ब्रिटनमध्ये अलिकडेच झालेल्या एका सर्व्हेक्षणात ५० टक्के लोकांनी शाळकरी मुलांसाठी शिक्षकांनी पुन्हा एकदा हातात छडी घ्यावी अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. तिथल्या सरकारी शाळांमध्ये छडीच्या शिक्षेवर प्रतिबंध करणारा कायदा अस्तित्वात आहे. खासगी शाळांना सुद्धा हा कायदा लागू आहे. मुलांसाठी हातात छडी घेण्याच्या विरोधात मोठं बहुमत होतं, असं मूळीच नव्हतं. संसदेत यासंबंधात ठेवण्यात आलेला प्रस्ताव केवळ एका मताने मंजूर करण्यात आला होता. मुलांना शिक्षा केली जावी, या बाजूच्या सांसदांना राजपुत्र अँड्यूच्या शाही विवाहाच्या तयारीच्या चाललेल्या खटपटीत ट्रॅफिकमध्ये अडकावे लागले होते. तर कडक शिस्तीच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर अमेरिकेच्या प्रथम नागरिक नॅन्सी रेगन यांच्या पाहुणचारात अडकल्याने त्यांनी संसदेत उपस्थित राहता आले नव्हते. या दरम्यान शिक्षेविरोधी विधेयक एका मताने संसदेत संमत झाले.
केवळ छडीच्या शिक्षेला विरोध नव्हता तर मुलांना थप्पड मारणे, शरीरावर अन्यत्र मारहाण करणे अशा सारख्या अनेक प्रकारच्या हिंसक शिक्षेला या विधेयकाद्वारे अटकाव करण्यात आला. पण आता काही लोक पुन्हा तीच हिंसक शिक्षा वैध करण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त कराताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे असे की, मुलांमध्ये शिक्षक अथवा मोठ्यांच्या प्रति आदर, भीती राहिलेली नाही. बेशिस्तपणा, खोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत्.त्यामुळेव त्यांना वठणीवर आणण्यासाठी पुन्हा शिक्षकांनी छडी हातात घ्यावी.
पंचविस वर्षापूर्वी शिक्षेच्या ज्या प्रथेला मनाई करण्यात आली , तीच प्रथा पुन्हा सुरू व्हावी, अशी इच्छा व्यक्त केलं जाणं, आणि तेही ब्रिटनसारख्या विकसित , उदारवादी आणि प्रगतशील समजल्या जाणार्या देशात , हे ऐकल्यावर निश्चितच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ब्रिटनबरोबरच आणखी काही देशांनी शाळेत मुलांच्या शिक्षेला बंदी घातली आहे. याबबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. काही देशांमध्ये आई-वडील शिक्षा करू शकतात पण शिक्षकांनी नाही, तर काही देशांमध्ये विशिष्ट वयापर्यंत शिक्षा करावी त्याआगोदर अथवा नंतर नको, या व अशा अनेक प्रकारच्या चर्चा झोडल्या जात आहेत. काही देशांमध्ये शिक्षेला प्रतिबंध करणारे कायदे आहेत, पण त्याचे पालन होताना दिसत नाही.
शारीरिक मजबुतीच्या युगात शिस्तीच्या नावाखाली मुलांना शिक्षा करणं, योग्यच होतं. त्या काळी बळावरच योग्य- अयोग्यचा फैसला केला जात होता. हाच सिद्धान्त सर्वत्र स्वीकार्य होता. त्याकाळात मुलांची गैरवगणूक, बेशिस्त यासठी मारझोड स्वाभाविक होती. पुढे माणूस सभ्य आणि सुसंस्कृत होत चालला तसतसे मुलांच्या शिक्षेच्या प्रकारात बदल होत गेले. यातही सभ्यता आली. अन्य कामात सुसभ्यता आणि सुसंस्कृतीचा आग्रह धरायला हरकत नाही, पण भावी पिढी चांगली घडावी, शिक्षेची अदिम परंपरा कायम राहावी, असे काहींचे म्हणणे पडले. आपल्या देशातही मुलांच्या शिक्षेबाबत मोठा बदल आला आहे. सक्तीच्या मोफत शिक्षण विधेयकामुळे छडी तर बाजूलाच राहुद्या, आता त्याला अपशब्दही बोलायचे नाहीत. छडीमुळे विद्यार्थी अभ्यासाकडे जरी वळत असला तरी अनेक विद्यार्थी त्याचा ताण घेतात आणि त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी केवळ छडीच्या भीतीने शाळेपासून लांब गेले आहेत. आज शाळांमध्ये मुलांच्या शारीरिक मारहाणीवर मनाई करण्यात आली असली तरीही ग्रामीण अथवा शहरातील मॉडर्न शाळांमध्ये मुलांना मारहाण केल्याचे किस्से ऐकायला मिळतात. शिक्षकांनी शिक्षा केल्यामुळे मनाला वाईट वाटून मुलांनी आत्महत्या केल्याच्या काही घटनाही घडल्या आहेत.
" छडी लागे छमचाम, विद्या येई घमघम" या उक्तीवर जुन्या- जाणत्या माणसांचा आजही ठाम विश्वास आहे. अभ्यास न करणार्या, शिस्त मोडणार्या आणि बिघडलेल्या मुलांना वठणीवर आणण्यासाठी चाडीच उपयोगाची आहे, अशी त्यांची पक्की धरणा आहे. मुलांनी शिकावं, यासाठी " छडी" महत्त्वाची आणि आवश्यक आहे. नाही तर मुलं बिघडतील, अज्ञानी राहतील. आज छडी हद्दपार झाल्यामुळे नको ते विदारक चित्र समोर येत आहे. , असा त्यांचा दावा आहे.
पूर्वी शिक्षक म्हटला की, हातात छडी अशी एक प्रतिमाच डोळ्यांसमोर उभी राहत असे. याला खूप काळ लोटला आहे, असेही नाही. पण आज छडीची सद्दी संपली आहे. , यात तथ्य आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, स्पेयर द रॉड अँड स्पॉईल द चाइल्ड. ( छडीचा उपयोग केला नाहीत तर मुलं बिघडवाल.) या म्हणीनं दीर्घकाळ तिच्या समर्थकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत.
मुलांना शिस्त लावण्यासाठी व त्याला एक चांगला नागरिक बनविण्यासाठी मारण्याची शिक्षा करण्याव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या शारीरिक शिक्षा केल्या जातात, पण मुले त्याला बधताना दिसत नाहेत. वर्गात बेंचवर उभा केल्याने त्याला वर्गाचा टॉप अँगलचा देखावा पाहायल मिळेल, पण त्याला आपली चूक दिसेल , असे नाही. हात वर करून उभे राहिल्याने भलेही त्याच्या हातातला रक्तप्रवाह कमी होईल, पण त्याच्या डोक्यात विद्येचा प्रवाह वाढेल, याची शाश्वती काय ? गुडघ्या वर उभारल्याने गुडघा दुखेल परंतु , त्याचा हट्टीपणा गुडघे टेकील, याचा काय भरवसा ?
क्लासबाहेर हाकल्याने त्याच्या खोडगुणी स्वभावाला खतपाणी घालण्यासारखंच आहे. " तारे जमीं पर" चे एक दृश्य लक्षात आहे का पहा, विद्यार्थ्याला बाहेर काढल्यावर तिथेच तो ब्रेक डान्स करायला लागतो. एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकदम वर्गाबाहेर काढणं म्हणजे तर सामुहिक गोंधळाला निमंत्रणच म्हणावे लागेल.यात मुलांना ताळ्यावर आणण्यासाठी " कोंबड्या" च्या शिक्षेचे योगदान कसे विसरता येईल. पण आता मुलं या सार्या शिक्षा चेष्टेवारी नेताना दिसत आहेत. या शिक्षा निष्प्रभ बनल्या आहेत. त्यामुळेच ब्रिटनवासियांना " छडी' खुणावू लागली आहे. मुलाला शिस्त लावायची असेल, त्याची आभ्यासातील प्रगती साधायची असेल आणि बिघडलेल्या पोराला ताल्यावर आणायचे असेल तर " छडी लागे छमछम, विद्या येई घमघम", याशिवाय पर्याय नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास बसला आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment