Sunday, March 26, 2017

डॉक्टर-रुग्णांच्या नात्यामध्ये परिवर्तन

     सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून राज्यातील निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उगारले. त्यामुळे शासनाच्या सूचनेवरून या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ खासगी दवाखानेही बंद ठेवण्यात आल्याने रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली होती. या संपामुळे रुग्णांना प्रचंड ससेहोलपट सहन करावी लागली. यात 377 रुग्णांचा बळी गेला, या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. मात्र शासनाने डॉ़क्टरांच्या हल्ल्यांची प्रकरणे गांभिर्यानेही घ्यायला हवी होती. या गोष्टीकडेही दुर्लक्षून चालणार नाही. आता कोणही उठून कोणावरही हात उगारू लागला आहे.या गोष्टी थांबल्या पाहिजेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या देशात सनदशीर मार्ग आहेत,त्याचा अवलंब केला पाहिजे.
     डॉक्टरांवर वांरवार होणारे हल्ले आणि डॉक्टरांकडून करण्यात येणारा संप याबाबत सर्वंकष विचार व्हायला पाहिजे.याबाबत एकांगी विचार केल्यास आवश्यक ते निष्कर्ष काढणे शक्य होत नाही. या प्रकरणातील मूळ मुद्दा हा सामाजिक सहिष्णूतेशी निगडित आहे. समाज आणि डॉक्टरांनी परस्परांना समजून एकमेकांशी जुळवून घेतल्यास हा प्रश्न सहज मार्गी लागू शकतो. डॉक्टरांनी जसा रुग्णांची सेवा करण्याचा संकल्प घेतला आहे तसेच या संकल्पाशी बांधील असणार्या डॉक्टरांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी आहे. डोक्यावरती हिंसेची टांगती तलवार असताना तो खर्या अर्थाने आपले कर्तव्य बजावू शकत नाही. वास्तविक पाहता या संपाचे सर्मथन करणे योग्य ठरणार नाही. कुठलाही संप जो अत्यावश्यक सेवांना छेद देतो तो संप सर्मथनीय नसतो. आपल्या भावना योग्य पद्धतीने मांडण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र, डॉक्टरांवर ही संपाची पाळी का आली, याचाही विचार करणे गरजेचे आहे. जसे डॉक्टरांनी ही लक्ष्मणरेषा ओलांडू नये तसेच त्यांच्यावर ती ओलांडण्याचे दडपण येऊ नये, याचाही विचार संबंधितांनी करावा. संस्कारक्षम डॉक्टर आणि विवेकपूर्ण समाज या दोघांची सांगड घालूनच हा प्रश्न सुटू शकतो.
     या घटना एका दिवसात घडत नाही. कुठेतरी समाजामध्येही डॉक्टरांच्याविषयी ज्या पद्धतीचा आदर असला पाहिजे, त्यामध्ये नितांत कमतरता आली आहे. डॉक्टर हा काही परका नाही, तो आपल्यातलाच एक आहे. आजही जवळपास प्रत्येक जण आपल्या पोराला डॉक्टर करण्याची इच्छा बाळगतोच की नाही. त्यामुळेच समाजमनानेही तर्कपूर्ण असतानाच विवेकपूर्ण असणेही आवश्यक नाही का? डॉक्टरांना हाणामारी करून परिस्थिती चिघळण्यापलिकडे काही घडते का? पण समाज शिक्षित होणे, समाज प्रगल्भ होणे, समाज संस्कारित होणे ही एक प्रक्रिया आहे आणि त्यावर कुणाचेही नियंत्रण राहू शकत नाही. कारण ती एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.
     निश्चितपणे आज डॉक्टर-रुग्णांच्या नात्यामध्ये कुठेतरी परिवर्तन आले आहे. डॉक्टरी पेशा हा नोबल पेशा आहे. समाजाच्या सेवेचे ब्रीद घेऊन चालणारा हा पेशा आहे, हे खरे होते. पण ज्या दिवशी डॉक्टरी पेशा हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्भूत आणण्यात आला त्यादिवशी याचे सेवेतून व्यापारात परिवर्तन झाले आणि रुग्ण ग्राहकांमध्ये रुपांतरित झाले. रुग्ण आणि ग्राहक म्हणून येणारा रुग्ण यामध्ये फरक असतो आणि म्हणून अपेक्षेचा हा संदर्भ बदलला आहे. सेवेच्या संदर्भाला आता पूर्णपणे व्यावसायिकतेची झळ पोहोचली आहे. कदाचित डॉक्टरांच्या सातत्याने होणार्या प्रशिक्षणामध्ये या गोष्टींच्या अंतर्भावाची उपेक्षा असल्याने देखील हे घडत असावे. म्हणूनमेडिकल काऊंसिलमध्येअँटिट्युड आणि कम्युनिकेशन मॉड्यूलअभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला आहे.
     शासनानेही डॉक्टरांसाठी आवश्यक असलेले धोरणात्मक निर्णय आणि त्या निर्णयामध्ये कामाच्या ठिकाणासह सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तात्पुरत्या घोषणा करून हे थांबणार नाही. यासाठी कायम असा एककॉम्प्रहेन्सिव्ह सिक्युरिटी प्लॅन ऑफ डॉक्टर्स अँट वर्क प्लेसेसतयार करणे गरजेचे आहे. आज जर शासनाला वाटत असेल की सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून सुरक्षेचा प्रश्न सुटू शकेल तर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची पाळी ही आग्रहानंतर का यावी, हा प्रश्नच आहे. ओपीडी, आयपीडी, आयसीयू, ऑपरेशन रूम, रिकव्हरी रूम आणि कॅम्पसमधील सुरक्षा केवळ एका सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून सुटेल का, असा प्रश्नही आहे.
     खरे तर, हा मुद्दा आजचा नाही. फार पूर्वीपासून याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे खर्या अर्थाने जी गुणात्मकता अभिप्रेत होती ती पूर्ण झाली काय, याचा विचार करता त्रोटक पद्धतीने या गोष्टींचे निदान होऊ शकत नाही. संबंधितांनी या बाबतीत एक ठोस निर्णय घेऊन ठरवलेल्या कालर्मयादेत पूर्ण करणे गरजेचे आहे. शेवटी निवासी डॉक्टर हा कुणाच्यातरी अधिपत्याखालीच काम करतो. तो एखाद्या संस्थेच्या नियंत्रणाखलीच काम करतो. जेव्हा आपण विमानात शिरतो आणि विमानाने हवेत झेप घेताच संपूर्ण विमानाचा वाली जसा कॅप्टन असतो तसेच निवासी डॉक्टरांचे जे वाली आहेत, त्यांच्यावरच डॉक्टरांना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे.त्यांनीच याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment