Monday, October 31, 2011

शिक्षण खात्यासारखीच अन्य खात्यांचीही झाडाझडती व्हायला हवी

शिक्षण खात्यासारखीच अन्य खात्यांचीही झाडाझडती व्हायला हवी
गेल्या महिन्याच्या प्रारंभी महाराष्ट्रात शिक्षण खात्यात अभूतपूर्व अशी पटपडताळणी झाली. यामुळे अख्खे शिक्षण खाते हादरून गेले. या खात्यातले घोटाळे , गडबडी चव्हाट्यावर आल्या.  अशाच पद्धतीने अन्य शासकीय खात्यांचा लेखाजोखा घेतला  जाण्याची गरज आहे. महसूल, आरोग्य, वीज, वन, उद्योग, पर्यटन, सहकार अशा अनेक खात्यांमध्ये भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार माजला आहे. या खात्यांची  झाडाझडती महाराष्ट्राच्या विकासाच्यादृष्टीने पुढील   दिशा ठरण्याच्याकामी याची गरज भासणार आहे.  महसूल खाते सगळ्यात भ्रष्ट असल्याचे जगजाहीर आहे. जमीन, अन्नपुरवठा, पाणी-वाळू, तेल, जात-शिक्षण अशा अनेक अनुषंगाने महसूल विभाग सर्वसामाण्यांशी निगडीत आहे. राज्याच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन म्हणून या खात्याकडे पाहिले जाते. पण या विभागातच अधिक गैरव्यवहार आढळून आले आहेत. जमिनीच्या चुकीच्या नोंदी, रेशनवरचा तेल, धान्य यातला काळाबाजार, खनीज साठ्याचा बेकायदा उपसा , जात, शिक्षण आदीचा चुकीचा दस्तावेज अशा एक ना अनेक अव्यवहारह्य गोष्टी या खात्यात घडत असतात. अलिकडेच राज्य शासनाने राज्यातल्या संपूर्ण जमिनींचे मापन करण्याचा निर्णाय घेतला आहे. ही बाब कौतुकास्पद असली तरी एवढ्यावर थांबून चालणार नाही.
पंचायत समितीतला शेती, आरोग्य या विभा त्याचबरोबर स्वतंत्रपणे कार्यरत असलेला वनविभागातसुद्धा अशी झाडाझडती होण्याची आवश्यकता आहे. औषधांचा काळाबाजार, वैद्यकीय अधिकार्‍यांचा खासगी प्रॅक्टीसकडचा ओढा, रुग्णांची आरोग्य केंद्र अथवा रुग्णालयात होणारी आर्थिक पिळवणूक, आलेल्या निधीचा वापराचा अभाव यामुळे लोकांना आरोग्य विभाग आपला आहे, असे वाटतच नाही. त्यामुळे रुग्ण खासगी डॉक्टरांकडे जातात. त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. आरोग्याच्या इतक्या चांगल्या सुविधा असतानासुद्धा रुग्ण खासगी दवाखान्यांकदे का जातो, याचा तपास होणे गरजेचे आहे.   वनविभागात झाडे लावण्या आणि संगोपनापेक्षा तोड्ण्यावरच भर दिला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. वनक्षेत्र वाढण्यापेक्षा कमी होत आहे, याचीही दखल घ्यायला हवी.
  वीज  ही आपल्या लोकांच्या जिव्हाळ्याशी निगडीत आहे. पण त्याची आवस्था मोठी गंभीर आहे. कमी उत्पादन आणि वाढती मागणी या विषमतेमुळे लोक हिंसक बनून रस्त्यावर उतरले आहेत. एकेकाळी उद्योग विश्वात क्रमांक एकचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात विजेच्या भविष्यातील वाढीव मागणीचा अंदाज बांधण्यात आणि वाढीव प्रकल्प राबवण्यात राज्य सरकार कमी पडले.  योजनेचा अभाव आणि इच्छाशक्तीचा तुटवडा याला कारणीभूत आहे.  उद्योगाच्या क्षेत्रात एकेकाळी अव्वल स्थानावर असलेला महाराष्ट्र आज बराच मागे फेकला गेला आहे. वास्तविक उद्योगाचे  रोजगार निर्मितीत महत्त्वाचे योगदान उद्योगाचे असते. महाराष्ट्रात सुरुवातीपासून उद्योगधंदे मोठय़ा संख्येने होते. त्या उद्योगांच्या अनुषंगाने निर्माण होणार्‍या व वाढणार्‍या लघुउद्योगांची संख्याही लक्षणीय होती. पण विजेची टंचाई, जकातीचा जाच, रस्ता व अन्य संसाधनांचा, कौशल्य शिक्षणाचा  अभाव, ग्रामीण पातळीवर उद्योग उभारणीसाठीची उदासिनता अशा अनेक कारणांमुळे अनेक मोठे उद्योग शेजारच्या राज्यात जात आहेत. 
  शेती हासुद्धा उद्योगाबरोबरच  किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा घटक आहे.  मात्र आज शेती देशोधडीला लागत आहे. दुष्काळी भागातील शेतीला पाणी पुरवण्याच्या योजना म्हणाव्या अशा गती घेतल्या नसल्याने आजही बहुतांश शेती पावसावर अवलबूंन आहे. सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही योजना अर्धवट
राहिल्याने हा पैसा विनाकारण गुंतून पडला आहे. शेतमालाला योग्य भाव मिळण्याबाबत करावे लागणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. याबाबत अजिबात नियोजन नाही. बदलत्या आर्थिक परिस्थितीत शेतीमालाच्या भावाच्या चढउताराला तोंड देण्याची क्षमता नसलेला शेतकरी. नैसर्गिक आपत्तीत शासनाचा तुटपुंजा व विलंबाने मिळणारा आधार अशा दुष्टचक्रात आपल्या राज्यातील शेती अडकली आहे.

 महाराष्ट्रातील सहकार चळवळ तर भ्रष्टाचाराने पुरती बरबरटलेली आहे. एक चांगली चळवळ त्यामुळे लयाला चालली आहे. काही मोजक्याच लोकांच्या सुयोग्य नियोजनामुळे काही संस्था टिकून आहेत. मात्र अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला तर निराशाच पदरी पडते. शिवाय या  चळवळीचा फायदा ठरावीक भागातील काही ठरावीक पिकांना आनि लोकांना  मिळाला. पण तसा फायदा सर्वसाधारण शेतकर्‍याला झाला नाही असेच म्हणावे लागेल. वाढते शहरीकरण, त्यामुळे वाढलेली अन्नधान्याची मागणी व डबघाईला येत चाललेली  शेती याचे गणित उत्तरोत्तर अधिकच व्यस्त होण्याची चिन्हे  दिसत आहे.
राज्याच्या महसुलात चांगली भर घालण्याचे काम पर्यटन विभाग करू शकतो. याचे उदाहरण अन्य राज्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे. परंतु, महाराष्ट्र मात्र याचा पुरेपुर फायदा घेण्यास असमर्थ ठरत आहे.  बदललेल्या जागतिक परिस्थितीत पर्यटन हा अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा उद्योग ठरत आहे. एक पर्यटक राज्यात आला तर त्यामुळे 14 ते 17 स्थानिक रोजगार निर्माण होतात असे मानले जाते.   समुद्रकिनारा आणि वनसंपदा एवढय़ा केवळ दोनच  भांडवलावर गेल्या 15-20 वर्षांत केरळने साधलेली प्रगती आपल्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ठरावी. पण आमच्या राज्यकर्त्यांनी अशांबाबतीत आपल्या डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधून घेतल्याचे दिसते.  राज्यातले अजूनही अनेक विभाग आहेत. त्यांच्या झाडाझडतीने महाराष्ट्र संपन्न, विकसित राज्य म्हणून पुढे येईल. काही प्रमाणात गमावलेले वैभव मिळवील.  उच्च शिक्षण, समाजकल्याण,  अशा खात्यांतही अवस्था खूप वाईत असल्याचा अनुभव लोकांना पदोपदी येत आहे.  राज्याला पुढे नेण्याची इच्छाशक्तीच  राज्यातल्या अन्य खात्याला स्वच्छ करण्याची मोहीम पुढे नेईल.

विचार आणि संस्कार यातून माणूस घडतो.

जगात गुन्हेगार निर्माण होत नाहीत अथवा गुन्हेगारी सापडत नाही, असा देश पृथ्वीच्या पाठीवर सापडणे अशक्य. ही गुन्हेगारी विशेषतः पैशासाठी अथवा अथवा आपली हौसमौज भागविण्यासाठी केली जाते. भ्रष्टाचार, शेतीवाडी प्लॉट अशी स्थावर मालमत्ता हडपणे, लाच खाणे, खून- बलात्कार अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीने सगळीकडे थैमान घातले आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात असते. गुन्ह्याच्या आवाक्यानुसार गुन्हेगाराला कमी- अधिक शिक्षा होत असते. पण  त्यासाठी साक्षी-पुरावे गोळा करावे लागतात. अर्थात इथेही भ्रष्टाचार  फोफावला आहे. पैशासाठी साक्षी फिरवण्याच्या घटना आता नव्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे पैसा हा सर्वश्रेष्ठ बनला असल्याने ही दुनिया पैशाच्यामागे धावताना दिसत आहे. गुन्हेगारी संपवायची भाषा बोलायला सोपी आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलात आणणे, महाकठीण आहे. आजकाल गुन्हेगारीचे यामुळेच उदात्तीकरण होत आहे. संघटीत गुन्हेगारीचे म्होरके छुप्या पद्धतीने गुन्ह्यांची सूत्रे हालवत आहेत. गुन्हेगारांना कायद्याची भिती राहिलेली नाही. त्यांना जात, धर्म, पंथ नसतो. त्यांची मानसिकताच पहिल्या गुन्ह्यापासून धीट बनलेली असते. शिक्षणाने गुन्हेगारांची विकृती बरी होत नाही. कठोर शिक्षा आणि संस्कार यासाठी महत्त्वाचे आहेत. शिक्षा ही चुकातून बोध घेण्यासाठी असते. शिक्षा विकृती घालवण्याचे काम करते. त्यासाठी गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी.  ही गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक आहे. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. विचार आणि संस्कार यातून माणूस घडतो. संस्कारातून नीतीमत्ता निर्माण होते.  जी माणसे प्रामाणिक असतात. त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ त्यांच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी मिळतेच.   

