Saturday, March 31, 2012

बालकथा दयाळू हिमपरी

    आयेशा बकर्‍या चारायला वनाजवळच्या मैदानात आली होती. इतक्यात बर्फ पडू लागला. आयेशा इकडे-तिकडे चरत असलेल्या बकर्‍यांना एकत्र करू लागली. तेव्हा कसलासा बारीक आवाज तिच्या कानावर पडला. पण तिथे तिला कुणी दिसले नाही.
     थंडीने आयेशा थरथर कापत होती. ती विचार करू लागली, अंटीच्या पोरी तर शेगडीसमोर बसून गप्प मारत असतील. माझे मम्मी-पप्पासुद्धा जिवंत  असते तर मला इतक्या थंडीत काम करावं लागलं नसतं.
     आयेशाने बकर्‍यांना हाकत एका मोठ्या दाट वृक्षाखाली आणले. तीसुद्धा तिथेच शरीर गोळा करून उभी राहिली.  मम्मीची आटहवण आल्याने तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. ती आपल्या अंटीसोबत राहात होती... तेवढ्यात तिला 'वाचवा, वाचवा,' असा बारीक आवाज ऐकू आला. ती लक्षपूर्वक इकडे-तिकडे पाहू लागली. समोरच काही अंतरावर एक छोटीशी परी बर्फाच्या एका मोठ्या गोळ्याखाली अडकून पडली होती. ती मदतीचा धावा करीत होती.
     आयेशाने बर्फाचा गोळा बाजूला केला. परीला उचलून घेतलं. तेवढ्यात तिथे एक मोठी परी आली. ती तिची मम्मी होती. तिने आयेशाला प्रेमाने गोंजारले. तिचा हात हातात घेत 'थँक्यू' म्हणाली. आणि तिच्या हातात एक पंख ठेवत म्हणाली," बाळ, तुला कशी अडचण आली, कधी संकटात सापडलीस तर पंख हातात घेऊन मला हाक मार. मी लगेच तुझ्या मदतीला येईन. माझं नाव हिमपरी आहे.''
     एवढे बोलून ती आपल्या छोट्या परीला घेऊन उडून गेली. हिमपरीशी भेट झाल्याने आयेशाला खूप आनंद झाला. मोठा धीर आला. संध्याकाळ होत होती. आयेशा बकर्‍या घेऊन घरी आली. आता जेव्हा कधी तिला उदास वाटे, तेव्हा ती हिमपरी आणि तिच्या मुलीला बोलावून घेई. त्यांच्याशी गप्पा मारी, खेळे. त्यामुळे ती उत्साही होई.  कामाचा क्षीण कुठल्या कुठे पळून जाई.
     एका दिवसाची गोष्ट! अंधार पडू लागला होता. आयेशा घरी परतण्याची घाई करीत होती. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. बकर्‍या इकडे-तिकडे भरकटल्या. आयेशासुद्धा बर्फात अडकून पडली. हिमपरीने दिलेला पंखसुद्धा कुठे उडून गेला. तिच्यापुढे प्रश्न पडला-आता काय करायचं? आता कुणाची मदत घ्यायची? ती पार घाबरून गेली. तिला अंटीचीही भीती वाटू लागली. बकर्‍या हरवल्या म्हणून तिचा मार बसणार होता.
     तेवढ्यात तिथे एक वृद्ध बाबा आला. आता आयेशा थोडी फार  सावरली. वृद्ध म्हणाला," मुली, मला थोडी फुलं आणून देशील का?'' आयेशा डोळ्यांतले अश्रू पुसत म्हणाली," हो बाबा, आता आणते." अशी म्हणून तिने वार्‍या-बर्फाची फिकीर न करता खुपशी फुलं तोडून आणून बाबाला दिली. तो वृद्ध बाबा तिला आशीर्वाद देत निघून गेला. आणि काय आश्चर्य! तिच्या हरवलेल्या सगळ्या ब़कर्‍या परत आल्या. आयेशा आनंदाने घराकडे निघाली.
     दुसर्‍यादिवशी आयेशा जंगलात गेली. पाहते तर तिथे हिमपरी आणि तिची मुलगी. ती हरखून गेली. धावतच जाऊन तिने हिमपरीला मिठी मारली. ती वादळात कशी अडकली? पंख कसे हरवले? तो वृद्ध बाबा... सगळे काही तिने आईला सांगावे तसे हिमपरीला सांगून टाकले. हिमपरीने तिला आणखी एक पंख दिले. हिमपरी तिच्या मुलीसह पून्हा निघून गेली. आता आयेशाचीसुद्धा घरी जाण्याची वेळ झाली होती.  
      ती वेगातच घरी निघाली होती. तेवढ्यात तिचा पाय घसरला. ती घरंगळत दरीत कोसळणार, इतक्यात तिला कोणी तरी धरले. तिने पाहिले, हे  तर कालचे वृद्ध बाबा!... ती काही बोलणार तोच वृद्ध एक सुंदर युवक बनला. युवक म्हणाला," मी वनदेवतेचा पुत्र. आईने तुला बोलावले आहे. आता तुला तुझ्या अंटीकडे जावं लागणार नाही. तू आमच्यासोबतच बर्फाच्या महालात राहा."
     आयेशा युवकासोबत निघाली. महालात गेल्यावर तिच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही.  हिमपरी तिथे  सिंहासनावर बसली होती. ती तिला प्रेमाने जवळ घेत म्हणाली," बाळ, मीच वनदेवी! मी तुझी परीक्षा पाहात होते. मीच एका चिमणीला परी बनवून तिला बर्फात अडकवले होते. मुलाला वृद्ध बनवून फुलं आणायला तुझ्याकडे पठवले होते. तू खरीच मोठी दयाळू आणि परोपकारी आहेस. तुझा स्वभाव मला फार आवडला. आता तू इथेच आमच्यासोबत राहायचंस."
     आयेशाला अत्यानंदाने रडू कोसळले. तिची अंटीच्या अत्याचारापासून आता सुटका झाली होती. तिने वनदेवतेचे पाय धरले. वनदेवतेने तिला प्रेमाने ऊठवले. आपल्या हृदयाशी धरले. आता आयेशा तिथेच राहू लागली. इकडे तिच्या अंटीने आयेशाचा खूप शोधाशोध केला. पण ती सापडणार थोडीच !                                 

Friday, March 30, 2012

बालकथा गुरूचा शोध

            एकदा एक संत खूप आजारी पडले. आपला अंतीम क्षण जवळ आला आहे, याची कल्पना आली. मात्र  त्यांना आपल्या तीन प्रिय शिष्यांच्या भवितव्याची चिंता सतावू लागली. ते विचार करू लागले,' त्यांना ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाणार्‍या योग्य गुरूची आवश्यकता आहे. मग तो कुठे आणि कसा मिळेल?'
     संत खूप विद्वानांना ओळखत होते. परंतु, त्यांची इच्छा होती की शिष्यांनी स्वतःच आपल्या गुरूची निवड करावी. यासाठी त्यांनी एक युक्ती योजली आणि आपल्या तीनही शिष्यांना बोलावून घेतले. संत म्हणाले,' आपल्या आश्रमात १७ उंट आहेत. मी त्यांची वाटणी करावी म्हणतो. तुम्ही तिघांनी त्यांची  वाटणी   अशाप्रकारे करा की यापैकी सर्वात मोठ्या शिष्याला निम्मे घोडे, मधल्याला एक तृतीयांश घोडे आणि धाकट्याला त्यातला नववा हिस्सा मिळायला हवा.'
     तीनही शिष्य गुरूच्या विचित्र वाटणीमुळे मोठ्या गोंधळात पडले. तिघांनीही खूप विचार केला. पण त्यांना त्यावर उत्तर शोधता आले  नाही. प्रत्येकजण आपापल्या मतीनुसार गुरूंच्या वाटनीचा  अंदाज बांधू लागला. त्यातला एकजण म्हणाला,' मला वाटतं, गुरुजींना वाटणीच कारायची नाही. त्यामुळे आपण तिघेही त्या घोड्याचे  मालक राहू.'  दुसरा म्हणाला,' गुरुजींनी जी वाटणी केली आहे. ती अशक्य वाटत असली तरी त्याच्या जवळपास तरी वाटणी करू. एखाद दुसर्‍याला कमी-जास्त मिळाले तरी काय हरकत आहे?' पण बाकी दोघांना ते काही पसंद पडले नाही. त्यामुळे त्यांची समस्या जशीच्या तशी राहिली. हळूहळू त्यांची समस्या आश्रमाबाहेर गेली. सगळीकडे पसरली. एका विद्वानाच्या कानांवर ही समस्या पडली. त्याने त्या तिन्ही शिष्यांना बोलावून घेतले. विद्वान म्हणाला,' तुम्ही माझा एक उंट घ्या. त्यामुळे तुमच्याकडे अठरा उंट होतील. आता तुम्ही गुरुजींच्या वाटणीनुसार सर्वात थोरल्याला त्यातले निम्मे म्हणजे नऊ उंट द्या. मधल्याला एक तृतीयांश म्हणजे सहा उंट आणि सगळ्यात धाकट्या शिष्याला नववा हिस्साचे म्हणजेच दोन ऊंट वाट्याला येतील.  आता बाकी राहिला एक उंट. तो तर माझा आहे. तो माझा मी परत घेईन. झालं, तुमच्या गुरुजींच्या म्हणण्यानुसार सगळ्यांना बरोबर वाटणी मिळाली.'
     विद्वानाने केलेली योग्य वाटणी ऐकून   तिघेही शिष्य जाम खूश झाले. आणि या वाटणीमुळे शिष्यांना त्यांचा नवा गुरू मिळाला. कारण, गुरू शिष्यांच्या अडचणीत स्वतः सुद्धा सहभागी झाला होता. आता संत निश्चिंत झाले.

Thursday, March 29, 2012

भ्रष्ट निवृत्त सरकारी कर्मचार्‍याला बसणार चाप!

     भ्रष्ट सरकारी कर्मचार्‍यावर त्याच्या निवृत्तीनंतरही कारवाई करून त्याला शिक्षा देण्यात येईल, असे    सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कर्मचारी वा अधिकारी सापडल्यास त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे प्रकरण तर चालविता येईलच. शिवाय निवृत्तीनंतर त्याच्या निवृत्ती वेतनातही कपात करण्यात येईल, असे कार्मिक, सार्वजनिक गार्‍हाणी व निवृत्ती वेतन राज्यमंत्री व्ही. नारायण सामी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.  या निर्णयाचे स्वागत करायला हरकत नाही.  भ्रष्टाचार करून खूपच अंगावर येताहे असे कळल्यावर अचानक सेवानिवृत्ती घेऊन घरी बसणार्‍या आणि उर्वरित आयुष्य चैनखोरीत घालविणार्‍या सरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांना या निर्णयामुळे मोठा चाप बसणार आहे.
      केवळ केंद्र सरकारी कार्यालयेच नव्हे तर राष्ट्रीयीकृत बँका व केंद्र सरकारच्या विविध सरकारी उपक्रमांमधील आस्थापनांनाही अशा प्रकारची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. निवृत्ती वेतनासोबतच भविष्य निर्वाह निधीच्या रकमेतून त्याने केलेल्या भ्रष्टाचाराची पूर्णत: वा अंशत: रक्कम कापून घेण्याची मुभाही देण्यात आली आहे, असे नारायण सामी म्हणाले.
     सरकारी अधिकारी सेवानिवृत्त झाला अथवा त्याने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली तरी त्याच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी होऊ शकते आणि त्याच्यावर खटला चालविला जाऊ शकतो. याबाबत सरकारने  गंभीर पावले उचलली आहेत. यापूर्वी मात्र असे होत नव्हते. एखाद्या भ्रष्ट अधिकार्‍याने अवैधरीत्या संपत्ती जमविली असेल आणि त्याला आपल्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो याची खात्री झाल्यास तो यापासून सुटका करून घेण्यासाठी आजारीपणाचा बहाणा करून स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी बसू शकत होता. किंवा आपली संपत्ती सरकार जप्त करील असा विश्वास वाटतो तेव्हा तो ती संपत्ती आपल्या नातेवाईकांच्या नावावर अथवा मित्रांच्या नावावर करून मोकळा होऊ शकत होता. आणि नोकरीतून निवृत्त झाल्यावर सरकारी तपास यंत्रणा त्याचं काही वाकडं करू शकत नाही हे माहीत असल्याने बिनधास्त आपण भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती आपल्या नावावर करून घेऊ शकत होता  आणि ऐषारामात जीवन जगू शकत होता. हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. निवृत्त झाल्यावर कोणा सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई होत नाही याचा फायदा भ्रष्ट नोकरदार घेत आला आहे.लोक मात्र त्याच्या अचानक झालेल्या बदलाने आश्चर्यचकित होऊन जात. सेवाकाळात कसेतरी जीवन जगणारा सरकारी बाबू अकस्मात कोट्यधीश झाला कसा, असा प्रश्न  त्यांना पडायचा. लॉटरी-बिटरी लागली की काय? असा सवाल तो करायचा. हा निवृत्त नोकर मात्र ग्रॅच्युईटी, फंड, विमा असे काहीतरी सांगून लोकांच्या डोळ्यांत चक्क धूळ फेकत राहायचा. त्यामुळे याअनुषंगाने सरकारचा हा निर्णय मोठा क्रांतिकारी  म्हटला पाहिजे आणि त्याचे सर्व स्तरांतून स्वागत व्हायला हवे. भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गडगंज झालेल्या सरकारी अधिकार्‍यांची सेवानिवृत्तीनंतर किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतरसुद्धा भ्रष्टाचार प्रकरणातून चौकशी केली जाऊ शकते आणि खटलाही चालवला जाऊ शकतो. शिवाय त्याच्या निवृत्ती वेतनातून वसुली केली जाऊ शकते. यामुळे भ्रष्ट सरकारी नोकरदारांवर चाप बसणार आहे. या सरकारच्या निर्णयाने आगामी काळात काही चांगले परिणाम दिसू शकतील अशी आशा करायला हरकत नाही.
      बहुतांश आयएएस अथवा आयपीएस अधिकारी छोट्या छोट्या शहरांमध्ये डीएम किंवा एसपी म्हणून जातात तेव्हा त्यांचा राहणीमानाचा थाट अगदी राजा-महाराजांसारखा असतो, यात अजिबात संशय नाही. ते सामान्य लोकांना कस्पटासमान समजत असतात. बहुतांश अधिकारी आपल्या अखत्यारीतील विकासकामांसाठी आलेला पैसा आपल्या खालच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने दोन्ही हातांनी लुटत असतात, मात्र काही अधिकारी-कर्मचारी खरोखरीच प्रामाणिक असतात, पण त्यांची संख्या अत्यंत नगण्य आहे. जी सरकारी माणसं प्रामाणिक असतात त्यांना त्यांचे घरचे, मित्रपरिवार यांची बोलणी खावी लागतात. त्यांना वाटेल तसे बोलले जाते. कारण त्याच्या सहकारी जोडीदाराचे राहणीमान पाहून खटकत असते, सुखावत असते. आपल्याही यजमानाने, मित्राने असे वागावे असे त्यांना वाटत असते. यासाठी त्यांच्यावर दबाव येत राहतो. शिवाय अलीकडच्या काळात प्रामाणिकपणावर तर कोणी विश्‍वासच ठेवायला तयार नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्‍याची दोन्हीकडून मानसिक, आर्थिक कोंडी होत राहते. त्यामुळे नाइलाजास्तव बेइमानीचा मार्ग पकडावा लागतो आणि या भ्रष्ट मार्गाला अंत नाही.यात आणखी एक बाब पाण्यासारखी स्वच्छ आहे ती म्हणजे भ्रष्ट अधिकारीच लोकप्रतिनिधींना पैसे खायला शिकवतो. विकास निधीतल्या पैशाला वाटे दाखवण्याचे काम अधिकारी करीत असतो. पैसा खर्चून निवडून आलेला लोकप्रतिनिधी अथवा मंत्री पडलेला खड्डा भरून काढायलाच टपलेला असतो. दोघांचे संगनमत होते आणि विकास निधी लुटला जातो. भ्रष्टाचार करून गडगंज झालेला अधिकारी अंगावर यायला लागल्यावर स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरात आरामात बसतो. निवृत्त झालेल्या नोकरदार मंडळींची चौकशी होत नाही, खटले दाखल होत नाहीत.
     दर पाच वर्षांनी बदलणार्‍या लोकप्रतिनिधींना अधिकार्‍याने काय केले, किती कमावले, याचा थांगपत्तासुद्धा लागत नाही आणि एखादे वेळेस झालीच शिक्षा तर किरकोळ होते. त्यामुळे भ्रष्टाचार करणारा ऐशारामाचे जीवन जगतो.भ्रष्टाचार उघडकीस आलाच तर अधिकारी अडकतो. नेता, लोकप्रतिनिधी मात्र नामानिराळे राहतात. लोकप्रतिनिधींना शिक्षा झाल्याचा प्रकार फारसा घडला नाही. ऐकण्यातही आला नाही. अलीकडच्या काळात काहींना तुरुंगाची हवा खावी लागली असली तरी संबंधित खटल्यामध्ये त्यांना शिक्षा होईलच अशी खात्री कोणी देऊ शकत नाही, पण या बहाद्दराचे घोटाळ्याचे आकडे वाचले तर मात्र सामान्यांचे डोळे फिरल्याशिवाय राहत नाहीत.अलीकडच्या काळात सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे सामान्य माणूस अवाक तर झालाच आहे, पण त्यांच्या सहीसलामत सुटण्याने तर पुरता हतबल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी ही अशी प्रकरणे चव्हाट्यावर आणली असल्याने समाज आता मोठा जागृत होत आहे आणि या जागृतपणाचा हिसकाही पाहायला मिळत आहे, दोन महिन्यांपूर्वी दिल्लीश्‍वरांनी अनुभवला आहे. अण्णा हजारेंच्या मागे लागलेला अलोट जनसागर या भ्रष्टाचाराला विटूनच रस्त्यावर आला होता. यापुढच्या काळात भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. मात्र सरकारनेही त्याबाबत कडक पावले उचलण्याची गरज आहे. भ्रष्ट अधिकार्‍यांना त्यांच्या निवृत्तीनंतरही चौकशी अथवा खटल्यापासून सुटका नाही. ही बाब स्वागतार्ह म्हटली पाहिजे.  मात्र त्याचबरोबर पाच वषार्ंत गडगंज होणार्‍या लोकप्रतिनिधींना कायद्याच्या दृष्टिकोनातून चाप लावण्याची आवश्यकता आहे. त्याच्या काळ्या कमाईचीही चौकशी व्हायला हवी. भ्रष्टाचार हा अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यापासून सुरू होतो आणि त्यांच्या संगनमताने चालतो. त्यामुळे या दोघांवर कायद्याचा फास घट्ट करण्याची आवश्यकता आहे.                  

Wednesday, March 28, 2012

महिलांवरील सायबर अत्याचारांत वाढ

अलीकडच्या काळात स्त्रियांवरील वाढत चाललेले सायबर अत्याचार केवळ छेडछाड किंवा ब्लॅकमेल करण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. स्त्रियांची खासगी माहिती चोरून त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. दिल्लीसारख्या शहरांमधील उपलब्ध आकडेवारीवरून सायबर अत्याचार करणारे ५० ते ७० टक्के लोक कामाच्या ठिकाणचे असल्याचे आढळून आले आहे. नोकरी पेशातल्या महिलांबाबतच अधिक गुन्हे आहेत. जगभरातल्या अत्याचारांच्या घटनांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की, सगळ्यात जास्त अत्याचार स्त्रियांवर झाले आहेत. हुंडाबळीचे प्रकरण असो अथवा कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, एकतर्फी प्रेमातून होणारे लैंगिक छळ किंवा खून, विनयभंग, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ अथवा बालविवाह अशा प्रकारचे अनेक अत्याचार स्त्रीवरच झाले आहेत. यात भरीस भर म्हणून सायबर अत्याचारांचे नवे भूत स्त्रियांच्या पाठीशी लागले आहे. सायबर अत्याचारांतही स्त्रीच ‘टारगेट’ बनली आहे. या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात स्त्रिया बळी पडत आहेत.
     आज सायबर कम्युनिकेशन एक मानवी गरज बनली आहे. मानवी जीवनशैलीचे अंग बनले आहे. त्याचा लाभ होत असला तरी नुकसान हे त्याचे दुसरे अंगही आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो, पण त्याचा वापर काही माणसे स्व-आनंद मिळविण्यासाठी करतात तर काही माणसे दुसर्‍याला त्रास देऊन आसुरी आनंद मिळवीत असतात. काहींना बदला घ्यायचा असतो तर काहींना प्रेमभंगाने पछाडलेले असते. काहींचे पैशांवर अतोनात प्रेम असते. ते मिळविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची त्यांची तयारी असते. अशा अनेक गोष्टींसाठी सायबर कम्युनिकेशनचा काही माणसे आता सराईतपणे वापर करू लागली आहेत. त्यामुळे सायबर क्राइमचा आलेख वाढत चालला आहे. ढोबळमानाने सायबर क्राइमची व्याख्या करायची झाल्यास ‘संगणकाच्या माध्यमातून संगणक प्रणालीत अनधिकृतरीत्या शिरकाव करून आपले ईप्सित साध्य करणे.’ या सायबर गुन्ह्याचे अनेक प्रकार आहेत. दुसर्‍याचा मानसिक छळ करणे, संगणक प्रणालीत माहितीची, साहित्याची नासधूस करणे, डाटा चोरणे, इंटरनेट तासांची चोरी करणे, दुसर्‍याच्या छायाचित्रांचा गैरमार्गासाठी वापर करणे असे अनेक प्रकारचे गुन्हे संगणकाच्या माध्यमातून केले जातात. फसवणुकीने दुसर्‍याचे पैसे परस्पर पळवणे अशा घटना तुरळक प्रमाणात होत असल्या तरी सायबर क्राइममध्ये स्त्रियांना ‘टारगेट’ करण्याचे प्रमाण मात्र कमालीचे वाढले आहे. स्त्रियांवरील अत्याचारांचा हा प्रकार त्यांना घातक ठरत आहे. याला आवर घालण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
     अलीकडच्या काळात स्त्रियांवरील वाढत चाललेले सायबर अत्याचार केवळ छेडछाड किंवा ब्लॅकमेल करण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. स्त्रियांची खासगी माहिती चोरून त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. युवती, महिलांची छायाचित्रे चोरून छायातंत्रज्ञानाच्या माध्यमातून ती अश्‍लील छायाचित्रांमध्ये बदलली जाऊ शकतात व तशी बदललेली छायाचित्रे आपल्या परिचयाच्या लोकांमध्ये प्रचारित, प्रसारित करून चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा घटना देशभरातल्या अनेक छोट्यामोठ्या शहरांमध्ये घडल्या आहेत. आपल्या या बदनामीमुळे अनेक मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी इहलोकीची यात्राच संपवून टाकली. शिवाय पोलिसांत जावे तर आणखी बदनामीच पदरात पडते. त्यामुळे असले अत्याचार निमूटपणे सहन करणार्‍यांची संख्याही मोठी आहे.
      इंटरनेटचा वापर करताना थोडीशी जरी बेफिकिरी झाली तरी ती घातक ठरू शकते. कारण कुरापतखोर माणसे त्याचा लगेच गैरवापर करायला मोकळे होतात. सायबर अत्याचारअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये ई-मेल अकाऊंटमधून फोटो काढून त्याचा गैरकामासाठी वापर करणार्‍या घटनांचाही समावेश आहे. अशाप्रकारच्या वाढत्या तक्रारींमुळे दिल्लीसारख्या अनेक शहरांमध्ये ‘सायबर क्राइम’साठी स्वतंत्र विभागाचीच स्थापना करण्यात आली आहे. आपल्या राज्यातल्या पुणे, मुंबई शहरातसुद्धा सायबर गुन्ह्यांची दखल घेणे भाग पडले आहे. त्यामुळे इंटरनेट आपल्याला कितीही फायदे देत असला तरी आपला थोडासासुद्धा दुर्लक्षपणा संकटे उभी करू शकतो. कित्येक कुरापतखोर माणसांचा अशा प्रकारचा अत्याचार करण्याच्या मागे बदनामी करण्याचा प्रमुख उद्देश असतो. बदनामी करण्यामागे अनेक प्रकारच्या भावना लपलेल्या असतात. बदला घेण्याची भावना काहींच्यात असते, तर काहीजण निव्वळ मनोरंजन अथवा टाइमपास करण्याच्या उद्देशाने असला प्रकार खेळत असतात. मानसशास्त्रज्ञ याला ‘सायबर सिकनेस’ असे नाव देतात. दुसर्‍याला त्रास देऊन आसुरी आनंद लुटणारे कुठल्याही थराला जातात आणि हा प्रकार जास्तीत जास्त स्त्रियांच्या बाबतीत घडतो आहे. विशेषकरून जे अशा प्रकारचा सायबर अत्याचार करतात ती माणसे संबंधित पीडित महिलेच्या जवळचीच असल्याचेही हे गुन्हे उघडकीस आणताना लक्षात आलेली बाब आहे.
     ही माणसे प्रत्यक्षात समोर अगदी चांगल्या प्रकारे पेश येतात. मात्र पाठीमागे बदनामी करण्याच्या नानाविध क्प्त्या शोधत असतात. दिल्लीसारख्या शहरांमधील उपलब्ध आकडेवारीवरून सायबर अत्याचार करणारे ५० ते ७० टक्के लोक कामाच्या ठिकाणचे असल्याचे आढळून आले आहे. नोकरी पेशातल्या महिलांबाबतच अधिक गुन्हे आहेत. आणखी एका अभ्यासानुसार असे गुन्हे करणारे २० ते २५ वयादरम्यानचे आहेत. नकार, ईर्षा, आत्मिक सुख, सूडभावना, तिरस्कार अशी अनेक कारणे या अत्याचारांमागे आहेत.
     अत्याचारांमागील कारणे काहीही असली तरी ही समस्या महिलांसाठी मोठी धोकादायक रूप धारण करत आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून याला आळा घालण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील याचा अभ्यास करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. महिलांनीही जरूर ती सावधगिरी बाळगायला हवी. सध्या तरी सायबर अत्याचारांपासून बचावण्यासाठी जागरूकता याचीच मोठी आवश्यकता आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे  dainik saamana 28/3/2012 

Tuesday, March 27, 2012

भारतीय खेळांचा कॅन्सरः क्रिकेट

     आपल्या देशात तसे पाहायला गेले तर क्रीडा प्रकारांची तशी काही वानवा नाही. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, तिरंदाजी, टेनिस त्याचबरोबर खो खो, कबड्डी, कुस्ती आदीए देशी खेळही खेळले जातात. या खेळांची प्रांतवार लोकप्रियताही वाखाणण्यासारखी आहे. तीन दशकापर्यंत कोलकात्यात फुटबॉल, दिल्ली- हरियाणात कुस्ती, महाराष्ट्र- पंजाबात कबड्डी आणि दक्षिण भारतात व्हॉलीबॉल किंवा ऍथलेटिक्सची लोकप्रियता सर्वोच्च स्तरावर होती. पण आज क्रिकेटरुपी दानवाने देशातल्या सर्वच खेळांना गिळंकृत करून टाकले आहे. क्रिकेटचा पागलपणा, असा उन्माद, असली आंधळी क्रिकेटभक्ती यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती. आणि विशेष म्हणजे ज्या देशात मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या साहेबांच्या देशातही इतका वेडेपणा पाहिला गेला नाही. भारतीय जनमानसात चढलेला उन्माद भारतीय खेळांना मात्र मृत्यूपंथाला नेत आहे.
     केवळ क्रिकेट आणि क्रिकेट हाच भारतीयांचा धर्म बनला हे. संपूर्ण जगभरातील फक्त डझनभर देशात खेळल्या जाणार्‍या या क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर अथवा महेंद्रसिंह धोनी यांनी शतक ठोकले तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचले जाते. सर्वसामान्यांपासून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसहेचे खासदारसुद्धा क्रिकेटपटूंचे कौतुक करायला विसरत नाहीत. विशेष म्हणजे 'टीम इंडिया' च्या दारुण पराभवावर आगपाखड करायला आणि खराब कामगिरीवर चिंता व्यक्त करायला हीच माणसे आघाडीवर असतात. मात्र देशातल्या अन्य क्रीडा प्रकारातल्या खेळाडूने अथवा संघाने विश्वविजेतेपद मिळवले किंवा विश्वविक्रम केला तरी त्याची फारशी चर्चा केली जात नाही. हॉकी, मुष्टीयुद्ध, बुद्धीबळ, बिलियडर्स, तिरंदाजी, कुस्ती, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल अशी काही क्रीडा प्रकारांची नावे आहेत. क्रिकेटच्या वेडापायी अन्य खेळातील उत्कृष्ट खेळाडूंची मोठी कुचंबना चालली आहे. सानिया मिर्झा, सायना नेहवालसारखे काही खेळाडू त्याला अपवाद आहेत. अलिकडच्या काळात काही खेळांना महत्त्वही आले आहे. मात्र क्रिकेटच्या तुलनेने म्हटले तर 'दरिया में खसखस'च! बीसीसीआय ही संस्था जगात एक श्रीमंत संस्था मानली जाते ते यामुळे. सगळा पैशाचा ओघ, प्रसिद्धी, जाहिराती, मान्-सन्मान सगळे सगळे क्रिकेटभोवती फिरत आहे.
     आज क्रिकेट खेळणार्‍या देशांवर दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की या देशातील क्रिकेटची लोकप्रियता घसरत चालली आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, झिम्बावे, न्यूझिलंड आदी देशांमध्ये क्रिकेटला पर्यायी खेळ पुढे आले आहेत. आपण मात्र खेळ म्हणजे क्रिकेट समजून अफूची गोळी खाऊन बसलो आहोत.  अजूनही म्हणावा असा दुसरा खेळ आमच्या डोक्यात नाही. नाही. परिणामस्वरूप आपला देश अन्य क्रीडा प्रकारात अद्याप खूप मागास आहोत. क्रिकेट सोडला तर करिअर म्हणून कालपर्यंत दुसरा खेळच नव्हता. आता कुठे जरा युवा वर्ग अन्य खेळाकडे वळतो आहे. पण त्यात अजून खूप प्रगती अपेक्षित आहे. शिवाय शासनस्तरावर त्यासाठी मोठी चालना मिळायला हवी. आपला देश देशी खेळाबाबत अजिबात निरुत्साही आहे. चीनसारख्या देशांनी आपल्या देशी खेळांना चालना देऊन ऑलिंपिकसारख्या स्पर्धांमध्ये आपल्या डझनावरी खेळांना स्थान मिळ्वून देण्यात यश मिळवले आहे. मात्र आपण त्याच्या उलट वागत आहोत.
     क्रिकेटने अन्य खेळांना अक्षरशः कॅन्सरग्रस्त करून टाकली आहे. वास्तविक क्रिकेट हा एक क्रीडा प्रकार आहे. वास्तविक क्रिकेट हा खेळ आहे, मानायला दुसरा एक वर्ग मानायलाच तयार नाही. वेळ घालविण्याचे साधन असल्याचे म्हटले जात आहे. या खेळामुळे आमची इतर क्षेत्रातील क्रयशक्तीही खालावत चालली आहे. सरकारी कार्यालये, अन्य सार्वजनिक ठिकाणे कामापेक्षा क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. याचा अर्थ क्रिकेट हा पांढरपेशांचा वेळ दवडणारा खेळ राहिला आहे.
    क्रिकेटचा कैफ आणि त्याची देशपातळीवरील त्याच्या ठळकपणा आपल्या देशातील घसरलेल्या खेळ- संस्कृतीची अओळख करून द्यायला पुरेसे आहे. या खेळातील आपल्या देशातील खेळाडूंच्या चांगल्या = वाईट कामगिरीवरच्या प्रतिक्रिया या खेळाविषयीचा उन्माद स्पष्ट करतो. संघ जिंकल्यानंतर लाखो- करोडोंचा पुरस्कार, प्रसारमाध्यमांकडून त्यांची सातत्याने होणारी वाहवा आणि खेळाडूंना देवाच्या जागी बसवणारी हीच निस्सिम चाहते मंडळी संघ हरला तर मात्र क्रिकेट प्रेमाच्या आवेशापोटी खेळाडूंच्या घरांवर हल्ले करतात. त्यांचे पुतळे जाळतात. त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढतात, निदर्शने करतात. याचा अर्थ यश आणि अपयश या दोन्हीतही किती उन्माद आपल्या अंगात भरला आहे, याची प्रचिती येते. हे खूळ प्रत्येक सामन्यागणिक संचारलेलं असतं.
     इतके क्रिकेटवेड भारतीयांच्या अंगात भिनायचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्याबाबत स्पष्टपणाने काही सांगता येणं अवघड आहे. काही क्रीडातज्ज्ञांनी व सामाजिक स्वास्थतज्ज्ञ यांनी वेळोवेळी काही टिपण्या दिल्या असल्या तरी त्यांनी प्रामुख्याने आपल्या उत्सवप्रेमाच्या परंपरेकडे अम्गुलीनिर्देश केले आहे.  शिवाय वेळेबाबतचा हलगर्जीपणा या आपल्या भारतीयांच्या दोषावरही बोट ठेवले आहे. कामाशिवायच्या गप्पाटप्पा , उठवळवृत्ती आणि सर्वाधिक म्हणजे खेळाविषयीची अभिजात भावना, ओढ. ही सगळी कारणे क्रिकेटरुपी नशेला खुराक मिळवून देतात. पूर्वी हा खेळ राजा- महाराजांचा, नवाब, कुलीन श्रीमंत लोकांचा खेळ होता. खेळावर त्यांचे निस्सिम प्रेम होते. खेळावर वाट्टेल तेवढा पैसा उधळायचे. साहजिकच ही परंपरा पुढे सर्वसामान्यांपर्यंत आली. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट आणि क्रिकेट आहे. आपल्या देशात अन्य खेळातही खेळाडूंनी देशाचा नावलौकिक वाढवला आहे. मात्र त्यांना पुढचा कौटुंबिक स्थैर्याबाबतचा काळ तितका सोपा राहिलेला नाही. अनेकांना त्यांच्या उतारवयात पोटापाण्यासाठी मोलमजुरी करावी लागली आहे.  अलिकड्च्या काळात त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी म्हणावी अशी प्रगती झाली नाही. आजही कित्येक खेळाडूंना प्रायोजक मिळवण्यासाठी महत्प्रयास करावे लागतात. तरीही हाती काही लागत नाही. हॉकीचा जादुगार मेजर ध्यानचंद, खुशाबा जाधव, मालवा, गुलाबसिंहसारख्या विभिन्न खेळातील शेकडो खेळातील खेळाडूंचे जीवन समाधानात गेले नाही. त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. करावा लागत आहे. आर्थिक टंचाईमुळे त्यांचे आयुष्य दुर्दैवी ठरले. क्रिकेटमधल्या लोकांना निवृतीनंतरही पंच, समालोचक, प्रशिक्षक अशा अनेक भूमिका पार पाडायला सहजतेने संधी मिळत आहे, त्याला कारण म्हणजे क्रिकेटचा उदोउदो.
     जाहिरातबाजीतून आपले उखळ पांढरे करून घेतलेल्या क्रिकेटविरांना राज्य सरकारे आणि केंद्र सरकार सवलतींचा वर्षाव करते. आयपीएलसारख्या खेळांमध्ये भाग घेऊन मैदानावरच्या धावांबरोबरच पैशांचाही पाऊस पाडणार्‍या याच खेळाडूंना ' भारतरत्न' देऊन सन्मान केला जावा, अशी ओरड करणार्‍यांविषयी तर खरोखर कीव करण्यासारखी परिस्थिती आहे.  खरोखरच हे खेळाडू देशासाठी खेळतात का याचा विचार क्रिकेटप्रेमींनी करायला हरकत नाही, पण जे स्वतः क्रिकेट प्रेमात आंधळे झाले आहेत, त्यांच्याकडून निरपेक्ष भावनेची काय अपेक्षा करायची असा प्रश्न आहे.  अशा या ग्लॅमर भरलेल्या, भारतीयांना धुंदी चढलेल्या आणि खेळाडूच्या पायावर पैशाच्या राशी ओतणार्‍या क्रिकेटकडे ओढा वाढला नाही तर नवलच! साहजिकच अन्य खेळात प्राविण्य मिळवून आर्थिक गटागंळ्या खात बसण्यापेक्षा 'वाहत्या गंगेत हात धुवून घेण्या'ची प्रवृत्ती वाढीस लागणार, हे ओघाने अपेक्षित आहे. नव्या दमाच्या खेळाडूंना असे वाटतच, पण प्रत्येकाला आपल्या घरात सचिन तेंडुलकर जन्माला आला पहिजे, असे वाटत असते. इतिहासातून हेच शिकता येते.
     ज्या देशामध्ये या खेळाचा उगम झाला, तिथून आता तो उखडला जात आहे. तरीही भारतीय उपखंडात मात्र क्रिकेट अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. भारताबरोबरच पाक, बांगला देश आणि श्रीलंकेतही क्रिकेटचा उन्माद भयानक आहे. याचा अर्थ सरळ आहे, आपल्यात इंग्रज गुलामगिरीची मानसिकता, सरंजामशाही आणि अभिजात वर्गाचा दर्प अजूनही लोकांमधून नाहीसा झाला नाही. प्रसारमाध्यमेही टीआरपीसाठी मिळालेल्या संधीचे सोने करायला टपलेली आहेतच. परिणामी क्रिकेटचीच तळी उचलून त्यांनी आपले आर्थिक हित जाणले आणि साधले. 'ग्लोबल' चा आधार त्यांनी घेतला.
     आपल्या देशात हा खेळ इंग्रजांनी आणला. इथल्या सामंत, राजेरजवाडे, नवाबांनी तो पोसला. साहजिकच त्याच्यावर श्रीमंतांचा खेळ म्हणून शिक्का बसला. पण त्यावेळी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांमध्ये देशी खेळच लोकप्रिय होते. फुटबॉललाही मध्यमवर्गियांनी स्वीकारले होते. मोहन बगानच्या संघाने १९११ मध्ये अनवाणी पायांनी फुटबॉल खेळून इंग्रजांच्या संघाला नामोहरम केले होते. तेव्हा तमाम भारतीयांमध्ये देशप्रेम उचंबळून आला होता. हॉकीमध्ये १९२८ साली ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यावर भारतात मोठा जल्लोष झाला होता. आज क्रिकेटबाबतीत जितका उत्साह, जितका जोम आणि जितकी भावना आहे, तितकाच उत्साह त्यावेळी अन्य खेळांबाबत होता. आज मात्र ती हावना, उत्साह राहिलेला नाही. काही दशकांपूर्वी हॉकी, कुस्तीसारखे खेळ देशभरात लोकप्रिय होते. कुस्तीमध्ये विशंबर, मालव, सुदेश, वेदप्रकाश, सतपाल, जाधव सारख्या पैलवानांनी विश्व ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली होती. हॉकीची गोष्ट मात्र विशेषत्वाने मोठी कौतुकास्पद होती. या खेळात आपण अनेकदा   ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. कोणत्याही डामडौल, योग्य प्रशिक्षणाशिवाया आणि सुविधांव्यतिरिक्त या खेळाडूंनी दैदीप्यमान यश मिळवून आपल्या देशाचे नाव जगात उंचावले होते.
    आपले देशी खेळ सर्वसामान्य आणि मध्यमवर्गियांमध्ये लोकप्रिय होते. आजही आहेत. तिरंजादी, वेटलेप्टिंग या खेळातील खेळाडूही गरीब, मध्यमवर्गीयच आहेत. क्रिकेट खेळात यश मिळवलेले खेळाडू केवळ दहा- बारा देशांमध्ये खेळल्या जाणार्‍या क्रिकेटसारख्या खेळात विश्वविजेता बनले नाहीत. तर १००-५०० देशांमध्ये खेळल्या जाणार्‍या खेळांमध्ये आपल्या यशाचा झेंडा आपला यशाचा झेंडा फडकावला आहे. सन १९८० च्या दशकांनतर या खेळांना जसे काही ग्रहणच लागले. वास्तविक या खेळांवर बदलत्या गरजानुसार ज्या तर्‍हेने लक्ष द्यायला हवे होते. , तितकेसे दिले गेले नाही. खेळांच्या पाठीमागचा आधारही हळूहळू कमी होत गेला.     ही खेळसंस्कृतीच्या दृष्टीने दुर्दैवाची म्हणावी लागेल. १२५ कोटीच्या भारताला ही बाब नक्कीच शरमेची आहे.
     या क्रिकेटच्या नादाला लागून कबड्डी, खो खो, मलखांब, दांडपट्टा, विठी-दांडू, रस्सीखेचसारखे अनेक क्रीडा प्रकार आम्ही विसरून गेलो आहोत. आपला शेजारचा देश चीनमात्र त्यांच्या देशी खेळांना प्रोत्साहन देऊन, त्यांचे संवर्धन करून व सातत्याने पाठपुरावा करून त्याम्चे खेळ ऑलिम्पिंक खेळात समाविष्ठ करून घेण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे विदेशी क्रीडा प्रकारातही चीन आघाडीवर आहे. आम्ही मात्र एका खेळालाच कवटाळून बसलो आहोत, ही आपल्यासारख्या सव्वाशे कोटी जनतेच्या दृष्टीने शरमेची बाब म्हणायला हवी. सरकार या देशी खेळांसाठी पैसा खर्च करत असली तरी ते खूपच नगण्य आहेत. शिवाय या ख्रेळांना ग्लॅमर मिळवून देण्यात सर्वच स्तरावर अपयशी ठरल्याने आपले देशी खेळ रसातळाला चालले आहेत.
     रामायण, महाभारत या पौराणिक कथांमध्ये राम, अर्जून, कृष्ण, भीम, हनुमान, वाली, सुग्रीव, बलराम आदींनी कुस्ती, तिरंदाजीत अदभूत असे शक्ती प्रदर्शन केले आहे. यानंतर बर्‍याच वर्षांनी आपल्याकडे खेळाचे स्वरुप आले. ऑलिम्पिंकमध्ये कुस्तीला १९०४ साली तर तीरंदाजीला १९७२ साली मान्यता मिळवण्यात यश मिळाले व त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. याचा अर्थ शासन स्तरावर आणि लोकांची मानसिकता किती निष्क्रिय आणि इंग्रज गुलामगिरीची आहे, हे लक्षात येते. देशी खेळांचा अभिमान न ठेवणारी पिढी पुढे तशीच घडत आहे. शासनही या खेळांसाठी आपणहून काही करायला तयार नाही. त्यामुळे देशी खेळ मृत्यूपंथाला लागले आहेत, तर क्रिकेट त्यांचे कॅन्सररुपाने गळा घोटून त्यांना संपवायला सज्ज झाला आहे.                                 

Monday, March 26, 2012

लेख मूर्खांचा दिवस

      'मुर्खांना इथे कुठे आलेय महत्त्व?' असे म्हणणार्‍यांनाही कधी वाटलं नसेल की, त्यांच्यासाठीही एक दिवस राखून ठेवला जाईल. माणसे मूर्ख बनायला आणि बनवायला  उतावीळ हो ऊन जातील आणि त्या दिवसाला 'मूर्खांचा दिवस' असे स्वरूप येईल, शिवाय त्याचे लोण अख्ख्या जगभरात पसरेल, असे वाटणे तर अगदी अशक्यच!  पण तसे झाले खरे! आज जगभर १ एप्रिल हा दिवस मूर्ख बनविण्याचा आणि बनण्याचा दिवस म्हणून मूक्रर झाला आहे.
     अर्थात लोकांना मूर्ख बनविण्याची ही परंपरा कधीपासून सुरू झाली, याबाबत मतभिन्नता असली तरी काही लोक याची सुरूवात फ्रान्स तर काहीजण इंग्लंडमध्ये झाल्याचे सांगतात. परंतु, बहुतांश लोक  या 'मूर्ख दिवसाची' सुरूवात फ्रान्समध्ये झाल्याचेच मानतात. प्राचीन काळातील फ्रान्सची जनता आपल्या विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध होती. तिथे सुरुवातीला 'मूर्ख दिवस' साजरा करण्याच्या उद्देशाने संमेलने भरविली जात. या संमेलनांमध्ये राजा, राजपुरोहितसुद्धा सामिल होत. संपूर्ण जनतेच्यादृष्टीने हा दिवस मोठी पर्वणीच होती. कारण या दिवशी जनतेला प्रत्यक्ष आपल्या राज्यकर्त्यांसमवेत हर्षोल्हासात दिवस घालविण्याची सुवर्णसंधी मिळत होती.
     काही लोकांच्यामते 'एप्रिल फूल'ची परंपरा १८ व्या सहतकात ब्रिटनमध्ये सुरू झाली. १७५२ मध्ये शासनकर्त्यांनी आपली जुनी कॅलेंडरपद्धती रद्दबातल करून नवी कालगणना सुरू केली, तेव्हा अनेकांनी या गोष्टीला विरोध दर्शविला होता. कारण नव्या कॅलेंडरमध्ये १ एप्रिल या नववर्षांरंभाऐवजी १ जानेवारी हा वर्षारंभ करण्यात आला होता. पण लोकांच्या विरोधाला भीक न घालता, नवीन वर्षाची सुरुवात १ जानेवारीच ठेवण्यात आली. परंतु, त्याला विरोध करणार्‍यांना मात्र मूर्खांची संज्ञा मिळाली.  आणि तेव्हापासून एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला 'एप्रिल फूल' बनविण्याच्या प्रथेला प्रारंभ झाला. कालांतराने ही प्रथा संपूर्ण युरोपात पसरली.
     अघटीत आणि अविश्वसनीय बातम्यांद्वारा या दिवशी लोकांना वेड्यात काढले जाते. पश्चिमी देशांत 'एप्रिल फूल' बनविण्याला समाज मान्यता मिळाली आहे. या दिवशी हरेकजण दुसर्‍याला मूर्ख बनविण्याची संधी दवडत नसतो.  नव्हे दुसर्‍याला मूर्ख बनविल्याशिवाय सोडत नाही. प्रसारमाध्यमेही याबाबतीत अजिबात मागे नाहीत. आजही ही परंपरा सर्वत्र मोठ्या उत्साहाने चालवली जाते. आपल्या भारतातही वृत्तपत्र माध्यमांनी त्यांचे अनुसरण केले आहे. १९८२ मध्ये ब्रिटिश दूरचित्रवाणीने एप्रिल फूल' च्यानिमित्ताने एक सनसनाटी बातमी देऊन खळबळ उडवून दिली होती. सेंटपाल संग्रहालय त्याच्या मूळ ठिकाणावरून हटवून रिजेंट पार्कमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी ती बातमी होती. अशाच प्रकारची ८० च्या दशकात एका वृत्तसंस्थेने ' इराण- इराक दरम्यानचे युद्ध विनाअट संपले', अशी बातमी देऊन आश्चर्यात टाकले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. कित्येकदा 'एप्रि फूल' बनविण्याच्या अशाप्रकारच्या सनसनाटी बातम्यांमुळे वाईट परिणामांनाही सामोरे जावे लागले आहे. भारतात ही परंपरा इंग्रजांनी आपल्यासोबत आणली. पारतंत्र्याच्या काळात इंग्रज अधिकारी त्यांच्या त्यांच्यात अशा प्रकारचा खेळ खेळायचे. पुढे इंग्रज त्यांच्या या खेळात भारतीयांनाही सामावून घेऊ लागले. भारतीयांनाही दुसर्‍यांना मूर्ख बनविण्याचा धंदा फार आवडला. भारतीय मनोरंजनवादी. त्यांनी हा खेळ पटकन उचलला. बघता बघता मूर्ख बनविण्याचा दिवस पुर्‍या भारत देशात साजरा केला जाऊ लागला. इंग्रज आपल्यातून निघून गेले, पण त्यांची ही विचित्र परंपरा भारतात कायम राहिली. पण ही प्रथा भारतीयांनी जशीच्या तशी आपल्या गळी उतरवली नाही. त्याला भारतीय स्वरूप देण्यात आली.
     आपल्या भारतात तर मूर्खांची 'व्हरायटी'च पाहायला मिळते. संत रामदासांनी तर मोर्खांची लक्षणेच सांगितली आहेत.  महामूर्ख, वज्रमूर्ख, मूर्खाधिराज, मूर्खपती, जडपती, बुद्धीहिन अशी काही मूर्खांची उदाहरणं आहेत. प्राचीन काळी अशा काही लोकांना दरबारात आश्रय दिला जात असे की तो चतुर दरबार्‍यांना मूर्ख बनवित असे. तेनालीराम, बिरबल, गोपाळ, मिथिलांचलचा प्रसिद्ध गानू झा यांसारख्यांच्या चतुराईने भरलेल्या किश्शांना कोण बरे विसरू शकेल?
     खरे तर 'मूर्ख दिवस' साजरा करणार्‍यांवर टीका करणार्‍यांची संख्याही काही कमी नाही. याला सुपीक डोक्यातलं पीक असं संबोधलं जातं. परंतु, हा दिवस साजरा करणार्‍या मदोन्मतांना कशाचीच पर्वा नाही. ते आपल्या आकलेला एक दिवस सुट्टी देतात. जगातल्या सार्‍या समस्यांचं कारण बुद्धीमत्ता आहे.  समस्यांच्या उकलीसाठी बुद्धी वापरली जाते.  मग एक दिवस बुद्धीचा वापर न करता मूर्खात निघालं म्हणून काय बिघडलं? असा त्यांचा सवाल आहे.                                          - मच्छिंद्र ऐनापुरे  

माझा लेखन प्रपंच

surajya, solapur
surajyaa, solapur
surajya, solapur
saamana, mumbai
pudhari,kolhapur
pudhari
pudhari
saamana
pudhari
pudhari
gavakari, nashik
pudhari
pudhari

Friday, March 23, 2012

लेख लोकशाहीचा पराभव

आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे, कळायला मार्ग नाही. दिल्लीपासून ते कोलकाता, बेंगलुरू, डेहरादून आणि रांचीपर्यंत सगळीकडे ब्लॅकमेलिंगचे राजकारण बिनबोभाट आणि तेही सगळ्या मर्यादा ध्वस्त करीत चालले आहे. कुठलेही सरकार घ्या, कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजनेता घ्या, कुणालाच जनतेची  फिकीर राहिलेली नाही, असं वाटतं.  सगळे आपापल्या काळजीने त्रस्त  आहेत. ज्यांचे सरकार आहे, ते आपले सरकार वाचवण्याच्या काळजीत आहेत. जे विरोधी बाकावर बसले आहेत, त्यांना सरकारमध्ये येण्याची काळजी लागली  आहे. देश गेल्या पंधरादिवसांपासून एका रेल्वेमंत्र्याला हटवण्याचा व दुसर्‍याला मंत्री बनवण्याचा तमाशा पाहात राहिला. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्र्याच्या गादीसाठीचे नाटकही पाहत राहिला.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संसद सत्रादरम्यान ज्या पद्धतीने पंतप्रधानांना रेल्वेमंत्री बदलायला भाग पाडले, ते पाहता केंद्रात सरकार नावाचे चिज आहे, याची शंका यावी, अशी परिस्थिती आहे.  हा खरे तर पंतप्रधानांचाच नव्हे तर देशातल्या लोकशाहीचा पराभव आहे, असे मानायला हवे. देशाचा रेल्वेमंत्री ठरविणार्‍या या ममता बॅनर्जी कोण लागतात? तरीही त्यांच्या पसंदीचा रेल्वेमंत्री बनवला गेला. याचा अर्थ केंद्र सरकार लाचार होऊन समर्थन किंवा राजकीय आघाडी सांभाळण्याचीच किंमत चुकती करत आहे. भारतीय राजकारणासाठी ही मोठी क्लेशकारक घटना म्हणायला हवी.
     कर्नाटकमध्ये ७० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करीत बी. एस. येड्डीयुरप्पा यांनी भाजपा श्रेष्ठीं विरोधात दंड थोपटले आहे. त्यांना धमकवले जात आहे. पार्टी नेतेसुद्धा  त्यांना मुख्यमंत्री करण्याची किंवा त्यांची मागणी फेटाळण्याची हिंमत दाखवायला तयार नाही. कारण त्यांना इथेही सत्ता गमावण्याची भीती आहे. राजकीय पक्ष पारदर्शकपणाच्या  बाता करतात पण प्रत्यक्षात पारदर्शकता कुठे दिसतच नाही.  खरे तर भाजपाच्या नेत्यांनी  येडीयुरप्पांना मुख्यमंत्री करणार आहोत की नाही ते, स्पष्टपणे एकदा सांगून टाकायला हवे. पडद्याआडचा लपंडाव थांबवायला हवा. उत्तराखंडमध्ये अशाच नाटकाने गेल्या आठवड्यापासून धुमाकूळ घातला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार बनले आहे, पण एक तृतीयांश आमदार शपथ घ्यायला तयार नाहीत. दहा मंत्र्यांनी शपथा घेऊनही सरकारचे भवितव्य अनिश्चित दिसत आहे. दिल्लीत असो अथवा बेंगळुरू वा डेहरादून; सगळीकडे जे काही घडत आहे, त्याला राजकारण्यांचे खायचे दात आणि दाखवायचे वेगळे असल्यामुळेच घदत आहे! येन केन प्रकारे सत्तेला चिकटून राहणे, हाच राजकीय पक्षांचा मूलमंत्र राहिला आहे. मात्र त्याची किंमत देशातील जनता चुकती करत आहे.
     सरकार धड दिल्लीत चालत नाही की बेंगळुरू, डेहरादूनमध्ये! सगळीकडे बोंबाबोंब सुरू आहे. केंद्रातल्या काँग्रेसने ममताच्या त्रासाला कंटाळून त्यांना हात दाखवून समाजवादी पक्षाला युपीए सरकारमध्ये घेण्याच्या विचारात होती. पण मुलायमसिंह यादव यांनी सरकारमध्ये सामिल होण्याचा कुठलाच इरादा नसल्याचे स्पष्ट सांगून काँग्रेसच्या प्रयत्नांमधील सारी हवाच काढून घेतली. पण भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी युपीएला बाहेरून पाठींबा कायम राहणार आहे. पण  त्यामुळे सपाला सत्तेत घेण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नाला पूर्णविराम मिळाला आहे.
     काँग्रेस केंद्रात आघाडी सरकार चालवत आहे. त्याला आता येत्या आठ मेला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. पण त्यांचं वागणं, बोलणं पाहिलं की असं वाटतं की काँग्रेसला आघाडी धर्म म्हणजे काय आणि तो कसा पाळला जातो, याची माहितीच नाही.काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी आपल्या सर्व सहयोगी पक्षांना डिनरचे आमंत्रण दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तारिक अन्वर यांनी कॉंग्रेसला सहयोगी पक्षांनी चांगला समन्वय ठेवावा, असे खडे बोल सुनावले होते. आता परवा सहयोगी पक्षांमुळे सरकार चालविणे अवघड झाले आहे, असे वक्तव्य करणार्‍या पंतप्रधानांनावर शरद पवार नाराज  झाले आहेत. याचा अर्थ सहयोगी पक्ष काँग्रेसवर नाराज आहेत, हे स्पष्ट होते. काँग्रेस महत्त्वाच्या निर्णयासमयी सहयोगी पक्षांना विश्वासात घेत नाही, असा आरोप केला जातो. ममता बॅनर्जी यांनी सर्व रेल्वे गाड्यांचे भाडे वाढविल्यावर थयथयाट करत रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचा बळी घेतला. त्यांच्या अशाप्रकारच्या वागणुकीचे कोणत्याही बाजूने समर्थन करता येणार नाही, पण त्यांनी जी आदळाआपट केली किंवा राग व्यक्त केला, तो केवळ दिनेश त्रिवेदी यांच्यावर केला आहे, असे नाही तर त्यांना पंतप्रधान, अर्थमंत्री आणि सोनिया गांधी यांचाही राग आलेला आहे. कारण रेल्वेची भाडेवाढ करताना ममतांना विश्वासात घेण्याची गरज वाटली नाही. युपीए-२ चा कारभार ज्याप्रकारे चालला आहे., तो पाहता सरकार चालले आहे कसे, याचे आश्चर्य वाटते. कारभार आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया यात सगळा आनंदीआनंद आहे. मात्र कॉंग्रेसला सत्ता सोडवेना झाली आहे. आपली अकार्यक्षमता लक्षात ठेवून त्यांनी सत्तेपासून दूर व्हायला हवे होते, पण सत्तेची हाव काही जायचे नाव घेत नाही. ममतांपुढे गुडघे टेकून त्या म्हणतील, तसे वागायला काँग्रेस आजघडीला तयार झाली आहे.
     ममता बॅनर्जी जोपर्यंत  रेल्वेमंत्री पदावर होत्या, तोपर्यंत त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. स्वतःचीच मनमानी चालवली. त्यांना वाट्टेल तसे रेल्वे बजेट बनवले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या तेव्हा काही काळ रेल्वेचा कारभार पंतप्रधानांकडे होता. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे मुकुल रॉय होते. दरम्यान आसामात रेल्वेची दुर्घटना घडली तेव्हा ते तिकडे फिरकलेच नाहीत. प्रसारमाध्यमांनी विचारले तेव्हा त्यांनी रेल्वेखाते पंतप्रधानांकडे आहे, हवं तर त्यांनी जावं, असे दर्पोद्गार काढले होते. आता ममता बॅनर्जी त्यांच्याच रेल्वेमंत्रीपदाची माळ गळ्यात घातली. हे आपल्या देशातले आघाडी राजकारणाचे विद्रुप चित्रण म्हणायला हवं.
     काँग्रेसचे काही शूर नेते माध्यमांसमोर काहीही बरळत असतात. त्याला कुठला आधार असतो ना काय! मिळून सगळे एक जात काँग्रेसला अडचणीत आणण्याचाच प्रयत्न करताना दिसतात. काँग्रेस हायकमांड त्यांना ताकीद देत नाही. अथवा त्यांच्या मुसक्या आवळत नाही. त्यामुळे कॉंग्रेस आता हसण्यावारी नेण्यासारखा पक्ष झाला आहे.  कॉंग्रेसवाले स्वतःच्या मस्तीतच दंग असताना दिसतात. त्यांना जनतेचीसुद्धा काळजी वाटत नाही.  आघाडीमधल्या घटक पक्षांचीसुद्धा फिकीर वाटत नाही. सरकारमध्ये वेगळवेगळ्या मतप्रवाहातील, सिद्धांत, नीती या सगळ्यात मतभिन्नता आहे. त्यामुळे सगळ्यांना विचारात घेऊन चालले पाहिजे, याचा विसरच त्यांना पडला आहे. लोकसभेत काँग्रेसचे २०६ सदस्य आहेत. २७२ चा मॅजिक आकडा गाठण्यासाठी त्यांना अशा बेजोड सहयोगींची मदत घ्यावी लागली आहे. डीएमकेच्या कोट्यातील दूरसंचार  मंत्री  दयानिधी मारन, ए. राजा यांनी अक्षरशः मनमानी केली.  भ्रष्टाचारा अपकीर्तीचा नवा उच्चांक गाठला. राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रफुल्ल पटेल आणि त्यांची कन्या यांनी चालवलेली एअर इंडियातील मनमानी सर्वश्रुत आहे. ममता बॅनर्जी यांनी तर यावर कळसच चढवला आहे, हे आपण पाहतच आहोत.  म्हणजे बघा, सत्तेची काळजी सोडली तर त्यांना कशाचीच फिकीर  वाटत नाही.  सहयोगी सदस्यांनी आदळाआपट केली तर मात्र त्यांचा पायघड्या घालून अथवा पॅकेजचा भरमार करून रुसवा -फुगवा काढला जातो.  सत्तेला मात्र चिकटून राहण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. त्यामुळे केंद्र सरकारात काय चाललं आहे, याचा थांगपत्ता लागेनासा झाला आहे. 
     राजकीय पक्ष स्वार्थ पाहण्याशिवाय काहीच पाहायला तयार नाहीत. लोकशाहीत जनता केंद्रबिंदू असते. पण इथे सगळे पक्ष स्वतः च्या मतलाबासाठी चिंतेत आहेत. ही बाब लोकशाहीला घातक आहे. हा लोकशाहीचा पराभव आहे.

Wednesday, March 21, 2012

दुसरी बाजू

कलमवाली ममतादीदी
     सध्या हिंदुस्थानच्या राजकारणात ममतादीदींचा मोठा वट्ट आहे. युपीएचे सरकार त्या सांगितले तसा डोंबारी नाच करत आहे. दीदीच्या मनमानीपुढे सरकार अक्षरशः हतबल आणि लाचार झाले आहे. त्यांनी एका झटक्यात रेल्वेमंत्री बदलला. खरं तर केंद्राचा मंत्री बदलायचा त्यांना आधिकार नसताना त्यांनी किमया घडवून आणली. त्यामुळे सध्या ममतादीदीचा हिंदुस्थानच्या राजकारणात बोलबाला आहे. दीदी आक्रमक, फटकळ, कुणाचीही भीडभाड न ठेवणार्‍या आणि आपला दरारा कायम ठेवणार्‍या एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असल्या तरी एक सृजनशील, हळव्या मनाच्या कवयित्री, लेखिका आणि चित्रकारही आहेत. ऐकून धक्का बसला असेल ना? पण खरं आहे. आतापर्यंत तब्बल २१ पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत.
     वरून कितीही कठोर दिसत असल्या तरी त्यांचे हृदय आतून ममतेने भरलेले आहे. हळव्या मनाच्या, भावनाशील चित्रकार आहेत. पायात साधी हवाई चप्पल, अंगावर साधी साडी आणि वर शालीचे पांघरूण. अशा अत्यंत साध्या राहणीच्या दीदी मात्र सभेत बोलायला लागल्या की, तिथे रणांगण उभे राहिल, असा जोश त्यांच्यात आलेला असतो. पिडीत, अत्याचारी  महिला आपली दु:खे त्यांच्यापुढे मनमोकळेपणाने हलके करीत असतात. जिथे अन्याय तिथे ममता. असा पश्चिम बंगलमधला आजपर्यंतचा अनुभव आहे. राजकारणात अव्याहतपणे डुंबून गेल्या असल्या तरी दीदींनी आपला वाचनाचा शौक सोडलेला नाही. आपल्या मनातल्या भावना लिखानातून आणि चित्रकारीतून व्यक्त करीत असतात. त्यांची कित्येक पुस्तके 'बेस्ट सेलर' ठरली आहेत.
     पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठीत मानल्या जाणार्‍या  'देज पब्लिकेशन' या प्रकाशन समुहाने दीदीची २१ पुस्तके आतापर्यंत प्रकाशित केली आहेत. 'मां', 'नागोल', 'जन्मायती', 'सरनी', 'आज के घडा', मां माटी मानुष', 'जनता दरबार' ही त्यांची पुस्तके बेस्ट सेलर ठरली आहेत. प्रसिद्ध लेखिका महाश्वेतादेवींना त्यांची ही कविता खूपच भावली आहे.  
    'मृत्यू कौन डरता है तुमसे? तुम को चुनौती देने का साहस नहीं है किसी में? इसलिए तो कहती हूँ सामने आओ|'
     राजकीय पटलावर व्यस्त असतानासुद्धा त्यांनी आपल्यातील सृजनशीलता मरू दिली नाही. लेखन आणि चित्रकारी यातून त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन कोलकात्यात भरले होते. त्यात चित्रकृतीच्या विक्रीतून जो पैसा उभा राहिला तो त्यांनी नंदीग्रामच्या पिडीत लोकांना दान केला. त्यांच्या चित्रांमध्ये कोमलता आहे. राजकारणातला उग्र चेहरा तिथे पाहायलाही मिळत नाही. त्यांच्या चित्रात फुलं असतात. आईचा चेहरा असतो. जगन्नाथ आणि गणेश असतात. त्यात मोराचे नृत्यही असते. पेंटिंग करीत असताना ममतादीदी कॅनवासवर खरोखरीचे ममतेचा वर्षाव करीत असतात.
     त्यांना कोणीही, कधीही भेटू शकतं. आज मुख्यमंत्रीपदाची खुर्ची असली तरी आलेल्या माणसाला जास्तीतजास्त भेटण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. भेटायला आलेल्याला विन्मुख करायचं नाही, ही महात्मा गांधीजींची परंपरा त्यांनी आजही कायम ठेवली आहे. इतक्या हळव्या मनाच्या कवयित्री, लेखिका, आणि चित्रकार असलेल्या ममतादीदी राजकारणात मात्र असं का वागतात? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. हट्टी, आक्रसताळपणा, आक्रमकता हे कदाचित राजकारणातले 'पत्ते' असतील. समोरच्याला नामोहरम करणारे शस्त्र असेल. पण काही का असेना, ममता दीदी मात्र या न त्या कारणाने सतत चर्चेत राहिल्या आहेत.                                                         

Tuesday, March 20, 2012

पाणीयुद्ध टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना हवी!


२२ मार्च हा जागतिक जलदिन. त्यानिमित्त...
पाणी म्हणजे जीवन. याचा अर्थ पाण्याच्या समस्या म्हणजे आपल्या जीवनाच्याच समस्या. यापुढची युद्धे पाण्यावरून होतील आणि रक्ताचे पाट वाहतील असे भाकीत केले जात आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक तज्ज्ञांच्या मते हिंदुस्थानची लोकसंख्या २०२५ सालापर्यंत १५० कोटी होणार आहे. याचा अर्थ येत्या दहा-पंधरा वर्षांत पाणी समस्या उग्र रूप धारण करील असे भाकीत केले जात आहे. सध्याची प्राप्त परिस्थिती बघितली तर या मताशी कुणाचे दुमत असायचे कारण नाही.
      पाणी जीवन असल्याकारणाने ते सर्वांनाच हवे आहे. नव्हे तो त्यांचा हक्क आहे. मात्र हे पाणीही हवे आहे मुबलक प्रमाणात. मुबलकतेचा अर्थ असा घ्यायचा की, आपल्याला पुरून उरलेल्या पाण्यावरही हक्क सांगायचा व त्याची हकनाक उधळपट्टी करायची. सगळ्यांनाच पाण्याचा वारेमाप वापर करण्याची सवय लागली आहे. माणसाच्या दैनंदिन गरजेसाठी माणशी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरले जाते. नागपूर, पुणे-मुंबईसारख्या शहरात तर हेच वापरायचे प्रमाण २०० प्रति लिटरपर्यंत जाते.

     आपल्या देशात सर्वाधिक पाण्याचा वापर शेतीसाठी होतो. आपला देश कृषिप्रधान देश आहे. ६६ टक्के लोक अजूनही खेड्यात राहतात. ही मंडळी शेतीवरच अवलंबून आहेत. मात्र शेतीसाठी पाण्याचा वापर करताना वायफळ खर्चही मोठ्या प्रमाणात होतो. हाच आपल्या चिंतेचा विषय झाला आहे. ऊस या नगदी पिकासाठी उपलब्ध पाण्यापैकी ७० टक्के पाणी वापरले जाते. तो वापरही अमर्याद आहे. पारंपरिक पद्धती सोडून ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास उपलब्ध पाण्यात चारपट ऊस पीक घेता येऊ शकते. मात्र अजूनही या नव्या पद्धतींचा स्वीकार शेतकर्‍यांनी म्हणावा तितका केला नाही.
     शेतीपाठोपाठ उद्योगधंद्यासाठीही पाण्याचा वापर प्रचंड प्रमाणात होतो. या उद्योगधंद्यासाठी वापरात आणलेले पाणी बहुतांश ठिकाणी पुन्हा नदीच्या पात्रातच सोडले जाते. त्यामुळे रासायनिक प्रक्रियेने दूषित झालेल्या पाण्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊन ते धोक्यात येते. त्याने आपलेच नुकसान होत आहे. अशा दूषित पाण्याने महाराष्ट्रासह नद्यांकाठी वसलेल्या शहरांमधील नागरिक पार बेजार होऊन गेले आहेत. हेच पाणी जर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपयोगात आणल्यास चांगलाच लाभ होणार आहे. शेतीसाठीही या पाण्याचा वापर होऊ शकतो. यासाठी कारखान्यांनी प्रक्रिया यंत्रणा बसविण्याची गरज आहे.
     सर्वच स्तरांवर पाण्याचा बेसुमार वापर टाळताना नागरिकांना पुरेसे पाणी मिळणे हासुद्धा त्यांचा हक्क आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्क समितीने पाणी मिळणे हा मानवी हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे. या हक्कानुसार पाणी मिळण्यापासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क व संबंधीच्या या कराराला १४५ देशांनी मान्यता दिली आहे. भेदभावरहित आणि समानतेच्या तत्त्वावर स्वच्छ पाणी पुरवणे, उपलब्ध करून देणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. देश आणि देशातल्या प्रत्येक प्रांतातल्या नागरिकाला पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र आपल्या देशाचे दुर्दैव असे की, अद्यापही आपल्या देशातील १८ ते २० हजार खेडी पाण्यापासून वंचित आहेत.
     उन्हाळ्याची चाहूल लागली की महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सर्वत्रच पाणीटंचाई उद्भवत असते. ही ये रे माझ्या मागल्याची कथा आहे. अशावेळी नागरिकांना पुरेसे प्यायला पाणी मिळत तर नाहीच पण ते मिळविण्यासाठी मोठी यातायातही करावी लागते. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आपण नागरिकांना किमान प्यायचे पाणी तरी उपलब्ध करून देण्याचा कायमस्वरूपी उपाय करण्यासही असमर्थ ठरलो आहोत. देशातल्या सर्वच भूस्थळावर पाणी पोहोचायला हवे. यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नद्यांवर धरणे बांधणे, नद्याजोड प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प साकारायला हवे आहेत. नद्या जोडसंदर्भात नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. तरीही सरकार मनावर घ्यायला तयार नाही. यासारखे लोकांचे आणखी दुसरे दुर्दैव कोणते? भाजपसह घटक पक्षाच्या आघाडी सरकार काळात नद्यांच्या जोडणीसाठी दहा हजार चौरस किलोमीटर परिसरात कालवे उभे करण्याचे काम सुरू झाले होते. परंतु संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने ही योजनाच बासनात गुंडाळून ठेवली. याशिवाय अनेक उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडून पडल्या आहेत. महाराष्ट्रात तर विदर्भ- मराठवाडा प्रांतावर अन्यायच होत आला आहे.
     पाणी योजनांवर गुंतवलेला पैसा पाणीपट्टीच्या रूपाने गोळा व्हायला हवा. तो म्हणावा तसा जमा होत नाही. सरकारने घाट्यातले सौदे थांबवायला हवेत. आज जी पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे त्याला चुकीचे नियोजनही कारणीभूत आहे. झालेल्या जलसंधारणावरील खर्च किती उपयुक्त आहे, याचे मूल्यमापन कोणी मांडतच नाही. त्यामुळे घाटा सोसून घ्यावा लागणार आहे. जलसंधारणच्या कामात गुंतलेल्या संस्था आणि माणसे मोठी झाली. पण जलसंधारण मात्र आहे तिथेच राहिले.
     पाण्यासाठी राज्याराज्यातली भांडणे सातत्याने डोकी वर काढत असतात, हे योग्य नव्हे. पाण्याचे समान वाटप करीत असताना भौगोलिक परिस्थितीचा विचार केला जावा. यातून देशहितही जोपासले जायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील पाणीसाठे राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावे असा आग्रह धरला होता. मात्र पुढे या विचार प्रवाहाला विरोध होऊन पाणी राज्यांची वैयक्तिक समस्या आहे, असा प्रवाह उदयाला आला. शेवटी एवढेच म्हणायचे आहे की, पृथ्वीवरील माणूस वाचवायचा असेल तर पहिल्यांदा पाणी वाचवायला शिकले पाहिजे. पावसाचे वाया जाणारे पाणी अडवणे व जिरवणे यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जायला हव्यात. सगळ्यांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे, या गोष्टी लक्षात ठेवल्यास आणि त्यादृष्टीने प्रयत्न झाल्यास भविष्यात पाण्यासाठी होणारा रक्तपात आताच थांबवता येईल.
- मच्छिंद्र ऐनापुरे  saamana 21/3/2012

Sunday, March 18, 2012

सिनेमा: जासूसपटांना चांगले दिवस येतील?

     सैफ अली खानच्या 'एजंट विनोद' आणि अभय देओलच्या 'बसरा' या आगामी जासूसपटांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्याकडे हॉलीवूडप्रमाने जासूसपटांचा भरमार नाही. आणि जे काही चित्रपट आले, त्यातले काही चित्रपट वगळता लक्षात राहण्यासारखे चित्रपट आलेच नाहीत. 'एजंट विनोद' आणि 'बसरा' हे दोन्हीही चित्रपट  निर्मिती मूल्यांच्यादृष्टीने उजवी असल्याचे म्हटले जात आहे.  प्रेक्षकांच्या पसंदीला उतरली तर एक नवा आयाम हे चित्रपट घालतील, अशी आशा करायला हरकत नाही.
     हॉलीवूडमध्ये जेम्स बॉण्ड मालिकेतील चित्रपटांशिवाय 'हिचकॉक', 'जेम्स हॅडली चेईज' आणि 'मिशन इंपॉसिबल' सारख्या चित्रपटांच्या काही मालिका आल्या आणि चांगल्याच लोकप्रिय झाल्या. मात्र त्या तुलनेत आपल्याकडे केवळ चार-दोन चित्रपट आले. पण त्यात दम फारसा नव्हता.  जासूसपटांचे विश्व आपल्यात रुजले नाही. आणि वाढलेही नाही. जितेंद्रचा 'फर्ज' आणि धर्मेंद्रचा 'आँखे' हे प्रारंभीचे दोन्हीही जासूस चित्रपट सुपरहिट ठरले. याशिवाय देव आनंदचा 'जॉनी मेरा नाम', 'ज्वेल थीफ', राजेंद्र कुमार आणि राज कपूर यांचा 'दो जासूस', मनोज कुमारचा 'वो कौन थी?', 'अनीता', 'गुमनाम' या चित्रपटांनीही चांगले यश मिळवले.
     'दो जासूस' नंतर आलेला 'गोपीचंद जासूस' मात्र फ्लॉप ठरला. रविकांत नगाइच यांनी मिथून चक्रवर्तीला घेऊन 'सुरक्षा', 'वारदात' सारखे चित्रपट केले. मात्र 'सुरक्षा' सोडला तर बाकी चित्रपट तिकिटबारीवर नांगीच टाकून बसले. १९७७ मध्ये आलेल्या दीपक बाहरी दिग्दर्शित 'एजंट विनोद' जासूसपटात किडनॅप केलेल्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ ( नाजिर हुसेन) यांच्या शोधाची मोहीम नायकावर सोपवण्यात आली होती. हा चित्रपट यशस्वी झाला खरा पण ही जासूस पटाची परंपरा पुढे नेऊ शकला नाही. 'बादशाह', 'मि. बाँड', 'हद कर दी आपने' सारखे जासूस नायकांचे चित्रपट पडद्यावर आले. पण त्यांचा ट्रॅक वेगळाच राहिला. हॉलीवूडमध्ये जासूसपटांचा भरमार आहे. शिवाय त्यांना पसंदही केलं जातं. हॉलीवूडच्या जासूसपटात इतर मसालाही घातलेला असतो. पण आपल्याकडे मात्र त्याहून अधिक मसाल्यांचा तडका मारलेला असतो. त्यामुळे अजीर्ण तर होणारच! पण त्यांची चांगला खेळ केला नाही.
     प्रेक्षक जासूसपट पसंद करत नाहीत, असे अजिबात नाही. दमदार जासूस पट तयार झालेच नाहीत. प्रेक्षकांनी असले चित्रपट नाकारले असते तर टिव्हीवरचे 'करमचंद' आणि कोमकेश बक्शी   यांची आठवण  प्रेक्षक काढले नसते. इतकी वर्षे 'सीआयडी' सारखी वेगळ्या धाटणीची मालिका आवडीने पाहिली गेली नसती.  वास्तविक बॉलीवूडने जासूसपटाची परंपरा विकसितच केली नाही. आयत्या पिटावर रेघोट्या ओढून गल्लाभरू धोरण निर्मात्यांनी आखल्याने नवा मार्ग चोखंदळण्याचे धाडस त्यांनी केलेच नाही.
     'बादशाह', 'मि.बॉण्ड', 'हद कर दी आपने'सारखे चित्रपट आले पण त्यांच्यावर जासूसपटाचा शिक्का बसला नाही. मणिशंकरच्या '१६ डिसेंबर' चे थोडेफार कौतुक झाले. सनी देओलच्या 'द हिरो' ला लव स्टोरी ऑफ ए स्पाइ ( एका जासूसची प्रेमकथा) चे शेपूट जोडले गेले होते. विवेक ओबरॉयचा 'मिशन इस्तांबूल'सुद्धा फ्लॉप राहिला. अलिकडे आलेला अभिषेक बच्चनचा 'गेम'सुद्धा फारसे यश मिळवू शकला नाही.
     जासूसपटाची निर्मिती कमी होण्याला पारशी रंगमंचचाही प्रभाव असल्याचे काहीजण सांगतात. पारशी रंगमंचावर सामाजिक विषयांची अधिक रेलचेल होती. त्यामुळे हिंदी सिनेमाच्या प्रारंभी पारशी रंगमंचचा तोच  हिंदी सिनेमा कित्ता गिरवू लागला. शिवाय काही प्रमाणात जासूस लेखनाचा अभावसुद्धा या गोष्टीला कारणीभूत आहे. जासूस लेखन या न त्या कारणाने कमी राहिले. काही काळ बाबू देवकीनंदन खत्री यांच्या 'चंद्रकांत' किंवा ' भूतनाथ' मालिकेतल्या कादंबर्‍या प्रचंड गाजल्या.पण त्यांना हात घालण्याचे धाडस कोणी केले नाही. जिथे निर्माता-दिग्दर्शकाम्नीच हिंमत दाखवली नाही, तिथे स्क्रिप्ट रायटर तर काय म्हणून प्रयत्न करणार?
     आता सैफ अली खानचा 'एजंट विनोद' आणि अभय देओलचा 'बसरा' हे जासूसपट येत आहेत. 'एजंट विनोद' हॉलीवूडच्या जेम्स बॉण्ड आणि 'मिशन इंपॉसिबल' मालिकेतल्या चित्रपटांनाही मागे टाकेल, अशी निर्मिती केल्याचे बोलले जात आहे. अभय देओलच्या 'बसरा'चीही चर्चा होते आहे. यात अभय रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. पाहू या चित्रपटांनाही यश कितपत मिळते ते? घवघवीत यश मिळाले तर या मालिकेतले चित्रपट येत राहतील. अन्यथा धुमकेतूसारखे जासूसपट कधी तरी उगवतील.    

Saturday, March 17, 2012

सिनेमा: बड्या कलाकारांचं एकत्र येणं

     अमिर आणि शाहरूख खान यांना हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन दोन दशकं उलटून गेली. परंतु, आजतागायत या दोघांनी एकत्र कुठला सिनेमा केला नाही. मात्र कधी-मधी वावड्या उठत असतात. अमूक अमूक एका निर्माता, दिग्दर्शकानं त्यांना साईन केलं आहे.... किंवा चर्चा चालली आहे... असं काही तरी येत राहतं. पण काही दिवस गेले की, मामला थंड होतो. या बड्या कलाकारांचा अहंभाव म्हणावा की दमदार स्क्रिप्टचा अभाव, पण या जोडीला एकत्र आणण्यात कुणालाही यश आलेलं नाही. परंतु, भविष्यात कधी कोणी त्यांना एकत्र आणण्यात आणले तर मात्र मोठा 'कास्टिंग करिश्मा' म्हणावा लागेल.
     या दोघांना एकत्र पाहायला प्रेक्षकसुद्धा मोठे उतावीळ झाले आहेत. यापूर्वीही अनेकदा आणि अनेक कलाकारांच्याबाबतीत प्रेक्षकांची निराशा झाली आहे. आपल्याकडे मल्टीस्टारर चित्रपटांची परंपरा फार जुनी आहे. पण तरीही दोन बड्या कलाकारांना समोरासमोर आणणं, निर्मात्याच्यादृष्टीने मोठे आव्हान असते. तसं म्हणाल तर जवळ जवळ अशक्यच असतं. कारण त्याला अनेक कारणांचा विचार करावा लागतो. त्याचा निपटारा करावा लागतो. दोन्ही कलाकारांना समान न्याय देणारं स्क्रिप्ट तेवढंच दमदार असायला हवं. त्यांच्या भूमिकांची लांबीसुद्धा समान असायला हवी. शिवाय निर्माता संबंधित कोणा एका कलाकाराच्या जवळचा नसावा. अन्यथा दुसर्‍याला न्याय देताना थोडी फार गल्लत होतेच. दुसर्‍यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. इतकं करूनही ही स्क्रिप्ट दोघांना पसंद पडायला हवी. कलाकारांच्यादृष्टीने स्क्रिप्ट,भूमिका, त्यांचा बॅलन्स, दिग्दर्शकावरचा विश्वास आणि प्रतिस्पर्धी कलाकारासोबत काम करताना कुठला त्रास होणार नाही, याची हमी. या सार्‍या गोष्टी जुळून आल्या तरच त्यांचा रिस्पॉन्स शक्य आहे.
     मेहबूब खानने 'अंदाज' मध्ये दिलीप कुमार आणि राज कपूर यांना एकत्र आणले होते. त्याच्यासाठी ते एक मोठे आव्हान होते. पण नंतर मात्र ते दोघेही पून्हा कधीच एकत्र आले नाहीत. असं म्हणतात की, 'संगम' मधली राजेंद्र कुमारची भूमिका राजकपूरने पहिल्यांदा दिलीप कुमारला देऊ केली होती. राज कपूर चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः करणार असल्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल, अशी खात्री दिलीप कुमारला नव्हती. दिलीप व देव आनंदसुद्धा 'इन्सानियत' नंतर पुन्हा केव्हाच एकत्र आले नाहीत.
     दिलीप कुमार आणि राज कुमार यांनी एकत्रित 'पैगाम' केला तेव्हा राज कुमार अजून उभरता कलाकार होता. मात्र बर्‍याच वर्षांनी सुभाष घई यांनी मोठी कसरत करून दोघांना 'सौदागर' मध्ये एकत्र आणण्यात यश मिळवले होते. रमेश सिप्पी यांनीही दिलीप व अमिताभ बच्चन यांना 'शक्ती' द्वारा एकत्र आणून  एक मोठा चमत्कार घडवून आणला होता. नंतर मात्र असा प्रयत्न कोणी केला नाही. कदाचित आपल्याच प्रतिभेवर या दिग्दर्शकांचा विश्वास नसावा. कारण काहीही असले तरी काही गोष्टी प्रेक्षकांना चुकल्या चुकल्यासारख्या वाटल्या. मोहब्बतें' मध्ये अमिताभ आणि शाहरुख यांना एकत्र आणणे, आदित्य चोप्रासाठी मोठी उपलब्धी होती. नंतर हे दोघे 'कभी खुशी कभी गम', 'वीरझारा', 'कभी अलविदा ना कहना', 'पहेली' आणि 'भूतनाथ' मध्ये एकत्र काम केले.
     अमिर आणि सलमान 'अंदाज अपना अपना' नंतर कधी एकत्र आलेच नाहीत. 'अंदाज...' चा पार्ट २ बनवण्याची चर्चा मधी-आधी होत असते. पण अद्याप त्याला मूर्त वरूप आले नाही. अमिर आणि सलमान चांगले दोस्त असल्याने त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता फळास येईल, असे प्रेक्षकांना वाटते. परंतु एकत्र येतील तेव्हाच ती गोष्ट खरी! शाहरूख आणि सलमान यांच्यात किंवा शाहरूख - अमिर यांच्यात सध्या विस्तव जात नाही. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे. मात्र भविष्यात काही घडेल काही सांगता येत नाही.  काळ सगळ्या गोष्टीवर मोठे औषध आहे. अक्षय कुमार सलमानसोबत पडद्यावर आला आहे मात्र अमिर किंवा शाहरूखसोबत एकत्र आला नाही. हृतिक रोशनने 'कभी खुशी कभी गम' मध्ये शाहरूखसोबत काम केले आहे. परंतु, वरील कलकारांसोबत चित्रपटात एकत्र आला नाही. काही प्रेक्षक डान्सवर आधारित एखाद्या चित्रपटात हृतिक रोशन आणि शाहिद कपूर एकत्र यावेत, अशी मनीषा बाळगून आहेत. नव्या पिढीचा रॉकस्टार रणबीर कपूर याच्यासोबतही बडे कलाकार पड्द्यावर पाहायला मिळावेत, अशीही प्रेक्षकांची इच्छा आहे. स्वप्नं... इच्छा... वैगेरे खूप आहेत. .... प्रेक्षकांच्या आणि निर्मात्यांच्याही! पण प्रतीक्षा आहे ती योग जुळून येण्याची...!                   

खिशाला चाट, भ्रष्टाचाराला वाट

     'दयालू होने के लिए मुझे क्रूर बनना ही होगा' असा शेक्सपिअरच्या हॅमेलटचा डॉयलॉग मारून केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी देशातल्या आम जनतेकडून 'आवळा देऊन कोवळा काढण्याचा'च प्रयत्न केला आहे. शनिवारच्या पानाकडे आपले लक्ष नाही तर दहा वर्षांनंतरचे समाधानकारक चित्र पाहायचे आहे, अशी देशाची काळजी असल्याची, आव आणणारी वाक्ये फेकत प्रणवदांनी आम जनतेच्या खिशाला हात घातला आहे. परंतु, विकास कामाम्साठी वापरला जाणारा पैसा थेट त्याच कामासाठी भ्रष्टाचार व कमिशनशिवाय  वापरला जाईल, याची शाश्वती मात्र कुठे दिली नाही. भ्रष्टाचार रोखणारी कुठलीच योजना आखली गेली नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराने कळस गाठलेल्या सध्याच्या विचित्र वातावरणात प्रणवदांनी आम जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटून काय साधले आहे, असाच सवाल उपस्थित होतो. वास्तविक भ्रष्टाचाराची भोकं मुजविल्याशिवाय जनतेच्या खिशाला हात घालण्याचा त्यांना अजिबात कुठला अधिकार नाही.
     आम जनतेला महागाईत पार पिळवटून टाकणार्‍या या त्यांच्या अर्थसंकल्पामुळे त्यांनी निवडणुकीला अज्ञून अवकाश आहे, याची जाणीवही करून दिली आहे. आम जनतेला त्यांनी करबचत, बँक बचत अथवा गुंतवणुकीच्या रुपाने समाधान देण्याचा प्रयत्न केला असला तरी सेवा कर आणि उत्पादन शुल्क यांच्यात वाढ करून दिलेले, हातासह हिसकावून घेण्याचाच उद्योग केला आहे. सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रावरही त्यांनी ओझं टाकलं आहे. पण त्याचा चुकारा शेवटी आम जनतेलाच करावा लागणार आहे. कर रुपाने पैसा गोळा करून देशाची वित्त परिस्थिती सुधारू पाहणार्‍या प्रणवदांनी आम जनतेला मात्र निराशाच दिली आहे. महागाई कमी होईल, असे ठणकावून सांगत असले तरी ती कमी करण्याचे कोणतेच उपाय दृष्टीक्षेपात नाहीत. रिझर्व्ह बँकेनेही व्याज दरात घट करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळेही महागाई वाढीलाच खतपाणी घातले जाणार आहे. नोकरदारांना आयकर सवलतीत घसघशीत सूट मिळेल, अशी मोठी आशा निर्माण झाली होती. त्याची चर्चा महिनाभर सुरू होती. पण प्रणवदांनी त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. आयकर सवलतीत दिलेली निव्वळ २० हजाराची सूट म्हणजे 'दरिया में खसखस'  च म्हणावी लागेल.
     अर्थसंकल्पामध्ये देशात आर्थिक मंदीचा हवाला देणं, आता सोडून द्यायला हवं. त्यातच त्यांनी उद्योग जगतालाही नाराज करून त्यांच्यावर ४५ हजार ९४० कोटी रुपयांचे ओझे टाकले आहे. उत्पादन शुल्क व सेवा कर यांच्या वाढीमुळे महागाई वाढणार आहे. कृषी आणि ग्रामीण बजेट वाढविण्यात आले असले तरी भ्रष्टाचार रोखण्याचा कुठलाच प्रयत्न केलेला नाही. देशाची आर्थिक स्थिती मजबूत करताना आणि कृषीसारख्या क्षेत्राला प्राधान्य देताना अनुदानाची विल्हेवाट कशी व्यवस्थित लावता येईल. हे पाहायला हवे. २ स्पेक्ट्रम, राष्ट्रकूल क्रीडास्पर्धासारख्या योजनांमधला भ्रष्टाचार आम जनतेच्या गिणती बाहेरचा आहे.  आम जनतेला पिळून पिळून काढलेला पैसा असा कुणाच्या तरी खिशात जाणार असेल तर त्याचे फलित काय? एक तर त्यांनी अधिकार नसताना आम जनतेच्या खिशाला हात घातला आहे, त्यात भ्रष्टाचराची भोके बंद करण्याचा कुठलाच उपाय शोधला नाही. त्यामुळे जनतेकडून ओरबाडलेला पैसा कुठे जाणार आहे, हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. प्रणवदा आणि केंद्र सरकार भ्रष्टाचारासंदर्भात कधी जागरूक होणार, देव जाणे!      

आरोग्य


नाश्त्यात स्वास्थाचे रहस्य
ब्रेनफूड ज्याला म्हटलं जातं, तो सकाळचा नाश्ता दिवसभरातला महत्त्वपूर्ण आहार समजला जातो. सकाळी उठल्यानंतर शरीराला ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. ही आवश्यकता नाश्ता पूर्ण करतो. सकाळची न्याहरी न केल्याने ऍनिमिया ( रक्ताची कमतरता) , कॅल्शियमची कमतरता, केस झडणे आणि ऍसिडिटी यांसारखे आजार सामान्यत: आपल्याला चिकटू शकतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये अशा काही पदार्थांचा समावेश करायला हवा, जेणेकरून आहार पौष्टिक तर होईलच पण स्वास्थवर्धकही असेल.
काय खाल?
अंडे उखडून खावे. यात प्रोटीन असतात. अंडे खाल्ल्याने कमीत कमी दुपारच्या जेवणापर्यंत तरी आणखी काही खाण्याची आवशयकता असणार नाही.
सकाळच्या नाश्त्याला फलाहार खूपच उपयुक्त मानला जातो. त्यामुळे एक सफरचंद, केळ, संत्री अथवा पपई आवश्य खावी.
उन्हाच्या दिवसात लस्सीसुद्धा स्वादिष्ट आणि पौष्टीक असते.
ब्रेडवर जॅम अथवा बटर यांच्याशिवाय टोमॅटो, कांदा अथवा अंड्याचे स्लाइस ठेवून त्यावर टोमॅटो कॅचप लावून खावे
केवळ दूध पिण्यापेक्षा मिल्क्शेक पिणं अधिक गरजेचे आहे. थंड दुधात बदाम, कॉफी मिसळून मिल्कशेक बनवलं जाऊ शकतं.
मोड आणलेल्या धान्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. हरभरा, मटकी, मूग, सोयाबीन रात्रभर भिजवण्यास घालून कापडात गुंडाळून ठेवावे. मोड आल्यानंतर ते चाट मिसळून खावे.                              

थोडीशी गंमत

थोडीशी गंमत                      पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा.
         १) * र - निवास, गृह
        २) * ट्ट - आवळ, दाट
        ३) * ड - जुडगा, अनेक केळींचा...
        ४) * ट - झीज, नुकसान
        ५) * डी - घड्याळ
        ६) * सा - नरडे, गळा
        ७) * ळ - खोलगट जागा, भेग
        ८) * न - दाट, मेघ
        ९) * डा - घागर
       १०) * ण - मोठा हातोडा
( उत्तर - घर, घट्ट, घड, घट, घडी, घसा, घळ, घन, घडा, घण)      - मच्छिंद्र ऐनापुरे

थोडीशी गंमत              पहिले अक्षर शोधा , आणि अर्थपूर्ण शब्द बनवा
        १) * बर - बातमी, वार्ता
        २) * बर - खोडण्याचे साधन
        ३) * बर - पातळ भाजी
        ४) * बर - क्रमांक ( इंग्रजी )
        ५) * बर - श्रीमंत 
        ६) * बर - रस्त्याचा कामाचा काळाकुट्ट  पदार्थ 
        ७) * बर - टणक, निर्भर 
        ८)  * बर - म्हैशीची विष्ठा (हिंदी)
        ९) * बर - नळ दुरुस्तीचे काम करणारा
      १०)  * बर – एक मुगल शासक
( उत्तरे - ख, र, सां, नं, ग, डां, नि, गो, प्लं, बा )                 - मच्छिंद्र ऐनापुरे


थोडीशी गंमत               पहिली दोन अक्षरे शोधा, शब्द बनवा
          १) ** कार - वाटोळे
          २) ** कार - आभार, मेहरबानी
          ३) ** कार - पदवी, योग्यता
          ४) ** कार -स्वीकार
          ५) ** कार - अंधार, काळोख
          ६) ** कार - न्यायालयात भांडणारे
          ७) ** कार - भाग पाडण्याची क्रिया
          ८)  ** कार -चितारी, चित्र काढणारा
          ९) ** कार - नेता, नायक, पुढचा
        १०) ** कार - नक्कल, सदृश
( उत्तर- चक्रा,उप, अधि, अंगि, अंध , पक्ष, भागा, चित्र, अग्रे, अनु )          - मच्छिंद्र ऐनापुरे

थोडीशी गंमत                      पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा
            १) * न - जाणिव
            २) * न - ऐट
           ३) * न - उपग्रह नेणारे
          ४) * न - गर्दन
         ५) * न - देणे
           ६) * न - पर्ण
         ७) * न - मस्त, सुंदर
         ८) * न - कर्ण
         ९) * न - जंगल
        १०) * न - लहान
( उत्तरे- भान, शान, यान, मान, दान, पान, छान, कान, वन, सान )           - मच्छिंद्र ऐनापुरे

थोडीशी गंमत     प्रारंभीची दोन अक्षरे शोधा
                      १) ** करी - विणणारा, सा़ळी
                      २) ** करी - नेमाने यात्रेला जाणारा
                      ३) ** करी- उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक
                      ४) ** करी- शाळेला जाणारा मुलगा
                      ५) ** करी- कीर्तनकार
                      ६) ** करी - कर्ज घेणारा
                      ७) ** करी - किल्ल्यवरचा सिपाई
                      ८)  ** करी - रात्री फिरणारा, सिपाई
                      ९) ** करी - एक जात
                    १०) ** करी - हमाल
( उत्तर- गस्त, गाव, गड, वार, कथे, कात, विण, ऋण, शाळ, वेठ ) - मच्छिंद्र ऐनापुरे

थोडीशी गंमत     पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा.
                    १) * म - नाव
                    २) * म - पैसा
                    ३) * म - उन्हामुळे येतो
                    ४) * म - सर्व, समस्त
                    ५) * म - चार मार्गांपैकी पहिला
                    ६) * म - डावा
                   ७) * म - फळांचा करतात
                  ८ ) * म - खंबीर, निश्चयी
                  ९) * म - तीर्थयात्रेचे ठिकाण
                 १०) * म - कृष्ण
(  उत्तरे- नाम, दाम, घाम, आम, साम, वाम, जाम, ठाम, धाम, शाम ) - मच्छिंद्र ऐनापुरे

थोडीशी गंमत   पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा
                १) * प - सर्प
                २) * प -  रागावल्यावर ऋषी देत
                ३) * प - फळांची फोड, काप
                ४) * प - नाण्याची एक बाजू
                ५) * प - मोजण्याचे साधन
                ६) * प - वडिल
                ७) * प - हिम्मत, धाडस
                ८)  * प - पंचमहाभूतांपैकी एक
                ९) * प - एक आजार
               १०) * प - धावल्यावर लागते.
( उत्तरे- साप,शाप, खाप, छाप, माप, बाप, टाप, आप, ताप, धाप) - मच्छिंद्र ऐनापुरे

थोडीशी गंमत       पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा
                    १) * ळ - शक्ती, ताकद
                     २) * ळ - याम्च्यातून पाणी येते
                     ३) * ळ - कष्टाचे मिळते
                    ४) * ळ - याने मासे पकडतात
                    ५) * ळ - अगदी खालचा भाग
                   ६) * ळ - हानी, नुकसान
                   ७) * ळ - चिकटवायला लावतात
                  ८ ) * ळ - मारल्यावर अंगावर उठतो
                   ९) * ळ - अंगावर साचतो
                     १०) * ळ - ही पोटात येते
 ( उत्तरे - बळ, नळ, फळ, गळ, तळ, झळ, खळ, वळ, मळ, कळ ) - मच्छिंद्र ऐनापुरे


थोडीशी गंमत       पहिले अक्षर शोधा, अर्थपूर्ण शब्द बनवा
                    १) * पट - थप्पड 
                    २) * पट - सरळ, उघड
                    ३) * पट - लबाडी
                    ४) * पट - एक अडनाव
                    ५) * पट - एक पक्षी
                    ६) * पट - झोपडी
                    ७) * पट - लोचट, कोडगा
                   ८ ) * पट - वैषम्य
                   ९) * पट - चारपट
                 १०) * पट - एका चहा कंपनीचे नाव
( उत्तरे- चा, धो, क, बा, पो, खो, ला, वि, चौ, स ) - मच्छिंद्र ऐनापुरे