बाथरुममधून बाहेर आल्यावर तिने आपल्या मोबाईलवरचे मिस्ड कॉल पाहिले, मग लँड लाइनचे 'डायल-टोन' चेक केले. अशुतोष संध्याकाळी सातपर्यंत येत असतो. प्रिया ती येण्याअगोदरच फोन करते. मग आज काय झालं आहे? मन दुश्चिंतांनी घेरलं. कदाचित आपसात भांडले तर नसतील? आजकालच्या पोरांमध्ये सहनशील नवाची चिजच राहिली नाही. एवढ्यात कीर्ती फिरायला बोलवायला आली. " अजून प्रियाचा फोन आला नाही." ती चिंता व्यक्त करत म्हणाली. " अगं येईल, काळजी काय करतेस एवढी? नवीन नवीन तर लग्न झालंय, गेले असतील कुठे तरी फिरायला? चल फिरायला, तेवढंच तुझं मन रमेल." कीर्ती जोर देऊन म्हणाली. नाही गं, आज माझं मन नाही." तिच्या उत्तरानं कीर्ती निघून गेली.
" हो! असतील. कदाचित ती फिरायलाही गेली असतील." ती स्वत: ला समजावत होती. 'पण हे सगळं, मला का सुचलं नाही. सुचणार तरी कसं? ती अशा परिस्थितीतून गेलीच कुठे होती? प्रेम-बीम, रागावणं, रुसण्-फुगणं तिच्या नशीबीच नव्हतं. महेंद्रशी तिचं लग्न म्हणजे जबरदस्तीचा एक सौदा होता. महेंद्रच्या आईनं तिला पसंद केलं होतं. 'आईची पसंद तिच माझी पसंद.' असे म्हणून त्यांनी होकार दिला होता.साखरपुढ्यालाच तिने त्याला पाहिलं होतं. दिसायला तिच्यापेक्षा डावाचं. पण मुलांच्या रंगरुपाकडं कोण पाहतं. त्याच्या नोकरी- पैशाकडं पाहिलं जातं. त्यांच्याजवळ चांगली नोकरी होती.
लवकरच दोघंही प्रणय सूत्रात बांधले गेले नी ती त्यांच्यासोबत इथे आली. त्यांची आईसुद्धा आली. ते सकाळी कामावर निघून जायचे ते रात्री उशिराच घरी परतायचे. आल्यावर जेवण करून झोपायचे. सुट्टीच्या दिवशीसुद्धा नेहमी बाहेर असायचे. सासूबाई तिला सारखी डिवचायची-' रात्री तर तुझ्याशी हसतो, बोलतो का गं?' मग स्वतः च 'नेहमी कामातच असतो. स्वता:च्या मस्तीतच असतो. काय करायचं, याचा स्वभावच असा आहे.' असे म्हणून स्वतः ला समजावयाची. काही दिवसांनी सासूबाई निघून गेल्या. आता दिवसभराचे एकटेपण खायला उठू लागले. तिने महेंद्रपुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. ते पटकन तयार झाले. ती दिवसभर घरच्या कामात व्यस्त राहायची आणि फावल्या वेळात अभ्यास करायची. याच दरम्यान तिच्या भावाचे लग्न होते. आईने तिला काही दिवसांसाठी बोलावलं. महेंद्रनी सहर्ष परवानगी दिली. घरातली सगळी व्यवस्था करून ती निघाली होती. पण एकदा, फक्त एकदा महेंद्रनी तिच्या अनुपस्थितीत होणार्या गैरसोयीचा उल्लेख करावा. पण महेंद्र, या सार्या गोष्टींपासून बेखबर होते. स्वता: च्या विश्वात मस्त होते. तिथेसुद्धा त्यांचे पत्र आले ना फोन. पण लग्नादिवशी मात्र आले. ती त्यांच्यासोबत माघारी आली. आता महेंद्रांकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन बदलला होता. तिच्या मला ठेच पोहोचली होती. नारी सर्व काही सहन करू शकते, पण कोणी तिचे अस्तित्व नाकारत असेल तर मात्र ती बर्दास्त करू शकत नाही. तिने बरीच मोठी धावपळ करून नोकरी मिळवली.
तोपर्यंत प्रियासुद्धा त्यांच्या संसारात आली होती. पण दोघांमधला दुरावा वाढतच चालला होता. प्रियाचा सांभाळ, नोकरी आणि घरकाम यामुळे ती सतत व्यस्त असायची. पण प्रबल या सगळ्यांपासून बेखबर आपल्याच मस्तीत दंग असायचे. तिला कामाचा त्रास व्हायचा. मग ती चिडचिड करायची. तेव्हा महेंद्र म्हणायचे-' घर आणि नोकरी सांभाळायचं होत नसेल तर नोकरी सोड. पण माझ्याकडून घर कामासाठी अपेक्षा करू नकोस.' नोकरी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय होता. यथावकाश या सगळ्या गोष्टींची तिला सवय झाली. इतकेच नव्हे तर गाडी बंद पडल्यावर वर्कशॉपपर्यंत स्वतः जायची किंवा मॅकॅनिकला घरी बोलावून गाडी त्याच्या सुपूर्द करायची. कधी एकत्र बाजारात गेले तरी महेंद्र कुठे तरी बाजूला उभे राहायचे. बिल बनवणं, पेमेंट करणं, सामान गाडीत ठेवणं ही सारी कामं एकटीच करायची. यामुळे एक फायदा होत होता. तिच्या आत्मविश्वासात वाढ होत होती. तिचे व्यक्तिमत्व निखरत होते.
प्रियाचा सांभाळ हेच तिच्या जीवनाचे ध्येय होते. प्रियासुद्धा तिच्याशीच समरस झाली होती. दोघीच शॉपींगला जायच्या. फिरायला जायच्या आणि कधी मधी मूवीसुद्धा पाहून यायच्या. त्यांच्या पेहराव्यावरून सुमीसुद्धा टीका-टिप्पणी करायची. वैतागल्यावर प्रिया आईसारखी त्यांना समजावायची, प्रेमानं वागायची. प्रिया मोठी झाल्यावर महेंद्रनी कित्येकदा पुत्र-इच्छेने दुसर्या मुलाविषयी बोलायचे, पण ती यासाठी कुठल्याही किंमतीवर तयार नव्हती.
अचानक फोन वाजला." ममा, आज आम्ही अशुतोषच्या मित्राच्या पत्नीच्या वाढदिवसाला गेलो होतो. मोठी मजा आली, आम्ही खूप मस्ती केली. खूप मोठे हॉटेल होते. आता आताच आलो आहे." प्रियाने एका दमात सगळं सांगून टाकलं. " ममा, मी पिंक ड्रेस घातला होता. अशुतोषलासुद्धा खूप आवडला. आज मी पार्टीत डान्ससुद्धा केला... " आवाजावरून उत्साह ओसंडून वाहात होता. "... ममा, तूसुद्धा सोबत असती ना खूप मजा आली असती. तुझी खूप आठवण आली."
तिचा उत्साह पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आलं. चला, आपल्या नशिबात नाही ते नाही निदान मुलीच्या नशिबात... तिच्या कष्टाचं सार्थक झालं.
तिला आठवलं, तिच्या वाढदिवसाला अनिता हसून म्हणाली होती-' जिजा, आज दीदीचा बर्थ डे. आज तुमचा विशेष प्रोगॅम काय आहे...' 'प्रोग्रॅम कसला? वाढदिवस काय येतात आणि जातात... ' महेंद्रनी उदासपणे उत्तर दिलं होतं. ती विचार करत राहिली. जीवनातले छोटे- छोटे आनंदाचे क्षणसुद्धा बरेच दिवस आपल्या मनाला उभारी देतात, आल्हाद देऊन जातात. पण आपण मोठमोठ्या गोष्टींसाठी या छोट्या छोट्या आनंदावर विरजण घालत असतो.'
मन पुन्हा भटकू लागलं. अनिताकडे गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. नेहमीप्रमाने ' माझी महत्त्वाची मिटिंग आहे.' सांगून महेंद्र बाजूला झाले. ती आणि प्रिया दोघीच गेल्या. सगळ्या भावा-बहिणींचा परिवार पाहून तिला खूप विचित्र वाटलं होतं.