Friday, October 28, 2011

अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडायला हवे

ज्या कारणांसाठी टीम अण्णांनी देशव्यापी आंदोलन केले आहे, तेच आरोप आता टीम अण्णांवर होत आहेत. ज्यांनी  मोठ्या विश्वासाने या टीमवर विश्वास दाखवला होता, त्या लोकांसाठी हा सगळा प्रकार दुर्दैवी म्हटला पाहिजे. टीम अण्णांवर चोहोबाजूंनी होत असलेला आरोप आणि टीका याला अण्णा हजारे यांनी आपले मौन व्रत सोडून उत्तर द्यायला हवे, अन्यथा आधीच संशयाच्या गर्देत सापडलेले अण्णांचे मौनसुद्धा बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही.  मौनाला मोठी सात्त्वीक परंपरा आहे. ही परंपरा अण्णांकडून जोपासली गेली पाहिजे.  
 अण्णा हजारे यांच्या टीमचे सदस्य अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. केजरीवाल यांच्यावर पहिल्यांदा  स्वामी अग्निवेश यांनी निशाणा साधला होता. अण्णांच्या आंदोलनासाठी लोकांनी देणगी म्हणून दिलेले 80 लाख रुपये  केजरीवाल यांनी आपल्या खासगी ट्रस्टच्या खात्यात वळते करून घेतले.  इंडिया अगेन्स्ट करप्शनसाठी ही देणगी आली होती. केजरीवाल यांनी ती आपल्या पब्लिक रिसर्च फाउंडेशनच्या खात्यावर वळती केली, असा आरोप स्वामी अग्निवेश यांनी केला होता.  पण टीम अण्णांनी या आरोपांचे खंडन केले होते. मात्र आता आणखी तिघांनी म्हणजे माजी न्यायाधीश जे.एस. वर्मा आणि टीम अण्णांचे एक सदस्य आणि माजी लोकायुक्त संतोष हेगडे आणि माजी प्राप्तीकर आयुक्त विश्वबंधु गुप्ता यांनीही केजरीवाल यांच्यावर  आफरातफरीचे गंभीर आरोप केले आहेत . गुप्ता यांनी तर पुरावे सादर करण्याचीच भाषा केली आहे. त्यामुळे ज्यांनी या टीम अण्णांवर विश्वास दाखवला त्या तमाम " आमाआदमीं" चा त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला  आहे.  हा प्रकार देशवासियांसाठी चुकीचा संदेश पोहचवणारा असून अशा प्रकारामुळे  लोकांचा "विश्वासा"वरचा विश्वासच उडणार आहे.
आर्थिक गुन्हे विषयक कायद्याचे अभ्यासक आणि  माजी प्राप्तीकर आयुक्त विश्वबंधु गुप्ता यांनी केजरीवाल आणि टीमचे अन्य तीन सदस्य यांच्यावर निशाणा साधला आहे.इडिंया अग्नेस्ट करप्शन ( आयएसी) च्या नावाने केजरीवाल आफरातफर करीत आहेत आणि याबाबतचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत असा दावादेखील त्यांनी केला आहे.  आयएसीची वेबसाईट (इंडिया अग्नेस्ट करप्शन. ओआरजी) चे डोमेन  अरविंद केजरीवाल यांनी १७ नोव्हेंबर २०१० रोजी नोंदवले आहे.  परंतु यात  त्यांनी ‘कुठेही पीसीआरएफ (पब्लिक कॉज रिसर्च फॉऊंडेशन) उल्लेख केलेला नाही. पीसीआरएफ ही केजरीवाल यांची एनजीओ आहे. तरीसुध्दा देगणी रूपात मिळालेल्या रकमा पीसीआरएफच्या खात्यात टाकण्यात येत आहे. रामलीला मैदानावर अण्णांच्या उपोषणादरम्यान जमा झालेली देणगी आणि त्याचा विनियोग याचा सारा तपशील वास्तविक पाहता वेबसाईटवर सार्वजनिक करायला हवा आहे, परंतु तो अद्याप करण्यात आलेला नाही.  याबाबत स्वत : गुप्ता यांनी केजरीवाला  यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण ते संपर्कात आले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
  याशिवाय टीम अण्णांच्या आणखी एक सदस्या  किरण बेदी यांच्यावरही आयोजकांकडून विमानाचे पूर्ण भाडे घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.  किरण बेदी यांनी हा तिकिटाचा जादा पैसा गरजू लोकांसाठी वापरल्याचे सांगत आहेत. किरण बेदींनी गरीब गरजू लोकांसाठी  हा पैसा  वापरत असल्याचे म्हटले असले तरी त्यांनी तसे उघड उघडपणे आयोजकांशी बोलायला हवे होते. आयोजक अशा नेक गोस्।तीला नाही म्हणाले नसते. किरण बेदी यांनी व्याख्यान अथवा अन्य मार्गातून जो पैसा मिळवला व तो ज्या ट्रस्ट्मध्ये जमा केला त्याचा सारा तपशील त्यांनी जनतेसमोर मांडून होणार्‍या आरोपाचे खंडन करणे आवश्यक आहे.  वास्तविक  पैसे खर्चच केलेले नसतील तर किरण बेदींनी त्याच्यावर दावा करणे योग्य नाही. एका महिला  पोलिस अधिकारी राहिलेल्या व्यक्तीकडून असे होणे चूकीचे आहे. देशाला भ्रष्ट्राचारापासून मुक्त करायला निघालेल्या व्यक्ती धुतल्या तांदळासारख्या स्वच्छच असायला हव्यात. आता त्यांनी आयोजकांचे त्यांचे पैसे परत करण्याची भाषा केली आहे. यातूनच त्यांचा इरादा साफ नव्हता , हे स्पट झाले आहे. यामुळे आमजनतेच्या विश्वासाला तडा गेला आहे. त्यांनी आयोजकांना सांगून असे केले असते तर काही अडचण नव्हती. पण आता सावरून काही साध्य होणार नाही. .

अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा दोषी नसतील तर  आपल्या ट्र्स्टची संपत्ती सार्वजनिक करायला काहीच हरकत नाही. नव्हे ती तातडीने सर्वांसमोर आणायला हवी आहे.  देशभर भ्रष्ट्राचार विरोधात आंदोलन करायला निघालेले स्वत: मात्र गळ्यापर्यंत भ्रष्ट्राचाराने बुडालेले असतील तर त्याचा परिणाम  तो काय होणार? जनता या भ्रष्टाचाराला पार विटून गेली आहे. त्यात ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केल्यावर भ्रष्ताचारावरून संतापलेली जनता गप्प बसणार नाही.  ते जिथे जातील, तिथे मग चपलांचा प्रसाद मिळत जाईल.   भ्रष्ट्राचाराची जननी काँग्रेस आहे, असे म्हणत टीम अण्णाने हिस्सारच्या पोटनिवडणुकीत  काँग्रेसविरोधात प्रचार  केले.  परिणाम व्हायचा तोच झाला. काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझीटही जप्त झाले. त्यामुळे  काँग्रेस कमालीची दुखावलेली आहे.   काँग्रेसला टीम अण्णामध्ये भ्रष्ट्राचाराची एक फट हवी आहे. ती फट सापडल्यास टीम अण्णा उधळली जाणार आहे.  सध्या टीम अण्णा आणि स्वतः अण्णा टीम अण्णात फूट पाडण्यासठी चौकडी प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. सरकार सूड उगवत आहे. असाही त्यांचा आरोप आहे. मात्र अशी भाषा करून आपल्यावर होणार्‍या आरोपाची सारवासारव करता येणार नाही. आरोपाला चोख उत्तर देण्याची आवश्यकता आहे.

