Saturday, August 4, 2012

प्रा. अशोक सेन यांच्या सन्मानाने भारतीय विज्ञानाला उत्तेजन

   
      भारतीय थियरिटिकल फिजिसिस्ट प्रा. अशोक सेन यांचा भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या जगातील सर्वात मोठ्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले, ही गोष्ट भारतीय विज्ञानासाठी एक सुवर्ण क्षण म्हटला पाहिजे.या पारितोषिकामुळे केवळ आपल्या देशाचाच गौरव वाढला आहे, असे नव्हे तर भारतीय संशोधकांमध्ये उत्तेजन मिळण्यासही मदत होणार आहे. आतापर्यंत भारतीय शास्त्रज्ञांनी विविध क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे, मात्र या  कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच उपेक्षा केली गेली आहे. काही अपवाद सोडले तर त्यांच्याबाबतीत दुराग्रही व्यवहार करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ज्यावेळेला 'गॉड पार्टिकल' किंवा 'हिग्स बोसोन' कणाच्या शोधाची घोषणा झाली, त्यावेळेला पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी मोठी हाकाटी मारत  ब्रिटिश फिजिस्ट पीटर हिग्स यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी केली होती. पण कोणीही भारतीय भौतिकशास्त्रज्ञ  प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. वास्तविकया नोबेल पुरस्काराचे हकदार प्रा. बोसच आहेत. त्यांच्या मूलभूत कार्यामुळे  तर 'गॉड पार्टिकल'च्या शोधाचा मार्ग सापडला होता. या मूळ ब्रम्हांडीय कणाच्या नावाचा एक हिस्सा 'बोसोन' हा प्रा. बोस यांच्या नावाशी जोडला गेलेला आहे. दुर्दैवाने प्रा. बोस आपल्या जीवनकाळात नोबेलपासून वंचित राहिले आणि आम्हीसुद्धा त्यांचा योग्य तो आदर- सन्मान करू शकलो नाही. अशा वातावरणात प्रा. अशोक सेन यांना मिळालेला आंतरराष्ट्रीय सन्मान विशेष महत्त्वाचा आहे. उशिराने का होईना पण जग  विज्ञान क्षेत्रात लपलेल्या भारतीय प्रतिभेला ओळखू लागले आहे, असेच म्हणायला हवे.
     प्रा. सेन अलाहाबादच्या हरीश्चंद्र संशोधन संस्थेशी संबंधित असलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते बर्‍याच वर्षांपासून मूलभूत भौतिक क्षेत्रावर महत्त्वपूर्ण असे काम करीत आहेत. त्यांना  युरी मिलनर फंडामेंटल फिजिक्स पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार त्यांना स्ट्रिंग थियरीवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन देण्यात आला आहे. त्यांना पुरस्काराच्या रुपाने ३० लाख डॉलर म्हणजे १६. ७ कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम नोबेल पुरस्काराच्या रकमेपेक्षाही जवळ्जवळ तिप्पट आहे. प्रा. सेन यांच्याशिवाय जगातल्या आठ आणखी शास्त्रज्ञांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार रशियन अब्जोपती युरी मिलनर याने सुरू केला आहे. याने फेसबूक आणि ग्रुपनसारख्या इंटरनेटवर आधारलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून अब्जावधी डॉलर कमावले आहेत. मिलनरने आपली फिजिक्सची पीएचडी अर्ध्यावरच सोडून हा व्यवसाय सुरू केला होता. यावेळेला पुरस्कारांसाठीच्या निवडी त्याने स्वतःच केल्या आहेत. पण पुढील वर्षांपासून आताचे पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ पुरस्कारांच्या निवडी करणार आहेत. 
     फंडामेंटल फिजिक्स अथवा मूलभूत भौतिक खूपच गुढ आणि किचकट असे विज्ञान आहे. पण या गुढ विज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय निसर्गातले मूलभूत नियम समझून घेता येत नाहीत. प्रा. सेन ज्या स्ट्रिंग थियरीवर काम करत आहेततो एक जटील गणितीय सिद्धांत आहे. याद्वारे गुरुत्वाकर्षणसारख्या ब्रम्हांडातल्या बलीय रहस्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न चालला आहे. प्रा. सेन यांचे हे कार्य काही लोकांना क्रांतिकारी वाटतात, तर काही लोकांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मूलभूत भौतिकशास्त्रातील संशोधकांच्या कामगिरीला मान्यता आणि सन्मान मिळावा, हे मिलनरचे ध्येय आहे.  या पुरस्कारांमुळे फंडामेंटल फिजिक्सच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या आणि भविष्यात या क्षेत्रात योगदान देऊ इच्छिणार्‍या शास्त्रज्ञांना उत्तेजन मिळण्यास मदत होईल, अशीही त्याला आशा आहे.  
     ५६ वर्षीय प्रा. सेन यांनी विदेशातल्या नावाजलेल्या संस्थांमध्ये अध्ययन केल्यानंतर अनेक आकर्षक प्रलोभनांना लाथाडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा ऍकॅडमिक रेकॉर्ड खूपच शानदार आहे. त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये अध्ययन केल्यानंतर कानपूर येथील आय आय टीमधून मास्टर्सची डिग्री घेतली होती. यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या स्टोनीब्रूकस्थित स्टेट युनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये शिक्षण सुरू ठेवले. पुन्हा ते पोस्ट डॉक्टरेटसाठी फर्मिलॅब आणि स्टेनफर्डला गेले. भारतात आल्यानंतर त्यांनी मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल संशोधन संस्थेत कामाला सुरुवात केली. पुन्हा ते अलाहाबादला गेले. आणि तेव्हापासून ते हरिश्चंद्र संशोधन संस्थेत कार्यरत आहेत. प्रा. सेन यांना कित्येक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २००१ मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले होते. तर १९९४ मध्ये त्यांना एस. एस, भटनागर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १९९८ मध्ये ते रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या फेलोशिपसाठी निवडले गेले होते.
      १९९५ मध्ये मायदेशी परत आले होते, तेव्हा त्यांना इथे थोडा अलिप्तपणा जाणवत होता. पण आता तशी परिस्थिती राहिली नसल्याचे ते आपल्या मुलाखतीत सांगतात. इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध असते. संशोधकांचा गट आणि आमच्या संस्थेतील सहकारी यांचा आता एक उत्तम समन्वय आहे. सैद्धांतिक भौतिकशास्त्राला निधी लागत नाही. त्यामुळे त्यांना पैशाची कधी गरज भासली नाही. शिवाय भारतातील संशोधनाबाबत ते मोठे आशावादी आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाकडे मुलांना आकर्षित करण्यासाठी अनेक विज्ञान संस्था उभारण्याची गरज आहे, असेही ते म्हणतात.
     अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी असलेले प्रा. सेन यांनी अद्याप आपल्याला मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेचे काय करायचे ते ठरवले नाही. त्यांनी आणखी एक कबुली दिली आहे ती म्हणजे या पुरस्काराने माझ्या संशोधनाला मान्यता मिळाली आहे, असे मी मानत नाही. असे असले तरी आपल्याला याचा आनंद झाला. तरुणांनी मूलभूत विज्ञानात रस घ्यावा यासाठी उत्तेजन मिळण्यास हा पुरस्कार महत्त्वाचा वाटतो. पण त्यांनी हेही सांगून टाकलं की युवकांनी केवळ पारितोषिकाच्या ग्लॅमरकडे पाहून विज्ञानाचा स्वीकार करू नये. विज्ञानातून ज्ञानार्जन किती होतं, हे पाहायला हवं.    
  
saamana 8/8/2012                      

No comments:

Post a Comment