Friday, March 31, 2017

कर्जदारांचा क्रेडिट स्कोर

     बँकिंग क्षेत्रात कर्ज वेळेत फेडणार्या एक प्रकारचा मान दिला जातो. ठेकेदार काम वेळेत किंवा वेळेच्या आत काम पूर्ण केल्यावर जसे तो दुसरे काम घेण्यास पात्र ठरतो अथवा काही बोनस रक्कम त्याच्या पदरात पडते. त्याचप्रमाणे वेळेत कर्जफेड करणार्या कर्जदाराची एक प्रतिमा तयार केली जाते. त्याचे क्रेडिट रेकॉर्ड बनवले जाते.त्यानुसार त्याला कर्ज देण्याचा बँका विचार करतातआपल्या दूरदर्शी वित्तीय सवयींमध्ये प्रामुख्याने दिसणारा मुद्दा म्हणजे कर्ज फेडण्याची जबाबदारी. अगदी तुमच्या बिलांपासून सुरुवात होऊन दरमहा कर्ज, कार आणि पर्सनल लोनचे भलेमोठे हप्ते..असे सर्व काही तुमचा क्रेडिट रिपोर्ट ठरवत असतात, आणि यातून तुमचा क्रेडिट स्कोअर तयार होतो. या रेकॉर्डमुळे भविष्यात तुम्हाला मिळणारे कर्ज बर्याच प्रमाणात याच मुद्यांवर अवलंबून असते. यालाच क्रेडिट रिपोर्ट म्हणतात. क्रेडिट रिपोर्ट म्हणजे तुमच्या आर्थिक व्यवहारांचा इतिहास होय. यात तुमची बांधीलकी, हेतू आणि कर्ज परतफेडीची क्षमता यांचा एकत्रित लेखाजोखा असतो. यापुढे तुम्ही कर्ज देण्यास पात्र आहात की नाही, हे ठरवण्यासाठी बँका आणि एनबीएफसीजना याच रिपोर्टचा संदर्भ उपयोगात येतो.
तुमचा क्रेडिट स्कोअर जितका कमी तितकी तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामुळे आपला क्रेडिट रिपोर्ट चांगला असावा,यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काही गोष्टींकडे ध्यान दिले पाहिजे.       कर्जपुरवठादारही कर्जदारांच्या सकारात्मक आणि सुधारित वागणुकीचे स्वागतच करतात. आपला क्रेडिट ट्रॅक रेकॉर्ड अधिक चांगला असेल याची खातरजमा करण्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवावे, यात क्रेडिट रिपोर्ट तो कायम अपडेट रहावा यासाठी ब्युरोजना साह्य करा. प्रत्येकाने ब्युरोशी संपर्क साधून सध्याचा क्रेडिट रिपोर्ट मिळवायला हवा. यातील आधीच्या चुका आणि जुनी माहितीही बदलून घ्यायला हवी. तुमच्या खात्यातून कोणत्याही प्रकारे उशिरा पेमेंट होणार नाही आणि प्रत्येक खात्यांशी संबंधित आकडेवारी खरी असेल आणि अपटूडेट असेल याची काळजी घ्या. तुम्ही सहकर्जदार म्हणून इतर कोणासाठी आपले नाव दिले असले तर ते तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसेल. अशा दुसर्याच माणसाच्या खात्यातील चुकाही तुमच्या क्रेडिट रिपोर्टचे नुकसान करू शकतात. त्यामुळे ठराविक काळाने सतत तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे आवश्यक आहे.
     वेळेवर कर्ज हवे असेल तर वेळेवर पेमेंट करा. आपण जसे घर बांधतो तसेच क्रेडिट समरी उभारणे म्हणजे एकेक वीट रचणे. दरमहा तुम्ही तुमची देणी देता, गहाण ठेवलेल्या वस्तूंवरचे कर्ज, क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज आणि अगदी तुमचे मोबाईल बिल्ससुद्धा, यातील प्रत्येक वेळी तुम्ही संभाव्य कर्जपुरवठादारांच्या मनात तुमची सकारात्मक प्रतिमा निर्माण करत असता. थकबाकीच्या वेळेवर केलेल्या पेमेंट्समुळे तुमचा क्रेे डिट स्कोर चांगला होईल. पण, त्याचबरोबर भविष्यात तुम्हाला अधिक वेगाने कर्ज मिळू शकेल. बॅँका आणि एनबीएफसीजसमोरपात्रठरण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे. नियामकांतर्फे तुमचे हप्ते फेडण्यासाठी तीन दिवसांचा ग्रेस पिरिअड दिला जातो. मात्र, एकदा का तुम्ही हा कालावधीही घालवलात की क्रे डिट ब्युरोजकडून तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये त्याची नोंद होते. क्रेडिट कार्डांच्या बाबतीत बॅँका पूर्ण पेमेंटच्या बदल्यात किमान थकबाकीचे पेमेंट करण्याची सवलत देतात. त्यामुळे तुम्हीडिफॉल्टरठरत नाही.
     नेहमीच कर्जांचे एक सकस मिश्रण करा. संभाव्य कर्जपुरवठादारासमोर जबाबदार आणि संतुलित क्रेडिट हाताळण्याची तुमची उत्तम प्रतिमा     तयार व्हावी यासाठी सकारात्मक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांचे मिर्शण असून द्यातुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कर्जे यशस्वीरीत्या हाताळल्यास एक चांगलाक्रे डिट मिक्सतयार होतो. यातून तुम्ही विविध प्रकारची कर्जे हाताळू शकता, हे स्पष्ट होऊन तुम्ही एक आर्थिकदृष्ट्यास्मार्टआणि विश्वसनीय व्यक्ती आहात, अशी प्रतिमा तयार होते.

स्वत:च्या क्षमता ओळखून आत्मविश्‍वासाने पुढे जा

     जिद्द,चिकाटी माणसाला भरभरून देतात. म्हणूनच काही माणसं झपाटून कामाला लागलेली असतात.यश त्यांच्या पायाशी लोळण घेतं. त्यामुळे ही माणसं सर्वसामान्यांपेक्षा वेगळी वाटतात. कित्येकांचे मग आयडॉल बनतात. काहीजण त्यांना पुजतात.त्यांचा जप करत मोठी होतात, यश मिळवतात. आणि मग ते दुसर्याचे आयडॉल होतात. पण हे सगळं होतं,ते काही तरी करण्या-बनण्याच्या जिद्दीतून,चिकाटीतून. अलिकडेच कोल्हापूरला दोन अशीच तरुणांची आयडॉल ठरावीत, अशी प्रसिद्ध तरुण माणसं येऊन गेली. त्यांनी आपल्या मुलाखतीतून तरुणांना संदेश दिला. ती माणसं म्हणजे सुप्रसिद्ध मॉडेल लोपमुद्रा राऊत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युवा शास्त्रज्ञ आदित्य पाटील. त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून तरुणांना आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत केली. त्यांनी आपल्या मुलाखतीतून सतत नवं शिकत राहा. ध्येय पक्कं केल्यावर फोकस्ड राहा. मान-अपमानाचे प्रसंग येतील. त्याला सामोरे जा,यश-अपयशाचे हिंदोळे दिसतील. पण कोणत्याही स्थितीत समतोल वृत्तीने कार्यरत राहा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वत:च्या क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जा, असा सक्सेस पासवर्ड  देऊन टाकला. तरुणांनीही त्यांना भरभरून दाद दिली.

     शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजितउडान 2017’  कार्यक्रमात मॉडेल राऊत आणि शास्त्रज्ञ पाटील  यांची  प्रकट मुलाखत झाली. ही मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. यावेळी बोलताना लोपमुद्रा राऊत म्हणाल्या कीमीदेखील  सर्वसामान्य मुला-मुलींप्रमाणेच वाढले. लहानपणी मित्रमैत्रीणींसोबत उन्हातान्हात मनसोक्त खेळले. शाळेत असताना प्रत्येक खेळात सहभागी असायचे. क्रिकेट, हॉलीबॉल अशा खेळांची मी कॅप्टन होतेपॉलिटेक्निक व त्यानंतर इंजिनियरिंग केले. कॉलेजमध्येही स्पर्धेत गोल्ड मिळवत असे. कारण कोणतीही गोष्ट एक्सट्रीम करायची मला सवय आहे. कॉलेजमध्ये माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मित्रमंडळींकडून कॉम्प्लिमेंटस् मिळत होत्या. त्यावेळी पहिल्यांदा सुंदरतेची जाणीव झालीमग धाडस करून कॉलेजच्या फॅशन शोमध्ये भाग घेतला. त्यामुळे आत्मविश्वास आला. ही गोष्ट खूप चांगली करू शकते याची जाणीव झाली. मग प्रयत्न केला. मिस इंडिया स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला. जगाचे लक्ष असलेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून सेकंड रनर अप बनले. यानंतर बिग बॉसच्या घरात 105 दिवस राहिलेस्वत:वर विश्वास ठेवला आणि आयुष्य बदलून गेले. लोपमुद्रा हे पुरातन दंतकथेतील विदर्भकन्येचे नाव आहे. माझ्या आजोबांनी ते ठेवले. मी नागपूरची असल्याचे एका प्रश्नावर तिने सांगितले. मी जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मेसेज आल्यावर थोडी बावरले होते. म्हणून आईला फोन केला. माझी आई पॉवरफुल आहे. तिने एका वाक्यात मला सांगितले, भिऊ नको,तू वाघिणीची मुलगी आहेस. या वाक्यावर मी स्पर्धेत यश मिळवून परतले. मी रोज दोन वेळा बाबांशी फोनवरून बोलून त्यांचा सल्ला घेेते. कॉलेजला असताना एक वर्ष नापास झाल्यानंतर माझे आयुष्य बदलले. मानअपमान झेलत आज इथपर्यंत पोहोचले. स्वत:वर विश्वास ठेवा, आयुष्य बदलून जाईल, हा संदेश सांगायला त्या विसरल्या नाहीत.
     आवडणार्या क्षेत्रात स्वत:ला झोकून द्या, असा तरुणांना संदेश देणारे युवा शास्त्रज्ञ आदित्य पाटील यांनीदेखील आपल्या आयुष्याचा पट तरुणांपुढे उलगडला. ते म्हणाले, मी शाळेतल्या जीवनात फारच खोडकर होतो. या वयात खूप मस्ती,मौजमजा केली. पण अभ्यासाकडे फार दुर्लक्ष होतं. कधीही चांगले गुण मिळाले नाहीत. त्यांच्या डाटा एंट्रीच्या कामासाठी वडिलांनी घरात संगणक आणला. सात वर्षांचा असताना उत्सुकतेपोटी संगणक चालू करण्याचा प्रयत्न केला. वयाच्या आठव्या वर्षी तिसरीत असताना संगणकावर गेम खेळण्याचे वेड लागले. त्यानंतर पुढे काय हे शोधण्यासाठी प्रोग्रामिंग शिकलो. संगणक हा माझ्यासाठी खेळाप्रमाणे होता. गणित विषयात गुण कमी पडल्याने वडील रागावलेजयपूर येथील मुलाने मायक्रोसॉफ्टमध्ये सर्टिफिकेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे आव्हान स्वीकारून मायक्रोसॉफ्टमध्ये वयाच्या 11 व्या वर्षी इंजिनिअर व्हायचे स्वप्न पूर्ण केले. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे आदित्य यांनी सांगताच उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांनी दाद दिली. एम. एस. सॉफ्टवेअरसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत पण फी भरू शकलो नाही. दिल्लीत असताना माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. .पी.जे.अब्दुल कलाम यांची भेट घेतलीडॉ. कलाम हे आपल्याच जीवनाचे मार्गदर्शक व मेनटॉर असल्याचे सांगत युवा शास्त्रज्ञ आदित्य म्हणाले, बिल गेटस् व डॉ. कलाम हे जीवनातील आयडॉल आहेततरुणांनी आवडणार्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन यशस्वी व्हावे, असा मंत्र युवा शास्त्रज्ञ आदित्य पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला
     खरे तर युवकांनी अशा यशस्वी लोकांच्या मुलाखती,त्यांची चरित्रे हुडकून, जाणीवपूर्वक शोध घेऊन वाचावीत.जिथे कुठे त्यांना लाईव्ह पाहता, ऐकता यील,त्याठिकाणी आवश्य जावे. अलिकडच्या काळात अशा यशस्वी लोकांच्या क्लिप्स युट्यूबवर सहज उपलब्ध होत आहे. त्यांचा शोध घेऊन त्या पाहाव्यात. आपल्या आवडीनुसारच्या क्षेत्रातल्या लोकांच्या क्लिपा शोधाव्यात. त्यातून आपल्याला बरेच काही मिळून जाईल. आपण काय करणार आहोत, हे एकदा निश्चित झाले की, पुढचे सगळे मार्ग सोपे होऊन जातात. वाचनातून काही हिंट्स म़िळतात. या गोष्टी आपल्याला पायर्या होण्याचे काम करतात.त्यामुळे माणसाने वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे.जाणलं पाहिजे.चला तर मित्रानों, सुरुवात करू या.

Thursday, March 30, 2017

दात त्यांचे, आमचे

     निसर्गाने वेगवेगळ्या जीव-जंतूंना दात दिले आहेत,ते फक्त शिकार करायला किंवा स्वत:चा बचाव करायला दिलेले नाहीत. अन्न चावण्याच्या कामालाही त्याचा उपयोग होत असतो. काही जीवांच्या दातांची ठेवण तर अगदी अद्वितीय आणि विचित्र असते. हत्तीचे दात खायचे आणि दाखवायचे वेगळे असतात.ही म्हण तर तुम्हाला माहितच आहे. काही नर जातीच्या हत्तीचे एक किंवा दोन दात बाहेर दिसतात,जे आकाराने बरेच मोठे असतात. पण हे फक्त दाखवायचे असतात. अन्न चावण्याचे दात त्याच्या तोंडात असतात, जे आपल्याला दिसत नाहीत. घोड्यांचे वय तर त्यांच्या दातांची स्थिती पाहून  ठरवले जाते. वयांबरोबरच त्यांचे दात घासले जातात. माकडाच्या तोंडात माणसांसारखीच दातांची ठेवण असते.फक्त इतकेच की, त्यांचे दात माणसांच्या दातांपेक्षा थोडे मोठे असतात. आपल्या या दातांनीच ते पीस्स्स करून माणसांच्या अंगावर येतात. त्यांना वाकुल्या दाखवतात. त्यांचे दात खूप दणकट असतात.

     गाय-बैल यांचे दात तर दोनवेळा खाण्याच्या कामी उपयोगाला येतात. पहिल्यांदा ते अन्न पटापटा खावून घेतात आणि नंतर निवांतपणे अन्न पुन्हा तोंडात आणून चघळत बसतात. त्याला आपण रवंथ करणे म्हणतो. वाघ,सिंह आणि चित्ता यासारखे हिंस्त्र प्राणी आपल्या दातांनीच शिकारची मानगुट पकडतात आणि क्षणात त्याच्या शरीराची चिरफाड करतात. यांचे दात फारच भीतीदायक असतातगेंड्याचे दात असतात,पण गवत खाण्यासाठी ते आपल्या ओठांचा उपयोग करतात. समुद्रगाय चरणारा प्राणी आहे,त्याचे दात पडत असतात.जुने दात पडून त्याजागी दुसरे दात येतात. समुद्रगाय सावकाश चालणारा सस्तनप्राणी आहे, मात्र ही गाय समुद्रात राहते. मगरीचे दात अर्धवट खुलले असतात. तिचा जबडा फारच मजबूत असतो. शिकार पकडल्यावर त्याला ती उलटा-पालटा करते. आपल्या तीक्ष्ण दातांनी त्याचे छोटे-छोटे तुकडे करून खाते. स्लोथ नावाचा सस्तन प्राणी दक्षिण अफ्रिकेत आढळतो. त्याचे दात खुंटीसारखे आणि पूर्ण विकसित झालेले असतात. हा झाडांची पाने आणि फांद्या खातो.
 
   कुत्र्याचे दातदेखील मोठे तीक्ष्ण असतात. ते वस्तू,पदार्थ किंवा शिकार यांची  आपल्या दातांनीच चिरफाड करतात.जर कुत्रा पिसाळलेला असेल आणि त्याने माणसाला चावले तर त्याला रेबीज नावाचा जीवघेणा रोग होतो.माणसाचे दात फक्त चावण्यासाठी,तुकडे करण्यासाठी चिघळण्यासाठी मदत करत नाहीत तर बोलण्यासाठीही मदत करतात. सुंदर दंतपंक्ति हास्य आणखी मनोहारी बनवतात. यांची संख्या बत्तीस असते. सापाच्या तोंडात तर म्हणे दात त्याच्या जन्माअगोदर येतात. अंड्यातून बाहेर येण्यासाठी सापाच्या तोंडाच्या वरच्या बाजूला एक दात असतो.विषारी सापांच्या वरच्या जबड्यात विषारी दात असतात. दंश केल्यानंतर तो उलटा पडतो आणि विष शरीरात सोडतो. उंदिर आणि चिचुंद्री यांचे दात तीक्ष्ण आणि सरळ असतात. अगदी कठीण वस्तू कुरतडतात. बीळ बनवण्यासाठी त्याचा त्यांना चांगला उपयोग होतो. याच दातांनी ते माणसांनादेखील चावतात. वटवाघळाचे दात सुईसारखे कारी असतात.या दातांनी ते एकाद्या जनावराच्या कातडीला छेद पाडून त्याचे रक्त शोषतात. एवढेच नव्हे तर झोपलेल्या माणसावरदेखील आपल्या दातांनी हल्ला करतात. किटकांना दात नसतात पण तोंडात चावण्यासाठी  जबडा असतो. पीनसारखा टोचवून आपले भोजन पिण्यासाठी त्याचा यंत्रासारखा उपयोग करतात. चिमण्यांना किंवा अन्य पक्ष्यांना दात नसतात. त्यांच्या जागी चोच असते. आणि या चोचीनेच ते आपले अन्न खातात. हे जग जसे अदभूत आहे, तशीच दातांची दुनियादेखील अदभूत आणि विचित्र आहे.

बदला घ्यायचा तर आनंदाने घ्या

     आपल्या भारतीय संस्कृतीत सूड उगवणं किंवा बदला घेणं,याला वाईट मानलं जातं. काही जण याला आगीशी खेळणं म्हणतात,काहीजण याला दुसर्यांबरोबर स्वत:लाही जाळणं, असं समजतात.याने दाट जंगल पार करताना रस्ता चुकण्याची शक्यता असते. पण हे आपल्याला केव्हा कळते तर ज्यावेळेला आपण सुडाच्या भावनेत धुमसत काही पावले पुढे गेलेलो असतो.
     खरे तर आपण कित्येकदा कसलीही प्रतिक्रिया न देता पुढे जात असतो. पुढे कधीतरी समज येईल किंवा वाईट कर्माची फळं मिळतीलच, असे म्हणून पुढे जातो. पण नेहमीच सूड उगविण्याच्या भावनेला दाबून ठेवणं, अवघड असतं.शेक्सपिअर तर सुड उगवणेच्या भावनेला उगवत्या सूर्यासमान मानतात. होतंही असतं,जर कोणी नुकसान पोहचवत असेल,धोका देत असेल किंवा मग पुन्हा पुन्हा हल्ला करत असेल तर काहीतरी करायलाच हवं ना? काही न करणं,कित्येकदा षंड किंवा लाचार असल्याचा अनुभव देतं.पण काय गरज आहे,यातून स्वत:लाही नुकसान पोहचवायचं?स्व्त:ला का यात लोटायचं? स्वत:वर सुडेच्या भावनेला हावी होऊ द्यायचं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. लोक काहीही  म्हणोत,त्याकडे लक्ष न देता पुढे गेले पाहिजे. आपल्या कृतीतून त्यांना दाखवायचं आहे,त्यामुळे न बोलता,व्यक्त न होता,बदला घेता आला पाहिजे.

     बदला घेताना आपल्याला खूप बरं वाटतं. पण हा आनंदाचा अनुभव मानसशास्त्रतज्ज्ञ क्षणिक बरोबरच मिथकही मानतात. क्लिनिकल सायकॉलॉजीच्या जाणकार आणि पीस ऑफ माइंड कॉलमच्या लेखिका कॅरेन हाल म्हणतात की, बेलगाम संताप आणि चुकीच्या प्रतिक्रियेच्या कारणामुळे आपण स्वत:चे किंवा दुसर्यांचे अधिक प्रमाणात नुकसान करतो. पण ज्यावेळेला नुकसान कारणांपेक्षा मोठे होते,तेव्हा बदला घेतल्याने होणारा त्यातला आनंददेखील संपून जातो.नाती तर कायमचीच संपतात आणि सूड भावना मात्र आपल्या मनात कायम राहते.
     बदला कसा असावा,याबाबत एंगर स्पेशलिस्ट एंड्रिया ब्रेंडेट म्हणतात, स्वत:साठी उभं राहणं महत्त्वाचं आहे. असं कराही,पण सूड घेण्याची भावना सोबत घेऊन नाही. जखम खोलवर असेल तर पहिल्यांदा ते बरे होण्यासाठी वेळ द्या. बौद्ध गुरू तिक न्यात म्हणतात, पहिल्यांदा आपल्या आतील आग शांत करा. त्यानंतर जे काही कराल,ते राग,संतापाने नाही तर योग्य मार्गाने करा.
     कृतीने स्वत:ला सिद्ध करा. चुकीचे काही बोलू नका, शिष्टता ठेवा. पारदर्शक रहा.ते कामात,बोलताना आणि भावनेच्यास्तरावरदेखील राहायला हवे. आपले नेटवर्क वाढवा. जितका मोठा विस्तार, तितकाच विशाल विचार आपल्यात निर्माण होतो. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन विशाल राहतो.लोकांपासून दूर जाण्यापेक्षा थेट मुद्द्याचे बोला.प्रत्येक वेळेला प्रतिष्ठेचा विषय करू नका. विनाकारण विरोधक बनलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. उलट त्यांच्या नडीला त्यांना मदत करा. अशा लोकांसाठी एवढे पुरेसे आहे. मिटिंगमध्ये किंवा ऑनलाईन तुमच्यावर हावी होत असेल तर लगेच प्रतिक्रिया देण्याच्या फंदात पडू नका. यामुळे तुम्हालाच चुकीचे ठरवले जाऊ शकते.थोडे थांबून आपले म्हणणे मांडा.
     जर कोणी तुमच्यावर जळत असेल,इर्षा करत असेल तर अशा लोकांजवळ आपल्या खासगी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या आरोग्याची आणि मनोरंजनाची काळजी घ्या. रोज व्यायाम करा. काही नवं शिका आणि काम करा.Tuesday, March 28, 2017

अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न सुटणार कधी?

     बालकांच्या मूळ जडणघडणीत महत्त्वाची भूमिका अंगणवाडी सेविका पार पाडतात.मात्र त्या कामाच्या अतिरेकी बोझ्याखाली पार दबून गेल्या आहेत. मानधनही तुटपुंजे आहे.त्यापेक्षा इतर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना चांगले मानधन आहे. मानधन वाढीबाबत नियुक्त केलेल्या समितीने मानधनवाढीची शिफारस केली आहे,तरीही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे वैतागलेल्या अंगणवाडी सेविकांनी म्हणजे त्यांच्या कर्मचारी संघटनेने 1 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना हे संपाचे हत्यार का उपसावे लागले आहे,याचा इथे ऊहापोह करुया.
      मूल 3 वर्षाचे झाले की, अंगवाडीच्या सेविकेच्या ताब्यात येते. म्हणजे त्या निम्नस्तर वर्गातील मुलांच्या खर्या पालनपोषणकर्त्या आहेत. मुलांच्या तीन ते सहा वयोगटातील या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात शिक्षण देण्याबरोबर, त्यांचे आरोग्य व योग्य आहारपोषणाची काळजी घेत, सुदृढ व निरोगी बालक घडवण्याचे काम या सेविका निष्ठेने करत आहेत. मुलांच्या व्यक्तिमत्वाची मूळ पायाभरणी इथे होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या मूलभूत गरजाही शासन पुरवू शकले नाही. त्यासाठी सेविकांनी लढा पुकारला आणि शासनाला दखल घेणे भाग पाडले आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या एकात्मिक बालसेवा योजनांतर्गत महाराष्ट्राभर 94 हजार अंगणवाड्या आहेत. सद्यस्थिती पाहता अंगणवाडीमध्ये झोपडपट्टी, मजुरी, घरकाम करणार्यांची मुले असतात. हा वर्ग कमी शिकलेला असल्याने, त्यांच्यामध्ये स्वच्छता, आरोग्य यांचे महत्त्व, शिक्षण आदी गोष्टींची जागृती करण्याचे काम या सेविका करतात. आरोग्य, शिक्षण, पोषण सेवेची जबाबदारी या अंगणवाडी सेविका पार पाडतात. गरोदर माता, नवजात ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण, तीन महिन्यांपासूनच्या गरोदर महिला ते सहा महिन्यांपर्यंतच्या स्तनदा माता, एक ते सहा वर्षापर्यंतचे बालक यांना पूरक पोषण आहार देणे. आपल्या परिसरात गृहभेटी देणे, त्यावेळी कोणी बालक आजारी असेल तर त्याचा रिपोर्ट देणे. आरोग्य सर्वेक्षण करणे, किशोरवयीन मुलींमध्ये हिमोग्लोबिन कमतरता आढळल्यास त्यांना पूरक आहार देणे, महिला व माता समितीच्या मीटिंग्ज घेणे, त्या अंतर्गत त्यांना आरोग्यशिक्षण देण्याचे काम या कर्मचारी करत आहेत. अंगणवाडी वर्गातील मुलांना बडबडगीतं शिकविणे, गोष्टी सांगणे, एबीसीडी, प्राणीपक्ष्यांची ओळख सांगणे, विविध खेळ घेणे अशा विविध गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. मुलांना खाऊ देणे, मुलांची आरोग्य तपासणी, दर महिन्याला वजन करणे आदी कामे सेविका करतात. तसेच, ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे अतिरिक्त काम करावे लागत आहे.

     सुमारे दोन लाख अंगणवाडी महिला कर्मचारी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचत अविरत कार्य करीत आहेत. तरीही शासनदरबारी त्यांची उपेक्षाच होते, अशी भावना सेविकांची झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. राज्यात एकूण एक लाख 80 हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनीअंगणवाडीच्या 20 हजार सेविका आहेत. त्यांचे भविष्य शासनाच्या दुर्लक्षामुळे अंधकारमय होत आहे. कामाचा अतिरिक्त बोजा, अत्यल्प व अवेळी मिळणारे वेतन, सुपरवायझरची दादगिरी व आर्थिक झळ यात सेविका भरडल्या जात आहेत. शासनाने आजपर्यंत दिलेल्या पोकळ आश्वासनांना कंटाळून त्यांनी आंदोलन पुराकरले आहे.
 या कर्मचार्यांचे मानधन कधीही वेळेत मिळत नाही. बैठकीसाठी असलेला प्रवासभत्ताही वेळेवर आणि वर्षोंवर्षे मिळत नाही. अंगणवाडी मुख्य केंद्रामध्ये आलेले विविध साहित्यही स्वखर्चाने न्यावे लागते. कधीकधी बचत गटांनी नाश्ता, जेवण न दिल्यास या सेविकांनाच तयार करावे लागते. त्यासाठी कधीकधी खर्चही करावा लागतो. अनेक प्रकारच्या कामाचे ओझे वाहणार्या सेविकांना कधी कधी मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. काही सुपरवायझर दादागिरी करतात, अशी तक्रार सेविकांची आहे. कामावरून कमी करण्याची धमकी देणे, कधी थोडा उशीर झाला तर गैरहजेरी लावणे, रिपोर्ट खराब करण्याची धमकी देणे आदी प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भीतीपोटी हा सर्व त्रास सेविका व मदतनीस सहन करतात. निवृत्तीनंतर पुढे काय? हा प्रश्नही सेविकांच्या पुढे मोठा आहे. निवृत्तीवेतनाचा जीआर निघूनही त्यांची अंमलबजावणी नाही. इतर राज्यांच्या तुलनेने मानधन अतिशय तुटपंजे आहे. वाढ म्हणून 100 250 रुपये वाढवून जणू क्रूर चेष्टाच केली. मानधनाच्याबाबतीत देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन मिळते. पाँडेचरी,गोवा आणि तेलंगणा या राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना अनुक्रमे 19480,15000 आणि 10500 इतके आहे.केरळ आणि तामिळनाडूमध्ये हेच मानधान अनुक्रमे 10000 आणि 8हजार 500 रुपये इतके आहे.मदतनीसांनाही साडेतीन हजारपासून 13340पर्यंत मानधन आहे.मात्र महाराष्ट्रात फारच कमी मानधन मिळते. या सेविकांना अंनत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे बेमुदत संपासारखे हत्यार उपसावे लागले आहे.            

अंकज्योतिष

आज गुढी पाडवा.मराठी नववर्षदिन.सकाळी उठल्यावर एका पोर्टलवर मला अंकज्योतिष पाहायला मिळाले.म्हटले तुमच्याशी शेअर करू. भविष्य खरं की खोटं, पण माणसांना भविष्यात डोकावून पाहायला आवडतं. भविष्य जाणून घ्यायला माणसे इच्छूक असतात.त्यामुळे नित्यनेमाने पहिल्यांदा वर्तमान पत्रातले भविष्याचे पान वाचणारी बरीच मंडळी आहेत. असो काही ना याबाबत आवड नसली तरी एक मनोरंजन म्हणून तरी बघायला काय हरकत आहे.राशीनुसार तुम्ही भविष्य बघताच आज अंकज्योतिषनुसार भविष्य जाणून घ्या.
     प्रत्येक नावानुसार एक राशी असते,त्याच प्रकारे अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक क्रमांकानुसार एक अंक असतो.अंकशास्त्रात मूलांकनुसार भविष्यफळाबाबत माहिती मिळू शकते. अंक ज्योतिषनुसार आपल्याला आपल्या मूलांकाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी जन्मतारीख माहित असणं महत्त्वाचं असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर 16 ही एक जन्मतारीख घेऊ. मग तुमचा मूलांक झाला 1+6=7. समजा  तुमचा जन्म 28 तारखेला झाला आहे,तर तुमचा मूलांक असणार आहे 2+8=10 म्हणजे 1+0=1.(एक)चला तर तुमचे आजचे भविष्य जाणून घेऊ या. सर भविष्य सांगत बसला आहात काय, असे काही म्हणू नका. एका हिंदी पोर्टलवरचा हा अनुवाद आहे.

अंक-1: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबात शुभवार्ता ऐकायला मिळेल.जुन्या कर्जाच्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकाल. कार्यक्षेत्र आणि व्यापारातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील.सहकारी आणि अधिकार्यांची मदत मिळेल. कुटुंबासोबत प्रवासाला जाऊ शकता. तुमचे आरोग्य चांगले राहिल.
अंक-2: आज तुमच्या प्रत्येक कामात सावधानता बाळगा. कार्यक्षेत्र आणि व्यापारात विरोधक सक्रीय होऊ शकतात. अतिउत्साह दाखवू नका. महत्त्वपूर्ण प्रकराणातील निर्णय पुढे ढकला. विनाकरणच्या वादापासून दूर रहा. दुसर्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करू नका. कुटुंबात कोणाचेतरी आरोग्य बिघडू शकते.
अंक-3: आज तुमच्या जुन्या काळापासून चालत आलेल्या एकाद्या समस्येचे समाधान मिळणार आहे. व्यापाराच्यानिमित्तने प्रवास घडू शकतो. कार्यक्षेत्रात अधिकारी आणि सहकारी यांची मदत मिळू शकते. नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. संततीपासून शुभवार्ता ऐकायला मिळेल. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
अंक-4: आज तुम्हाला नशिबाची मोठी साथ मिळेल. व्यापार आणि कार्यक्षेत्रातील वातावरण तुम्हाला अनुकूल असेल. नव्या योजनांवर कार्य सुरू करू शकता. कुटुंबात कुठून तरी शुभवार्ता ऐकायला मिळेल.दाम्पत्य जीवनात गोडवा येईल. मोसमबदलामुळे तुमचे आरोग्य प्रभावित होऊ शकते.
अंक-5: आज तुम्ही वादविवादापासून दूर राहा. वाचा आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात सहकारी आणि अधिकार्यांशी खटके उडतील. मित्रांकडून आर्थिक मदत मागण्याची गरज पडू शकते. घडणार्या गोष्टींना बाधा येऊ शकते. पोटाचे विकार तुम्हाला त्रास देतील.
अंक-6:आज तुम्ही महत्त्वाच्या प्रकराणातील निर्णय पुढेढकला. कोणत्याही कामात घाईगडबड करू नका.जोखीमीच्या कामापासून दूर राहा. नशिबाच्या भरवश्यावर राहू नका. ऑफिसमध्ये तुमच्यावर नवीन जबाबदारी टाकली जाऊ शकते. विरोधक सक्रीय होतील. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. मानसिक व शारीरिक थकवा तुमच्यावर हावी होऊ शकतो.
अंक-7: आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल. कुटुंबासोबत वेळ घालावण्याची संधी मिळेल.दाम्पत्य जीवनात गोडवा येईल. कार्यक्षेत्रात अधिकारी आणि सहकारी लोकांचे सहकार्य मिळेल. मोसम बदलामुळे तुमच्या आरोघ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या.
अंक-8: आज तुमच्या मनात एखाद्या गोष्टीवरून संभ्रम निर्माण होईल. घडणार्या कामात बाधा येण्याची शक्यता आहे. विनाकारण वादात अडकू नका. कोणत्याही वादविवादात सहभाग घेऊ नका. वाहन आणि यंत्र चालवताना सावधानता बाळगा. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.
अंक-9: आज तुम्ही नशिबाच्या भरवशावर राहू नका. कार्यक्षेत्र आणि व्यापारात विरोधक वरचढ होऊ शकतात. व्यापारात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. घडणार्या कामात अडथळा येऊ शकतो. कार्यक्षेत्रात अधिकारी आणि सहकारी यांच्याशी खटके उडतील. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.Monday, March 27, 2017

बहिरे व्हा.(Success मंत्र)

यश मिळवायचं असेल तर बहिरे व्हा.कुणाचं काही ऐकू नका, असं सांगितलं जातं. यासाठी एक गोष्ट सांगितली जाते. ती आहे, एका बेडकाची. एक बेडूक झाड चढण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो सारखा खाली पडत असतोआपल्याला झाड चढायचंच आहे, असा विचार करून तो पुन्हा नव्या नेटाने पुढे सरकत असतो. तो पुढे सरकला की, तिथे जमलेले सगळे बेडूक दंगा करायचे. सगळे जोरात ओरडायचे. जाऊ दे रे,तुझ्याच्याने होणार नाही. तू पोहचणार नाहीस, अशक्य आहे,तू पडशील, असे ते मोठमोठ्याने ओरडायचे. पण बेडूक मात्र आपल्याच मस्तीत होता. शेवटी तो झाडावर चढण्यात यशस्वी झाला.

तुम्हाला माहित आहे,तो का यशस्वी झाला ते? कारण तो बहिरा होता. ज्यावेळेला सगळे बेडूक त्याला झाडावर चढायला  मनाई करत होते, तेव्हा त्याला ते सगळे आपल्याला प्रोत्साहन देत आहेत, असे वाटायचे.त्यामुळे तो पुन्हा नव्या नेटाने पुढे जायचा. त्यामुळे तो आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचला. आपल्याला यश मिळवायचे असेल तर नकारात्मक माणसांसाठी बहिरे व्हा, हाच संदेश आपल्याला या गोष्टीतून मिळतो.

