Tuesday, July 24, 2012

विज्ञान क्षेत्रातली पीछेहाट चिंताजनक

     शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या दृष्टीने हिंदुस्थान जगात तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत तो बराच मागासलेला आहे. स्वत: पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विज्ञान कॉंग्रेसच्या ९९ व्या अधिवेशनात चीनने हिंदुस्थानला या क्षेत्रात मागे टाकल्याच्या पार्श्‍वभूमीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विज्ञान संशोधनावरचा खर्च एक टक्क्यावरून दोन टक्क्यांवर नेण्याचा मनोदयही जाहीर केला आहे. पण केवळ खर्च वाढविल्याने देशातला विज्ञान विकास साधला जाणार नाही. यासाठी देशात विज्ञान शोध आणि आविष्काराचा माहोल बनविण्याची आवश्यकता आहे. रसायनात संयुक्तरीत्या नोबेल मिळविलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या शास्त्रज्ञांनी- वेंकटरमण रामकृष्णन- यांनी दोन वर्षांपूर्वी दिले हेाते. ते म्हणाले होते की, ‘हिंदुस्थानी शास्त्रज्ञांना लालफीतशाहीच्या जाचातून मुक्ती आणि अधिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. देशातल्या वैज्ञानिक संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये नेमकं काय चाललं आहे हे पाहण्याचीही गरज आहे आणि जबाबदारी शासनाची आहे.
     देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि डॉ. होमीभाभा यांनी एक स्वप्न पाहिले होते, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खाद्यान्न आणि औद्योगिक उत्पादन वाढवून देशाला स्वावलंबी बनवू शकतो. या दोघांच्या प्रयत्नांमुळे आज आमच्याजवळ तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या विकासासाठी आधारभूत ढाचा तयार आहे. अवकाश, अणुऊर्जा क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय आहे. पण जगाला अभिमानाने सांगण्याइतका नवा मौलिक शोध किंवा आविष्कार आपल्याजवळ नाही. शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या संख्येच्या हिशेबाने हिंदुस्थान जगात तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. पण आपल्याकडे असलेले विज्ञान साहित्य पश्‍चिमी देशाच्या शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वानेच भरलेले आहे. त्यात एकाही हिंदुस्थानीचे नाव दिसून येत नाही. आपल्या देशात आजच्या घडीला एखादे रमण, खुराणा का निर्माण झाले नाहीत किंवा होत नाहीत?
     आपल्या प्राचीन देशाने जगाला बरेच काही भरभरून दिले आहे. अगदी सात-आठ दशकांपूर्वीपर्यंत आपल्या देशात आतासारखी परिस्थिती नव्हती. शिवाय इंग्रजांच्या राजवटीत अडचणी काही कमी नव्हत्या. वातावरण अत्यंत प्रतिकूल होते. तरीही हिंदुस्थानने मोठमोठे शास्त्रज्ञ निर्माण केले. रामानुजम, जगदीशचंद्र बोस, चंद्रशेखर व्यंकटरमण, मेघनाद साहा आणि सत्येंद्रनाथ बोस अशी अनेक नावे घेता येतील. पण स्वातंत्र्यानंतर आपण एकसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा शास्त्रज्ञ जन्माला घातला नाही याचा आपण कधी विचार केला आहे?
     अत्याधुनिक पाश्‍चिमात्य देश आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वांच्या पुढे आहेत. कारण तेथील वैज्ञानिक प्रगती अनिवार्यच होती. तिथला माहोल पहिल्यापासूनच पोषक राहिला आहे. स्वातंत्र्याच्या उन्मादात इथल्या लोकांनी साहसी प्रवासाला प्राधान्यक्रम दिला. विविध प्रकारच्या जाती, वर्ण, स्वभाव, रुढी-परंपरा आणि राजकीय व्यवस्था तिथल्या लोकांच्या आड आली नाही. मानवी हितास बाधा येईल अशी मनोवृत्ती इथे बोकाळली नाही. उलट हित जोपासण्याचीच धडपड सुरू राहिली. शिवाय त्यांच्या भटक्या वृत्तीमुळे त्यांचा संपर्क जगात काही तरी नवे शोधणार्‍या कारागिरांशी झाला, वाढला त्यामुळे ज्या काही अंधश्रद्धा, रुढी-परंपरा, सवयी किंवा सामाजिक मूल्ये होती ती तपासली गेली आणि कसोटीनुरूप बदलली गेली. विकासाची एक नवीच प्रक्रिया सुरू झाली. उत्पादनाच्या नव्या ‘आयडियाज’ आणि दळणवळण साधनांमध्ये सुधारणा ही इथली गरज बनली. त्यावेळेला युद्धेसुद्धा होत होती आणि युद्धात विजयासाठी नवनव्या साधनांची आवश्यकता होती त्यांचीही निर्मिती घडू लागली.