टीम अण्णावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्यारूपाने उठलेले वादळ जनतेला सैरभैर बनवत आहे. त्यांचा विश्वासावरचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे हे उठकेले वादळ तातडीने शमविण्याची गरज आहे. केजरीवाल आणि किरण बेदी यांनी आपल्या ट्रस्टची मालमत्ता तातडीने सार्वजनिक करायला हवी व म्हत्त्वाचे म्हणजे  अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडायला हवे.  टीम अण्णावर चोहोबाजूंनी होत असलेल्या आरोपांमुळे अण्णा हजारेंचे मौनसुद्धा  आधीच संशयात सापडले आहे.  अण्णांनी या संशयाला जागा देऊ नये, हीच अपेक्षा     

Tuesday, October 25, 2011

आत्महत्या रोखण्याची लस शोधण्याची आवश्यकता

आत्महत्या भ्याडपणाचं लक्षण  असलं तरी माणसं त्याला कवटाळतात. आपला अनमोल जीव एकदाचा मातीमोल करून टाकतात. अर्थात माणसानं  स्वतः ला भावनेशी जोडताना अतिरेक केला की,  अशा या गोष्टी व्हायच्याच! आत्महत्येला कुठलं एकादं कारण पुरेसं नाही. असंख्य कारणं आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्तीनुसार आत्महत्यासुद्धा अशा गटात विभागल्या गेल्या आहेत. परवा वाचायला मिळालं की जगात दहा लाख माणसं दरवर्षी आत्महत्या करतात. भारतातही त्याचं प्रमाण प्रचंड आहे. दर पंधरा मिनिटाला ३ माणसं आत्महत्येद्वारे मृत्यूला कवटळतात. आणि आजच्या तरुणांना सांगण्यासारखं महत्त्वाचं असं की या तीनपैकी एक  १५ ते २१ वयोगटातले आहेत. वाचल्यावर धक्का बसेल, पण हे सत्य आहे. आज ताण, झटपट श्रीमंती आणि असुरक्षितता  माणसाला आत्महत्येला प्रवृत्त करीत आहे.  बेकारी, गरीबी , बेघर असणे त्याचबरोबर वंश, जात, धर्म, लिंग हा भेदभावसुद्धा आत्महत्येची वाट धरायला लावतो आहे. का इतकी माणसं जीवाला विटली आहेत, हा प्रश्न अस्वस्थ करून सोडतो.
सासू-सासर्‍याचा, नवर्‍याचा  छळ, घरातील सततची भांडणे, कटकट असह्य आजार  यामुळे अथवा परीक्षेत नापास होण्याची भीती ही अगोदर सर्वसाधारण आत्महत्येची कारणं असायची.  पण आता आत्महत्येच्या  मागील  कारणे अनेक झाली आहेत.  विविध गोष्टींचा, कामाचा वाढता ताण आणि असुरक्षितता यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अलिकडे विभक्त कुटुंब पद्धती बळावल्याने एकलकोंडेपणा वाढला आहे. ज्या घरात आई- वडील दिवसभर  कामाला जातात, आपल्या मुलांशी संवाद सधायला वेळ नसतो,  तिथल्या मुलांची मानसिक अवस्था फारच विचित्र होत असते. चांगल्या संस्काराची शिदोरी त्यांच्याजवळ असल्यास ठीक नाहीतर त्याला अनेक वाईट सवयी जडल्याच म्हणून समजायला हरकत नाही. . विशेष म्हणजे त्याला रोखणारा , वाईट आहे म्हणून सांगायला कोणी नसतो. असंगाशी संग  ... घडल्यावर काय होतं, याविषयी अधिक सांगण्याची आवश्यकता नाही.  अगदी आपल्या संतांनीही सांगून ठेवलं आहे. पण आज तरुण पिढी बंधनमुक्त झाल्याने आणि चांगल्या- वाईटाची वेळीच समज दिली गेली नसल्याने स्वैराचाराला रान मोकळे झाले आहे. टीव्ही- सिनेमा यामूळे आपल्या जीवनाचा नायक कोण, आपल्या जीवनाचे ध्येय काय, याची सारी मानके बदलली आहेत.
मुलीच्या  प्रेमातल्या अपेक्षा, अपेक्षाभंग, हवे ते मिळवण्याची दांडगाई यातून हाणामार्‍या, चोर्‍या, व्यसनाचा अतिरेक यासगळ्यांमुळे आयुष्याला मिळालेला अधोगतीचा रस्ता, अपयश, भ्रमनिराश , बदनामी याला शेवट आत्महत्या. जिवनात राम नसल्याचा साक्षात्कार होतो. आणि जीव संपवला जातो. अशावेळी आई-बापाचा..कुणाकुणाचा विचार येत नाही. अपयशानं, कामाच्या ताणानं, निराशेनं स्मृतीभ्रंश झालेला असतो. 
आत्महत्येला झटपट श्रीमंतीचे फ्याडही याला कारणीभूत आहे. आज सगळ्या सुखसोयी आपल्या पायी लोळण घ्याव्यात अशी लालसा निर्माण झाली आहे. आणि ती मिळविण्याची धडपडही चालली आहे. पण तरीही सगळ्या गोष्टी आवाक्यात येत नाहीत तेव्हा त्या मिळवण्यासाठी 'शॉर्टकट' चा मार्ग स्वीकारला जातो. तरीही भूक भागत नाही. वामार्ग शेवटी  बदनामी, असुरक्षितता पदरात पाडून जातो. आज कमी वयातच दारू, सिगरेटसारखी नशेची व्यसने जडली आहेत. बापाच्या पैशावर चैन करायला बापानंही त्यांच्या व्यापामुळं मोकळीक दिली आहे.काही क्षेत्रात प्रचंड पैसा मिळत असल्याने मिळालेल्या पैशाचं काय करायचं म्हणूनही अशा नशेच्या गोष्टी सहजतेने केल्या जात आहेत. रेव्ह पार्टी  हा त्यातलाच एक भाग आहे.
आज कामाच्या ठिकाणी प्रचंड स्पर्धा वाढली आहे. हाही एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. व्यसनाच्या आहारी जाण्याला तिथला कामाचा प्रचंड ताणसुद्धा कारणीभूत आहे. आज प्रचंड पैसा मिळतोय पण तितकाच मानसिक ताणसुद्धा वाढला आहे.  आयटी तसेच अन्य क्षेत्रांतील माणसे भरडली यामुळे जात आहेत. कॉल सेंटरसारख्या ठिकाणी तर रात्री काम करून दिवसा झोपणे अशी निसर्गचक्राच्या विरुद्ध जाणारी जीवनशैली असल्याने अनेकांना तरुणवयातच नैराश्य येते. चेतन भगत याने त्याच्या ‘वन नाइट अँट कॉल सेंटर’ या कादंबरीत कॉल सेंटरचे जीवन अत्यंत चांगल्याप्रकारे  रेखाटले आहे. बंगळुरू, पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी कामे करणारे अनेक लोक अन्य राज्यांतून आलेले असतात. त्यांना या शहरांमध्ये जमवून घेणे अवघड जाते हेही नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांमागील मोठे कारण आहे. आताच्या समाजव्यवस्थेत तुम्ही यशस्वी असणे म्हणजे उत्तम मार्क मिळवणे आणि भरपूर पैसे कमावून देणारी नोकरी किंवा व्यवसाय करणे असेच समजले जात आहे. बाकी सब झूठ आहे.  इतरांना समाजात  काहीच किंमत  नाही. अशीच त्यांची भावना झाली  आहे.
आज परिपूर्ण माणसाची व्याख्या बदलली आहे.  व्यक्तिमत्त्वसंपन्न  व्हावे अशा प्रयत्नांच्या मागे माणूस लागताना दिसत  नाही, आरोग्यसंपन्न, जीवनमूल्याधारित आयुष्य असावं असं त्याच्या मनालाही आता शिवत नाही.  आता फक्त घर, गाड्या, घरात निरनिराळ्या वस्तू आणणे यात त्याला अधिक  सुख आहे, अशी त्याची धारणा झाली आहे. या वस्तूंचा उपभोग घेण्यापेक्षा त्या केवळ आपल्या मालकीच्या आहेत याचा आनंद व त्या स्वत:च्या मालकीच्या आहेत म्हणून इतरांना वाटलेला हेवा उपभोगणे असा प्रकार चालू झाला आहे. या सगळ्यांतून  समाजात मनोविकारांचे, नैराश्य, दडपण आणि भीती अशा इतर अनेक गोष्टींचे प्रमाण खूपच वाढते आहे,
आज माणसाला चैन नाही. ज्याच्याकडे सर्व काही आहे, तोही समाधानी नाही. आणि दुसर्‍यालाही समाधानी ठेवीत नाही. कधी कधी मिळवण्याच्या हट्टाहासापायी तुलाही नको, मलाही नको, घाल कुत्र्याला , असा हीनसुद्धा वागताना माणूस दिसतो. दुसर्‍याच्या समाधानात समाधान मानणं अवघडल्यासारखं वाटतं आहे. माणसं अशी का वागायला लागली आहेत , कळायला मार्ग नाही. कदाचित चांगल्या संस्काराची शिदोरी संपत चालल्याची ही लक्षणं आहेत. आज दुसर्‍याच्या मनाला शाम्ती देण्याचा प्रयत्न करणाराही राग, लोभ आणि शारीरि- मानसिक आजारांपासून सुटला नाही. तेव्हा त्याच्या शिकवण्याचा अर्थ तो काय घ्यायचा ? 
आज समाधान मानण्याची मानसिकता संपली आहे. आज चोहोबाजूला चाललेला भ्रष्टाचार, लबाडी, खून - मारामार्‍या या सग़ळ्यात पैसा महत्वाचा झाला आहे. पैसा नाही तर सुरक्षितता नाही. त्यासाठी प्रचंड पैसा  कमवून ठेवण्याची एकप्रकारची होड लागली आहे. त्यात आजची तरुणपिढी भरकटत चालली आहे. त्यांना सांगायला कोणाजवळ वेळ नाही. सांगाण्याचीही कोणाची हिंमत राहिली नाही. शिवाय आजच्या पिढीची ऐकून घेण्याची क्षमताही उरलेली  नाही. त्यामुळे आत्महत्या वाढत राहताहेत. त्याला रोखण्याची लस शोधण्याची आवश्यकता आहे.

