Saturday, June 16, 2018

पर्यावरणाची फिकीर कुणाला?


     परवाच पर्यावरण दिवस साजरा झाला. घोषणा झाल्या,काहींनी संकल्प सोडले, सोशल मिडिया, प्रसार माध्यमांवर काही पर्यावरणतज्ज्ञांनी आपापले अनुभव सांगितले. सरकारकडूनदेखील काही घोषणा झाल्या. राजकीय नेत्यांची भाषणेदेखील ऐकायला,वाचायला मिळाली. पण लगेच सगळेजण विसरूनही गेले. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाविषयी फक्त घोषणाच होत आहेत. पर्यावरणाविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात असली तरी कुठेच काही या दिशेने काम होताना दिसत नाही. या लोकांना दरवर्षी वायू प्रदूषणामुळे संपूर्ण विश्वभरात सत्तर लाख लोक आपला जीव गमावत आहेत, सांगूनही काही फरक पडणार नाही. या लोकांना संधी मिळाली तर त्यांच्या घरासाठी दहा-वीसच काय पन्नास- शंभर झाडे ते सहज तोडून टाकायला  तयार होतील. पूर्वी माणसे विचार करायची, घराभोवती हिरवीगार झाडी असावी, पण आता हिरवीगार जंगलं तोडून घरं,इमले बांधले जात आहेत

     जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अलिकडेच सांगितले आहे की, जगात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सत्तर लाख लोक मृत्यूच्या दाढेत जात आहेत. ज्यावेळेला जगातील वीस सर्वाधिक प्रदूषित शहरांची सूची बनवण्यात आली, तेव्हा त्यात भारतातली चौदा शहरे होती. ही गोष्ट फारच गंभीर आहे. प्रदूषित हवेत जे सूक्ष्म कण असतात, ते मानवाच्या फुफ्फुसात गेल्याने कॅन्सर,हृदय रोग, दमा,न्यूमोनिया आणि लकव्यासारखे रोग होतात. आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगातील दहापैकी नऊ माणसे या विषारी हवेतूनच आपला प्राणवायू घेत आहेत. त्यामुळे साहजिकच ही माणसे कित्येक रोगांना बळी पडत आहेत. त्यांची काम करण्याची क्षमतादेखील घटत चालली आहे. आता तर माणसाचे अन्नच प्रदूषित होऊ लागले आहे. इथे सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा की, वायू प्रदूणामुळे युरोपची अर्थव्यवस्था पूर्णपणे  बिघडली असून त्यांना दरवर्षी सोळा अब्ज डॉलरच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
     आपण म्हणतो की, गेल्या काही शतकांपासून विज्ञानाने अनेक नवनवे शोध लावले आणि प्रगती साधली. मात्र वास्तव नेमके उलटे आहे. मानवाने नैसर्गिक संपत्ती नष्ट केली आहे आणि त्याने संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वालाच संकटाच्या दिशेने लोटले आहे. निसर्गाने मानवाला सर्वात प्रिय अशी भेट दिली आहे ती म्हणजे शुद्ध हवा, पाणी आणि आहार. पण आज जगातल्या बहुतांश नद्यांचे पाणी प्रदूषित झाले आहे. शहरांमधील हवा जीवघेणी बनली आहे. जेवणात कीटकनाशकांचे विष पसरले आहे. गेल्या काही दशकांपासून कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्याने जी वाढ होत आहे, याला विषारी वायू, विषारी पाणी आणि विषारी आहारच कारणीभूत आहे. या विषामुळे आरोग्यावरचा खर्च वाढला आहे. बराच खर्च करूनदेखील रुग्ण लवकर बरा होताना दिसत नाही. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.
     विश्वाची निर्मिती झाल्यानंतर किती तरी कोटी वर्षे हवा शुद्ध राहिली. खळखळ वाहणार्या नद्यांचेदेखील पाणी शुद्ध व स्वच्छ होते. आपला आहार विषापासून कोसो लांब होता. पण 19 व्या शतकात औद्योगिक क्रांतिनंतर जो बदल झाला, तो मानवाच्या आरोग्याच्यादृष्टीने फारच वाईट झाला, असे म्हणावे लागेल. हवा विषारी बनत चालली, पाणी प्रदूषित होत चालले आहे,त्याचबरोबर आपला आहारसुद्धा विषारी बनत चालला. याचा विपरित परिणाम माणसाच्या आरोग्यावर झाला. शहरात मुख्यत्त्वे हवा प्रदूषित होण्याला पेट्रोल-डिझेलवर चालणार्या वाहनांमधून निघणारा  विषारी धूर कारणीभूत आहे. यामुळे आजारांचे प्रमाणदेखील त्याच प्रमाणात वाढले आहे. ज्यांनी कुणी बैलगाडी, घोडागाडी (टांगा)चा अविष्कार केला, त्यांच्या बुद्धीला दाद द्यायला हवी. त्यांनी असे वाहन बनवले, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नव्हते. प्रदूषण-रहित वाहनाची कल्पना खरेच मोठी सुखद गोष्ट आहे. आजच्या घडीला सायकल सर्वात प्रासंगिक म्हटली पाहिजे.
     आता खरे तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत,पण तरीही आपल्या शहरांमध्ये यावर चालणार्या वाहनांची संख्यादेखील सातत्याने वाढत चालली आहे. आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लीची लोकसंख्या दोन कोटी आहे. इथे वाहनांची संख्या एक कोटींपेक्षा अधिक आहे. मायानगरी मुंबईमध्ये पाच वर्षांपूवी वाहनांची संख्या वीस लाख होती. आता ती तीस लाख झाली आहे. दिल्लीच्या तुलनेत मुंबईतील वाहनांची लोकसंख्या कमी आहे,त्यामुळे इथले वायू प्रदूषणदेखील दिल्लीच्या तुलनेत फारच कमी आहे,परंतु  कमी धोकादायक नाही. दिल्लीतल्या लोकांना प्रदूषणापासून सुटका मिळवायची असेल तर त्यांना वाहनांचा मोह टाळायला हवा आहे. सार्वजनिक वाहनांचा आधार त्यांना घ्यावा लागेल. या गोष्टी अवलंबल्या तरच त्यांना स्वत:ची आणि कुटुंबाच्या आरोग्याचे संरक्षण  करता येणार आहे.
     पूर्वी शहरातील श्रीमंत आणि गावातले गरीब खूपच समजूतदार होते. ते पेट्रोल-डिझेलच्या वाहनांपेक्षा घोडागाडी किंवा बैलगाडीचा अधिक वापर करायचे. शहरातल्या शिक्षित नागरिकांपेक्षा जंगलात राहणारे अदिवासी लोकदेखील असेच समजूतदार आहेत, ते नदीत कचरा फेकत नाहीत. आणि असे कुठले कामही करीत नाहीत,ज्यामुळे हवा विषारी होईल. आज लोकांनी जी जीवनशैली अंग्गिकारली आहे,त्यामुळे वायू,जल, आणि जमीन पूर्णपणे नष्ट होत चालली आहेत. शहरांमधले लोक ज्याप्रकारे शौचालयांचा वापर करत आहेत, त्यामुळे ते सर्व पाणी शहरातून जाणार्या गटारींमधून वाहत जात आहे. आज वाराणशीमधून वाहणारी गंगा, दिल्लीतून वाहणारी यमुना या नद्या पूर्णपणे प्रदूषित झाल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबई-पुण्याजवळून वाहणार्या मुळा-मुठी नद्यांची आवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही.  यासाठी शहरातील मल निस्सा:रण व्यवस्थापन याला जबाबदार आहे. मलमिश्रीत, सांडपाणी नद्यांमध्ये सोडताना लोकांनी अजिबात मागचा-पुढचा विचार केला नाही. वास्तविक खळखळ करत वाहणार्या शुद्ध नदीच्या पाण्याला प्रदूषित करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला, याचा तरी त्यांनी विचार करायला हवा होता. नदीवर बांध घालतानाही विचार केला नाही की, नदीत सोडण्यात आलेले प्रदूषित पाणी त्यातच सामावले जाणार आहे. मग कसे शुद्ध राहणार बरे नदीचे पाणी?
     पाणी आणि वायू प्रदूषित करण्यामागे वाहनांचीही मोठी भूमिका राहिली आहे. याशिवाय धूर ओकणारी कारखाने, खाद्य कारखाने, रिफायनरी, कोळसा जाळून केली जाणारी वीज निर्मिती संयंत्रे, पेपर मिल, लोखंड कारखाने, रासायनिक कारखाने शहरांबरोबरच गावांची हवादेखील विषारी बनवत आहेत. आपल्याला सहजपणे वीज मिळत आहे,पण यासाठी वीज निर्मिती केंद्रांमध्ये जो कोळसा जाळला जात आहे, त्यामुळे जे प्रदूषण होत आहे, त्यावर कोणी विचारच करायला तयार नाही. या कारखान्यांमुळे वायू प्रदूषणाबरोबरच नद्यांचे पाणीदेखील प्रदूषित होत आहे. यामुळेच आपल्या देशात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आम्ही अन्नधान्य उत्पादन वाढविण्यासाठी हरित क्रांतिचा आधार घेतला,पण शेतात कीटकनाशकांचा जो बेसुमार वापर वाढला, त्यामुळे आपल्या शेतीची किती अपरिमित हानी झाली आहे, हे आपल्या देशातल्या पंजाबमधल्या शेतकर्यांना जाऊन विचारायला हवे. तिथला प्रत्येक दुसरा शेतकरी कॅन्सरग्रस्त आहे. अजून बर्याच लोकांना माहित नाही की, पंजाबमधून राजस्थानला जाणार्या एका रेल्वेला कॅन्सर एक्सप्रेस म्हटले जाते ते! या रेल्वेमधून पंजाबचे रुग्ण उपचारासाठी राजस्थानला जातात, म्हणून या रेल्वेला कॅन्सर एक्सप्रेस म्हणतात. यावरून आपल्या पुढचा काळ किती भयानक आहे, याची कल्पना यायला हरकत नाही. आमच्या जीवनशैलीने आपल्याला कोठून कुठे नेऊन ठेवले आहे. यामुळे आमचे आयुष्य पार बदलून गेले आहे. आता आपण कोणत्या जीवनशैलीचा स्वीकार करावा, हा एक यक्ष प्रश्नच आहे.

No comments:

Post a Comment