Wednesday, April 4, 2012

विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा

     शिक्षण आणि विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही, असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  संधी मिळेल तेव्हा, संवाद साधताना विद्यार्थ्यांना दिला आहे.  त्यांनी स्वतः आयुष्यात अनेक कार्ये अंगिकारली. राजकारणातही त्यांचा महत्त्वाचा काळ गेला. पण यासाठी त्यांनी मोठे कष्ट उपसले. बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाचे चीज होणार नाही, याची त्यांना जाणीव होती. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेऊन झटून अभ्यास करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे.  चांगले दिव्य- भव्य  केल्याशिवाय महत्त्व प्राप्त होत  नाही, याची जाणीवही त्यांना करून दिली आहे.  
     कष्ट, जिद्द याशिवाय आत्मविश्वास अंगी असायला हवा. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. कितीही संकटे आली तरी आपल्यातला आत्मविश्वास कधीही ढळू देता कामा नये. 'कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसर्‍याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीच होणार नाही. त्यामुळे मी  जे करीन ते होईल, असा आत्मविश्वास बाळगल्यास पराभव नावाचा राक्षस तुमच्याजवळही फिरकणार नाही.  
     डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'कोणताही मनुष्य उपजत बुद्धीमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. तर सततच्या दीर्घोद्योगानेच कोणताही मनुष्य पराक्रमी व बुद्धीमान होऊ शकतो. दीर्घोद्योगी व कष्ट करण्यानेच यश प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून झटाल्यास  ही मी उत्कृष्ट व समाधानाची गोष्ट  मानेन. मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास ८ वर्षे लागतात, तो अभ्यासक्रम मी २ वर्षे ३ महिन्यात यशस्वी तर्‍हेने पुरा केला. हे करण्यासाठी मला २४ तासांपैकी १८ तास अभ्यास करावा लागत असे.'
     विद्येबरोबरच आपल्यात शील पाहिजे, असा डॉ. आंबेडकरांचा अट्टाहास आहे.  शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. कारण विद्या हे एक शस्त्र आहे. ज्याच्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करील, तर तोच इसम शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसर्‍याचा घात करील. विद्या ही तलवारीसारखी दुधारी आहे. परंतु, तिचं महत्त्व तिला धारण करणार्‍यावर अवलंबून आहे. कारण अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत नाही. फसवावे कसे, हेच त्याला उमगत नाही. परंतु, शिकल्या सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी, कोणास कसे फसवावे व त्याला फसविण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खर्‍याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासवू शकतात. विद्यार्थ्यांनी आपले शील जपले पाहिजे.
     अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांना राजकारणाचे मोठे आकर्षण आहे. झटपट श्रीमंती, चैनबाजीला मिळणारा पैसा, करायला मिळणारी दादागिरी यामुळे आजचा विद्यार्थी अभ्यासापैक्षा राजकारणात अधिक रमू लागला आहे. वास्तविक राजकारणी त्यांचा फायदा उपटण्यासाठी युवकांचा वापर करून घेत असतात. यामुळे त्यांचे आयुष्य उदवस्त होते. डॉ. आंबेडकरांनीही  विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष राजकारणात पडू नये, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 'अभ्यास सोडून राजकारणात पड्ल्यास आयुष्याचे नुकसानच होणार आहे.' अभ्यासाच्या वेळेला अभ्यास हाच धर्म स्वीकारायला हवा. 
     'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या उदासिन वृतीचा त्याग करायला लोकांनी शिकले पाहिजे. कारण आहे त्या स्थितीत समाधानी न होण्याच्या वृत्तीतूनच समाजाची उन्नती होत असते. आपल्यात स्फूर्ति आणि उत्साह निर्माण केला पाहिजे. आपल्या आशा , आकांक्षा उंचावल्या पाहिजेत. अंथरूण पाहून पाय पसरावे या उदासिन वृत्तीला झिडकारून आपले अंथरून वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेळोवेळी आपल्या विद्यार्थी दशेतील परिस्थिती आवर्जून सांगत. त्यांच्या  विद्यार्थी दशेत त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रात्रंदिवस अभ्यास केला.  एका छोट्याशा खोलीत त्यांचे सारे कुटुंब राहत असे. त्यात बहीणीची दोन मुले, भरीस भर म्हणजे एक बकरी, जाते, पाटा वैगेरे आणि मिणमिण जळणारा दिवा इतक्या हालाखीत जीवन काढले. अभ्यास केला. आज तेवढी वाईट परिस्थिती नाही. वसतीगृहांच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिक अभ्यास करायला काय हरकत आहे, असा त्यांचा सवाल आहे.
     शिवाय त्यांनी मानवी जीवन मूल्यांची जोपासना केल्यास अडचणी कुठल्या उदभवणार नाहीत. नव्या मूल्यांचाही अंगिकार व्हायला हवा. कारण मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मूल्ये कधीच स्थीर राहिली नाहीत. ती कालमानाप्रमाणे प्रत्यही बदलत राहिली आहेत. नुसती बदलतात असे  नव्हे तर ती प्रगत होत जातात. देशातल्या विद्यार्थ्यांनीही या नव्या निर्माण होणार्‍या जीवनमूल्यांची दखल घेतली पाहिजे आणि आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे. हे सांगताना डॉ. आंबेडकरांनी अलिकडच्या विद्यार्थ्यांची प्रज्ञा व प्रतिभा खालावत चालल्याची खंतही व्यक्त केली आहे. आजचा विद्यार्थी वर्ग वरवरच्या रंगांना भुलत चालला आहे. चैन, झटपट पैशाच्या आशेला लागला आहे. पण वास्तविक विद्यार्जनाला एक मोठा अर्थ प्राप्त झालेला आहे. आपली प्राचीन गुरूकुले एकांतात विद्या शिकवित असत. रानावनातून ही विद्यापीठे प्रस्थापित झाली होती. त्याचे मुख्य कारण होते, त्यांना विद्येच्या अभ्यासाने नवी दृष्टी यावी, या दृष्टीतून त्यांनी खर्‍या जीवनमूल्याचा शोध व बोध घ्यावा. पण आजचे विद्यार्थी उथळ गोष्टीच्या फंदात पडून दिव्यदृष्टी प्राप्त करून घ्यायला तयार नाहीत. ही गोष्ट भावी पिढीसाठी, देशासाठी घातक आहे, याबाबत डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट मते मांडली आहेत. देशाची भावी अशी  बहकत जाऊ नये, याबाबत त्यांचा कटाक्ष होता.                                       

1 comment:

  1. अप्रतिम लेख. जबरदस्त प्रेरणादायी.

    ReplyDelete