Monday, October 24, 2011

आणखी एक संकट

अवकाशात निकामी उपग्रहांचा कचरा साठत असताना आता  हा कचरा पृथ्वीवर आदळू लागल्याने पृथ्वीवासियांच्या डोक्यावर आणखी एका संकटाची तलवार टांगली गेल्याने चिंता वाढली आहे.
गेल्याच महिन्यात नासाचा अपर एटमोस्फेअर रिसर्च सॅटेलाइट पॅसिफिक महासागरात कोसळला होता. आता जर्मनीच्या अंतराळ संशोधकांनी निकामी झालेला आणखी एक उपग्रह या आठवड्यात पृथ्वीवर आदळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु तो नेमका केव्हा आणि कधी पडणार हे स्पष्ट केले  नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.
अवकाशात आधीच उपग्रहांची भाऊगर्दी झाली आहे. त्यात दरवर्षी आणखी भर पडत आहे. अवकाशात निकामी झालेल्या उपग्रहांची तर अधिकच मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्या कचर्‍याचे काय करायचे या चिंतेत अवकाश संशोधक असताना त्यांचे पृथ्वीवर येऊन आदळणे धोकादायक ठरणार आहे. हा कचरा नेमका कधी व केव्हा पडणार आहे, हे नक्की स्पष्टपणाने आजच्या घडीला तरी सांगता येणार नाही. हीच मोठी आता अडचण झाली आहे. उपग्रहांचा कचरा पृथ्वीवर आदळण्यापूर्वी केवळ दोन तास आगोदर समजू शकणार आहे.
या आठवड्यात पृथ्वीवर आदळणारा हा रोसॅट नावाचा उपग्रह जर्मनीने जून १९९० मध्ये लॉन्च केला होता. १९९८ मध्ये त्याचा स्टार स्टॅकर निकामी झाला होता. त्यामुळे यामध्ये लावण्यात आलेल्या कॅमेर्‍याची बदलली जाऊन तो सूर्याच्या दिशेने केंद्रित झाला.  याचा परिणाम  सॅटेलाइट कायम स्वरुपी खराब होण्यात झाला. फेब्रुवारी १९९९ मध्ये त्याला कामातून हटवण्यात आले.
या उपग्रहाचे वजन २४ टन इतके आहे. जर्मन एरोस्पेस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार २४ टनाची एक्स-रे वेधशाळा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच पेट घेईल. व जळून जाईल. परंतु यातूओन जवळपास १.७ टन कचारा राहिल, तो पृथ्वीवर आदळेल. या उपग्रहाला ३० मोठमोठे आरसे लावण्यात आले आहेत. या आरशांवर आणि चिनी मातीवर पृथ्वीच्या वातावरणाचा काहीही परिणाम होणार नसून ते थेट पृथ्वीवर कोसळणार आहेत.
 गेल्या पन्नास वर्षांपासून सोडण्यात येत असलेल्या उपग्रहांचा परिणाम म्हणजे अंतराळात आतापर्यंत जवळजवळ ५,५०० टन कचरा कचरा जमा झाला आहे. या कचर्‍यांचा कुठल्याही अंतराळ उपग्रहांशी धड्क होऊन धोका पोहोचण्याची शक्यता आहे. यात अपरिमित हानी संभवते. याची सार्‍या विश्वाला चिंता लागलेली असताना आता आणखी एक संकट समोर उभे येऊन ठाकले आहे. नष्ट झालेल्या उपग्रहांचा कचरा मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर आदळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अवकाशात कित्येक सॅटेलाइट सोडण्यात आले आहेत. परंतु त्यातले काही योग्य प्रकारे काम करीत नसल्याने पर्यायाने त्यांचा सहभाग निकाम्या उपग्रहांमध्ये झाला आहे. हा कचरा टीव्ही व अन्य संचार विभागांना अडथळा बनू शकतो. हा कचरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालवले गेले आहेत. पण अद्याप तरी त्यावर तोडगा निघाला नाही. पण हा अंतराळातला कचरा एकावर एक समस्या निर्माण करत आहे. हा कचरा पृथ्वीवर कोसळू लागल्याने त्याचा माणसांनाही धोका वाढला आहे.
                                                                  - मच्छिंद्र ऐनापुरे, जत  

