Friday, June 1, 2012

हम न भुलेंगे तुम्हें...

     गुलाब जितका मनोहारी गंध विखरतो, तितकाच तो त्याच्या अंगभरच्या काट्यांनी घायाळ करतो. सज्जाद हुसेन यांचा स्वभावसुद्दा काहीसा असाच होता. गान्याची चाल जितकी गोड, तितकीच त्यांची जीभ कडवट. त्यांच्या हट्टी स्वभावामुळे हा वटवृक्ष बोन्सॉय बनून राहिला. अहंकार आणि घमेंद यामुळे हा प्रतिभावंत कलाकार हळूहळू प्रवाहातून बाहेर पडला. शिवाय लहरी आणि संशयी अशीही त्याम्ची प्रतिमा झाली. 'ये हवा ये रात ये चांदनी...' या गाण्यात तलतने जी काही कमाल दाखवली, त्याच्या मागे सज्जाद यांची कडी मेहनत आहे. या गाण्यामुळे तलत रोमांटिक गाणीसुद्धा लिलया गाऊ शकतो, ही नवी ओळख स्रोत्यांना  झाली. सतरा टेक घेतल्यावर सज्जाद यांनी काळजाचा ठाव घेणार्‍या बंदिशीला हिरवा कंदिल दाखवला. त्यांना परफेक्शनबाबतीत कणभरसुद्धा हयगय चालत नव्हती. सज्जाद यांच्या गाण्यांची संख्या कमी असली तरी त्यांचे प्रत्येक गीत पानांवरल्या दवांप्रमाणम चमकत राहतं.
     सीतामऊ ( मध्यप्रदेश) मध्ये १५ जून १९१७ रोजी एका शिंप्याच्या कुटुंबात जन्मलेल्या सज्जाद यांनी आपल्या वडिलांकडून सितार वादनाचे धडे घेतले. नम्तर वीणा, वॉयोलिन, सरोद, बासरी, पियानोसारखी वाद्ये वाजवायले शिकले. मेडोलिन वादनात त्यांनी हातखंडा मिळवला. १९३७ मध्ये मुंबईला आल्यावर अल्ला बक्श यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम पत्करले. के. एल. सैगल यांच्या 'दुख के दिन अब बितत ना हो...' ( देवदास) या गाण्यावर भलतेच प्रभावित झाले होते. नूरजहांचे पती शौकत हुसेन यांच्या 'दोस्त' (१९४४) चित्रपटाने त्यांच्या स्वतंत्र कारकिर्दीला सुरूवात झाली. 'बदनाम मुहबत कौन करें...' मध्ये  नूरजहांने 'बदनाम' शब्दावर असा काही हळूवार, मासूम जोर दिला होता की, या गाण्याने जणु काही श्रोत्यांच्या काळजावर सुरी चालवली. मात्र 'दोस्त' च्या संगीताच्या यशाचे श्रेय शौकथुसेन यांनी सज्जाद यांना नूरजहां यांना दिले. 'दोस्त'ची गाणी नूरजहांमुळे गाजली. इथे संगीतकार कुणीही असला तरी फरक पडला नसता, अशी मुक्ताफळे उधळली. यावर सज्जाद चांगलेच उखडले. दोघे 'दोस्त' बनण्याअगोदर दुश्मन बनले.सज्जाद यांनी त्यानंतर नूरजहांकडून गाणी गाऊन न घेण्याची शपथ घेतली. नूरजहां यांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी स्वतः जाऊन सज्जाद यांची माफी मागितली. परंतु, सज्जाद यांच्यावर काडीचाही परिणाम झाला नाही. त्यांनी 'जुगनू'चा करार मोडला तर 'जीनत'ची ऑफर धुडकावून लावली.
     तिकडे 'ये हवा ये रात्...' च्या चालीचा मदनमोहन यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. त्यांनी संगदिल' नंतर पाच वर्षांनी या धूनचा 'तुझे क्या सुनाऊं ऐ दिलरुबा...' ( आखरी दाव) साठी वापर केला. तेव्हा सज्जाद यांनी खूप वाईट प्रतिक्रिया दिली होती. 'आजकाल लोक आमच्या सावलीचीसुद्धा नक्कल करतात,' असं त्यांचं वक्तव्य होतं. विशेष म्हणजे या चालीचा मोह संगीतकार रवी यांनासुद्धा आवरला नव्हता. त्यांनी 'जरा सुन हसीना ऐ नाजनी...'( कौन अपना कौन पराया) साठी आजमावली होती.
