम करून  टाकील."
"चिकू, तू म्हणतोयसं ते खरंय. आपल्याला आपला आळस नडला. मम्मीचं ऐकलं नाही, म्हणून ही शिक्षा मिळाली. पण रडू नकोस. आपन काही तरी करू..."
दोघांचं बोलणं सुरू होतं, तेवढ्यात एका लहान बाळाच्या हसण्या-खिदळण्याचा आवाज कानावर आला. दोघांनीही त्या दिशेने पाहिलं, तर तिथे एक लहान मूल आईचा हात धरून हळूहळू चालायला शिकत होतं.
ते दृश्य पाहून चिकू आणि मिकूची भीती कुठल्या कुठे पळून गेली. त्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं. डोळ्यांनी खाणाखुणा केल्या आणि मग दोघांनीही मोठ्या धैर्याने हवेत झेप घेतली, मम्मीकडे जाण्यासाठी! कारण तिच्याकडून उडण्याचे उत्तम उत्तम धडे घ्यायचे होते.