Sunday, October 23, 2011

बालकथा सूडाचा शेवट

एडमंड आणि डँगलर दोघे खलाशी होते. दोघेही एकाच जहाजावर काम करीत. एडमंड मोठा  कष्टाळू आणि प्रामाणिक होता. जहाजाच्या कॅप्टनचाही  त्याच्यावर मोठा भरवसा होता. डँगलर एडमंडवर जळत होता.
एकदा समुद्र प्रवासादरम्यान कॅप्टनचा मृत्यू झाला. एडमंड अशावेळी अगदी समजुतीने वागला. अत्यंत हुशारीने जहाजाची कमान सांभाळली. जहाजाचा मालक त्याच्यावर जाम खूश झाला. त्याने त्यालाच कॅप्टन करून टाकले. आता डँगलर इर्षेने पुरता बेभान झाला.त्याने  एडमंडला गोत्यात आणायचा   विढा उचलला.
एडमंडचे वडिलसुद्धा त्याच्या कर्तबगारीवर खूश झाले. ते एडमंडला म्हणाले. " बेटा, आता तू मर्सीडीसशी लग्न करावंस." एडमंडचा तिच्याशी विवाह पक्का झाला होता. त्यातच आणखी एक तरुण मर्सीडीसशी विवाह करण्यास इच्छुक होता. त्याचं नाव होतं फर्नांड. पण मर्सीडीसलाही एडमंडशीच विवाह करायचा होता.
फर्नांड डँगलरचा मित्र होता. त्याने त्याला सारी हकीकत सांगितली. एडमंडचा काटा काढण्याचे दोघांनी ठरवले. त्याने एलबा टापूत लपलेल्या सरकारविरोधी -विद्रोही नेत्याचे एक गुप्त पत्र आणले आहे. पोलिसांना याची खबर दिल्यास ते त्याला तात्काळ अटक करतील्.दोघांनी आपली योजना प्रत्यक्षात आणली. पोलिसांनी एडमंडला अटक केली. त्याला ज्या दिवशी अटक करण्यात आली होती, त्याच दिवशी त्याचा विवाह होणार होता. पोलिसांनी त्याला न्यायाधीशांसमोर उभे केले. न्यायाधीश विलेफोर्ट एडमंडला म्हणाले, " हे पत्र मी जाळून टाकतो. उद्या तुझी मुक्तता होईल."
एड्मंड सकाळी सुटण्याच्या आशेवर सारी रात्र तुरुंगात काढली. सकाळी चार पोलिस आले. त्याला गाडीत बसवले आणि  निघाले. एडमंड त्यांना म्हणाला, " कशाला माझ्यासाठी तसदी घेता. जाईन मी एकटा."  एक पोलिस  शिपाई म्हणाला," आम्ही तुला तुझ्या घरी नेत नाही आहोत, तर किल्ल्याच्या बंदीखान्यात घेऊन चाललो आहोत."
काही वेळाने त्याला एका छोट्याशा बेटावर नेण्यात आले. तिथल्या एका भग्न किल्ल्यातल्या बंदीखान्यात बंद करण्यात आले. तुरुंगात त्याला अगदी वेड्यासारखं झालं.
एक दिवस एडमंडच्या कोठडीच्या भिंतीवर घाव मारले जात असल्याचा आवाज येऊ लागला. तो समजून चुकला की, कोणी तरी कैदी पळून जाण्यासाठी मार्ग काढीत आहे. एडमंडने त्याला मदत करण्याचे ठरवले. त्याने त्याच्यासाठी येणार्‍या जेवणाच्या ताटाचे मोठ्या प्रयासाने दोन भाग केले. व त्या तुकड्याने तो कोठडीच्या भिंतीचे सिमेंट खरडवून काढू लागला. काही दिवसांनंतर भिंतीचा दगड सैल झाला.
एक दिवस एडमंडने दगड काढला. आता तो पुढच्या योजनेवर विचार करू लागला. त्याच्वेळेला एक हडकुळा वृद्ध त्या छिद्रातून त्याच्या खोलीत आला. वृद्धकैदाने आपली ओळख सांगितली. तो चाळीस वर्षांपासून तुरुंगात होता. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या अवगत होत्या. वृद्ध त्याला या विद्या शिकवू लागला. त्याने एडमंडला एका खजिन्याचे रहस्य सांगितले. हा खजिना मोंटे क्रिस्टो नावाच्या बेटावर होता.
एके रात्री  वृद्धाचा मृत्यू झाला. तुरुंगातल्या कर्मचार्‍यांनी वृद्धाचा मृतदेह एका  तरटात गुंडाळून ठेवला. सकाळ झाल्यावर तो समुद्रात फेकणार होते. त्याने त्या वृद्धाचा मृतदेह आपला अंथरुणावर झोपवला. व वरून त्यावर चादर ओढली. नंतर तरट स्वता: भोवती गुंडाळून घेऊन निपचिप पडून राहिला. त्याने स्वता:जवळ एक चाकू ठेवला.
सकाळी कर्मचार्‍यांनी तरटातला मृतदेह उचलला. त्याला भलामोठा दगड बांधला आणि समुद्रात लोटून दिला. एडमंड तयारच होता. त्याने चाकूने दगडाची दोर कापली आणि पोहत वर आला. काही अंतरावर एक झाड उभे होते. तो पोहत तिकडे गेला. जहाजेत चढल्यावर एडमंडने तिथे त्याने हमालीचे काम पत्करले. काही दिवसांनी जहाज तेथून पुढच्या  प्रवासाला निघाले. बर्‍याच दिवसानंतरच्या प्रवासानंतर जहाज मोंटे क्रिस्टोच्या किनार्‍याला लागले. एडमंडला खजिन्याची आठवण झाली. त्याने कॅप्टनसमोर आजारी असल्याची बतावणी केली. आणि बेटावर उतरला. मात्र परतताना  त्याला  सोबत नेण्याची विनंती केली.    कॅप्टन तयार झाला.
 जहाज निघून जाताच एडमंडने वृद्धाद्वारा सांगितलेल्या निशाणांचा शोध सुरू केला. लवकरच त्याला ती गुहा सापडली. सांगितलेल्या ठिकाणी खणले असता त्याला तिथे एक लोखंडी संदूक मिळाली. त्यात हिरे-जवाहीर आणि सोन्याची नाणी होती. एडमंड या खजिन्याच्यामदतीने आपल्या शत्रूंचा सूड घेऊ शकणार होता. त्याने काही हिर्‍यांनी आपले खिसे भरले. एका थैलीत सोन्याची नाणी भरली. राहिलेले धन तिथेच लपवून ठेवले. आणि समुद्र किनारी येऊन जहाजाची प्रतीक्षा करीत राहिला. जहाज आले. कॅप्टन त्याला घ्यायला विसरला नाही. काही दिवसांनी यथावकाश जहाज फान्सला पोहोचले.
एडमंद नोकरी सोडून पॅरीसला आला. तिथे त्याने एक अलिशान बंगला भाड्याने घेतला. त्यात तो अगदी ऐशआरामात राहू लागला. आता त्याने काऊंट ऑफ मोंटे क्रिस्टो असे नाव धारण केले. यादरम्यान त्याने आपल्याला कोणाकोणामुळे तुरुंगवास भोगावा लागला, याचा शोध घेतला.
सगळ्यात अगोदर त्याने कुणाचा बदला घेतला असेल तर तो डँगलरचा. त्याच्या व्यापाराचे सारे शेअर्स शेअरबाजारात पाडले. एका रात्रीत डँगलर रावाचा रंक झाला. आता फर्नांडची पाळी होती. एडमंडला कळले की, फर्नाडने एका कॅप्टनचा खून करून त्याची सगळी संपत्ती हडप केली होती. त्याने वृतपत्रांमध्ये पुराव्यासह फर्नांडच्या गुन्ह्यांचा पर्दापाश केला. बदनामी झाल्याने फर्नांडने आत्महत्या केली. 
या दोघांचा सूड उगवल्यानंतर एडमंडने मॅजिस्ट्रेट विलेफोर्टकडे आपला मोर्चा वळविला. विलेफोर्टच्या पहिल्या पत्नीपासूनची एक मुलगी होती. तिचे नाव वॅलेंटाइन. पण सगळे तिला वॅलेन या नावानेच हाक मारित.
वॅलेनला आपल्या वडिलोपार्जित लाखोची संपत्ती मिळणार होती. विलेफोर्टची दुसरी पत्नी ही संपत्ती हडपण्याच्या तयारीत होती. बोलता बोलता एडमंड तिला म्हणाला, " माझ्याकडे एकप्रकारचे विष आहे. ते शरीरावर हळूहळू परिणाम करतं आणि माणसाला मारतं." हे ऐकून विलेफोर्टच्या पत्नीचे डोळे दिपून गेले. तिच्यापुढे वॅलेनची संपत्ती नाचू लागली. ती पार हरखून गेली. त्याच्याकडे तिने विषाची मागणी केली. त्यासाठी ती पाहिजे किंमत मोजायला तयार झाली.
काही दिवसांनंतर विलेफोर्टच्या घरात एकानंतर एक अशा तिघाजणांचा मृत्यू झाला. यात वॅलेनचे आजी-आजोबा मृत्यू पावले. शिवाय एका नोकराचाही जीव गेला. वॅलेनसुद्धा आजारी पडली. पण एडमंड्ने तिला वाचवले. वॅलेन मॅक्स नावाच्या एका तरुणावर प्रेम करीत होती. तो त्याच्या जुन्या कॅप्टनचा मुलगा होता.
एडमंड वॅलेनच्या खोलीत लपून राहायचा.तिची सावत्र आई पिण्याच्या पाण्यात विष मिसळून जायची. एडमंड ते पाणी फेकून द्यायचा. विलेफोर्टला मारण्याचा त्याचा बेत होता. पण वॅलेन बापावर खूप प्रेम करीत होती. वडिल गेल्यावर वॅलेन वेडीपिसी होईल, अशी त्याला भीती वाटू लागली. त्यामुळे त्याने दुसरा डाव टाकला. सारी हकीकत वॅलेनला सांगितली. तो म्हणाला," मी तुला एक औषध देतो की ज्यामुळे सारे तुला मृत समजतील. पण तू अजिबात घाबरू नकोस. मी तुला कब्रेतून बाहेर काढीन."
सगळ्या गोष्टी एडमंडच्या म्हणण्यानुसार घडल्या. वॅलन मृत झाली असे समजून विलेफोर्टला अतीव दु: ख झाले. एडमंडने त्याला धीर देत  वॅलेनला त्याच्या दुसर्‍या पत्नीने विष पाजून मारल्याचे सांगितले. मग त्याने आपली खरी ओळख करून दिली. त्याने असे का केले, हेही विलेफोर्टला सांगून टाकले. सागळा प्रकार ऐकून विलेफोर्टच्या डोक्यावर परिणाम झाला. तो आरडत्-ओरड्त रस्त्यावर आला आणि एका गाडीखाली सापडून ठार झाला. 
विलेफोर्टचे छिन्नविछिन्न मृतदेह पाहून त्याचे हृदय द्रवले. त्याने विचार केला की, मनुष्याच्या वाईट कृत्याबद्दल शिक्षा करण्याचा मला कय हक्क आहे. ज्याने माणसाची निर्मिती केली, त्यालाच त्याचा जीव घेण्याचा अधिकार आहे.  त्याला वाटले, आपण आपल्या शत्रूला खूपच मोठी शिक्षा ठोठावली.
एडमंदने वॅलेनला कब्रेतून बाहेर काढले. तिला  मुलगी मानून आपल्या घरी आणले. ती खडखडीत बरी झाल्यावर तिचा विवाह मोठ्या थाटामाटात मॅक्सशी करून दिला.त्याने  आपली सगळी संपत्ती लोककल्याणासाठी दान केली.  ( विदेशी कथा: फ्रेंच लेखक ऍलेक्झांडर ड्यूमा)  अनुवाद - मच्छिंद्र ऐनापुरे

Saturday, October 22, 2011

लोककथा साधूबाबांचा शाप

जारो वर्षांपूर्वी एका जंगलात एक साधू राहत होते. त्याचा बराचसा वेळ ध्यानधारणा  करण्यात जात असे. त्यांनी आपल्या झोपडी परिसरात  खुपसे पशू-पक्षी सांभाळले होते. ते त्यांची खूप काळजी घेत. पशू-पक्षीसुद्धा तितकेच त्यांच्यावर प्रेम करत. त्यांची सेवा करत.  मदत करत. कोण त्यांच्यासाठी ताजीताजी फळे तोडून आणत असे. कोण अन्नाचे दाणे आणत तर कोण कंदमुळे.  सगळेच जे जे काही आणत, ते साधूबाबांसमोर ठेवत.  बाबा त्यातले थोडेसे आपल्यासाठी  ठेवत आणि बाकीचे सगळे त्यांच्यात वाटून टाकत. प्राणी त्यांना प्रेमाने साधूबाबा म्हणत. अशाप्रकारे काही वर्षे गेली.
एक दिवस साधूबाबांनी पाहिले की, पशू-पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. बाब मोठी गंभीर होती. त्यांनी प्राण्यांना रात्रीची गस्त घालण्यास सांगितले. हलकू घोड्याला पूर्व भागाचा पहारा देण्यास सांगितले. झबरु कुत्र्याला पश्चिम, गदू अस्वलाला उत्तर आणि दक्षिण  भागाची जबाबदारी  जंबो हत्तीवर सोपवली.
दुसर्‍याचदिवशी  पशू-पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी  साधूबाबा स्वतः जंगलात फेरफटका  मारायला निघाले. साधूबाबा पूर्व दिशेला आले, तेव्हा त्यांना हलकू घोडा मऊशार  गवतावर आरामात झोपला असल्याचे दिसले. साधूबाबांना खूप वाईट वाटले. जवळूनच शिकार्‍यांच्या पावलांचा ठसे गेल्याचे साधूबाबांनी  पाहिले.  त्यांनी त्याला उठवले. हलकू खडबडून जागा झाला. बाबा म्हणाले, " काय हलकू, पहारा दिलास नाहीस वाटत ?" हलकू अडखळत बोलला," नाही...  नाही साधूबाबा, रात्रभर जागलो होतो. बस्स ! आता जरा डोळा लागला होता." 
साधूबाबा म्हणाले," मला खोटे बोलू नकोस. तू रात्रीचा  पहारा दिला नाहीस. " अशाप्रकारे साधूबाबांनी त्याला खरे बोलण्यास सांगितले. पण हलकू त्यांच्यापुढे खोटेच बोलत राहिला. साधूबाबांना राग अनावर झाला. ते म्हणाले, " एका साधूपुढे तू खोटे बोलतोस.जा,  निघून जा इथून. माझ्या डोळ्यांसमोर अजिबात थांबू नकोस. इथून पुढे  असा आडवा होऊन  कधीच आरामात झोपणार नाहीस. झोप आली तरी तू उभ्या उभ्याच झोप घेशील. हा माझा शाप आहे तुला."  हलकू घाबरला. रडला. गडगडला, " बाबा, मला माफ करा.  यापुढे अशी  चूक कदापि होणार नाही. मला माफ करा..."      पण हलकूवर साधूबाबा इतके रागावले होते की, त्याला त्यांनी अजिबात माफ केलं नाही. त्यादिवसांपासून घोडा कधी आडवा होऊन झोपला नाही. _ मच्छिंद्र ऐनापुरे, जत

Friday, October 21, 2011

बालकथा अधिकार्‍याची लबाडी

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मगध देशातल्या एका गावातले बहुतांश लोक चोर्‍या-मार्‍या करत. दरोडे घालत. अधिकार्‍याला लाच देऊन शिक्षेपासून स्वतः चा बचाव करत. दुर्लक्षामुळे गावात सगळीकडे अस्वच्छता पसरली होती. दुर्गंधी वाढली होती. चोर आणि गावची अवकळा यामुळे गावाची सार्‍या पंचक्रोशीत बदनामी झाली होती.
याच गावात माघ नावाची एक व्यक्ती राहत होती. गावातल्या लोकांना सन्मार्गाला लावण्याचा त्याने संकल्प केला. पहिल्यांदा कुणाचीच मदत न घेता, सारा गाव स्वच्छ करून टाकला. गावात सावली देणारी झाडे लावली. गाव लख्ख , चकचकीत पाहून लोकांनासुद्धा मोठा आनंद झाला. त्याची नि: स्वार्थ सेवा पाहून त्याच्याकडे काही तरुण आकृष्ट झाले. ते सगळे माघच्या नेतृत्वाखाली गावची सेवा करू लागले. एकाला एक करत सगळा तरुण वर्ग यात सामिल झाला. माघच्या कष्टाला, जिद्दीला फळ आले. गावची परिस्थिती सुधारली. गावाने विकासाची वाट धरली. रोगराई पळून गेली. लोकांची मानसिकता बदलली. त्यांनी चोर्‍या-मार्‍या  सोडून दिल्या. गावात सुख-शांती नांदू लागली.
माणसे सुधारल्याने अधिकार्‍याची पंचाईत झाली. वरकमाई बंद झाली. त्याने माघचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने राजाकडे  जाऊन तक्रार केली. " माहाराज, आमच्या गावात अराजकता माजली आहे. माघ  नावाच्या दरोडेखोराने तरुणांना फूस लावून  आपल्या नादी लावले आहे. या  तरुणांनी सार्‍या गावात धुमाकूळ घातला आहे. हातात हत्यारे घेऊन गावभर हिंडतात व दहशत पसरवात. त्यांच्यामुळे लोकांचा जीव आणि माल  धोक्यात आला आहे. तुम्हाला सुचित करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून कानावर घालायला आलो आहे."
राजाने त्यांना बंदी बनवून  हत्तीच्या पायाखाली देण्याचे फर्मान सोडले.प्रत्यक्षात हत्ती त्यांना काहीही न करता लांब जाऊन उभा राहिला. राजाला  कळल्यावर त्याला मोठा आश्चर्याचा धक्का बसला. त्याने त्यांना दरबारात हजर करण्याचे आदेश दिले. माघसह सगळे दरबारात हजर झाले.
" सांगा, हत्ती तुम्हाला का घाबरला ?  तुम्ही कुठला जदूटॉणा जाणता? की मंत्र-तंत्र जाणता ?  सांगा, नाही तर इथेच सार्‍यांचा शिरच्छेद केला जाईल. " राजा संतापून म्हणाला.
माघ पुढे झाला. आणि म्हणाला, "  होय महाराज, आम्ही एक मंत्र जाणतो. आम्ही प्राण्यांची हिंसा न करण्याचा मंत्र जाणतो. कुणाशी वाईट वागत नाही.  प्रेमाने वागतो. दान करतो, रस्ते बनवतो. तलाव खोलतो. हीच आमची शक्ती, हाच आमचा मंत्र."
उत्तर ऐकून राजा बुचाकाळ्यात पडला. त्याने विचारले, " आम्ही ऐकलंय की तुम्ही वाटसरूंना लुटता. हत्यारे दाखवून दहशत माजवता. संपत्ती लुटता. "
" महाराज, आपण कुणाच्या तरी सांगण्यावर विश्वास ठेवला आहात. मात्र त्यातली सत्यता पडताळली नाहीत. " माघ म्हणाला.
" तुमच्याकडे हत्यारे पाहिली गेली आहेत. त्यामुळेच चौकशीची गरज भासली नाही. " राजा म्हणाला.
माघ समजावणीच्या सुरात म्हणाला," महाराज, कुर्‍हाडीने आम्ही रस्त्याच्या दुतर्फा माजलेली झाडे-झुडपे हटवतो. रस्ते बनवतो. तलाव खोदतो. घरे बांधतो. यासाठी लागणारी आवश्यक साधने आमच्यासोबत असतात."
राजाने अधिक चौकशी केल्यावर समजले की अधिकारी स्वतः च गुन्हेगार आहे. त्याने अधिकार्‍याला शिक्षा देण्याचे आदेश दिले. राजा तरुणांकडे वळून म्हणाला," जा, तुमच्या गावचा कारभार तुम्ही स्वतः पहा." सोबत जाताना त्याने त्यांना तो हत्तीसुद्धा भेटीदाखल देऊन टाकला.  - मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

Wednesday, October 19, 2011

ब्रिटनच्या पालकांना हवा 'छडी' वाला मास्तर

ब्रिटनमध्ये अलिकडेच झालेल्या एका सर्व्हेक्षणात ५० टक्के लोकांनी शाळकरी मुलांसाठी शिक्षकांनी पुन्हा एकदा हातात छडी घ्यावी अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. तिथल्या सरकारी शाळांमध्ये छडीच्या शिक्षेवर प्रतिबंध करणारा कायदा अस्तित्वात आहे. खासगी शाळांना सुद्धा हा कायदा लागू आहे. मुलांसाठी हातात छडी घेण्याच्या विरोधात मोठं बहुमत होतं, असं मूळीच नव्हतं. संसदेत यासंबंधात ठेवण्यात आलेला प्रस्ताव केवळ एका मताने मंजूर करण्यात आला होता. मुलांना शिक्षा केली जावी, या बाजूच्या सांसदांना राजपुत्र अँड्यूच्या शाही विवाहाच्या तयारीच्या चाललेल्या खटपटीत ट्रॅफिकमध्ये अडकावे लागले होते. तर कडक शिस्तीच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर अमेरिकेच्या प्रथम नागरिक नॅन्सी रेगन यांच्या पाहुणचारात अडकल्याने त्यांनी संसदेत उपस्थित राहता आले नव्हते. या दरम्यान शिक्षेविरोधी विधेयक एका मताने संसदेत संमत झाले.
केवळ छडीच्या शिक्षेला विरोध नव्हता तर मुलांना थप्पड मारणे, शरीरावर अन्यत्र मारहाण करणे अशा सारख्या अनेक प्रकारच्या हिंसक शिक्षेला या विधेयकाद्वारे अटकाव करण्यात आला. पण आता काही लोक पुन्हा तीच हिंसक शिक्षा वैध करण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त कराताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे असे की, मुलांमध्ये शिक्षक अथवा मोठ्यांच्या प्रति आदर, भीती राहिलेली नाही. बेशिस्तपणा, खोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत्.त्यामुळेव त्यांना वठणीवर आणण्यासाठी पुन्हा शिक्षकांनी छडी हातात घ्यावी.
पंचविस वर्षापूर्वी शिक्षेच्या ज्या प्रथेला मनाई करण्यात आली , तीच प्रथा पुन्हा सुरू व्हावी, अशी इच्छा व्यक्त केलं जाणं, आणि तेही ब्रिटनसारख्या विकसित , उदारवादी आणि प्रगतशील समजल्या जाणार्‍या देशात , हे ऐकल्यावर निश्चितच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ब्रिटनबरोबरच आणखी काही देशांनी शाळेत मुलांच्या शिक्षेला बंदी घातली आहे. याबबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. काही देशांमध्ये आई-वडील शिक्षा करू शकतात पण शिक्षकांनी नाही, तर काही देशांमध्ये विशिष्ट वयापर्यंत शिक्षा करावी त्याआगोदर अथवा नंतर नको, या व अशा अनेक प्रकारच्या चर्चा झोडल्या जात आहेत. काही देशांमध्ये शिक्षेला प्रतिबंध करणारे कायदे आहेत, पण त्याचे पालन होताना दिसत नाही.
शारीरिक मजबुतीच्या युगात शिस्तीच्या नावाखाली मुलांना शिक्षा करणं, योग्यच होतं. त्या काळी बळावरच योग्य- अयोग्यचा फैसला केला जात होता. हाच सिद्धान्त सर्वत्र स्वीकार्य होता. त्याकाळात मुलांची गैरवगणूक, बेशिस्त यासठी मारझोड स्वाभाविक होती. पुढे माणूस सभ्य आणि सुसंस्कृत होत चालला तसतसे मुलांच्या शिक्षेच्या प्रकारात बदल होत गेले. यातही सभ्यता आली. अन्य कामात सुसभ्यता आणि सुसंस्कृतीचा आग्रह धरायला हरकत नाही, पण भावी पिढी चांगली घडावी, शिक्षेची अदिम परंपरा कायम राहावी, असे काहींचे म्हणणे पडले. आपल्या देशातही मुलांच्या शिक्षेबाबत मोठा बदल आला आहे. सक्तीच्या मोफत शिक्षण विधेयकामुळे छडी तर बाजूलाच राहुद्या, आता त्याला अपशब्दही बोलायचे नाहीत. छडीमुळे विद्यार्थी अभ्यासाकडे जरी वळत असला तरी अनेक विद्यार्थी त्याचा ताण घेतात आणि त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी केवळ छडीच्या भीतीने शाळेपासून लांब गेले आहेत. आज शाळांमध्ये मुलांच्या शारीरिक मारहाणीवर मनाई करण्यात आली असली तरीही ग्रामीण अथवा शहरातील मॉडर्न शाळांमध्ये मुलांना मारहाण केल्याचे किस्से ऐकायला मिळतात. शिक्षकांनी शिक्षा केल्यामुळे मनाला वाईट वाटून मुलांनी आत्महत्या केल्याच्या काही घटनाही घडल्या आहेत.
" छडी लागे छमचाम, विद्या येई घमघम" या उक्तीवर जुन्या- जाणत्या माणसांचा आजही ठाम विश्वास आहे. अभ्यास न करणार्‍या, शिस्त मोडणार्‍या आणि बिघडलेल्या मुलांना वठणीवर आणण्यासाठी चाडीच उपयोगाची आहे, अशी त्यांची पक्की धरणा आहे. मुलांनी शिकावं, यासाठी " छडी" महत्त्वाची आणि आवश्यक आहे. नाही तर मुलं बिघडतील, अज्ञानी राहतील. आज छडी हद्दपार झाल्यामुळे नको ते विदारक चित्र समोर येत आहे. , असा त्यांचा दावा आहे.
 पूर्वी शिक्षक म्हटला की, हातात छडी अशी एक प्रतिमाच डोळ्यांसमोर उभी राहत असे. याला खूप काळ लोटला आहे, असेही नाही. पण आज छडीची सद्दी संपली आहे. , यात तथ्य आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, स्पेयर द रॉड अँड स्पॉईल द चाइल्ड. ( छडीचा उपयोग केला नाहीत तर मुलं बिघडवाल.) या म्हणीनं दीर्घकाळ तिच्या समर्थकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत.
मुलांना शिस्त लावण्यासाठी व त्याला एक चांगला नागरिक बनविण्यासाठी मारण्याची शिक्षा करण्याव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या शारीरिक शिक्षा केल्या जातात, पण मुले त्याला बधताना दिसत नाहेत. वर्गात बेंचवर उभा केल्याने त्याला वर्गाचा टॉप अँगलचा देखावा पाहायल मिळेल, पण त्याला आपली चूक दिसेल , असे नाही. हात वर करून उभे राहिल्याने भलेही त्याच्या हातातला रक्तप्रवाह कमी होईल, पण त्याच्या डोक्यात विद्येचा प्रवाह वाढेल, याची शाश्वती काय ? गुडघ्या वर उभारल्याने गुडघा दुखेल परंतु , त्याचा हट्टीपणा गुडघे टेकील, याचा काय भरवसा ?
क्लासबाहेर हाकल्याने त्याच्या खोडगुणी स्वभावाला खतपाणी घालण्यासारखंच आहे. " तारे जमीं पर" चे एक दृश्य लक्षात आहे का पहा, विद्यार्थ्याला बाहेर काढल्यावर तिथेच तो ब्रेक डान्स करायला लागतो. एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकदम वर्गाबाहेर काढणं म्हणजे तर सामुहिक गोंधळाला निमंत्रणच म्हणावे लागेल.यात मुलांना ताळ्यावर आणण्यासाठी  " कोंबड्या" च्या शिक्षेचे योगदान कसे विसरता येईल. पण आता मुलं या सार्‍या शिक्षा चेष्टेवारी नेताना दिसत आहेत. या शिक्षा निष्प्रभ बनल्या आहेत. त्यामुळेच ब्रिटनवासियांना " छडी' खुणावू लागली आहे. मुलाला शिस्त लावायची असेल, त्याची  आभ्यासातील प्रगती साधायची असेल आणि बिघडलेल्या पोराला ताल्यावर आणायचे असेल तर " छडी लागे छमछम, विद्या येई घमघम", याशिवाय पर्याय नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास बसला आहे.
                                                      - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

Saturday, October 15, 2011

संगणक विश्वातल्या 'आकाशा' ला गवसणी


     भारताने सगळ्यात छोटा कॉम्प्युटर म्हणजे टॅबलेट पीसी बनवून सार्‍या विश्वाला आश्चर्यात टाकले आहे. 2 हजार 250 रुपयांचा हा कॉम्प्युटर देशातल्या विद्यार्थ्यांना केवळ 1100 -1400  रुपयांमध्ये मिळणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी खरोखरच ही एक दिवाळी गिफ्ट म्हटली पाहिजे. कारण इतक्या स्वस्त टेबलेट पीसीची कधी कोणी कल्पनाही केली नव्हती. आज सार्‍या जगातला युवा वर्ग टॅबलेट पीसीचा दिवाना आहे. परंतु, मोठमोठ्या कंपन्यांचे टॅबलेट पीसी 10 हजारापसून  30-35  हजारापर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. अशा वेळेला अगदीच स्वस्तात तो बाजारात येणं , ही आजच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
    भारत सरकार या टॅबलेट पीसीची पन्नास टक्के रक्कम स्वतः भरून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे त्यांना हा टॅबलेट निम्म्या किंमतीलाच मिळणार आहे. आजच्या मोबाईल क्रांतिच्या जगतात, ही रक्कम फारशी मोठी नाही. कारण एवढ्या किंमतीचे मोबाईल विद्यार्थ्यांच्या खिशात आरामात स्थिरावले आहेत. सरकारच्या या टॅबलेट पीसीच्या वितरणामुळे देशातल्या अत्यंत गरीब विद्यार्थ्यांनाही नवे तंत्रज्ञान हाताळता येणार आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
    देशात अगोदरच मोबाइल क्रांती घरोघरी पोहचली आहे. परंतु, इलेक्ट्रॉनिक साधने अथवा त्यांच्या हाताळण्याबबतचा अनुभव यात मोठी असमानता आहे. याला आपण डीजिटल असमानता म्हणू. सरकार जर या टॅबलेटचे प्रेझेंटेशन किंवा यासाठी योग्य योग्यप्रकारे प्रोत्साहित नक्कीच मदत हो ऊ शकेल. सध्या ई-लर्निंग आणि ई-गव्हर्नर्सचा जमाना येऊ घातला आहे. अशा वेळेला एक स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रॉनिक उपकरण हाताला येणं संपूर्ण समाजाच्यादृष्टीने लाभदायक ठरू शकणार आहे.
    आयआयटी ( राजस्थान) आणि दुसर्‍या प्रमुख संस्थांच्या मदतीने बनविण्यात आलेल्या या टॅबलेट पीसीचे नामकरण 'आकाश' असे करण्यात आले आहे.  हे उपकरण  खरोखरच कॉम्प्युटर आणि टॅबलेटच्या 'आकाशा'त आपले स्थान भक्कम करण्यात किती सक्षम होईल ? हे आता आपल्याला पाहयचं आहे.    आकाश आपल्या घरातल्या कॉम्प्युटर इतका शक्तिशाली नाही. शिवाय बड्या ब्रँडशी स्पर्धाही करू शकणार नाही. पण काही उणीवा असल्या तरीही आयपॉडप्रमाणे काम करण्याची ताकद त्याच्यात आहे. आकाश ऑपरेटिंग सिस्टिम - गुगल  2.2 वर चालतो. एका टॅबलेटसाठी ही योग्य अशी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. यात प्रोसेसर - 366 मेगाहटर्ज इतका आहे. आयपॉड आणि महागड्या टॅबलेटसमध्ये साधारण्तः एक गीगाहर्टजचा प्रोसेसर असतो. यामुळे साहजिकच आकाश सुपरफास्ट स्पीडने काम करू शकणार नाही, पण ज्या उद्देशाने 'आकाश'ची निर्मिती करण्यात आली आहे, तो उद्देश मात्र सफल होणार आहे. त्यासाठी फास्ट स्पीडची गरज भासणार नाही. सामन्य नेट सर्फिंग आणि शिक्षण इत्यादी कामांसाठी आकाश आपल्या सात इंचाच्या स्क्रिनवर आवश्यक तो स्पीड देऊ शकतो.
   खरे तर यात विद्यार्थ्यांसाठी काही इनबिल्ट ऍप्लिकेशन्स आहेत. टच स्क्रिनबाबतीत हा महागड्या टॅबलेटचा सामना करू शकणार नाही.याला रेजेस्टीन स्क्रिन देण्यात आली आहे. त्यामुळे स्क्रिनवर जोराने

दाब द्यावा लागणार आहे. साधारणतः केपोस्टीव स्क्रिन योग्य मानले जातात. पण त्याचा वापर या उपकरणात केला असता तर त्याची किंमत वाढली असती.  यात  ग्राफिक ऍक्सिलरेटर, एचडी व्हिडिओ प्रोसेसर आणि मेमरी (रॅम) 256 एमबी रॅम ठेवण्यात आली आहे. स्टोअरेज (इंटर्नल) 2 जीबी फ्लॅश आहे तर  स्टोअरेज (एर्क्स्टनल) 2 जीबी ते 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. आकाश वाय-फाय डिवाईस आहे, परंतु यात 3 जी सुविधा आणि कॅमेरा नाही. यांची कमतरता असूनही हे उपकरण जबरदस्त असे आहे. इंटरनेटच्या जगतात ज्यांना सफर करायची आहे, त्यांच्याशी आकाश चांगला उपयोगाचा ठरणार आहे. आकाशच्या माध्यमातून विद्यार्थी भारतातल्या  1500  महाविद्यालयातील जवळजवळ 70 हजार पुस्तके आणि 2100  ई-जर्नल्सपर्यंत पोहोचू शकतो.
    आकाशची निर्मिती करणारी डेटाविंड नावाची कंपनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टेलिकॉम कंपन्यांच्या सहाय्यने 'आकाश'ला बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे. लोकांच्या हाती पडल्यावरच आकाशची उपयुक्तता आणि त्याच्या क्षमतेचा अंदाज लक्षात येणार आहे.सरकार मुलांसाठी स्वस्त कॉम्प्युटरबाबत  विचार करत होते. मात्र ते हवेतच विरून गेले. हा टॅबलेट पीसी मात्र भारतातल्याच नव्हे तर जगातल्या मुलांसाठीही उपयोगाचा ठरणार आहे.          
                                                             - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
aapala vartahar,mumbai, 15/10/2011

यशस्वी स्त्रीच्यामागे पुरुष

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते.पण अशाही काही महिला आहेत, ज्यांना यशाच्या शिखरावर पोहचवण्यात पुरुषांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशाच काही परिचित हस्तींच्या  'हमसफर' प्रवासाची चर्चा करणार आहोत.
डॉ.श्याम लुल्ला हे प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला हिचे पती. पेशाने डोक्टर. मानसशास्त्रतज्ज्ञ डॉ. लुल्ला एक मोकळ्या विचाराचे व्यक्तीमत्त्व. त्यांनी लग्नानंतर नीताला तिची स्वतःची 'आयडेंटी' निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले. वास्तविक नीता १६ वर्षाची होती, तेव्हा शिक्षण सोडण्याच्या विचारात होती. तिच्या वडिलांनी तिला शेवटी लग्न नाहीतर उच्च शिक्षण यापैकी कुठलाही एक पर्याय निवडण्यास सांगितले. नीताने आनंदाने लग्नाचा पर्याय स्वीकारला. पण श्याम आणि त्यांच्या कुटूंबाला तिने 'हाऊस वाइफ'चे जिणे जगावं , असे वाटत नव्हते. त्यांना वाटत होतं की, तिने पारंपारिक शिक्षणापेक्षा कुठला  तरी 'हटके'  प्रोफेशनल कोर्स करावा. नंतर नीताने मुंबईच्या एसएनडीटी युनिवर्सिटीमधून फॅशन डिझायनरचा कोर्स पूर्ण केला. आता ती 'सेलिब्रिटीं'ची डिझायनर म्हणून ओळखली जाते. ऐश्वर्या, अभिषेक, श्रीदेवी, जुही चावला, अमीषा पटेल, करिना कपूर यांच्यासह आलिकडच्या अनेल बॉलीवूड ऍक्ट्रेसशिवाय हॉलीवूडच्या कलाकारांची डिझायनर आहे. फॅशन डिझायनिंगमध्ये राष्ट्रीय ऍवार्ड मिळवलेली नीता या सार्‍या यशाचे श्रेय आपल्या पतीराजाला देते. श्याम मानसतज्ज्ञ आहेत. त्यांनी तिची प्रतिभा वेळीच ओळखली नसती तर ती आज ' हाऊस वाईफ'चं जीणं जगत असती.
राजकिशन आणि इंदिरा नूई यांची पहिली भेट अमेरिकेत झाली. राजकिशन इंजिनिअर होते. तर इंदिरा आपली ओळख बनविण्याच्या प्रयत्नात होती. राजकिशन यांना तिचा लढाऊबाणा भावला. व दोघांनी कुटुंबांच्या  संमतीने लग्न केले. आज इंदिराला 'पेप्सीको' या आंतरराष्ट्रीय शीतपेय कंपनीची सीईओ  म्हणून ओळखले जाते. मॅनेजमेंट कन्सलटंट असलेल्या राजकिशन यांनी एक मित्र बनून तिच्या प्रतिभेला   वाट दाखवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं.
बृज बेदी देशातल्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी म्हणून नाव कमावलेल्या आणि आज निवृतीनंतर 'भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण' कार्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत स्वतःला झोकून दिलेल्या किरण बेदींचे पती. किरणने आपल्या मोठ्या बहिणीच्या बेजोड लग्नामुळे  निर्माण झालेल्या कलहाचा परिणाम म्हणून स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचा निर्णय घेतला.  हा शोध बृज बेदींच्याजवळ येऊन थांबला. टेनीसची  खेळाडू असलेल्या किरणवर त्यांनी कुठलीही बंधने घातली नाहीत. " टोम बॉय" प्रमाणे जीवन जगणार्‍या किरणने पोलिस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा बृज बेदींसह घरच्या सार्‍यांनी तिला पाठिंबा दिला. किरणने आपल्या कर्तव्याला अग्रक्रम दिला, कारण मागे सारी कुटुंबाची जबाबदारी साम्भालायला बृज बेदी सक्षम होते. ती कामामुळे नेहमी घरापासून दूर असे, पण तिच्या पती-बृज बेदीं यांनी कुटुंबाची सारी जबाबदारी आपला व्यवसाय सांभाळत चोख पार पाडली. बृज यांनी तिच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. किरण ज्या ज्या गोष्टीची हक्कदार आहे, ते सारं तिला मिळावं, यासाठी त्यांची धडपड असे.
राजेश त्यागी वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीचे पती. स्वतः वेटलिफ्टिंगमध्ये अनेक पदके पटकावली आहेत. महाविद्यालयीन स्तरावर  त्यांनी राष्ट्रीय चॅम्पियनचा किताब पटकावला आहे. कर्णमने त्यांच्याकडूनच वेटलिफ्टिंगचे धडे गिरवले. याच दरम्यान दोघांनी एकमेकाला जोडीदार निवडले आणि लग्न करण्याचे ठरवले. घरचा प्रखर विरोध असूनही राजेश यांनी कर्णमशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी तिच्या करिअरकडे अधिक लक्ष देण्याला प्राधान्य दिले. सिडनीत कास्यपदक पटकावून कर्णमने देशात नाव कमावले. शिवाय आपल्या पतीचा विश्वासही सार्थ ठरवला.
प्रसिद्ध वायलिनिस्ट आणि पेशाने डॉक्टर असलेले डॉ. एल सुब्रम्हण्यम विख्यात गायिका कविता कृष्णमूर्ती हिचे हमसफर आहेत. काव्य आणि संगीत यांनी त्यांना एकमेकांजवळ आणलं. सुब्रम्हण्यम यांच्यासाठी कविताला हरिहरनसोबत एक गीत गायचे होते. समोर प्रसिद्ध वायलिनिस्ट असल्यानं कविताला मोठं टेन्शन आलं होतं. त्यांच्या मनासारखं गाणं होईल का, याची चिंता तिला सतावत होती. पण स्टुडिओत गेल्यावर त्यांचा विनम्र आणि शांत स्वभाव पाहून तिचे टेन्शन कुठच्या कुठे दूर पळाले. याचवेळी तिने आपला जोडीदार असावा तर असा, असे मनोमन ठरवून टाकले. योग जुळून आला आणि दोघे विवाह बद्ध झाले. संगीत दोघांचाही आत्मा. त्यामुळे लग्नानंतरही कविताला गायला मोकळीक मिळाली.  
विश्वविख्यात सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसेनचे पती नासीर हुसेन आयएएस अधिकारी होते. स्टेट टेनिंग कॉर्पोरेशनमध्ये चीफ जनरल मॅनेजर पदावर काम केल्यानंतर ते शहनाजची कंपनी सांभाळत आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न आणि सोळाव्या वर्षी आई बनलेल्या शहनाजला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते की आपण एक दिवस सौंदर्य उद्योगातली एक जानी-मानी शख्सियत होऊ. तेहरानच्या पोस्टींगदरम्यान ऑफिसर नासीर हुसेन कामावरून घरी परतायचे तेव्हा ती नेहमी त्यांची वाट पाहात उभी राहिलेली पाहायला मिळायचे. तिने वाट पाहण्यातच सारे आयुष्य घालवू नये, असे त्यांना वाटत असे. शेवटी त्यांनी तिला कॉस्मेटीकलॉजीच्या अभ्यासासाठी घराबाहेर काढले. लंडन, पॅरीस, न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांमध्ये आणि हेलेना रुबीन्स्टीन आणि क्रिस्टीन वाल्मेसारख्या विश्व प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन केंद्रांमधून या विषयाचे शिक्षण घेऊन भारतात परतल्यावर नासीरच्या मदतीने पहिले सौंदर्य उपचार क्लिनिक उघडले. आणि बघता बघता तिने लोकप्रियतेचे सारे विक्रम मोडले. तिच्या क्लिनिकचा विस्तार विश्वभर झाला आहे. आज शहनाज हुसेन एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक ब्रँडमध्ये म्हणून जगतविख्यात बनली आहे.
केवळ यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, असे नव्हे तर यशस्वी महिलेमागेसुद्धा पुरुष खंबीरपणे उभे असतो, याचीही काही ही वानगी दाखल नावे आहेत, जी कौतुकास पात्र आहेत.
                                                      - मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली