Monday, November 18, 2013

लेख नट्यांचं वाढतं वय आणि त्यांच्या लग्नाची चर्चा



     नुकतीच एक बातमी आली होती की, आपल्या राणी मुखर्जीचा  तिचा विवाहीत दोस्त आदित्य चोप्राबरोबर साखरपुडा झाला आहे आणि ते लवकरच लग्न करणार आहेत. अर्थात तथ्य किती आहे, हे अद्याप बाहेर आले नाही, पण त्यामुळे आपल्या बॉलीवूड नट्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा रंग भरला आहे. तुलसी विवाह संपन्न झाल्याने सगळीकडे लग्नाचे बार उडत असताना आता या बॉलीवूडमधल्या सिंगल सुंदर्यांच्या लग्नाच्या चर्चेचीही त्यात भर पडली आहे. राणी मुखर्जी आता 36 वर्षांची झाली आहे. कित्येक वर्षांपासून तिचे  यशराज बॅनरचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राशी प्रेमसंबंध सुरू आहेत. 1997 मध्ये राजा की आयेगी बारात या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एंट्री केलेल्या राणीला मध्यंतरीच्या काळात बॉलीवूडची सम्राज्ञी म्हणूनही संबोधले जात होते. ब्लॅक, हम तुम, बंटी और बबली सारखे हिट चित्रपट दिलेल्या राणीचे  अलिकडच्या चार-पाच वर्षात फारच कमी चित्रपट आले आनि जे आले ते साफ कोसळले. मात्र तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या प्रेमसंबंधाची आणि लग्नाचीच चर्चा अधिक ऐकायला मिळाली. मध्यंतरी दोघांनी गुपचुप लग्नही केल्याच्या वावड्या उठल्या होत्या, परंतु त्यावेळी राणीने त्याचे खंडन केले होते. काही महिन्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हाने म्हणे एका कार्यक्रमात राणी मुखर्जी असा उल्लेख न करता तिचा राणी चोप्रा असा उल्लेख केला होता. काहीही असले तरी हे दोघेही अद्याप मिडियासमोर एकत्र न आल्याने तिच्या विवाहाबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता मात्र लागून राहिली आहे.
      37 वर्षाची विश्व सुंदरी सुष्मिता सेन अजूनही अविवाहित आहे. ब्युटी वुथ ब्रेन असे संबोधल्या जाणार्या सुश्मिता सेनच्या सौंदर्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी चाहत्यांमध्ये  तिच्याविषयी अजूनही आकर्षण कायम आहेआपल्या फिल्मी कारकीर्दीला दस्तक चित्रपटाद्वारे सुरुवात केलेल्या सुश्मिताने सिर्फ तुम, बीवी नं 1, आँखे सारखे चांगले चित्रपट दिले.दिग्दर्शक विक्रम भट्ट,अभिनेता रणदीप हुड्डा नंतर त्चे नाव पकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमशी तिचे नाव जोडले गेले, पण सुश्मिताने या सगळ्या बाष्कळ गप्पा असल्याचे म्हटले. लग्नाशिवाय दत्तक घेतलेल्या दोन मुलांच्या संगोपनात सध्या ती गुंतली आहे. तिने एके ठिकाणी म्हटलंय की, माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे.मला उशिर लागत असला तरी मी लवकरच या बंधनात अडकणार आहे.
      सुश्मिताबरोबरच तब्बूदेखील अद्याप अविवाहित आहे. माचिस, विरासत, हु तू तू, अस्तित्व, चांदणी बार, मकबूल, चिनी कम आणि मीरा नायरचा द नेमसेकसारख्या चित्रपटांमध्ये काम एक परिपक्व विचाराची आणि दमदार अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या तब्बू आपली चित्रपट कारकीर्द देव आनंद यांच्या हम नौजवान या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सुरू केली होती. गेल्या वर्षीच्या ऑस्कर विजेत्या लाईफ ऑफ पाइ या चित्रपटातही ती होती. हैद्राबादच्या या सुंदर ललनेचे वय 41 आहे. मात्र तिच्याकडे पाहिल्यावर तसे वाटत नाही. आजदेखील तरुणीसारखीच दिसते. कधी निर्माता साजिद नाडियादवाला तर कधी तेलगु सुपरस्टार नागार्जूनसोबत तिचे अफेयर असल्याचे बोलले जात होते. पण ती अजूनही सिंगल आहे.
      जवळपास नऊ वर्षे जॉन अब्राहमसोबत सिरियस रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या बिपाशा बसूचे  आता त्याच्याशी ब्रेक अप झाले आहे. बारा वर्षांपूर्वी अजनबीद्वारा फिल्म इंडस्ट्रीत आलेल्या बिपाशाच्या खात्यावर जिस्म,राज,धूम 2, ओमकारा, नो एंट्री, अपहरणसारखे अनेक हिट चित्रपट आहेत. 34 वर्षाची ही बंगाली कन्या जॉनच्या अगोदर डिनो मोरियोसोबतही काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. मात्र आजही ती सिंगल आहे. सध्या तिचे नाव हरमन बावेजाशी घेतले जात आहे. पण तिला विचारल्यावर ती म्हणते, हरमन फक्त माझा दोस्त आहे.
      33 वर्षाच्या नेहा धुपियाला देखील लग्नची प्रतीक्षा आहे. 12 वर्षांपासून  फॅशन आणि चित्रपटांमध्ये सक्रिय राहिलेल्या नेहाला वैयक्तिक आयुष्यात मात्र अपयशच मिळाले आहे. त्यामुळे रिलेशन निर्माण करण्याच्याबाबतीत ती सावध आहे. योग्य असा जोडीदार मिळाला की, आपण विवाह बंधनात अडकू, असं ती ठामपणे सांगते. नेहाबरोबरच इंडियन क्रिकेट लीगच्या निमिताने पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेली प्रिती झिंटादेखील अजून अविवाहित आहे. बर्याच कालावधीनंतर अलिकडचेच तिचा एक सिनेमा आला पण चालला नाही. नेस वाडियासोबतचे अनेक वर्षांपासूनचे रिलेशनशिप तुटल्यानंतर सध्या तरी तिचे नाव कुणाशी जोडले गेलेले नाही. 1998 मध्ये दिल से चित्रपटाद्वारा बॉलीवूडमध्ये पर्दापण केलेल्या प्रितीच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत.सोल्जर, क्या कहना, सलाम नमस्ते, वीर झारा आदी चित्रपटांचा त्यात समावेश आहे.35 वर्षाच्या डिम्पलगर्ललामात्र लग्नाची फारशी घाई नाहीए. हजरजबाबी आणि बिझनेसचे पक्के सेन्स  असलेल्या प्रितीने  सध्या चित्रपट आणि बिझनेसवर  आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

     वय  वाढत चालले असले तरी या अभिनेत्रींना त्याची पर्वा नाही. त्यांची चिंता मात्र त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. चित्रपट इंडस्ट्रीला लागली आहे. नट्यांच्या लग्नाच्या चर्चेचा  विषय केवळ आजचा नाही. त्यांची वयं वाढत चालली की, त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण येते. सध्याही तसेच वातावरण आहे. नुकतेच मल्लिका शेरावतने एम टीव्हीच्या बॅचलरेट इंडिया या स्वयंवरावर आधारित असलेल्या कार्यक्रमाद्वारा 29 पुरुषांमधून विजय सिंह याला आपला जोडीदार म्हणून निवडला आहे. या घडामोडी घडत असतानाच मल्लिकाचे बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीच विवाह झाला होता आणि पहिल्या नवर्यापासून तिला एक मुलगाही आहे, ही बातमी थडकली. पण काही का असेना तिने दुसरा जोडीदार निवडला आहे, त्याच्याशी तिचा किती दिवस संसार चालतो, ते आपल्याला पाहायला मिळलेच.


लेख डॉक्टरांची जीवघेणी लिखणावळ



     डॉक्टरांच्या गिचमिड, घसरड्या आणि घाणेरड्या अक्षरांमुळे दरवर्षी सात हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो, यावर आपला विश्वास बसेल का? नाही ना? पण ही वस्तुस्थिती आहे. एका सरकारी रिपोर्टनुसार डॉक्टरांच्या अशा घसरड्या, न वाचता येणार्या हस्ताक्षरांमुळे दरवर्षी जवळपास सात हजार रुग्णांना आपले प्राण गमवावे  लागतात. इतकी या डॉक्टर मंडळींची लिखणावळ खराब आहे. त्यांच्या या लिखणावळीमुळे लोकांचा जीव जात असेल तर त्यांच्यात आणि जल्लाद यांच्यात काय फरक आहे, असे समजायचे? आपल्या घरातली किंवा खिशातली डॉक्टरांची औषधांची चिठ्ठी  काढून पहातुमच्याही लक्षात ही गोष्ट येईल. शेवटी ही माणसं अशी का करतात बरं?
      अशाच हस्ताक्षरात त्यांनी डॉक्टरकीच्या डिग्रीची परीक्षा दिली असती तर ही मंडळी पास झाली असती का? आणि अशी दुकाने थाटल्यासारखी दवाखाने उघडली असती किंवा सरकारी रुग्णालयात नोकरीला लागली असती का? डॉक्टर झाल्यावरच  त्यांचे हस्ताक्षर का बिघडते? याचा सरळ अर्थ निघतो. तो म्हणजे ते केवळ पैसे कमवायला बसले आहेत. रुग्णांना झिडकारल्यासारखे करत ही माणसे औषधाची चिठ्ठी लिहितात. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, हे वचन ही मंडळी विसरूनच जातात. कित्येक डॉक्टर तर फक्त पहिले अक्षर तेवढे स्पष्ट लिहितात. बाकी पुढे नुसती आढवी रेघ असते. कित्येकांना त्यांनी काय लिहिलं आहे, असं विचारलं तर सांगून टाकतात, मेडिकलमध्ये जा, तो वाचून गोळ्या-औषध दे ईल. म्हणजे त्यांना पुन्हा विचारायला गेले तर त्यांचे त्यांना लिहिलेले वाचता येत नाही, अशी ही तर्हा. मग मेडिकल दुकानदाराला तर काय कप्पाळ कळणार त्याचे हस्ताक्षर! तो पहिल्या अक्षरावरून अंदाजित गोळ्या लिहून देतो. मग होतात चुका. चुकीचा डोस दिला गेल्याने रुग्णाच्या जीवावर बेततं.
      जग जिंकायला निघालेल्या सिंकदरचे अक्षर फारच वाईट होते. तो स्वारीवर असल्यावर आपल्या बायकोला पत्रं लिहायचा. बिचारी ती पत्रं वाचूच   शकत नव्हती. तो स्वारीवरून परत आल्यावर तिने ती सगळी पत्रं त्याच्यापुढे टाकली आणि म्हणाली, यात काय लिहिलात मला वाचून दाखवा. तो म्हणाला, ही पत्रं  लिहून मला खूप दिवस झाले. आता ही पत्रं मी आता कशी वाचू शकतो? पुढे इतिहासात  सिंकदर महान (?) ठरला. मग त्याच्या समर्थकांनी एक सिद्धांत मांडला, महान लोकांची अक्षरे खराबच असतात. आता या महानतेच्या पलिकडे आपली ही डॉक्टर मंडळी गेली आहेत. कारण यांची हस्ताक्षरे नुसते खराबच नाहीत तर जीवघेणीही आहेत.
      डॉक्टरांचा दवाखान्याचा उंबरा उलांडायचा म्हणजे खिशात भरपूर पैसे असायला हवा. त्यांच्या अशा हस्ताक्षरांचा विचार केला आणि एखाद्याचे ऑपरेशन झाले तर मग त्याने पिशवी भरूनच पैसे न्यायला हवेत. एक तर डॉक्टर वेळेत सापडत नाहीत किंवा जाग्यावर नसतात म्हणून अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यात डॉक्टर लोक जाणूनबोझुन रुग्णांना मारत असतील, हा प्रकार  मोठा चिंताजनक म्हटला पाहिजे. आपल्या मेडिकल कायद्यात अशी काही तरतुद नाही की, त्यांनी स्वच्छ अक्षरात औषधांची चिठ्ठी लिहून द्यावी. मात्र सरकारने किंवा सामाजिक संस्थांकडून याची दखल घेतली जायला हवी. चुकीच्या डोसने जीव गमावणार्यांची ही आकडेवारी मोठी चिंताजनक आहेच, पण त्यातही अशा चुकीच्या औषधांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होणार्यांची संख्याही कमी असणार नाही. त्यामुळे  याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे. डॉक्टरांनी रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणून काम करायला हवे. औषधांची चिठ्ठी लिहून देताना औषधांची नवे व डोसेचे प्रमाण स्वच्छ अक्षरात लिहून द्यायला हवेत्यांचे खराब अक्षर हे त्यांच्या असंवेदनशीलता आणि  असामाजिकतेच लक्षण मानले पाहिजे. सुंदर  हस्ताक्षर हाच खरा दागिना आहे, असा एक सुविचार प्रसिद्ध आहेसुंदर अक्षरात त्याचे व्यक्तिमत्त्व डोकावते, म्हणतात. तर मग डॉक्टरांच्या या औषधांच्या चिठ्ठ्यांवर लिहिलेली अक्षरे त्यांच्या कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक म्हणायचे, याचा विचार केला गेला पाहिजेआता कॉम्प्युटरचे युग  आहे, त्याचा लाभ उठवत डॉक्टरांनी औषधांच्या चिठ्ठ्या कॉम्प्युटर प्रिंट द्याव्यात, त्यामुळे असे धोके राहणार नाही. शिवाय त्यांचा  लिहिण्याच्या कंटाळ्यापासून बचावही होईल.