Tuesday, February 28, 2017

महिला आरक्षणाचे विधेयक कधी?

     इंटर पार्लमेंट युनियन या संस्थेने गतवर्षी केलेल्या 188 देशांच्या पाहणी अहवालानुसार, राजकारणातील महिलांच्या प्रमाणाबाबतीत भारताचा क्रमांक 108 वा आहे. लोकसभेत 11 टक्के आणि राज्यसभेत 10.5 टक्के असे महिलांचे प्रमाण असणारा भारत देश किती खालच्या स्तरावर आहे याचे भान येण्यासाठी आपल्या नजीकच्या देशांची आकडेवारी पाहणे संयुक्तिक ठरेल. नेपाळचा क्रमांक 24 वा आहे. चीनचा 55 वा, तर पाकिस्तानचा 66 वा आहे. म्हणजेच या देशातील राजकारणात महिलांच्या सहभागाचे प्रमाण आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. जागतिक स्तरावर महिलांच्या राजकारणातील सहभागाचे सरासरी प्रमाण 22 टक्के आहे. आपले त्याच्या निम्मे आहे. रवांडा, अंडोरा आणि क्युबा या देशातील राजकारणात महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तब्बल 62 कोटी म्हणजे भारताच्या लोकसंख्येच्या 41 टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचे भारताच्या राजकीय क्षेत्रातील स्थान वाढवण्याची गरज आहे.
     73 व्या घटनादुरुस्तीमुळे 1993 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळालं. महिलांसाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे परिस्थिती पालटली. अनेक पुरुष आपल्या घरातील स्त्रीला राजकारणामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले. गेल्या काही वर्षांत यामध्ये आणखी बदल झाला आणि आज स्त्रिया आपणहून राजकारणामध्ये सक्रिय सहभागी होत आहेत. आपला जनसंपर्क वाढवत आहेत. विविध प्रश्नांवरून स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, विधानसभा इथपासून ते संसदेतही आवाज उठवत आहेत. या सर्वांमध्ये अग्रक्रम ानं नाव घ्यावं लागेल ते स्व. इंदिरा गांधींचं. त्यांनी समर्थपणे केलेलं देशाचं नेतृत्त्व यांमुळे देशभरातील लाखो महिलांना प्रेरणा मिळाली. दैनंदिन आयुष्यात आपल्याला बरे-वाईट अनुभव येतात, तसेच ते राजकारणातही येतात. त्यामुळं राजकारणाबाबत वेगळा विचार करून चालणार नाही. मी मुंबईची महापौर बनले तेव्हा 33 टक्के आरक्षणातून निवडून आले असले तरी तेव्हा महापौरपदासाठी आरक्षण नव्हते. किंबहुना महापौरपदासाठी आरक्षण अशी तरतूदच तेव्हा नव्हती. तरीही मी निवडून आले ही गोष्ट सर्वच महिलांसाठी अभिमानास्पद होती.

     आज राजकारण आणि महिला यांबाबत बोलताना संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक कधी पारित होणार, हा प्रश्न राज्यकर्त्यांना विचारणं आवश्यक आहे.   राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आवश्यक असणारं हे विधेयक इतकी वर्षे प्रलंबित राहू शकते, ही गोष्ट आपल्याला भूषणावह ठरणारी नाही. आजवर जेव्हा जेव्हा हे विधेयक संसदेत सादर झालं तेव्हा त्याला काही पक्षांच्या नेत्यांनी आक्षेप घेतले आणि त्याचा मार्ग रोखला. यामागं अर्थातच पुरुषी मानसिकता होती. महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या तर आपलं राजकारणातील स्थान डळमळीत होईल, अशी भीती या पुरुषप्रधान नेत्यांना होती. स्वार्थी भूमिकेतून राजकारणाकडं खासगी मालमत्ता म्हणून पाहणार्या या नेत्यांनी सातत्याने या विधेयकाच्या मार्गात खोडा घातला. त्या काळात आघाड्यांची सरकारे होती. त्यामुळं बहुमताचा प्रश्न होता; पण आज स्थिती बदलली आहे. आज संसदेत सरकारला पूर्ण बहुमत आहे. तसेच या विधेयकामुळे फक्त उच्चवर्णीय म हिलांना संसदेत जाण्याची संधी मिळेल, असा युक्तिवाद करीत हे विधेयक संसदेपुढे येऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न करणार्या पक्षांचा एकही खासदार आज संसदेत नाही, तसेच या विधेयकाला विरोध करणार्या इतर पक्षांचेही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सदस्य लोकसभेत आहेत. त्यामुळे इतक्या वर्षांपासून रखडलेलं हे विधेयक आता तरी सरकारने इच्छाशक्ती दाखवून पारित करून दाखवण्याची गरज आहे
     सध्या राजकारणात येणार्या महिलांनी अभ्यासूवृत्ती अंगीकारणं गरजेचे आहे. यासाठी वाचनावर भर दिला पाहिजे. जनतेचे प्रश्न समजावून घेतले पाहिजेत. जनसंपर्क वाढवला पाहिजे. विधिमंडळ, विधानसभा आदी ठिकाणच्या संसदीय आयुधांचा अभ्यास केला पाहिजे. राजकारणातीलमहिलाराजस्वातंत्र्यपूर्वकाळापासून महिलांनी राजकारण आणि समाजकारणामध्ये आपला ठसा उमटवला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात राजकारणातील महिलांचं प्रमाण काहीसं कमी झालं. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर परिस्थिती पालटली; पण आजही जगभरातील इतर देशांशी तुलना करता भारतीय राजकारणातील महिलांचं प्रमाण हे कमीच आहे. असे असले तरी भारतामध्ये पंतप्रधान, लोकसभेचा सभापती, राष्ट्रपती, पक्षाध्यक्ष, मुख्यमंत्री आदी अनेक महत्त्वाच्या पदांवर विराजमान होऊन महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. असे असूनही आजतागायत आपल्याला महिला आरक्षणाचे विधेयक पारित करण्यात यश आलेलं नाही, ही विचार करण्याची गरज आहे.



बचतगटातून स्वयंरोजगार

     बचत गट म्हणजे सामान्यतः 10 ते 20 महिलांचा अनौपचारिक समूह. किंवा एका निश्चित स्वरूपाचे उद्दिष्ट घेऊन आणि स्वेच्छेने एकत्र आलेल्या महिलांचा गट म्हणजेच बचत गट. आज महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने बचत गट आहेत. बचत गटांच्या मोहिमेची सुरुवातदेखील अपघाती रूपातच झाली. बांगलादेशचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. महमूद यूनूस हे जोबरा या खेड्यात गेले असता, त्यांनी पाहिले की तेथील महिला टोपल्या बनवितात; मात्र कच्चा माल घेण्यासाठी या सर्व महिला सावकाराकडून अधिक व्याजदराने कर्ज घेतात. टोपल्या विकल्यानंतर, कर्ज फेडल्यावर या महिलांच्या हाती काहीच राहत नसे. डॉ. यूनूस यांनी 42 महिलांना एकत्र करून त्यांना त्याकाळाचे 500 टाका कर्ज म्हणून दिले. हे कर्ज एका महिलेचे नसून, तुमच्या गटाचे आहे असे सांगितले. महिलांनी टोपल्या बनवून विकल्या आणि त्यांना त्या व्यवहारातून कर्ज फेडल्यावर नफा देखील झाला. याच घटनेनंतर डॉ. महमूद यूनूस यांना सूक्ष्म वित्त आणि बचत गटांची ताकत दिसली. याच मोहिमेची परिणती म्हणजे बांगलादेशातील ग्रामीण बँकेची स्थापना. डॉ. युनूस यांना या कामासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.
     बचत गटांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यामुळे महिलांचे संघटन बळ वाढते. आपण बरेच वेळा वृत्तपत्रात वाचतो की बचत गटांच्या महिलांनी गावातील दारूचे गुत्ते आणि इतर अनिष्ट व असामाजिक कामे बंद पाडली. ही ताकद या सामान्य महिलांमध्ये येते कोठून, तर बचत गटाच्या माध्यम ातून वाढलेल्या संघटन बळातून. या व्यतिरिक्त बचत गटाचा मुख्य फायदा म्हणजे महिलांना अडीअडचणीच्या वेळेस कमी व्याजदराने उपलब्ध होणारे हक्काचे अर्थसहाय्य. आज अनेक बचत गट केवळ बचत करत नसून त्यापुढे जाऊन यशस्वीरीत्या स्वयंरोजगार करीत आहेत. सध्या असे अनेक बचत गट आढळून येतात ज्यांनी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली आहे आणि आज या गटातील महिला या कंपनीच्या संचालिका आहेत. काही बचत गटांनी आपली बँक सुरू केलीय. याशिवाय वार्षिक पाच कोटींच्या वर उलाढाल करणारे गट देखील आहेत. बचत गटाची विभागणी लिंग, वास्तव्य आणि आर्थिक उत्पन्न आदी बाबींवर होते. याप्रमाणे बचत गटाचे प्रकार म्हणजे महिला बचत गट, पुरुष बचत गट, ग्रामीण बचत गट, शहरी बचत गट व दारिद्य्र रेषेवरील व दारिद्य्ररेषेखालील बचत गट. बँकेत बचत गटाच्या नावाने खाते उघडणे आवश्यक असते. गटाची नोंदणी करावयाची असेल तर शहरी विभागात महापालिकेत अथवा नगरपरिषदेत तर ग्रामीण भागात पंचायत समितीच्या कार्यालयात करावी लागते. बचत गट बनविणे ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे.
      शासनाने जास्तीत जास्त महिला या मोहिमेत सहभागी व्हाव्यात याच उद्देश्याने बचत गटांना कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात अडकविले नाही. बचत गट बनवायचा असेल तर फक्त एका वाडीतील, वस्तीतील किंवा गावातील दहा ते वीस महिलांचा एक गट बनवावा, त्यांना आपली संकल्पना सांगावी, गटास नाव द्यावे, गटाचे नियम बनवावेत, दर म हिन्यास गोळा करावयाची रक्कम सर्वानुमते ठरवावी आणि पदाधिका-यांची निवड करुन ते ठराव पारीत करून बँकेत बचत गटाचे खाते उघडावे. पदाधिकार्यांमध्ये अध्यक्षा, सचिव व खजिनदार ही पद आवश्यक असतात; मात्र काही मोठे गट उपाध्यक्ष, सहसचिव, सहखजिनदार, सल्लागार आदी पदे देखील ठेवतात. केवळ काही शासकीय योजनांचा किंवा कर्जयोजनेचा लाभ मिळावा इतक्या संकीर्ण उद्देशापोटी बचत गट बनवू नये. बचत गटांची वर नमूद केलेली ताकद लक्षात ठेवावी आणि गट स्थापन करुन स्वयंरोजगार सुरू करण्याचा प्रयत्न करावा. स्वयंसिद्धा होऊन स्वतःस आणि इतरांस आपली खरी शक्ती काय आहे याची प्रचिती द्यावी. एक स्त्री जी संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकते तिला हे करणे अजिबात अशक्य नाही. मात्र हे साध्य करण्यास लागेल ती फक्त इच्छाशक्ती; जी सुप्तावस्थेत आहे, ती जागृत करा, दुरदृष्टी बाळगा, मोठी स्वप्ने पाहा आणि ती स्वप्ने पुर्ण करण्याची जिद्द निर्माण करा. यश तुमचेच आहे.



Monday, February 27, 2017

शेततळ्यामुळे जलसमृध्दी


      अनियमित पर्जन्यमानावर मात करण्यासाठी शेततळे फायद्याचे ठरले आहे. पिकांना योग्य वेळी पाणी देण्याबरोबरच मत्स्य व्यवसायासारखा जोड व्यवसायही करुन आपल्या उत्पन्नात भर घालता आली आहे. कृषि विभागाच्या वतीने शेतकर्‍यांना वरदान ठरणारे शेततळे करण्यासाठी योजना कार्यान्वित असून याचा संपूर्ण खर्च शासन करते. परभणी जिल्हयात अनियमित पर्जन्यमान असल्यामुळे पाण्याअभावी अनेक भागातील पिके वाळून जातात. यावर मात करण्यासाठी ज्या शेतकर्‍यांनी शेततळे घेतले त्यांच्या शेतीतून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न निघाले आहे.  शेततळ्याचे दोन प्रकार असून राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना संयुक्तरित्या तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत वैयक्तिक स्वरुपावर शेततळे घेता येतात. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार हे अभिनव अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत मागेल त्याला शेततळे ही योजना अमलात आणली आहे. या शेततळ्यामुळे जलसमृध्दीस मदत होणार आहे.

     सर्वसाधारणपणे ३० मीटर रुंद, ३० मीटर लांब व ३ मीटर खोलीचे शेततळे घेण्यात येते. यासाठी शासनाच्या वतीने ८२ हजार २६० रुपयांचे अनुदान देण्यात येते. प्रारंभी शेतकर्‍यांनी स्वत:च्या खर्चातून हे शेततळे पूर्ण करावयाचे आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर कृषि विभागाच्या वतीने पाहणी करुन अनुदान धनादेशाद्वारे देण्यात येते. लहान शेतकर्‍यांनी संयुक्तरित्या या शेततळ्याचा लाभ घेतल्यास त्यांच्या जीवनात खर्‍या अर्थाने क्रांती घडेल. शासनाच्या पाणलोट क्षेत्र विकास योजनेखाली जलसंधारणाच्या विविध उपायांचा अवलंब केला जातो. यामध्ये नालाबांध, सिमेंट बांध, पाझरतलाव, कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे यांचा समावेश आहे. या कामांमुळे त्या परिसरातीलच शेतकर्यांना लाभ मिळत असे. मात्र शेततळ्यामुळे शेतकर्यांना वैयक्तिक लाभ घेता येतो. राज्यातील बर्याचशा कोरडवाहू जमिनी काळ्या मातीच्या आहेत. पडणार्या पावसाचे पाणी हे मोठ्या प्रमाणात जमिनीवरुन वाहते. हे पाणी अडवून, साठवून आणि नंतर गरजेच्या वेळी वापरणे हे शेततळ्याच्या माध्यमातून शक्य आहे.
     शेत जमिनीतून वाहात जाणारे पाणी अडचणीच्या वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे म्हणतात. शेतात तळे करुन भुपृष्ठावरुन वाहात जाणारे पाणी त्यात साठवून त्याचा उपयोग जलसिंचनासाठी करता येऊ शकतो. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे-दुसरे पाणी पिकास देता आल्यास पीक हमखास येते.
     शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकाराचे शेततळे करता येते. शेततळ्याची जागा निवडतांना पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर निवडू नये कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळी प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावीत. शेततळी दोन प्रकारची असतात. एक म्हणजे खोदून खड्डा तयार करणे व दुसरे म्हणजे नाल्यात आडवा बांध टाकून पाणी अडवून तयार केलेला तलाव. शेततळ्याचे आकारमान पावसाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. पाणी देताना ते केव्हा व कसे द्यावे तसेच किती प्रमाणात द्यावे याही गोष्टीचा विचार करावा, त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल

     शेततळ्याचे पाणी शक्यतो नगदी पिके तसेच फळबागांसाठी वापरावे यामुळे निश्चित उत्पादन मिळून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरु शकते. शेततळ्यामुळे शेतकर्यांना स्वत:च्या शेतात पाणीसाठा निर्माण करणे, शेतात पाणी मुरवणे व पिकांस संरक्षित पाणी देणे शक्य होते. संयुक्त शेततळे घेण्यासाठी ८ ते १० शेतकरी एकत्र आल्यास जमिनीची वरची बाजू लक्षात घेऊन त्या ठिकाणी ४४ मीटर रुंद, ४४ मीटर लांब आणि ५.२ मीटर उंची असलेले शेततळे सामुहिकरित्या घेण्यात येते. शेततळ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत असल्याने जलसमृध्दीच्या दिशेने नेणार्या शेततळ्याचा मार्ग निवडणे योग्य ठरेल. या योजनेचा लाभ शेतकर्यांनी जास्तीत जास्त घ्यायला हवा. तरच जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेततळ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.  जीवनदायिनी शेततळ्याचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.



पळत्याच्या मागे का पळता?


