Saturday, July 14, 2012

बालकथा ठकेवाडी घोड्याचा शोध

      फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक श्रीमंत व्यापारी होता. त्याचा व्यापार दिवसेंदिवस भरभराटीला पावत होता. त्याच्याने त्याला नेहमी दूरदूरचा प्रवास करावा लागे. त्याला एक चांगला चपळ, दणकट  घोडा हवा होता.
     तो घोड्यांच्या बाजारात गेला, पण त्याला एकही घोडा पसंद पडला नाही. लोकांनी सल्ला दिला,' तुम्हाला चांगला घोडा हवा असेल, तर मग ठकेवाडी घोडा घ्या. साधारण घोडा जितके अंतर कापायला आठवडा लावतो, तिथे ठकेवाडी घोडा एका दिवसात पोहचतो.'
     व्यापार्‍याने ठकेवाडी घोडा खरेदी करण्याचा निश्चय केला. तो घोड्यांच्या सगळ्यात मोठ्या बाजारात पोहचला. तो इकडे-तिकडे फिरत होता, तेव्हा त्याला एका ठकाने हेरले. तो भोपळा विकत होता. त्यानं ताडलं, हा माणूस नवखा आहे, अडाणी आहे. याला सहजपणे ठकवता येईल. व्यापारी फिरत फिरत त्याच्यासमोरूनच निघाला. त्याने आवाज दिला," काय हो मालक, काय शोधताय? काय हवंय का तुम्हाला? मी बराच वेळ पाहतोय, तुम्ही मोठ्या काळजीत दिसताय, मी काही मदत करू का?" ठकाच्या नम्रतेवर व्यापारी प्रभावित झाला. तो म्हणाला," हो रे बाबा! मला ठकेवाडी घोडा हवाय. कुठे मिळेल, सांगू शकशील?"
     " तुम्ही योग्य ठिकाणीच आला आहात, मालक! पण ठकेवाडी घोडा  असा-तसा मिळणार नाही आणि मिळालाच तर  त्यासाठी तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. तुम्ही असे करा, माझ्याजवळ ठकेवाडी घोड्याची अंडी आहेत. एक अंडे घेऊन जा. यातून लगेचच एक सुंदर आणि दणकट शिंगरू बाहेर येईल. "
     "किती पैसे पडतील एका अंड्याला?" व्यापार्‍याने विचारले.
     " फक्त एक हजार रुपये, मालक." ठक
     व्यापार्‍याने  मोठासा, पिवळासा एक भोपळा खरेदी केला. तो नाण्यांची मोजदाद करू लागला, तोच ठक सावधानतेचा इशारा देत म्हणाला," मालक, सावध असा. अंडे खांद्यावरूनच वाहून न्या. खाली ठेवलात तर घोडा पळून जाईल. ठिकाय, देव तुमचं कल्याण करो." असे म्हणून ठकाने हात जोडले. व्यापार्‍याने भोपळा उचलून खांद्यावर ठेवला आणि गावाच्या दिशेने चालू लागला. 
     सूर्य मावळला होता आणि अंधार दाटत चालला होता. व्यापारी तर चालून चालून थकला होता. आता त्याच्याने चालवत नव्हते. त्याने भोपळा एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवला. आणि तिथेच बसला. त्याने  चेहर्‍यावरचा आणि अंगावरचा घाम पुसून काढला. बसल्या बसल्या त्याला पेंग येऊ लागली. तो तिथेच आडवा झाला. डोळे मिटून घेतले. त्याचवेळी एक कोल्हा धावत धावत तिथे आला. त्यानं भोपळ्याला पाहिलं नी त्याच्यातलं कुतूहल जागं झालं. त्याने एक जोराचा पंजा मारला. भोपळा फुटला आणि कोल्हा घाबरून पळू लागला.
     आवाजाने व्यापार्‍याचे डोळे उघडले. त्यानं पाहिलं, अंडं फुटलं आहे आणि त्यातून घोडा बाहेर पडून पळू लागला आहे. त्याने त्याचा पाठलाग सुरू केला. स्वतःशीच म्हणाला,' हा जन्मताच इतक्या वेगाने धावू शकतो, तर मोठा झाल्यावर किती कमाल करेल.'
    
आजपर्यंत  कोणा माणसाने आपला असा  पाठलाग करताना  कोल्ह्याने कधी पाहिले नव्हते. तो घाबरून एका गवताच्या गंजीत घुसला. योगायोगाने त्याच ढिगार्‍यात एक वाघ लपून बसला होता. व्यापारी ढिगार्‍यावर काठीने मारायला लागला, तसा वाघ बाहेर आला आणि पळून जाऊ लागला.व्यापारी मोठा चकीत झाला. घोडा इतक्यात एवढा मोठा कसा झाला, असा मोठा  संभ्रम  पडला. तो वाघाचा पाठलाग करू लागला. व्यापारी या मौल्यवान घोड्याला असा हातचा जाऊ देणार नव्हता. तो जीव तोडून त्याच्या मागे लागला. शेवटी वाघ सापडला. तो त्याच्यावर स्वार झाला. वाघाला वाटलं, हा कोणी मोठा शिकारी असावा. म्हणून बिचारा घाबरून गप्प चालू लागला.
      चालता चालता पूर्ण रात्र सरली. सकाळी सूर्य चमकला. व्यापार्‍याने सकाळच्या प्रकाशात पाहिलं, की तो कशावर स्वार आहे ते! पाहताच त्याला धडकी भरली. आता तो जीव वाचवायचा विचार करू लागला. वाटेत त्याला एका झाडाची फांदी आडवी आली. त्याने ती पटकन उडी मारून पकडली. आणि तसाच  झाडावर लोंबकत राहिला. पाठीवरचे ओझे उतरताच, वाघ मागे वळून न पाहता धूम पळला. 
     व्यापारी काही वेळाने झाडावरून खाली उतरला. त्याच्या पायाला जखम झाली होती. तो लंगडतच घरी आला. आता त्याला ठकेवाडी घोड्याच्या नावाचीच चीड येऊ लागली. आयुष्यात पुन्हा  म्हणून कधी त्याने ठकेवाडी घोड्याचे नाव काढले नाही.  ( बांगला देश लोककथेवर आधारीत)          

No comments:

Post a Comment