पश्‍चिमी युरोप व अमेरिकेत विज्ञान संस्कृती वाढली. ही संस्कृती आणि देशांनी स्वीकारली. त्यात जपान आघाडीवर आहे. जपानबरोबरच सोव्हिएत संघ आणि आता रशियानेसुद्धा विज्ञानालाच शासन आणि औद्योगिक एकात्मतेचा आधार बनविला. रशियानेसुद्धा विज्ञान शिक्षणासाठी जपानप्रमाणेच आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिले. योजनाबद्ध विकासाचा सिद्धांत रशियाने स्वीकारला. नोकरशाही आणि लालफीतशाही संपविण्यासाठी अनेक योजना राबवल्या. शिक्षण उत्पादनाच्या गरजेच्या हिशेबात दिले जाऊ लागले. कॉलेजमध्ये शिक्षण, आराखडा आणि निर्मिती या तिन्ही गोष्टी होऊ लागल्या.
जपान आणि रशियाच्या अनुभवाचा चीनला मोठा फायदा झाला. चीनचा आर्थिक चमत्कार कसा शक्य झाला याचा खरं तर अभ्यास करायला हवा. त्यामुळे आपल्या देशालाही लाभ होऊ शकेल. लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण प्रसार, आधारभूत विकासाबरोबरच आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणांचा अभ्यास करायला हवा. चीनमध्ये गेल्या दशकभरात जी भांडवली वाढ झाली त्यात विदेशी गुंतवणुकीचा वाटा केवळ सात ते आठ टक्केच आहे. तरीही त्यांची झेप वाखाणण्यासारखी आहे. आपल्याकडे जशी गरिबी, निरक्षरता आणि परंपरा आहे तशीच ती त्या देशांमध्येही आहे. पण आपण इंग्रज गेल्यानंतर विज्ञानाला वैज्ञानिक स्वरूपात विकसित केलेच नाही. आज देशात नऊशेपेक्षा अधिक वैज्ञानिक संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनाचे काम चालले आहे, पण तरीही जगातल्या विज्ञान क्षेत्रात आमचे नामोनिशाणही नाही आणि तंत्रज्ञानासाठी आपल्या देशाला दुसर्‍या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे व त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागते.
     आपण पंचवार्षिक योजनांची कल्पना रशियाकडूनच उचलली आहे. पण त्यांच्या अनुभवातून आपण काही शिकलेलो नाही. आपले शास्त्रज्ञ मोक्याच्या जागांसाठी राजकारण्यांचे उंबरठे झिजवताना दिसतात, तर विद्यार्थी विदेशी संस्थांचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी धडपडताना दिसतात. देशातले जे काही हुशार शास्त्रज्ञ आहेत ते आपल्या स्वत:च्या हिमतीवर काही करण्याची इच्छा बाळगून आहेत, त्याला आपली लालफितशाही अनेक कागदांच्या अटीं घालून खोडा घालत आहे. काही तरी करण्याची ऊर्मी मारण्याचे काम आपली नोकरशाही करीत असते. जगात आपण गरीब नाही. आपल्याजवळ प्राकृतिक खजिना आहे. जगातल्या पिकावू जमिनींपेक्षा सर्वाधिक जमीन आपल्याकडे आहे. स्वच्छ प्रकाश, उष्णता आहे. पोखरण अणुस्फोट, अवकाश, उपग्रह, अग्निबाण निर्मितीतील आपली श्रेष्ठता जगजाहीर आहे. मात्र तरीही आम्ही विज्ञान क्षेत्रात पीछाडीवर आहोत. आपण आपली प्राथमिकता निश्‍चित केलेली नाही. त्यादृष्टीने पावले उचलली गेली नाहीत. मग विकास कसा होणार? आपल्या राजकारण्यांना व नोकरशहांना जरा जरी राष्ट्राभिमान, चिंता असेल तर त्यांनी आतापासून या कार्यासाठी, या दिशेने पावले उचलायला हवीत.
- मच्छिंद्र ऐनापुरेainapurem_2390@rediffmail.com          dainik.saamana 24/7/2012

No comments:

Post a Comment