Saturday, June 23, 2018

(बालकथा) खेकडे


     समुद्रामध्ये एक छोटंसं बेट होतं. एके दिवशी बेटाच्या किनार्‍याला एक जहाज येऊन थांबलं. त्यातून एक मध्यम वयाचा माणूस आणि एक सोळा वर्षांचा मुलगा  खाली उतरला.त्यांच्या पाठोपाठ लाकडाच्या मोठमोठ्या दहा पेट्या उतरवण्यात आल्या. पेट्यांवर क्रमांक लिहिलेले होते. दहाव्या क्रमांकाची पेटी इतर पेट्यांपेक्षा काहीशी लहान होती. काही वेळानंतर त्या दोघांना बेटावरच सोडून जहाज निघून गेले.
     जहाज निघून जाताच त्या दोघांनी एका ठिकाणी आपला तंबू ठोकायला सुरुवात केली. आपल्यासोबत आणलेले सर्व साहित्य  त्यांनी आत ठेवले. काही वेळ आराम करून झाल्यावर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यातल्या पहिल्या सात पेट्या त्यांनी खोलल्या. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचे लहान-मोठे तुकडे होते. ते पाहून मुलगा आश्‍चर्याने ओरडला," याचे काय होणार, सर?"
मध्यम वयाचा तो माणूस मोठ्याने हसला, तसे त्याचे नकली दात चमकले. तो म्हणाला," जरा धीर धर, सगळं तुला कळेल. चल! अगोदर हे तुकडे आपण संपूर्ण बेटावर विखरून येऊ या."

     मुलाचे नाव अनिकेत होते. तो हळू आवाजात म्हणाला,"हो कॅप्टनजी." आणि मग ते धातुंचे तुकडे बेटावर विखरून टाकण्याच्या कामाला लागले.ज्यावेळेला त्यांचे सर्व काम संपले, तेव्हा कॅप्टन सुशांतने त्याला आदेश दिला," चल अनिकेत, आता शेवटची पेटीदेखील उघड बरं!"
     अनिकेतने दहावी पेटी उघडली.त्यातून लोकरी कापडात गुंडाळलेले खेकड्यासारखे दिसणारे खेळणे बाहेर आले. त्याला पाहून अनिकेतच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. तो काही साधासुधा खेकडा नव्हता. मोठे मोठे पंजे, लांब काटे होते त्याला. त्याच्या पाठीवर एक छोटासा खड्डा होता. त्यावर एक चकचकीत आरसा होता. अनिकेत खेकड्याला पाहून विचारात पडला. तेवढ्यात कॅप्टन सुशांत म्हणाला,"याला उचलून वाळूवर ठेवून ये."
अनिकेतने त्याला वाळूवर ठेवले. मग त्याने विचारले," हे सर्व काय आहे,कॅप्टन?"
कॅप्टन हसत हसत त्याला म्हणाला," हा एक प्रयोग आहे. डारविनचा सिद्धांत तुला आठवतो का?"
     अनिकेतला सिद्धांत आठवला. सुरुवातीला सुरुवातीला समुद्रात छोटे छोटे जीव जन्माला आले. हळूहळू ते विकसित झाले आणि शेवटी विविध प्रकारच्या जीव-जंतू आणि माणसांमध्ये त्यांचा बदल झाला. त्याच्या मनात एक प्रश्‍न उभा राहिला," पण डारविनच्या सिद्धांताचा आणि या मशीनी खेकड्याचा काय संबंध?"
     तो कॅप्टन सुशांतला काही तरी विचारणार होता,पण खेकड्याला पाहून थांबला. खेकड्याच्या पाठीवर लावण्यात आलेला आरसा हळूहळू गोल गोल फिरत होता. कारण त्याचे केंद्र सूर्यासमोर यायला हवे होते. कॅप्टन सुशांत आनंदाने ओरडला,"व्वा! आता याच्यात जीव यायला लागला आहे."
     या दरम्यान तो खेकडा रांगत रांगत पाण्यापर्यंत पोहचला आणि पाणी पिऊ लागला. थोड्या वेळाने तो तिथून चालू लागला आणि धातूंच्या एका ढिगाजवळ जाऊन पोहचला.
