Saturday, July 14, 2012

पाशवी मनोवृत्ती!

    कोलकात्यातील एका शाळेशी संलग्न असलेल्या हॉस्टेलच्या वार्डनने पाचव्या इयत्तेतल्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने स्वमूत्र प्यायला लावून केवळ मानवतेलाच काळिमा फासला नाही तर शिक्षण मंदिरांनाही कलंकित करून टाकले आहे. मानवतेचा संदेश देणार्‍या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या 'विश्वभारती विद्यापीठा'शी संलग्न असलेल्या एका हॉस्टेलमध्ये असा धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार घडावा हे देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. विश्वभारतीच्या पाया भवन येथील गल्र्स हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेणार्‍या या विद्यार्थिनीला रात्री झोपेत अंथरुण ओले करण्याचा विकार आहे. महिला वॉर्डनने तिच्या या विकारावरच्या उपचाराला मदत करण्याऐवजी या कुकृत्यामुळे संपूर्ण शिक्षक जमातीलाच बदनाम करून टाकले आहे. या विद्यार्थिनीच्या जागी त्या महिला वॉर्डनची मुलगीच असती तर तिने तिच्याशी असा व्यवहार केला असता का? असाही सवाल उपस्थित होत आहे. स्वत:च्या मुलीशी असे वर्तन तिने नक्कीच केले नसते. मग ती या अजाण बालिकेशीच अशी का वागली? याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे पाशवी मनोवृत्ती!
     अशा निर्दयी, बेशरम लोकांना ठाऊक असतं की मुलांना अशी अमानवीय वागणूक दिल्यानं त्यांचं काही बिघडत नाही. प्रकरण आणखी वाढलंच तर पालकांची माफी मागितली की विषय संपून जातो. शिवाय अशा पीडित मुलांच्या आई-वडिलांनाही ठाऊक असतं की अशा आरोपींविरुद्ध तक्रार केली तर आपल्या मुलांचं काय होणार? मुलाला तर त्याच शाळेत शिकवायचं असतं. त्याच हॉस्टेलमध्ये ठेवायचं असतं. त्यामुळे अशा अनेक अत्याचारांना सहन केलं जातं, मात्र इथल्या प्रकरणात पालकांनी धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली, याचे कौतुक करायला हवे. महिला वॉर्डनला अटक करण्यात आली, पण या वॉर्डनची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. कायदेशीर कारवाई करण्यास विलंब लागणार आहे. आज विश्वभारतीने तातडीने कारवाईची पावले उचलण्याची गरज आहे.
     वास्तविक अलीकडच्या काळात शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये अजाण विद्यार्थी-विद्यार्थिनींवर शिक्षकांच्या अत्याचारांच्या घटना वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आणखी एका सरकारी शाळेत शिक्षकांनी तीन विद्यार्थ्यांचे मुंडण केल्याची घटना घडली होती, तर आणखी एका खाजगी शाळेत कोल्ड्रिंक प्यायल्यानं शिक्षिकेनं विद्यार्थ्याची इतकी धुलाई केली की त्यात त्याच्या हाताची नस कापली गेली. देशभर बालकांच्या शिक्षणाचा अधिकार लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याला मारायचं तर राहिले बाजूला पण त्याला अपशब्दसुद्धा वापरायचा नाही, असे असताना शिक्षकांची ही पाशवी वृत्ती धक्कादायकच म्हणायला हवी.
     अशा घटनांमुळे शिक्षण संस्थांची प्रतिमा मात्र खराब होत चालली आहे. मुलांसाठी या शाळा, हॉस्टेल्स म्हणजे निव्वळ जनावरांसाठीचे कोंडवाडे होऊ लागले आहे. इथे कुठलीच दया-माया नसते. केवळ 11 ते 5 या वेळेत मुले सांभाळण्याची व व्यवस्थित न वागल्यास, काही चुका केल्यास अत्याचार करण्याची मुभा मिळाली असल्याचे शिक्षकांना वाटत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी शाळा-हॉस्टेलमध्ये मुलांवर अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच मुलांना शिक्षण मोकळ्य़ा वातावरणात मिळावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अशा विकृत लोकांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय त्यांच्या हात, छडी किंवा त्यांच्या पशुवृत्तीवर अंकुश बसणार नाही.
     मुलांना मोकळ्य़ा वातावरणात शिक्षण देणार्‍या अनेक शिक्षण संस्था आहेत. मुलांवर कोणतंही दडपण नसावं. मुलांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांच्या कलानुरूप शिक्षणाची मात्रा चालवावी लागते. आजकाल शिक्षक आपल्या घर-दाराचे टेन्शन घेऊन शाळेत वावरत असल्याचे चित्र मोठे आहे. त्यामुळेही रागाच्या भरात विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना घडतात. शिक्षकांनाही शाळेत तणावमुक्त वावरण्याचा प्रयत्न करायला हवा.
punya-nagari 14/6/2012

No comments:

Post a Comment