हम दो, हमारे
दो, हे छोट्या कुटुंबाचं सुंदर चित्र स्पष्ट करणारं स्लोगन आपण
कित्येकदा तरी ऐकलं आणि वाचलं आहे.पण खरं पाहायचं तर ते हम दो
मेरे दो, असं असायला हवं होतं. कारण आपलं
कुटुंब छोटं हवं असं सगळ्यांनाचं वाटत असतं. मात्र कुटुंबाची
सगळी जबाबदारी एकट्या महिलेलाच उचलावी लागते. आपल्याकडे कुटुंब
नियोजनाचा सगळ्यात लोकप्रिय उपाय आहे,तो म्हणजे नसबंदीचा.
आणि ही नसबंदी करण्याची सगळी जबाबदारी फक्त म्हणजे फक्त महिलांकडेच आहे.
आता तुम्ही याला स्वेच्छा म्हणा किंवा मजबुरी. किंवा आपल्या नवर्याला कसला त्रास होऊ नये,म्हणून ही जबाबदारी आपल्याकडे घेणारी महिला असेल,परंतु
नसबंदीची शस्त्रक्रिया ही महिलांच्याच वाट्याला येते. आणि ही
जबाबदारी महिला निमुटपणे पार पाडत आहेत.
पुरुष ही नसबंदीची शस्त्रक्रिया
करून घ्यायला पुढे धजावत नाही. त्याला अनेक कारणे आहेत.एक म्हणजे नसबंदीचे कनेकशन मर्दानगीशी जोडले गेले आहे. या शस्त्रक्रियेमुळे पुरुषाचा मर्दपणा कमी होईल आणि शारीरिक संबंधादरम्यान
त्याला पूर्ण समाधान मिळणार नाही. आणि जर शस्त्रक्रिया केलीच
तर मित्रमंडळी किंवा नातेवाईक काय म्हणतील? या भीतीमुळे पुरुष
ही जबाबदारी झटकताना दिसत आहे. पुरुषांना आणखी एक मोठी भीती आहे,
ती म्हणजे आपल्यावरची शस्त्रक्रिया फेल गेली आणि आपली बायको गर्भवती
राहिली तर काय करायचे? हा विषय चेष्टेचा तर बनतोच, पण समाज,मित्र आणि नातेवाईक दोघांकडे संशयाच्या नजरेने
पाहतील,ही चिंता सतावत असते. आणि हा असला
खुलासा कुणा-कुणापुढे आणि कसा करायचा हा प्रश्न उरतोच. पुरुष नसबंदी करून घ्यायला मागे सरतात,
त्याला आणखी एक कारण आहे, दुर्दैवाने आपले दुसरे
लग्न मोडले तर आपण दुसर्या लग्नाच्या योग्यतेचेच राहणार नाही.
समाजातला एक वर्ग असाही आहे की, पैशासाठी शस्त्रक्रियेला
महिलांचाच पुढे केले जाते.म्हणजे कुटुंबाचे कुटुंब नियोजन व्हायला
हवे,पण याची पूर्ण जबाबदारी बायकोने घ्यावी.
स्टेट इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ अँड
फॅमिली वेलफेयरच्या आकडेवारीनुसार 2016-17 (जानेवारी
2017 पर्यंत) 2 लाख 32 हजार
145 महिलांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. तीच नसबंदी करून घेणार्या पुरुषांची संख्या फक्त
2 हजार 960 आहे. यातही शहरी
महिलांपेक्षा ग्रामीण महिलांची संख्या अधिक आहे. याचाही विचार
होणं महत्त्वाचं आहे.
कुटुंब शस्त्रक्रिेची जबाबदारी
महिलांवरच का आली, यालाही काही तत्कालिन कारणे आहेत. आपल्या देशात कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 मध्ये सुरू झाली.कित्येक वर्षे या कार्यक्रमाचा उद्देश
टारगेट पूर्ण करण्याचाच राहिला आहे.तर काही राज्यांमध्ये पब्लिक
सेक्टर हेल्थ वर्कर्स यान त्या प्रकारे टारगेट पूर्ण करण्याच्या मागेच लागले.
काही ठिकाणी बसेसच्या बसेस हायजॅक करण्यात येत होत्या. पुरुषांवर जबरदस्ती करण्यात आली. पुढे दादा कोंडकेंचा
याबाबतचा एक चित्रपटदेखील आला होता. शिवाय नसबंदी करण्यासाठी
गरीब कुटुंबातल्या पुरुषांना रेडिओ किंवा रोख पैसेही देण्यात आले. मात्र याचा परिणाम असा झाला की, लोक या पुरुष नसबंदीच्या
राष्ट्रीय कार्यक्रमाविरोधातच गेले. शेवटी यानंतर सरकारने आपला
पराभव स्वीकारत महिलांवरच फोकस करण्यावर भर दिला.आणीबाणीच्या
काळात जवळपास 6.2 दशलक्ष महिला आणि पुरुषांची जबरदस्तीने नसबंदी
करण्यात आली होती. यादरम्यान पाच हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
झाला.
मात्र अलिकडे नॅशनल पॉलिसी फॉर
वुमनमध्ये आता महिला नसबंदीच्या तुलनेत पुरुष नसबंदीवर अधिक जोर दिला जात आहे.यातून सरकारलाही वाटते की, पुरुषांनीही कुटुंब नियोजनासंबंधीची
जबाबदारी आपल्या खांद्यावरही घ्यावी. पण पुरुष आपल्या शरीराला
डॉक्टरांचा स्पर्श होऊ नये म्हणून,कुठल्याही मेडिकल प्रक्रियेपासून
स्वत:ला दूर ठेवण्याचाच प्रयत्न करीत असतात. शरीराच्या कुठल्याही भागातील बदलला,ते खूप मोठा निर्णय
समजतात. त्यांना पूर्ण प्रक्रियेबाबत माहिती नसते, त्यामुळे ते घाबरतात.ही शस्त्रक्रिया तशी फार सोपी आहे,तरीही पुरुष यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. शिवाय कित्येक महिला स्वत: च आपल्या नवर्याला या गोष्टीपासून दूर ठेवताना दिसतात.
आपल्या नवर्याला याचा त्रास होऊ नये, असं त्यांना वाटतं.
नसबंदीची जबाबदारी महिला आपोआपच
स्वीकारताना दिसत आहेत. मग त्यांची शारीरिक प्रकृती खराब असली
तरी शस्त्रक्रियेला तयार होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनीच
छोटे कुटुंब, सुखी कुटुंबचा अंगिकार केला आहे. खंडीभर मुलांच्या गराड्यात महिला गुरफटून जातात. त्यांना
नीट मुलांचा सांभाळ करता येत नाही तर स्वत;लाही जपता येत नाही.
त्यामुळे कुटुंब नियोजनामुळे सगळयात अधिक सुधारणा महिला आणि मुलामध्ये
होते. मुलांमध्ये अंतर असणं आणि एक किंवा दोन मुलं असण्याने आईला
स्वत:चे स्वाथ्य चांगले ठेवण्यास मदत मिळते. याशिवाय मुलांचा सांभाळदेखील चांगल्याप्रकारे करता येतो. महिलांमध्ये शारीरिक सक्षमता आल्याने दोघांचीही प्रकृती ठणठणीत राहण्यास मदत
होते. नोकरी करणारी स्त्री तर लवकर मूल व्हायला नको,याच मताची असते. त्यामुळे साहजिकच छोट्या कुटुंबासाठी
नवरा आणि बायको दोघेही तयार असले तरी नसबंदी शस्त्रक्रियेची जबाबदारी मात्र महिलेकडेच
जाते, याला तसा कुणाचाच अक्षेप नाही.
No comments:
Post a Comment