Tuesday, October 4, 2011

बालकथा एक दिवसाचा राजा

एका गुरूकुलात राजपुत्रासोबत  व्यापार्‍यांची दोन मुलंही अध्ययन करीत होती. अध्ययनाच्या शेवटच्या वर्षी व्यापारीपुत्र राजपुत्रापासून लांब लांब राहू लागले. राजपुत्राने त्यांना कारण विचारले. त्यावर शेठपुत्र म्हणाले,  'तू राजपुत्र आहेस. आज ना उद्या राजा  होशील. आम्ही मात्र व्यापारीच होऊ आणि आपले पोट भरत राहू. कुठे तू आणि कुठे आम्ही. तुझ्यापासून लांब असलेलंच बरं.'   राजपुत्र म्हणाला, ' तुम्ही माझे मित्र आहात. मैत्री राहिली तर भविष्यात कधी ना कधी मी तुम्हाला एक दिवसाचा राजा बनवीन.' ऐकून दोघा मित्रांना खूप आनंद झाला.  अध्ययन पूर्ण झाल्यावर सगळे आपापल्या घरी परतले.
काही काळ लोटला. राजपुत्र राजा बनला. तिकडे शेठपुत्रसुद्धा आपापल्या नगरीतले  शेठ म्हणून ओळखले जाऊ लागले. दिवस जात होते. एक दिवस पहिल्या शेठपुत्राला व्यापारात मोठा तोटा झाला. कर्ज देणार्‍यांनी तगादा लावला. त्याला आपल्या राजपुत्र मित्राची आठवण झाली. तो त्याच्याकडे गेला. आणि आपल्या वचनाची आठवण करून दिली. राजा म्हणाला,' ठीक आहे, आज दिवसभर तू राज्यकारभार सांभाळ.'
शेठपुत्राने पहिल्यांदा कोशाध्यक्षास बोलावणे पाठवले.  शेठपुत्रास  कर्ज दिलेल्या लोकांनाही बोलावण्यात आले. कोषाध्यक्षास राज खजिन्यातून व्याजासह मुद्दल देण्यास सांगितले. त्यानुसार देणेकर्‍यांचे सारे पैसे चुकते करण्यात आले. सगळ्यांना आनंद झाला. काही धन त्याने परोपकारात घालवले. घोडागाडी भरून सोने-चांदी आपल्या घरी पाठवून सुखी आणि संपन्न झाला.
काही दिवसांनी दुसर्‍या व्यापारीपुत्राचा धंदाही डळमळीत होऊ लागला. तोसुद्धा आपल्या राजपुत्र मित्राकडे गेला. वचनाची आठवण करून दिली. राजा म्हणाला, ' उद्या या नगरीचा राजा तू हो.' शेठपुत्र हर्षोल्हासित झाला. दुसर्‍यादिवशी सकाळी उठल्यावर त्याने सेवकांकरवी दाढी केस बनवले. मालिश करवून घेतली. अंघोळ केली. राजवस्त्रे नेसली. नंतर भोजनखान्यात राजेशाही भोजनावर मनसोक्त ताव मारला. यामुळे त्याचे शरीर जड झाले. त्याला झोप येऊ लागली.त्याने विचार केला, थोडा वेळ आराम करावा आणि मग राजदरबारात जाऊन कारभार पाहावा. एक दिवसाचा राजा राजमाहालात जाऊन झोपला. जाग आली तेव्हा सूर्य मावळत होता. तो घाबरला. पण आता त्याच्या हातात काही राहिले नव्हते. कारण त्याची वेळ संपली होती. तो जसा आला , तसा राजमाहालातून बाहेर पडला. त्याने वेळेचे महत्त्व जाणले नाही. ( राजस्थानी लोककथा)
                                                         - मच्छिंद्र ऐनापुरे, जत    


No comments:

Post a Comment