Saturday, June 30, 2018

प्लास्टिकबंदी, केनिया आणि घायपात


     महाराष्ट्र सरकारने राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला,पण तो अर्धकच्चा घेतला. कुणाला सूट तर कुणाला बंदी अशा अर्धवट निर्णयामुळे काहींचा रोष ओढवून घेतला आहे,तर काहींना सवलत देऊन खूश केले आहे.याच्याने सरकारच्या पारड्यात नेमके काय पडले, असा प्रश्न निर्माण होतो. प्लास्टिक बंदीबाबत संभ्रमावस्था आहे. आता परवा किराणा माल पुरवणार्या दुकानदारांसाठी प्लास्टिक वापराला सवलत दिली आहे. म्हणजे हे प्लास्टिक पुन्हा घराघरात आणि मग उकिरड्यांवर, गटारीत पडणार! हीच अवस्था दुधाच्या पिशव्यांची आहे. त्यामुळे सरकारने या प्लास्टिक बंदीतून काय साधले? या म्हणण्याला जागा आहे. परवा म्हणे वडापाव विकणार्या मालकाने हातात प्लास्टिक चा वापर ग्लोजप्रमाणे केला म्हणून त्याला पाच हजारचा दंड ठोठावण्यात आला. साहजिकच सर्वसामान्यांना प्रश्न पडतो, हा कुठला न्याय?

     या प्लास्टिक बंदीतून कायद्याची अंमलबजावणी करणार्या डिपार्टमेंटची मात्र चैन असल्याचे म्हटले जात आहे. एक दुकानदार मला म्हणाला, चला! आज चैनी करायची ना तर चला बकरा गाठू. असे म्हणत ही माणसे एकाद्या दुकानावर, मटण-चिकनच्या शॉपवर छापा टाकतील. पाच हजाराचा दंड सोडून काही तरी सेटलमेंट करतील आणि चैनीपुरते पैसे उकळून मोकळे होतील. अर्थात त्याचे म्हणणे अगदीच खोटे नाही. आपल्याकडे असंच चालते. त्यामुळे सरकारने प्लास्टिकबंदी करून फार मोठा तीर मारला आहे, असे काही नाही. उलट यातून काहीच साध्य होणार नाही. आजही पान शॉपवर मावा प्लास्टिक पिशवीतच मिळतो. गुटख्या-मसाल्याच्या पुड्या अजूनही रस्त्यावरच पडलेल्या आपल्याला दिसत आहेत. खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या पिशव्यांमधून घेणे आरोग्याला हानिकारक असल्याचे सांगितले जात असले तरी अजूनही हे पदार्थ प्लास्टिकच्या पिशव्यांमधूनच मिळतात.
     यातली दुसरी बाजू म्हणजे राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीमुळे 25 हजार छोट्या-मोठ्या उद्योगांवर कुर्हाड पडली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार हिरावून घेतले गेले आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणजे आपण पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी याला पर्याय उभा केलेला नाही. त्यामुळेच ही बंदीसुद्धा फसण्याची अधिक शक्यता आहे. जी अवस्था आज गुटखा बंदीची आहे, तीच अवस्था प्लास्टिक बंदीची होणार आहे. आपल्याकडे अवैध धंद्यांना बंदी आहे, पण ते बंद असल्याचे कुठेच आढळून येत नाही. अवैध प्रवाशी वाहतूक, गावठी दारू निर्मिती आणि विक्री, मटका, चक्री जुगार बिनबोभाट सुरू आहेत. कायद्याची अंमलबजावणी होताना कुठेच दिसत नाही.
     आपण आपल्या भारत देशातल्या महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदी बाबतचे चित्र आपण पाहिले आहे. आता थोडे आपण दुसर्या देशातले चित्र पाहू. केनिया,ब्राझिल आणि टांझानिया या देशांमध्ये पूर्णपणे प्लास्टिकवर बंदी आहे. त्याचा वापर करणार्यांना भारी शिक्षेला तोंड द्यावे लागते. पण तिथे प्लास्टिकला पर्याय दिला आहे शिवाय यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. उलट नवे व्यवसाय-उद्योग उभे राहिले आहेत. शेतीत सुधारणा झाली आहे. केनियात प्लास्टिकच्या जागी सिसल झुडपांपासून बनवण्यात येणार्या पिशव्यांचा वापर होत आहे. या झाडांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यापासून शोपिंगच्या बॅगा बनवल्या जातात. या बॅगांचा वापर वाढला आहे. शेतकरी आपल्या पारंपारिक शेतीबरोबरच सिसलचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेत आहेत. यातून मोठा फायदा शेतकर्यांना होत आहे. सिसलपासून बॅहा बनवणे अतिशय सोपे आहे. शिवाय या बॅगा कोठेही फेकल्या गेल्या तरी त्या जमिनीत मिसळून लगेच कुजतात.
   
 ब्राझिल, टांझानिया पाठोपाठ आता केनियादेखील सिसलचे उत्पादन घेणारा तिसर्या क्रमांकाचा देश ठरला आहे. दरवर्षी सिसलच्या उत्पादनातून दोन कोटी डॉलरची मिळकत होत आहे. जर सिसलची मागणी अशीच वाढली तर पुढच्या पाच वर्षात हीच मिळकत 50 कोटी डोलरची होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. केनिया सरकार सिसल शेतीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान देत आहे. सद्या तिथे प्लास्टिकचा कचरा पूर्णपणे हटवला जात आहे. नौरोबीमध्ये रोज सकाळी विद्यार्थी, स्वयंसेवक आणि सरकारी कर्मचारी मिळून जलसाठे स्वच्छ करत आहेत.पर्यावरण वाचवण्यासाठी प्लास्टिकला तिलांजली देणे गरजेचे आहे, याची जाणीव तिथल्या लोकांमध्ये झाली आहे. अशी परिस्थिती आपल्याकडे आहे का?
     सिसल म्हणजे कोणते झुडूप माहित काय? आपल्या दुष्काळी भागात उगवणारे घायपात! यापासून एक समाज दोरखंड तयार करतात आणि आपली उपजीविका करतात. आपल्याकडे हे भरपूर प्रमाणात पिकते. पण आपण त्याचा वापर करायलाच शिकलो नाही. त्यामुळे ही वनस्पती दुर्लक्षितच आहे. आपल्या सरकारनेही प्लास्टिकला पर्याय उभा केला असता तर चांगले परिणाम दिसले असते. बघा! अजून वेळ गेलेली नाही.

