जो कोणी अंतराळात वर्चस्व गाजवेल तो जगातील सर्वात मोठा सम्राट असेल. गेल्या वर्षी रशियाने आपल्या एका उपग्रहावरून क्षेपणास्त्र हल्ला करून दुसरा उपग्रह पाडला होता. तेव्हापासून रशियाच्या या पावलाकडे अंतराळ युद्धाच्या आघाडीत रुपांतर करण्याच्या दिशेने एक प्रमुख रणनीती म्हणून पाहिले जात आहे. इतकंच नाही तर चीन अंतराळ युद्धासाठीही खूप वेगाने तयारी करत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अवकाशात पोहोचले आहे. रशियाच्या अंतराळ संस्थेच्या प्रमुखाने अमेरिकेला धमकी दिली आहे की मॉस्कोवर लादलेल्या निर्बंधांमुळे अवकाशस्थानक (स्पेस स्टेशन- आयएसएस) वरील दोन्ही देशांमधील सहकार्य संपुष्टात येऊ शकते. रशियाने असेही म्हटले आहे की आमच्याकडे आयएसएस खाली पाडण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत, ज्याचा फटका भारत आणि चीनलाही सहन करावा लागू शकतो. आता अशी बातमी आहे की अमेरिकन स्पेस एजन्सी - नासा देखील या स्पेस स्टेशनमधील रशियाचे सहकार्य संपवण्याच्या तयारीत आहे. अमेरिका आता जपानच्या मदतीने ते चालवणार असल्याची चर्चा आहे.
रशिया आणि अमेरिका यांचे अंतराळ क्षेत्रात जवळपास तीन दशकांपासून घनिष्ठ सहकार्य राहिले आहे. मात्र युक्रेनवरील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेसह संपूर्ण युरोपने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाची अंतराळ मोहीमही या निर्बंधांच्या नियंत्रणाखाली आली आहे. साहजिकच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम अवकाशातही दिसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनीही अमेरिकेच्या निर्बंधांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोगोझिनने अशी धमकीही दिली होती की या निर्बंधांमुळे अवकाशस्थानक (स्पेस स्टेशन) कधीही भारत किंवा चीनवर आदळू शकते. अमेरिकेला हेच हवे आहे का, याचे उत्तर आपल्याला लवकरच मिळेल. रशियाने पाश्चात्य देशांसाठी उपग्रह सोडण्यास नकार देण्याची धमकीही दिली आहे. रशियन इंजिन स्पेस स्टेशनच्या हालचाली नियंत्रित करतात. युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भात रशियन सैन्याच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिका अंतराळातून लक्ष ठेवून आहे.
काही दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये चौसष्ट किलोमीटर लांबीच्या रशियन लष्करी ताफ्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. यामध्ये रशियन सैन्याचा ताफा युक्रेनच्या दिशेने जाताना दिसला. अमेरिकेकडून मिळालेल्या या उपग्रह छायाचित्रांच्या मदतीने युक्रेनचे लष्कर आपल्या लष्कराला सहज लक्ष्य करत असल्याचे रशियाला वाटत आहे. याद्वारे युक्रेनच्या लष्कराला कोणत्या भागात किती रशियन सैन्य आहे हे सहज कळू शकते. अंतराळातून रशियाच्या सैन्याच्या हालचाली टिपून अमेरिका अशा प्रकारे युक्रेनला मदत करत असल्याचे रशियाला कळून चुकले आहे. जगातील मोजक्याच देशांच्या सैन्याकडे उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, आता अनेक कंपन्याही या व्यवसायात आल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सामायिक ताकद रशियापेक्षा कितीतरी जास्त असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशी माहिती देण्याचा एक फायदा असाही आहे की पाश्चिमात्य देश आपले सैन्य थेट युक्रेनमध्ये पाठवण्याऐवजी या छायाचित्रांद्वारे अचूक माहिती देत आहेत आणि या छायाचित्रांच्या आधारे युक्रेनकडून रशियन सैन्याला वेगाने प्रत्युत्तर दिले जात आहे.
अलीकडेच 'स्पेसएक्स'चे मालक एलोन मस्क यांनी देखील युक्रेनला मदत करण्याची घोषणा केली होती. 'स्पेसएक्स' ही केवळ अमेरिकेमधीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी खासगी अंतराळ कंपनी आहे. स्पेसएक्स युक्रेनला केवळ उपग्रहांवरील छायाचित्रेच नाही तर संवाद साधने देखील देऊ शकते. इलॉन मस्कने युक्रेनला त्याच्या हाय-स्पीड इंटरनेट सेवा, स्टारलिंक सिस्टीममध्ये प्रवेश देण्याची ऑफर दिल्याचेही अहवाल आले आहेत. अशा स्थितीत रशियाने युक्रेनमधील इंटरनेट सेवा आणि दळणवळण बंद केले तरी त्याला स्टारलिंककडून या सेवा मिळत राहतील.
