Friday, August 31, 2012

फिनिक्स 'आर्मस्ट्रांग' ची वाताहत?

      फिनिक्स म्हणजे राखेतून पुन्हा भरारी घेणारा पक्षी. या पक्षाशी ज्याची तुलना केली जात होती, त्या अमेरिकन सायकिलिस्ट लान्स आर्मस्ट्रांग याने त्याच्याविरोधात चाललेली डोपींग संबंधातली न्यायालयीन लढाई लढण्यास नकार देऊन अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. कॅन्सर या  जीवघेण्या आजाराशी कणखरपणे लढा देऊन नंतर सायक्लिंगमधले प्रतिष्ठेचे  'टुअर डी फ्रान्सहे पदक लागोपाठ सातवेळा पटकावणार्‍या लान्स आर्मस्ट्रांगने ही लांबलेली लढाई लढण्यास नकार दिला आहे. वास्तविक आता शेवटच्याच काही साक्षी राहिल्या असताना त्याने माघार घेऊन सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकले आहे. मात्र अमेरिकेच्या एंटी डोपिंग एजन्सी (यूएसएडीए) ने त्याच्यावर केवळ आजीवन बंदी घालून थांबली नाही तर त्याने पटकावलेली 'टुअर डी फ्रान्स' या सात पदकांसह सर्व पदके काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
     आपल्या राखेतून पुन्हा पुन्हा जिवंत हो ऊन मिथकांचा मृत्यूंजय असलेला फिनिक्स पक्षी जसा नव्याने पुर्‍या जोमाने भरारी घेतो. तशीच भरारी अमेरिकन सायकिलिस्ट लान्स आर्मस्ट्रांगने आपल्या आयुष्यात घेतली होती. परंतु, त्याच्या आयुष्याला डोपिंगची काळी किनार लागली. असे असतानाही जगभरातील प्रसारमाध्यमे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्याने ज्या प्रकारे व्यवस्थेविरोधात लढण्यास माघार घेतली, ती मात्र त्यांना रुचलेली नाही. आर्मस्ट्रांग म्हणतो,' खूप झाले! मी माझी बाजू कुठेवर मांडत राहू?' ऑस्टिनच्या एका न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने धीर सोडलेल्या आर्मस्ट्रांगने अचानक हा निर्णय घेतला. अमेरिकन डिस्ट्रिक्ट न्यायालयाच्या स्पॅम स्पार्क्स या न्यायाधीशांनी युएसएडीएच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केले असताना आर्मस्ट्रांगचा निर्णय दुर्दैवी म्हणावा लागेल. आता हे प्रकरण जनतेच्या दरबारात पोहचले आहे. तेथील जनता त्याच्याशी कसा व्यवहार करते, ते पाहावे लागणार आहे.
     फ्रान्सची 'टुअर डी फ्रान्स' ही सायकिलिंग विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. ही स्पर्धा 23 दिवसाच्या आत तीन हजार 200 किलोमीटरचे अंतर अनंत अडथळे पार करून कापायचे असते. ही स्पर्धा अमेरिकन सायकिलिस्ट लान्स आर्मस्ट्रांगने 1999 ते 2005 पर्यंत लागोपाठ सात वेळा जिंकून विजेतेपद पटकावले आहे. केवळ ही स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे नाही, तर कॅन्सरच्या आजारातून उठल्यानंतर त्याने केलेली ही अतुलनीय कामगिरी महत्त्वाची आहे. 1996 मध्ये त्याला टेस्टिकल कॅन्सर झाला होता. फुफ्फुस आणि मेंदूवर प्रभाव टाकलेल्या या आजारातूनशक्यता डॉक्टरांनी कमीच वर्तवली होती. सर्जरी आणि कीमोथिरेपीच्या जीवघेण्या त्रासातून जाताना त्याने केवळ कॅन्सरलाच हरवले नाही तर लागोपाठ सात वेळा 'टुअर डी फ्रान्स' चा किताब पटकावला. शिवाय ऑलिम्पिकमध्ये कास्यपदकही पटकावले आहे. आजारातून बाहेर पडून इतकी मोठी कामगिरी तशी अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
     आर्मस्ट्रांगच्या निमित्ताने आपल्या युवराजसिंहची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अलिकडेच त्यानेही कॅन्सरवर विजय मिळवला आहे. युवराज आजारी होता, तेव्हा आर्मस्ट्रांगने त्याला लवकर बरा होण्याचा संदेश दिला होता. अमेरिकत उपचार घेत असताना युवराजने ट्वीटद्वारे  ही माहिती दिली होती.  युवराजने आर्मस्ट्रांगची 'इटस नॉत अबाऊट द बाईक' ही आत्मकथा वाचली होती. आणि त्यातून त्याला प्रेरणा मिळाली होती, मनोबल वाढले होते. डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूंची पुढे वाताहत झाली आहे. त्यांचे करिअर बरबाद झाले आहे. पण आर्मस्ट्रांगची पदके माघारी घेण्याची घोषणा झाली, तेव्हा त्याला उलट अनुभव आला. त्याने ट्वीट करताना म्हटले,' लिवस्ट्रांग समर्थकांचा मी आभारी आहे. ... रोजच्या आर्थिक मदतीपेक्षा आज 25 पटीने त्यात वाढ झाली आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.' अचानक त्याची लोकप्रियता वाढली. जनता त्याच्याबरोबर आहे. आंतरराष्त्रीय सायकिलिंग युनुयन ( युसीआय) त्याच्या पाठीशी आहे. खेळ-साहित्य बनवणारी अग्रगण्य कम्पनी नाइकेसुद्धा त्याच्यासोबत आहे.
     युएसएडीएचे म्हणणे असे की, आर्मस्ट्रांग 1996 पासून प्रतिबंधित औषधे घेत होता, ज्यात रक्ताचा प्रवाह वाढविणारे स्टेरॉयड्स होते. शिवाय त्याच्यावर दुसर्‍या खेळाडूला डोपिंगची सवय लावण्याचा आरोपही आहे.' यावर  आर्मस्ट्रांगचे म्हणतो,' डोपिंगच्या सार्‍या टेस्टमध्ये मी निर्दोष ठरलो आहे. नियमानुसार आठ वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणांची चौकशी करता येत नाही. युएसएडीए तर 17 वर्षांपूर्वीचे जुने मढे उखरून काढत आहे. हे  'विच हंटिंग' आहे.' वास्तविक आतापर्यंत ज्या काही टेस्ट, चौकशा करण्यात आल्या, त्यात आरोप सिद्ध झाले नाहीत. काही खेळाडूंच्या साक्षी आणि ई-मेल्ससारखे परिस्थितीजन्य पुरावे त्याच्याविरोधात आहेत. पण आर्मस्ट्रांगच्या म्हणण्यानुसार,' कॅन्सर आणि कीमोथेरेपीने पिडीत असलेले त्याचे शरीर स्टेरॉयड आणि अन्य नशेची औषधे झेलण्यास सक्षम नाही."
      त्याने गेल्यावर्षीच खेळातून निवृत्ती पत्करली आहे. दोन वर्षांपर्यंत अमेरिकन संघीय सरकारने त्याच्याविरोधात असलेल्या गुन्ह्यांचा तपास केला, त्यातून तो सहिसलामत सुटला. युएसएडीएचे म्हणणे आहे की, त्यांच्याजवळ 2009- 10 च्या काळातले आर्मस्ट्रांगच्या रक्ताचे नमुने आहेत, ज्यात नशिली औषधे आढळून आली आहेत. पण ही नमुने तर त्याच्या चॅम्पियन बनल्यानंतरच्या 4-5 वर्षांनंतरचे आहेत.
     डोप डोपिंगने मोठमोठ्या खेळाडूंची कारकिर्द बरबाद झाली आहे. बेज जॉन्सन आणि मेरियन जोन्स यांच्यासारख्या खेळाडूंची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सायकिलिंग रेस मूळी नशिल्या औषधांसाठी बदनाम झाली आहे. आर्मस्ट्रांगवरसुद्धा सुरुवातीपासून आरोप होत आला आहे. पण तो लघवी व रक्ताच्या तपासणीतून निदोर्ष सुटला आहे. आता फक्त काही व्यक्तींच्या साक्षी उरल्या आहेत. आर्मस्ट्रांगला त्यांचा सामना का करावासा वाटला नाही, हाच मोठा प्रश्न आहे. कदाचित त्याला वाटत असेल, कटकारस्थानाने आपल्याला अडकविले जाण्याची शक्यता आहे. युएसएडीए त्याच्यामागे हात धुवून लागली आहे, म्हटल्यावर त्याचा भरवसा तुटला असणार. मात्र तो म्हणतो," मी स्वतः ला कधी दोषी मानले नाही. पण आता मी कॅन्सरपिडीत रुग्णांसाठी लढाई लढत राहीन." तरीही एक प्रश्न उरतोच. त्याने जिंकलेली पदके माघारी घेतल्यानंतर ती दुसर्‍या क्रमांकाच्या खेळाडूंना दिली जातील का?"  का सायकिलिंग रेसच्या विश्वातले त्याचे ध्रुवपद अढळ राहील?

Wednesday, August 29, 2012

जैविक शेतीसाठी सिक्कीमचा आदर्श

     रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती आणि कीटकनाशकाच्या दुष्परिणामुळे शेतकरी पुन्हा जैविक शेतीकडे आकर्षित होत आहे. देशातल्या अनेक प्रांतांमध्ये आज हजारो शेतकर्‍यांनी जैविक शेतीचा स्वीकार केला आहे व त्याची  यशस्वीतता समोर ठेऊन  त्याची गरजही  जगाला पटवून दिली जात  आहे. यासाठी राज्य सरकारेही उत्तेजन देत आहेत,  की  ज्याची नितांत गरज आहे. जर रासायनिक खतांचा वापर टाळून जैविक खतांचा वापर वाढवला गेला तर त्याचा मानवालाच नव्हे तर पर्यावरणालाही चांगला फायदा आहे. राज्य सरकारे रासायनिक खतांच्या  वापरासाठी सबशिडी देत आहेत, यातून राज्य सरकारांची सुटका होईलच, शिवाय या खतांच्या वापरामुळे जमिनी नापिक होण्यापासून आणि  धोक्यात येत असलेले मानवाचे आरोग्य त्याच्या दुष्परिणांपासून  यांचा वाचवता येईल.  जैविक खते आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर पर्यावरणाच्यादृष्टीनेही आपल्या प्रचंड लाभाचे आहेत.
     देशात हरित क्रांती दरम्यान रासायनिक खतांचा व कीटकनाशक औषधांचा वापर सुरू झाला. शेतीची उत्पादकता वाढवणे, हा एकमेव उद्देश त्यामागे होता. प्रारंभी उत्पादकता वाढलीही. पण पुढे हळूहळू त्याचे दुष्परिणामसुद्धा समोर येऊ लागले. सध्याची भयानक अवस्था अशी की, देशात कृषी उत्पादनात आघाडीवर असलेल्या पंजाब व हरियाणा या राज्यांमधील शेती रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे धोक्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात तेथील जमिनी नापिक होत चालल्या आहेत.
     खरे तर, रासायनिक खतांचा वापर सुरू झाल्यानंतर अधिक उत्पादनाच्या अमिषापोटी त्याचा अतिवापर वाढत चालला. त्यामुळे त्याची जमिनींना सवय होऊ लागली. माणसाला दारूच्या व्यसनाची जशी चटक लागते तशी, जमिनीला या रासायनिक खतांची चटक लागली. पण 'अति तिथे माती' या उक्तीप्रमाणे शेतकर्‍याच्या अन्नात माती कालवण्याचे काम ही रासायनिक खते करू लागली. मातीचे आरोग्य बिघडू लागले. केवळ मातीवरच नव्हे तर खाद्य-पदार्थांच्या उत्पादनावरही त्याचा विपरित परिणाम होऊ लागला. त्याच्या स्तरात घट येऊ लागली.  त्यामुळे आता शेतीतील मातीचे आरोग्य कसे शाबूत राहिल आणि रासायनिक खतावर सबशिडीच्या रुपाने होणारा कोट्यावधीचा खर्चही कसा वाचवता येईल, या प्रश्नाचे उत्तर जैविक शेतीच देऊ शकते, हे आता अनुभवावरून लोकांना कळू लागले आहे.
     आता साहजिकच शेतकर्‍यांना पुन्हा जैविक शेतीकडे वळावे लागणार आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी शेतकर्‍यांनी अधिकाधिक जैव शेतीचा स्वीकार करावा, यासाठी विशेष योजना राबवायला हव्यात. वैकल्पिक सबशिडीची व्यवस्था करायला हवी. राज्य सरकारांनी किंवा केंद्र सरकारने योजनाबद्धरित्या कार्यक्रम आखून जैविक शेतीला प्रोत्साहन दिल्यास त्याचा विस्तार फारसा कठीण नाही. देशातले सिक्कीम हे उत्तर-पूर्वी राज्य याबाबत आघाडी घेत असून संपूर्ण देशासाठी तो एक आदर्श वस्तूपाठ आहे, असे म्हणायला हवे.
     २००३ मध्ये सिक्कीमच्या पवन चामलिंग सरकारने विधानसभेत एक प्रस्ताव पास करून राज्याला 'जैविक राज्य' म्हणून पुढे आणण्याचा संकल्प सोडला. यासाठी सिक्कीम सरकारने पहिल्यांदा काय केले असेल तर , ते म्हणजे संपूर्ण राज्यात रासायनिक खते व कीटकनाशक औषधांच्या विक्रीवर बंदी घातली. त्याची अंमलबजावणी कड्कपणे केली. यानंतर राज्यातल्या जवळपास ४०० गावांना २००९ पर्यंत 'जैविक गाव' बनविण्याचे लक्ष्य ठेवले. नंतर राज्य सरकारने ५० हजार हेक्टर जमीन जैविक शेतीमध्ये रुपांतरित करण्याचा सपाटा चालवला. पूर्ण इच्छाशक्तीने राज्य सरकारने त्यात स्वतः ला झोकून दिले. या प्रयत्नांचा परिणाम असा झाला की, राज्यात वनस्पती खते तयार करणार्‍या २४ हजार ५३६ संस्था तर गांडूळ खताच्या १४ हजार ४८७ संस्था उभा राहिल्या आणि त्या पुर्‍या जोमाने काम करू लागल्या आणि आज त्या ते काम करीत आहेत.
     या प्रयत्नांमुळे २००९ पर्यंत सिक्कीममध्ये जैविक शेतीचा विस्तार सहा हजार हेक्टरपर्यंत पोहोचला होता. त्यात सतत वाढ होत असून तिथल्या आठ हजार शेतकर्‍यांनी आतापर्यंत जैव शेतीचे प्रमाणिकरण मिळवले आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर २०१५ पर्यंत सिक्कीममधील ५० हजार शेतकरी जैवशेती करताना दिसतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सिक्कीमचा आदर्श संपूर्ण देशाने अगदी गंभीरपणे घेतल्यास आपल्या देशाचे एक चांगले चित्र जगासमोर येईल. शिवाय आपली भावी पिढी रसायनमुक्त अन्नाचे सेवन करील आणि बिघडलेल्या पर्यावरणाला आवरही घालता येईल.                                                                        

Friday, August 24, 2012

हास्यबहार - मॉर्निंग वॉक? छे छे !

     अलिकडच्या दिवसांत 'मॉर्निंग वॉक' ला जायचा योग आला नव्हता. कसा येणार? सारखा कुणी ना कुणी पाव्हणा-रावळा या न त्या निमित्ताने किंवा निष्कारणाने घरी टपकायचा. खरं सांगू का? एकाच शहरात लग्न कधी करू नये. ऊठ-सुठ बायकांकडल्या मंडळींचा राबता आपल्या घरात. शिवाय काही बोलायची सोय नाही. अवघड जागेचं दुखणं. नुकसानीलाही काही परिसीमा नाही. सगळ्या बाजूनं 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' सोसायचा. आणि त्यातूनही विरोधाचा एकादा जर 'शब्द' चूकून- माकून अर्थात वैतागाचा कडेलोट झाल्यावर तोंडातून गेला तर आपल्या सात पिढ्यांचा उद्धार झालाच म्हणून समजा. तेवढ्याने निभावले तर नशीब म्हणायचे. नाही तर खाण्या-पिण्यापासून अनेक संकटं चालून आलीच म्हणायची!
     पण आज संधी मिळाली होती. सकाळी सकाळी गजाननराव येऊन धडकले. त्यांनी बाहेरच्या बाहेर अक्षरशः मला ओढून नेलं. आम्ही आमच्या गृहमंत्र्यांनाही सांगू शकलो नाही. तसे आम्ही गजाननरावांना इशार्‍याने सांगितलेही, पण त्यांनी आमच्याकडे आमची खिल्ली उडविण्याच्या दृष्टीनं असं काही पाहिलं कीजणू काय एवढे मर्द असून बायकोला घाबरता! आम्ही मुकाट्याने त्यांच्याबरोबर निघालो. पार्कात गेल्यावर मात्र चोहोबाजूला सृष्टीचा हिरवा गालिचा पांघरलेला पाहून मन कसं प्रफुल्लित झालं. गार वार्‍यासवे झोके घेऊ लागलं. लहान पोरांसारखं हुंदडावं वाटलं, पण हाय रे हमारी किस्मत! त्यानं ५५ व्या वर्षीच आमच्या गुड्घ्याची हवा काढून टाकली होती.
     जाऊ दे, बागेत सगळंच हिरवं-हिरवं होतं. हिरवी, टवटवीत फुलपाखरंही बागेत घिरट्या घालत होती. मुलं-बाळंही टोळी टोळीनं क्रिकेट खेळत होती. गजाननराव म्हणाले," या खेळाइतका खुळचट खेळ कुठला नसेल. कापडं बडवणार्‍या थापीनं चेंडू मारा आणि त्याच्या मागे धावा. आणि यासाठी आकराच माणसं का बरं जीव धोक्यात घालतात कळत नाही. आणि यातनं पडून झडून उद्भवलेल्या आजारांची नावं तर किती विचित्र! टेनीस एल्बोचंच  उदाहरण घ्या. गडी खेळतात क्रिकेट आणि आजार टेनीसचा. "
     आम्ही उभ्या उभ्याच क्रिकेटबद्दलच विचार करत होतो, तेवढ्यात आमच्या डोळ्यांसमोर काळाकुट्ट अंधार पसरला. कुणी तरी विजेचा 'शॉकद्यावा, तसा जोराचा झटका बसला. तोंड धरून आम्ही आमच्या अस्पष्ट डोळ्यांनी पाहिलं की पार्कमधली माणसं आमच्याकडे धावत येत आहेत. आम्ही धाडकन खाली कोसळलो. 'काय झालं... काय झालं...? ' असं काही तरी कानावर आलं आणि आम्ही मूर्च्छित झालो.
     शुद्ध आली तेव्हा पाहिलं तर समोर गृहमंत्र्यांचा काळजी भरलेला चेहरा. आमच्याविषयीची चिंता आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. मनोमन सुखावलो. पण आमचे डोळे उघडताच त्यांनी महिषासुरमर्दिनीचा अवतार धारण केला. डोळ्यांत विस्तव फुलला.    
     गृहमंत्री कडाडल्या," कितीदा बजावलं, आता तुमचं वय हिंडण्या-फिरण्याचं  नाही म्हणून. कुणाला तरी संगतीला घेऊन जायचं. पण नाही! स्वतः ला काय अजून धर्मेंद्र समजता. आणि काय हो! जिथं मुलं खेळत होती, तिथं कशाला तडमडायला गेला होता? तरी बरं, तिथं गजाननभाऊजी 'वॉकिंग' करत होते. त्यांनीच तुम्हाला रिक्षाने घरापर्यंत आणलं."
     आता आम्ही यापुढं काय बोलणार? कसं सांगणार गजाननराव आमच्यासोबत होते. काही सांगितलं असतं तर आमच्या कडकलक्ष्मी त्यांच्यापुढे  जाऊन काही तरी जिव्हारी लागणारं कडाडल्या असत्या.  आम्ही ताडलं, तोंड बंद ठेवण्यातच आपला शहाणपणा आहे.
     पण आता यापुढं पुन्हा कधी आम्हाला 'मॉर्निंग वॉक'ला जाता येईल, असं वाटत नाही.     