Thursday, June 28, 2018

धोक्याच्या बदल्यात धोका


     प्रामाणिकपणा हा माणसाचा खरा अलंकार आहे. संत सुकरात म्हणतात, ज्याला प्रामाणिकपणा नाही, तो माणूस नाही. सर्व काही विकले तरीही आपला प्रामाणिकपणा कधीही विकू नका, असे आवाहनही त्यांनी आपल्याला केले आहे.म्हणजे माणसाजवळ प्रामाणिकपणा नसेल, तर त्याच्याकडे दुसरे त्याचे म्हणून काहीच उरत नाही. त्यामुळे एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून लोक तुम्हाला ओळखत असतील तर, तुम्ही एक महत्त्वाची व्यक्ती आहात, हे लक्षात ठेवा. आणि हे आजच्या घडीला दुर्मीळ आहे, असे म्हणायलाही हरकत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणा जपायला शिकले पाहिजे.

     धन दौलतीच्या मोहापायी जी माणसं आपला धर्म आणि प्रामाणिकपणा विकून खातात, अशा व्यक्तीचा आत्मा कधीच शांत होऊ शकत नाही, असे म्हणतात. वास्तविक, ज्याने पैशांचा संचय केला आहे, अशा माणसाला कधीच शांत झोप लागत नाही. आपण दुसर्याला लुबाडून आपले घर भरलेले असते,पण आपलेही घर कोणी तरी लुटेल, याची त्याला सतत भिती वाटत असते. त्यामुळे अशी माणसे सतत चलबिचल असतात. तणावाखाली असतात. पण ज्याने प्रामाणिकपणाने कमावलेले असते, त्याला कुणाचीच आणि कसलीच भिती नसते. अशी माणसे बिनधास्त रात्री झोपी जातात. सकाळी फ्रेश होतात आणि आनंदाने कामाला जातात.
     सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण काय बोलतो, यावरून आपला प्रामाणिकपणा ठरत नाही, तर आपण काय करतो, हे महत्त्वाचे असते. त्यावरून आपला प्रामाणिकपणा ठरत असतो. त्यामुळे आपले वागणे आदर्शवतच असले पाहिजे.कोणत्याही व्यक्तीचा प्रामाणिकपणा आपण आयकर विवरण पत्रासारखा भरून घेऊ शकत नाही. कारण प्रामाणिकपणा तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो आणि तो त्याच्या मानसिकतेत वसलेला असतो, कागदात नाही. प्रामाणिक माणसाचे व्यक्तिमत्त्व भरदार असते. तिथे भलेभले नतमस्तक होत असतात. अशा व्यक्तिमत्त्वाजवळून जाण्याची काहींची लायकीसुद्धा नसते. अशी माणसे या व्यक्तींकडे जाण्याचे धाडस करत नाहीत. कारण ती स्वत:च स्वत:च्या कर्मामुळे खजिल झालेली असतात.
     आपल्याला माहित आहे, जशास तसे, ठकास महाठक, जैसे को वैसा तसे धोका देणार्याला धोका हा मिळतच असतो. आणि प्रामाणिकपणे काम करणार्याला यश मिळतच असते. त्यामुळे चुकीचे वागू नका, भलतासलता मार्ग धरू नका. प्रामाणिक काम करत राहा, यश हे नक्की मिळतच असते, असे आपली संत मंडळी सांगून गेले आहेत. नाही तर जशास तसे उत्तर द्यायला माणसे तयारच आहेत. यासदंर्भात एक गोष्ट सांगितली जाते. एक शेतकरी होता. एक बेकरीवाला रोज त्याच्याकडून दोन किलो लोणी घेऊन जायचा. एके दिवशी बेकरीवाल्याची लहर फिरली. त्याने लोणीचे वजन करण्याचा निर्णय घेतला. कदाचित शेतकरी आपल्याशी लबाडी करत नसेल, असेही त्याला वाटले आणि लोणी त्याने तराजूत तोलून पाहिला. आणि काय आश्चर्य! लोणी कमी आढळून आला.  बेकरीवाल्याचा अंगाचा  रागाने तीळपापड झाला. शेतकर्याने आपल्याला फसवले आहे, याची त्याला खात्री झाली आणि या शेतकर्याने आपल्याला किती लुबाडले, याचा अंदाजही करू लागला, तसा त्याचा बीपी वाढत चालला. बेकरीवाल्याने शेवटी शेतकर्याला न्यायालयात खेचले.
तिथल्या न्यायाधीशाने शेतकर्याला विचारले, “ लोणी तोलण्यासाठी तुम्ही काय करता? तोलण्यासाठी काही निश्चित असे भांडे वैगेरे ठेवला आहात का?  शेतकरी म्हणाला, “ श्रीमंत! मी गरीब आहे. माझ्याकडे यासाठी निश्चित असा उपाय सापडत नव्हता पण मी यासाठी निश्चित एक उपाय शोधला होता.
     न्यायाधीशाने विचारले, “ मग सांगा,तुम्ही लोणी तोलण्यासाठी काय वापरता?ङ्घ
     शेतकर्याने उत्तर दिले, “ खूप दिवसांपासून बेकरीवाला माझ्याकडून लोणी खरेदी करतो. मीही त्याच्याकडून दोन किलोचे ब्रेड खरेदी करतो. तो रोज ब्रेड घेऊन येतो आणि तेच दोन किलोचे ब्रेड तराजूच्या दुसर्या बाजूला ठेवतो. आणि तेवढ्याच वजनाचे लोणी त्याला विकत देतो. लोणी कमी पडले असेल तर यात माझा काही दोष नाही. दोष असेल तर तो या बेकरीवाल्याचा आहे. ” अर्थात बेकरीवाला खजिल झाला, हे सांगण्याची काही गरज नाही.
     याचा अर्थच असा की, धोक्याच्या बदल्यात धोकाच मिळत असतो. आणि प्रामाणिक काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळते.

Wednesday, June 27, 2018

हिंसाचारामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी


     हिंसाचारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या वर्षी एक हजार 190 अब्ज डॉलर म्हणजेच 80 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. ही रक्कम आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला वाटली तर ती प्रत्येकाला 40 हजार रुपये येईल, असा त्याचा अंदाज काढता येईल. हा डोके सुन्न करणारा आणि धक्कादायक असा खुलासा इंस्टीट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसच्या अहवालात करण्यात आला आहे. यावरून गेल्या दशकात सार्वजनिक संपत्तीचे आणि सर्वसामान्य लोकांचे किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज येईल. अहवालाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर हिंसाचारामध्ये 2017 च्या दरम्यान सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)च्या नऊ टक्के नुकसान झाले आहे. जर ही धनराशी शिक्षण किंवा आरोग्याच्या क्षेत्रात खर्च केली गेली असती तर शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल पाहावयास मिळाला असता. हा अहवाल 163 देशांच्या अध्ययनावर आधारित तयार करण्यात आला आहे. अहवालात जागतिक परिस्थितीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. यात सांगितले गेले आहे की, हिंसाचारामुळे वैश्विक अर्थव्यवस्थेचे जवळपास पंधरा हजार अब्ज डॉलर इतके नुकसान झाले आहे.ही रक्कम जीडीपीच्या सुमारे साडेबारा टक्के इतकी असून ती प्रत्येक माणसाला विभागून दिली तर दोन हजार डॉलर येईल. या अहवालात असेही म्हटले आहे की, प्रामुख्याने अंतर्गत सुरक्षा खर्चात वाढ झाल्याने वैश्विक हिंसाचाराचा वैश्विक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये दोन टक्क्यांनी वाढला आहे. अहवालातून आणखी एक गोष्ट उजेडात आली आहे, ती म्हणजे आशियाई खंडाअंतर्गत, बाह्य संघर्ष आणि शेजारील देशांमधील संबंधांमध्ये उल्लेखनिय अशी सुधारणा झाली आहे. परंतु हिंसक गुन्हेगारी,दहशतवादाचा प्रभाव आणि राजकीय अस्थिरता याबाबतची परिस्थिती फारच खराब आहे.

     दक्षिण आशियाई क्षेत्रात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अत्यंत संवेदनशील आहेत. आणि यांची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी खराब होत चालली आहे. सिरिया हा देश सध्या जीडीपीच्या 68 टक्के नुकसानीसोबत अग्रस्थानावर आहे. 63 टक्के अफगाणिस्तान आणि 51 टक्के नुकसानीसोबत इराण देश तिसर्या स्थानावर आहे. या देशांची सर्वात खराब कामगिरी आहे, असा हा अहवाल सांगतो. अहवालावरून आणखी एक दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या असे लक्षात येईल की, अंतर्गत हिंसाचारामुळे चीनी अर्थव्यवस्थेचे सतराशे अब्ज डॉलर आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचे  सहाशे अब्ज डॉलर तर रशियाचे एक हजार अब्ज डॉलर नुकसान झाले आहे. विकसित देशांचा विचार केला तर अमेरिकेतील हिंसाचार हा जवळपास तीन खरब असून तो त्यांच्या जीडीपीच्या सात टक्के आहे. ब्रिटनमध्ये हेच प्रमाण 312.27 अब्ज डॉलर आहे. हे त्यांच्या जीडीपीच्या तुलनेत सात टक्के आहे. दहा प्रमुख खराब देशांमध्ये अल सल्वाडोर आणि दक्षिण सुदानचाही समावेश आहे. हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीच्याबाबतीत तशी बर्यापैकी परिस्थिती स्विझर्लंडची आहे.
     आपल्या भारताचा विचार केला तर असे लक्षात येईल की, इथे अलिकडे जातीय, धार्मिक आणि राजकीय समूहा दरम्यान संघर्ष होत आला आहे. हे खरे की, बहुंताश संघर्ष हिंसात्मक रुप घेत नाहीत. पण काही प्रकरणांमध्ये हिंसाचाराचे स्वरुप इतके भयावह असते की, यामुळे सामाजिक परिस्थिती पार बिघडून जाते. इथे आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे राजकीय पक्ष आपल्या हितसंबंधासाठी जाती-जातींना आणि धार्मिक समुहांना उकसवतात. त्यामुळे परिस्थिती फारच बिकट बनते. गेल्या काही दशकातल्या आंदोलनावर दृष्टीक्षेप टाकला तर आपल्याला बहुतांश आंदोलनांमागे राजकीय पक्षांचा हात असल्याचे दिसून येईल. कधी ते जातीय आणि धार्मिक  उदाहरणे पुढे करत लोकांमध्ये भडकवण्याचे काम केले जाते. तर कधी ते भाषा आणि आरक्षणाच्या प्रश्नांवर आपली पोळी भाजून घेताना दिसतात.
      गेल्या वर्षी दार्जिलिंगमध्ये ज्यावेळेला हिंसाचार भडकला होता, याला कारण होतं, राज्य सरकारने पर्वतीय प्रदेशातील शाळांमध्ये बंगाली भाषा शिकवण्याचा घेतलेला निर्णय. त्यामुळे लोक भडकले आणि याचा परिणाम असा झाला की, याचे पर्यावसान गोरखालँड राज्याच्या मागणीत झाले. यात हिंसाचारात हजारो-कोट्यवधींचे नुकसान झाले. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी हरियाणातही आंदोलनातून हिंसाचार घडला.यातून फक्त हरियाणातील एकता आणि बंधुभाव याला तडे गेले नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले.          आंदोलकांनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारून आपल्या विरोधकांची दुकाने, घरे आणि वाहने यांना आगीच्या भक्ष्यस्थानी दिले. या हिंसाचारात तीसपेक्षा अधिक माणसे मारली गेली. आणि शेकडो जखमी झाले. एसोचॅमच्या अहवालानुसार या हिंसात्मक आंदोलनामुळे हरियाणा राज्याचे जवळपास तीस हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ही रक्कम जर राज्याच्या विकासकामांना लावली असती तर राज्याचे भलेच झाले असते. आंदोलन करणार्या लोकांनी रस्ते जाम करण्यासाठी हजारो झाडांची कत्तल करून पर्यावरणाचेही नुकसान केले होते. अशाच प्रकारे गेल्यावर्षी गुजरातच्या पाटीदार समाजाने आरक्षणाच्या मागणीवरून हिंसेचेच प्रदर्शन केले होते. यामुळे खासगी आणि सरकारी संपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. या हिंसाचारात साडेतीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. गेल्या वर्षी मध्यप्रदेशात शेतकर्यांचे आंदोलन झाले. यातही काही शेतकरी मारले गेले आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
     सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनाच्या नावावर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणार्या आणि हिंसाचार घडवून आणणार्यांच्या विरोधात कडक धोरण अवलंबण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचे असेही म्हणणे होते की, आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या राजकीय पक्ष आणि संघटनांनी या नुकसानीची भरपाई करावी.  ही टिप्पणी गुजरातमध्ये झालेल्या पाटीदार आंदोलनाचा नेतृत्वकर्ता हार्दिक पटेलच्या सुनावणीच्यादरम्यान केली होती. यावेळी असेही सांगितले होते की, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान पोहचवणार्या लोकांवर कारवाई करताना काही निश्चित अशी धोरणे राबवावीत, निश्चित अशी दिशा ठरवावी. पण बघा, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही आजही हिंसाचार घडवणारी आंदोलने होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात परवा एसटीच्या कर्मचार्यांनी पगारवाढीसाठी आंदोलन करताना आपल्याच एसटीचे नुकसान केले.
     भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात प्रत्येक नागरिकाला आणि समुदायाला आपले म्हणणे सकारात्मदृष्ट्या मांडण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. योग्य मार्गाने आंदोलन करण्याचाही अधिकार दिला आहे. असे असतानाही हिंसाचार घडवत आंदोलन करणारे देशाच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करत आहेत. यामुळे देशातील शांतता, धर्मनिरपेक्षता याला तडे जात आहेत. देश वेगळ्याच दिशेने जात असून यामुळे आपल्या देशाचे कदापि भले होणार नाही. फक्त आणि फक्त नुकसानच होणार आहे. यातून देश महासत्ता कसा होणार, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

यशाचं रहस्य काय?


     ‘ पुढच्याच ठेच ,मागचा शहाणा’ अशी एक म्हण आहे. म्हणजे पुढच्या माणसाने ज्या चुका केल्या, ते चुका आपल्या हातून होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. यशाचे खरे हेच गमक आहे. यश मिळवण्यासाठी उगीच घाई करून चालत नाही. शिवाय एकापेक्षा अधिक कामांत हात घालून चालत नाही. कारण त्यामुळे कुठल्या एकाच कामाकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. एका वेळी एकापेक्षा अधिक कामे करणारी व्यक्ती कोणत्याही कामात यश मिळवू शकत नाही. दोन नावांमध्ये बसून प्रवास करणार्यांप्रमाणेच बुडणे हेच त्याच्या नशिबी असते. ‘एक ना भर भाराभर चिंध्या’ असे उगीच म्हटलेले नाही. म्हणजे अपयशाची अनेक कारणे आहेत, ही यशस्वी होणार्या माणसाने अयशस्वी लोकांकडून शिकले पाहिजे. त्यामुळे अपयशी माणसेही वाचायला शिकली पाहिजेत, हे प्रामुख्याने लक्षात ठेवले पाहिजे.

     यश मिळवण्यासाठी विनाकारण घाई करून चालत नाही. कारण यशासाठी केलेली घाई, हीसुद्धा अपयशी होण्याचे कारण आहे. आणि ही चूक आपण लगेच सुधारली पाहिजे. जर त्यातून आपण काही शिकू शकलो नाहीत तर मात्र शेवटी पदरी आपल्या धोकाच आहे. प्रेरक विचार देणारे सूर्यासिन्हा म्हणतात,यशस्वी लोक चुका करून त्यांचा स्वीकार करतात आणि त्यात सुधारणा करून पुढे जातात. हुशार लोक आपल्या आणि दुसर्याच्या अपयशातून धडा घेतात आणि आपले सर्व लक्ष यशावर लक्ष केंद्रित करतात.
     एकदा पराभवाने खचलेली व्यक्ती जीवनात यशस्वी झालेल्या एका व्यक्तीकडे गेला. त्याने यशस्वी व्यक्तीला विचारले, “दादा, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? ” यशस्वी व्यक्ती त्याला म्हणाली,“ आयुष्यात जी माणसं यशस्वी झाली नाहीत, त्यांच्याकडूनच तर मी जीवनात यशस्वी होण्याचे धडे घेतले आहेत. अपयशी व्यक्ती म्हणाली, तुम्ही काय सांगता आहात, ते मला काही कळालं नाही, जरा समजून सांगितलं तर बरं होईल. तेव्हा यशस्वी व्यक्ती म्हणाली, मला सांगा, तुमच्या पदरात अपयश का पडल?
     अपयशी माणूस म्हणाला, “ पूर्वी मी खूप श्रीमंत होतो. यशस्वी होण्यासाठी मी एक कंपनी काढली. त्यात मी खूप मोठी गुंतवणूक केली. मला लगेच यशस्वी व्हायचं होतं. त्यामुळे मी त्याचवर्षी पुन्हा एक दुसरी कंपनी सुरू केली. त्यात मी माझे उरलेले सगळे पैसे गुंतवले. मी घाईगडबडीने दोन कंपन्या सुरू केल्या,पण मला कोणत्याही कंपनीला पूर्ण वेळ देता आला नाही.
     तो पुढे सांगू लागला, काही वर्षातच दोन्ही कंपन्या तोट्यात गेल्या. मला त्या कंपन्या वर काढण्याकरता पैसाच मिळाला नाही. मग काय! दिवसेंदिवस तोटा वाढत चालला आणि शेवटी एक दिवस कंपनी बंद करावी लागली. आज मी पूर्ण अपयशी आहे.
     आता यशस्वी व्यक्ती म्हणाली, तुमच्या अपयशाची दोन कारणे आहेत.एक म्हणजे,तुम्ही एकाच वेळी दोन कंपन्या सुरू केल्या. त्यामुळे तुम्ही कुठल्याही एका कंपनीला पूर्ण वेळ देऊ शकला नाही. दुसरे कारण म्हणजे,तुम्ही या दोन्ही कंपन्यांमध्ये तुमचा सगळा पैसा गुंतवला. ज्यावेळेला तुम्हाला कंपन्यांमध्ये तोटा झाला,त्यावेळेला त्या कंपन्या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तुमच्याजवळ पैसाच शिल्लक नव्हता. आता मी जे सांगितले, हे बरोबर आहे का? तुम्ही याच्याशी सहमत आहात का?
 मग आता मला सांगा,या अपयशातून तुम्ही काय शिकला? 
     अपयशी व्यक्ती म्हणाली, मी माझ्या अपयशातून काय शिकणार? यशस्वी झालो असतो तर बरंच काही शिकलो असतो.
     यशस्वी व्यक्ती म्हणाली, तुम्ही तुमच्या अपयशातून काहीच शिकला नाहीत. म्हणून तुम्ही आजदेखील अपयशी आहात.मी मात्र अपयशी लोकांच्या अपयशातूनच शिकलो आणि यशस्वी झालो. मी अपयशी लोकांनी ज्या चुका केल्या, त्या चुकांमधून शिकलो आणि माझ्या आयुष्यात त्या चुका केल्या नाहीत. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. ” 

Tuesday, June 26, 2018

पावसाळा आला... विजेपासून स्वत:ला सांभाळा


     सांगली जिल्ह्यातल्या लिंगनूर गावातल्या दोघांचा विजेचा शॉक बसून मृत्यू होण्याची घटना नुकतीच घडली आहे. विद्या भैराप्पा कुडचे (वय 33) ही महिला तारेवर कपडे वाळत घालत होती. या तारेतच वीजप्रवाह होता,त्यामुळे ही महिला जागीच ठार झाली. दरम्यान, विद्या कशामुळे खाली कोसळली याची पाहणी करत असताना त्या महिलेचा सासरा बसगोंडा याचाही या तारेला स्पर्श झाला आणि विजेचा जबर शॉक लागून त्याचाही मृत्यू झाला. ही घटना निष्काळजीपणा झाली आहे, असे म्हणायला जागा आहे, योग्य ती खबरदारी घेतली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.

     विद्या या नेहमी कपडे बाहेर घालत होत्या.पावसाचे वातावरण असल्याने त्यांनी धुतलेले कपडे घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या तारेवर टाकायला गेल्या. त्यात विद्युतप्रवाह होता,त्यामुळे त्यांना विजेचा शॉक लागला. कुडचे यांनी घरातून वायर टाकून शेडमध्ये वीज नेली होती. या वायरचे प्लास्टिक कोटिंग झिजून निघून गेले होते. त्यामुळे त्याचा विद्युतप्रवाह तारेत गेला होता. वेळोवेळी खबरदारी घेतली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. अशा घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घडतात. आणि हकनाक लोकांचा जीव जातो. त्यामुळे या घटना रोखणे, हे मोठे आव्हान असून वीज वितरण कंपनीसह सामाजिक संस्थांनी यासाठी जागृती करण्याबरोबरच घरोघरी जाऊन वीज प्रवाहाची परिस्थिती पाहून संबंधितांना सूचना द्यायला हव्यात.यासाठी पावसाळ्याअगोदर विशेष मोहीम उघडण्याची गरज आहे.
वास्तविक, पावसाळ्यात दोन प्रकारे विजेचा झटका आपल्याला मिळत असतो. एक आहे ती नैसर्गिक वीज. जी ढगांच्या संघर्षातून निर्माण होते. आणि दुसरी वीज आहे,ती विद्युत वाहिनीतून घरोघरी पोहचलेली महावितरणची वीज.  मानवनिर्मित वीज सोयीसुविधांसाठी असली तरी अनेकदा विद्युत वाहिनीतील उच्चदाब काळ बनून आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सांगली,सातारा,कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी अशा काही घटना या काही दिवसांत घडल्या आहेत. वीजमंडळाचा बेफिकिरपणा आणि नागरिकांना निष्काळजीपणा त्यांच्यासाठीच जीवघेणा ठरत आहे.
     पावसाळ्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या चमचमाटासह पाऊस बरसत असतो. अलिकडच्या मोबाईलसारख्या आधुनिक साधनांमुळे या विजेच्या धक्क्यामुळेही मृत्यू होणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. खरे तर विजेचा चमचमाट,ढगांचा गडगडाट सुरू होतो, तेव्हा लोकांनी आपली सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षित स्थानी आश्रय घ्यायला हवा आहे. शिवाय आता मोबाईलमधून हा विद्युतप्रवाह लोकांपर्यंत येऊ लागल्याने पावसाळ्यात फोनवर बोलणे टाळणे आवश्यक आहे. मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर काळात असंतुलित वातावरणात आकाशात विजा चमकत असतात. हवेतील वाढलेले बाष्प, वरच्या बाजूस जाणारा हवेचा प्रचंड दाब आणि उष्णतेने होणारे अभिसरण यामुळे बनणार्या क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगांतून विजांची निर्मिती होते. ही वीज अनेकदा यमदूत होऊनच कोसळते. छावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या वळीव पावसात अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडत असतात. जशा नैसर्गिक विजेने जीवघेण्या घडतात, तशा मानवनिर्मिती विजेच्या धक्क्यानेदेखील अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
     अशाच घटनेत परवा सातारा जिल्ह्यातल्या वर्णे गावातल्या एकाच कुटुंबातल्या तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्यात वीज खंडीत होण्याचे व शॉक लागण्याचे प्रकार सतत घडत असतात. परंतु वीज का गेली, जा जाते, शॉक का व कसा लागतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होत नाही आणि त्यातून दुदैवी घटना घडतात.पण यातून कोणी बोधही घेत नाही. सोयीसुविधा या आपल्यासाठी असल्या तरी त्याचे तोटेही आहेत, या माहिती घेणे आवश्यक आहे. अनेकदा यंत्रणादेखील दोषी असते,परंतु त्याचवेळी यात गुंतागुतही असते, ती समजून घेऊन होणारे अपघात टाळता येऊ शकतात.
     विजेचे खांब उभे करताना आणि तारा ओढताना काही गोष्टींची खबरदारी घेतली जाते. खांबात वीज उतरू नये म्हणून चिनीमातीचे इन्सुलेटर बसविले जातात. मात्र हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात.पावसाचे पाणी पडले की, त्याला तडे जातात ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. यामुळे आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होऊन फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर फिडर बंद पडला नाही तर मात्र जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. जेव्हा वीज पुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून तिथे वीज पुरवठा आहे किंवा नाही, याची चौकशी करतात. वीजपुरवठा असल्याची खात्री झाल्यावर फिडर चालू केला जातो. वीज मंडळाचे कर्मचारी दक्ष असतील तर दुर्दैवी अपघातांना आळा बसतो. वीजमंडळ पावसाळ्यात सतर्क राहायलाच हवे,त्याच बरोबर लोकांनीही काही गोष्टींत खबरदारी घ्यायला हवी. नाही तर निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो.

वीज गेल्यावर घ्यायची काळजी
1)   प्रत्येकाच्या घरात ELCB switch असायला हवे. यामुळे घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास वीजपुरवठा आपोआप बंद होऊन जिवितहानी टाळता येऊ शकते.
2)   आपल्या घरातले आर्थिंग सुव्यस्थित असणे गरजेचे आहे. त्याची वेळोवेळी तपासणी करून खातरजमा करावी.
3)   उपकरणे हाताळताना पायांत प्लास्टिक पादत्राणे (स्लिपर) घालण्याचे विसरू नका.
4)   उपकरणे कोरड्या ठिकाणी असायला हवीत. ओलावा किंवा पत्र्यापासून लांब असावीत. वायरिंग सुव्यवस्थित असल्याची वेळोवेळी पाहणी करावी. थोड्या थोडक्यासाठी स्वस्तली वायर खरेदी करू नका. चांगली मजबूत,जाड कोटिंग असलेल्या वायरिंगचा वापर करायला हवा.
5)   जनावरे विजेच्या खांबाला किंवा त्याला दिलेल्या ताणाला बांधू नयेत. जनावरांचे गोठे, कडबा गंजीदेखील खांबांपासून दूर असावेत.
6)   तारा वैगेरे तुटल्या असल्यास त्याला हात लावू नका, त्वरित वीज मंडळाशी संपर्क साधा.

Monday, June 25, 2018

हसत जगावे (भग 1)


तू का हसतोयस?
नवरा: डार्लिंग, तू इतकी उदास का आहेस, काही विचार करतेयस का?
बायको: नाही, असं काही नाही, फक्त काही दिवसांपासून ही काळजी लागलीय की, शेवटी काय कमी राहिले माझ्या प्रयत्नात, ज्यामुळे तू लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही हसतो आहेस?
******
डॉक्टर,माझं वजन वाढवा
पुढारी: डॉक्टरसाहेब, माझ्यावर असा काही तरी इलाज करा, ज्यामुळे माझं वजन वाढेल?
डॉक्टर:साहेब,पण तुम्हाला वजन का वाढवायचंय?
पुढारी: डॉक्टरसाहेब,प्रचाराच्यादरम्यान माझी चांदी-तुला केली जाणार आहे.
******
चहासाठी काय पण!
प्रश्: तुम्ही चहा पिण्यासाठी कोणत्या थराला जाल?
उत्तर: अरे, मी एकदा चक्क मुलगी पाहण्याचा कार्यक्रमदेखील केला.
*****
डिनर बॉससोबत
मुलगी: इतका उशीर का झाला, मी कधीची तुझी वाट पाहतेय.
मुलगा: बॉसने थांबवून घेतलं आणि डिनर केलं बॉससोबत...
मुलगी: अरे व्वा! काय खाल्लंस?
मुलगा: शिव्या!

*****
सुंदर बायको
बायको: बघ ना! आपल्या शेजार्यांनी 50 इंचीचा एलईडी टीव्ही खरेदी केला आहे...! तुम्हीदसुद्धा एक विकत आणा ना?
नवरा: अगं डार्लिंग, ज्याच्याजवळ तुझ्यासारखी सुंदर बायको असताना ... तो का बरं फालतुचा वेळ टीव्ही पाहण्यात घालवेल बरं!
बायको: तुम्हीही ना!... काही तरीच!... थांबा हं, मी तुम्हाला भजी तळून आणते.
*****
पुढच्या वर्षी  आणखी भाडे वाढणार
शिक्षक: रेल्वेचे भाडे इतकं वाढूनही प्रवाशीसंख्या वाढतच आहे, काय कारण असावं सांगा बरं?
विद्यार्थी: याचं कारण आहे, प्रत्येकजण असा विचार करतो की, पुढच्या वर्षी आणखी भाडे वाढेल. त्यामुळे आताच प्रवास का करू नये!
*****
तुझ्यासाठी खीर
बायको: तुम्ही माझा वाढदिवस कसा विसरलात बरं?
नवरा: अगं, तुझा वाढदिवस कोण कसं बरं लक्षात ठेवेल...तुझ्याकडं बघितल्यावर जराही वाटत नाही, तुझं वय वाढत चाललंय म्हणून!
बायको: (डोळ्यांतले अश्रू पुसत) खरं... थांबा हं, तुमच्यासाठी खीर घेऊन येते.
*****
चेहरा दिसत नाही
पत्नी कार चालवायला शिकत होती. अचानक तिचे लक्ष आरशाकडे गेले.
पत्नी: अहो, तो समोरचा आरसा बरोबर लावला नाही.
पती: का ?काय गडबड झालीय का?
पत्नी: यात मागून येणारी वाहने दिसत आहेत, पण आपला चेहराच दिसत नाही.
*****
डीजे
मुलगी: (एका मुलाला) काय करतोस?
मुलगा: डीजेंकडे बाबू आहे.
मुलगी: ... असं! ... तर मग माझं गाणं लाव.
मुलगा: ताई, डिस्न्ट्रिक्ट जजकडे बाबू आहे.
*****
वेडाच लग्न करेल
प्रेमिक: प्रिय! आता आपण आपल्या लग्नाची गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायची.
प्रेमिका: नाही, ही गोष्ट मी माझ्या मैत्रिणीला- अमृताला नक्की सांगेन. कारण  ती म्हणते की, तुझ्याशी कुणी तरी वेडाच लग्न करेल.
*****
जावाईबापू रिचार्ज करा
जावईबापूने रागाच्या भरात मेसेज पाठवला.
जावई: तुमची वस्तू दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, जेवण नीट करत नाही, भाकरीचा तर पापडच होतो.
सासू: जावईबापू! तीन तोळ्याचे सोने रिचार्ज करा. एक वर्षांपर्यंत तरी अगदी व्यवस्थित चालेल.

Sunday, June 24, 2018

तरुणीपिढी देश,समाज आणि जगाची आशा


      आपला देश सर्वात तरुण आहे. संपूर्ण जगाची परिस्थिती पाहता आपल्या देशात बेरोजगारी वाढली असली तरी जगात मात्र रोजगार पुष्कळ आहे. फक्त आपल्याला तेवढी योग्यता मिळवायला हवी. चीनसारखा प्रगत देश आज म्हातार्यांचा देश म्हणून गणला जातो,कारण त्यांनी लोकसंख्येला आळा घालण्यासाठी एका कुटुंबाला एकच मूल जन्माला घालता येईल, अशी अट घातली होती. गेल्या तीस-पस्तीस वर्षात या देशात हा नियम, कायदा लागू आहे. त्यामुळे तिथे आजच्या घडीला युवाशक्तीची कमतरता आहे. संपूर्ण देशभरात कमी-जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे इतर देश आपल्या देशाकडे युवकांचा देश म्हणून पाहात आहे,पण आपण मात्र या जगाचा, सध्याच्या परिस्थितीचा विचारसुद्धा करत नाही. आपल्या देशात रोजगार निर्मिती कमी आहे,पण त्याहीपेक्षा आपल्याकडे कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. त्यामुळे आपल्याकडे रोजगार आहे,आपल्याकडेच काय जगभरातदेखील रोजगार पुष्कळ आहे,पण आपल्याकडे त्या योग्यतेचे युवक नाहीत.

     आज नव्या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. रोज काही ना काही घड्तं आहे,नवं येत आहे. या नव्याचा स्वीकार करून त्यात आणखी भर घालून नव्या शोधाची भर घालता येऊ शकते.पण आपल्याकडे ज्या शिक्षणसंस्था आहेत,इन्स्टीट्यूट आहेत,त्याठिकाणी प्रॅक्टिकली करण्यासाठी साधनांचा अभाव आहे. काही तरी करायला हातातच काही मिळत नसेल तर विद्यार्थी त्यातून काय शिकणार आहेत. समोर साधने असल्याशिवाय तेही नव्या तंत्रज्ञानासह उपलब्ध असायला हवीत. तरच आपल्याला त्यातून काही तरी करायला मिळणार आहे. आपल्या देशात विज्ञान क्षेत्रात संधी असतानासुद्धा फक्त राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नवे शोध लागलेले दिसत नाहीत. नोबेल पारितोषिक विजेत्यांची संख्या आपल्याकडे किती आहे, चार-दोनच! एवढा मोठा देश, वेगाने वाढणारी लोकसंख्या पाहता आपल्या देशात किती तरी संशोधक, शास्त्रज्ञ व्हायला हवेत, मात्र तसे झालेले नाही. सत्ताधारी आणि विरोधक फक्त सत्तेच्या साठमारीत मश्गुल आहेत. विज्ञान क्षेत्रात काम करणार्यांचा आरोप आहे की, शासन निधी जेवढा हवा, तेवढा उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे आपल्याकडे शास्त्रज्ञ, संशोधक होऊ शकत नाहीत. ज्यांना यात भरीव कामगिरी करायची आहे, ते परदेशात स्थलांतर करत आहेत. इथली उदासिनता त्यांना इथे थांबू देत नाही. याचा विचार सत्ताधारी मंडळींनी करायला हवा.
     आपल्याकडील प्रसारमाध्यमे राजकारण,सिनेमा आणि क्रिकेट या व्यतिरिक्त काही दाखवतच नाहीत. फुटबॉलसारख्या खेळांचे संपूर्ण जग वेडेपिसे आहे,पण आमच्या देशात मात्र त्यासाठी काहीच किंमत नाही. जगात किती तरी क्षेत्रात संधी आहेत. पण त्यासाठीचे कुशल मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे  सव्वाशे कोटी लोकसंख्या असूनही आपल्याकडे रोजगारासाठीची नवी क्षेत्रे, प्रशिक्षण केंद्रे नाहीत. प्रसारमाध्यमे आपला टीआरपी वाढवण्याच्या नादात भलतीकडेच वळताना दिसत आहेत.
     आजचा युवा वर्ग कष्ट न करता पैसे मिळवायच्या नादाला लागला आहे. पुढारी लोक अशा युवकांना आपल्या दावणीला बांधून आपला मतलब साधत आहेत. ही युवापिढी चार घोट दारूसाठी आणि चार मटणाच्या तुकड्यासाठी लाचार झाली आहे. घरातून शिक्षण, शिस्त मिळत नसल्याने आणि वचक नसल्याने ही पिढी वाहवत चालली आहे. यांना आवरणार कोण असा प्रश्न आहे.खरे तर या तरुणांकडे इतकी क्षमता आहे, इतके अधिकार मिळाले आहेत,पण त्याची त्यांना कल्पनाच नाही. युवकांनी त्याचा सदुपयोग केला तर ते स्वत: आपला विकास साधू शकतील आणि आपल्या देशालाही पुढे नेऊ शकतील.
     सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. थांबला तो संपला, आजचे ब्रीद आहे. त्यामुळे युवकांनी फक्त स्पर्धेची तयारी करण्यातच आपल्याला व्यस्त ठेवायला हवे. तरुणीपिढी देश,समाज आणि जगाची आशा आहे, असे समजले जाते.कारण एक दिवस आपल्यासह संपूर्ण जगालाच त्याच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे जर ही पिढीच बिनकामाची असेल तर त्या देशाला काय भविष्य असणार आहे, याची कल्पनाच केलेली बरी! तरुणांनी नेहमी सतर्क राहयला हवे, कारण ही सतर्कताच त्यांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवित असते. आणि तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्या जीवनासाठी आव्श्यक असलेले सर्व काही व्यक्ती तरुणपणीच मिळवित असते. तो जर असे करू शकला नाही तर समजून घ्या की,गरजांची आंधळी स्पर्धा आणि शर्यत यामध्ये तो मागे पडला आहे.

जिंकणार्‍याकडे एकच कारण...


     काही तरी करणार्यांसाठी सर्व काही शक्य आहे,पण न करणार्याला मात्र सर्व काही अशक्य आहे. ज्याच्या मनात जिद्द, विश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे या जगात असे कोणतेही कार्य नाही, जे अशक्य आहे.फक्त आपण त्यासाठी तयार असले पाहिजे. मला जमत नाही, मला येत नाही, असे म्हणत राहिल्यावर ती गोष्ट कशी येणार बरं! तिथेच जर ती गोष्ट मला का येत नाही? मी का करू शकत नाही? असा विचार करायला हवा.ती गोष्ट करण्यासाठी आपल्याजवळ कशाची उणीव आहे, याचा शोध घेऊन ती आपल्याला का येत नाही, म्हणून त्याच्या खनफटीलाच बसले पाहिजे. एकादी गोष्ट सहजासहजी मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

     यशस्वी माणसे कोणतेही काम अशक्य समजत नाहीत. त्यांच्यासाठी सर्व कामे ही सहज आणि शक्य असतात. कारण त्यांना यशाची चटक लागलेली असते. त्यातूनच ते त्याकडे ओढले जातात. एक लक्षात ठेवा, एकाद्या कामाला अशक्य समजणारी व्यक्ती अतिशय दुर्बल असते. एखादे काम अशक्य असल्याचे त्याने जाहीर केल्यावर पुढे चालून त्याच्यासाठी सर्व कामे अशक्य होतात. मग तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. जो प्रयत्न करतो,त्याला यश हे हमखास मिळत असते. आपण ज्याचा विचार करतो आणि मन लावून ते करण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा ते कधीच अशक्य होत नाही.
     हंगरीच्या लष्करात एक शुटर होता. त्याचं नाव होतं करौली. तो त्या देशातला सर्वात उत्तम असा शूटर होता. संपूर्ण देशाची आशा त्याच्या टिकून होती.येणार्या 1940 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तो सुवर्ण पदक पटकवणार, याची खात्री तमाम देशवासियांना होती. पण नंतर एक अशी घटना घडली की, त्याचा पुढचा काळ अंधकारमय होऊन गेला. ज्या हाताने शुटिंग करणार होता, त्याच हात बॉम्ब स्फोट झाला. हात पूर्णपणे निरोपयोगी झाला. डॉक्टरांनी सांगितले की,तो आता शुटिंग करू शकत नाही. करौली अजून आपल्या लक्ष्यापासून दोन वर्षे दूर होता. त्याचा त्याच्यावर विश्वास होता की, तो नक्की जिंकणार! त्याच्या नशिबाने त्याचा पराभव करण्याचा निश्चय केला,पण तो हरला नाही.
     त्या अपघातानंतर बरोबर एक महिन्याने त्याने दुसर्या हाताने शुटिंगचा सराव करायला सुरुवात केली. त्याला जगातला बेस्ट शुटर बनायचे होते आणि त्यासाठी आता त्याच्याकडे फक्त डावा हात उरला होता. आणि प्रचंड जिद्द,मेहनत,झपाटलेपणा, सातत्य याच्या जोरावर त्याने त्याच्या डाव्या हातालाच उत्कृष्ठ बेस्ट हँड बनवले. त्या दिवसांत हंगरीमध्ये एक शुटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तिथे देशातल्या इतर भागातले शुटरही उपस्थित होते. हाही तिथे गेला.त्यांना वाटले की, काही महिन्यांपूर्वी त्याच्याबाबतीत अपघात घडूनही तो सहभाग घेणार्यांना प्रोत्साहन द्यायला आला असेल, असे वाटले. सगळ्यांनी त्याच्या हिंमतीला दाद दिली.  पण तो तर त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी गेला होता. त्याने त्याच्या डाव्या हाताने स्पर्धेत भाग घेतला आणि स्पर्धाही जिंकली. उपस्थितीत सगळ्यांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
     त्याने दोन वर्षांत आपल्या डाव्या हाताला अशा प्रकारे सक्षम बनवले की, येणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेता यावा असे. पण 1940 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा दुसर्या जागतिक युद्धामुळे रद्द करण्यात आली. करौली खूप निराश झाला.परंतु, तो हिंमत हारला नाही. 1948 मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने आपल्या देशासाठी सुवर्णपदक मिळवून दिले.
     पराभव झालेल्या माणसाकडे त्याची हजार कारणे असतात,पण जिंकणार्याकडे फक्त एकच कारण असते आणि ते त्याला विजय मिळवून देतं. इच्छाशक्ती असली की, अशक्य काहीच नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