रशियन स्पेस एजन्सीचे प्रमुख रोगोझिन म्हणाले की जर आमच्याशी सहकार्यात व्यत्यय आला तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अनियंत्रितपणे कक्षेच्या बाहेर जाण्यापासून आणि ते अमेरिका किंवा युरोपमध्ये पडण्यापासून आम्हाला कोण रोखू शकणार नाही. हे 500 टन वजनाचे अंतराळस्थानक भारत किंवा चीनवरही पडू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. रोगोझिन म्हणाले - 'अंतराळस्थानक रशियावरून उड्डाण करत नाही, त्यामुळे सर्व जोखीम तुमचीच आहे. तुम्ही त्यासाठी तयार आहात का?' असा सवालही उपस्थित केला आहे. अंतराळवीर त्यात आठवडे किंवा महिनोन्महिने राहतात आणि विविध प्रयोग, संशोधन करतात. 1998 मध्ये रशिया, अमेरिका, जपान, कॅनडा आणि युरोपच्या मदतीने ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत वीसहून अधिक देशांतील दोनशेहून अधिक अंतराळवीरांनी या स्थानकाला भेट दिली आहे. आयएसएस कार्यक्रमात रशिया आणि अमेरिका हे प्रमुख देश सहभागी आहेत. त्यांची यातील गुंतवणूक मोठी आहे. कॅनडा, जपान, फ्रान्स, इटली आणि स्पेन यासारखे अनेक युरोपीय देशही यामध्ये सहभागी आहेत. विशेष म्हणजे 2 नोव्हेंबर 2000 रोजी एक मानव प्रथमच अवकाश स्थानकावर पोहोचला होता. तेव्हापासून ते अवकाशस्थानक आजतागायत कधीच रिकामे राहिलेले नाही. या मोहिमेवर आतापर्यंत शंभर अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आला आहे. सुमारे पंच्याहत्तर ट्रिलियन रुपयांपासून बनवलेली ही जगातील सर्वात महागडी वस्तू आहे. पृथ्वीपासून शंभर किलोमीटर अंतरावर अंतराळ सुरू होते. अंतराळ स्थानक सुमारे 400 किमी उंचीवर आहे. ते एका ठिकाणी स्थिर नसते. ते ताशी अठ्ठावीस हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती फिरते. एवढ्या वेगाने फिरणारे हे स्थानक नव्वद मिनिटांत पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करते.
रशिया आता स्वतःचे स्पेस स्टेशन बनवण्याची आणि व्यवस्थापित करण्याची योजना आखत आहे, जे त्याला 2030 पर्यंत कक्षेत स्थापित करायचे आहे. इंटरफॅक्सच्या अहवालानुसार, रशियाचे स्पेस मॉड्यूल एनर्जीया कॉर्पोरेशन तयार करत आहे. त्याची किंमत सध्या 5 अब्ज डॉलर एवढी आहे. विशेष म्हणजे रशियानेच 2025 पर्यंत आयएसएसपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. रशियाच्या या वक्तव्यानंतर अमेरिकी अंतराळ संस्था नासानेही रशियाच्या मदतीशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक चालवण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.तरीही त्याच्यासाठी हे सोपे असणार नाही. आयएसएस मोहिमेतील अमेरिकेचे काम येथे येणाऱ्या अंतराळवीरांसाठी खाण्यापिण्यापासून ते या आणि इतर आवश्यक गोष्टींपर्यंत ऊर्जा उपलब्ध करून देणे हे आहे. स्टेशनसाठी ऑपरेशनल आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करणे हे रशियाचे काम आहे. अशा स्थितीत नासाला ते चालवण्याचा नवा मार्ग शोधावा लागणार आहे. 'आयएसएस'ची कक्षा आणि अंतराळातील जागा ठरवण्याचे काम रशियन इंजिन करतात आणि रशिया त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. जर रशिया यापासून वेगळे झाला, तर हे स्टेशन अनियंत्रितपणे कक्षेबाहेर जाईल, ज्यामुळे ते पृथ्वीवर पडू शकते.
खरे तर युद्ध आता जल, जमीन आणि आकाशात म्हणजे अवकाशात पोहोचले आहे. या युद्धात रशिया आणि अमेरिका हे मोठे खेळाडू म्हणून पुढे आले आहेत. तसे पाहता, अमेरिका, रशिया आणि चीन अनेक दिवसांपासून या युद्धाची तयारी करत आहेत. त्यांना असे वाटते की जो अवकाशावर वर्चस्व गाजवेल तोच जगातील सर्वात मोठा सम्राट होईल. गेल्या वर्षी रशियाने आपल्या एका उपग्रहावरून क्षेपणास्त्र हल्ला करून दुसरा उपग्रह पाडला होता. तेव्हापासून रशियाच्या या हालचालींना अंतराळ युद्धाच्या आघाडीत रुपांतर करण्याच्या दिशेने एक प्रमुख रणनीती म्हणून पाहिले जात आहे. इतकंच नाही तर चीन अंतराळ युद्धासाठीही खूप वेगाने तयारी करत आहे. रशिया आणि चीनच्या समान आव्हानामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर संकट निर्माण झाले आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली