Tuesday, March 6, 2012

बालकथा समाधान

         एका गावात सुधाकर नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याला अनिता आणि वनिता नावाच्या दोन मुली होत्या.  लग्नायोग्य झाल्यावर त्याने त्यांची लग्ने लावून दिली. अनिताचा विवाह भांडी बनविणार्‍याशी तर वनिताचा विवाह एका शेतकर्‍याशी लावून दिला.
     सुधाकरने आपल्या मुलींची ख्याली-खुशाली जाणून घेण्यासाठी त्यांना भेटायला जाण्याचे ठरवले. एक दिवस ठरवून तो पहिल्यांदा मोठ्या मुलीकडे- अनिताकडे गेला. अनिता बोलता बोलता म्हणाली," बाबा, या खेपेला आम्ही खूप मातीची भांडी बनवली आहेत. पाऊस झाला नाही तर आमच्या कष्टाला चांगलं फळ मिळेल. बाबा, तुम्हीसुद्धा आमच्यासाठी पाऊस पडू नये म्हणून देवाकडे प्रार्थना करा." काही वेळ इकडच्या- तिकडच्या गप्पा, भोजन वैगेरे झाल्यावर सुधाकर जायला निघाला. जाताना त्याने तिच्या धंद्याच्या बरकतीसाठी प्रार्थना करण्याचे आश्वासन दिले. तेथून तो धाकट्या मुलीकडे गेला.
     वनिता म्हणाली," बाबा, या वर्षी आम्ही शेतात खूप राबलो आहोत. चांगला पाऊस झाला तर भरपूर धान्य पिकेल. बाबा, पावसासाठी तुम्हीसुद्धा प्रार्थना करा." तिची ख्याली-खुशाली विचारून सुधाकर घरी आला. तो द्विधा मनस्थितीत होता. कोणत्या मुलीसाठी प्रार्थना करायची, याचा विचार करू लागला. एकिला पाऊस नको होता तर दुसरीला हवा होता. एकिला साथ दिल्यावर दुसरीवर अन्याय होणार! माझ्यासाठी दोन्हीही मुली सारख्याच! मध्यरात्र उलटून गेली तरी तो विचार करीत होता. शेवटी पहाटे त्याला यावर तोडगा सापडला. मग शांत झोपला.
     दिवस माथ्यावर आल्यावर उठला. आंघोळ- पाणी आवरून पुन्हा थोरल्या मुलीला भेटायला गेला. तो अनिताला म्हणाला," बाळ, यंदा पाऊस झाला नाही तर तुझ्या नफ्यातला निम्मा हिस्सा तुझ्या बहिणीला देऊन टाक. कारण पाऊस झाला नाही तर तिचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे तिला थोडी भरपाई होईल." अनिताने तसे वचन दिले. नंतर तो धाकट्या मुलीकडे गेला.
     " बाळ वनिता, या खेपेला पाऊस झाला तर तुझ्या लाभातला अर्धा हिस्सा तुझ्या थोरल्या बहिणीला देऊन टाक. पावसामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे." वनितानेही मदत करण्याचे वचन आपल्या पित्यास दिले. सुधाकरला खूप मोठे समाधान झाले. कुठल्याही भेदभावाशिवाय समस्या सोडवू शकल्याचे समाधान सुधाकरच्या चेहर्‍यावर दिसत होते.

No comments:

Post a Comment