जरा ऐकायला विचित्रच वाटत आहे, ते याचं की, देश आणि समाजातल्या
अनेक अडचणी, समस्यांवर सहजगत्या मात करणारी मोठी मोठी माणसं स्वत:
मृत्यूला कवटाळत आहेत. सगळ्यात आश्चर्यकारक घटना घडली ती म्हणजे मध्य प्रदेशातले अध्यात्मिक गुरू या नावाने संपूर्ण
देशभर प्रसिद्ध असलेले भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून
आत्महत्या केली. दुसर्याच्या समस्या सोडवणारे
हे गुरू स्वत:ची मात्र समस्या सोडवू शकले नाहीत. यापूर्वी आपल्या पराक्रम आणि योग्यतेच्या जोरावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध आयपीएस
अधिकारी हिमांशू रॉय यांनीदेखील आत्महत्या केली. खतरनाक लोकांशी
सहजगत्या तोंड देणारा हा माणूस एक दिवस स्वत:च आपल्या आयुष्यापुढे
हार पत्करली. अलिकडेच उत्तर प्रदेशातल्या एका अप्पर पोलिस अधिक्षकाने
आपल्या कार्यालयातच सर्व्हिस रिव्हाल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. अर्थात आत्महत्या या आता कॉमन घटना झाल्या आहेत. रोज
कुठे ना कुठे एकादी-दुसरी आत्महत्येची घटना घडत असते.
आपल्याला या घटना वर्तमानपत्रात वाचायला आणि प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला
आणि ऐकायला मिळत आहे. अशी परिस्थिती जगातल्या काही विकसनशील देशांबरोबरच
भारतातही आहे. आपल्याकडे युवकांची वाढती आत्महत्या ही एक मोठी
चितेची गोष्ट आहे. त्यामुळेच कदाचित दरवर्षी दहा सप्टेंबर रोजी
वर्ल्ड सुसाइड प्रीवेंशन डे साजरा केला जातो. संमिश्र आणि खुल्या अर्थव्यवस्थेच्या
विकसनशील देशांमध्ये
याचे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचेही काही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
शेवटी असे काय कारण आहे,ज्यामुळे लहान मुलांपासून किशोर, विद्यार्थी-विद्यार्थीनी, मोठे-वयोवृद्ध, गरीब, शेतकरी आणि व्यापारी
यांच्याबरोबरच कमकुवत मनाचे ते खंबीर मनाचे लोक आत्महत्या करत आहेत. या संबंधी जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ)ने गेल्या सहा महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच जागतिक स्तरावर आत्महत्येबाबतचा
एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालातून एक गोष्ट समोर आली,
ती म्हणजे विकसित देशांपेक्षा विकसनशील देशातील लोक अधिक आत्महत्या करत
आहेत. शिवाय यात महिलांपेक्षा पुरुष आत्महत्येचे प्रमाण अधिक
आढळून आले आहे. मात्र दुसर्या बाजूला विकसित
देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. आकडेवारीनुसार जगात दर चाळीस मिनिटाला एक व्यक्ती आत्महत्या करत आहेत.
वर्षाला आठ लाख लोक मृत्यूला कवटाळत आहेत.
आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार लोकसंख्येच्या
प्रमाणात गुयाना, उत्तर कोरिया आणि दक्षिण
कोरिया या देशांची अवस्था मोठी चिंताजनक आहे. इथे एक लाख लोकसंख्येला
आत्महत्येचे प्रमाण अनुक्रमे 44.2,38.5 आणि 28.9 टक्के असे आहे. अहवालानुसार जागतिक स्तरावर पंधरा ते
एकोणतीस वर्षे दरम्यानच्या वयात आत्महत्या करण्याचे प्रमाण 35.5 टक्के आहे. या अहवालाची आणखी एक विशेष गोष्ट अशी की,
या वयात आत्महत्या करण्याचे सर्वात मोठे कारण नैराश्य हे आहे.
या वयात आजार तर कमी असतात. पण हे वय संक्रमणाचे
असते. शरीरातील आणि समाजातील बदल याबरोबरच युवकांचे लक्ष स्वत:च्या भवितव्यााकडे अधिक असते. त्यामुळे स्पष्ट आहे की,
करिअर बनवण्यामध्ये यशस्वी न झालेले युवक नैराश्यात जातात आणि मृत्यूला
कवटाळतात. ऑस्ट्रेलियन इंस्टीट्यूट ऑफ सुसाइड एंड प्रीवेंशनच्या
संचालकांचे मत असे की, आत्महत्येच्याबाबतीत जागतिक स्तरावर यापूर्वी
कधीच आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. कारण यापूर्वी आत्महत्येला
कुठला आजार मानला गेला नव्हता तर लोकांचा नकारात्मक दृष्टीकोन म्हणून त्याकडे पाहिले
जात होते. या अभ्यासामुळे एक चांगली सुरुवात झाली आहे आणि आकड्यांच्या
आधारावर अशा प्रकरणात याच्या निदानासाठी प्रयत्न वाढवले जाऊ शकतात.
