Saturday, March 18, 2017

पत्रकारिता आणि फुटबॉलची आवड असणारा मुख्यमंत्री

     एन बीरेन सिंह हे नुकतेच मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. फुटबॉल आणि पत्रकारिता यांची आवड असलेले बीरेन सिंह यांचा जीवन प्रवास तसा संघर्षपूर्ण आहे. त्यांनी राजकारणात येण्याअगोदर वृत्तपत्र चालवले आहे. 2002 मध्ये ते राजकारणात आले. काँग्रेसने त्यांना 2003 मध्ये दक्षता राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली. 2007 मध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालय आले. शिवाय पूर नियंत्रण,युवक कल्याण आणि क्रीडा खात्याचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र 2016 मध्ये मुख्यंमत्री इबोबी सिंह यांच्या विरोधात बंड करून त्यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचादेखील राजिनामा देऊन भाजपत प्रवेश केला.ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला. मुख्यमंत्री होईन, असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे म्हणणारे बीरेन सिंह आता मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत.
बीरेन सिंह यांचा जन्म इम्फाळमध्ये झाला. त्यांना आपल्या बालपणाच्या फारशा आठवणी ज्ञात नसल्या तरी त्यांना शाळेला घर आणि गावापासून खूप दूर पायी जावावे लागायचे, हे आठवते. त्यांच संपूर्ण आयुष्यच कठीण गेल्याने त्यांनी आयुष्यात काही तरी बनण्याचे ध्येयच बाळगले नव्हते. पुढे मोठे झाल्यावर त्यांना वृत्तपत्र वाचण्याचा छंद जडला, त्यातूनच त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पावले टाकली. कठीण काळ असतानासुद्धा त्यांनी मणिपूर युनिवर्सिटीतून आर्टसमध्ये ग्रॅज्युएशन केले.

     लहानपणी त्यांना फुटबॉल खेळ फार आवडायचा. पण अभ्यासाचे दडपण होतेच, मात्र संधी मिळेल तेव्हा ते फुटबॉल खेळायला धावायचे. फुटबॉलचे सामने पाहायलाही ते दूर दूरवर जात असत.खेळात त्यांनी शाळा स्तरावर चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे स्पोर्टस कोट्यातून बीएसएफमध्ये आले. सीमा सुरक्षा दलाची फुटबॉलची टीम होती. त्यात त्यांनी प्रतिनिधीत्व केले होते. या संघाने 1881 मध्ये डुरंड चषक जिंकला होता.
     बीएसएफची नोकरी सोडून त्यांनी काळ पत्रकारिता केली. नाहरलोगी थाउडंग (युवकांची जबाबदारी) नावाचे स्थानिक वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. मात्र यासाठी त्यांनी कुठले प्रशिक्षण घेतले नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वृत्तपत्राचा खप चांगला होता. 2002 मध्ये त्यांच्या वृत्तपत्रात इबोआएमा सिंह यांच्याबाबतचा एक लेख छापून आला होता. ज्यात मैती सशस्त्र गटाच्या अभियानाचे समर्थन करण्यात आले होते. इबोआएमा सिंह यांना त्यांच्या सामाजिक कार्याबाबत लोकांना माहिती होती,मात्र त्यांची वैचारिकता मणिपूर आणि त्यांच्या लोकांविषयी इतकी खोल होती की, प्रशासनाला त्या लेखात देशद्राहाचा कट दिसून आला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.
अटकेनंतर त्यांचा दृष्टिकोनच बदलला. आपल्याला परिवर्तन तर घडवायचे आहे, मग पत्रकारिताच का? राजकारण का नाही? अशा प्रकारे त्यांनी आपल्या आवडत्या पत्रकारितेच्या क्षेत्राला सोडचिठ्ठी दिली. आणि मग त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मणिपूरच्या त्यावेळच्या राजकारणात बरीच उलथापालथ होत होती. त्याच काळात केंद्र सरकार आणि एनएससीएन (आयएम) यांनी संघर्षविराम दस्तऐवजावर सह्या केल्या. 2002 साली ते डेम्प्क्रेटिक रेवोल्यूशनरी पीपुल्स पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. आणि ते विजयी झाले. पुढच्याच वर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचवर्सी मुख्यमंत्री इकराम इबोबी सिंह यांनी त्यांना मंत्री केले. 2007 च्या निवडनुकीत विजयी झाल्यावर त्यांच्याकडे सिंचन,पूर नियंत्रण, युवा आणि खेळ मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण इबोबी यांच्याशी त्यांचे पटले नाही. त्यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारले. शेवटी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.आपल्या भाजप प्रवेशाचे समर्थन करताना ते या पक्षाकडेच मणिपूरसाठी रोडमॅप होता, असा दावा ते करतात.
     फुटबॉल आणि पत्रकारिताशिवाय त्यांना आणखी कुठली आवड नव्हती. परिवर्तनाच्या इच्छेमुळे त्यांनी राजकारणात उडी घेतली. पण स्वप्नातही वाटले नव्हते की, आपण मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री होऊ, असेही ते सांगून जातात. हा गोष्ट त्यांच्यासाठी फारच आनंदाची आहे. त्यांना मणिपूरसाठी खूप काही करण्याची संधी चालून आली आहे. राज्यात गेल्या चार महिन्याच्या अधिक काळापासून आर्थिक नाकेबंदी आहे. ही नाकेबंदी त्यांना संपुष्टात आणायची आहे. सुशासन हेच त्यांचे लक्ष्य आहे. भ्रष्टाचार आणि कुशासन या कारणांमुळेच लोकांनी भाजपच्या हातात सत्ता सोपवली आहे, असेही ते म्हणतात.

No comments:

Post a Comment