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा

हिंदुंच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. संपूर्ण देशभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू संस्कृती नुसार नवीन वर्षाचा प्रारंभही याच दिवशी होत असल्याचे मानले जाते. नवीन संवत्सराचा व वसंत ऋतुचा आरंभ याच दिवशी होत असल्याने कुठल्याही नवीन शुभकार्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आपण आपल्या दारात उभारलेली गुढी आपल्यात असलेली महत्त्वाकांक्षा ही गगना एवढी विशाल व मोठी असावी असा जणू संदेशच आपल्याला देत असते. चैत्र पाडव्याच्या दिनी उभारलेली गुढी ही आपण मिळविलेल्या विजयाचे, अपार कष्ट, मेहनत घेत केलेल्या श्रम साफल्याचे जणू प्रतीकच आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात याच शुभदिनी करण्याची प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे.
      प्रभू श्री रामचंद्राने 14 वर्षांच्या वनवासानंतर व रावणावर विजय मिळविला व याच शुभदिनी त्यांचे अयोध्येत आगमन झाल्याची ऐतिहासिक कथा रूढ आहे. प्रभु श्री राम चंद्रांनी अयोध्येत प्रवेश केल्यानंतर अयोध्यावासियांनी त्यांचे गुढी उभारून व मंगल तोरणे बांधून भव्य स्वागत केल्याचे इतिहास सांगतो. देशभरातील हिंदुंचा हा सण अतिशय शुभदायक असल्याने सकाळी मंगलस्नान करून घराघरातून गुढ्या व तोरणे उभारली जातात. उभारलेल्या गुढीची पूजा करुन कडूनिंबाची पाने, मिरी, हिंग, ओवा, जिरे, लवण एकत्र करून खाल्ली जातात. त्यामुळे आरोग्य, तेजस्विता, बुद्धी व बल प्राप्त होत असल्याची समजूत प्रचलित आहे. याच शुभ दिनी ब्रम्हदेवाने हे विश्‍व निर्माण केले म्हणून ब्रम्हपूजा करणे हा विधी गुढी पाडव्याच्या दिवशी करणे महत्त्वाचे मानले जाते. पाण्याने स्वच्छ केलेल्या एका बांबुस रेशमी वस्र गुंडाळून तांब्याचे, पितळेचे अथवा चांदीचे भांडे पालथे घालून त्याला कडू निंबाचे डहाळे, साखरेपासुन तयार केलेली गाठीमाळ व रंगीबेरंगी फुलांची माळ बांधली जाते. घरातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत या गुढीची विधीवत पूजा करुन सजवलेली गुढी दारात उभारली जाते. गुढी उभारताना वापरलेले कडूनिंबाचे डहाळे, साखरेच्या गाठीची माळ, विविध रंगछटा असलेली रेशीम वस्त्रे ही मानवाच्या गरजांची प्रतीके आहेत. चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रसन्न वातावरणात उगवत्या सूर्याच्या साक्षीने दारासमोर गुढी उभारण्याची हिंदूंची ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा निश्‍चितच अभिमानास्पद आहे.  दारासमोर विविध रंगछटांयुक्त रांगोळ्या घातल्या जातात. घरोघरी गुढी उभारण्याच्या परंपरेमुळे या सणास गुढी पाडवा संबोधले जाते. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असल्याने नवनवीन व्यवसाय व नवीन कार्यांची सुरुवातही अनेकजण याच दिवशी करतात. ग्रामीण भागातील गावोगावी पुढील काळात होणार्‍या यात्रा व विविध विषयांनुरूप ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन गुढी पाडव्याच्या दिवशी केले जाते. 
     सध्याच्या यांत्रिक व धावत्या जीवनात आपले आचार, विचार व आचरण कसे असावे याबाबत अनेकांना प्रश्‍न निर्माण होत आहेत. नेमक्या अशाच वेळी गुढीपाडव्या सारखे इतरही महत्त्वाचे सण आपली संस़्कृती व धर्माचा अर्थ आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम करताना दिसून येतात. हिंदु संस्कृतीचा इतिहास व परंपरा यांची जपणूक करीत त्यांचे आचरण करणे आजच्या धावत्या जीवनातही तितकेच महत्वाचे आहे. आजच्या काळाचा विचार केला तर सर्वसामान्यांत मोठ्या प्रमाणावर वैचारिक मतभेद वाढले असल्याचे निदर्शनास येते. आपापसातील मतभेद व वाईट विचार यांना दूर करून सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. गुढीपाडवा हा सण एकात्मता व आपापसात स्नेह, प्रेम, जिव्हाळा व जवळीक वाढविण्याला उत्तेजन देणारा सण आहे. याच गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येत सर्व प्रकारचे मतभेद व भेदभाव विसरत सर्वांगाने सामाजिक विकास साधण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.

सबकुछ काही 'देशी गाई'साठी

     देशी गाईंची संख्या कमी झाली आहे,हे नाकारून चालत नाही. मात्र आता या देशी गाईंची संख्या वाढावी आणि तिच्या दुधापासूनच्या पदार्थांचा किंवा गाईच्या गोमूत्र,शेण यांचाही आपल्या दैनंदिन जीवनात वापर वाढायला हवा,यासाठी जोरदार प्रयत्न चालले आहे. भाजपचे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यापासून तर याच्या जनजागृातीला वेग आला आहे. ही बाब चांगली असली तरी गाईच्या संगोपनासाठी शासकीय मदतीचीही आवश्यकता आहे. गाय भेकड झाल्यावर त्याच्या पालनासाठी आर्थिक सहाय्य महत्त्वाचे आहे. ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी देशी गायींच्या संगोपनासाठी आवाहन करणार्या संस्थांनी प्रयत्न करायला हवे आहे. गायींची संख्या वाढेलच पण त्यापासून चरितार्थही शेतकर्यांचा चालेल.

     परवा डॉ. निरंजनभाई वर्मा यांचे व्याख्यान झाले. त्यांनी मानवासह संपूर्ण विश्व कल्याणासाठी गाय पाळणे कसे  आवश्यक  आहे, हे आपल्या व्याख्यानातून समजावून सांगितलेमनुष्याला व्याधीमुक्त करण्याबरोबरच निसर्गाचे रक्षण करण्याची ताकद गायीच्या शेणात, गोमूत्रात व दुधात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सृष्टीचे ऋतुचक्र समतोल राखून पर्यावरण रक्षणाची क्षमता त्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘चांगल्या प्रतीचे अन्न, चांगले आरोग्य आणि पर्यावरण रक्षण या तीनही बाबी मिळवण्यासाठी देशी गोधनाचे महत्त्व अधिक आहे. परंतु आज विविध कारणांनी गोधनाची संख्या रोडावत आहे. गाईचे मानवी जीवनात मोठे स्थान असून पर्यावरणाचा समतोल राखण्याला यातून मदत होते. गाईचे शेण, गोमूत्र आणि दुधामधील घटक मनुष्याला व्याधीमुक्त जीवन देण्यास साहाय्य करतात. यामुळे मानवातील चेतना जागवण्याचे काम केले जाते. शेणाद्वारे जमिनीचा कस सुधारून आपोआपच उत्पादन वाढीस मदत होते. गोमूत्राच्या बाष्पीभवनामधून हवा शुद्ध होण्यास मदत होऊन पर्यावरणाचे रक्षण होते, असेही ते म्हणाले.
     उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज असून त्यासाठी गाय पाळणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी गो-शाळा झाल्या पाहिजेत. मोठ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी गोमूत्र हा उत्तम पर्याय आहे. मानवाच्या शरीरातील पाच मूलतत्त्वे संतुलित राखण्यासाठी गोमूत्राबरोबरच ताक, तूप याचे सेवन करण्याची गरज आहे,हे सांगतानाच त्यांनी  या वेळी  गाईचे शेण, गोमूत्र, दूध याचे विविध फायदे, मानवाचे जीवन अधिक निरोगी राखण्यासाठी होणारा लाभ तसेच यातून पर्यावरण रक्षणासाठी होणारा फायदा याची सविस्तर माहिती देऊन कथन केली.गायींच्या संख्येत वाढ व्हावी आणि तिच्यापासून मिळणारे घटक मानवाला किती फायदेशीर आहेत, हे सांगण्यासाठी काही मंडळी राज्य,देश अशा सगळ्या भागात फिरत आहे.त्यामुळे गायीचे मूल्य आपणही लक्षात घेतले पाहिजे.
     गायीच्या संदर्भातील आणखी एक बातमी नुकतीच वाचायला मिळाली. गेल्या चार पिढ्या पुणे जिल्ह्यात लोणी देवकर येथे देशी गायींचे संवर्धन करणारे रज्जाक पठाण यांना लोकसेवा-समाजसेवा विभागातील 1 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलारज्जाक पठाण यांनी आपल्या गोठ्यात दररोज 12 लीटर दूध देणारी खिल्लार गाय तसेच 28 लीटर दूध देणार्या गीर गायींची पैदास केली आहे. जातिवंत गायींची पैदास करून त्या गायी ते शेतकर्यांना दान करतात. भाकड देशी गायी दुभत्या बनवून त्यांनी शेतकर्यांच्या दावणीला बांधल्या आहेत. 650 विधवा महिलांच्या मुलांना ते शिक्षणासाठी मदतही करतात. ‘मुस्लीम गोपालकअशी त्यांची ओळख आजच्या काळातली नसून गेल्या तीन पिढ्यांची आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला खूप आनंद झाला. निरोगी राहायचे असेल, तर देशी गायी पाळणे गरजेचे आहे. ज्याला गाय पाळता येत नाही, त्याने देशी गायीचे दूध तरी प्यायले पाहिजे. सुदृढ भारत घडवायचा असेल व निरोगी राहायचे, तर गायी पाळण्याला पर्याय नाही, असेही ते आवाहन करतात. विशेष म्हणजे त्यांना 1 लाखाचे पारितोषिक देण्यात आले,त्यात आणखी एका लाखाची भर घालून त्यांनी तो निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन टाकला. काही माणसं खरेच समाजाच्या उद्धारासाठी झपाटलेली असतात. ही दोन नावे त्यापैकीच आहेत. समाज सदृढ बनला पाहिजे, देशी गायींची पैदास वाढली पाहिजे, यासाठी झटणार्या या मंडळींना सलाम करावा तेवढा थोडाच आहे.

Sunday, March 26, 2017

डॉक्टर-रुग्णांच्या नात्यामध्ये परिवर्तन

     सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून राज्यातील निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उगारले. त्यामुळे शासनाच्या सूचनेवरून या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ खासगी दवाखानेही बंद ठेवण्यात आल्याने रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली होती. या संपामुळे रुग्णांना प्रचंड ससेहोलपट सहन करावी लागली. यात 377 रुग्णांचा बळी गेला, या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. मात्र शासनाने डॉ़क्टरांच्या हल्ल्यांची प्रकरणे गांभिर्यानेही घ्यायला हवी होती. या गोष्टीकडेही दुर्लक्षून चालणार नाही. आता कोणही उठून कोणावरही हात उगारू लागला आहे.या गोष्टी थांबल्या पाहिजेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या देशात सनदशीर मार्ग आहेत,त्याचा अवलंब केला पाहिजे.
     डॉक्टरांवर वांरवार होणारे हल्ले आणि डॉक्टरांकडून करण्यात येणारा संप याबाबत सर्वंकष विचार व्हायला पाहिजे.याबाबत एकांगी विचार केल्यास आवश्यक ते निष्कर्ष काढणे शक्य होत नाही. या प्रकरणातील मूळ मुद्दा हा सामाजिक सहिष्णूतेशी निगडित आहे. समाज आणि डॉक्टरांनी परस्परांना समजून एकमेकांशी जुळवून घेतल्यास हा प्रश्न सहज मार्गी लागू शकतो. डॉक्टरांनी जसा रुग्णांची सेवा करण्याचा संकल्प घेतला आहे तसेच या संकल्पाशी बांधील असणार्या डॉक्टरांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी आहे. डोक्यावरती हिंसेची टांगती तलवार असताना तो खर्या अर्थाने आपले कर्तव्य बजावू शकत नाही. वास्तविक पाहता या संपाचे सर्मथन करणे योग्य ठरणार नाही. कुठलाही संप जो अत्यावश्यक सेवांना छेद देतो तो संप सर्मथनीय नसतो. आपल्या भावना योग्य पद्धतीने मांडण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र, डॉक्टरांवर ही संपाची पाळी का आली, याचाही विचार करणे गरजेचे आहे. जसे डॉक्टरांनी ही लक्ष्मणरेषा ओलांडू नये तसेच त्यांच्यावर ती ओलांडण्याचे दडपण येऊ नये, याचाही विचार संबंधितांनी करावा. संस्कारक्षम डॉक्टर आणि विवेकपूर्ण समाज या दोघांची सांगड घालूनच हा प्रश्न सुटू शकतो.
     या घटना एका दिवसात घडत नाही. कुठेतरी समाजामध्येही डॉक्टरांच्याविषयी ज्या पद्धतीचा आदर असला पाहिजे, त्यामध्ये नितांत कमतरता आली आहे. डॉक्टर हा काही परका नाही, तो आपल्यातलाच एक आहे. आजही जवळपास प्रत्येक जण आपल्या पोराला डॉक्टर करण्याची इच्छा बाळगतोच की नाही. त्यामुळेच समाजमनानेही तर्कपूर्ण असतानाच विवेकपूर्ण असणेही आवश्यक नाही का? डॉक्टरांना हाणामारी करून परिस्थिती चिघळण्यापलिकडे काही घडते का? पण समाज शिक्षित होणे, समाज प्रगल्भ होणे, समाज संस्कारित होणे ही एक प्रक्रिया आहे आणि त्यावर कुणाचेही नियंत्रण राहू शकत नाही. कारण ती एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.
     निश्चितपणे आज डॉक्टर-रुग्णांच्या नात्यामध्ये कुठेतरी परिवर्तन आले आहे. डॉक्टरी पेशा हा नोबल पेशा आहे. समाजाच्या सेवेचे ब्रीद घेऊन चालणारा हा पेशा आहे, हे खरे होते. पण ज्या दिवशी डॉक्टरी पेशा हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्भूत आणण्यात आला त्यादिवशी याचे सेवेतून व्यापारात परिवर्तन झाले आणि रुग्ण ग्राहकांमध्ये रुपांतरित झाले. रुग्ण आणि ग्राहक म्हणून येणारा रुग्ण यामध्ये फरक असतो आणि म्हणून अपेक्षेचा हा संदर्भ बदलला आहे. सेवेच्या संदर्भाला आता पूर्णपणे व्यावसायिकतेची झळ पोहोचली आहे. कदाचित डॉक्टरांच्या सातत्याने होणार्या प्रशिक्षणामध्ये या गोष्टींच्या अंतर्भावाची उपेक्षा असल्याने देखील हे घडत असावे. म्हणूनमेडिकल काऊंसिलमध्येअँटिट्युड आणि कम्युनिकेशन मॉड्यूलअभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला आहे.
     शासनानेही डॉक्टरांसाठी आवश्यक असलेले धोरणात्मक निर्णय आणि त्या निर्णयामध्ये कामाच्या ठिकाणासह सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तात्पुरत्या घोषणा करून हे थांबणार नाही. यासाठी कायम असा एककॉम्प्रहेन्सिव्ह सिक्युरिटी प्लॅन ऑफ डॉक्टर्स अँट वर्क प्लेसेसतयार करणे गरजेचे आहे. आज जर शासनाला वाटत असेल की सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून सुरक्षेचा प्रश्न सुटू शकेल तर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची पाळी ही आग्रहानंतर का यावी, हा प्रश्नच आहे. ओपीडी, आयपीडी, आयसीयू, ऑपरेशन रूम, रिकव्हरी रूम आणि कॅम्पसमधील सुरक्षा केवळ एका सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून सुटेल का, असा प्रश्नही आहे.
     खरे तर, हा मुद्दा आजचा नाही. फार पूर्वीपासून याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे खर्या अर्थाने जी गुणात्मकता अभिप्रेत होती ती पूर्ण झाली काय, याचा विचार करता त्रोटक पद्धतीने या गोष्टींचे निदान होऊ शकत नाही. संबंधितांनी या बाबतीत एक ठोस निर्णय घेऊन ठरवलेल्या कालर्मयादेत पूर्ण करणे गरजेचे आहे. शेवटी निवासी डॉक्टर हा कुणाच्यातरी अधिपत्याखालीच काम करतो. तो एखाद्या संस्थेच्या नियंत्रणाखलीच काम करतो. जेव्हा आपण विमानात शिरतो आणि विमानाने हवेत झेप घेताच संपूर्ण विमानाचा वाली जसा कॅप्टन असतो तसेच निवासी डॉक्टरांचे जे वाली आहेत, त्यांच्यावरच डॉक्टरांना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे.त्यांनीच याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

विज्ञान साक्षरता वाढण्याची गरज

     विज्ञान हा विषय पुस्तक वाचून शिकविता येत नसून तो अनुभवाने शिकविणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या देशातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. विज्ञान हा विषयाला अनुभवांपासून दुरावता येणार नाही. हा विषय पूर्णपणे अनुभवांशी निगडीत आहे. वर्गात शिक्षकाने किंवा पालकांनी अधोरेखित करुन दिलेले एखादे उत्तर पाठ करुन परीक्षेत ते उतरविणे ही आपल्याकडची रूढ पद्धत अत्यंत चुकीची आहे. परीक्षांना देण्यात येणार्या अवाजवी महत्त्वाचा हा परिणाम आहे, असे म्हणावे लागेल.
      शाळांमध्ये विज्ञानाचा अभ्यास हा प्रत्यक्ष प्रयोग करुन शिकविला गेला पाहिजे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणात आवड निर्माण होणार नाही. यासर्वासाठी आपल्या शिक्षण पद्धतीचा साचा बदलणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठ, राज्य शासन, शिक्षण मंडळे, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा बोर्डाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. परीक्षा मंडळांनी केवळ ठराविक साच्यातच परीक्षा घेणे चुकीचे आहे. त्यात काळानुरुप बदल करणे गरजेचे आहे.