आत्महत्येच्याबाबतीत भारताची परिस्थिती
फारच चिंताजनक आहे. आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार
गेल्या वर्षी जगात आठ लाखांपेक्षा अधिक लोकांनी आत्महत्या केली. यात जवळपास दोन लाख भारतीय होते. भारतात एक लाख लोकांमागे
21.1 टक्के आत्महत्येचे प्रमाण आहे. नॅशनल क्राइम
रिकॉर्ड ब्युरोचे आकडे सांगतात की, भारतात आत्महत्येचा दर जागतिक
आत्महत्येच्या दराच्या तुलनेत अधिक आहे. खरे पाहायला गेले तर,
संपूर्ण जगातील एकूण आत्महत्या करणार्या लोकांमध्ये
भारतीयांचे प्रमाण 23 टक्क्यांपेक्षा आधिक आहेत. भारतात गेल्या दोन वर्षात आत्महत्या करणार्यांचे प्रमाण
वाढले आहे. आज भारतात
37.8 टक्के आत्महत्या करणार्यांमध्ये तीसपेक्षा
कमी वयाच्या युवकांचा समावेश आहे.दुसर्या बाजूला 44 सालापर्यंतच्या लोकांचे आत्महत्येचे प्रमाण
71 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आज 37.8 टक्के आत्महत्या करणार्या लोकांमध्ये तीसपेक्षा कमी
वयाच्या युवकांची संख्या अधिक आहे. केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूसह पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये आत्महत्येच्या घटनांचे आकडे 56.2 टक्क्यांपर्यंत आहेत. आत्महत्येच्या 43.8 टक्के घटना या तेवीस राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदवल्या गेल्या
आहेत. उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये अर्थात पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि जम्मू काश्मिरसारख्या राज्यांमध्ये
एक लाख लोकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण पाच टक्के आहे. याचा साधा
सरळ अर्थ असा की, उत्तर प्रदेशच्या तुलनेत दक्षिण राज्यातील आत्महत्येचे
प्रमाण अधिक असल्याचे संकेत मिळत आहेत.
आत्महत्येशी जोडल्या गेलेल्या या समस्या
आज आपल्याला हा विचार करायला विवश करत आहेत की, शेवटी
भारतीय संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या कुटुंब, प्रेम, नैतिकता, आदर्श, मानदंड,
स्नेह, वात्सल्य, संवाद आणि
भागिदारीसारख्या सामाजिक संस्थांचा मानवी जीवनातला परिणाम कमी का होत चालला आहे?
कित्येकदा आम्ही मुले, युवक, महिला आणि शेतकरी यांच्यादरम्यान वाढत्या आत्मघातकी घटनांसाठी परीक्षांचा तणाव-दबाव, नैराश्य, प्रेमातील अपयश,
चुकीची बरोबरी, बेरोजगारी, गरिबी आणि नशेचे व्यसनसारख्या कारकांना दोष देतो. आज
परिस्थिती वेगळी आहे. गळाकापू स्पर्धेच्या वातावरणातील व्यक्तीच्या
हतबलतेमुळे आलेली मानसिकता समजून घ्यावी लागेल. जीवनाचे जे सत्य
आहे, त्याकडे पाठ करून आत्महत्येकडे जाणार्या लोकांना मानसशास्त्रांच्या उपचारांची, त्यांच्या स्नेह
भरलेल्या संवादाची गरज आहे. वाढती महत्त्वाकांक्षा, पुढे जाण्याची स्पर्धा,
मोठ्या पगाराच्या नोकरीची काळजी आज सातत्याने लोकांना सतावत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार
आत्महत्येच्या निदानाबाबत सरकारांना असा सल्ला देण्यात आला आहे की, आत्महत्येची मिडिया रिपोर्टींग योग्य प्रकारे व्हायला
हवी. दुसरे महत्त्वाचे म्हणजे अल्कोहलच्याबाबतीत ठोस नियम बनवला
जायला हवा. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या माणसाशी व्यवहार आणि
त्याची देखभाल योग्य प्रकारे व्हायला हवी. आत्महत्येचे कारण स्पष्टपणे
समोर आले पाहिजे. त्यानुसार अभ्यास केला जाऊन आत्महत्या रोखण्याबाबत
ठोस उपाय सुचवता येतील. युवकांना येणार्या अडचणींशी कसा सामना करायचा, याचे प्रशिक्षण लहान-मोठ्या गोष्टींमधून मिळायला हवे. आज पालक आपल्याला फार
खस्ता खाव्या लागल्या म्हणून आपल्या पाल्याला त्याचा त्रास व्हायला नको म्हणून पाहिजे
त्या सुखसोयी पुरवतात. त्यामुळे त्याला सगळे आयते मिळत आहे. मात्र पालक विचार करत नाही की,
प्रत्येक गोष्ट सहज मिळत गेली तर त्यांना जीवनातला संघर्ष कसा अनुभवायला
मिळेल. एकादी गोष्ट लवकर मिळत नसेल तर तेवढा धीर धरण्याची क्षमता
त्याच्यात यायला हवी, अशा प्रकारचे शिक्षण मुलांना घरातून,
समाजातून मिळायला हवे. कष्ट, जिद्द, सातत्य या क्षमता युवकांमध्ये लहानपासून रुजवण्याची
आवश्यकता आहे. आव्हानांना सामोरे जायला शिकवले पाहिजे.
अयशस्वी लोकांनी यश कसे मिळवले, याचा वस्तूपाठ
युवकांना मिळायला हवा. आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य
मुलांमध्ये, युवकांमध्ये आल्यास ते आत्महत्यासारख्या आत्मघाती
घटनांपासून दूर राहतील.
No comments:
Post a Comment