एका गावात भोलाराम नावाचा एक शेतकरी राहत होता. नावाप्रमाणेच स्वभावानेही तो भोळाभाबडा होता. त्याच्याजवळ थोडीशी जमीन होती. त्यात जे काही पिकायचं, ते त्याला पुरेसं ठरायचं. गावालगतच जंगल होतं. पीक भरास आलं की माकडं पिकात घुसायची. धुडगूस घालायची. खाऊन फस्त करायची.
माकडं जितकं खायची, त्याहून अधिक नाश करायची. शेतकरी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नानाविध उपाय करायचे. पिकं वाचवायला बघायची. भोलाराम मात्र सगळ्यांपेक्षा वेगळा होता. तो विचार करायचा, माकडांनाही पोटं असतं. आपल्याकडे जमीन्-जुमला आहे, म्हणून आपण काम करतो. बिचार्या माकडांकडे काय आहे? तो माकडांना कधी हुसकावून लावत नसे.एकदा पीक भराला आले होते. त्याच्या रखवलीसाठीच तो एका झाडाखाली बसला होता. बसल्या बसल्या त्याला झोप येऊ लागली. शेवटी तो तिथेच लवंडला. तेवढ्यात माकडांनी पिकावर धाड घातली. सगळ्या शेताची नासधूस केली. माकडांनी भोलारामला झाडाखाली झोपलेलं पाहिलं, तसे सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. त्यातला एकजण म्हणाला," अरे, बिचारा मेला वाटतं." दुसरा म्हणाला," अरे हो रे, चला याला नदीत सोडून येऊ. नाही तर हा मृतदेह सडून जाईल."
सगळ्या माकडांचे या गोष्टीवर एकमत झाले. ते त्याला उचलू लागले., तेवढ्यात एक आवाज आला," नको, त्याला पाण्यात सोडू नका. बिचारा भला माणूस होता. याने आपल्याला कधीच त्रास दिला नाही की कधी शेतात येण्यापासून मज्जाव केला नाही. याने आपल्यासाठी कधी जाळेसुद्धा लावले नाही. याला सोन्याच्या गुहेत नेऊन ठेवू." हा आवाज माकडांच्या सरदाराचा होता.
भोलाराम माकडांचे बोलणे ऐकून खूश झाला. तो डोळे बंद करून तसाच पडून राहिला. माकडांनी त्याला उचलले नी सोन्याच्या गुहेत घेऊन गेले. तिथे गेल्यावर माकडांनी योग्य जागा शोधून त्याची साफसफाई केली आणि तिथे भोलारामला झोपवले. त्याला नमस्कार करून माकडे निघून गेली.
सगळे गेल्यावर भोलाराम उठला. धोतरात जेवढे सोने मावेल, तेवढे घेऊन तो घरी आला. आता तो गावातला सर्वात श्रीमंत माणूस बनला. त्याच्या शेजारी एक व्यापारी राहत होता. तो फार दुष्ट होता. त्याने भोलारामला विश्वासात घेऊन श्रीमंतीचे रहस्य जाणून घेतले. भोलारामने खरे काय ते सगळे सांगून टाकले.
आता तो माकडांची वाटपाहू लागला. आणि एक दिवस माकडांची झुंद त्याच्या पिकावर चालून आली. व्यापारी झाडाखाली मेल्याचे सोंग घेऊन पडला. माकडे त्याच्याजवळ आली. त्यांना तो मेला असल्याचे वाटले. त्यातला एकजण म्हणाला," बरं झालं, हा दुष्ट मेला तो! चला, याला जंगलात फेकून येऊ." ते त्याला उचलून जंगलात घेऊन जाऊ लागले. इतक्यात तिथे त्यांचा सरदार आला. तो म्हणाला," याने आपल्याला खूप त्रास दिला आहे. याला सोन्याच्या गुहेत घेऊन जायला नको. त्यापेक्षा चांदीच्या गुहेत फेकून या."
व्यापारी सोन्याच्या गुहेचे स्वप्न पाहात होता. चांदीचा विषय निघाल्यावर तो विचार करू लागला,' कुठे सोने आणि कुठे चांदी! आपल्याला चांदी घेऊन करायचे काय?' तो पटकन उठला आणि म्हणाला," मलासुद्धा सोन्याच्या गुहेत घेऊन चला." मेलेल्या माणसाला हलता - बोलताना पाहून माकडे घाबरली. आणि त्यांनी त्याला तिथेच टाकून धूम ठोकली. बिचार्याला सोन्याच्या मोहापायी चांदीवरही पाणी सोडावं लागलं.
No comments:
Post a Comment