Tuesday, October 4, 2011

बालकथा एक होती तारका

गोष्ट प्राचीन काळची आहे. एका गावात एक वृद्ध जोडपे राहात होते. त्यांना मूलबाळ नव्हते. पण तरीही ते कुणाला दोष न देता दिवस आनंदात  घालवत  होते.
एका दिवसाची संध्याकाळ. दोघेही शेतातून घरी परतत होते. वाटेत त्यांना एक लाकडी पेटी दिसली. त्यांनी काही वेळ कसलासा विचार केला आणि पेटी उचलून घरी आणली. त्याचे कुलूप फोडून  ती उघडली. आणि पाहतात तर काय , आत सुंदर, गोंडस चिमुरडी  मुलगी शांत झोपली होती. तिला पाहताच दोघांना खूप खूप आनंद  झाला. जणू काही ही सुंदर मुलगी परमेश्वरानेच पाठवली आहे असे त्यांना वाटले. तसे समजूनच देवाचे आभार मानून त्यांनी तिचा सांभाळ करण्याचे ठरवले.
ते तिच्या संगोपनात गर्क झाले. तिला अगदी फुलासारखे जपू लागले. दिवस जात होते, तशी ती मोठी होत होती. ती अधिकच देखणी दिसू लागली. ती त्या दोघा वृद्धांनाच माता-पिता समजू लागली. त्यांच्या प्रत्येक आज्ञेत राहू लागली. शिवाय त्यांची काळजी करू लागली. त्यांना कामात मदत  करू लागली. दोघांनी तिचे नाव तारका ठेवले.
वयात आली तेव्हा तर ती एखाद्या राजकन्येहून अधिक सुंदर दिसू लागली. तिच्या सौंदर्याची कीर्ती सर्व दूर पसरली. तिला मागणी घालण्यासाठी लांब लांबचे राजपुत्र, राजे- महाराजे येऊ लागले.  तिच्या सौंदर्यावर भाळून , तिचा विरह सहन न होऊन कित्येक वेडेपिसे झाले. मात्र तिने कुणालाच दाद दिली नाही. सगळ्यांना तिने स्पष्ट नकार दिला.
एक दिवस त्या राज्याचा सम्राट स्वतः तिला पाहायला आला. तिच्या सौंदर्यावर तोही भाळला. त्याने लगेच तिला लग्नाची मागणी घातली. पण तारकाने त्यालाही नकार दिला. त्याने तिला पळवून नेण्याची धमकी दिली. त्यावर तारका त्याला म्हणाली, ' माझा पती चंद्र आहे. त्या सुधारकाची मी राणी आहे. माझे लग्न त्याच्याशी झाले आहे. मी लवकरच त्याच्याकडे आकाशात परतणार आहे. त्यामुळे राजा अविचार सोडून दे.'
भल्या भल्या राजा- महाराजांना आपले मांडलिकत्व पत्करायला लावणार्‍या सम्राटाचा अहंकार दुखावला. त्याला   तिच्या नकाराचा संताप आला.  त्याने गर्जना केली, ' तू चंद्राकडे जातेसच कशी ते मी पाहतो.' त्याने सिपायांना आदेश दिला. ' तारका आणि त्या चंद्रावर बारीक नजर ठेवा. पळून चालली तर तिला ठार मारा. '
सम्राटाच्या सिपायांनी जागता पाहारा ठेवला. दुसर्‍यादिवशी अंधार होताच, आकाशात ढगांनी गर्दी केली. जोराचा वारा सुटला. लोक सैरावैरा धावू लागले. इतक्यात तारका दिशेने आकाशातून प्रचंड मोठा एक प्रकाशाचा गोळा आला आणि काही क्षणात तारकाला वरती घेऊन गेला.  तिच्यासोबत वृद्ध माता-पिता गेले. शेवटी सम्राटाचा अहंकार आणि क्रोध व्यर्थ गेले. ( जपानी लोककथा)                                                                   - मच्छिंद्र ऐनापुरे, जत    

No comments:

Post a Comment