Tuesday, October 4, 2011

ये दोस्ती हम तो तोडेंगे

अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांचा ' याराना' आपण पाहिला आहे. एकमेकांसाठी सर्वस्व त्यागणार्‍या या मैत्रीमध्ये विघ्नसंतोषी विघ्न आणतात. पण शेवटी मैत्रीचा विजय होतो. ही झाली चित्रपटातली मैत्री. पण 'रियल लाईफ' मध्ये दोस्ती तुटण्याच्या घटना आजूबाजूला सतत घडत असतात.कालचे दोस्त आज एकमेकांची तोंडेसुद्धा पाहायला तयार होत नाहीत. आपल्या अमिताभ आणि अमरसिंग यांच्या मैत्रीचेच उदाहरण घ्या. त्यांच्या मैत्रीला 'अमरप्रेम' म्हटले जायचे. पण काळाने पलटी खाल्ली आणि मैत्रीचे संदर्भही बदलले. बरीच ओरड झाल्यावर अमिताभ अमरसिंगास भेटायला तुरुंगात गेले पण हा नाटकीपणा सार्‍या देशाला कळून आला. अमिताभच्या चित्रपट आणि वास्तव जीवनातला फरकही लक्षात आला. 
भारतीय टेनीस जगतातील महेश भूपती आणि लिएंडर पेस यांच्या मैत्रीची चर्चा सातासमुद्रापार केली जात होती. या दोघांनीही दुहेरीमध्ये आपली हुकूमत ठेवली होती. पण कोण जाणे, काय झालं ? अचानक दोघांच्या मैत्रीत दरार आली. दोघांच्यातले मतभेद चव्हाट्यावर आल्यावर सारेच संपले. दोघांनीही एकमेकांसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर एकमेकांचे तोंड न पाहण्याच्या शपथाही घेतल्या. आता अलिकडे डेविस कपमध्ये दोघे एकत्र आले, पण ती पहिली जादू  खेळात दिसली नाही.
संजय दत्त आणि संजय गुप्ता जुने मित्र. संजय गुप्ताने चित्रपटाची निर्मिती करावी आणि संजय दत्तने त्यात भूमिका करून आपली दोस्ती निभावावी. पण एकाला वाटले, दुसरा आपला फायदा घेतोय आणि दुसर्‍याला वाटले, आपलीही एक 'आयडेंटी' आहे. झालं! जुने मित्र वेगळे झाले. तेव्हापासून आजतागायत या दोघाम्मधून विस्तव जात नाही. प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर भरभरून लिहलं आणि बोललंही पण यांनी थोडंच बोलून जगाला बरंच काही सांगून टाकलं.
पैसा, ताकद आणि नाती एकदम सांभाळणं तसं कठीण काम. अशात आयपीएलचा तमाशा  असेल तर बाब आणखीनच गंभीर. ललित मोदी आणि शशी थरूर यांची ओळख तशी फार जुनी नव्ह्ती. आयपीएलच्या कोची टीमने त्यांची मैत्री गडद केली. पण सोशल वेबसाईट ट्वीटरच्या  सततच्या ' ट्वीट्'ने दोघांमध्ये दरी आणली. पैशाची ताकद नाती सांभाळण्यास असमर्थ ठरली. दोघेही वेगळे झाले. तेव्हा त्यांनी जी बयानबाजी केली, ती पुन्हा सांगण्याची खरे तर आवश्यकताच नाही.
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता डिनो मोरियो आणि कॅली दोरजी यांच्या मैत्रीत दरार आणायला त्याची मैत्रीण लारा दत्ता कारण  बनली. दोघांची मैत्री बॉलीवूडमध्ये फेमस होती. पण आज तो इतिहास बनला आहे. आज ते एकमेकांविषयी फारसे बोलत  नाहीत.पण बोलले तर  दुश्मनीचे रंग लपत नाहीत.
शाहरुखचे बॉलीवूडमध्ये मित्र आधीच कमी. पण जे मित्र आहेत किंवा होते, त्यांच्याशी त्याची मैत्री वाखाणण्यासारखी असते, असे म्हटले जाते. शाहरुख मैत्रीला जागतो, म्हणतात. अशीच  फराह खान आणि त्याची मैत्री या मायानगरीत ' बेस्ट बडीज' मानली जात होती. परंतु, आता त्यांच्यात ही मैत्री


राहिलेली नाही. त्यांच्या मैत्रीबाबत म्हटले जात होते की, दोघेही एकमेकांशिवाय कधी कुठली असायनमेंट करणारच नाहीत. पण त्यांच्यातल्या अधिकच्या गोडीत मिठाचा खडा पडला.  आणि काम बिघडले. दोघांमध्ये अशा काही घटना घडल्या की, फराहने आपल्या ' तीस मार खाँ' मधून शाहरुखला आऊट करून टाकले. आता दोघांच्या मैत्रीच्या नात्यात अजिबात मिठास राहिली नाही. अर्थात जुन्या मैत्रीचा आदर करीत या दोघांनी सार्वजनिकरित्या एकमेकांविषयी बोलण्याचे टाळले आहे.
बॉलीवूडचा बादशहा आणि दबंग सलमान खान यांचा उल्लेख केल्याशिवाय ' दोस्ती ते दुश्मनी' या प्रवासाचा शेवट हो ऊच शकत नाही. या दोन दिग्गज कलाकारांसाठी ' टॉक ऑफ द टाऊन ' या इंग्रजी म्हणीचा खास उल्लेख केला जातो. त्यांची कुठलीही ऍक्टीविटी बातमी बनून जाते. वास्तविक बॉलीवूडमध्ये दोस्ती-दुश्मनी कायम स्वरुपाची कधीच नसते. पण या दोघांची दुश्मनी दिवसेंदिवस जुनी होत चालली आहे. कटुता वाढत आहे. दोघे मित्र होते, तेव्हाही चर्चा होती आणि आताही होत आहे. एकदा बोललेला शब्द माघारी घेतला जात नाही, तसे एकदा तुटलेली  मैत्री पुन्हा   जोडली जात नाही, असेच काहीसे  चिन्ह आपल्याला  आजूबाजूला दिसत आहे. पण पुन्हा  मैत्री जोडलीच  तर मात्र त्यात  पूर्वीचा मिठास राहत नाही . एवढे मात्र खरे !             - मच्छिंद्र ऐनापुरे, जत  

No comments:

Post a Comment