     दुसर्‍यादिवशी अनिकेत आणि कॅप्टन सुशांत त्या जागी पोहचले, ज्याजागी त्यांनी शेवटचे खेकड्याला पाहिले होते. तिथले दृश्य पाहून अनिकेत कमालीचा चकीत झाला. तिथे एक नाही तर दोन खेकडे होते.दोघेही तांब्याच्या ढिगार्‍यावर चढले होते. आणि त्या ढिगारातून निळ्या निळ्या रंगाचा धूर निघत होता. अनिकेत सावकाश त्या तांब्याच्या ढिगार्‍याजवळ गेला.दोन्ही खेकडे कामाला लागले होते. धातू कापून ते आपल्या तोंडात ठेवून द्यायचे. त्यांच्या शरीरातून सतत कसली तरी घरघर ऐकायला येत होती. थोड्या थोड्या वेळाने त्यांच्या तोंडातून विजेच्या ठिगण्या बाहेर पडायच्या. त्याबरोबर दोन नांग्या बाहेर पडायच्या आणि थोड्या वेळाने खेकड्याचे धड बाहेर पडायचे. यातून एक नवीन खेकडा तयार व्हायचा. अनिकेत पाहात होता. खेकडा तयार झाल्यावर तो थेट पाण्याकडे जायचा. त्याने कॅप्टन सुशांतला विचारले,"सर, हे पाणी का पित आहेत?"
"हे खेकडे त्यांच्या बॅटरीत पाणी भरतात.दिवसभर आरशाच्या बॅटरीवर काम करतात. रात्री पाण्याच्या बॅटरीचा वापर करतात." कॅप्टन म्हणाला.
     यानंतर कॅप्टन सुशांत आपल्या या अनोख्या अविष्काराबद्दल  सांगू लागला. तो म्हणाला," युद्धाच्या प्रसंगी हे खेकडे खूप कामाला येतील. असं समज की, काही खेकडे शत्रूच्या सीमेवर पोहचवले तर ते तिथल्या सर्व रणगाडे, तोफे, विमान, टँक इत्यादी खेकड्यांमध्ये रुपांतर करतील.शत्रूला लढणं अशक्य होऊन जाईल. त्यांचे सर्व धातू आपल्याला मिळून जातील."
चार दिवसांतच संपूर्ण बेट खेकड्यांनी भरून गेले. जिकडे पाहावे, तिकडे खेकडेच खेकडे! हळूहळू धातूचे सगळे ढिगारे फस्त झाले. यामुळे खेकड्यांमध्ये खेचाखेची सुरू झाली. 
     त्या दिवशीची गोष्ट आहे. अनिकेतने पाहिले की, एक खेकडा धातूंचा शोध घेत घेत तंबूमध्येच घुसला आहे. त्याने लगेच कॅप्टन सुशांतला उठवून सगळी परिस्थिती कथन केली. त्यांनी सर्वप्रथम खाद्यान्न असलेले डबे पाण्यात बुडवले आणि त्यावर वाळू टाकली.मग पाण्यात लपवून ठेवलेल्या कोबाल्टच्या चार कांड्या  काढल्या आणि बाहेर फेकून दिल्या. त्यासरशी सगळे खेकडे त्याच्यावर तुटून पडले. ते आपापसात भांडायलाही लागले. काही मिनिटातच ती जागा लढाईचे मैदानच बनले. जे खेकडे तुटून-फुटून निर्जीवासारखे पडायचे, त्यांना दुसरे खेकडे लगेच खाऊन टाकायचे. ते आपली सगळी शक्ती सूर्याकडून घेत होते.
     दुपार ढळता ढळता नव्या जातीची खेकडे निर्माण होऊ लागले. ते पहिल्या खेकड्यांपेक्षा मोठे आणि काहीसे चपटे होते. हे पाहून कॅप्टन सुशांत चक्रावून गेला. त्याला आपल्या खेकड्यांचा अशा प्रकारचा विकास अपेक्षित नव्हता. पण आता करणार तरी काय होता?  रात्री थकल्यामुळे अनिकेतला झोप लवकर आली,पण तो निवांतपणे झोपू शकला नाही. मध्यरात्री दोनच्या सुमारास कुणाच्या तरी ओरडण्याने त्याला जाग आली. तो पटकन बाहेर आला. कॅप्टन सुशांत ओरडत होता. तो त्याच्या अंथरुणावर नव्हता. अनिकेत बाहेर आला. त्याने पाहिले, कॅप्टन सुशांत गळ्यापर्यंत पाण्यात उभे होते. अनिकेतला पाहून सुशांत ओरडू लागला," खेकडे माझा पाठलाग करत आहेत. मला सोडव."
