Sunday, March 11, 2012

लेख आता राष्ट्रपती पदाची निवडणूक

       नुकत्याच पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता सार्‍या देशाच्या नजरा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांकडे लागल्या आहेत. केंद्रात  सत्तेवर असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीतील प्रमुख  काँग्रेस पक्षाला नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. आघाडीतील घटक पक्षांचे समर्थन मिळवता येईल, अशा उमेदवाराला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे करावे लागणार आहे. काँगेस पक्षात याबाबत हालचाली चालल्या असताना उपराष्ट्रपती असलेले हामिद अन्सारी यांनी यांनी स्वतः निवड्णुकीसाठी मोहीम चालवल्याची बातमी कानावर येत आहे. त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडून भाजपासह राजगच्या नेत्यांचे समर्थन मिळवण्याच्या खटपटी सुरू केल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही निकटवर्तीयांनी भेट घेऊन समर्थन मागितले आहे. प्रत्यक्षात हामिद अन्सारी यांनी या पदासाठी इच्छूक असल्याचे जाहीररित्या सांगितले नसले तरी पडद्याआडून हालचाली गतिमान केल्या आहेत.
     काँगेस पक्षातही राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चा चालू आहे. पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्यानंतरच यावर अधिक व्यापकपणे चर्चा करण्याचा पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले होते. आता विधानसभेच्या निवडणुका पार पडल्याने हालचालीही वाढल्या आहेत. संरक्षणमंत्री ए. के. अँथनी यांची राष्ट्रपतीपदासाठी तर केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उपराष्ट्रपती पदासाठी नावे पुढे आली आहेत. प्रारंभी राष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे व लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांच्या नावाचीही चर्चा झाली, परंतु विद्यमान राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील या महिला असल्याने पुन्हा त्याच पदावर महिलेला आणण्याबाबतचा मुद्दा मागे पडला. शिवाय त्या महाराष्ट्राच्या असल्याने सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव मागे पडले. मात्र उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव कायम आहे. राहता राहिला प्रश्न अँथनी यांचा! ते काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असून नेहरू-गांधी कुटुंबाशी त्यांचा निकटचा संबंध आहे. असे असले तरी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये कॉग्रेसला सपाटून मार खावा लागल्याने त्यांना या पदाच्या उमेदवाराबाबत फेरविचार करावा लागणार आहे. डाव्या आघाडीसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही समर्थन मिळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहे.
     मतांच्या किंमतींवर दृष्टीक्षेप टाकल्यास आपल्या असे लक्षात येईल की, संयुक्त पुरोगामी आघाडीकडे एकूण मतांच्या ३० टक्के इतकी मते आहेत. तर भाजपासह राजगकडे २८ टक्के इतकी मते आहेत. उत्तर प्रदेशात मायावतीच्या हत्तीला चिरडून निर्विवादपणे सत्तेवर आलेल्या समाजवादी पक्षाकडे ६६ हजार ६८८ इतकी मतांची किंमत आहे. नितीशकुमार (जदयू) कडे ४० हजार ७३७, बसपा ४५ हजार ४७३, तृणमूल काँग्रेस ४५ हजार ९२५ आणि भाजपाकडे २ लाख २५ हजार ३०१ तर काँग्रेसकडे ३ लाख ३० हजार ४८५ मतांची किंमत आहे. कॉग्रेसला घटक पक्षांबरोबर चर्चा करून उमेदवार ठरवावा लागणार आहे. थोडे इतिहासावर नजर टाकल्यास उपराष्ट्रपती पदावर कार्यरत असणार्‍या व्यक्तीसच उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार हामिद अन्सारी यांना राष्ट्रपती पदासाठी निवडणूक रिंगणात उभे केल्यास काँग्रेसला लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. हामिद अन्सारी मुस्लीम असल्याने बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारचे समर्थन मिळण्याची शक्यता अधिक आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचेसुद्धा समर्थन मिळू शकते.

No comments:

Post a Comment