जेष्ठ नेते वसंतदादा पाटील
यांचे व्यक्तिमत्त्व सरळमार्गी, सुस्वभावी,अन्यायाविरुध्द पेटून उठणारे ,बंडखोरी करणारे होते.
सामान्य माणसांतून ताकद निर्माण करून अफाट कर्तृत्व गाजविणारेही होते. सोप्या,
सुंदर भाषेत सहजपणे संवाद साधणाऱ्या वसंतदादा पाटील यांचे राजकीय जीवन
प्रचंड बंडखोरीने भरलेले होते. त्यामुळेच राजकीय संघर्षातून मिळविलेले कोणतेही पद
संपूर्ण कालावधीसाठी त्यांनी कधीच सांभाळले नाही. सत्तेची खुर्ची फेकून देवून
सातत्याने स्वाभिमानाने जगण्याची बंडखोर वृत्ती त्यांच्या कणाकणात भरलेली होती.
सत्तेचा मोह कधीच झाला नाही. जेव्हा सत्ता घेतली आणि संघर्षाची वेळ आली तेव्हा
मनापासून संघर्षही केला. अनेक वादही ओढवून घेतले, त्या वादात
यशस्वीपणे संघर्षही केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला गवसणी घालणारे वसंतदादा
पाटील यांचे व्यक्तिमत्त्व त्यामुळेच असंख्य वैशिष्ट्यांनी भरलेले आहे.
महाराष्ट्राचे राजकारण समजून घेण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने घेतलेल्या
प्रत्येक वळणाचा विचार करावा लागतो.खर्या अर्थाने महाराष्ट्राचे शिल्प घडवताना
एका साध्यासुध्या, मराठमोळ्या सह्याद्रीच्या पुत्राने
‘कार्यकर्ता ते मुख्यमंत्री’ या प्रवासामध्ये जी कामगिरी बजावली ती इतिहासामध्ये
पुसता न येणारी अशी आहे.

शिक्षण क्षेत्रातील
त्यांचे विचार क्रांतिकारी होते. 1983 साली वसंतदादा पाटील
मुख्यमंत्री असताना विनाअनुदान तत्त्वावर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय
महाविद्यालयांना परवानगी देऊन महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र क्रांती
घडवून आणली. महाराष्ट्रातील मुलांना अन्य कोणत्याही राज्यात जाऊन उच्च शिक्षणासाठी
हात पसरावे लागू नयेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. ग्रामीण भागात
शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यासाठी गावखेड्यांत महाविद्यालय
उघडली जावीत, त्यात चांगल्या व प्रशिक्षित शिक्षकांचा सहभाग
असावा, असा त्यांचा आग्रह असायचा.
वसंतदादांच्या
वागण्या-बोलण्यात नेहमीच एक सहजसाधेपणा असे. आपल्या माणसांना मोठ करताना त्याचे
भरभरून कौतुक करायचे हा दादांचा स्वभाव होता. पोलिसांच्या गराड्यात कधी न राहणारे
व नागरिकांना नेहमी उपलब्ध असणारे मुख्यमंत्री हा त्यांचा लौकिक होता. विकासाच्या
कामात जनतेचा सहभाग व पुढाकार महत्त्वाचा असतो, असे ते
म्हणत. सरकार विकास करत नाही तो करून घ्यावा लागेल असेही ते म्हणत. दादांकडे माणसे
जतन करण्याची उपजत शक्ती होती. त्यांनी उभे केलेले सहकाराचे विराट वैभव नंतरच्या
काळात आलेल्या नेतृत्वाला नीट राखता आले नाही. सहकारी संस्था चालविणारे अनेकजण खर्या
अर्थाने ‘सहकार महर्षी’ न राहता ‘सहकार सम्राट’ बनले. त्यांच्यातील अनेकजण ‘साखर
सम्राट’ म्हणून बदनाम झाले. आज दादांची स्मृती जपायची व तिचा आदर करायचा तर
सहकारात शिरलेल्या ‘स्वहाकार’ थांबविणे व त्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय राज्याचा विकास होणे नाही आणि वसंतदादा यांच्या
मार्गाने गेल्याखेरीज ग्रामीण भागात विकासही होणे नाही, ही
बाब त्यांचे स्मरण करताना सार्या महाराष्ट्राने ध्यानात घेतली पाहिजे. आजही
महाराष्ट्रात वसंतदादांच्या विचाराने प्रभावीत झालेली माणसे दिसतात व चांगले
सामाजिक कार्य करतात. नेते आणि कार्यकर्ते, सहकार आणि शिक्षण
क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणारी मंडळी आणि सर्वसामान्य जनता यांच्या मनात
वसंतदादांबद्दल घरातील ज्येष्ठ कर्त्या पुरुषाइतकीच श्रद्धा होती. ‘दादा’ नावाचे
हे पर्व 1 मार्च 1989 रोजी काळाच्या
पडद्याआड गेले आणि उभ्या महाराष्ट्राचा खंदा आधारच हरपला.
No comments:
Post a Comment