Saturday, June 23, 2018

संधीचे सोने करा


     निराशजनक परिस्थितीतही जी माणसे आशा सोडत नाहीत, ती माणसे त्यांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे यश मिळवू शकतात. निराशेच्या परिघातून बाहेर पडल्यावर यश तुमची वाट पाहात असल्याचे तुम्हाला दिसेल. म्हणूनच आपण कधीही निराश होऊ नये. एखाद्या मोठ्या कारणामुळे निराशा आली तरीही लगेच आपल्या उणिवा दूर करून पुढे जायला हवे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली आशा आणि ध्येय नेहमी समोर ठेवा. आशा आणि ध्येय समोर असल्यावर तुम्हाला कधीही निराशपणा येण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला निराशेने घेरू नये, यासाठी अशा वातावरणातून बाहेर पडा. कारण तुमच्या भोवताली सर्वत्र निराशाच पसरलेली असेल तर तुम्ही काहीही काम करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. या निराशेच्या अंधारात तुमच्यापर्यंत उजेडाचा एकही किरण पोहचू शकत नाही. त्यामुळे आशा आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात जा. असे मित्र जोडा,पुस्तके वाचा. जेणेकरून तुम्हाला निराशा घेरणार नाही. अशा प्रकारचा निर्णय तुमच्यासाठी फायद्याचा राहणार आहे.

     निराशवादी माणसे नेहमी रडतरावसारखे रडत असतात.विव्हळत असतात. त्यांना प्रत्येक संधी अवघड वाटते. याच्या उलट आशावादी लोकांचे असते. अशी माणसे दुसर्याला हुरुप देतात. अशी माणसे प्रत्येक अवघड गोष्टीतही संधीचा शोध घेत असतात. आपल्याला संधी मिळत असते.पण ती पकडायला यायला हवी. आपले प्रयत्न असतील तर संधीदेखील चालत तुमच्या दारापर्यंत येते. आपल्याकडल्या गुणांची,कौशल्याची जाणीव लोकांना करून देताही आली पाहिजे. त्यासाठी कोणत्याही माध्यमाचा वापर करता आला तर ती करायला हवी. कारण आपल्याकडे काय आहे आणि काय नाही, याची कल्पना समोरच्याला यायला हवी, अशा प्रकारचे वर्तन आपले असले पाहिजे.
अमेरिकेतला एक भिकारी कोट्यधीश होतो, त्याची एक कथा आहे. अमेरिकेच्या ब्रुकलिनमध्ये जन्माला आलेला टेड व्हिलियम त्याच्या वाईट सवयी आणि कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे अमेरिकेतल्या एका राज्यातल्या ऑहियोच्या रस्त्यावर भीक मागत होता. नशा करण्याच्या त्याच्या व्यसनामुळे त्याला कित्येकदा तुरुंगाचीदेखील हवा खायला लागली होती. तुरुंगातून सुटल्यावर तो रस्त्यावर एका कार्डावर माझा आवाज खूप छान आहे.‘ असे लिहून भीक मागायचा. रात्री पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बनवलेल्या तंबूत झोपायचा.
     एके दिवशी नशिबाने कुठल्या तरी एका बातमीदाराची दृष्टी त्याच्यावर पडली. त्याने या टेड व्हिलियमची मुलाखत घेण्याचा विचार केला. आणि सहज गंमत म्हणून त्याचा शूट केलेला व्हिडिओ युट्यूबवर टाकला. व्हिडिओ येताच त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. यानंतर न्यूयॉर्क शहरातल्या एका टीव्ही चॅनेलने त्याला त्यांच्या मॉर्निंग शोमध्ये इंटरव्यू घेण्यासाठी बोलावणे पाठवले. इथे त्याची निवड झाली. या शिवाय त्याने अनेक कंपन्यांच्या जाहिरातींसाठी आपला आवाज दिला. यामुळे तो अल्पावधीतच अमेरिकेतला लोकप्रिय लोकांमधला एक म्हणून ओळखला जाऊ लागला. टेड व्हिलियमचा गोल्डन वॉयस हा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला.
      टेड व्हिलियमने आपल्या संघर्षाची आणि यशाची आत्मकथा सांगणारे पुस्तकदेखील लिहिले. त्यांच्या या यशाच्या कथेतून आपल्याला प्रेरणा घेता आली पाहिजे.आयुष्यात आपल्याला अनेक संधी मिळतात, त्यामुळे आपल्याला निराश होऊन कधीही प्रयत्न बंद करायचे नाहीत. एक लक्षात ठेवा, तुम्ही आशावादी झालात की, तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रकारच्या निराशा आपोआप नाहीशा होतात.
अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा. प्रयत्न करत राहिल्याने अशक्य ती गोष्ट शक्य होऊन जाते. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणी तरी सांगितली आहे, ती सांगतो आहे, निराश आनि हताश होऊन बसण्यापेक्षा किंवा एखादे आत्मघातकी पाऊल उचलण्यापेक्षा तुम्ही समाजसेवेला वाहून घेतलेले सर्वात चांगले. कारण त्यामुळे तुमचे जीवन सार्थकी लागते.