"कॅप्टन, तुम्ही इथे कसे आलात?"अनिकेतने विचारले.
     मग त्याने सांगायला सुरुवात केली, ते तंबूत झोपले होते. अचानक एका खेकड्याने त्याच्यावर हल्ला चढवला. मी त्याला बाजूला करून बाहेर आलो, तर बाहेर एक नव्हे अनेक खेकडे माझ्या  मागे लागले. " पण अगोदर असे काही घडले नव्हते. आजच का? अनिकेतला काहीच कळेना, तेव्हा त्याने पाण्यात उडी मारली. दोन पावले पुढे गेल्यावर त्याला एकानंतर एक अनेक खेकडे  दिसले.
अनिकेतने पाहिले, एका खेकड्याच्या नांग्या  कॅप्टनच्या चेहर्‍याला पकडण्याचा प्रयत्न करत होती. अनिकेतने त्या नांग्या गच्च धरून मोडून काढल्या. खेकडा मागे सरला.
     या दरम्यान सकाळ झाली. बरेच तास पाण्यात उभे राहिल्याने कॅप्टनचे हात-पाय सुन्न झाले होते. थंडीपासून त्याचा बचाव करण्यासाठी अनिकेतने त्याला उन्हात वाळूने झाकून टाकलं. मग तो तंबूच्या दिशेने चालू लागला. पाहिलं तर तंबू संपूर्ण उखडून टाकण्यात आला होता. खेकड्यांनी तंबू उभारण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व लोखंडी सांगाडे खाऊन फस्त करून टाकले होते. 
या दरम्यान खेकड्यांची लढाई समुद्राच्या काठावरून तिकडे मैदानात पोहचली होती. लांबून त्याला काही बरेच मोठे खेकडे दिसले. ते माणसाएवढ्या उंचीचे दिसत होते. एक क्षण तर त्याची भितीने गाळणच उडाली. पण त्याला विश्‍वास होता की, खेकडे त्याच्यावर हल्ला चढवणार नाहीत.काही वेळानंतर तो कॅप्टन सुशांतकडे गेला. तिथे पोहचल्यावर त्याला विशालकाय खेकड्याचे डोके दिसले. तो धावतच कॅप्टनजवळ गेला,पण तोपर्यंत खेकड्याच्या नांगीने त्याचा गळा पकडला होता.
     अनिकेत धावतच खेकड्याच्या मागच्या बाजूला गेला. त्याने पाहिले, कॅप्टनचे तोंड उघडले होते आणि त्याच्या आत स्टेनलेस स्टीलचे दात चमकत होते. अचानक अनिकेतच्या डोक्याची ट्यूब पेटली. यामुळेच खेकडे त्याच्या पाठीमागे लागले होते. खेकड्याचा चेहरा कॅटनच्या तोंडाच्या अगदी समोर होता. विजेची ठिणगी पडत होती. अनिकेतने एक जोराचा प्रहार खेकड्याच्या आरशावर केला. खेकड्याची पकड ढिली पडली आणि तो एका बाजूला कोसळला. दुसर्‍या बाजूला कॅप्टनचे शरीरदेखील खाली पडले. 
     यानंतर काही दिवस अनिकेत भुकेने, तहानेने व्याकूळ वाळूवर पडून राहिला. त्याच्या अंगात त्राण नव्हते. एकविसाव्या दिवशी जहाज येईल, आणि मग त्याची या सगळ्यापासून सुटका होणार होती. तो स्वत:चे मन रमावे म्हणून चित्र-विचित्र गोष्टींचा विचार करत होता. 
एके दिवशी एक सावली त्याच्या अंगावर पडली. त्याने अगदी जडपणे डोळे उघडून पाहिले. एक विशालकाय राक्षसी  खेकडा पाण्याजवळ उभा राहून आकाशाकडे पाहात होता. अनिकेत बडबडू लागला. त्याला कळलेदेखील नाही की, तो राक्षसी खेकडासुद्धा कधी थकून जमिनीवर पडला तो!
    त्याला शुद्ध  आली, तेव्हा तो जहाजावर होता. जहाजाच्या कॅप्टनने त्याला विचारले," ती विचित्र मशीनसुद्धा सोबत घेऊन जायची का?" अनिकेतने  मानेनेच नाही म्हणून सांगितले.(एका इंग्रजी कथेवर आधारित)

1 comment: