Sunday, April 22, 2012

बालकथा हलगर्जीपणा ... छू मंतर!

     सौंदर्या सातवी इयत्तेत शिकत होती. तिची वार्षिक परीक्षा जवळ आली होती. तिला भलतेच टेन्शन आले होते. ती दिवस-रात्र अभ्यासात गढून गेली होती. तिचे मम्मी-पप्पासुद्धा तिची काळजी घेत होते.
     सौदर्या नावाप्रमाणे जशी सुंदर होती, तशीच मोठी कष्टाळूही होती. तिची हुशार मुलांमध्ये गणना होत असे. तिचा वर्गात कधीही पहिला नंबर आला नसला तरी ती हमखास तिसर्‍या - चौथ्या क्रमांकावर असायची. मार्कांमध्येही फारसा फरक नसायचा. तिची मम्मी नेहमी तिला एक शिकवण द्यायची ," अभ्यासात आपण कुठल्या क्रमांकावर आहोत, याला अजिबात महत्त्व  नाही. महत्त्व आहे, ते आपण काय  शिकलो आणि किती समजलं याला! त्यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे." पापांचंही म्हणणं, यापेक्षा वेगळं नव्हतं. मात्र सौंदर्याला या खेपेला वार्षिक परीक्षेत काही औरच करून दाखवायचं होतं. शेवटी असं काय होतं ते?
      झालं होतं असं की, पहिल्या टर्ममध्ये सौंदर्याने नेहमीप्रमाणे जीवतोड मेहनत केली होती. परीक्षा हॉलमध्ये ती मोठ्या तन्मयतेने पेपर सोडवत होती. तिने पेपर पूर्ण झाल्यावर कुठला प्रश्न राहिला आहे का, याच्यासाठी म्हणून तिने पेपर पुन्हा पुन्हा चेक केला होता. ती नेहमी कुठला ना कुठला प्रश्न हमखास विसरायची किंवा हमखास एखादी चूक करायची. तिची खोडच होती ती! पण ती काही मुद्दाम करायची नाही. पण हलगर्जीपणा व्हायचा. मात्र यामुळे ती नंतर पश्चाताप करत बसायची. हे तर आपल्याला येत होते, असे मम्मीजवळ म्हणायची. पण तिच्या या खोडीमुळे मार्क गेलेले असायचे. टिचर तर जादाच मार्क कापणार, असं तिला वाटायचं.
      मम्मीसुद्धा तिला हसून म्हणायची," अगं जाऊ दे गं, पैकीच्या पैकी मार्क मिलायला पाहिजेत असं कुठे आहे? " तिच्या गालाची पापी घेत वर म्हणायची," माझी गुणी बाळ गं." अभ्यास करता करता सौंदर्याने मम्मीची ही गोष्ट लक्षात ठेवली होती आणि परीक्षा हॉलमध्ये आठवून छान हसली.
      इतक्यात तिला तिच्या बाजूला बसलेल्या दीपाची खुसखुस ऐकायला आली. तिने तिच्याकडे थोडे वाकून पाहिले. तेवढ्यात मागून येणार्‍या सुपरवायझर टिचरने पाहिलं. टिचर दरडावत मोठ्यानं म्हणाल्या," बघून लिहितेस?"
" नाही... नाही, मॅम! माझा तर पेपरसुद्धा झाला आहे." सौंदर्या आत्मविश्वासानं पेपर दाखवत म्हणाली.
     तरीही सुपरवायझर टिचरने तिचा पेपर काढून घेतला व सौंदर्याला कळायच्या आत, तिच्या पेपरवर रिमार्क लिहिला गेला. सौंदर्या खूप रडली. परीक्षा हॉलमधल्या तिच्या अन्य मैत्रिणींनीही टिचरांना ,'ती खूप हुशार आहे, ती कॉफी करणारी मुलगी नाही," असे ठमपणे सांगितले. पण टिचरांनी कुणाचेच काही ऐकले नाही. सौंदर्याने झाला प्रकार मम्मीला सांगितला. मम्मीने तिला धीर दिला," टिचर तिचे पाच मार्क कापणार नाही."
     पण निकाल आल्यावर सगळेच चकित झाले. सौंदर्याच्या विज्ञान विशयातले पाच मार्क खरोखरच कापले गेले होते. ती तर रडून रडून आपला जीव द्यायला निघाली होती.दीपा तिच्यासमोर एखाद्या अपराध्यासारखी उभी होती. गौरांगी आणि श्रुती तिला शांत करत होत्या. सौंदर्याला कमी गुण मिळाल्याचे दु: ख वाटत नव्हते, पण तिला आपली काहीही चूक नसताना शिक्षा मिळाल्याचे तीव्र वाईट वाटत होते.
     घरी आल्यावर तिच्या दु:खाचा बांध फुटला. ती जोरजोराने ओक्साबोक्शी रडू लागली. मम्मीने तिला प्रेमानं मिठीत घेतलं आणि म्हणाली," तुझ्या खोडीमुळे दरवेळेला दोन मार्क जातात्च. आता पाच चुका झाल्या समज आणि गप बस." मम्मी म्हणाली," तुला स्वत: ला निर्दोष करायचे असेल तर आतापासूनच अभ्यासाला लाग. आणि खोडीला बाय बाय कर! पैकीच्या पैकी गुण मिळवून तुला परीक्षेत कॉपीची आवश्यकता नाही, हे दाखवून दे!"
     सौंदर्याने आपले डोळे पुसले. मम्मीचे म्हणणे तिला पटले होते. तिने रात्र- दिवस अभ्यास केला. पुन्हा पुन्हा प्रश्नपत्रिका सोडवल्या. तपासून पाहिल्या. चुका लक्षात घेऊन टाळण्याचा प्रयत्न केला.
     आज वार्षिक परीक्षेचा निकाल येणार होता. नेहमीप्रमाणे मम्मी-पप्पासुद्धा तिच्यासोबत होते. पूर्ण हॉल खचाखच भरलेला होता. खालच्या वर्गापासून निकाल सांगायला सुरुवात झाली होती. सातवीचा निकाल सांगताना टिचरांनी सौंदर्या संपूर्ण वर्गात पहिली आल्याचे सांगताच सारा हॉल टाळ्यांच्या कडकडाटात गर्जून गेला.
सौंदर्याच्या डोळ्यांत पाणी आले. सुपरवायझर टिचरांनी जवळ येऊन तिला आपल्या मिठीत घेतले. आणि कौतुकाने तिची पाठ थोपटली. मम्मी-पप्पांचाही ऊर अभिमानाने भरून आला.

No comments:

Post a Comment