अचानक अनिताच्या खोलीतून जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. माधव कुणावर तरी रागावत होता. 'तुझी हिंमत कशी झाली, माझ्या बायकोच्या फोनवर एसएमएस करण्याची.आता पोलिसात रिपोर्ट करतो.' तिकडे कुणी तरी 'सॉरी-सॉरी' म्हणत होते. ' हे नालायक लोक कोणालाही एसएमएस करीत असतात. असं काही खडसावलंय की पुन्हा हिंमत करणार नाही त्याची!.' माधव हसून सांगत होता. मनाला एक झटका बसल्यासारखं झालं. एक दिवस तिच्या फोनवर तीन्-चार रॉन्ग नंबर आले होते. महेंद्र खिजवून म्हणाले होते. आता रॉन्ग नंबरसुद्धा यायला लागले.कुणासठाऊक कुठे कुठे नंबर दिला आहे. ऐकून तिचे पित्त खवळले होते. पण ती गप्प बसली होती. महेंद्रनी कधी तिला भावनात्मक संरक्षणसुद्धा दिले नव्हते.
काळाचा महिमा आगाध आहे. ते नदीच्या दोन किनार्यासमान आपले जीवन व्यतीत करीत होते. हळू हळू बारीक सारीक गोष्टीसुद्धा मोठ्या मोठ्या मुद्द्यांचे स्वरुप घेत होते. त्यामुळे नेहमीचा संवादसुद्धा संपायचा. प्रिया यात सेतूचे काम करायची. पण आता सेतूच्या अभावामुळे परिस्थिती आणखीच ताणली जात होती. वास्तविक, ही दोन व्यक्तींमधल्या 'इगो'ची टक्कर होती. महेंद्रमध्ये पुरुषांना स्त्रींपेक्षा श्रेष्ठ समजण्याचा इगो होता. आणि तिच्यात आपल्या रंगरुपाचा, व्यवहार कुशलतेचा, आत्मविश्वासाचा आणि स्वतः च्या पायावर गृहस्थी सांभाळल्याचा अहंकार होता.
म्हणतात ना, सय माणसाच्या मागे सावलीसारखी लागलेली असते. तिला पुन्हा आठवलं, सामाजिक समारंभांमध्ये सामिल होण्यापासून लांब पळणारे महेंद्र प्रियाच्या लग्नात किती घाबरल्या घाबरल्यासारखे वावरत होते. पण ती मात्र पूर्ण आश्वस्त होती. लग्नाची सगळी कमान तिने सांभाळली होती. महेंद्र मात्र उदास उदास आणि बाजू बाजूलाच राहिले.
" आज वॉकला गेली नाहीस?" आवाज ऐकून चमकली. तिने मान वर करून पाहिले तर समोर महेंद्र होते. खूप थकल्यासारखे दिसत होते. जणू काही साठ वर्षाचे म्हातारे झाले आहेत. पण ते आपल्या विश्वात दंग होते. त्यामुळे या गोष्टींकडे त्यांचे ध्यानच दिले नाही. मानवाचे मस्तिष्क म्हणजे अजीब गुत्थ्यांचे जाळे आहे. जे नाही, त्याच्यामागेच धावत असते. आणि जे जवळ आहे त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करत असते.
पाण्यासमान मनाचा प्रवाहसुद्धा मोठा विचित्र असतो. कधी कुठले वळण घेईल सांगता येत नाही. आता ती विचार करत होती, शेवटी महेंद्रंशी असे तोडून वागण्यासारखे त्यांच्यात असे काय कमी आहे? त्यांच्या खाण्यापिण्याकडे आपण म्हणावे असे लक्ष दिले नाही. शेवटी काम म्हणजे एक अल्कोहलिक तर आहे? मग कामात दंग राहणे, काही गुन्हा नाही. ऑफिसमधील लोक त्यांच्या कामाचे किती प्रशंसा करतात. कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही, आब नाही. कुठला वायफट खर्च नाही. तीसुद्धा किती मूर्ख, जी या हिर्याची पारख करू शकली नाही.
मानवी मन म्हणजे अजीब कोडे आहे. काही वेळापूर्वी तिला महेंद्रमध्ये दोष आणि दोषच दिसत होते.कारण ती त्यांना स्वतः च्या नजरेतून पाहात होती. पण आता.. आता प्रेम उफाळून आले होते. कारण आता ती त्याच्याच दृष्टीकोनातून पाहाते आहे. नकारात्मक विचार व्यक्तीला निष्क्रिय बनवतात, हेच खरे! पण सकारात्मक विचार नवीन ऊर्जा देतो. तिने झटकन घरभर प्रकाश केला. संध्याकळची धूपाची बत्ती लावली. आणि आज कित्येक वर्षांनी महेंद्रांच्या आवडीचा स्वयंपाक करण्यात गुंतली. आज तिच्या मनाची भाषा बदलली होती.