Wednesday, August 22, 2012

लोकशाहीतले नवे नवाब

   हा किस्सा गेल्या महिन्यातला म्हणजे जुलैमधला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरन आणि त्यांच्या अधिकार्‍यांना 'सेना दिवस' च्या कार्यक्रमाला जायचे होते. जाता जाता त्यांना कॉफी प्यावीशी वाटली. ते रस्त्यालगतच्या एका कॉफी हाऊसमध्ये घुसले. तिथे खूपच गर्दी होती. तिथल्या महिला वेटरला त्यांनी विचारले, 'कॉफी मिळेल का?' तर तिने सांगितले की,  मी दुसरे ग्राहक पाहते आहे. थोडा वेळ  वाट पाहावी लागेल. त्यांनी दहा मिनिटे वाट पाहिली तरीही तिने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी ते दुसर्‍या रेस्टारंटमध्ये गेले. तिथे त्यांना ओळखले गेले. त्यामुळे तिथे त्यांची शाही बडदास्त करण्यात आली. जेव्हा हा प्रकार शीला थॉमस या महिला वेटरला कळला, तेव्हा तिने त्यांची माफी मागितली.
     ब्रिटनमधल्या प्रसारमाध्यमांनी किश्श्यावरून बराच हंगामा केला. त्यांच्या लोकप्रियतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. ब्रिटनच्या पंतप्रधानांना  साधी महिला वेटरसुद्धा  ओळखत नाही, असा कांगावा त्यांनी चालवला. याअगोदर इटलीतल्या एका महिला वेटरने पंतप्रधान कॅमरन आणि त्यांच्या पत्नीला आपण कामात खूप बिझी आहोत, त्यामुळे आपल्याला जेवण देऊ शकत नाही, अशी हतबलता व्यक्त केली होती.
     कॅमरनबाबतचा आणखी एक किस्सा ब्रिटनमधल्या मिडियामध्ये चर्चेचा आणि गप्पांचा विषय झाला आहे. हा किस्सा वरील घटनेच्या अगोदरचा आहे. पंतप्रधान कॅमरन आपल्या कुटुंब आणि  आपल्या मित्र-परिवारांसोबत एका रेस्टारंटमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यावर परतताना ते चक्क आपल्या मुलीलाच तिथे विसरले. माध्यमांनी हा विषय चांगलाच रंगवला. कॅमरन दाम्पंत्य आई-वडील म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, असा शेरा  मारत त्यांनी  त्यांची खूप टर उडवली. पण झालं होतं असं की, कॅमरन आणि त्यांच्या मित्रांच्या अनेक गाड्या तिथे होत्या. त्यांना वाटलं की ती कुठल्या तरी एका गाडीत बसली असेल. पण जेव्हा त्यांना कळले की, आपली मुलगीच तिथेच राहिली आहे, तेव्हा ते पुन्हा तिथे मुलीला आणायला गेले. तिथल्या रेस्टारंटवाल्यांनी पंतप्रधानांच्या मुलीला तोपर्यंत व्यवस्थित सांभाळून ठेवले होते.
     ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी यावर काहीही टिकाटिपणी केली असली तरी भारतीयांसाठी मात्र हा मोठा संदेश आहे. पंतप्रधानाने सामान्य नागरिकांप्रमाणे हिंडावे- फिरावे, रेस्टारंटमध्ये जावे, मनासारखे पण  सामान्यांप्रमाणे खावे-प्यावे, सामान्य नागरिकांप्रमाणे चुका कराव्यात आणि त्यांना  वागणूकही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे मिळावी. ही कल्पनाच आम्हां भारतीयांना सहन होणारी नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान तर दूरच पण अन्य मंत्रीगण, मुख्यमंत्री, उच्चाधिकारी आणि एवढेच नव्हे तर जिल्ह्याचा कलेक्टर किंवा जिल्ह्याचा  पोलिस अधिक्षक यांच्या भोवतीने खालच्या अधिकार्‍यांचा- कर्मचार्‍यांच्या भोवतीचा गराडा पाहिला कुठे इंग्लडचा पंतप्रधान आणि कुठे आमचा जिल्ह्याचा अधिकारी असा प्रश्नच पडतो. दिल्ले तर दूरच राहिली. त्यांच्याभोवतीचा लवाजमा पाहिला की, नवाबांचा रुबाब फिका वाटावा. या मंडळींचा सर्वसामान्य नागरिकांशी संबंधच येत नाही.   ब्रिटनच्या पंतप्रधानाबाबत घडणारी घटना आपल्याकडे स्वप्नातसुद्धा पाहायला मिळणार नाही.
     आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी  पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा मंत्री जातातत्या त्या ठिकाणची रहदारी अगोदरच बंद करण्यात येते. ही मंडळी तिथून जात नाहीत, तोपर्यंत त्याठिकाणचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले असते.      लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. भारतातल्या सामान्य नागरिकांना त्यांना पाहायचं तर दूरच पण बोलणं, भेटणंसुद्धा नशिबी नसतं. अलिकडच्या काही वर्षांपासून तर सुरक्षितच्या नावाखाली ही 'व्हीआयपी' मंडळी अधिकच पोलिसांच्या गराड्यात वावरत असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मंत्री- संत्री यांच्या संरक्षणाच्या नावावर या गरिब देशातले अब्जावधी रुपये उधळले जात आहेत. दहशतवादाचा धोका असल्याचे कारण पुढे करीत या गोष्टीचे समर्थन केले जाऊ लागले आहे. पण हा धोका ब्रिटनमध्ये नाही काय? असा प्रश्न पडतो.  उलट आपल्यापेक्षा अधिक ब्रिटन जगभरातल्या दहशतवादांच्या हिटलिस्टवर आहे. मग ब्रिटनमधील पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणा पंतप्रधानांच्या सुरक्षेची व्यवस्था करीत नाही काय? पण सुरक्षा आणि देखरेख ही गोष्ट वेगळी आणि राजा-महाराजांसारखा संरक्षणाचा लवाजमा म्हणजेच हत्यारबंद सुरक्षारक्षक, नोकर आणि हुजर्‍यांची फौज घेऊन मिरवणे, ही गोष्ट निराळी.
     आपल्या देशात ही नवी पण तितकीच 'व्हीआयपी संस्कृती' बनली आहे. 'व्हीआयपी' हा असा शब्द केवळ अडाणीच नव्हे तर शेंबडं पोरगं समजू लागला आहे. कारण याचा जागोजागी प्रत्यय येत असतो. या संस्कृतीची आपल्याला इतकी सवय लागली आहे की, याचे आपल्याला काहीच वाटेनासे झाले आहे. स्वत; ला 'व्हीआयपी' समजणाराही याला सरावला आहे. कुणालाच याविषयी काही बोलावसं वाटत नाही. इतका हा लाचारीपणा आपल्या रक्तात भिनला आहे.  ही संस्कृती पुरान्या सामंत, नवाबाच्या युगापासून आणि  इंग्रजाच्या राजवटीपासून चालत आलेली आहे. इंग्रजाच्या देशात स्वीकारार्ह नसलेला राजा-महाराजांसारखा थाटमाट आणि लवाजमा तत्कालीन   भारतातले व्हाईसराय आणि इंग्रज अधिकारीसुद्धा गुलामगिरीच्या बाळगून राहत होते. खरे तर लोकशाहीत लोकप्रतिनिधी लोकांमधून लोकांच्या कल्याणासाठी निवडून दिलेला असतो. त्याने लोकांचा सेवक म्हणून त्यांच्यात मिसळून लोकांसाठी काम करावयाचे असते. इथे लोक हेच सर्वस्व असतात. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन चालवणारा नोकरवर्ग यांची निवड किंवा नेमणूक लोकांच्या कल्याणाकरता केलेली असते. पण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात नेमकी उलटी परिस्थिती आहे. निवडून दिलेले 'दादा', 'बाबा' होऊन बसतात तर नोकरवर्ग लोकांनाच 'नोकर' समजून त्यांना वागणूक देत असतो. लोप्रतिनिधींचा यांचा थाटच वेगळा असतो. एकदा निवडून गेला की त्यांचा आणि लोकांचा संबंधच तुटतो. त्यांच्यात मोठी दरी निर्माण होते. ज्यासाठी त्यांना निवडून दिलेले असते, त्यांच्यापासूनच ते दूर जातात. हा प्रकार लोकशाही भावनेदृष्टीने  मोठा घातक ठरत आहे.
     युरोपातल्या नॉर्वेसारख्या आणखी एका देशातला पंतप्रधान सामान्य नागरिकांसारखा गल्लीतल्या सर्वसामान्य घरात राहतो. इतरांसारखाच बाजारहाटही करतो. जवळपास ५० वर्षांपूर्वी समाजवादी नेते डॉ. राममोहन लोहिया यांनीसुद्धा ब्रिटनमधल्या हॉटेलमधल्या महिला वेटरशी चर्चा आनि मुलाखत केल्यानंतरचा एक किस्सा लिहून ठेवला होता. त्यांना त्या महिलेच्या भारताबाबतची माहितीने, विद्वत्तेने चकित करून टाकले होते. यावर त्यांनी संबंधित महिलेला विचारल्यावर तिनं सांगितलं की ती भारतात राहिलेल्या इंग्रज उच्चाधिकार्‍याची पुत्रवधू आहे. एका उच्चाधिकार्‍याच्या घराण्यातली एक  सदस्या  एका रेस्टारंटमध्ये वेटरचे काम करतेहा प्रश्नच पचनी पडत नाही. असल्या गोष्टीची आपल्या देशात याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. पण तिथे ही गोष्ट सामान्य आहे. या किश्श्यावरून लोहिया यांनी भारतातल्या जातीव्यवस्था, सामंतशाही वृत्तीगरीब- श्रीमंत,  व श्रम याबाबतचा प्रचंड विरोधाभास परखडपणे मांडला होता.
     आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६०-६५ वर्षे उलटली. पण भारतातली लाचारीची मनोवृत्ती बदललेली  नाही. उलट ती आणखीणच बिकट बनत चालली आहे. या सगळ्या वागणुकीतून आम्ही लोकशाहीतले नवे नवाब तयार करत आहोत. देश कितीही प्रगती करीत असला तरी याबाबतीत आम्ही पुढे न जाता मागे मागे जात आहोत. 

Tuesday, August 21, 2012

बालकथा गाढव आणि धोबी

     एका घनदाट जंगलात बसू नावाचे एक गाढव राहत होते. ते मोठे हुशार, धाडशी आणि समजूतदार होते. त्याच्या या गुणांमुळे तो जंगलातल्या सर्व प्राणी-पक्ष्यांचा आवडता होता. एक दिवस बसू गाढव गवत खाण्यात मग्न होते. तेवढ्यात तो तेथून निघालेल्या धोब्याच्या दृष्टीस पडला. गाढवाला पाहून त्याच्या मनात लड्डू फुटले. "अरे व्वा! काय सुंदर, तगडे गाढव आहे. हा चाळीस गाढवाचे काम एकटा करू शकेल. याला पकडून आपण शहरात घेऊन जाऊ. चांगली किंमत येईल."
     मग तो बसूजवळ गेला. त्याला दमात घेत म्हणाला," ये गाढवा, चल माझ्याबरोबर. मी तुला शहरी गाढव बनवतो."
     "अरे चल हट, मोठा आला शहरी गाढव बनवणारा. " बसू त्याच्यावर डोळे वटारत म्हणाला.
     " बर्‍या बोलानं चल, नाहीतर कान पकडून ओढत नेईन. समजलास!"
     "अरे जा रे, तू कोण एवढा लागून गेलास...?" गाढव म्हणाले.
     गाढव आपले ऐकत नाही म्हटल्यावर धोबी संतापला. "थांब आता, मी कोण आहे ते दाखवतो." असे म्हणत तो बसू गाढवाजवळ गेला. त्याचा कान पकडणार तोच बसूने गर्र्कन गिरकी घेतली आणि एक झाडून लाथ मारली. धोबी तिकडे लांब झुडपात जाऊन पडला. छातीवर चांगलाच मार बसल्याने आणि झुडपात  अडकल्याने त्याला उठता येईना. " अरे देवा, काय जोराची लाथ मारली रे. बरखडया मोडल्या की माझ्या ..." असा विव्हळत- कण्हत  धोबी झाडा-झुडपांमध्येच गडप झाला. पण तो कमालीचा जिद्दी होता. तो पळून जाण्यापेक्षा जंगलातच लपून बसला आणि बसू गाढवावर लक्ष ठेवू राहिला. त्याला पकडून शहरात नेण्याचा त्याने चंगच बांधला होता.
     बसू मात्र अगदी मजेत गवतावर ताव मारत होता. पोट भरल्यावर तो नदीला गेला. पोटभर पाणी प्याला. आता त्याला सुस्ती येऊ लागली. तिथेच एका डेरेदार वडाच्या गार झाडाखाली लवंडला. आणि लगेचच त्याला गाढ झोप लागली.
     गाढ झोपलेल्या गाढवाला पाहून धोब्याने संधीचा फायदा उठवायचे ठरवले. तो हळूच त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या गळ्यात जाम दोरी बांधली. "अरे हे काय, माझ्या गळ्याला फास कशाचा?" असे म्हणत बसू गाढव उठले. पाहतो तर समोर धोबी आणि गळ्यात दोरी बांधलेली. "या धूर्त माणसाने मला पकडले तर.."  तो मनातल्या मनात म्हणाला.
     "हा.. हा" धोबी मोठ्याने हसत म्हणाला," आली का नाही अक्कल ठिकाण्यावर? मला लाथाडतोस काय? आता मुकाट्याने माझ्याबरोबर चल." असे म्हणत धोबी त्याला ओढत शहराकडे घेऊन चालू लागला. बिच्चारा बसू, करणार काय? मुकाट्याने त्याच्यामागे चालू लागला. बसू गाढवाच्या लक्षात आले, की आता काही तरी आयडिया केल्याशिवाय आपली सुटका नाही. तो हळूच डोळे मिचकावत म्हणाला," धोबीदादा, माझी चूकच झाली. मी तुला लाथाडायला नको होतं. कृपया, मला माफ कर. मी तुला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाईन."
     " आता कसा वठणीवर आलास? मला माहित होतं तू ताळ्यावर येणार ते." असे म्हणून तो गाढवाच्या पाठीवर बसला. बसूला हेच पाहिजे होतं. धोबी पाठीवर बसताच त्याने धूम ठोकली. त्याचा वेग पाहून धोब्याला घाम फुटला. आता आपली काही धडगत नाही, हे धोब्याने ओळखले. आता तो बसूची विणवणी करू लागला.  " माझ्या मित्रा, माझी चूक झाली. पुन्हा कधी असा वागणार नाही. मला सोड."
     आता गाढव मोठमोठ्याने हसू लागले. " आता स्वतः च्या जीवावर बेतल्यावर माफी मागतोस  काय? थांब आता, तुला असली शिक्षा देतो की तू ती आयुष्यभर विसरणार नाही." असे म्हणून ते आणखी वेगाने धावू लागले. " मित्रा,   तुझ्या पाया पडतो.पण मला सोड. पुन्हा कधी कुठल्या गाढवाच्या वाटेला जाणार नाही. मी सगळी गाढवं सोडून देईन. पण मला सोड.'' धोबी त्याच्यापुढे गडगडू लागला. रडू लागला.
     पण बसू ऐकतोय कुठे! त्याने आणखी वेग वाढवला. सुसाट वार्‍यासारखा धावत सुटला. तो दाट जंगलात शिरला. आणि तो थेट वनराजाच्या गुहेजवळ जाऊन थांबला. तिथे त्याने धोब्याला खाली आपटले आणि म्हणाला," महाराज, तुम्हाला नोकराची गरज होती ना? हा घ्या, मी नोकर आणला आहे."
     वनराज बाहेर आला. माणसाला पाहून हरकला. " व्वा बसू, तू तर कमालच केलीस. माणूस माझा नोकर. माणसाला नोकर म्हणून ठेवणारा मी जगातला एकमेव राजा असेन. या बदली तुला त्या नदीकाठची गवताळ जमीन बक्षीस म्हणून देतो. जा ऐश कर." वनराज नोकर पाहून खूश झाला.
     बसू गाढव  धोब्याकडे पाहत हसत-हसत निघून गेले. इकडे वनराजाच्या तावडीत सापडलेल्या धोब्याची पाचावर धारण बसली. त्याची शिट्टी-बिट्ती गूल झाली होती. वनराजाने त्याला नोकर म्हणून ठेवले.  राणी त्याच्याकडून सगळी कामे करवून घेऊ लागली. धोब्याला मोठा पश्चाताप झाला आणि... आणि एक दिवस संधी साधून डोक्याला पाय लावून शहराकडे पळत सुटला.        

Monday, August 20, 2012

कथा पैज


      शरद ऋतुची ती गडद काळी रात्र. बँकर आपल्या स्टडीरूमसमोर अस्वस्थपणे येरझार्‍या घालीत होता. तो आठवत होता, १५ वर्षांपूर्वीची अशीच एक रात्र. त्या रात्री त्याने पार्टी दिली होती. पार्टीत अनेक  बुद्धीवान, हुशार माणसे सहभागी झाली होती. यावेळी ज्या काही विषयांवर चर्चा झाली होती, त्यात मृत्यूदंडाचाही विषय होता. बहुतांश पाहुण्यांनी मृत्यूदंडाला नकार दिला होता. यात पत्रकार आणि बुद्धिवंतही होते. काहींचं मत होतं की, मृत्यूदंडाच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले जावे. पार्टीचा होस्ट बँकर म्हणाला," मी तुमच्याशी सहमत नाही. खरे तर मला या दोन्हीचा अनुभव नाही, परंतु तसा विचार केला तर मला जन्मठेपेपेक्षा मृत्यूदंडच योग्य वाटतो. नैतिकतेच्या आणि मानवतेच्या दृष्टीकोनातूनही मृत्यूदंड सरस आहे. मृत्यूदंड माणसाला, त्याच्या वेदनांना  एका झटक्यात संपवून टाकतो, जन्मठेप त्याला तीळतीळ करीत कित्येक वर्षे मारत राहतो. मग मला सांगा, दोघांमधील अधिक मानवीय काय आहे? जो माणसाला एका झटक्यात संपवतो तो की, जो त्याचे जीवन हिरावून घेऊन कित्येक वर्षे फक्त जगायला भाग पाडतो."
     तिथे उपस्थित असलेला एक पाहुणा म्हणाला," तसं पाहिलं तर दोन्हीही गोष्टी समानरुपानं अनैतिकच आहेत. कारण दोघांचा उद्देश एकच, जीवन संपवणं. देश काही देव नव्हे. जर तो जीवन देऊ शकत नाही तर त्याला ते हिरावून घेण्याचाही अधिकार नाही." पार्टीत एक पंचवीस वर्षे वयाचा  तरुण वकीलसुद्धा होता. जेव्हा त्याला याबाबत त्याचं मत विचारण्यात आलं, तेव्हा तो म्हणाला," मृत्यूदंड आणि जन्मठेप दोन्ही समानरुपानं अनैतिकच आहेत. पण मला या दोन्हीपैकी एकाची निवड करायला सांगितले गेले तर मी दुसर्‍या पर्यायाचा स्वीकार करीन. न जगण्यापेक्षा कशाही पद्धतीने जगणे चांगले." चर्चा रंगतदार अवस्थेत आली होती. बँकर एकाएकी उत्तेजित झाला. टेबलावर जोराची मूठ मारत तो तरुणावर ओरडला," नाही... नाही.. शक्य नाही. मी तुझ्याबरोबर २० लाख रुबल्सची पैज लावायला तयार आहे. पण पाच वर्षेसुद्धा तू एकटा राहू शकणार नाहीस."
     "तू तुझ्या मतावर ठाम असशील तर मी पैज स्वीकारायला तयार आहे. पण मी ५ वर्षे नव्हे तर १५ वर्षे एकांतवासात राहू शकतो." तरुण वकील आत्मविश्वासाने म्हणाला.
     "१५ वर्षे! ठीक आहे. मी तयार आहे." बॅंकर ओरडला," ... मित्रांनो, मी वीस लाखाची पैज लावायला तयार आहे."
     "ठीक आहे, तू तुझे २० लाख रुबल्स पणाला लाव, इकडे मी माझे स्वातंत्र्य पणाला लावतो." तरुण म्हणाला. आणि ती विचित्र आणि निरर्थक पैज लावली गेली. लाडाखोडाने बिघडलेला, चंचल मनोवृत्तीचा आणि लाखात लोळणारा बँकर पैजेने खूश होता. भोजनावेळी त्या तरुणाची टर उडवित बँकर म्हणाला," भला माणसा, अजूनही वेळ गेलेली नाही. मी विचार करायला आणखी एक संधी देतो. बघ. माझ्यासाठी वीस लाख म्हणजे काहीच नाहीत. पण तू मात्र तुझ्या आयुष्यातले किंमतीचे तीन्-चार वर्षे हकनाक गमावून बसशील. मी ३-४ वर्षे एवढ्यासाठी म्हणतोय की, यापेक्षा अधिक काळ एकांतवासात काढूच शकणार नाहीस. आणि हेही विसरू नकोस, की कम्पलसरी कारावासापेक्षा स्वैच्छिक कारावास मोठा भयंकर असतो. तू केव्हाही बाहेर येऊन, तुझे स्वातंत्र्य पुन्हा मिळवू शकतोस, पण तुझा हा कारावासाचा विचार तुझे आयुष्य उद्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. मला तर बाबा, तुझी कीव येतेय."
     आज बँकरला येरझार्‍या घालताना सगळं आठवत होतं. त्याने स्वतःलाच विचारले,' शेवटी त्या पैजेचा उद्देश काय होता? त्याला आयुष्यातली १५ वर्षे आणि मला २० लाख रुबल्स पणाला लावून काय मिळाले? नाही! नाही! ते सगळे बेकार, बकवास आणि निरर्थक होते. ती पैज एका बिघडलेल्या व्यक्तीची क्षणिक इच्छा आणि दुसर्‍याची पैशासाठीची लालसा होती. बँकर आठवत राहिला,' मग निश्चित करण्यात आले. त्या तरुणाने आपली शिक्षा बँकरच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या चौकीदार आणि नोकरांसाठी असलेल्या निवासादरम्यानच्या एका रिकाम्या खोलीत भोगावी. त्याच्यावर सतत पाळत राहिल. तो कुणाला दिसणार नाही. कुणाचा आवाज ऐकणार नाही. त्याला वृत्तपत्रे किंवा पत्रे मिळणार नाहीत. तो एखादे वाद्य आणि पुस्तके ठेऊ शकतो. त्याला पत्रे लिहिण्याचे, सिगरेट- वाईन पिण्याचे स्वातंत्र्य असेल. बाहेरील जगताशी त्याचा संबंध केवळ एका खिडकीच्या माध्यमातून येईल. त्याला वाटले तर तो पाहिजे तेवढी दारू, पुस्तके आणि संगीताची मागणी करू शकेल. एग्रीमेंटमध्ये सगळ्या बाबी विस्ताराने लिहिल्या होत्या. त्याची १५ वर्षाची शिक्षा १४ नोव्हेंबर १८७० ला १२ वाजता सुरू होऊन १४ नोव्हेंबर १८८५ रोजी समाप्त होणार होती. तरुणाकडून यातल्या एखाद्या जरी अटीचे उल्लंघन झाले तरी बँकर त्याला वीस लाख रुबल्स देण्यास बांधील असणार नव्हता.  
     तरुण कारावासाच्या पहिल्या वर्षात एकांतग्रस्त राहिला. त्याच्या खोलीतून रात्रंदिवस पियानोचा आवाज येत होता. तो सिगरेट किंवा दारू प्यायला नाही. त्याने लिहिले,' दारू इच्छांना जागृत करते. आणि इच्छा एखाद्या कैद्यासाठी मोठी शत्रू ठरते. माणूस दारू प्यायला आणि तो कुणाला पाहू शकला नाही तर त्याइतकी बोरिंग गोष्ट कुठली नसेल. आणि हां, तंबाकूमुळे खोलीतली हवा प्रदुषित होते.' त्याच्या छोट्या छोट्या टिपण्यांवरून लक्षात येतं की, पहिल्या वर्षात त्याने हलक्या-फुलक्या रोमांटिक कादंबर्‍या आणि थरकाप उडविणार्‍या कथा वाचल्या असाव्यात. दुसर्‍या वर्षी पियानो गप्प राहिला. या कालावधीत कैद्याने फक्त क्लासिक वाचले. पाचव्या वर्षापासून पुन्हा संगीत ऐकायला येऊ लागले. आणि त्याने वाईनसुद्धा मागितली. खिडकीतून त्याला पाहणार्‍यांनी सांगितले की, त्याने ते पूर्ण वर्ष केवळ खाण्या-पिण्यात आणि ऐशारामात लोळण्यात घालवले. कधी कधी तो रात्री-अपरात्री लिहायला बसे. तासनतास लिहित असे. पण पुन्हा सकाळी रात्रभर लिहिलेले सगळे फाडून टाकत असे. कित्येकदा तो रडतानाही ऐकला गेला. सहाव्या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात कैद्याने मोठ्या उत्साहाने भाषा, तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे सखोल अध्ययन करण्यास प्रारंभ केला. किती तरी वेळा त्याने मागवलेली पुस्तके उपलब्ध करून देताना बँकरला अवघड गेले. चार वर्षात बँकरने त्याला ६०० पुस्तके मागवून दिली.
     अकराव्या वर्षी कैदी केवळ बायबलच वाचत राहिला. ज्या माणसाने चार वर्षात ६०० पुस्तकांचा फडशा पाडला, त्या माणसाने समजायला अत्यंत सोपे असलेले पुस्तक वाचायला मात्र पुरे एक वर्ष लावले, हे ऐकून बँकर मोठा चकीत झाला. त्यानंतर त्याने अन्य धर्माची पुस्तके आणि त्यांचा इतिहास सांगणारी पुस्तकेही वाचली. कधी तो नॅचरल सायन्स वाचत होता, तर कधी वायरन आणि शेक्सपिअर. कधी तो केमिस्ट्रीची पुस्तकेही मागायचा, तर कधी मेडीसीनचे मॅन्युअल, कधी तत्त्वज्ञानावरचे एखादे थिसिस मागत होता.
     म्हातारा बॅंकर हे सगळे आठवून विचार करत होता,' उद्या १२ वाजता तो आपले स्वातंत्र्य पुन्हा मिळवेल आणि आमच्यात झालेल्या करारानुसार मला त्याला वीस लाख रुबल्स द्यावे लागतील. जर मी ही रक्कम दिली तर मी कफल्लक होऊन जाईन. माझे सर्वस्व लुटले जाईल.'
     १५ वर्षांपूर्वी बँकरला त्याच्या  स्वतःच्या संपत्तीची मोजदाद करता येत नव्हती. परंतु, आज मात्र कर्ज अधिक आहे की त्याची संपत्ती, हा प्रश्न स्वतःला विचारायला तो घाबरतो होता. सट्टेबाजीमुळे त्याची संपत्ती हळूहळू घटत चालली होती. एकेकाळचा निडर, आत्मविश्वासी आणि गर्विष्ठ लखपती आज मात्र मध्यमवर्गिय बनला होता. दोन्ही हातांनी घट्ट डोकं धरून तो निराशेने बडबडला,' वाट लावणारी पैज! तो तरुन मरून का गेला नाही? आज तो फक्त चाळीस वर्षाचा आहे. अजून पुरी जिंदगी त्याच्यापुढे पडली आहे. आता तो माझे सर्वस्व हिरावून घेईल. जीवनाचा लुप्त उठवेल. सट्टा लावेल आणि मी मात्र त्याच्याकडे आशाळभूतपणे एखाद्या भिकार्‍यासारखा इर्षेने पाहात राहीन. तो रोज एकच वाक्य उच्चारेल, मी माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणासाठी तुझा आभारी आहे. मला तुझी कीव येतेय. आता मला तुला मदत करण्याची संधी दे.'
     'हा अपमान आणि दिवाळखोरी यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे- त्याचा मृत्यू!'
     रात्रीचे तीन वाजले होते. घरातले सगळे झोपले होते. कसलाही आवाज न करता त्याने सेफमधून चावी काढली, जी १५ वर्षांपासून कपाटात बंदिस्त होती. ओव्हरकोट घातला आणि तो घराबाहेर पडला. बागेत गडद अंधार आणि थंडी होती. पाणी वाहत होतं. त्याने दोनवेळा चौकीदाराला हाक दिली. पण प्रतिसाद मिळाला नाही. नक्कीच तो या भयंकर मौसमात स्वतःचा बचाव करण्यासाठी किचन किंवा ग्रीन हाऊसमध्ये जाऊन झोपला असेल. 
     "जर मी माझ्या निश्चयात यशस्वी झालो तर पहिल्यांदा संशयाची सुई चौकीदारावर रोखली जाईल." त्याने आगकाडी पेटवली. कैदाच्या खोलीकडे जाणारा रस्ता अंधाराने भरला होता. काडीच्या उजेडात तो कसा तरी दरवाज्यापर्यंत गेला. दरवाज्याला सील ठोकले होते. जेव्हा काडी विझली तेव्हा, अचानक त्याचे अंग थरथरून आले. त्याने तशा अवस्थेतच खिडकीतून डोकावले. खोलीत एक मेणबत्ती सावकाशीने जळत होती. कैदी टेबलासमोर बसला होता. त्याच्या पाठीवर, डोक्यावर वाढलेल्या केसांशिवाय आणि हातांशिवाय काहीच दिसत नव्हते. टेबल, दोन्ही आराम खुर्च्या आणि कारपेटवर उघडलेल्या अवस्थेत पुस्तके पडलेली होती.       
     पाच मिनिटे गेली, पण कैद्याने एकदाही हलचाल केली नाही. १५ वर्षाच्या कारावासाने त्याला स्थीर बसायला शिकवलं होतं. बॅंकरने खिडकीवर थाप मारली, तरीही कैदी हलला नाही. बँकरने सावधपणे दरवाज्याचे सील तोडले. आणि चावी गंज चढलेल्या कुलुपाला लावली. त्याला वाटलं होतं की, कुलुपाची आणि दरवाज्याची खडखड ऐकून कैदी उठेल आणि आरडा-ओरडा करेल. पण यातले काहीच घडले नाही. तीन मिनिटे उलटून गेली तरी खोलीत भयाण शांतता होती. त्याने आत जाण्याचा निर्धार केला.
     टेबलासमोर बसलेला माणूस असामान्य असा स्थीर होता. त्याच्यात फक्त हाडाचा सांगाडा उरला होता. त्याचा क्षीण चेहरा पाहिल्यावर कोणीही अंदाज करू शकला नसता की, हा फक्त चाळीस वर्षांचा आहे. तो झोपला होता. त्याची मान झुकलेली होती. समोर टेबलावर कागदाचा एक तुकडा पडला होता. त्यावर सुंदर अक्षरांत काही तरी लिहिलं होतं.
     " बिच्चारा!" बँकरने विचार केला," ... झोपला आहे. कदाचित तो उद्याची लाखोंची स्वप्ने पाहात असेल. मला या अर्धमेल्या माणसाला उचलून अंथरुणावर पटकवावं लागेल. त्याची हत्या झाली आहे, याचा थोडाही संशय येणार नाही, अशा पद्धतीने त्याच्या तोंडावर ऊशी ठेवून मारावं लागेल. पण पहिल्यांदा या कागदावर काय लिहिलं आहे, हे तरी पाहावं?"बँकरने टेबलावरचा कागद उचलला आणि वाचू लागला.
     " उद्या १२ वाजता मला पुन्हा अन्य लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल. पण ही खोली सोडण्या आणि सूर्यप्रकाश पाहण्याअगोदर मला तुला काही सांगणं आवश्यक आहे. मी अगदी स्वच्छ मनाने सांगतो आहे, जसा एखादा भक्त देवासमोर बसून बोलतोय तसा. पुस्तकातल्या स्वास्थ्य, जीवन स्वातंत्र्य आणि विश्व या सगळ्या गोष्टी तुझ्यासारख्यांनी मानल्या आहेत, त्याच सगळ्या गोष्टींचा मला तिटकारा आहे. "
     " १५ वर्षांपासून मी एकाग्रतेने वैश्विक जीवन वाचत आणि तपासत आलो आहे. खरे तर मी जग आणि लोकांना अधिक पाहिलं किंवा जाणलं नाही, पण तुझ्या या पुस्तकांमधील सुगंधीत आणि स्वादिष्ट मदिरा मी प्यालो आहे. जंगलात मी जंगली हरीण आणि रानटी डुकरांची शिकार केलीय. कवी व प्रतिभावंतांनी रचलेल्या साहित्यावर, मेघसमान अलौकिक ललनांवर प्रेम केलं आहे. त्यांनी मला भान विसरून टाकणार्‍या , डोकं चक्रावून सोडणार्‍या कहाण्या ऐकवल्या आहेत."
     "पुस्तकांनी मला विवेक दिला. शतकानुशतके चलायमान माणसाच्या विचाराने जे काही रचलं गेलं आहे, आता ते सगळं माझ्या मस्तकातल्या एका छोट्याशा कंपासात बंद आहे. मला माहित आहे की, मी तुम्हां सगळ्यांपेक्षा अधिक समजूतदार बनलो आहे. आणि आता मी तू दिलेल्या पुस्तकांचा, विवेक, ज्ञान आणि जगातल्या सगळ्या सुखांचा तिटकारा करतो आहे. कारण हे सगळं बेकार, क्षणिक, भ्रामक आणि अर्थहीन आहे. तू कितीही चांगला, समजूतदार आणि आत्मसन्मानी असशील पण मृत्यू तुला पृथ्वीवरून अशाप्रकारे मिटवून टाकील की, तू इथे कधी नव्हतासच."
     "तू खोट्याला खरं आणि कुरुपाला सुंदर मानलं आहेस. जर एखाद्या असाधारण घटनेमुळे सफरचंद किंवा  संत्र्याच्या झाडावर बेडूक आणि पाली लखडल्या तर तुला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जर गुलाबाच्या सुगंधातून घोड्याच्या घामाचा दुर्गंध यायला लागला तरी तू आश्चर्य करशील. तशाच प्रकारचे मला तुझ्याविषयी नवल वाटते आहे. स्वर्गाऐवजी तू मातीचा स्वीकार केला आहेस. ज्या गोष्टींसाठी तू जगतो आहेसत्यांचा मला किती तिटकारा आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी या वीस लाखाचा त्याग करतो आहे. कधी काळी त्याच्यावरून मी स्वर्गलोकीचे स्वप्न पाहिले होते. या रकमेपासून वंचित राहण्यासाठी मी पैज हरणार आहे. निर्धारित वेळेच्या अगोदर म्हणजे पाच तास आधी मी इथून निघून जाणार आहे."
     बँकरने तो कागद वाचल्यावर पुन्हा जसा होता, तसा टेबलावर ठेवून दिला. त्या माणसाच्या मस्तकाचे चुंबन घेतले आणि हुंदके देत तो खोलीबाहेर आला. आज त्याला स्वतःचीच स्वतःला घृणा वाटू लागली. घरी आल्यावर अंथरुणावर पडून राहिला. परंतु भावना आणि अश्रुंनी त्याला बराच वेळ झोपू दिले नाही.
     दुसर्‍यादिवशी घाबर्‍या चेहर्‍यानं चौकीदार धावतच त्याच्याकडे आला. त्याने बँकरला सांगितलं, कैदी बागेतल्या भिंतीवरून पळाला. पाठलाग केला पण सापडला नाही.'बँकर लगेच उठला. खोलीकडे जाऊ लागला. कैद्याचं पळून जाणं निश्चित होतं. बेकारच्या गोष्टींची झंझट नको म्हणून बँकरने टेबलावरचा कागद उचलला, ज्यात कैद्याने २० लाखाचा त्याग केल्याचे लिहिले होते.  घरी आल्यावर त्याने तो कागद सुरक्षितपणे सेफमध्ये ठेवून दिला आणि अंथरुणावर पडून राहिला.
                                                                                             मूळ रशियन लेखक- एण्टन चेकोव
                                                                                                      भाषांतर- मच्छिंद्र ऐनापुरे    

Sunday, August 19, 2012

बालकथा चिमणीचे घरटे

     एका राजाच्या महालात त्याच्या वडिलांच्या तस्वीरीमागे एक चिमणी आपले घरटे बांधत होती.  ती दिवसभर काट्याकुट्या गोळा करायची. आणायची. तिची सारखी आत-बाहेर धडपड चालली होती. शिवाय तोंडाने सारखी 'चिव चिव' चालायची. तिच्या सततच्या 'चिव चिव' मुळे  राजाची झोप मात्र होत नव्हती. शेवटी त्याने वैतागून नोकरांना घरटे काढून फेकून द्यायला सांगितले. चिमणीला राजाचा राग आला. तिने राजाला धडा शिकवण्याचे ठाणले. ती फणकारतच 'चिव चिव' करत उडाली आणि जंगलात निघून गेली.
     चिमणीला आरडत- ओरडत आल्याचे पाहून  दोघा उंदरांनी तिला कारण विचारले. तिने सारा प्रकार सांगितला. त्यावर उंदीर म्हणाले," आम्ही तुला मदत करू. राजाला धडा शिकवू. त्याने तुझे घरटे मोडले, आम्ही त्याचा महाल तोडू. त्याचा महाल पायासकट ढासळून टाकू."
     चिमणीला आयडिया पसंद पडली. उंदरांनी आपल्या बांधवांना हाक दिली. जंगलातले सारे उंदीर चिमणीच्या मदतीला धावून आले. राजाच्या विरोधात मोर्चा निघाला. वाटेत मधमाशा भेटल्या. म्हणाल्या, चिमणीताई, आम्हीही येणार तुझ्याबरोबर.!" चिमणी म्हणाली," हां, तर चला मग." मग काय खूप सार्‍या मधमाशा तिच्या मागून चालू लागल्या. मोर्चा निघाला. वाटेत मुंग्या, मुंगळे, साप, कुत्री, घोडे, उंट, हत्ती सगळे सामिल झाले. चिमणी सगळ्यांना राजाने घरटे तोडल्याचे सांगायची आणि म्हणायची," मी घमेंडी राजाचा महाल पाडायला निघाले आहे." जंगलातले  सारे प्राणी तिच्यासोबत निघाले. सगळ्यांनी तिला हिंमत दिली.
     चिमणी सगळ्यांना सोबत घेऊन निघाली. जंगल संपल्यावर राजाचा महाल दिसू लागला. चिमणीने आपला दूत म्हणून पोपटाला राजाकडे पाठवले. पोपट राजाला धमकावत म्हणाला," राजा, तू ज्या प्रकारे चिमणीचे घरटे मोडलेस, त्याचप्रकारे आता आम्ही तुझा महाल पाडणार. आमच्याशी सामना करायला तयार हो."
     राजा मोठमोठ्याने हसू लागला. त्याने पोपटाला एक दगड भिरकावून उडवून लावले. तेवढ्यात राजाच्या महालावर कावळे, घारी, गिधड घिरट्या घालू लागले. मग मात्र सारा प्रकार राजाच्या लक्षात आला.  आपल्या सैन्याला   त्याने सगळ्यांना मारून टाकण्याचे आदेश दिले. राजाचे सैन्य अजून पुढे सरकणार तोच त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला. त्यातच मुंग्यांनी, सापांनी राजाच्या सैन्याला घेरून टाकले. कुत्री त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या अंगाचे लचके तोडू लागले.  हत्ती झाडे उखडून सैन्यावर फेकू लागले. सैन्यांना चिरडू लागले. या जोरदार हल्ल्याने सैन्य घाबरून माघारी पळू लागले. राजाला कळून चुकले, आता याम्च्यापुढे आपला निभाव लागणार नाही. राजा पांढरे निशाण दाखवत त्यांना शरण गेला. चिमणीने युद्ध थांबवण्याचा आदेश दिला. राजाला बंदी बनवण्यात आले. राजा भीतीने थरथर कापत होता. त्याने चिमणीची माफी मागितली. म्हणाला," माझ्याकडून चूक झाली. यापुढे तू म्हणशील, तसे करीन."
     चिमणी म्हणाली," माझे घरटे होते तिथे बांधायला सांग." राजाने सैनिकांना आदेश दिला. चिमणी पुढे म्हणाली," माझ्यासोबत आलेले माझे सर्व सखे- सोबती  आता इथेच राहतील. त्यांच्या राहण्याची व्यवस्था कर." राजा म्हणाला," ठीक आहे. करतो सारी व्यवस्था."
     मग काय चोहोबाजूंनी चिमणीचा जयजयकार सुरू झाला. राजाने पक्ष्यांसाठी फळा-फुलांची झाडे लावली. घोड्यांसाठी तबेल्यांची व्यवस्था केली. हत्ती, उंट सार्‍या प्राण्यांसाठी राहण्याचा बंदोबस्त केला गेला. कुत्र्यांनीही आपल्या राहण्याची व्यवस्था केली. 
     झाले,  तेव्हापासून प्राणी-पक्षी, जीव-जंतू शहरांमध्ये आणि गावांमध्ये राहायला लागले.    

बालकथा लक्ष्मी येती घरा.

      जंगलाजवळच असलेल्या  एका गावात एक गरीब म्हातारा लाकूडतोड्या राहात होता. त्याला पाच मुलगे होते. म्हातार्‍याची बायको वारली होती. तो आपल्या मुलांसोबत जंगलात लाकडे तोडत असे आणि राजाच्या भांडारात जमा करत असे. बदल्यात प्रत्येक व्यक्तीच्या हिशोबाने शेरभर धान्य मिळत असे. ते रोज चने घेत. घरी आणून भाजून खात. त्यातून जे थोडफार शिल्लक राहत असेते सकाळी न्याहरी म्हणून खायचे. ते इतके आळशी होते की,  अधिक मेहनत करून अधिक कमवावे, हे त्यांच्या गावीही नव्हते. 
     मोठ्या मुलाचे लग्न झाले होते. पण सून माहेरीच होती. गावातले लोक म्हातार्‍याला म्हणायचे," सुनेला का घेऊन येत नाहीस? तुमचे खाय-प्यायचे आबाळ तर थांबतील."
     म्हातारा म्हणायचा," आम्ही इतकी मेहनत करतो तरी आम्हाला पोटभर मिळत नाही. त्यात सुनेला आणून तिला काय खायला घालायचे?"
     परंतु, सुनेच्या घरच्यांनी सारखा तगादा लावल्याने शेवटी म्हातार्‍याला तिला घरी आणणे भाग पडले. सूनबाई घरी आली.  इथली गरिबी पाहून ती फार निराश झाली. घरा- अंगणाचा निव्वळ उकिरडा झाला होता. दारात तण माजले होते. तिथेच सहा चुली मांडल्या होत्या. ते सगळे आपापल्या हिश्शातले चने स्वतः भाजत, कारण दुसर्‍याला आपल्या हिश्शातले जाऊन नये.
     सूनबाईने म्हातारा आणि त्याची मुले जंगलात गेल्यावर सारे अंगण झाडून स्वच्छ केले. गवत-बिवत काढून टाकले. झोपडी झाडून - सावरून लख्ख केली. एक चूल ठेऊन बाकीच्या चुली  तोडून टाकल्या. म्हातारा आणि मुले परत आली तेव्हा घराची साफसफाई पाहून खूश झाले. पण चुली तोडलेल्या पाहून ते संतापले. सगळे ओरडले," चने एका चुलीवर भाजायला किती वेळ लागतो माहित आहे का? तो पर्यंत आम्ही भुकेने मरून जाऊ."
     सूनबाई समजावत म्हणाली," स्वयंपाक मी बनवीन. त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. तुम्ही सगळे जाऊन त्या तलावावर अंघोळ करून या. तोपर्यंत जेवण तयार होईल."
     नाईलाजाने चने तिच्या हातात देऊन सगळे तलावावर अंघोळीला गेले. ते क्वचितच कधी सणावाराला अंघोळ करीत. त्यांना उशीर झाला. तिकडे सूनबाईने चने भाजले आणि शेजारणीच्या जात्यावर दळून आणले. त्याचा सातू बनवला.
     म्हातारा आणि मुलगे घरी परतले, तेव्हा सूनबाईने त्यांच्या पानांवर सातू वाढला. भाजलेल्या चन्याच्या जागी सातू पाहून  त्यांना आनंद झाला. पाण्यात सातू मिसळून ते  तिखट्-मिठासह खाल्ल्याने त्यांना त्याची चव फार छान लागली. ते रोज जितके चने फस्त करायचे, त्याच्या निम्मेही ते सातू खाऊ शकले नाहीत. त्यांचे पोट भरले.
 राहिलेला सातू तिने ठेऊन दिला आणि सकाळी पुन्हा खायला दिला. त्यातूनही थोडा सातू शिल्लक राहिला.  दुसर्‍यादिवशी सगळे काम करून आल्यावर त्यांना लगेच खायला मिळाले. कारण सातू तयार होता. त्या दिवशी रोजगारातून  मिळालेल्या चने सूनबाईने दळून आणले.
     तिसर्‍यादिवशी तिने आजूबाजूच्या शेतातून भाजीपाला तोडून आणला. चन्याचे पीठ मळून त्याच्या भाकर्‍या बनवल्या. भाजी बनवली. मग काय त्यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. सगळ्यांनी मनसोक्त भाजी-भाकरी खाल्ली.
     दुसर्‍यादिवशी कामावर जाताना सूनबाईने म्हातार्‍याला विचारले," दररोज तुम्हाला राजाच्या भांडारातून  फक्त चनेच मिळतात का?" म्हातारा म्हणाला," नाही. आम्हाला कुठलंही शेरभर धान्य मिळू शकत. पण आम्ही आमच्या सोयीसाठी चने आणतो."
     सूनबाई म्हणाली," तर मग आज तुम्ही निम्मे धान्य आणि निम्मे चने घेऊन या." संध्याकाळी येताना त्यांनी साळी आणि चने आणले तेव्हा सूनबाईने शेजार्‍यांकडील ऊखळीत साळीचा भात  कुटून घेतला. त्याचा भात बनवला. आणि त्यांना भाताबरोबर बेसनाची कढी वाढली. भात-कढी खाऊन सगळे तृप्त झाले. त्यांना सूनबाई देवीसमान वाटू लागली. रोज नवनवीन पदार्थ खायला मिळाल्याने त्यांच्या तब्येतीतही सुधारणा होऊ लागली.            
     त्यांना वाटत होते की, सूनबाई आल्यावर आपल्याच पोटावर गदा येईल. आपल्या हिश्श्याचे खाईल आणि आपल्याला उपाशी ठेवले. पण झाले उलटेच. घरसुद्धा साफ-सुतरे राहू लागले. आणि तिच्या भीतीने सगळे रोज अंघोळ करून टापटिप राहू लागले.
     सूनबाई कधी कधी मसूर, कधी साळी तर कधी गहू आदी मागवत असे. आणि रोज त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालत असे. कधी भाजी- भाकरी, कधी डाळ्-भात तर कधी कढी-भात. आयुष्यात पहिल्यांदा त्यांना चांगल्या ढंगाचं जेवण मिळू लागले.  ते खूप आनंदी होते.  सूनबाईच्या सांगण्यावरून  ते आता रोज घरासाठीही  लाकडे तोडून आणू लागले. सूनबाई उरलेली लाकडे एकत्रित करत असे. ते आठवड्यातून एकदा बाजारात जाऊन विकत असे आणि त्यातून तेल, तिखट-मीठ आणत असे. हळूहळू तिने काही भांडी, ऊखळ, जाते. पाटा-वरवंटा आदी वस्तू खरेदी करून आणल्या. बघता-बघता घर समृद्धी आली.
     सूनबाई  रोज थोडे थोडे धान्य बाजूला काढून ठेवत होती. एक दिवस ती म्हातार्‍याला म्हणाली," मामंजी, तुमचं वय झालं आहे,  आता हे लाकडे तोडायचे काम बंद करा."
     त्यावर म्हातारा म्हणाला," मग सगळ्यांची पोटे कसे भरणार?"
     "तुम्ही धान्याच्या दुकानावर बसत जा." सूनबाई म्हणाली.  म्हातारा आश्चर्याने म्हणाला,"  दुकान थाटण्याएवढी पुंजी माझ्याकडे कुठे आहे?"
     सूनबाई म्हणाली," मी बरेच धान्य जमा  केले आहे. तेच बाजारात जाऊन विका."
     म्हातार्‍याला गोष्ट पटली. गावात एका कोपर्‍याला  रोज बाजार लागत असे.  तोही तिथे एका झाडाखाली बसून भात, गहू, चने, ज्वारी, वाटाणा, लाकूडफाटा आदी चिजा लावून विकू लागला. रोज चांगली विक्री होऊ लागली. घराच्या समृद्धीत आणखी भर पडू लागली. आता ते सूनबाईची प्रत्येक गोष्ट वेदासमान मानू लागले.
     एकदा राजाच्या खजिन्याची चोरी झाली. चोरांनी खुपसे धनहिरे-जवाहार लुटले.  चोरी करून जंगलात पळून जाण्याचा त्यांचा इरादा होता. जाताना म्हातार्‍याच्या गावात आले. गावाबाहेर असलेल्या म्हातार्‍याच्या झोपडीत एकटी महिला पाहून ते झोपडीत शिरले. तिला धमकावत म्हणाले," खबरदार, जर आरडाओरडा केलीस तर! गप्प राहा, नाही तर इथेच मारून टाकू. आम्हाला भूक लागली आहे. भोजन बनवून दे, आम्ही तुला बक्षीस देऊ आणि निघू जाऊ."
     सूनबाईने मुकाट्याने भात कढी, भाजी बनवली. तिने भाजीच्या बहाण्याने  पुष्कळशी  धोतर्‍याची फुले तोडून आणली. ती तिने भाजीत मिसळली.  एकटी महिला  काय प्रतिकार करणार? असे वाटल्याने दरोडेखोर बिनधास्त होते.  त्यांना भूक लागल्याने ते भरपेट जेवले. जेवणही स्वादिष्ट झाले होते. मात्र  धोतर्‍याच्या नशेमुळे ते तिथेच कोसळले. सूनबाईने सगळ्यांचे हातपाय करकचून बांधले. घराला कुलूप लावले आणि धावत धावत राजाच्या महालात गेली. ओरडून तिने राज्याचे लक्ष  वेधून घेतले आणि सगळा प्रकार राजाला सांगितला.
     राजा स्वतः सैन्यासह म्हातार्‍याच्या घरी आला. दरोडेखोर अजूनही नशेत धूत पडले होते. सगळ्यांना सैनिकांनी ताब्यात घेतले.  आपल्या खजिन्यातला माल सुरक्षित पाहून राजा खूश झाला. त्याने सुनेचे कौतुक करीत तिला एक किंमती हार बक्षीस  दिला. पण सूनबाई हात जोडून  म्हणाली,"महाराज,  हा किंमती हार घेऊन मी काय करू. याबदल्यात मला थोडी फार जमीन द्या. त्यावर आम्ही राबून खाऊ."
     राजाला सूनबाईचे मोठे कौतुक वाटले. त्याने तिला दहा एकर जमीन लिहून देण्याचा आदेश गावच्या प्रमुखाला दिला. शंभर मोहराही बक्षीस म्हणून दिल्या. शिवाय तिच्या नवर्‍याला दरबारात नोकरीही दिली. आणि मग पकडलेले दरोडेखोर आणि खजिना घेऊन तो सैन्यासह निघून गेला. सगळा प्रकार पाहून अचंबित झालेला म्हातारा आपल्या सुनेला  हात जोडून म्हणाला," सूनबाई, तू माझी फक्त सून नाहीस तर माझ्या या घराची साक्षात   लक्ष्मी आहेस."                                                                                            

Thursday, August 16, 2012

बालकथा अस्वलाचे पिलू

"बाबा, मी बागेत झोपाळा खेळायला जाऊ?" अस्वलाचे पिलू अस्वलाला म्हणाले.
" नको रे, बघ अजून किती ऊन पडलं आहे आणि बागेत कुणी आलंही नसेल्.कुणी आलं की जा." अस्वल म्हणाले. पिलू हिरमुसले.
इतक्यात त्याला बागेच्या भिंतीवर बछडे दिसले. त्याला अत्यानंद झाला. त्या आनंदाच ओरडला. " बाबा, ते बघा बागेच्या भींतीवर !" अस्वलाच्या पिलाने अस्वलाला तिकडे पाहायला सांगितले.
"ठिकाय, जा" अस्वल म्हणाले.
तसा तो उड्या मारतच पळाला. त्याला पळत जाऊन झोपाळा पकडायचा होता. कारण बछड्यांनी झोपाळे पटकावले की त्याला लवकर खेळायला संधी मिळणार नव्हती. तो धावतच बागेत गेला. आणि पटकन एका झोपाळ्यावर जाऊन बसला. तो मजेत झोके घेऊ लागला, तोच तिथे वाघाचे चार बछडे आले. त्यातला सगळ्यात मोठा बछडा म्हणाला," आम्हाला झोके घ्यायचे आहेत."
" मग त्यावर घ्या की" अस्वलाच्या पिलाने दुसर्‍या झोपाळ्याकडे इशारा करत म्हटले. बागेत दोन झोपाळे होते.
" दिसत नाही का, आम्ही चौघेजण आहोत ते!" मधला बछडा रागात गुरगुरला.
" तुम्ही चार असा नाही तर पाच. मला काय त्याचे! त्यावर बारी बारीने खेळा" अस्वलाचे पिलू झोका घेत बेफिकिरीने म्हणाले.
" आम्ही चौघांनी एका झोपाळ्यावर आणि तू मात्र एकटा एका झोपाळ्यावर मजेत खेळणार. ते काही नाही. खाली उतर आधी." असे म्हणत सगळ्यात बारक्या बछड्याने जमिनीवरची माती उचलली आणि अस्वलाच्या पिलावर फेकली.
"ए... ए... माती  का फेकतोयस माझ्यावर..?" पिलू रागाने म्हणाले.
इतक्यात वाघाच्या एका बछडयाने दगड उचलून पिलावर फेकत म्हटले," तू तर इथे सारखा खेळायला येतोस, आम्ही मात्र फक्त सुट्टीच्या दिवशी येतो. उतर बघू आधी."
"मीही काही सारखा इथे येत नाही. सुट्टी असल्यावरच येतो." पिलू म्हणाले.
तू असा ऐकणार नाहीस." असे म्हणत चौघेही त्याच्याभोवती गोळा झाले. अस्वलाच्या पिलाने पटकन झोपाळ्यावरून उडी मारली व  त्यांच्या कोंडाळ्यातून बाहेर आला. आणि आपल्या वडिलांना हाक मारू लागला." बाबा, बाबा"
तिकडे लांब एका इमारतीच्या गच्चीवर पिलाचे बाबा काही तरी शोधत होते. ते त्याच्याकडे पाहात म्हणाले, " काय रे, काय झाले? ये बघू इकडे."
चारही बछड्यांनी पाहिलं. तिथे खरोखरच एक अस्वल उभे होते. त्यांना वेगळंच ऐकू आलं." काय रे काय झालं? थांब! आत्ता आलो."
ऐकल्यावर झोपाळ्याजवळ गेलेला छोटा बछडा पटकन बाजूला जाऊन उभा राहिला.
अस्वलाचे पिलू पुन्हा म्हणाले," बाबा, जरा इकडे या."
अस्वल म्हणाले,' अरे, मी इथे कामात आहे. तूच इकडे ये."
वाघाच्या बछड्यांनी ऐकलं," तू तिथेच थांब, मी तिकडे आलोच."
आता तिघे बछडे छोट्या बछड्याजवळ जाऊन उभे राहिले.तिथे अस्वल अजून उभे होते. पण इकडे या चौघांनी धूम ठोकली. पडत्-झडत कसे तरी ते भींतीवर चढले. आणि उडी मारून पसार झाले.
अस्वलाचे पिलू आता एकटेच झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागले. एकदा या झोक्यावर तर एकदा त्या झोक्यावर. एकदम त्याच्या डोक्यात आले, वाघाच्या बछड्यांनी आपल्या आई- वडिलांना बोलावून आणले तर...!'
आता त्याला खेळायचा कंटाळा आला. 'दोन्ही झोपाळ्यावर मी एकटा तरी किती झोके घेणार? 'असे म्हणत  तेही तेथून पळत सुटले. त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 
          

Wednesday, August 15, 2012

खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याची गरज

     लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदकांची कमाई करून आम्ही आजपर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली असली तरी खेळांच्या पदकांची तालिका आपल्याला आपल्या कमकुवतपणाची जाणीव करून देते. त्यामुळे या स्पर्धेत  डावाला लागलेल्या तीनशेपेक्षा अधिक सुवर्ण पदकांपैकी एकही सुवर्ण पदक आपल्याला मिळू शकले नाही, याची शरम वाटल्याशिवाय राहत नाही. एकशे एकवीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला एकही सुवर्ण पदक जिंकता येत नाही, यावरून आपल्या देशात क्रीडा क्षेत्र किती गांभिर्याने घेतले जाते, याचीच साक्ष पटते. भारताला रुपेरी पदक जिंकून देणारा सुशिलकुमार असो अथवा विजयकुमार किंवा कास्यपदक मिळवून देणारे गगन नारंग, सायना नेहवाल, योगेश्वर दत्त व मेरीकोम या सगळ्यांनी आपल्या स्वतः च्या हिंमतीवर ही पदके जिंकली आहेत. यात आपल्या सरकारचा किंवा क्रीडा संघांचा काडीमात्र संबंध नाही. आणि जो काही असेल, तो कागदी संबंधापुरता मर्यादित असेल.
     प्रत्येक ऑलिम्पिकच्या समारोपाला हमखास आश्वासन दिले जाते की, पुढच्या खेपेला आम्ही चांगले प्रदर्शन करू. आणि ही आश्वासने केवळ प्रसारमाध्यमांपुरते मर्यादित असतात आणि पुढे राहतातही. ऑलिम्पिक खेळात आठ वेळा सुवर्णपदक मिळवून देणार्‍या हॉकीने या खेपेला कमालीची निराशा केली. या खेपेला त्यांनी एकही सामना न जिंकण्याचा विक्रम आपल्या खात्यावर नोंदवला आहे. कालपरवापर्यंत आपण याच हॉकीला 'राष्ट्रीय खेळ' या नावाने संबोधत होतो आणि त्याच्या सुवर्णकाळाच्या गप्पा मारताना आजच्या दुर्दशेविषयी गळा काढत होतो, परंतु, केंद्र सरकार या हॉकी खेळाला आपला 'राष्ट्रीय खेळ'च मानायला तयार  नाहीत्यामुळे या खेळाची उरलीसुरली आत्मियताही संपली आहे. ऑलिम्पिकच्या लंडनवारीत हॉकी संघाने भारताच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली असताना केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने हॉकी हा खेळ आमचा 'राष्ट्रीय खेळ' नाही, असे एका माहिती अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या अर्जाला उत्तर देऊन या खेळाला दूर कुठे तरी उचलून फेकून दिल्यासारखे करून टाकले आहे. भारताच्यादृष्टीने हा खेळ आता अस्पृश्य वाटायला लागला आहे. एकशे सोळा वर्षाच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात  एक हॉकी सोडला आणि मागील खेपेचा अभिनव बिंद्राचा वैयक्तिक सुवर्ण पदकाचा विषय सोडला तर एवढ्या वर्षात आणि एवढ्या खेळांमध्ये  आपण सुवर्णमय कामगिरी करू शकलेलो नाही, हे आपल्या देशाच्यादृष्टीने किती दुर्दैवी म्हणावे लागेल.  मात्र याच वेळेला दुसर्‍या बाजूला अमेरिकेचा मायकल फेल्पससारख्या खेळाडू आपल्या देशासाठी तब्बल अठरा सुवर्ण पदकांची कमाई करतो आहे. तर जमैका आणि क्यूबासारख्या छोट्या छोट्या देशांतील खेळाडूंनी चार चार सुवर्णपदके जिंकून  सव्वा अब्ज लोकसंख्येच्या भारताला आपली लायकी कळवून देण्याचाच हा प्रकार आहे.
      जगात लोकसंख्येच्यादृष्टीने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेत पंचावन्नाव्या क्रमांकावर नाव यावेहा भारताच्यादृष्टीने खरे तर चिंतेचा विषय आहे. दीर्घकाळ ऑलिम्पिक खेळापासून दूर राहिलेल्या चीनने गेल्या काही ऑलिम्पिकमधून धूमधडाक्यात सुरुवात करत अमेरिकेलाही जबरदस्त धक्का दिला आहे. चीनच्या आश्चर्यकारक कामगिरीमुळे अमेरिकेची काळजी वाढली आहे. गेल्या खेपेला अमेरिकेला दुसर्‍या क्रमांकावर फेकणार्‍या चीनने यावेळेलाही अमेरिकेशी चांगलीच टक्कर दिली आहे. जगातले छोटे छोटे देश सहज चार-पाच सुवर्ण पदकाची कमाई करून जातात. मात्र सव्वाशे कोटीचा भारत देश केवळ सहा रजत आणि ब्रांझ पदकांवर समाधान मानतो, याचा कुठे तरी विचार झाला पाहिजे. याचा अर्थ सरळ आहे, आपण खेळाला सन्मानाचे स्थान कधी दिलेच नाही. ना खेळाला प्रोत्साहन दिले ना खेळाडूंना चांगली वागणूक. एक क्रिकेट सोडला तर अन्य खेळाला आपण तुच्छतेचीच वागणूक दिली आहे. 
 खरे तर आपल्या देशाची सभ्यता जितकी प्राचीन आहे, तितकी आपली क्रीडा परंपरा आहे. तीरंदाजी, तलवारबाजी, कब्बड्डी, खो खो सारखे खेळ आपल्या ऐतिहासिक, प्राचीन  खेळाची साक्ष देतात. हॉकी तर एक असा खेळ होता की, ज्यात ऑलिम्पिकच्या इतिहासात आमचा बोलबाला आणि दबदबा होता. पण खेळाकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिलेच नाही. जीवन जगण्याचे साधन म्हणून खेळाचा कधी विचार केला नाही, हेही तितकेच खरे आहे. 'शिकला-सवरलास तर होशील नवाब...हाच कित्ता आम्ही गिरवत आलो आहोत.  त्यामुळे घराघरात 'कुठे चाललास खेळायला, चल मुकाट्याने अभ्यास करत बस' असा मुलांना दरडवण्याचा आवाज येत राहिला. मात्र अलिकडच्या काळात थोडी फार परिस्थिती बदलली आहे. खेळाविषयीचा पालकांचा दृष्टीकोण बदलला आहे. शालेय स्तरावरही  खेळाची दखल घेतली जाऊ लागली आहे. पण अजूनही म्हणावे असे लक्ष अथवा प्रोत्साहन मिळत नाही. सरकार द्यायला हवे, तितके लक्ष देत नाही. खेळाला जगण्याचा हिस्सा बनवायला हवा. तरच परिस्थिती बदलणार आहे.  
     स्थानिक स्तरावरसुद्धा राज्य सरकारे, स्थानिक संस्था, विविध संघटना यांनीही खेळाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे खेळ मशहूर आहेत. गोवा आणि कोलकाता येथे फुटबॉलची धूम आहे. तर हरियाणा, पंजाब, केरळसारख्या राज्यात ऍथलेटिक्सवर भर दिला जातो. क्रिकेटची तर जादू पुर्‍या भारत वर्षात आहे. पण आपण आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे काम करतो का? हा प्रश्न आहे. एक क्रिकेट सोडला तर अन्य खेळाच्याबाबतीत नकारात्मकताच आढळून येत आहे. त्यामुळेच लंडन ऑलिम्पिकमध्ये आमच्या खेळांडूंनी या खेपेला सगळ्यात जास्त पदकांची कमाई केली, तरीही फटाक्यांचा आवाज, क्रिकेटसारखा गुंजला नाही. आपल्या देशी खेळांना जितका वाव द्यायला हवा, जितके कौतुक व्हायला हवे, तितके आपण करत नाही. शाळा, गल्लीत खेळ वाढला पाहिजे, रुजला पाहिजे, तरच तो राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचेल. आपण आपल्या खेळांना प्रोत्साहन दिल्याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व येणार नाही. चीनसारख्या देशाने पाठपुरावा करून आपले देशी खेळ ऑलिम्पिकमध्ये पाठविले. आपण मात्र आहे तिथेच आहोत. ही उदासिनता टाळायला हवी.
      आणखी एक गोष्ट अशी की, अलिकडे झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार आम्ही खेळाच्याबाबतीत किती गंभीर आहोत आणि आपल्या खेळाडूंचा हौसला वाढवण्याबाबतीत किती मागे आहोत, याची कल्पना  स्पष्ट होते. आपण भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करायला का कचरतो, कळायला मार्ग नाही. जोपर्यंत विजय मिळत असतो, तोपर्यंत टाळ्या मिळतात. पराभव झाला की आपण त्यांच्यावर लागलीच तोंडसुख घ्यायला लागतात. त्यामुळेच २००३ मध्ये एका पराभवानंतर मोहम्मद कैफच्या घरासमोर केवळ निदर्शने झाली नाही तर घरावर हल्लाही झाला. आपल्या देशात क्रिकेटला धर्माप्रमाणे मानलं जातं. मात्र तिथेच दुसर्‍या खेळाच्या खेळाडूचे नावही घेतले जात नाही, नव्हे अशा खेळाडूंची नावेसुद्धा लोकांना माहित नसतातअशी विचित्र परिस्थिती आहे. हा असा आपला इतर खेळांविषयीचा उदासी दृष्टीकोण असेल तर आपला देश कसा बरे विश्व चॅम्पियन होणार?
     खेळ हा शेवटी खेळ मानला पाहिजे. कारण त्यात जयपराजय ठरलेला असतो. यात आपली भूमिका फक्त एकच राहणार आहे, ती म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची! एक देश, एक आवाज आणि एक आत्मा बनून आपण खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळाडूंना जिंकण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करूनही  पराभव स्वीकारावा लागतो, असे झाले तरी आपण  त्यांना साथ द्यायला हवी. आपल्याला प्रत्येक खेळात विश्व चॅम्पियन बनयचं आहे.  प्रयत्नांना यशाची जोड द्यायची आहे. त्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, हौसला वाढविला पाहिजे. आपले प्रोत्साहन त्यांना प्रेरणा देईल आणि नक्की आपला देश क्रीडा क्षेत्रात विश्व चॅम्पियन बनेल.
     भारताला क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करायचा असेल खेळनीती अवलंबली गेली पाहिजे.  त्यासाठी पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे. देशी खेळांना वाव देण्याच्या, त्याच्या प्रसार वाढीच्यादृष्टीकोनातून प्रयत्न करायला हवेत. केवळ अधिकार्‍यांना किंवा खेळ संघटनांच्या प्रमुखांना पुढे आणण्यापेक्षा खेळाडूंना  पुढे आणून सुधारणेवर भर दिला गेला पाहिजे. तरच पुढच्या येणार्‍या काही वर्षात आपण पहिल्या दहात पोहचू शकू.  

Sunday, August 12, 2012

साठ वर्षात आम्ही काय कमावलं, काय गमावलं

      मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि १५ ऑगस्ट १९४७ च्या दिवसाची सुरुवात झाली.  भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला. त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या. आपण एका नव्या स्वतंत्र भारतात पाऊल ठेवले. पण स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता. देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे एक प्रकारची उदासी पसरली होती. पण तरीही आम्हाला आशा आणि महत्त्वाकांक्षा होती, ती म्हणजे आमचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक भविष्य स्वतः घडविण्याची. लोकशाही राज्यात ते शक्य वाटत होते. आता आपण याच महत्त्वाकांक्षेसोबत पन्नास साठ  वर्षाचा एक टप्पा पार केला आहे. आज आपण जी प्रगती साधली आहे, त्याची बिजे त्या दशकात रोवली गेली होती. हे लक्षात घ्यायला हवे. या कालावधीत आपल्याला बरेच क्लेशदायक, दु:खदायक घटनांना सामोरे जावे लागले. त्याचबरोबर  काही आनंददायी, यशदायी घटनाही वाट्याला आल्या. याचा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संक्षिप्त लेखाजोखा...
१९४७ ते १९६० 
भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने १९४७ साली सुरू केले. या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारखे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते तर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅ. जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित; तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यांसारख्या कर्तबगार महिलाही होत्या. संविधान समितीने तयार केलेले संविधान २६ जानेवारी, १९५० रोजी अमलात आले. आणि अशा प्रकारे आपला भारत देश प्रजासत्ताक बनला.  ब्रिटिश साम्राज्यवादाविरुध्द लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनण्याचा मान डॉ. राजेंद्र प्रसाद यांना मिळाला. क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी १९५१ मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या. १९५० मध्ये योजना आयोग आणि निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. १९५१ मध्ये पाणी आडविण्यावर भर देणारी आणि सिंचनाला प्राधान्य देणारी पहिली पंचवार्षिक योजना राबवण्याला सुरुवात झाली. याच वर्षी पहिल्यांदा सार्वजनिक निवड्णुका घेण्यात आल्या. भारताला टेक्नॉलॉजी क्षेत्रात पुढे आणण्याच्या उद्देशाने पश्चिम बंगालमधील खडगपूर येथे पहिली इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्था स्थापन करण्यात आली. १९५५ मध्ये भाखरा धरणाच्या कामाला प्रारंभ झाला. ५० च्या दशकात हिंदू विवाह अधिनियम लागू  करण्यात आला. यावरून बराच गदारोळ झाला.
१९६० ते १९७०
या दशकात देशाला अनेक जबरदस्त धक्के मिळाले. भारताचे पहिल्यांदा चीनशी १९६२ मध्ये तर १९६५ मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाले. पंडित नेहरू ( १९६४) आणि लालबहाद्दूर शास्त्री (१९६६)  या दोन महान नेत्यांना आपल्याला गमवावे लागले. तरीही 'भारत निर्माण' साठी मैलाचा दगड ठरावेत, असे प्रयत्न याच दशकात झाले. १९६३ मध्ये डॉ. नॉर्मन बॉरलॉग  यांनी गव्हाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नव्या हायब्रीड जातीचे वाण उपयोगात आणले. याचबरोबर डॉ. एस. एम. स्वामीनाथन यांनी खताच्या वापरास प्रोत्साहन दिले. या दोघांच्या प्रयत्नाने आणि सिंचन व्यवस्थेमुळे हरित क्रांतिला चालना मिळाली. याच दशकात मन्सूर अली खाँ पतौडी यांनी भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळली. (१९६२) व संघात जिंकण्याची मानसिकता विकसित केली. 'आन' चित्रपटाद्वारा हिंदी सिनेमा रंगीत झाला. आणि 'संगम' 'जंगली' पर्यंत तो ईस्टमन कलर बनला. रिटा फारिया ही १९६५ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकवणारी पहिली भारतीय महिला ठरली. याच दरम्यान पश्चिम बंगालमधून नक्षलवाद्यांच्या आंदोलनाला ( १९६७) सुरुवात झाली. १९६९ मध्ये भारत सरकारने १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
१९७० ते १९८०
     सत्तरच्या दशकाची सुरुवातीलाच भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानला १९७५ च्या युद्धात पराभूत केले. सिमला करार (१९७२), पोखरण अणू परीक्षण (१९७४), भारताच्या पहिल्या आर्यभट्ट सॅटेलाइट उपग्रहाचे प्रक्षेपण अशा महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पण १९७५ मध्ये आणीबाणी लादली गेली.   
१९८० ते १९९०
     ऐंशीचे दशक आशियाई खेळ ( १९८२) आणि क्रिकेट विश्वकप (१९८३) यासाठी विशेषत्वाने संस्मरणात राहिले. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांची हत्या, रंगीत दूरदर्शनवर मालिकांचा प्रारंभ आणि राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड आदी उल्लेखनीय घटना म्हणाव्या लागतील. राकेश शर्माच्या रुपाने पहिल्यांदा एक भारतीय अवकाशात पोहोचला. कॉम्प्युटरसुद्धा कार्यालयांमध्ये दिसू लागले.
१९९० ते २०००
या दशकाची सुरुवात मंडल आयोग व आयोध्या आंदोलनाच्या हिंसेने आणि राजीव गांधी यांच्या हत्येने ( १९९१)  झाली. या दशकात केबल टीव्ही, आर्थिक सुधारणा कार्यक्रम आणि सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. सॅटेलाइट टेलिव्हिजनचा नवा जमाना सुरू झाला. सुष्मिता सेन मिस युनिवर्स तर ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड बनली. याच दरम्यान पोखरणमध्ये पुन्हा एकदा अणूस्फोट (१९९८) घडवून आणला गेला. आणि १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानला कारगील युद्धात धूळ चारली.  
२००० ते आतापर्यंत
     २००० ची सुरुवात प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड, लारा दत्ता मिस युनिवर्स, दीया मिर्झा मिस एशिया पॅसेफिक आणि आदीती गोवारीकर मिसेज वर्ल्ड या ग्लॅमर जगतातल्या सौंदर्यवती ललना ठरल्या. पण भारतीय संसदेवरील हल्ला (२००१), गुजरात दंगल (२००२), सुनामी(२००४), मुंबई हल्ला ( २००८) सारख्या काळ्याकुट्ट घटना घडल्या. हे दशक रक्तरंजित दशक म्हणून ओळखले जाईल. मात्र याच दशकात भारताने आयटीसह अन्य क्षेत्रात पुर्‍या विश्वभरात आपला दबदबा निर्मान केला. २०१० मध्ये भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेचे नेटके संयोजन केले. अभिनव बिंद्राने देशासाठी पहिले वैयक्तिक गटात बिजिंगच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. आणि २०११ मध्ये भारताने पुन्हा एकदा क्रिकेट विश्व कपवर आपले नाव कोरले.
     एकूण काय तर या साडेसहा दशकांच्या स्वतंत्र भारताच्या या वाटचालीत आम्हाला बर्‍याच जखमांनी घायाळ केले असले तरी आम्ही बरेच काही मिळवलेही आहे. उतुंग भरारी घेतली आहे.