सूर्य मावळतीला पोहचला होता. या वेळेला नावेतून आलेले दोन संन्यासी नदी किनार्याला लागले. त्यातला एक तरुण होता तर दुसरा वृद्ध. त्यांनी नावेतून उतरल्यावर नावाड्याला विचारले," सूर्य मावळण्यापोर्वी आम्ही गावात पोहचू शकू का? ' जवळच गाव होते. गावाभोवती तटबंदी होती. या गावाचा एक नियम होता. सूर्याच्या अस्ताबरोबरच गावाचा मुख्य दरवाजाही बंद केला जात असे. वृद्ध नावाडी म्हणाला, ' तुम्ही सावकाश जाल तर पोहचाल पण वेगाने, घाईगडबडीने जाल तर मात्र पोहचू शकणार नाही.' दोघांनाही आश्चर्य वाटले." हा असे का सांगतो, हा वेडा आहे, ' असा त्यांनी मनात विचार केला. आता याच्या तोंडाला लागण्यात अर्थ नाही असे समजून त्यांनी गावची वाट धरली. वेळेत पोहचण्याच्या इराद्याने ते भरभर चालू लागले. सूर्य मावळण्यापूर्वी पोहचलो नाही तर रात्र गावाबाहेरच काढावी लागेल, या भीतीने ते आणखी वेगाने चालू लागले. इतक्यात वृद्ध संन्यासी ठेच लागून पडला. त्याच्या डोक्यावरचे ग्रंथांचे गाठोडेही पडले. ग्रंथ इतस्तः विखुरले. काहींची पाने वार्याने उडून गेली. तरुण संन्याशाची मोठी तारांबळ उडाली.
मागून नावाडी आपली नाव ठिकाणाला लावून येत होता. तो जवळ आला तेव्हा तरुण संन्यासी वृद्ध संन्याशाच्या पायातील जखम साफ करून पट्टी बांधत होता. नावाडी त्यांना म्हणाला,"" मित्रांनो, मी सांगितले होते की सावकाश जाल तर पोहचाल. आणि घाईगडबड कराल तर मात्र पोहचणार नाही... माझं तुम्ही ऐकलेले नाही.'' तेव्हा दोघांच्या लक्षात आले की, सावकाश चालणे हीसुद्धा एक कला आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment