Sunday, March 19, 2017

चीनमध्ये सायकल शेयरिंगचा वाढता व्यवसाय


     नव्वदच्या दशकापर्यंत भाड्याच्या सायकली म्हणजे एक सामाजिक गरज होती. चार-पाच रुपयांत तासभर सायकल भाड्याने मिळायची. खेड्यातून शहरात शासकीय कामानिमिताने किंवा अन्य कामासाठी आलेल्या लोकांना भाड्याच्या सायकली म्हणजे मोठा दिलासा होता. या सायकलींमुळे लोकांचा महत्त्वाचा वेळ वाचायचा. पाहिजे तिथे जाता येतं होतं.त्यावेळची भाड्याची सायकल मोठं काम करायची. त्यावेळची लहान मुलं किंवा आम्ही सायकली शिकलो ते भाड्याच्या सायकलींवरच. नंतर लोकांकडे जसजशी सुबत्ता येऊ लागली,तस तसे लोकांच्या मालकीच्या सायकली वाढल्या. मोटारसायकलींची संख्या वाढली आणि भाड्याच्या सायकली लुप्त होत गेल्या. आज आपल्याकडे आज भाड्यांच्या सायकली कुठे दिसत नसल्या तरी चीनसारख्या देशात त्याचे प्रचलन पुन्हा नव्याने वाढले आहे. तिथले लोक त्याचा भरपूर लाभ घेताना दिसत आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं काय? तर त्याला या सायकलींना आधुनिक टच दिला गेला आहे. सायकली वापरताना ज्या काही समस्या निर्माण होत होत्या, त्या सगळ्यांपासून आता त्यांची सुटका झाली आहे. आता तिथल्या लोकांना सायकलींचा प्रवास आवडू लागला आहे.आणि त्यामुळे हा व्यवसायही भलताच वाढू लागला आहे.

     चीनमध्ये दोन डझनापेक्षा अधिक मोठ्या कंपन्या या सायकल शेयरिंगच्या व्यवसायात उतरल्या आहेत.यात मोबाईक आणि ओफो कंपन्या यात सगळ्यात पुढे आहेत. या कंपन्यांनी 13 शहरांमध्ये लाखो सायकली उतरवल्या आहेत. या वर्षााखेर प्रत्येक एक लाखापेक्षा अधिक सायकली उतरवण्याचा या कंपन्यांचा इरादा आहे. नव्या तंत्रज्ञानाची जोड या व्यवसायाला मिळाली असल्याने कामे होत असल्याने तिथले लोक सायकल शेयरिंगच्या आनंदही लुटत आहेत.पिवळ्या आणि नारंगी रंगांच्या सायकलींना क्यूआर कोड आणि जीपीएस सिस्टम सुविधा लागलेल्या आहेत.स्मार्टफोन युजर क्यूआर कोडच्या साहाय्याने लोक खोलून कुठल्याही कोपर्यातून किंवा गल्लीतून सायकली घेऊन जाऊ शकतात. आणि आपल्या  सोयीनुसार रस्त्याच्या कडेला कोठेही त्या उभ्या करू शकतात. म्हणजे तुम्ही शहरातल्या कुठल्याही ठिकाणाहून कोठेही घेऊन जाऊ शकता आणि ती कोठेही पार्क  करून जाऊ शकता. सायकल जिथून घेतली आहे,तिथेच स्टँड करावी, असा प्रकार नाही. सायकलीच्या सुरक्षेची चिंता करायची काही गरज नाही. त्याचे भाडेही तुम्ही मोबाईल अॅपद्वारे भरू शकता. या सायकली चीनच्या युवकांना फारच भावल्या आहेत.
     चीनमधल्या मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक जामची मोठी समस्या आहे.यापासून सुटका करून घेण्याच्यादृष्टीकोनातून 2000 साली तिथल्या महापालिकांनी सायकल शेयरिंगची सुरुवात केली होती.पण ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. कारण यात काही नवं असं काही नव्हतं. शिवाय सायकल पुन्हा स्टँडलाच नेऊन उभी करायला लागायची.आता मोबाईल अॅपने सायकल मिळवण्याच्या विचारात क्रांतिकारी बदल आणायला आहे. त्यामुळे फक्त युवकच नाही तर वयस्कर मंडळीदेखील घरचे सामान आणण्यापासून जवळपासच्या आवश्यक कामासाठी सायकलींचा वापर करताना दिसत आहेत. या हायटेक सायकली वापरण्याविषयी लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
     या एका सायकलची किंमत 30 हजाराच्या (तीन हजार युआन) आसपास आहे. याला टायर-ट्युबची आवश्यकता नाही. त्यामुळे मधे-अधे पंक्चर होण्याची भानगड नाही. याचं भाडं एका तासाला एक युआन आहे. पेडलिंगमुळे याचं जीपीएस सिस्टीम रिचार्ज होतो. मोबाईक या कंपनीने हलक्या तंत्रज्ञानाच्याही सायकली रस्त्यावर उतरवल्या आहेत.याचे भाडे तासाला अर्धा युआन इतके आहे. दुसर्या ओफो कंपनीने 2015 मध्ये बिजिंग विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी शेयरिंग सायकलिंगचा प्रोजेक्ट तयार केला आहे. 33 शहरांमध्ये या कंपनीचे दहा लाख सायकलींसाठी एक कोटी ग्राहक आहेत. ओफोने विद्यार्थ्यांना टारगेट केले आहे. चीनमध्ये यश मिळाल्यावर याच कंपनीने फेब्रुवारी महिन्यात सिंगापूरमध्ये एक हजार सायकली लाँच केल्या आहेत. तर युरोपमध्ये आपले पाऊल ठेवण्यासाठी ओफोने केंब्रिज विद्यापीठाची निवड केली आहे.
     चीनमध्ये सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध आहेच शिवाय चार चाकी वाहनेही या व्यवसायात आहेत. साधारण कमी अंतरासाठी लोकांना रिक्षा,टॅक्सी,बस किंवा मग बॅटरीवर चालणारी दुचाकी वाहने घ्यावी लागायची. सायकल शेयरिंग हा छोटा प्रवास आणखी सुलभ करून ठेवला आहे. लोक याकडे तंदुरुस्तीच्यादृष्टीकोनातूनही पाहात आहेत. तिथले सरकारही सायकलिंगला प्रोत्साहन देत आहे. जागोजागी सायकल स्टँड आहेत. नव्यानेही स्टँड उभारले जात आहेत. 1995 मध्ये चीनमध्ये 67 कोटी सायकली होत्या.2013 पर्यंत त्यात घट होऊन 37 कोटीपर्यंत पोहोचल्या. चीनच्या आर्थिक विकासामुळे सायकली मागे पडल्या.त्यांची जागा महागड्या वाहनांनी घेतल्या. या वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या निर्माण झाल्या. आता पुन्हा चीनमध्ये सायकलींची संख्या 43 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. हा आकडा जगात सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.चीनच्या राजधानीचा विचार केला तर बिजिंगमध्ये सायकल शेयरिंगची सुरुवात एका दशकाअगोदरच झाली होती. 2012 मध्ये सरकार ती रिलाँच केली. जागतिक स्तरावर सायकलींच्या पुनर्रागमनाची गोष्ट करायची तर यावर सहाशेपेक्षा अधिक प्रकारचे प्लॅन जगभरात सुरू आहेत.
     चीनच्या सायकली जगभरात प्रसिद्ध आहेत. 2016 मध्ये अमेरिकेने 93.5 टक्के सायकली चीनकडून खरेदी केल्या. युरोपातदेखील चीनच्या सायकलींचेच साम्राज्य आहे. 50 टक्क्याहून अधिक सायकली तैवानहून जातात. गेल्यावर्षी नेदरलँड,जर्मनी आणि ब्रिटेन चीनच्या सायकलींचे मोठे खरेदीदार होते. आता आपल्यालाही त्या सायकलींचे वेध लागले आहेत. लवकरच आपल्याही मोठ्या शहरांमध्ये अशा आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त सायकली वावरताना दिसतील.
                                          

No comments:

Post a Comment