Thursday, March 30, 2017

दात त्यांचे, आमचे

     निसर्गाने वेगवेगळ्या जीव-जंतूंना दात दिले आहेत,ते फक्त शिकार करायला किंवा स्वत:चा बचाव करायला दिलेले नाहीत. अन्न चावण्याच्या कामालाही त्याचा उपयोग होत असतो. काही जीवांच्या दातांची ठेवण तर अगदी अद्वितीय आणि विचित्र असते. हत्तीचे दात खायचे आणि दाखवायचे वेगळे असतात.ही म्हण तर तुम्हाला माहितच आहे. काही नर जातीच्या हत्तीचे एक किंवा दोन दात बाहेर दिसतात,जे आकाराने बरेच मोठे असतात. पण हे फक्त दाखवायचे असतात. अन्न चावण्याचे दात त्याच्या तोंडात असतात, जे आपल्याला दिसत नाहीत. घोड्यांचे वय तर त्यांच्या दातांची स्थिती पाहून  ठरवले जाते. वयांबरोबरच त्यांचे दात घासले जातात. माकडाच्या तोंडात माणसांसारखीच दातांची ठेवण असते.फक्त इतकेच की, त्यांचे दात माणसांच्या दातांपेक्षा थोडे मोठे असतात. आपल्या या दातांनीच ते पीस्स्स करून माणसांच्या अंगावर येतात. त्यांना वाकुल्या दाखवतात. त्यांचे दात खूप दणकट असतात.

     गाय-बैल यांचे दात तर दोनवेळा खाण्याच्या कामी उपयोगाला येतात. पहिल्यांदा ते अन्न पटापटा खावून घेतात आणि नंतर निवांतपणे अन्न पुन्हा तोंडात आणून चघळत बसतात. त्याला आपण रवंथ करणे म्हणतो. वाघ,सिंह आणि चित्ता यासारखे हिंस्त्र प्राणी आपल्या दातांनीच शिकारची मानगुट पकडतात आणि क्षणात त्याच्या शरीराची चिरफाड करतात. यांचे दात फारच भीतीदायक असतातगेंड्याचे दात असतात,पण गवत खाण्यासाठी ते आपल्या ओठांचा उपयोग करतात. समुद्रगाय चरणारा प्राणी आहे,त्याचे दात पडत असतात.जुने दात पडून त्याजागी दुसरे दात येतात. समुद्रगाय सावकाश चालणारा सस्तनप्राणी आहे, मात्र ही गाय समुद्रात राहते. मगरीचे दात अर्धवट खुलले असतात. तिचा जबडा फारच मजबूत असतो. शिकार पकडल्यावर त्याला ती उलटा-पालटा करते. आपल्या तीक्ष्ण दातांनी त्याचे छोटे-छोटे तुकडे करून खाते. स्लोथ नावाचा सस्तन प्राणी दक्षिण अफ्रिकेत आढळतो. त्याचे दात खुंटीसारखे आणि पूर्ण विकसित झालेले असतात. हा झाडांची पाने आणि फांद्या खातो.
 
   कुत्र्याचे दातदेखील मोठे तीक्ष्ण असतात. ते वस्तू,पदार्थ किंवा शिकार यांची  आपल्या दातांनीच चिरफाड करतात.जर कुत्रा पिसाळलेला असेल आणि त्याने माणसाला चावले तर त्याला रेबीज नावाचा जीवघेणा रोग होतो.माणसाचे दात फक्त चावण्यासाठी,तुकडे करण्यासाठी चिघळण्यासाठी मदत करत नाहीत तर बोलण्यासाठीही मदत करतात. सुंदर दंतपंक्ति हास्य आणखी मनोहारी बनवतात. यांची संख्या बत्तीस असते. सापाच्या तोंडात तर म्हणे दात त्याच्या जन्माअगोदर येतात. अंड्यातून बाहेर येण्यासाठी सापाच्या तोंडाच्या वरच्या बाजूला एक दात असतो.विषारी सापांच्या वरच्या जबड्यात विषारी दात असतात. दंश केल्यानंतर तो उलटा पडतो आणि विष शरीरात सोडतो. उंदिर आणि चिचुंद्री यांचे दात तीक्ष्ण आणि सरळ असतात. अगदी कठीण वस्तू कुरतडतात. बीळ बनवण्यासाठी त्याचा त्यांना चांगला उपयोग होतो. याच दातांनी ते माणसांनादेखील चावतात. वटवाघळाचे दात सुईसारखे कारी असतात.या दातांनी ते एकाद्या जनावराच्या कातडीला छेद पाडून त्याचे रक्त शोषतात. एवढेच नव्हे तर झोपलेल्या माणसावरदेखील आपल्या दातांनी हल्ला करतात. किटकांना दात नसतात पण तोंडात चावण्यासाठी  जबडा असतो. पीनसारखा टोचवून आपले भोजन पिण्यासाठी त्याचा यंत्रासारखा उपयोग करतात. चिमण्यांना किंवा अन्य पक्ष्यांना दात नसतात. त्यांच्या जागी चोच असते. आणि या चोचीनेच ते आपले अन्न खातात. हे जग जसे अदभूत आहे, तशीच दातांची दुनियादेखील अदभूत आणि विचित्र आहे.

No comments:

Post a Comment