जिद्द,चिकाटी माणसाला भरभरून देतात.
म्हणूनच काही माणसं झपाटून कामाला लागलेली असतात.यश त्यांच्या पायाशी लोळण घेतं. त्यामुळे ही माणसं सर्वसामान्यांपेक्षा
वेगळी वाटतात. कित्येकांचे मग आयडॉल बनतात. काहीजण त्यांना पुजतात.त्यांचा जप करत मोठी होतात,
यश मिळवतात. आणि मग ते दुसर्याचे आयडॉल होतात. पण हे सगळं होतं,ते काही तरी करण्या-बनण्याच्या जिद्दीतून,चिकाटीतून. अलिकडेच कोल्हापूरला दोन अशीच तरुणांची आयडॉल
ठरावीत, अशी प्रसिद्ध तरुण माणसं येऊन गेली. त्यांनी आपल्या मुलाखतीतून तरुणांना संदेश दिला. ती माणसं
म्हणजे सुप्रसिद्ध मॉडेल लोपमुद्रा राऊत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युवा शास्त्रज्ञ
आदित्य पाटील. त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून
तरुणांना आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत केली. त्यांनी आपल्या मुलाखतीतून सतत नवं शिकत राहा. ध्येय
पक्कं केल्यावर फोकस्ड राहा. मान-अपमानाचे
प्रसंग येतील. त्याला सामोरे जा,यश-अपयशाचे हिंदोळे दिसतील. पण कोणत्याही स्थितीत समतोल
वृत्तीने कार्यरत राहा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वत:च्या क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जा, असा सक्सेस पासवर्ड देऊन टाकला. तरुणांनीही त्यांना भरभरून दाद दिली.
शिवाजी
विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजित ‘उडान
2017’ कार्यक्रमात मॉडेल राऊत
आणि शास्त्रज्ञ पाटील यांची प्रकट
मुलाखत झाली. ही मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. यावेळी बोलताना लोपमुद्रा राऊत म्हणाल्या की, मीदेखील सर्वसामान्य मुला-मुलींप्रमाणेच वाढले. लहानपणी मित्रमैत्रीणींसोबत उन्हातान्हात
मनसोक्त खेळले. शाळेत असताना प्रत्येक खेळात सहभागी असायचे.
क्रिकेट, हॉलीबॉल अशा खेळांची मी कॅप्टन होते. पॉलिटेक्निक व त्यानंतर इंजिनियरिंग
केले. कॉलेजमध्येही स्पर्धेत गोल्ड मिळवत असे. कारण कोणतीही गोष्ट एक्सट्रीम करायची मला सवय आहे. कॉलेजमध्ये
माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मित्रमंडळींकडून कॉम्प्लिमेंटस् मिळत होत्या. त्यावेळी पहिल्यांदा सुंदरतेची जाणीव झाली. मग धाडस करून कॉलेजच्या फॅशन शोमध्ये
भाग घेतला. त्यामुळे आत्मविश्वास आला.
ही गोष्ट खूप चांगली करू शकते याची जाणीव झाली. मग प्रयत्न केला. मिस इंडिया स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला.
जगाचे लक्ष असलेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व
करून सेकंड रनर अप बनले. यानंतर बिग बॉसच्या घरात 105
दिवस राहिले. स्वत:वर विश्वास ठेवला आणि आयुष्य
बदलून गेले. लोपमुद्रा हे पुरातन दंतकथेतील विदर्भकन्येचे नाव
आहे. माझ्या आजोबांनी ते ठेवले. मी नागपूरची
असल्याचे एका प्रश्नावर तिने सांगितले. मी जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मेसेज आल्यावर थोडी बावरले
होते. म्हणून आईला फोन केला. माझी आई पॉवरफुल
आहे. तिने एका वाक्यात मला सांगितले, भिऊ
नको,तू वाघिणीची मुलगी आहेस. या वाक्यावर
मी स्पर्धेत यश मिळवून परतले. मी रोज दोन वेळा बाबांशी फोनवरून
बोलून त्यांचा सल्ला घेेते. कॉलेजला असताना एक वर्ष नापास झाल्यानंतर
माझे आयुष्य बदलले. मानअपमान झेलत आज इथपर्यंत पोहोचले.
स्वत:वर विश्वास ठेवा,
आयुष्य बदलून जाईल, हा संदेश सांगायला त्या विसरल्या
नाहीत.

खरे तर युवकांनी अशा यशस्वी लोकांच्या मुलाखती,त्यांची चरित्रे हुडकून, जाणीवपूर्वक शोध घेऊन वाचावीत.जिथे कुठे त्यांना लाईव्ह पाहता, ऐकता यील,त्याठिकाणी आवश्य जावे. अलिकडच्या काळात अशा यशस्वी लोकांच्या
क्लिप्स युट्यूबवर सहज उपलब्ध होत आहे. त्यांचा शोध घेऊन त्या
पाहाव्यात. आपल्या आवडीनुसारच्या क्षेत्रातल्या लोकांच्या क्लिपा
शोधाव्यात. त्यातून आपल्याला बरेच काही मिळून जाईल. आपण काय करणार आहोत, हे एकदा निश्चित झाले की, पुढचे सगळे मार्ग सोपे होऊन जातात.
वाचनातून काही हिंट्स म़िळतात. या गोष्टी आपल्याला
पायर्या होण्याचे काम करतात.त्यामुळे माणसाने
वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे.जाणलं पाहिजे.चला तर मित्रानों, सुरुवात करू या.
No comments:
Post a Comment