अलिकडच्या काही
वर्षात करचुकवेगिरी वाढली आहे. नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत. या कर्तव्यापासून
लोक दूर पळू लागली आहेत. आपल्या एकट्याने करचुकवला म्हणून काय
एवढे होणार आहे, अशी मानसिकता बळावत चालली आहे. मात्र आपल्याला माहित आहे, थेंबे थेंबे तळे साचेची किमया.
त्यामुळे प्रत्येकानेच थोडा थोडा करबुडवला तर ती रक्क्म कितीतरी मोठी
होते. जत नगरपालिकेने अशा करचुकव्या नागरिकांची थकित कराच्या
रकमेसह वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली आहे. ही रक्कम तब्बल
2 कोटीच्या घरात जाते.ही रक्कम काही मामुली नाही.
याच्या व्याजावर सहज इथल्या कर्मचारी अधिकार्यांचा
पगार भागवला जाऊ शकतो. सध्या इथल्या कर्मचार्यांचा पैसा नसल्याने पगार थकवला जातो, असे ऐकायला मिळत
आहे. इतकी मोठी रक्कम नगरपालिकेला मिळाल्यास त्याचा चांगला उपयोग
करता येऊ शकतो. त्यामुळे जत नगरपालिकेने अशा करचुकव्या नागरिकांची
नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली ती चांगलेच झाले. निदान लाजेखातर
तरी आता नागरिक आपला थकित कर चुकता करतील. अर्थात सगळ्यांना लाज-लज्जा असते असे नाही. त्यामुळे सगळीच थकित रक्क्म पालिकेच्या
खात्यावर जमा होईल म्हणणे वेडेपणाचे ठरावे.
या थकित कर चुकवेदारांच्या
यादीवर एक नजर टाकली तर लक्षात येते की, यात राजकारणी,व्यापारी, डॉक्टर आणि व्यावसायिक यांची संख्या आणि त्यांनी थकवलेल्या रकमा मोठ्या आहेत.काही शिक्षक, नोकरदार असले तरी त्यांची संख्या तुलनेने
कमी आहे.वास्तविक ही मंडळीच नगरपालिकेची सेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात
घेत असतात, मात्र कर भरायला हे लोक मागे राहावेत, हे चिंताजनक म्हटले पाहिजे.करचुकवेगिरीची ही प्रवृत्ती
थांबण्याची गरज आहे. कारण या रकमेतून गावाचा, शहरांचा विकास साधला जातो. जत नगरपालिकेची पाणी योजनेची
वीज बिलाची मोठी रक्क्म थकित असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे
लोकांकडून कर जमा झाला नाही तर नगरपालिकेने तरी ही रक्क्म कोठून भरणार, असा सवाल आहे.विकास कामांना आलेला निधी विकासकामांसाठी
करायचा की, तो थकित बाबींवर करायचा की कर्मचार्यांच्या पगारावर खर्च करायचा,हा प्रश्न आहे. जो तो निधी ज्या त्या कामांवर खर्ची झाला पाहिजे.
त्यामुळे नागरिकांनी आपण ज्या ज्या गोष्टींचा उपभोग घेतो आहे,
त्याचा जो काही कर आहे,तो भरला पाहिजे.
जत नगरपालिकेने
जी करचुकव्यांची यादी प्रसिद्ध केली आहे, त्यातही काही गोलमाल केल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
काही राजकारण्यांची,नगरसेवकांची त्यात नावे आलेली
नाहीत, असा आक्षेप आहे. त्यामुळे नगरपालिकेने
कर गोळा करण्यासाठी एवढे
चांगले प्रयत्न सुरू केले असताना क्षुल्लक गोष्टीसाठी आपले नाव खराब करून घेणे,
बरे नव्हे. जतला नगरपालिका स्थापन होऊन चार वर्षे
ओलांडून गेली आहेत. या चार वर्षात फारसा विकास दिसलाच नाही.
अलिकडच्या वर्षभरात काही विकासकामे दिसत आहेत. अर्थात शासनाकडून निधी उपलब्ध
व्हायला विलंब झाला असला तरी सगळे त्याच्यावर अवलंबून आहे,
असे नाही. शहरात शौचालये,मुतार्या यांची संख्या कमी आहे. प्रभागांमधील रस्त्यांची मोठी दुर्दशा आहे.गटारी आणि
सांडपाण्याचा निचरा हा मोठा कळीचा मुद्दा आहे. शहरात अतिक्रमण
वाढले आहे. मंडई बाजार,मटण मार्केट आदी
प्रश्न प्रलंबित आहेत. मंगळवार पेठेतील
गर्दी आणि रहदारी समस्या हा मोठा चिंतनाचा विषय आहे. भाजी मार्केट
उभे केले असतानाही शहरभर भाजी बाजार अजूनही भरतो आहे. जतमधल्या
रिक्षा थांब्यांना आणि त्या रिक्षावाल्यांना अजिबात वळण नाही. शहरात वाहने पार्क करायला जागा नाही.
जत शहरात बोगस नळ कनेक्शन हाही मोठा चर्चेचा विषय आहे.हे कनेक्शन तोडण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी त्याला वेग येणे आवश्यक आहे. शहराला पाणी पुरवठा चार दिवसांतून एकदा होतो. चार-चार दिवस नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागत आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगराईचा या साठवणुकीशी चांगला संबंध आहे, याची कल्पना आरोग्य विभागाला असायला हवी. एकिकडे पाण्याची टंचाई असताना दुसरीकडे शहरातल्या बाजारपेठेतल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होताना दिसत आहे. यालाही लगाम घालण्याची गरज आहे. या भागात फारसे कुटुंब राहात नाहीत. इथे दुकाने जास्त आहेत. त्यामुळे एक-दोन घागरी भरून घेतल्या की, सगळे पाणी रस्त्यावर सोडले जाते. गाड्या धुतल्या जातात. लोकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा आहे. नळांना तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. नगरपालिकेने नळांना तोट्या बसवण्याची आवश्यकता आहे. जतला नगरपालिका झाली आहे, तसा विकास दिसायला हवा आहे. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यांना सोयी-सुविधा मिळायला हव्यात आहेत. तसेच नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडत असताना वेळच्यावेळी कर भरून सहकार्य केले पाहिजे. कराची रक्कम जास्त झाली की, ती भरताना मग अडचण येते, या गोष्टीही ध्यानात घेतल्या पाहिजेत.
No comments:
Post a Comment