तो करतोय मग मला तेच करायला हवं, हा अट्टहास घेऊन जगणारी तरुणाई आपण पाहतो. यश मिळविण्यासाठी गर्दीच्या मागे धावणारी माणसं पाहतो. पण जेव्हा आपण गर्दीच्या मागे धावतो, त्यावेळी आपण आपल्या कौशल्यांकडं दुर्लक्ष करतो आणि आपल्या कौशल्यांकडं जेव्हा आपण दुर्लक्ष करतो, तेव्हा आपण कुठेच पोहोचू शकत नाही. एखादा माणूस काही करू लागला की बाकीचे लगेच त्याच्या मागे धावू लागतात. पाहता-पाहता त्या क्षेत्राच्या मागे मोठी गर्दी जमा होते. यामुळे यशाची शक्यता कमी होत जाते. अनेकदा आम्ही जे करू लागतो, दुसरेही तसेच करू लागतात, असे म्हणताना अनेक लोक दिसतात. पण हे म्हणणं कितपत योग्य आहे? आपण जेव्हा गर्दीच्या मागे धावत असतो, तेव्हाच असे प्रश्‍न निर्माण होतात. जीवनात यशासाठी कौशल्य जास्त गरजेचं आहे, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. म्हणूनच तुमच्याकडं ज्या प्रकारची कौशल्यं असतील, त्यानुसारच तुमचं कार्यक्षेत्र निवडा. 
तुमच्यात काय आहे, ते पाहा :करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक माणूस वेगळा असतो, हे समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकात काही ना काही वेगळं असतं. यासाठी आपण आपल्या कौशल्यांवर आधारित कार्यक्षेत्रच निवडलं पाहिजे. दुसर्‍यांशी तुलना करून काहीच फायदा होत नाही. जे तुमच्याकडं आहे, ते दुसर्‍याकडं नाही. जे दुसर्‍याकडं आहे, ते आपल्याकडे असेलच असं नाही. दुसर्‍याचा निर्णय आपल्या निर्णयासारखा कसा असू शकतो? ज्या प्रकारची कौशल्यं आपल्याकडं आहेत, ती घेऊन पुढं गेलो, तर जगातील कोणतीच ताकद आपल्याला अडवू शकत नाही. यश मिळवण्यासाठी गर्दीच्या मागे पळण्याऐवजी आपल्या कौशल्यांच्या मागे धावावं आणि त्यानुसारच करिअर निवडावं. 
मनाचा आवाज ऐका : करिअरमध्ये यश मिळवायचं असेल, तर आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. दुसर्‍याचं पाहून निर्णय घेऊ नये. करिअरबाबत आपण एखादा चुकीचा निर्णय घेतला, तर आपल्याला आयुष्यभर पश्‍चात्ताप करत बसावं लागेल. सगळेच जण इंजिनिअरिंग, बँकिंग, मीडिया, सरकारी क्षेत्राच्या दिशेने धावत आहेत. मात्र, तुम्ही त्यांच्यामागं पळू नका. तुम्ही जे करू शकता, जिथे तुम्ही यशस्वी होऊ शकता, त्याच क्षेत्राला आपलं करिअर म्हणून निवडा. 
दुसर्‍याच्या मताला महत्त्व द्या : करिअरमध्ये दुसर्‍यांपेक्षा वेगळे चालण्यासाठी त्यांच्यामागं धावणं थांबवा. दुसर्‍यांचा सल्ला नक्की घ्या. मात्र, तुम्ही जे करू इच्छित आहात, तसंच करा. दुसर्‍याचं ऐकल्यानं आपल्याला त्या क्षेत्रातील आव्हाने आणि शक्यतांची माहिती होते. यशासाठी स्वत:वर आणि स्वत:च्या कौशल्यांवर विश्‍वास ठेवा. गर्दीच्या मागे का पळता? ः जेव्हा आपण गर्दीच्या मागे धावतो, तेव्हा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. गर्दीत पडण्याची शक्यता जास्त असते. लक्ष्य प्राप्त होवो अथवा न होवो याची खात्री नसते. मग काय कराल, तर आपल्यासाठी स्वत: रस्ता बनवा. तुमच्याकडं कौशल्य असतील, तर तुम्ही गर्दीपासून दूर राहूनच लक्ष्य प्राप्त करू शकता. म्हणूनच गर्दीच्या मागे पळण्याऐवजी स्वत:च्या मागे पळा.


राष्ट्रवादीची वेळ आणि क्षमता संपली?


     दोन्ही डगरीवर पाय ठेवून राहणार्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आता ना घर का ना घाट का, अशी झाली आहे. राष्ट्रवादीला आता कोणी जवळ करणार नाही, अशी परिस्थिती असली तरी, शरद पवार यांनी काँग्रेससोबत आघाडी करू, हे आपले पालपूद लावलेच आहे. पण आता जवळपास दोन अडीच वर्षे तरी संधी नाही. तोपर्यंत कमळ अजून काय काय चमत्कार करेल आणि घड्याळाची टीकटीक कायमची बंद करेल, सांगता येत नाही. त्यामुळे शरद पवार  स्वाभिमानासाठी काँग्रेसमधून बाहेर पडले.पण आज त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवायला निघाले असले तरी, त्यांना विचारायला कुणी तयार नाही. 20-25 वर्षातच त्यांना विजनवासात जावे लागणार की, काय अशी शंका येऊ लागली आहे.

     राष्ट्रवादीची स्थापना काँग्रेसमध्ये ताठ मानेने राहता येत नाही म्हणून स्वाभिमानाच्या तत्वावर करण्यात आली. सोनिया गांधी या विदेशी आहेत, हा मुद्दा पवारांनी केला. कारण सोनियांनी मनमोहनसिंग यांना पंतप्रधान पदासाठी निवडले. त्या आधी नरसिंहराव यांच्यामुळे पवारांना या पदाने हुलकावणी दिली. म्हणून 12 डिसेंबर हा स्वाभिमानदिन म्हणून घड्याळकरांनी साजरा करणे सुरू केले. काँग्रेसमध्ये राहून नव्हे तर सोबत राहून आपण केंद्रात सर्वोच्च पदाला गवसणी घालू शकतो, असे पवारांनाच वाटले. केंद्रात आणि राज्यातही ते सत्तेत काँग्रेससोबत सहभागी झाले. पाटी पलटताना दिसताच त्यांनी काँग्रेसची साथ सोडली. कारण शिवसेना- भाजपा ही युती तुटली होती. पवारांच्या पक्षाला आता तीन स्पर्धक होते. निवडणुकीनंतर जो सत्तेच्या जवळ; त्याला आपण जवळ करायचा, ही चाल असू शकते. काँग्रेस गलितगात्र झाली. भाजपाला केंद्रात कुणाचीच गरज राहिली नाही. असती तरीही पवारांच्या पक्षाची ती पत नव्हती आणि आता बिनशर्त पाठिंबा देऊनहीजातीयवादीपक्षासोबत जाऊन पुरोगामीत्वाचा स्वाभिमान राखता येत नव्हता. युती तुटेल आणि सरकार पडेल, अशामियाँ मरेंगे और बैल बटेंगेया आशेवर राहण्याचे काय फळ मिळाले ते दिसते आहे
     आता शिवसेना- भाजपाचा हा बनाव आहे की एकत्र राहणे ही दोघांचीही अगतिकता, जनतेचा कौल काय म्हणायचे ते काळच सिद्ध करणार आहे. मात्र ते एकत्र आहेत. मुंबईतदेखील शिवसेनेला कडवेपण बाजूला सारत पुन्हा एकत्र यावेच लागणार आहे. दुय्यमत्त्व त्यांच्या नीती आणि कर्तृत्वामुळे जनतेने त्यांना दिले आहे. यात राष्ट्रवादीला दुसर्या स्थानी राहण्याचे धोरणही नीट राखता आलेले नाही. पवारांचा हा केवळ निवडणुकीतील पराभव नाही तर राजकीय खेळ्यांमध्येही ते पराभूतच झालेले आहेत. विश्वासघात हा त्यांच्या राजकारणाचा पाया राहिला असताना इतरांकडून विश्वासार्हतेची अपेक्षा करणे गैरच आहे. आता पुन्हा काँग्रेसला सोबत घेऊनच लढू, हे त्यांचे म्हणने हास्यास्पदच आहे. तुमचे अस्तित्वच उरलेले नाही. होते ते पश्चिम महाराष्ट्रातील साडेचार जिल्ह्यांपुरतेच होते. तिथेही आता ते संपलेले आहे. मराठाही तितुका त्यांनी घालवला आहे. त्यांना आता पुन्हा शुन्यातून सुरूवात करावी लागेल आणि आता ती वेळ आणि क्षमताही राहिली नाही.




Sunday, February 26, 2017

सोशल मिडियावर या 9 गोष्टी टाळा


     आजकाल प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवर काही ना काही शेअर करतो असतो.मग ते फेसबूक असो,ट्विटर असो,इंस्टाग्राम,स्नॅपचॅट किंवा व्हाट्सअॅप,सगळीकडे अगदी जोमाने कित्येक गोष्टी शेअर केल्या जात आहेत.कित्येकदा शेअरिंग करण्याच्या भानगडीत आपण काही अशा गोष्टी इंटरनेटवर  शेअर करत असतो की, भविष्यात त्या आपल्याला नुकसानकारक किंवा धोकादायक ठरू शकतात. जर आपणही सोशल मिडियावर काही गोष्टी मागचा पुढचा कोणताही विचार न करता शेअर करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या. खाली दिलेल्या नऊ गोष्टींबाबत अधिक खबरदारी घ्या.आपले नुकसान होण्यापासून वाचवा.

1.फोन क्रमांक
आपल्या प्रोफाईलमध्ये आपला फोन क्रमांक टाकण्याची आयडिया सहा वर्षांपूर्वी चांगली वाटत होती, ज्यावेळेला फेसबूकने सांगितले होते की, ही सिक्योरिटीच्या सुधारणेसाठी आवश्यक आहे. इंटरनेटवर उपस्थित असलेली काही वाईट विचारांची माणसं आपल्या फोन क्रमांकाच्या मदतीने आपल्याला त्रास देऊ शकतात. शिवाय आपल्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती गोळा करू शकतात. विशेषत: स्त्रिया,तरुण मुलींनी याची अधिक काळजी घ्यायला हवी.
2.खराब छायाचित्रे
आपण कित्येकदा मजेमजेत असे काही फोटो सोशल मिडियावर शेअर करतो की, तेच फोटो पुढे भविष्यात आपल्याला गोत्यात आणू शकतात. जर आपल्या आई-वडिलांना आवडत नसेल तर तसे फोटो सोशल मिडियावर टाकू नका. कदाचित असंही होऊ शकतं की, आपला भावी जोडीदार आपल्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा खराब फोटोंमुळे त्याची आपल्याविषयीची धारणा बदलू शकते.
3.जन्म तिथी
जर आपण आपली जन्मतारीख सोशल मिडियावर टाकली असेल तर ती त्यावरून तात्काळ हटवा. तुमच्या नाव आणि पत्त्यासोबत जन्मतारीख मिळाल्यावर हॅकर आपल्या अकाऊंटला नुकसान पोहचवू शकतो. मित्रांना आपली जन्मतारीख सांगायला आवडत असेल पण अकाऊंटच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने ते धोकादायक ठरू शकते.
4.रिलेशनशिपची छायाचित्रे  
सोशल मिडियावर आपल्या नातेवाईकांच्या संबंधातली छायाचित्रे टाकण्यापूर्वी पूर्णपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. जर आपण आपल्या जुन्या मित्राचे छायाचित्र टाकत असाल तर त्याने भविष्यात बनणार्या नातेसंबंधांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही लोक आपल्या भावी जोडीदाराची सोशल मिडियावरील अकाऊंट फारच काळजीने पाहतात. जर तुम्ही जुन्या रिलेशनिपसंबंधित असलेली छायाचित्रे टाकली असतील तर ती डिलीट करून टाका. फेसबूकचा प्रोफेशनल पद्धतीने वापर करायला शिका.
5. सुट्टीची छायाचित्रे
आपण सहलीला गेलेली छायाचित्रे फेसबूकवर टाकली असतील तर तुम्ही सुट्टीला गेल्याचे सहज लक्षात येते, चोरांना हा संदेश मिळू शकतो आणि ते आपल्या घरात चोरी करू शकतात. फेसबूकवर कधीही एअरपोर्ट किंवा हॉलीडेची छायाचित्रे टाकण्यापासून सावध राहा. तुम्ही सुट्टीवरून आल्यावरच या संबंधातले फोटो शेअर करा.काहीजण मिनिटा मिनिटाचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मिडियाशी शेअर करतात, त्यांनी ही आपली सवय बदलायला हवी.
6. योग्य कंटेंट शेअरिंग
काही काही वेळेला आपल्याला आवडणारे व्हिडिओ आपण पूर्ण न पाहताच शेअर कतो. अशा वेळेला आपल्याकडून चूक होऊ शकते. ज्या ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ शेअर करता , त्या त्या वेळेला अगोदर तो तुम्ही नीट पूर्ण पहा.नंतरच शेअर करा. असं व्हायला नको की, व्हिडिओत एकादी चुकीची गोष्ट असेल आणि ती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचेल.फेसबूक आणि ट्विटर आदींवर उपयोगी कंटेंटच शेअर करा. अनावश्यक कंटेंट शेअर केल्याने कुणाला त्याचा फायदा होत नाही. कंटेंटच्या निवडीत सावधानता बाळगा.
7.लोकेशन
फेसबूकवर आपले लोकेशन टॅग करण्याची आता फॅशनच आली आहे.पण हे धोकादायक ठरू शकते. कुठलीही वाईट व्यक्ती नुकसान पोहचवू शकते. तुम्ही बाहेर असाल किंवा तुम्ही मुलाला शाळेला सोडलेला  असाल, अशा पोस्ट्स करण्याच्या टाळा. तुमचे लोकेशन कधीही फेसबूकवर शेअर करू नका.
8. मालक किंवा अधिकारी
काही लोकांना सवय असते की, कुठल्याही गोष्टीत आपल्या मालकाला किंवा अधिकार्याला ओढण्याची! आपल्याला असे वाटते की, यामुळे आपला बॉस खूश होईल. पण तुम्हाला कुठलीही पोस्ट टाकण्यापूर्वी याचा विचार करायला हवा की, आपला बॉस आपली पोस्ट वाचू शकतो. आणि त्याला ते आवडेल की नाही याचा विचार करा. सोशल मिडियावर आपल्या बॉसला ओडू नका.
9.चुकीची भाषा
एकाद्यावेळेला रागाच्या भरात तुम्ही एखाद्याला काही चुकीचे बोलला असाल आणि ती पोस्ट सोशल मिडियावर टाकली असेल तर ती पोस्ट कधीही उकरून काढून तुमच्यावर आरोप होऊ शकतो. आपण मागे कधी काही चुकीची पोस्ट टाकली असेल तर ती पाहण्यासाअठी आपल्या अकाऊंटवर सतत नजर ठेवत चलाकुणी त्याचा गैरवापर तर केला नाही ना, याचा शोध घ्या. सोशल मिडियावर कुणाला वाईट-साईट बोलू नका किंवा तशा पोस्टस टाकू नका.



भारत निर्यातदार कधी बनणार?


     
जगात सर्वांत जास्त प्रमाणात शेती भारतात केली जाते. शेतमालाचे उत्पादनही चांगल्या प्रमाणात होते. शेतमालाचा दर्जादेखील निर्यातक्षम आहे. त्यामुळे भारत एक उत्तम आणि मोठा निर्यातदार देश बनू शकतो, मात्र आपल्या देशाला शेतमाल आयात-निर्यातीचे स्पष्ट असे धोरणच नाही. साहजिकच त्यामुळे देश मागे राहिला आहे. आणि आपली गंगाजळी गमावत चालला आहे.शेती हा उत्तम व्यवसाय आहे, याकडे आपला देश कृषीप्रधान असूनही दुर्लक्ष करीत आहे.सरकारे याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल आहे.
     भारतातील शेतकर्यांचा शेतमाल बाहेर निर्यात करण्याची क्षमता ही भारतात असून निर्यातदार बनण्याची प्रचंड मोठी क्षमता आहे. भारताचे सद्यपरिस्थितीत शेतकर्याच्या शेतमाला विषयी आयात- निर्यातीचे धोरणच नाही. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची प्रगती खुंटली आहे आणि इथला शेतकरी आत्महत्या करत सुटला आहे. शेतकर्याच्या शेतमालाला भाव देणेदेखील गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही, शेतकर्यांच्या शेतमालाचा भाव ठरविला जातो, मात्र प्रत्यक्षात बाजारपेठेत भलताच भाव शेतमालाला मिळतो. शेतकर्याला शेतमालाचे उत्पादन घेण्यासाठी जेवढा खर्च येतो, तो खर्च निघावा एवढे देखील शेतमालाला भाव बाजारपेठेत नसतो. भारत हा कृषीप्रधान देश जरी असला तरी कृषी क्षेत्राबाबत योग्य धोरणच देशात नाही. त्यामुळे शेतमालाला अल्प भाव मिळत आहे. शेतकर्यांची संपत्ती, क्रयशक्ती वाढली तरच आपला देश सुजलाम, सुफलाम होणार परंतू तसे प्रयत्न देशात होताना दिसत नाही.

      शहरात रस्ते आणि पार्किंगची सुविधा करुन विकास केला जातो. मात्र शेतकर्यांची अवस्था तशीच आहे. त्यात काही एक बदल झालेला नाही. शेतकर्यांची परिस्थिती खर्या अर्थाने सुधारायची असल्यास शेतमालाची आयात करण्यापेक्षा ती निर्यात करण्याची अधिक गरज आहे. मात्र सध्या केवळ दोन टक्के शेतमालाची निर्यात आपल्या देशातून केली जाते. याच्या तुलनेत भारतापेक्षाही लहान देशात निर्यातीचे प्रमाण हे सुमारे 50 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच अमेरिकासारख्या देशात केवळ दोन टक्के शेती करणार्या लोकांना शासनाकडून प्रचंड मोठया प्रमाणात मदत केली जाते. तसेच अनेक पीकनुकसानात शेतकर्यांना मोठया प्रमाणात सबसिडी दिली जाते. तसेच तेथील शेतकर्यांना सर्वदृष्टीने संरक्षण कवच पुरवण्यात आले आहे.
      अणुबाँबच्या मार्याने जपान सारखा देश सर्वच बाजूने पुरता विकलांग झाला होता, मात्र तोच देश आज आर्थिक दृष्टा संपन्न दिसून येतो आहे, हे तिथल्या शेतीनिष्ठ धोरणामुळेकेवळ तेथील शेतकर्यांच्या जोरावरच त्यांची फिनिक्ससारखी गगन भरारी शक्य झाली आहे. मात्र भारतात शेतकर्याची स्थिती अतिशय दयनीय दिसून येते. एका वर्षी तुरीच्या डाळीचे भाव हे आभाळाला भिडलेले असतात, तर दुसर्या वर्षी तुरीची आवक वाढल्याने भावच खाली पडलेले असतात. या सर्व प्रकाराला शेतीविषयीचे चुकीचे धोरणच जबाबदार आहे. एकीकडे तुरीचे उत्पादन वाढले तरी विदेशातून तुरीच्या डाळीचे आयात केले जाते. त्यामुळे तुरीच्या डाळीचे भाव हे तुरीचे पीक निघण्याआधीच कमी होतात. याचाच फटका पर्यायाने शेतकर्यांना बसतो. ज्याप्रमाणे विदेशात शेतकर्यांना मोठया प्रमाणात मदत केली जाते, तशी मदत भारतात मिळणे गरजेचे आहे. शेतकर्यांना मदत करण्याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची आहे मात्र तसे होतांना दिसून येत नाही. शेतकर्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहीजे असे मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. सध्याच्या परिस्थितीत तर देशात शेतकर्यांच्या समस्याबाबत बोलणेही टाळले जात असून निवडणूकीच्या प्रचारातही शेतकर्यांची मुद्दे गहाळ झाले आहेत. भारतात शेत जमिनीची संख्या इतर देशाहून किती तरी पटीने अधिक आहे, आणि तीच खर्या अर्थाने देशाची संपत्ती आहे. योग्य धेय्य धोरणे जर यासंदर्भात अवलंबविले तर खर्या अर्थाने शेतकर्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आनि होणार भारत एक मोठा निर्यातदार म्हणून जगापुढे आल्याशिवाय राहणार नाही.


उपहास आणि अपमानानंतरचे यश


     यशाची कुठली अशी व्याख्या नाही. प्रत्येकाचं यश हे वेगवेगळं असतं,मात्र तुम्ही यशासाठी जो मार्ग निवडता ,तो उपहास,उपेक्षा आणि अपमान यांना ओलांडल्याशिवाय जात नाही. विशेष म्हणजे  आपल्याला हा मार्ग न सांगता मिळतो.लोकांना तुम्ही काय करणार आहात किंवा काही नवीन शोधत आहात,हे जाणून घ्यायचं असतं, कारण तुम्हाला तेवढी तुमची पात्रता नाही, असं सांगायचं असतं आणि तुम्हाला त्यापासून रोखायचं असतंतुम्हाला प्रोत्साहन देण्यापेक्षा तुमच्या निवडीची ते टर उडवतील,उपहास करतील.तुमचा आत्मविश्वास ढळावा,यामागे काहींचा उद्देश असतो.त्यासाठी ही माणसे वाट्टेल तशा पद्धतीने अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. वेंधळ्यासारखे काही तरी करू नकोस, असाही सल्ला दिला जातो. आपल्या जवळच्या लोकांकडूनही असे काही कमेंट्स येतात की, तुम्हाला आश्चर्य व्हायला होतं. काही लोक तुमच्या क्षमतेबाबतच प्रश्न उपस्थित करतात. आपल्या धाडसाचा अपमान करतात. पण ज्यावेळेला तुम्हाला यश मिळतं,तेव्हा अपमान,उपेक्षा आणि उपहास सर्व काही यशापुढे गौण,छोटे वाटायला लागतात. त्यामुळे तुम्हाला मिळालेला उपहास,अपमान आणि उपेक्षा लक्षात ठेवून वाटचाल करा. कारण ते तुम्हाला सतत टोचत राहतील. ते तुमच्या पुढे जाण्याच्या इच्छाशक्तीला सतत इंधन घालत राहतात. त्याच गोष्टी तुम्हाला उत्साह देत राहतात.
महान बास्केटबॉल प्लेयर
त्याला हॉयर स्कूल बास्केटबॉलच्या संघातून काढण्यात आलं. त्याने घरी आल्यावर स्वत:ला कित्येक तास कोंडून घेतलं. पण  त्याने दृढ निश्चय केला. आपण खेळ सोडायचा नाही. शेवटी तो म्हणजे मायकल जॉर्डन बास्केटबॉल खेळातला शतकातला महान खेळाडू बनला.चौदा वेळा तो एनबीए ऑल स्टार चॅम्पियन बनला. दोन वेळा तो ऑलम्पिक गोल्ड मेडेलिस्टदेखील राहिला. 5 वेळा तो एनबीएचा मोस्ट वॅल्यूड प्लेयर बनला. या गोष्टीवरून एक स्पष्ट आहे की, अपमानानंतर निराश व्हायचं नाही.
लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपली नजर लक्ष्यावर खिळलेली असली पाहिजे.लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे.लोक जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही,तोपर्यंत म्हणतच राहणार.ज्यादिवशी तुम्ही यशस्वी व्हाल,त्यादिवशी सगळ्यांची बोलती आपोआप बंद होईल. जर तुम्ही तुमच्या स्वप्नांवर मर्यादेपेक्षा प्रेम करत असाल तर, लोकांची फिकीर न करता आपले लक्ष्य गाठण्यासाठी कठोर मेहनत करत रहा. तुम्हाला कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भटकायचं नाहीए.
कार्टूनिस्ट ते डिज्नीलँडपर्यंत
युवा कार्टूनिस्टला वर्तमानपत्रातून यासाठी काढून टाकण्यात आले होते की,त्याच्याकडे ओरिजनल आयडिया नव्हती आणि शिवाय कल्पनाशक्तीचा अभावदेखील होता, असंही सांगण्यात आलं होतं. आपण बोलत आहोत वाल्ट डिज्नीविषयी! आपण त्यांना यासाठी ओळखतो की, त्यांनी मिकी माऊससारख्या कार्टून कॅरेक्टरची निर्मिती केली.त्यांनी 22 ॅकॅडमी अवार्ड्स जिंकले आहेत.ते हॉलीवूडमधील यशस्वी निर्माते आहेत. त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे बनलेला डिज्नीलँड प्रत्येकाच्या चेहर्यावर हास्य आणतो.
अपमान आणि लेम्बोर्गिनी
इटालियन व्यावसायिक आणि स्पोर्ट्स कार निर्माता फारुशियो लेम्बोर्गिनीला संपूर्ण जग फॅशनेबल आणि लग्जरी स्पोर्ट्स कार लेम्बोर्गिनीच्या निर्माताच्या रुपात ओळखतं. स्वत:साठी त्यांनी त्यावेळेला सर्वात प्रसिद्ध अशी स्पोर्ट्स कार फेरारी विकत घेतली होती. पण आवाज करणार्या गियरबॉक्समध्ये त्यांना काहीतरी गडबड वाटली.ते एन्जो फेरारी यांना भेटायला गेले, जे फेरारीचे मालक होते.पण एन्जो यांनी त्यांच्याकडे जवळपास दुर्लक्षच केलं. त्यांचा अपमान करणारा व्यवहार लेम्बोर्गिनी यांच्या मनाला लागला.त्या अपमानानेच त्यांना स्पोर्ट्स कार निर्मितीमध्ये उतरवलं. फेरारीमध्ये त्यांना जी मॅकेनिकल चूक जाणवली होती, ती त्यांनी सुधारली. सुरुवातीच्या व्यवसायातल्या घाट्यानंतरही ते फॅशनेबल स्पोर्ट्स कारचे यशस्वी निर्माता बनले.
उपहासाला घाबरू नका
कित्येकदा तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यातल्या मौलिकतेविषयी किंवा कल्पनाशक्तीविषयी संशय वाटतो. पण त्यांच्याकडून केला गेलेला अपमान,उपहास,तिरस्कार किंवा उपेक्षा तुमच्यातल्या सृजनशीलतेला बाहेर काढण्यास मदत करतात. एक लक्षात घ्या की, आपल्या या लक्ष्याच्या दिशेनेच्या प्रवासात मिळालेल्या अपमान,उपेक्षा आणि उपहासाचा यशानंतर बदला घ्यायचा नाही आहे. सूडाचा आणि नकारात्मकतेचा विचार तुमची उंची कमी करतो. असले विचार  तुमच्या तिथंपर्यंत पोहचलेल्या उंचीला धक्का देणारे आहेत. तुमचे यशच ते काम आपोआप करत असते. मात्र त्यांनी जे काही बोलले आहे, अपमान,उपहास,उपेक्षा केली आहे,त्याचा यशासाठी वापर करून घेतला पाहिजे.

Friday, February 24, 2017

धडपडणार्‍या नेत्यांची परंपरा


     सांगली जिल्ह्याला लोकांसाठी धडपडणार्या आणि आपले कर्तृत्व सिद्ध करणार्या नेत्यांची मोठी परंपरा आहे. जिल्ह्याच्या राजकारणात संघर्ष करून विलासराव जगताप, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, खासदार संजयकाका पाटील ही मंडळी  पुढे आली आहेत. आजच्या घडीला सांगली जिल्ह्याची धुरा या मंडळींकडे आली आहे. मात्र त्यांना अजूनही संघर्षच करावा लागणार आहे. आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले असले तरी काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. मंत्रीपद यासाठी जिल्ह्याला आवश्यक आहे. यातूनच त्यांच्या कामाचा ठसा उठून दिसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद ताब्यात घ्या,तुम्हाला मंत्रीपदाची संधी देतो, असे वचन दिले होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपने दैदिप्यमान कामगिरी करत सत्ता हासिल केली आहे. या यशात या सगळ्या मंडळींचा मोठा हातभार लागला आहे.त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या आणि किती जणांच्या गळ्यात पडणार, हे आता पाहावे लागणार आहे.

     जनतेची सुख-दु:खे जाणणार्या राजकीय नेत्यांची सांगली जिल्ह्यास परंपरा आहे. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे वसंतदादा पाटील,पूर्वभागाच्या प्रश्नांसाठी सातत्याने अग्रेसर असलेले बॅ. जी.डी.पाटील,दुष्काळग्रस्त भागासाठी झटणारे राजारामबापू पाटील आणि सहकाराच्या क्षेत्रात ठसा उमटवणारे गुलाबराव पाटील व विष्णूअण्णा पाटील असे नेतृत्व सांगली जिल्ह्याला लाभले.हे सर्व नेते कष्टातून पुढे आलेले होते. गरिबांची दु:खे त्यांना माहित होती.जिल्ह्याच्या विकासासाठी नेमके काय करायला हवे,हे त्यांना माहित होते. अनेक मंत्रीपदे सहजगत्या सांभाळणारे शिवाजीराव देशमुख आणि माजी ग्रामीण विकासमंत्री अण्णासाहेब डांगे यांनीही दादा आणि बापूंचीच परंपरा सांभाळली. अलिकडेचे नेते डॉ.पतंगराव कदम,जयंतराव पाटील, अजितराव घोरपडे, (कै.) आर. आर. पाटील,शिवाजीराव नाईक यांनाही मंत्रीपदे मिळाली.त्यांनीही आपापल्या कारकीर्दीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला.
     सांगलीनजिकच्या पद्माळे या छोट्याशा गावातून वसंतदादा पाटील यांचे नेतृत्व पुढे आले. तासगाव तालुका काँग्रेस समितीचे सचिव म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. आमदार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष,पाटबंधारेमंत्री आणि मुख्यमंत्री  अशा यशाच्या एकेक पायर्या चढत गेलेल्या दादांसमोर गरीब व कष्टाळू शेतकरी होता. त्यांना कोरडवाहू शेतकर्यांची दु:खे माहित होती. कारण त्यांनी ते जीवन जवळून अनुभवले होते. त्यामुळेच कोरडवाहू शेतकर्यांना बारमाही पाण्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी सतत भर दिला.
दादांनी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांची संकल्पना प्रत्यक्षात आणून सामान्य शेतकर्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी दुष्काळग्रस्त पूर्व भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ताकारी आणि म्हैसाळ पाणी योजनांना चालना दिली.गुलाबराव पाटील यांनी सहकारी क्षेत्राला तत्त्वज्ञान दिले.सहकारी बँकिंगच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील फळबागायतीला चालना दिली. सहकार प्रशिक्षणासारख्या सोयी कार्यकर्त्यांना कायमस्वरुपी उपलब्ध करून दिल्या.
राजारामबापू पाटील यांच्याकडेही गरिबांचे नेते म्हणूनच पाहिले जाते. त्यांनीही मंत्रिपदे सांभाळताना सामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय राबवले.दुष्काळग्रस्त अशा पूर्व भागातील लोकांचे संघटन त्यांनी सर्वप्रथम केले. परिणामी पाण्याच्या प्रश्नाबाबत जागृती झाली. ताकारी व म्हैसाळ योजनांना त्यामुळे मूर्त स्वरुप आले.
   
 विष्णूअण्णा पाटील यांना सहकार क्षेत्रातील जाणकार नेते म्हणून मान्यता मिळाली होती.राज्य बँकेचे अध्यक्षपद सलग पाच वर्षे सांभाळणार्या अण्णांनी आर्थिक संकटांतून ती संस्था दूर ठेवली होती. राज्य व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे.
     आमदार विलासराव देशमुख हे वसंतदादांचे अनुयायी. शिराळा मतदारसंघातून राजकारणात प्रवेश करताना त्यांनीही खूप संघर्ष करावा लागला होता. दादांचा त्यांच्यावर विश्वास होता. स्वता:च्या मंत्रिमंडळातच गृहराज्यमंत्री म्हणून दादांनी श्री.देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपवली.त्यानंतर पाटबंधारे, माहिती,विधीमंडळ कामकाज अशी अनेक मंत्रिपदे त्यांनी सांभाळली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते काम करीत होते,तेव्हा त्यांचे नाव नेतृत्वाच्या स्पर्धेत घेतले जात होते. विधीमंडळात सरकारची बाजू अतिशय प्रभावी;पण संयमाने मांडणारे मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता.
     युतीच्या काळात श्री. डांगे यांनी ग्रामीण विकास आणि पाणीपुरवठा खाते गतीने चालवले.साडेचार वर्षात अनेक पाणीयोजना त्यांनी आखल्या आणि प्रत्यक्षात आणल्या.मंत्री म्हणून संपूर्ण प्रशासनावर वचक कसा ठेवायचा, याचे प्रशिक्षणच त्यांच्याकडून घ्यावे, असा त्यांचा दरारा होता.युतीच्या काळात ताकारी व म्हैसाळ या जुन्या योजनांना गती आली आणि टेंभूसारख्या नव्या योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.त्या मागे श्री. डांगे यांचीच दूरदृष्टी होती. सध्याच्या घडीला ते राजकारणात सक्रीय नसले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुतगिरण्यासारख्या संस्था उत्तमप्रकारे चालवल्या जात आहेत.
     युतीच्या काळात मंत्रीपद भूषविलेले आमदार शिवाजीराव देशमुख यांनीही आपल्या कामाचा ठसा उमटला आहे. याअगोदर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाही त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचा डंका पार दिल्लीपर्यंत वाजवला.सत्ता नसली की, प्रवाहातून काही प्रमाणात मागे खेचले जातात, तसे नाईक यांचे झाले होते,पण आता पुन्हा त्यांना चांगली संधी प्राप्त झाली आहे. मंत्रीपदाच्या रेसमधले नाईक नक्कीच आपल्या कामाचा ठसा उमठवतील.
     नव्या पिढीतील डॉ.पतंगराव कदम यांचा शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातला प्रवास थक्क करणारा आहे. कडेगाव तालुक्यातील सोनसळ या छोट्याशा गावातून श्री. कदम यांचे नेतृत्व पुढे आले.शिक्षणाची कोणतीही परंपरा नसलेला आणि एका लहानशा खेड्यातील एखादा जिद्दी तरुण केवढी भव्य स्वप्ने पाहतो व ती प्रत्यक्षात आणतो, हे पतंगरावांनी त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.
     पुण्यासारख्या विद्यानगरीत जाऊन डॉ.कदम यांनी सदाशिव पेठेतील एका छोट्याशा खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी विशीतील तरुणाच्या या साहसाकदे काहीशा उपहासानेच पाहिले गेले;मात्र हातात घेतलेले काम अर्धवट सोडायचे नाही, अशी त्यांची जिद्द. त्यामुळे भारती विद्यापीठाने यशाची एकेक शिखरे सर केली.दिल्लीतही या विद्यापीठाने स्वत:चा ठसा उमटवला. आता विदेशातही जाण्याचे स्वप्न फारसे दूर नाही. शिक्षणक्षेत्रातच डॉ.कदम थांबले नाहीत.त्यांनी सहकार आणि राजकारणातही स्वत:चा ठसा उमटवला. पाटबंधारे, शिक्षण,उद्योग आणि वनमंत्री म्हणून त्यांची धडाकेबाज कामगिरी लक्षात राहणारी आहे. मुख्यमंत्रीपदाची त्यांना सातत्याने हुलकावणी मिळत राहिली. सध्या तरी ही त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासारखी नाही. मात्र त्यांना त्याची सल वाटत नाही. त्यांच्यावर कुठली कामगिरी सोपवा,ती ते मोठ्या नेटाने पुढे नेणार आणि आपला त्यात ठसा उमटवणार, असा स्वभाव आहे.
     अंजनी या तासगाव तालुक्यातील छोट्याशा गावातून राज्यस्तरावरच्या राजकारणात पोहचलेले आर. आर. आबा पाटील यांचा प्रवासदेखील थक्क करणारा आहे.कुठलाही राजकीय वारसा नसताना स्वत:च्या कर्तृत्वावर त्यांनी ग्रामविकासमंत्री,उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. ग्रामीण जीवनाशी नाळ जोडली असल्याने त्यांच्या अनेक योजना यशस्वी झाल्या. जिल्हा परिषदेचा सदस्य,लक्षवेधी आमदार, कल्पक ग्रामविकासमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा यशाच्या एकेक पायर्या त्यांनी पादाक्रांत केल्या.मात्र त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष त्यांच्याच जीववार उठले. आज त्यांची महाराष्ट्राला गरज होती, मात्र आता ते नाहीत, याची खंत सार्यांनाच आहे.दादा घराण्याचा वारसा लाभलेले आणि काही काळ मंत्रीपद भूषवलेले मदन पाटील यांचीही ऐन उमेदीतील एक्झिट चटका लावणारी आहे.त्यांचा कार्यकर्त्यांचा गोतावळा मोठा होता. सांगली महापालिका क्षेत्रात त्यांचे काम जाणवण्यासारखे होते. सांगली जिल्ह्यातले दोन मोठे मोहरे ऐन तारुण्यात गळाले,यात जिल्ह्याचे नक्कीच मोठे नुकसान झाले.
     ग्रामविकासमंत्री, अर्थमंत्री अशी महत्त्वाची राज्य शासनाची खाती सांभाळलेल्या जयंत पाटील यांना राजारामबापू पाटील यांचा राजकीय वारसा लाभला आहे.मात्र त्यांनी स्वत:चेही चौफेर कर्तृत्व सिद्ध केले आहे. ते अभियंते आहेत.उच्चविद्याविभूषित असले तरी त्यांना शेतकर्यांच्या बांधावरचे प्रश्न माहीत आहेत. कारण त्यांनी त्यांचा जवळून अभ्यास केला आहे. राजारामबापू यांच्या निधनानंतर साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात आले. कारखाना,दूध संघ, सुतगिरण्या,बँक, अभियांतिकी महाविद्यालय अशा विविध क्षेत्रात त्यांची कामगिरी उत्तमप्रकारे सुरू आहे.प्रत्येक संस्था उत्त्मरित्या चालवण्यावर त्यांनी कटाक्ष ठेवला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातले अजितराव घोरपडे यांनाही मंत्रिपदाच्या कारकीर्दीत चांगली कामगिरी आहे. आर. आर. पाटील यांच्यामुळे त्यांना अलिकडच्या काही काळात चार पावले मागे सरायला लागले होते. मात्र त्यांची ग्रामीण भागातील पकड मजबूत आहे. महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांचीही कामगिरी वाखाणण्यासारखी होती. दुष्काळी टापूत कारखाना असतानाही त्यांनी तो उत्तमप्रकारे चालवला होता.यांचेही ऐन उमेदीतील निधन चटका लावणारे आहे.
 
   सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे राज्य आहे. अनिल बाबर शिवसेनेत आहेत. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून झाली आहे. खासदार संजयकाका पाटील यांचाही मुळचा पिंढ काँग्रेसचा आहे. मात्र त्यांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. मात्र आता त्यांच्या कारकीर्द बहरवण्यास मोठा वाव आहे. आमदार शिवाजीराव नाईक यांनीही भाजपमध्ये एंट्री करून आपली राजकीय कारकीर्द नव्याने सुरू केली आहे. त्यांना मंत्रीपदाची संधी आहे.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत भाजपने सांगली जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. शिवाजीराव नाईक, मिरज तालुक्याचे आमदार सुरेश खाडे आणि जतचे आमदार विलासराव जगताप यांनी या यशात मोठी कामगिरी बजावली आहे. ही सगळी मंडळी संघर्षातून पुढे आलेली आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण त्यांना आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळदेखील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.
      सांगली जिल्ह्याला सातत्याने मंत्रीपदे मिळाली आहेत. यापूर्वीच्या युतीच्या काळातदेखील जिल्ह्याला मंत्रिपदे मिळाली होती. त्या संधीचे सोनेदेखील केले गेले. मात्र याखेपेच्या युतीच्या काळात सांगली जिल्ह्याला मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली आहे. कर्तृत्व असूनही संधी न मिळाल्याने त्याचे सोने करता येईना, अशी आज परिस्थिती आहे.मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत बहुमोल कामगिरी करत भाजप आमदारांनी पक्षाला मोठी उभारी दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या इतिहासात भाजपला कधीही जिल्हा परिषदेत पाय ठेवता आला नव्हता, मात्र यंदा प्रथमच ही संधी मिळाली आहे. शिवाय निम्म्यापेक्षा जास्त पंचायत समितीवरदेखील भाजपचा झेंडा फडकला आहे. यानिमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या दमाच्या तरुणांना संधी मिळाली आहे. राजकीय समिकरणेही बदलली आहेत. त्यामुळे संधीचे सोने कोण कसा करतो आणि आपले कर्तृत्व सिद्ध करतो, हे आता पाहावे लागणार आहे.
     सांगली जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे बाकी आहेत.वीज,पाणी आणि रस्ते या मूलभूत गरजा अजूनही पेंडिंग आहेत. जिल्ह्यातला निम्मा भाग दुष्काळी आहे. तिथे रोजगार उपलब्ध नाही. स्थलांतराचा प्रश्न मोठा आहे. कृष्णाकाठच्या शेतकर्यांच्या समस्याही वेगळ्या आहेत. सांगली,मिरजसह तालुक्यातल्या ठिकाणच्या शहरांचेही प्रश्न प्रलंबित आहेत.जिल्ह्यातल्या पूर्वभागात मोठे उद्योगधंदे नाहीत. या भागात रेल्वेची आवश्यकता आहे. गेल्या साठ-पासष्ट वर्षात या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.सांगली,जत आदी ठिकाणच्या विभाजनाचा प्रश्नही प्रलंबित आहे.या प्रश्नांची सोडवनूक होण्याची गरज आहे.राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न तडीस नेण्याची गरज आहे.




नाट्यपंढरी सांगली


     विष्णूदास भावे यांनी 1843 साली सांगलीच्या भूमित सीतास्वयंवर हे पहिले नाटक सादर केले होते. त्यामुळे सांगलीला नाट्यपंढरीचा बहुमान मिळाला. भावे यांनी केवळ सांगलीतच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात आपल्या नाटकांचे प्रयोग केले.नगर,पुणे,बारामती तसेच झांशी,ग्वाल्हेर या ठिकाणीही नाटकाचे प्रयोग करत सांगलीच्या मातीचा नाट्यगंध रसिकांपर्यंत पोहचवला होता.गोपीचंद हे पहिले हिंदी नाटकही त्यांनी लिहिल्यामुळे आद्य हिंदी नाटककार म्हणूनही त्यांना संबोधले जाते. आद्य नाटककार म्हणून त्यांच्या नावाने असलेले नाट्यगृह आजही नाट्यचळवळ जपत आहे.त्यांच्या नावाच्या पुरस्काराला आजही संपूर्ण देशभरात मानाचे स्थान आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. त्याचे पहिले मानकरी नटसम्राट बालगंधर्व होते. त्यानंतर केशवराव दाते, आचार्य अत्रे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक,मास्तर कृष्णराव मामा पेंडसे,दुर्गा खोटे,पु..देशपांडे,.दि.माडगुळकर,पु.श्री.काळे, विठाबाई नारायणगावकर, प्रभाकर पणशीकर,वसंत कानेटकर, हिराबाई बडोदेकर,बापूराव माने,शरद तळवळकर,छोटा गंधर्व,दत्तोपंत भोसले,ज्योत्स्ना भोळे,माधव मनोहर,विश्राम बेडेकर, डॉ. जब्बार पटेल अशा अनेक दिग्गजांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.
     संगीत नाटकाचा सुवर्ण इतिहासही याच भूमित लिहिला गेला.सांगलीपासून अडीच मैलावर असणार्या हरिपूर गावातील पारावर या इतिहासाची सुवर्णपाने कोरली गेली. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावाला संगीत नाटकाचा इतिहास प्राप्त झाला आहे. गोविंद बल्लाळ देवल यांना याच ठिकाणी शारदेतील गीत स्फुरले. 13 जानेवारी 1899 रोजी शारदा या संगीत नाटकाचा प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळींनी केला. देवलांच्या या इतिहासाची पाने आजही येथील रंगकर्मी उघडतात. आणि त्यास वंदनही करतात. 13 जानेवारी 1999 रोजी येथील देवल स्मारक मंदिरने हरिपूरच्या त्याच पारावर शारदा नाटकाचा शताब्दी प्रयोग करून त्या स्मृतिंना आदरांजली वाहिली. ॅड्.मधुसुदन करमरकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते.
     स्त्री वेषभूषेत अनेक भूमिका अजरामर केल्या,त्या नटसम्राट बालगंधर्वाचा इतिहासही रंगकर्मींना वेढ लावणारा आहे.संपूर्ण महाराष्ट्रात या कलाकराच्या गाजलेल्या भूमिकांना ,त्या इतिहासाला मानाचा मुजरा केला जातो. जोहार मायबाप जोहार या भजनाच्या ओळी आजही आपसूक अनेकांच्या तोंडावर येतात. नारायण राजहंस हे त्यांचे मूळ नाव. मिरजेच्या ज्या नाट्यगृहात त्यांनी अनेक ऐतिहासिक प्रयोग केले, त्या नाट्यगृहास बालगंधर्वांचेच नाव दिले आहे.
     या रत्नमालिकेत नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर,मास्टर दीनानाथ मंगेशकर, गणपतराव मोहिते तथा मास्टर अविनाश अशा अनेकांचा समावेश झाला. अलौकिक आवाजाची देणगी लाभलेल्या मास्टर दीनानाथांनी आपला काळ गाजविला. सुरुवातीला त्यांनी ताज वफा, कांटो में फूल या हिंदी-उर्दू नाटकात संगीत भूमिका केल्या. अच्युतराव कोल्हटकरांनी त्यांना मास्टर ही पदवी बहाल केली.त्यानंतर बलवंत नाटक मंडळी स्थापन झाली. राम गणेश गडकरी,वीर वामनराव जोशी,स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेवशास्त्री खरे, विश्राम बेडेकर आदींची नाटके त्यांनी रंगमंचावर आणली. त्यांनी अनेक नाटकात स्त्री भूमिकाही साकारल्या. पुण्यप्रभाव, भावबंधन, उग्रमंडल,रणदुंदुभी,मानापमान,संन्यस्थ खड्ग,ब्रम्हकुमारी,राजसंन्यास अशी त्यांची गाजलेली नाटके आहेत. विष्णूदास भावे,देवल,खाडिलकर यांनी रंगभूमिचा पाया रचला आणि ही रंगभूमि पुढे नेण्याचे काम साम्गलीतील गणपतराव मोहिते तथा मास्टर अविनाश यांनी केले.
नाट्यचळवळींची ही परंपरा अखंडितपणे वहात असतानाच नव्या पिढीत नाट्यलेखक,नाटककार, कलाकार,दिग्दर्शक यांनी यात मोलाचे योगदान दिले. 1970 ते 85 च्या कालखंडात रंगभूमीवर अशाच कलाकारांनी आपले अस्तित्व सिद्ध करताना संपूर्ण राज्यभर आणि राज्याबाहेरही सांगलीचा डंका वाजविला. दिलीप परदेशीच्या रुपाने परंपरा पुढे नेणारा एक अस्सल नाटककार सांगलीच्या रंगभूमीला मिळाला. नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत परदेशींचे नाटक आहे का। अशी विचारणा रसिकांमधून व्हायची. रसिकप्रेक्षकांमध्ये परदेशींच्या नाटकांची इतकी जादू त्यावेळी निर्माण झाली होती. काळोख, अंतिम,निष्पाप,कहाणी, अस्त अशा त्यांच्या नाटकांनी रंगभूमी गाजवली. काळोख देतं हुंकार या त्यांच्या व्यावसायिक नाटकालाही मोठे यश लाभले.प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यावेळी त्यांची आठ ते दहा नाटके असायची. एकांकिका स्पर्धांमध्येही तितक्याच संख्येने एकांकिका दाखल व्हायच्या. रंगभूमी स्पर्धात्मक स्तरावर खर्या अर्थाने सक्षम करण्याचे मौलिक काम परदेशींनी केले.

     आम कुलकर्णी यांनीही रिंगण या नाटकाद्वारे नाट्यसृष्टीत आपला ठसा उमटविला. दिग्दर्शनाच्या स्तरावर चेतना वैद्य,प्रदीप पाटील,प्रकाश गडदे यांनीही रंगभूमी गाजविली.बडोदा विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम केलेले यशवंत केळकर यांनी नाट्यशिबिरांद्वारे याठिकाणच्या चळवळीला तेवत ठेवले. नाटक, संगीत नाटकाच्या परंपरेला नवी झळाळी मिळत असतानाच संगीत व अन्य पौराणिक कार्यक्रमांनीही स्वतंत्र अस्तित्व जपले. अशोक परांजपे यांनी इंडियन नॅशनल थिएटर ( आयएनटी) मार्फत सोंगी रामायण चे प्रयोग केले. राष्ट्रीय स्तरावर याला मोठे यश मिळाले.पुणे,मुंबई, दिल्ली इतकेच काय तर परदेशातही याचे प्रयोग झाले.
     दरम्यान, सांगलीला माधव खाडिलकर, आशा खाडिलकरांच्या रुपाने एक नाट्यदाम्पत्यही लाभले.सागरा प्राण तळमळला या नाटकाने चांगले यश मिळवले. शिवाजी विद्यापीठाच्या ललित कला विभागप्रमुख भारती वैशंपायन यांचेही योगदान उल्लेखनिय मानले जाते. श्रीनिवास शिंदगी यांनी बालनाट्यामध्ये अमूल्य योगदान दिले. वर्षा भावे यांनीही बालनाट्याचे अनेक प्रयोग केले. त्यांनी काही नाटकांना संगीतही दिले. डॉ. दयानंद नाईक,डॉ.मधू आपटे, रत्नाकर दिवाकर, बाबासाहेब पाटील, नाना ताडे, मुकुंद पटवर्धन, राजेंद्र पोळ,सुनील नाईक, अरुण मिरजकर, राम कुलकर्णी, अरविंद लिमये, वामन काळे, चंद्रकांत धामणीकर, विजय कडणे अशा अनेकांनी ही चळवळ नुसती जिवंत ठेवली नाही,तर त्यात अनेक बदलही केले. केवळ अभिनेता, अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर दिग्दर्शक, लेखक याचबरोबर नेपथ्यकार म्हणूनही सांगलीने राज्यात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अव्वल दर्जाचा नेपथ्यकार म्हणून सांगलीचे बाबा लिमये यांनी स्थान मिळवले होते. सांगलीचेच प्रवीण कमते यांनी चार्लीच्या जीवनावरील प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात तसेच दूरदर्शनवरही केले. चित्रपटांच्याबाबतीतही सांगलीने आपली छाप सोडली. दिलीप परदेशी लिखित अंगू बाजारल जाते हा चित्रपट तसेच सांगलीचेच आण्णासाहेब घाटगे यांनी पंढरीची वारी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात मोठे यश मिळाले.
     वैयक्तिक पातळीवर सुरू असलेले हे प्रयत्न संस्थास्तरावरही चालू होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अखिल महाराष्ट्र मराठी नाट्यविद्यामंदिर ,देवल स्मारक, अभिरुची, ॅक्टिव्ह, नाट्य, चित्रपट,कलाकार,तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट, सस्नेह ग्रुप, मिरजेतील नाट्यांगण आदी संस्थानींही आपली ताकद या चळवळीमागे उभी केली. मिरजेसारख्या ठिकाणी दरवर्षी नाट्यांगणने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरवून राज्यभरातील रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. देवल स्मारकने 13 जानेवारी 1999 रोजी हरिपूरच्या त्याच ऐतिहासिक पारावर देवलांच्या शारदा या संगीत नाटकाचा ऐतिहासिक शताब्दी प्रयोग केला. हा प्रयोग भालचंद्र पेंढारकर,वि,भा.देशपांडे, मास्टर अविनाश यांच्या साक्षीनेच नोंदला गेला. या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने राज्यभरातील शारदा नाटकाचा प्रयोग केलेल्या संस्थांचा सत्कारही करण्यात आला होता. देवलने 1990 ते 96 या कालावधीत अनेक नाटकांचे प्रयोग केले. राज्य नाट्य स्पर्धेलाच नव्हे तर दिल्लीतील स्पर्धेतही त्यांनी अनेकवेळा प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. शारदा, स्वयंवर,मत्स्यगंधा,कट्यार काळजात घुसली, संशयकल्लोळ या सर्व नाटकांनी दिल्लीत प्रथम क्रमांक मिळवित सांगलीचा झेंडा रोवला. नाट्यसृष्टीच्या इतिहासात दिल्लीत बक्षिसांच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 16 कॅटॅगिरीत प्रथम क्रमांक मिळवण्याचा पराक्रम ययाती-देवयानी या नाटकाने केला. दिल्लीच्या नाट्यैतिहासात याची नोंद आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या गेल्या चाळीस वर्षाच्या इतिहासात कधीही सांगलीच्या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला नव्हता.तोही पराक्रम 1996 ला स्वयंवर या नाटकाने केला. विक्रमावर विक्रम रचत रंगभूमीवर सांगलीने आपले नाव कोरले.खर्या अर्थाने ही नाट्यपंढरी आहे,हेसुद्धा वारंवार सिद्ध केले. गद्य नाटकात मधू आपटे यांच्याबरोबर अरुण नाईक, तारा भावाळकर, शैला गाडगीळ,मुकुंद फडणीस यांनीही कर्तृत्व सिद्ध केले.सांगलीच्या नाट्यैतिहासात सलग दहा नाट्यप्रयोग करण्याचा विश्वविक्रमही नोंदला गेला आहे.

     अनाहूत या नाट्यप्रयोगाचे 2003 मध्ये सलग चोवीस तासात दहा प्रयोग करण्यात आले. या नाट्यपंढरीच्या आणि महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. सांगलीत उगम पावलेला हा नाट्यप्रवाह खळखळत ठेवण्यात हजारो रंगकर्मीचा हात असला तरी त्यांच्या या प्रयत्नांना रसिकांनीही तितकाच सन्मान दिला.