     शाळेत शिकविताना शिक्षकांनी सर्वप्रथममी माझ्या समोर असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा हुशार आहे. त्यांना काय कळतं, माझा अनुभव जास्त आहे.’ हा अहंभाव मनातून काढून टाकला पाहिजे. तरच तो शिक्षक विद्यार्थ्यांना हा विषय व्यवस्थित शिकवू शकतो. विज्ञान हा विषय सैधांतिक आहे. यामुळे यातील सिद्धांत समजणे गरजेचे आहे, आणि हे सिद्धांत समजण्यासाठी प्रयोगाद्वारे शिक्षण देणे गरजेचे आहे. शाळांनी, शैक्षणिक संस्थांनी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. देशात विज्ञान शिक्षण पद्धतीवर अनेक प्रयोग सुरु असून ते अत्यंत लहान स्वरुपात आहेत. शाळा, महाविद्यालयातील काही शिक्षक शिकविण्याच्या पद्धतीत निरनिराळे प्रयोग करत असतात. मात्र त्या प्रयोगांना व्यापक स्वरुप येण्याची गरज आहे. यामध्ये विज्ञानसंस्थांबरोबर शासकीय हातभार तसेच विद्यापीठांनी पुढे येणे आवश्यक आहे.
     बर्याचदा विद्यार्थी प्रश्न वा एखादी समस्या सोडविताना गोंधळतात यामागचे कारण म्हणजे त्यांच्या डोक्यात असलेली सूत्रे वापरण्याची पद्धत. मग जर विद्यार्थ्यांनाच प्रश्न तयार करायला सांगून तो सोडविण्यास सांगितला तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. हा विचार एका शिक्षकाने केला आणि  त्या शिक्षकाने एक महिना विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या व्यतिरिक्त अशाप्रकारचे प्रशिक्षण दिले. त्याचा परिणाम इतका चांगला झाला की विद्यार्थ्यांचे भौतिकशास्त्राचा पाया पक्का झाला व त्यांच्या मनातील त्या विषया संदर्भातील भीती पूर्णत: दूर झाली. अशाप्रकारचे प्रयोग विविध ठिकाणी झाले पाहिजे तरच आपली शिक्षण पद्धती सुधारेल आणि आपला देश खर्या अर्थाने विज्ञानाधिष्ठ होईल.
शाळेतील शिक्षण पद्धतीच्याबाबतीत नेमके कोणते पाऊल उचलण्यासाठी काही गोष्टींचा अंगिकार केला गेला पाहिजे. परदेशात नव्याने रुढ झालेल्या रचनावादाचा आपण पुरस्कार केला पाहिजे, असे काही तज्ञांना वाटतेविद्यार्थ्यांच्या स्वयंकल्पनांना वाव दिला पाहिजे. शिक्षक वारंवार मी सांगतो तेच बरोबर आहे असे म्हणत जर विद्यार्थ्यांची कल्पकता मारत असेल तर, विज्ञानाच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना रुची वाटणे कठीण आहे. रचनावादाच्या सिद्धांतामध्ये प्रत्येकाच्या कल्पनेला वाव देण्यात येतो. त्यानुसार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अथवा त्यांच्या कल्पनेला शिक्षकांनी वाव दिला पाहिजे. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळू शकते. आपल्याकडे रचनावाद रुजलेलाच नाही, विशेष म्हणजे तो अनेकांना माहितीदेखील नाही. विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या चुका समजून घेणे आवश्यक आहे. मुलं त्यांच्यापाशी असलेल्या अनुभवातून अंदाज बांधत असतात आणि त्यातून त्यांची कृती होत असते. त्यांच्या चुकीचे मूळ शोधून जर त्यांना त्याचे स्पष्टीकरण दिले तर त्यांची खर्या अर्थाने प्रगती होईल.
      विज्ञानाचा अभ्यास बदलण्यासाठी विज्ञानाच्या पुस्तकांचा साचा बदलणे आवश्यक आहे. पुस्तकांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला पाहिले. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे 1 ली ते 5 वीच्या पाठयपुस्तकांमध्ये बदल करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर येथे होणार्या ऑलिम्पियाडसचाही विज्ञान शिक्षणात बदल घडविण्यात वाटा आहेप्रयोगाच्या आधारे पाठयपुस्तके लिहिली गेली पाहिजेत. याचे प्रयत्न काही ठिकाणी सुरु आहेतच. नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटरने काढलेली नवीन पाठयपुस्तके विज्ञानाच्या अभ्यासासाठी अनुकुल असून त्या आधारावर महाराष्ट्र शासनाने पाठयपुस्तकांची निर्मिती करावी असा सल्लाही काही संशोधक प्राध्यापकांनी दिला आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांचा शिकविण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काही पावले उचलण्याची आवश्यकता आहे. यासाठीही बरेच प्रयत्न सुरु आहेत. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे टिचर्स ट्रेनिंग देण्यात येते. यासाठी सर्व स्तरातील शिक्षकांनी पुढे येणे गरजेचे आहे. प्रत्येक स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्नही करण्यात आले. पण काही तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या होमी भाभा केंद्र आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. याचा फायदा नक्कीच होत आहे,मात्र यात व्यापकता यायला हवी.
     माणसाच्या दैनंदिन जिवनातील विज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जात असल्याने विज्ञान साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्याला देशाची बौद्धिक, सांस्कृतिक प्रगती करायची असेल तर शिक्षणाचे संयोजन करणे अपरिहार्य आहे. आज विज्ञान व तंत्रज्ञान हे प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले आहे. त्याचबरोबर या माध्यमातून फसवाफसवीचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे विज्ञान साक्षरता पसरणे गरजेचे आहे. येत्या काही वर्षांमध्ये विज्ञान आयुष्यातील अविभाज्य घटक बनणार आहे. त्यामुळे विज्ञान शिक्षण क्रमप्राप्त होणार आहे. याचे गांभीर्य जाणून 1968 मध्येच कोठारी कमिशनने विज्ञान शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे. सर्वाची बुद्धिमत्ता समान स्तरावर मानून अभ्यासक्रम बनविण्यात येतो याचा अर्थ असा आहे की, प्रत्येकाला विज्ञान येऊ शकते. त्यामुळे शिक्षक, पालक यांच्याकडून होणारा विज्ञानाचा बागुलबुवा कमी झाला पाहिजे.

Friday, March 24, 2017

ऑनलाईन खरेदीतील धोके

     घरबसल्या सगळी कामे होत असतील तर कोणाला नको आहे. ग्राहकांच्या मनातील हेच भाव जाणून घेऊन काही कंपन्यांनी त्यांना घरबसल्या वस्तू देण्याचा फंडा अलिकडच्या काही वर्षात अवलंबला आहे. आणि याला अपेक्षेप्रमाणे भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने यात अन्य कंपन्याही उतरल्या आहेत. ग्राहक आपल्याला हवी ती वस्तू ऑनलाईन नोंदवू लागला आहे. आणि त्या वस्तू पोस्टाच्या,कुरिअरच्यामाध्यमातून लोकांना घरपोच मिळू लागल्या आहेत. लोकांनी ऑनलाईन आपला चॉईस निवडायचा आहे. बाजारातल्या दुकानातील पोर्या जशा वस्तू आपल्यासमोर ठेवतो, तशा वस्तू ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे आकार,वजन,किंमत,त्यातले नमुने अशा अनेक वस्तूंची व्हरायटी आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतात. साड्या,अन्य कपडे,घड्याळ,मिक्सर,ग्राईंडर,इस्त्री,हेअर ड्रायर,मोबाईल,टीव्ही,लॅपटॅप अशा कितीतरी वस्तू आपल्याला ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. इतकेच नव्हे तर काही कंपन्यांनी 2 हजार रुपयांचे सुट्टे देण्याचीही व्यवस्था केली होती. लोकांच्या दिमतीला अगदी गोवर्या, गोमूत्र अशाही काही आश्चर्यकारक वस्तूही विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. इतका हा ऑनलाईन बाजार भरला-फुलला आहेइलेक्टॉनिक वस्तूंना या ऑनलाईन खरेदीच्या बाजारात अधिक मागणी असल्याचे सध्यातरी दिसते आहे. हा व्यवहार लोकांना आवडला आहे, मात्र यात काही धोकेही आहेत. फसवणुकीचे धोके वाढले आहेत. घरापर्यंत येणारी वस्तू ही आपण मागितलेलीच आहे का, याची खात्रीही देता येत नाही. शिवाय आपल्या बँकेतले पैसेही आता सुरक्षित राहिनासे झाले आहेत.

     त्यामुळे ऑनलाईन खरेदीतील धोके लक्षात घेऊन व्यवहार करणे, योग्य आहे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या वेबसाईटवरून खरेदी करणार आहे,ती सुरक्षित आहे का,याची खात्री करून घ्यावी लागेल. सुरक्षित वेबसाईटवर सुरक्षिततेचे चिन्ह दिलेले असते. अशा वेबसाईटवरून खरेदी करणे,उत्तम. ऑनलाइन खरेदीच्या ज्या चांगल्या साइटस् उपलब्ध आहेत त्यावर खरेदीच्या मूल्यमापनाचे अहवालही उपलब्ध असतात. खरेदीसाठी क्लिक करण्याआधी पूर्ण वेबसाइटवर फिरून यावं. अनेक वेबसाइटवर ग्राहकांची तक्रार नोंदवण्याची-निवारणाची सोयही उपलब्ध असते. आपण जिथून खरेदी करू तिथे ही व्यवस्था आहे का? हे आधी तपासायला हवं.वस्तूची ऑर्डर देण्याअगोदर या गोष्टीची काळजी करायला हवी.दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या वस्तूची ऑनलाईन खरेदी करणार आहे.त्या वस्तूची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी.
नेहमीची खरेदी करताना जसं चार दुकानं फिरून आल्याशिवाय आपण साधा झाडूसुद्धा घेत नाही तसंच एखाद्या साइटवरची वस्तू जरी आपल्याला आवडली असली तरी त्यासंबंधीच्या आणखी दोन चार साइटसची माहिती काढून तिथे फेरफटका मारून येणे आवश्यक आहे. कपडे, ज्वेलरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेटस् यांची मागणी ऑनलाइन करण्याआधी जवळच्या दुकानात जाऊन त्या हाताळून पाहिल्या पाहिजेत.
     ऑनलाईन खरेदी करताना आपण पैसेदेखील ऑनलाईन चुकते करणार असतो. आपल्याकडे डेबिट,क्रेडिट कार्ड उपलब्ध असतात,यातून आपण पैसे पाठवण्याची व्यवस्था करतो. मात्र अलिकडे यात धोके वाढले आहेत. त्यामुळे खरेदीचं पेमेंट जर आपल्या क्रेडिट कार्डवरून होणार असेल तर पेमेंटची माहिती स्वत:च्या हाताने भरायला हवी. इतरांना ती भरू देऊ नये. यामुळे आपल्या क्रेडिट कार्डची सुरक्षा धोक्यात येते. क्रेडिट कार्डच्या मागे बारा अंकी नंबर असतो. शेवटचे तीन नंबर म्हणजे क्रेडिट कार्डची चावी असतात. ते इतरांना समजू देवू नये आपण ऊठसूट जरी ऑनलाइन खरेदी करत नसलो तरी आपलं इंटरनेट बँकिंगचं अकाउंट ऊठसूट चेक करावं. नेट चालू केल्यावर एकदा आणि बंद करण्याआधी एकदा अकाउंट चेक करणं हे सुरक्षिततेच्या दृष्टीनं उचित असतं. क्रेडिट कार्डने खरेदीचे पेमेंट करताना पुरेशी काळजी घेतली नाही तर तुमचे ऑनलाइन खरेदीचे अकाउंट हँग होऊ शकते.त्यातले पैसे दुसराच कुणीतरी परस्पर काढून मोकळा होतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाइन खरेदी ही शक्यतो स्वत:च्या कॉम्प्युटरवरून स्वत:च्या नेटवरून करावी. सायबर कॅफेचा पर्याय      सुरक्षित नाही. अगदीच नाईलाज असल्यास आपण वापरत असलेल्या कॉम्प्युटरवर अँटीव्हायरस अँक्टिव्ह आहे की नाही हे आधी पाहायला हवे.सायबर कॅफेमधील कॉम्प्युटर अनेक जण हाताळतात. आणि आपण इंटरनेटवर केलेले व्यवहार हे गोपनीय राहात नाही. ब्राऊजरमध्ये खरेदीसाठी निवडलेल्या साइटसची नोंद झालेलीच असते. त्यामुळे हे व्यवहार इतरांना माहीत होण्याची शक्यता जास्त बळावते. आपण इंटरनेटद्वारे केलेले व्यवहार कितीही गोपनीय ठेवण्याचे प्रयत्न केले तरी इंटरनेटवर आपल्या व्यवहाराचे ठसे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उमटलेलेच असतात. त्यामुळे खरेदीसाठी आपलाच कॉम्प्युटर आणि आपलेच नेट वापरायला हवे.
     आपण वर्तमानपत्रात वाचलेच आहे की, मोबाईल मागितला आणि दगड मिळाला. एका व्यक्तीला तर इस्त्रीऐवजी शेणाच्या गोवर्या ऑनलाईन पॅकिंगमध्ये आढळून आल्या. अशा फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत.त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना असे संभाव्य धोके लक्षात घेऊन पुढे काय करायचे,याही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. कारण आपली फसवनूक झाल्यावर पुन्हा आपल्याला पैसे परत मिळत नाहीत. या व्यवहारात अजून सक्षम असे कायदे आपल्याकडे झालेले नाहीत. ग्राहक पंचायतीशी संपर्क साधून संभाव्य धोक्यांवरही तोडगा काढून ठेवायला हवा. कंपन्या आपली विश्वासाहर्ता अशाप्रकारे गमावणार नाहीत.मधल्यामधे अशा भानगडी होत असतात. या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांची हमी घेतल्यास उत्तम आहे. ऑनलाईन खरेदी आपल्याला फार सोयीस्कर वाटत असली तरी त्यातले धोके लक्षात घेऊन व्यवहार करायला हवा.

Wednesday, March 22, 2017

कुटुंब शस्त्रक्रियेसाठी महिलाच पुढे का?


     हम दो, हमारे दो, हे छोट्या कुटुंबाचं सुंदर चित्र स्पष्ट करणारं स्लोगन आपण कित्येकदा तरी ऐकलं आणि वाचलं आहे.पण खरं पाहायचं तर ते हम दो मेरे दो, असं असायला हवं होतं. कारण आपलं कुटुंब छोटं हवं असं सगळ्यांनाचं वाटत असतं. मात्र कुटुंबाची सगळी जबाबदारी एकट्या महिलेलाच उचलावी लागते. आपल्याकडे कुटुंब नियोजनाचा सगळ्यात लोकप्रिय उपाय आहे,तो म्हणजे नसबंदीचा. आणि ही नसबंदी करण्याची सगळी जबाबदारी फक्त म्हणजे फक्त महिलांकडेच आहे. आता तुम्ही याला स्वेच्छा म्हणा किंवा मजबुरी. किंवा आपल्या नवर्याला कसला त्रास होऊ नये,म्हणून ही जबाबदारी आपल्याकडे घेणारी महिला असेल,परंतु नसबंदीची शस्त्रक्रिया ही महिलांच्याच वाट्याला येते. आणि ही जबाबदारी महिला निमुटपणे पार पाडत आहेत.

     पुरुष ही नसबंदीची शस्त्रक्रिया करून घ्यायला पुढे धजावत नाही. त्याला अनेक कारणे आहेत.एक म्हणजे नसबंदीचे कनेकशन मर्दानगीशी जोडले गेले आहे. या शस्त्रक्रियेमुळे पुरुषाचा मर्दपणा कमी होईल आणि शारीरिक संबंधादरम्यान त्याला पूर्ण समाधान मिळणार नाही. आणि जर शस्त्रक्रिया केलीच तर मित्रमंडळी किंवा नातेवाईक काय म्हणतील? या भीतीमुळे पुरुष ही जबाबदारी झटकताना दिसत आहे. पुरुषांना आणखी एक मोठी भीती आहे, ती म्हणजे आपल्यावरची शस्त्रक्रिया फेल गेली आणि आपली बायको गर्भवती राहिली तर काय करायचे? हा विषय चेष्टेचा तर बनतोच, पण समाज,मित्र आणि नातेवाईक दोघांकडे संशयाच्या नजरेने पाहतील,ही चिंता सतावत असते. आणि हा असला खुलासा कुणा-कुणापुढे आणि कसा करायचा हा प्रश्न उरतोच. पुरुष नसबंदी करून घ्यायला मागे सरतात, त्याला आणखी एक कारण आहे, दुर्दैवाने आपले दुसरे लग्न मोडले तर आपण दुसर्या लग्नाच्या योग्यतेचेच राहणार नाही. समाजातला एक वर्ग असाही आहे की, पैशासाठी शस्त्रक्रियेला महिलांचाच पुढे केले जाते.म्हणजे कुटुंबाचे कुटुंब नियोजन व्हायला हवे,पण याची पूर्ण जबाबदारी बायकोने घ्यावी. 
     स्टेट इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेयरच्या आकडेवारीनुसार 2016-17 (जानेवारी 2017 पर्यंत) 2 लाख 32 हजार 145 महिलांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. तीच नसबंदी करून घेणार्या पुरुषांची संख्या फक्त 2 हजार 960 आहे. यातही शहरी महिलांपेक्षा ग्रामीण महिलांची संख्या अधिक आहे. याचाही विचार होणं महत्त्वाचं आहे.
     कुटुंब शस्त्रक्रिेची जबाबदारी महिलांवरच का आली, यालाही काही तत्कालिन कारणे आहेत. आपल्या देशात कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 मध्ये सुरू झाली.कित्येक वर्षे या कार्यक्रमाचा उद्देश टारगेट पूर्ण करण्याचाच राहिला आहे.तर काही राज्यांमध्ये पब्लिक सेक्टर हेल्थ वर्कर्स यान त्या प्रकारे टारगेट पूर्ण करण्याच्या मागेच लागले. काही ठिकाणी बसेसच्या बसेस हायजॅक करण्यात येत होत्या. पुरुषांवर जबरदस्ती करण्यात आली. पुढे दादा कोंडकेंचा याबाबतचा एक चित्रपटदेखील आला होता. शिवाय नसबंदी करण्यासाठी गरीब कुटुंबातल्या पुरुषांना रेडिओ किंवा रोख पैसेही देण्यात आले. मात्र याचा परिणाम असा झाला की, लोक या पुरुष नसबंदीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाविरोधातच गेले. शेवटी यानंतर सरकारने आपला पराभव स्वीकारत महिलांवरच फोकस करण्यावर भर दिला.आणीबाणीच्या काळात जवळपास 6.2 दशलक्ष महिला आणि पुरुषांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली होती. यादरम्यान पाच हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.
     मात्र अलिकडे नॅशनल पॉलिसी फॉर वुमनमध्ये आता महिला नसबंदीच्या तुलनेत पुरुष नसबंदीवर अधिक जोर दिला जात आहे.यातून सरकारलाही वाटते की, पुरुषांनीही कुटुंब नियोजनासंबंधीची जबाबदारी आपल्या खांद्यावरही घ्यावी. पण पुरुष आपल्या शरीराला डॉक्टरांचा स्पर्श होऊ नये म्हणून,कुठल्याही मेडिकल प्रक्रियेपासून स्वत:ला दूर ठेवण्याचाच प्रयत्न करीत असतात. शरीराच्या कुठल्याही भागातील बदलला,ते खूप मोठा निर्णय समजतात. त्यांना पूर्ण प्रक्रियेबाबत माहिती नसते, त्यामुळे ते घाबरतात.ही शस्त्रक्रिया तशी फार सोपी आहे,तरीही पुरुष यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. शिवाय कित्येक  महिला स्वत: च आपल्या नवर्याला या गोष्टीपासून दूर ठेवताना दिसतात. आपल्या नवर्याला याचा त्रास होऊ नये, असं त्यांना वाटतं
     नसबंदीची जबाबदारी महिला आपोआपच स्वीकारताना दिसत आहेत. मग त्यांची शारीरिक प्रकृती खराब असली तरी शस्त्रक्रियेला तयार होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनीच छोटे कुटुंब, सुखी कुटुंबचा अंगिकार केला आहे. खंडीभर मुलांच्या गराड्यात महिला गुरफटून जातात. त्यांना नीट मुलांचा सांभाळ करता येत नाही तर स्वत;लाही जपता येत नाही. त्यामुळे कुटुंब नियोजनामुळे सगळयात अधिक सुधारणा महिला आणि मुलामध्ये होते. मुलांमध्ये अंतर असणं आणि एक किंवा दोन मुलं असण्याने आईला स्वत:चे स्वाथ्य चांगले ठेवण्यास मदत मिळते. याशिवाय मुलांचा सांभाळदेखील चांगल्याप्रकारे करता येतो. महिलांमध्ये शारीरिक सक्षमता आल्याने दोघांचीही प्रकृती ठणठणीत राहण्यास मदत होते. नोकरी करणारी स्त्री तर लवकर मूल व्हायला नको,याच मताची असते. त्यामुळे साहजिकच छोट्या कुटुंबासाठी नवरा आणि बायको दोघेही तयार असले तरी नसबंदी शस्त्रक्रियेची जबाबदारी मात्र महिलेकडेच जाते, याला तसा कुणाचाच अक्षेप नाही.