     सज्जाद यांच्या संगीतात एक प्रकारचा गोडवा होता. निवडक गाणी असूनही त्यांनी उच्च कोटीची संगीतनिर्मिती केली. 'ये कैसी अजब दास्तां हो गई है...' ( रुस्तम सोहराब/ सुरैय्या) ची दिलखेचक धून असो अथवा 'धरती से दूर गोरे बादलों के पार...'( संगदिल/ गीता-आशा) ची मेलोडियन तर्ज! सज्जाद यांची प्रत्येक बंदिश लाजवाब होती. 'दिल में समा गए सनम...' ( सम्गदिल्/लता-तलत) , 'क्या रात सुहानी हैं...(अलिफ लैला/रफी-लता), 'मेरी नजर में तू रहें...(१८५७/सुरेंद्र-सुरैय्या) आणि 'ये चार दिन बहार के...'(रुखसाना/आशा-किशोर) सारखी डुएट गाणी सज्जाद यांच्या खात्यावर जमा आहेत. लता मंगेशकर यांनी सुद्धा सज्जाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनेक अनमोल गानी गायिली आहेत. 'वो तो चले गये ऐ दिल...' (संगदिल), 'आज मेरे नशीब ने ( हलचल) , ऐ दिलरुबा( रुस्तुम सोहराब), भूल जाए ऐ दिल...( खेल) आणि तुम्हें दिल दिया ये क्या किया...(सैंया) ही लता-सज्जाद जोडीची गोड गाणी आहेत.
     रागीट आणि फटकळ स्वभाव असला तरी सज्जाद यांची गणना अनेक संगीतकारांनी प्रतिभावंतांमध्येच केली आहे. अनिल विश्वास  तर त्यांना एकमेव  अलौकिक संगीतकार मानायचे. दुसर्‍या संगीतकारांनी सज्जाद यांच्या चालींची नक्कल केली पण स्वतः सज्जाद यांनी मात्र कुणाची धून किंवा सैली चोरली नाही. एकदा एका निर्मात्याने कुठल्या तरी एका इंग्रजी चालीची ऑफर दिली होती, पण त्यांनी त्या निर्मात्याला बाहेरचा रस्ता दाखवला. चिडचिड्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली. गायक त्यांच्याशी बिचकून वागू लागले तर गीतकारांनी त्यांच्याशी संबंधच तोडले.
     परंपरागत हिंदुस्थानी संगीताचे पुजारी असलेल्या सज्जाद यांनी कधी कुणाची खुशामत केली नाही की कुणाची ढवळाढवळ सहन केली नाही. आणि कुणाचा सल्ला मानला नाही. ते नेहमी आपल्या मर्जीनुसारच वागले. याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. अनेक चित्रपट त्यांच्या हातून निसटले. पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. त्यांच्या संगीताची चर्चा कमी तर त्यांच्या विक्षिप्त वागण्याची चर्चा अधिक होत राहिली. ओ.पी. नय्यर त्यांचे एकमेव मित्र. लता मंगेशकर हेसुद्धा त्यांची शेवटपर्यंत विचारपूस करत.  २१ सप्टेंबर १९९५ रोजी या प्रतिभावंत संगीतकाराने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या चाहत्यांच्या ओठी  'रुस्तम सोहराब' मधील ही कव्वाली आजही रेंगाळत असेल,' हम न भुलेंगे तुम्हें...'!                                                    

1 comment:

  1. खरे आहे. सज्जाद हुसेन यांचे संगीत अगदी अलौकिक असेच आहे.

    ReplyDelete